द इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन (IAU) ही संस्था ग्रहांना आणि त्यांच्या विशेष पैलूंना नामनिर्देश करते. शुक्रग्रहाची देवता स्त्री आहे. त्यामुळे ‘आयएयू’ने या ग्रहाच्या सर्व पैलूंना स्त्रियांची नावे द्यायचे ठरवले. शुक्र ग्रहावरील तीन विवरांना तीन हिंदुस्थानी स्त्रियांची नावे दिली गेली आहेत. त्यातील एक सर्वाधिक लोकप्रिय विवर आहे ते म्हणजे ‘जोशी’ नावाचे विवर. हे विवर आनंदीबाई, त्यांचे लक्षणीय आयुष्य आणि त्यांचे यश यांच्या सन्मानार्थ नामांकित केले गेले आहे.
डॉ. आनंदीबाई जोशी या भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर. त्यांच्या जीवनावर आधारित ‘रॅडिकल स्पिरिटस्’ नावाचे एक नवीन पुस्तक ‘स्टोरी आर्टिसन प्रेस’ने प्रकाशित केले आहे. अमेरिकास्थित भारतीय नंदिनी पटवर्धन या पुस्तकाच्या मूळ लेखिका आहेत. याच इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद डॉ. श्रुती फाटक यांनी ‘डॉ. आनंदीबाई जोशी : प्रवास एका ध्यासाचा’ या नावाने केला आहे. दोन्ही पुस्तकांच्या मुखपृष्ठावर डॉ. आनंदीबाई जोशी यांचे छायाचित्र आहे. आनंदीबाईंच्या चेहऱ्यावर असणारे ज्ञानाचे तेज आणि कणखरपणा या दोन्ही गोष्टी दोन्ही पुस्तकांच्या नावांशी अत्यंत समर्पक आहेत. दोन्ही पुस्तके वाचायला हातात घेतली आणि वाचता वाचता शेवटी असे लक्षात आले की, पुस्तकाचे वजन जितके आहे, त्यापेक्षाही लेखिकेचे लेखन आणि मांडणी जास्त वजनदार आहे!
नंदिनी पटवर्धन या अनेक वर्षे अमेरिकेत स्थायिक आहेत. त्यामुळे अनेक अमेरिकन कुटुंबांशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध आहेत. स्वत: नंदिनी पटवर्धन यांनी आयआयटी, मुंबई येथून सिल्व्हर मेडलसह मॅथेमॅटिक्समध्ये मास्टर डिग्री मिळविली आहे. लेखिका नंदिनी यांना इतिहासाची आवड पहिल्यापासूनच आहे.
डॉ. आनंदीबाई जोशी यांच्याविषयी प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात आणि मनात एक वेगळे स्थान आहे. वाचन करता करता माझ्या मनात एक प्रश्न सतत येत होता, तो म्हणजे महाराष्ट्रात आनंदीबाईंविषयी पुष्कळ माहिती उपलब्ध आहे. डॉ. काशीबाई कानिटकर आणि अंजली किर्तने यांनी त्यांचे चरित्र लिहिले आहे. या शिवाय चित्रपट, दूरदर्शन मालिका इ. माध्यमांतूनही आनंदीबाई आणि त्यांच्या कर्तृत्वाचा परिचय लोकांना झाला आहे. आणखी कोणती नवी माहिती लेखिका या पुस्तकातून देणार आहे? परंतु हे पुस्तक वाचता वाचता प्रश्नाचे उत्तरही सहज मिळून गेले.
संगणकीकरणामुळे आणि तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे 20-25 वर्षांपूर्वीच्या स्थितीत आज खूप बदल झाला आहे. कोणतेही पुरावे कितीही लांब असले तरी ते अत्यंत जलद गतीने मिळवता येणे शक्य झाले आहे. आणि याच गोष्टीचा उपयोग लेखिकेने केला आहे.
मराठीशी परिचय नसलेल्या देशविदेशातील वाचक-अभ्यासकांना डॉ. आनंदीबाईंबद्दल माहीत व्हावे आणि ती माहिती नव्या स्वरूपात वाचकांसमोर सादर करावी या हेतूने मूळ पुस्तक इंग्रजीत लिहिले गेले आहे.
