भारत-चीन युद्धाची शक्यता कितपत?

दोन्ही देशांदरम्यान स्थिती ‘क्लियर अँड प्रेझेंट डेंजर’ अशी आहे, त्याचा निवडणुकीशी काहीही संबंध नाही!

प्रातिनिधिक चित्र | bbc.com

भारत व चीन यांच्यात येत्या काळात युद्ध होणारच नाही असे ठामपणे सांगणे अवघड असले तरी भारत व चीन यांच्यातील सीमेबाबत भारताची गेल्या 70 वर्षांतील भूमिका अगदी स्पष्ट आहे. भारत हा वाद युद्धाने सोडवू इच्छित नाही. चर्चा, संवाद, मुत्सद्देगिरी व 2020च्या घटनेनंतर काहिसा लष्करी दबाव या मार्गानेच दोन्ही देशांतील वाद सोडविण्याची भारताची भूमिका आहे. चीनचे समग्र राष्ट्रीय बळ हे भारतापेक्षा अडीच पटीने अधिक आहे, याची भारताला जाणीव आहे. त्यामुळे भारतासाठी युद्धाचा पर्याय हा अगदी शेवटचा आहे. मग चीनने युद्ध लादले तर काय, असा प्रश्न उपस्थित होतो.

भारत आणि चीन यांच्यासंबंधीच्या दोन बातम्या सध्या गाजत आहेत… एक, भारताने चीनबरोबरच्या सीमेवर 10 हजार सैनिकांची कुमक पाठवली आहे ही. तर दुसरी, 2025 ते 2030 या कालवधीत केव्हातरी भारत व चीन यांच्यात युद्ध होण्याची शक्यता आहे, असे एका पाश्चात्य संस्थेने केलेले भाकित ही. या दोन बातम्यांचा अर्थ लावण्याचा हा प्रयत्न.

मोदी सरकारचे विरोधक या दोन्ही बातम्यांकडे निवडणुकीच्या काळातला स्टंट म्हणून पाहत आहेत. पण भारत-चीन संबंधांकडे जागरूकपणे पाहणारे या बातम्यांकडे इतक्या सहजपणे पाहू शकत नाहीत. कारण दोन्ही देशांतले संबंध गेल्या चार वर्षांपासून गंभीर अशा तणावाचे आहेत. दोन्ही देशांचे सैन्य थोडे अंतर राखून पण समोरासमोर आहे. संबंध तणावाचे असताना सैन्य समोरासमोर असेल तर परिस्थिती फारशी आश्वासक नसते. अशा स्थितीत परस्पर अविश्वास असतो आणि दोन्ही पक्ष एकमेकांच्या हालचालींकडे सतत संशयाने पाहत असतात. त्यामुळे स्थिती ‘क्लियर अँड प्रेझेंट डेंजर’ अशी आहे. त्याचा निवडणुकीशी काहीही संबंध नाही.

आता यातल्या पहिल्या बातमीचा विचार करू या. भारताने चीन किवा तिबेट सीमेवर 10 हजार नवे सैन्य पाठविले आहे, ही बातमी अमेरिकेच्या ‘ब्लूमबर्ग’ या वृत्त व माहिती संस्थेने 7 मार्च रोजी एका वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिली आहे. या बातमीचा भारताकडून ना इन्कार करण्यात आला ना तिला दुजोरा देण्यात आला. पण चीनच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्तीने मात्र या बातमीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे व एक प्रकारे भारताने दोन्ही देशांच्या सीमेवर जादा 10 हजार सैन्य आणल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. त्यामुळे या बातमीत तथ्य आहे, हे स्पष्ट आहे. आता प्रश्न हा आहे की, भारताने अचानक आपल्या पश्चिम सीमेवरील दहा हजार सैनिक काढून ते चीन सीमेवर का नेले व ते नेमके लडाख ते अरुणाचल या लांब सीमेवर नेमके कुठे नेले? भारताने असे सैन्य हलविल्याचे अधिकृतपणे सांगितलेलेच नाही, त्यामुळे ते नेमके कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या परिस्थितीत हलविले हे सांगण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. शिवाय सैन्याच्या हालचाली गुप्त ठेवण्याचा प्रघात आहे. पण 19 फेब्रुवारीला दोन्ही देशांच्या सैन्यात चुशुल येथे कोअर कमांडर पातळीवरची 21वी बैठक झाल्यानंतर लगेच ही घटना घडली आहे, त्यामुळे सैन्याच्या या हालचालीविषयी तर्ककुतर्क केले जात आहेत. मुळात 19 फेब्रुवारीची लष्करी बैठक ही अचानक झाली. या बैठकीची कोणतीही पूर्वसूचना माध्यमांना नव्हती. तसेच ही बैठक भारताच्या विनंतीवरून झाली की चीनच्या हेही कळू शकलेले नाही. पण या बैठकीआधीच्या काही घटना लक्षात घेतल्या तर ही बैठक चीनच्या विनंतीवरून झाली असावी असे वाटते. कारण 17 फेब्रुवारीला म्युनिक सुरक्षा परिषदेत चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी स्वत: चालत भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्याकडे गेले व त्यांच्याशी काही तरी बोलले, त्यानंतर दोनच दिवसांत ही लष्करी बैठक झाली.

