अमेरिका हे आर्थिक आणि सैनिकी अशा दोन्ही अर्थांनी जगातील सर्वात शक्तिमान राष्ट्र आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेली व्यक्ती संपूर्ण जगाच्या अर्थकारणाला आणि राजकारणाला दिशा देऊ शकते. साहजिकच सर्व जगाचे लक्ष अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे लागलेले असते. या निवडणुकांचे स्वरूप; त्यामध्ये जनता, पत्रकार, राजकीय पक्ष, व्यवसाय इत्यादींचा असणारा सहभाग; अमेरिकन लोकांसाठी महत्त्वाचे असणारे विषय... या गोष्टींवर टाकलेला हा ओझरता दृष्टिक्षेप...
अमेरिकन राज्यपद्धती आणि निवडणूक यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात सत्तेचा समतोल राखला गेला आहे. भारताच्या तुलनेत इथे गोष्टी बऱ्याच वेगळ्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे राष्ट्राध्यक्षनिवडीसाठी इथे थेट जनतेतून निवडणूक घेतली जाते. भारतामध्ये आपण खासदार निवडून देतो आणि ते खासदार पंतप्रधान निवडतात. भारतात घटनात्मकरीत्या पंतप्रधानांपेक्षा राष्ट्रपती हे पद मोठे मानले गेले आहे. अमेरिकेत तसे नाही. अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष हेच सर्वोच्च पद आहे. प्रशासन आणि सैन्य दोन्हींचे प्रमुख राष्ट्राध्यक्ष असतात... त्यामुळे अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष मोकळेपणाने निर्णय राबवू शकतो आणि त्याची बांधिलकी थेट जनतेशी असते.
दुसरा महत्त्वाचा फरक म्हणजे अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष एका पक्षाचा असला तरी संसदेची दोन्ही दालने विरुद्ध पक्षाच्या ताब्यात आहेत असे घडू शकते. अमेरिकेच्या मूळ पुरुषांनी (फाउंडिंग फादर्सनी) देशाची घडीच अशी बसवली आहे की, कोणाही एका व्यक्तीला किंवा पक्षाला अमर्याद अधिकार मिळत नाहीत.
तिसरी बाब म्हणजे अमेरिकेत निवडून आलेल्या कोणत्याही पदाचा एक विशिष्ट काळ आणि निवडणुकीचे एक विशिष्ट चक्र असते. जर त्या काळात कुणी राजीनामा दिला तर त्या पदाचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत त्या जागी हंगामी व्यक्ती नेमली जाते आणि निवडणुकांचे चक्र कायम राहते. राष्ट्राध्यक्ष चार वर्षे, सिनेटचे खासदार सहा वर्षे तर प्रतिनिधीगृहाच्या खासदारांचा काळ दोनच वर्षांचा असतो. प्रतिनिधीगृह पैशांवर लक्ष ठेवते... त्यामुळे तिथे भ्रष्टाचार होऊ नये म्हणून दोन वर्षांची मर्यादा ठेवली आहे. एक तृतीयांश सिनेट दर दोन वर्षांनी निवडली जाते.
अमेरिकेत एकाच पक्षाची निरंकुश सत्ता क्वचितच असते. केंद्रात (फेडमध्ये) जरी निरंकुश सत्ता प्राप्त झाली तरीही राज्ये खूप स्वतंत्र असतात. राज्य आणि शहर/गाव पातळीवर सहसा निम्म्या प्रमाणात विरोधी पक्षाचे वर्चस्व असते. अमेरिकेत अमर्याद सत्ता कोणाला मिळू नये याची अशा प्रकारे काळजी घटनेतच घेतली आहे.
इलेक्टोरल कॉलेज
असे असले तरीही चंद्रावरील काळ्या डागाप्रमाणे अमेरिकेच्या निवडणूक पद्धतीतही एक कच्चा दुवा निर्माण झाला आहे. गेल्या काही काळात अमेरिकेत अशी एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे की, सर्वाधिक मते मिळवणारी व्यक्ती राष्ट्राध्यक्ष होईलच असे नाही. अमेरिकेचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 2016च्या निवडणुकीत जिंकले खरे... पण सर्वाधिक मते हिलरी क्लिंटन यांना मिळाली होती... ट्रम्प यांच्यापेक्षा तब्बल तीस लाख मते जास्त! सध्या जो बायडन यांना ट्रम्प यांच्यापेक्षा जास्त मते मिळतील यात काहीच शंका नाही... परंतु तरीही अध्यक्ष म्हणून निश्चित निवडून येण्यासाठी त्यांना किमान पाच टक्के अधिक मते मिळवावी लागतील असा अंदाज आहे.
