अमेरिकन निवडणुकीमध्ये मतदान करताना...

अध्यक्षीय निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याविषयी....

फोटो सौजन्य: variety.com

जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्र आणि सर्वात जुनी लोकशाही म्हणून लौकिक असलेल्या अमेरिकेत निवडणुकांमध्ये ईव्हीएम  वापरत नाहीत, कागदावरच मतदान होते. इथे केंद्रीय निवडणूक आयोग नाही. निवडणुकांचा निकाल स्थानिक म्हणजे अगदी जिल्हा/तालुका पातळीवर स्थानिक अधिकारी जाहीर करतात आणि तोच प्रमाण मानला जातो. पराभव दिसू लागल्यावर राष्ट्राध्यक्षांनी यंत्रणांवर दबाव टाकायचा प्रयत्न केला तरी शेकडो-हजारो अधिकारी ताठ मानेने तो दबाव झुगारून लावतात. राष्ट्राध्यक्षांनी न्यायालयात धाव घेऊन निवडणूक प्रक्रियेत मोडता घालायचा प्रयत्न केला तर न्यायालय एकदा नाही तब्बल सहा वेळा तो प्रयत्न हाणून पाडते. भविष्यात भारतातही अशा चारित्र्याचे अधिकारी आणि अशा व्यवस्था प्रस्थापित होतील अशी आशा करू या. 

अमेरिकेत अध्यक्षपदासाठी सध्या होत असलेल्या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याविषयी....
हा लेख लिहितो आहे तेव्हा अमेरिकेची निवडणूक रोमांचक टप्प्यावर आली आहे. ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या कारकिर्दीतील असह्य, असभ्य आणि मनमानी कारभार संपुष्टात येईल अशी अनेक चिन्हे दिसत आहेत. बायडेन या विरुद्ध पक्षाच्या नेत्याला अनेक सत्ताधारी पक्षाच्या माजी नेत्यांनी आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी तसेच शेकडो सैनिकी अधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. 3 नोव्हेंबरला प्रत्यक्ष मतदान झाले... परंतु त्याआधीच दहा कोटी अमेरिकन नागरिकांनी मतदान केंद्रावर जाऊन किंवा पोस्टाद्वारे मतदान केले. अमेरिकेच्या इतिहासात अभूतपूर्व अशी ही घटना घडली. ट्रम्प यांच्या कारभारावर लोक एकतर प्रचंड नाराज आहेत किंवा प्रचंड खूश आहेत. मधल्या मताचे कोणी सहसा दिसून येत नाही... त्यामुळे दोन्ही बाजूंच्या लोकांनी प्रचंड विक्रमी मतदान केले आहे. मागच्या निवडणुकीत अंदाजे साडेबारा कोटी मतदारांनी मतदान केले होते. या वर्षी एकूण मतदान तब्बल चौदा कोटींहून अधिक झाले आहे. 

या क्षणी 50 प्रांतांपैकी 45 प्रांतांचा अनधिकृत निकाल स्पष्ट झाला आहे. (अनधिकृत म्हणजे मतमोजणीवर आधारित वेगवेगळ्या चॅनेल्सने केलेला अंदाज. तो निकाल पुढे अधिकृत व्हायला वेगळी प्रक्रिया असते आणि त्याला दोनचार आठवडे लागतात... पण हा निकाल सहसा बदलत नाही.)  45 प्रांतांतून बायडेन यांना गरज असलेल्या 270 इलेक्टोरल मतांपैकी 264 आणि ट्रम्प यांना 214 मते मिळतील असा अंदाज आहे. (मागच्या लेखात मी इलेक्टोरल कॉलेजबद्दल लिहिले आहे). उरलेल्या 5 प्रांतांमध्ये मतमोजणी अतिशय चुरशीची होत चालली आहे. नेवाडा (6), पेनसिल्व्हेनिया (20), जॉर्जिया (16), नॉर्थ कॅरोलिना (16) आणि अलास्का (3) असे ते पाच प्रांत आणि उरलेली मते आहेत. बायडेन सध्या नेवाडा या प्रांतांमध्ये आघाडीवर आहेत. पेनसिल्व्हेनिया आणि जॉर्जिया या प्रांतातही ते आघाडीवर असले तरी दोघांमधले अंतर अगदी कमी आहे. जर तिथे ते जिंकले तर त्यांच्या एकूण जागा 270 होऊन ते अध्यक्ष होतील. पेनसिल्व्हेनिया आणि जॉर्जिया या प्रांतांमध्येसुद्धा बायडेन जिंकतील असे चित्र आहे. नॉर्थ कॅरोलिना आणि अलास्का प्रांतांत ट्रम्प जरी आघाडीवर असले तरीही त्यांचे मताधिक्य कमी होत चालले आहे.