अमेरिकन लोकांना इतिहासाबद्दल आणि डॉक्युमेंटेशनबद्दल कायमच आस्था राहिली आहे. त्यामुळे अनेक पुरावे त्यांनी व्यवस्थित जतन करून ठेवलेले आहेत. अमेरिकेत असताना डॉ. आनंदीबाईंनी तिथून भारतात पाठवलेली अनेक पत्रे आज उपलब्ध आहेत. त्यातील बहुतेक सगळी इंग्रजीतच आहेत. माहिती मिळविण्यासाठी सुरूवात केल्यावर लेखिकेने अनेक लोकांशी चर्चा केली. ‘गूगल’ने अमेरिकन विद्यापीठांच्या ग्रंथसंग्रहातील बौद्धिक संपदा कायद्याच्या कचाट्यातून मुक्त केली आणि काही पुस्तके स्कॅनही करून ठेवली आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या विद्यापीठांशी संपर्क साधून लेखिकेला घरबसल्या माहिती मिळवता आली. मूळ इंग्रजी पुस्तकात जवळ जवळ अडीचशे पुरावे लेखिकेने दिले आहेत. या सर्व पुराव्यांची आणि त्या अनुषंगाने आशयाची मांडणी अतिशय वेधक आहे. ही माहिती या पुस्तकाच्या निमित्ताने प्रथमतःच लोकांसमोर येते आहे. तिचा उपयोग करून डॉ. आनंदीबाईंच्या आयुष्यातील अनेक प्रसंग लेखिकेने वाचकांसमोर सादर केले आहेत. त्यामुळेच एकदा हे चरित्र वाचायला घेतले की पुढे काय लिहिले आहे हे वाचण्याची उत्कंठा वाटत राहते.
नंदिनी पटवर्धन या नोकरी करत असतानाच शनिवार, रविवार या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी वेगवेगळया विद्यापीठांशी, संस्थांशी तंत्रज्ञानाद्वारे संपर्क करून घरबसल्या माहिती मिळवत असत. यानिमित्ताने तंत्रज्ञानाच्या सहाय्याने योग्य ठिकाणाहून अचूक माहिती जलद गतीने कशी मिळवावी याचा वस्तुपाठच लेखिकेने नव्या पिढीला घालून दिला आहे.
नंदिनी पटवर्धन
1865 ते 1888 हा डॉ. आनंदीबाईंचा जीवनकाळ, त्यांच्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा काळ. त्यांच्या आयुष्यात अनेक स्थित्यंतरे घडली. अनेक प्रसंग असेही घडले की जे आनंदीबाईंच्या जीवावर बेतले, तर काही प्रसंग त्यांच्या कुटुंबावर बेतले. वयाच्या आठव्या वर्षी त्यांचे लग्न त्यांच्याहून वयाने 20 वर्षे मोठे असलेल्या गोपाळराव जोशी यांच्यासोबत झाले. बाराव्या वर्षी त्यांना मूल झाले. वैद्यकीय सेवेचा अभाव असल्यामुळे मुलाचा दहा दिवसांतच मृत्यू झाला. आनंदीबाईंवर अनेक बंधने होती. त्याकाळी स्त्रीला संसारात दुय्यम स्थान होते. शिक्षणाचा अधिकार नव्हता. जी स्थिती आनंदीबाईंची होती त्यापेक्षा कितीतरी वाईट स्थिती समाजातील इतर स्त्रियांची होती. त्यामुळे स्त्रियांचे आरोग्यही निकृष्ट दर्जाचे होते. भारतावर ब्रिटिशांचे राज्य होते. त्या काळात परदेशगमनही निषिद्ध मानले होते. विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत अनेक सामाजिक समस्या होत्या. आनंदीबाईंचे यजमान श्री. गोपाळराव जोशी हे पुरोगामी विचारांचे होते, आनंदीबाईंचे शिक्षण गोपाळरावांच्या देखरेखीखाली मुख्यतः घरीच झाले. पुढे त्या शिक्षणासाठी मिशनरी स्कूलमध्ये दाखल झाल्या. स्त्रियांची परिस्थिती बदलायची असेल तर वैद्यकीय शिक्षण घेऊन आपण आपल्या देशातील स्त्रियांचे प्रश्न सोडविले पाहिजेत असे आनंदीबाईंचे विचार होते. आणि गोपाळरावांनाही तसेच वाटत होते.