हे विचित्र गणित तयार झाले आहे इलेक्टोरल कॉलेजमुळे. अमेरिकेत जरी निवडणूक थेट व्यक्तीसाठी होत असली तरीही त्यात इलेक्टोरल कॉलेज म्हणून एक अप्रत्यक्ष संस्था आहे. जनता व्यक्तीसाठी मत देते... परंतु अखेरीस मत मोजले जाते इलेक्टोरल कॉलेजचे. हे कॉलेज 538 जणांचे असते आणि प्रत्येक राज्याचे प्रतिनिधी मिळून ते बनलेले असते. त्याचा कालावधी नोव्हेंबरमध्ये निवडणूक झाल्यानंतर ते राष्ट्राध्यक्ष शपथविधी जानेवारीत घेईपर्यंतच असतो. लहान राज्यांना कमी आणि मोठ्या राज्यांना जास्त अशी ही रचना साधारण लोकसंख्येच्या तुलनेत असते.
जो उमेदवार राज्य जिंकतो त्याला हे प्रतिनिधी राज्यातील मताधिक्यानुसार आणि राज्याच्या कायद्यानुसार अध्यक्षपदासाठी राज्यामार्फत मतदान करतात. शेवटी 538पैकी ज्याला 270 मते मिळतील तो उमेदवार अध्यक्ष होतो. राज्य कितीही छोटे असले तरीही त्या राज्याला काही किमान इलेक्टोरल मतांचा अधिकार आहे आणि म्हणूनच जनतेची मते आणि इलेक्टोरल मते यांमध्ये असमतोल असतो.
काळाच्या ओघात अमेरिकेच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यांवरच्या राज्यांची लोकसंख्या खूपच वाढली आहे... मात्र त्यामानाने त्यांची इलेक्टोरल मते वाढली नाहीत... त्यामुळे तिथल्या जनतेची मते आणि इलेक्टोरल मते यांमध्ये असमतोल वाढत गेला आहे. अमेरिकेच्या दोन्ही किनाऱ्यांवरची राज्ये सहसा डेमोक्रॅटीक पक्षाला मते देतात आणि अमेरिकेचा मध्य भाग सहसा रिपब्लिकन पक्ष निवडून देतो आणि म्हणून मागील वीस वर्षांत दोन वेळा असे घडले आहे की, डेमोक्रॅटीक पक्षाला जास्त मते मिळूनही त्यांचा उमेदवार अध्यक्ष झाला नाही.
निवडणूक जिंकण्याची रणनीती
अमेरिकेत अनेक पक्ष असले तरीही दोनच पक्षांभोवती अमेरिकन जनमानस फिरते. प्रादेशिक पक्ष तिथे अजिबातच चालत नाहीत... त्यामुळे राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत 50पैकी 30 ते 40 राज्यांचा निकाल आधीपासून निश्चित असतो. उदाहरणार्थ, कॅलिफोर्निया, न्यू यॉर्क इथे रिपब्लिकन राष्ट्राध्यक्षाला मागच्या कित्येक दशकांत विजय मिळाला नाही. त्याउलट टेक्सासमध्ये मागच्या 50 वर्षांत डेमोक्रॅटीक उमेदवाराला विजय मिळाला नाही... त्यामुळे जिथे विजय अनिश्चित आहे अशाच दहापंधरा राज्यांवर दोन्ही पक्षांचे उमेदवार लक्ष केंद्रित करतात.
या वर्षी फ्लोरिडा, नॉर्थ कॅरोलायना, पेनसिल्व्हेनिया, मिशिगन, मिनेसोटा, आणि विस्कॉन्सिन ही सहा मोठी आणि सध्या अनिश्चित असलेली राज्ये आहेत. यांतील चार राज्ये जो कोणी जिंकेल तो 2020ची निवडणूक जिंकेल असे मानले जाते आहे. मतचाचणी अंदाजानुसार बायडेन यांनी या सर्व राज्यांमध्ये आघाडी घेतली आहे... परंतु हे अंदाज मागच्या वेळी ट्रम्प यांनी साफ खोटे ठरवले होते... त्यामुळे या वेळी डेमोक्रॅटीक पक्ष तसेच सर्व राजकीय विश्लेषक अगदी खातरीलायकरीत्या काही सांगू शकत नाहीत.