बायडेन यांच्या विजयाची चाहूल आधीच लागल्यामुळे ट्रम्प यांनी अमेरिकेच्या इतिहासात अभूतपूर्व म्हणता येईल अशा असभ्य पद्धतीने बायडेन यांच्यावर टीका केली होती. अमेरिकेच्या राजकारणात आणि समाजजीवनात व्यक्तिगत असभ्य टीका सहसा कधी दिसत नाही. मतभेद असले तरीही अतिशय समंजसपणे ते व्यक्त करण्याची पद्धत आहे. राष्ट्राध्यक्ष तर सर्व अमेरिकन नागरिकांचा मानबिंदू असल्यामुळे त्यांच्याकडून अजूनच जास्त अपेक्षा असतात... परंतु ट्रम्प यांना संकेत, शिष्टाचार किंवा प्रथा मान्य नाहीत. त्यांच्यासाठी विजय म्हणजे सर्व काही आहे... त्यामुळे पराभव दिसू लागल्यावर ट्रम्प यांनी संपूर्ण निवडणूक यंत्रणेवर आणि विरोधी पक्षांवर बेताल आरोप करायला सुरुवात केली आहे. ते हरले तर निवडणुकीत घोटाळा झाल्याचे ते लक्षण आहे असे ते सांगू लागले. विरोधक सरळ मार्गाने जिंकणारच नाहीत अशी आपल्या समर्थकांची धारणा करून दिल्यामुळे आपण देशात फूट पडतो आहोत याचे भानही त्यांना राहिले नाही. 

जिथे ट्रम्प पिछाडीवर आहेत तिथे पुन्हा मतमोजणी करण्यात यावी अशी मागणी आता त्यांनी केली आहे... कारण त्यांना खातरी आहे की, तेच जिंकणार आहेत... मात्र ते जिथे पुढे आहेत तिथे मतमोजणी बंद करण्यात यावी... कारण तिथे घोटाळा चालू आहे असेही त्यांचे म्हणणे आहे... परंतु सुदैवाने अमेरिकेत माणसे स्वतंत्र विचाराची आणि बाण्याची असतात आणि प्रांत केंद्राचे बटीक नसतात... त्यामुळे राष्ट्राध्यक्ष असला तरीही त्याला न जुमानता आपले कर्तव्य पार पाडत अनेक प्रांतांच्या अधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी ट्रम्प यांना अप्रत्यक्षरीत्या ठणकावले आहे. अमेरिकेच्या या व्यवस्थेला आणि अशा चारित्र्यवान अधिकाऱ्यांना आणि नेत्यांना खरोखरच दंडवत! 

मतदानाचा माझा अनुभव 
दोनचार दिवसांपूर्वी मी आणि बायको दोघे मतदान करायला गेलो. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी खूप गर्दी होईल म्हणून आधीच गेलो. अमेरिकेत तुम्ही राहत असलेल्या जिल्हा-तालुक्यात तुम्ही कुठेही मतदान करू शकता. आम्ही त्यातल्या त्यात जवळ असलेल्या चारपाच मैलांवरील एका ठिकाणी गेलो. एका शाळेशेजारी कम्युनिटी सेंटर होते. त्यात संपूर्ण व्यवस्था केली होती. गर्दी भरपूर होती पण कुठेही गोंधळ नव्हता. गाडी लावून इमारतीत जायच्या आधी ‘काही मदत हवी का?’ ते वेगवेगळ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला विचारले. काही उमेदवार जवळ येऊन त्यांची बाजू मांडू लागले. मुख्य निवडणूक अध्यक्षपदाची असली तरीही इतर किमान 10 वेगवेगळ्या पदांचीसुद्धा निवडणूक त्याच वेळी होती. काही स्थानिक कोर्टांचे न्यायाधीश, सरकारी शाळेच्या नियामक मंडळाची काही पदे, एक खासदार अशा किमान चारपाच वेगवेगळ्या पदांसाठी आम्ही मतदान करणार होतो. 

आम्ही मतदानाच्या सभागृहात प्रवेश केला. आपल्याकडच्या कुठल्याही लग्नमंडपापेक्षा दुप्पट, चौपट मोठे असे ते सभागृह होते. सुरुवातीला एका महिला अधिकाऱ्याने नाव आणि पत्ता विचारला. कुठलेही ओळखपत्र मागितले नाही. स्वतःच्या हाताने कागदावर माहिती भरूनमतदान करणार की कॉम्प्युटरच्या मदतीने? असे तिने विचारले. मी म्हटले- कॉम्प्युटरवर. त्यावर तिने एक कोरा कागद दिला. तो घेऊन मशीनपाशी गेलो. इथे मशीन तुम्हाला प्रश्न विचारते आणि तुम्ही दिलेली उत्तरे प्रिंट करून तो कागद तुम्हाला परत देते. मग तो कागद घेऊन दुसऱ्या अधिकाऱ्याकडे जायचे. अधिकारी तो कागद त्याच्या कॉम्प्युटरमध्ये घालतो आणि तिथे तुमचे मत नोंदवले जाते. इतकेच नाही तर तुम्हाला तुमचे मत खरेच नोंदवले गेले आहे की नाही हे नंतर इंटरनेटवरून तपासता येते. 