भारताने गेल्या काही महिन्यांत अरुणाचल भागात हवाई कवायती केल्या होत्या. परदेशी लष्करांबरोबरही भारत-चीन सीमेवर कवायती केल्या होत्या. मुख्य म्हणजे चीनने दावा केलेल्या प्रदेशात भारतीय मेंढपाळ गुरे चरावयास नेत असल्याचा व त्यांना चिनी सैनिक अडवित असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ही सर्व पार्श्वभूमी या बैठकीमागे असू शकते. त्यानंतर ही 10 हजार जादा सैनिक पाठविण्याची घटना घडली आहे. त्या घटनेमागचा आणखी एक तर्क असा असू शकतो की, भारताने उत्तराखंड राज्याला लागून असलेल्या तिबेट सीमेवर एक नवा लष्करी विभाग ‘18 वी कोअर’ या नावाने स्थापन केला आहे. त्यात 45 हजार सैनिक असतील. उत्तराखंड राज्याला लागून असलेली सीमा फारशी वादग्रस्त नाही, पण तेथील बाराहोती या भागावर चीन दावा करीत आला आहे. सध्याच्या तणावाच्या परिस्थितीत या भागाची संरक्षण व्यवस्था भक्कम करणे आवश्यक आहे, त्यामुळे भारताने खबरदारीचा उपाय म्हणून हा नवा लष्करी विभाग स्थापन केला आहे. या विभागाची सैन्य संख्या व रचना आता निश्चित झाली आहे, त्याचा भाग म्हणून हे दहा हजार सैन्य पाठविले असेल तर त्यात बातमी ती काय असणार. पण ‘ब्लूमबर्ग’ने ही एक बातमी केली आहे व ती खळबळजनक आहे. त्यामुळे हे सैन्य पाठविण्याची कारणे निश्चितच वेगळी असली पाहिजेत. त्यामुळे हे सैन्य अरुणाचलच्या तवांग भागात किवा पूर्व लडाखच्या भागातच पाठवले असावे असा तर्क काढता येतो.