ब्लू वॉल राज्ये
निवडणुकीचा अंतिम निकाल केवळ दहापंधरा राज्यांवर अवलंबून असल्यामुळे त्याच राज्यातील जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न हिरिरीने मांडले जातात. बऱ्याचदा ते प्रश्न संपूर्ण देशाचे असतात. अमेरिकेच्या उत्तरेला असलेली पेनसिल्व्हेनिया, मिशिगन, विस्कॉन्सिन आणि मिनेसोटा ही राज्ये ब्लू वॉल राज्ये म्हणजे हमखास डेमोक्रॅटीक मत देणारी समजली जायची. अमेरिकेच्या अवजड औद्योगिक क्षेत्राची ती धुरीण राज्ये आहेत... परंतु 1972पासून एकेकाळची ही श्रीमंत राज्ये चीनच्या स्वस्त कारखानदारीला बळी पडत गेली आहेत आणि अमेरिकेत तुलनेने गरीब होत गेली आहेत. गरिबीतून असंतोष आणि अगतिकता आल्यामुळे इथला मतदार जो पूर्वी आर्थिक विषयांबाबत जागरूक होता... तो आता राष्ट्रवाद, वंशवाद, धर्म, बंदुका असल्या प्रतिगामी गोष्टींच्या जाळ्यात अडकला आहे. 2016च्या निवडणुकांत ट्रम्प यांनी त्याचा फायदा घेऊन या जनतेला चिथावून मते जिंकली. 2020च्या निवडणुकीत बायडेन इथे जिंकतील असे चिन्ह आहे... परंतु निवडून आले तरीही इथले आर्थिक विषय एक दिवसात सुटणारे नाहीत आणि त्यामुळे अमेरिकेच्या राजकारणात कट्टर राष्ट्रवाद, वंशवाद यांचा झालेला शिरकाव हा सहजासहजी जाणार नाही. बरेच जाणकार लोक त्यामुळे चिंतेत आहेत.
ट्रम्प यांची कामगिरी
सहसा आर्थिक प्रगती चांगली असेल तर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष दुसऱ्यांदा पुन्हा निवडून येतात. ट्रम्प यांच्या काळात अमेरिकेची आर्थिक प्रगती पहिल्या तीन वर्षांत चांगलीच झाली होती... परंतु 2020च्या वर्षात कोरोना विषाणूच्या संकटाचे मोठे सावट आहे. ट्रम्प यांच्या हलगर्जीपणामुळे तब्बल सव्वादोन लाख अमेरिकी नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. जगाच्या तुलनेत अमेरिकेची लोकसंख्या चार टक्के असूनही जगाच्या मृत्युदरात मात्र अमेरिकेचा 20 ते 25 टक्के इतका प्रचंड हिस्सा आहे. यातूनच ट्रम्प यांचे अपयश स्पष्ट होते.
कोरोनामुळे जगाबरोबरच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम झाला आहे. या संकटाचा सर्वात मोठा फटका गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना बसला असल्यामुळे काही ट्रम्पसमर्थकांचा भ्रमनिरास होऊ लागला आहे. अमेरिकेची निवडणूक सहसा लोकांच्या आयुष्याशी निगडित विषयांवर लढवली जात असे... परंतु ट्रम्प यांच्या चिथावणीखोर वृत्तीमुळे फुटीरतावादी विषय जास्त ठळक झाले आहेत. नोकरी, अर्थव्यवस्था, भाववाढ यांकडे लक्ष देण्यापेक्षा वंशवाद, परकीय विरुद्ध स्थानिक, धार्मिक उन्माद, बंदुका आणि दंगली यांना चिथावणी देऊन ट्रम्प आपले स्थान टिकवण्यात गर्क आहेत.
बायडेन यांच्या मध्यममार्गी, विचारी आणि समंजस वृत्तीमुळे ट्रम्प विरुद्ध अनेक रिपब्लिकन पक्षांच्या जुन्या नेत्यांनी आणि सैनिकी अधिकाऱ्यांनी बायडेन यांना पाठिंबा जाहीर केला आहे. बायडेन यांनी ही निवडणूक अमेरिकेच्या चारित्र्याची कसोटी आहे असे आवाहन मतदारांना केले आहे.