शेवटी आनंदीबाई अमेरिकेत गेल्या, जातानाच्या प्रवासात त्यांना खूपच वाईट अनुभव आले. प्रवासात त्यांना मिसेस जॉन्सन भेटल्या. सुरुवातीला त्यांनी आनंदीबाईंना खूपच त्रास दिला परंतु आनंदीबाईंचे वर्तन असे होते की अंतिमतः मिसेस जॉन्सन यांना त्यांच्याविषयी प्रेमच निर्माण झाले. अमेरिकेत कार्पेटर मावशी यांच्याबरोबर त्यांचे खूपच प्रेमाचे संबंध आले. कार्पेटर मावशींच्या घरी गेल्यावर त्यांना एक प्रश्नावली देण्यात आली. त्यात एक प्रश्न असा होता की, तुझा येथे येण्याचा हेतू काय? 18 वर्षांच्या आनंदीने उत्तर दिले, उपयोगी पडावे म्हणून! असे अनेक प्रसंग नव्या माहितीच्या संदर्भाने लेखिकेने पुस्तकात फार उत्तम प्रकारे मांडले आहेत. आनंदीने आपल्या कामाने, वर्तनाने अमेरिकन लोकांच्या मनात एक स्थान निर्माण केले होते. ‘प्रसन्न वसंत’ या सदरात अशा प्रकारच्या अनेक प्रसंगांची वर्णने खूपच सुंदर केली आहे. एकूणच काय, तर पुस्तक अतिशय वाचनीय आहे!
लास्ट बट नॉट द लीस्ट, मूळ इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद करणाऱ्या डॉ. श्रुती फाटक यांचे काम असे आहे की तो अनुवाद वाटतच नाही. याचे कारण म्हणजे त्यांची लेखनशैली आणि आशयाची मांडणी. त्यांच्या अनुवादातील एक वाक्य विशेष लक्षात राहिले आहे, ‘हिंदुस्थानातील स्त्रियांचे उन्नयन व्हावे यासाठी आनंदीने आपल्या प्राणांची दिवटी लावली. त्यामुळे पुढचा स्त्री स्वातंत्र्याचा मार्ग प्रकाशित झाला.’
मूळ लेखिका नंदिनी पटवर्धन आणि अनुवादक डॉ. श्रुती फाटक या दोघींच्या ध्यासातून साकारलेली ही दोन्ही पुस्तके कायम संग्रही ठेवावीत अशीच आहेत.
लेखन पूर्ण झाल्यानंतर शेवटीही डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या कार्याची, कर्तृत्वाची आणि ध्यासाची दखल जागतिक स्तरावर कशी घेतली गेली याची माहितीही नंदिनी यांनी दिली आहे. द इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन (IAU) ही संस्था ग्रहांना आणि त्यांच्या विशेष पैलूंना नामनिर्देश करते. शुक्रग्रहाची देवता स्त्री आहे. त्यामुळे ‘आयएयू’ने या ग्रहाच्या सर्व पैलूंना स्त्रियांची नावे द्यायचे ठरवले. शुक्र ग्रहावरील तीन विवरांना तीन हिंदुस्थानी स्त्रियांची नावे दिली गेली आहेत. त्यातील एक सर्वाधिक लोकप्रिय विवर आहे ते म्हणजे ‘जोशी’ नावाचे विवर. हे विवर आनंदीबाई, त्यांचे लक्षणीय आयुष्य आणि त्यांचे यश यांच्या सन्मानार्थ नामांकित केले गेले आहे.
पुस्तकाचे नाव : रॅडिकल स्पिरिटस्
लेखिका : नंदिनी पटवर्धन
प्रकाशक : स्टोरी आर्टिसन प्रेस.
पृष्ठे : 315, मूल्य : 400 रुपये.
अनुवादित पुस्तकाचे नाव : डॉ. आनंदीबाई जोशी : प्रवास एका ध्यासाचा
अनुवाद : डॉ. श्रुती फाटक
मधुश्री प्रकाशन, पुणे
पृष्ठे : 324, मूल्य : 300 रुपये.
- सुनंदा साठे
Tags: पुस्तक परिचय महिला डॉक्टर डॉ. आनंदीबाई जोशी मधुश्री प्रकाशन चरित्रे आनंदीगोपाळ anandibai joshi book review anandigopal Load More Tags
Add Comment