अरुणाचलचा विचार करायचा झाला तर हा भाग सैनिक हालचालींसाठी अवघड आहे, त्यातच भारतीय सैन्याची ठाणी ही उंचावर असल्यामुळे चिनी सैन्याला परिस्थिती फारशी अनुकूल नाही. शिवाय या भागातला चीनचा दावा हा डावपेचात्मक आहे, त्यामुळे या भागात भारताला जादा सैन्य पाठविण्याची गरज नाही. त्यामुळे हे सैन्य पूर्व लडाख भागातच पाठविले असावे हाच तर्क योग्य ठरू शकतो. एप्रिल 2020 मध्ये याच भागातील गलवान परिसरात चीनने आक्रमण करून भारतीय सैन्यावर हल्ला केला होता व त्यात 20 भारतीय सैनिकांना वीरमरण आले होते. भारताने लेहपासून दौलतबेग ओल्डी येथील सर्वाधिक उंच धावपट्टीपर्यंत दोन्ही देशांतील नियंत्रणरेषेला समांतर असा रस्ता बांधल्यापासून चीन अस्वस्थ आहे. कारण हे ठिकाण नियंत्रणरेषेपासून फक्त 8 किमी अंतरावर आहे व येथून तिबेट-झिंगझियांग महामार्ग फक्त 20 किमी अंतरावर आहे. शिवाय चीनने व्यापलेले डेपसांग पठार दौलतबेग पासून अगदी जवळ आहे, त्यामुळे चीन या भागात सतत आपली कुमक वाढवत असतो. चीनने या भागात आणखी सैन्य आणल्याची खबर भारताच्या लष्कराला लागली असावी व त्यामुळेच भारताने जादा 10 हजार सैन्य या भागात पाठवले असावे असा तर्क करण्यास जागा आहे.

आता दुसरी बातमी. ही बातमी रॉयल युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूट (रुसी-RUSI) या लंडनस्थित थिंकटँकच्या अहवालावर आधारित आहे. हा अहवाल समीर टाटा नावाच्या भारतीय वंशाच्या अमेरिकन तज्ज्ञाने तयार केला आहे. पोलिटिकल रिस्क अ‍ॅनालिस्ट असलेल्या समीर टाटाने तयार केलेल्या अहवालाचा थोडक्यात आशय असा आहे की, पूर्व लडाखला लागून असलेल्या खाशगर भागात इराणहून एक गॅस वा तेलवाहक पाइपलाइन येणार आहे व तेथे चीनचा मोठा तेल व गॅस साठा असणार आहे. पूर्व लडाखमधून भारत या साठ्याला लक्ष्य करू शकतो. विशेषत: युद्धाच्या स्थितीत मल्लाका सामुद्रधुनी व ग्वादर बंदराची कोंडी करून भारताने समुद्रमार्गे होणारा चीनचा तेल पुरवठा रोखला तर इराण ते खाशगर हाच एक तेल पुरवठा मार्ग उरतो. तो भारताने लक्ष्य केला तर चीनची कोंडी होऊ शकते. शिवाय भारत पूर्व लडाख अथवा कारगिल भागातून पाकव्याप्त काश्मीरमध्ये हल्ला करून चीन पाकिस्तान आर्थिक महामार्गाला लक्ष्य करू शकतो. हे दोन्ही धोके टाळण्यासाठी चीन पूर्व लडाखमध्ये तीन टप्प्यांत लष्कराचे आधुनिकीकरण करीत आहे, ते 2027 मध्ये पूर्ण होईल व त्यानंतर पूर्व लडाखपासून कारगिलपर्यंतचा भाग निर्धोक करण्यासाठी चीन पूर्व लडाखमध्ये आक्रमण करून भारताला मागे ढकलण्याचा प्रयत्न करील, असे या अहवालात म्हटले आहे.