अमेरिका आपल्या नागरिकांच्या मताधिकाराबद्दल आणि लोकशाहीबद्दल अतिशय जागरूक असल्यामुळे त्यांनी ईव्हीएमसारख्या असुरक्षित गोष्टी न वापरता आपली मतदानप्रक्रिया सुलभ आणि वेगवान केली आहे. दरवर्षी मतदानाच्या दिवशीच निकाल जाहीर होतो... मात्र या वर्षी कोरोनामुळे अनेकांनी पत्राने मतदान केले आणि म्हणून या वर्षी निकाल लागायला उशीर लागणार आहे. 

मी कॉम्प्युटरवर मतदानाला सुरुवात केली तर लक्षात आले की, उमेदवारांची संख्या काही प्रचंड नव्हती. दोन किंवा फार तर फार चारच उमेदवार होते. अमेरिकेत भ्रष्टाचार करता येत नाही... त्यामुळे निवडून येऊन लोकांचे काम करण्याची पद्धत असल्यामुळे निवडणूक लढवायला द्यावा लागणारा वेळ, पैसे आणि श्रम या गोष्टी खर्च करायला बहुतांश जण तयार नसतात. मी सर्वांत आधी राष्ट्राध्यक्षांसाठी मतदान केले. त्यानंतर पुढचा प्रश्न होता आमच्या प्रांताच्या खासदाराचा. त्यासाठीही मी मतदान केले.

सर्किट जजच्या चार जागांसाठी पाच लोक उभे होते. त्यांपैकी चार लोकांना मी मतदान केले आणि त्यानंतर शाळांच्या नियामक मंडळावर उभ्या असलेल्या सुनील दासगुप्ता या आपल्या भारतीय व्यक्तीला मतदान केले. घरी जाता-जाता मी त्याला हात करून सांगितले की, तुलाच मत दिले. तो खूश झाला. एकूणच अमेरिकेत निवडणुकीसाठी उभे राहणे सामान्य माणसासाठी मुळीच अवघड नाही. 

- पराग जगताप, अमेरिका    
paraglj@gmail.com

(लेखक, खाजगी व्यावसायिक असून गेल्या 20 वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्यास आहेत.) 



अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकांशी संबंधित हे लेखही वाचा : 

जो बायडन: अमेरिकेचे संभाव्य राष्ट्राध्यक्ष?

स्वच्छ कौल मिळेल, शांततेत सत्तांतर होईल?

Tags: अमेरिका अमेरिकन अध्यक्षीय निवडणुका पराग जगताप जो बायडन डोनाल्ड ट्रम्प भारत निवडणूक निकाल लोकशाही US Elections America US Presidential Elections Joe Biden Donald Trump Parag Jagtap Load More Tags

Comments:

Parag

प्रशांत धन्यवाद. तुझी प्रतिक्रिया पाहून बरे वाटले. कधी तरी फोन वर बोलू .. पण याचा जरूर विचार कर की अमेरिकेत टॉयलेट सुद्धा ऑटोमॅटिक असते पण त्यांनी EVM मात्र कागदावर का ठेवले आहे. त्याउलट आपल्याकडे साधे रस्ते पाणी वीज नाही पण मतदान यंत्रे एकदम अमेरिकेच्या पुढे ? विचार करा

Prashant Modale

छान माहिती आहे अमेरिकेतील निवडणूक मतदान प्रक्रियेची ! भारतातही निवडणूक आयोग वेगवेगळया अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने जास्तीत जास्त निरपेक्ष प्रक्रिया घडवून आणतो. हेही वास्तव आहे आणि evm मशीन मध्ये घोटाळा करणे खूप अशक्य आहे कारण प्रत्यक्ष अंतिम मतदान होण्यापूर्वी त्याची दोन तीन वेळा mock टेस्ट केली जाते आणि ती वेगवेगळ्या ठिकाणी आणि पातळीवर केली जाते. आणि हे करणारे सर्व कर्मचारी वेगवेगळया ठिकाणचे असतात जे एकमेकांना पूर्णपणे अनोळखी असतात. हे सर्व माझ्या मित्राने, जो सर्व राजकारणी लोकांना कायम शिव्या घालत असतो, त्याच्याशी बोलताना कळलेली माहिती आहे. तो या निवडणूक व्यवस्थेचा एक वरिष्ठ जबाबदार अधिकारी म्हणून काम करत असतो.

Add Comment