हेही वाचा : बलाढ्य चीन भारताला का घाबरतो? - प्रभाकर देवधर


भारत व चीन यांच्यात येत्या काळात युद्ध होणारच नाही असे ठामपणे सांगणे अवघड असले तरी भारत व चीन यांच्यातील सीमेबाबत भारताची गेल्या 70 वर्षांतील भूमिका अगदी स्पष्ट आहे. भारत हा वाद युद्धाने सोडवू इच्छित नाही. चर्चा, संवाद, मुत्सद्देगिरी व 2020च्या घटनेनंतर काहिसा लष्करी दबाव या मार्गानेच दोन्ही देशांतील वाद सोडविण्याची भारताची भूमिका आहे. चीनचे समग्र राष्ट्रीय बळ (comprehensive national power) हे भारतापेक्षा अडीच पटीने अधिक आहे, याची भारताला जाणीव आहे. त्यामुळे भारतासाठी युद्धाचा पर्याय हा अगदी शेवटचा आहे. मग चीनने युद्ध लादले तर काय, असा प्रश्न उपस्थित होतो. तशा अवस्थेत भारताला जी काही साधने हाती असतील ते घेऊन युद्धाला तोंड द्यावे लागेल. पण चीन भारताशी थेट व व्यापक युद्ध करील ही शक्यता खूप कमी वाटते. कारण भारत ही चीनला टक्कर देऊ शकेल अशी लष्करी शक्ती आहे शिवाय युद्ध कोणत्या क्षणी कसे वळण घेईल याची कोणतीच हमी नसते. 100 टक्के विजयाची खात्री असल्याशिवाय चीन युद्धाच्या भानगडीत पडेल असे वाटत नाही आणि अशी हमी चीनला कधीच असणार नाही. चीनचा भर (1962 चा अपवाद वगळता) हा आतापर्यंत लष्करी दबाव टाकून आपल्या पदरात हवे ते पाडून घेण्याचा राहिला आहे. सध्या तरी भारताचा भर हा अशा लष्करी दबावाला तोंड देता येईल अशी तयारी करण्यावर आहे. भारताने अगदी कंठाशी आल्यावर हा दबाव टाळण्यासाठी भारत व चीन सीमेवर 50 हजार सैन्य व युद्धसामुग्री पाठवली आहे. चीनशी युद्ध करणे हा त्यामागचा हेतू नाही. त्यामुळे भारत काशगरच्या चीनच्या तेलसाठ्यावर हल्ला करण्याची शक्यता नाही. अर्थात चीनला भारत तशी हमी देणार नाही, त्यामुळे चीनला या तेलसाठ्याच्या सुरक्षेची काळजी घ्यावी लागेल.

भारत व चीन दोन्ही देश अण्वस्त्रधारी आहेत. दोन्ही देशांकडे परस्परांचा प्रचंड विध्वंस करू शकेल अशी अस्त्र सामुग्री आहे. दोन्ही देशांचे युद्ध झाले तर विजेता कोणीही असणार नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे भारत व चीन युद्धाची शक्यता खूपच कमी आहे. पण भविष्यात काय दडले आहे ते कधीच सांगता येत नसल्यामुळे दोन्ही देश सतत शस्त्रसज्ज होत राहतील. कदाचित त्यामुळेच, येत्या काळात केव्हातरी सीमाप्रश्नावर तोडगा काढण्याची आवश्यकता दोन्ही देशांना वाटू शकते. गलवान घटनेनंतर दोन्ही देशांचे सैन्य चर्चेसाठी 21 वेळा भेटले ही एक आश्वासक बाब आहे. दुसरे म्हणजे, चीन हा भारताचा दुसरा मोठा व्यापारी सहयोग असलेला देश आहे. हा दुहेरी व्यापार 2023 मध्ये 135.98 अब्ज डॉलर इतका विक्रमी झाला आहे. हा व्यापार चीनच्या फायद्याचा असल्यामुळे सध्याच्या आर्थिक अडचणीच्या काळात चीन युद्ध करून हा व्यापार बंद पाडणार नाही, असे वाटते. पण चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे अतिशय महत्त्वाकांक्षी व विस्तारवादी नेते आहेत, त्यामुळे चीनशी कधीही युद्धाची शक्यता गृहीत धरूनच भारताला आपली तयारी करावी लागेल.

- दिवाकर देशपांडे, वाशी, नवी मुंबई.
diwakardeshpande@gmail.com
(लेखक वरिष्ठ पत्रकार आहेत.)


हेही वाचा : चीनच्या विकासशैलीमुळे चीनमध्ये आणि जगात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.चीनचे जागतिक व्यवस्थेमध्ये शांततापूर्ण मार्गाने सामिलीकरण कसे करायचे, हा आता जगापुढील मोठा प्रश्न आहे. मागील चाळीस वर्षांतील चीनच्या या आर्थिक आणि राजकीय वाटचालीचा, त्यामागील विविध प्रेरणांचा आणि त्यामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांचा मागोवा या पुस्तकात घेतला आहे.

 

Tags: indo-china relations india china war international politics diwakar deshpande भारत चीन युद्ध आंतरराष्ट्रीय राजकारण दिवाकर देशपांडे Load More Tags

Add Comment