मतदानप्रक्रिया
सध्या मतदान सुरू असून 3 नोव्हेंबर हा शेवटचा दिवस आहे. त्याआधी सुद्धा मतदार पोस्टाने मतदान करू शकतात किंवा मतदानाच्या प्रत्यक्ष दिवसाच्या आधीसुद्धा केंद्रावर जाऊन मतदान करू शकतात. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत थांबण्याची गरज नसते. अमेरिकेत इव्हीएम नाहीत. जगातील सर्वात शक्तिशाली देश इव्हीएम वापरत नाही ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे. इथे मतमोजणी यंत्रांनी होते... परंतु मतदान कागदावरच होते.
एकूण अपेक्षित मतदानाच्या किमान 40 टक्के मतदान आत्तापर्यंत झाले आहे. 3 नोव्हेंबर हा मुख्य मतदानाचा दिवस आहे. ट्रम्पसमर्थक पोस्टाने मतदान करायला विरोध करत आहेत. जितके कमी मतदान होते तितके रिपब्लिकन पक्षाला फायद्याचे म्हणून रिपब्लिकन पक्ष डेमोक्रॅटीक मतदारांचे खच्चीकरण करण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न करत असतात. पोस्टाने मतदान करण्यास विरोध हा त्याचाच एक भाग आहे.
2016 च्या निवडणुकीत 25% मतदान पोस्टाने झाले होते... परंतु कोविडमुळे या वर्षी ते 50-60% असेल असा अंदाज आहे. प्रत्येक राज्याचे पोस्टाने मतदान करण्याचे नियम वेगळे असल्यामुळे मतदान मोजण्यासाठी अनेक दिवस लागणार आहेत आणि त्यामुळे नेहमीप्रमाणे 3 नोव्हेंबरला निकाल लागेल याची खातरी या वेळी नाही.
ट्रम्प यांचा असा अंदाज आहे की, 3 नोव्हेंबरच्या दिवशी जे थेट प्रत्यक्ष मतदान होईल त्यानुसार ते जिंकतील... परंतु पोस्टाने येणाऱ्या मतांमुळे ते हरतील आणि एकूण निवडणूक हरू शकतील... त्यामुळे 3 नोव्हेंबरला लागेल तोच निकाल असे ट्रम्प आत्तापासूनच म्हणत आहेत.
सत्तांतर
अमेरिकेला शांततापूर्ण मतदान आणि सौहार्दशील सत्तांतर यांची गौरवशाली परंपरा आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ दर चार वर्षांनी 20 जानेवारीला दुपारी 12 वाजता संपतो आणि नवीन अध्यक्षांचा काळ सुरू होतो. हे सत्तांतर कसे करायचे याची एक पद्धत आहे आणि अमेरिकन प्रशासन कोणत्याही राजकीय विचारसरणीला न चिकटता अतिशय कर्तव्यनिष्ठपणे हे सत्तांतर घडवून आणते.
...परंतु हरल्यावर शांततापूर्ण सत्तांतर करण्याची खातरी ट्रम्प देत नाहीत. ते म्हणत आहेत की, निकाल काय आहे त्यावर माझे वागणे अवलंबून आहे. अमेरिकेला हे अगदी नवीन आहे आणि त्यामुळे इथल्या सज्जन, विचारी लोकांचा थरकाप उडाला आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
अमेरिकेच्या इतिहासात अगदी अलीकडे म्हणजे 2000मध्ये झालेली बुशविरुद्ध गोअर निवडणूक अखेरीस कोर्टात गेली आणि फ्लोरिडा राज्यातील मतमोजणी बंद करायला लावून कोर्टाने ती निवडणूक बुश यांच्या पारड्यात टाकली होती. या वेळीही जर निकाल कोर्टात गेला तर कोर्ट ट्रम्प यांच्या बाजूने निकाल देईल अशी डेमोक्रॅटीक पक्षाला भीती वाटते आहे. त्यांची ती भीती सार्थसुद्धा आहे... कारण गेल्या तीन वर्षांत ट्रम्प यांनी अमेरिकन न्यायव्यवस्थेत प्रचंड संख्येने उजव्या विचारसरणीच्या कट्टर लोकांची वर्णी लावली आहे.
अशा प्रकारे कोरोना, आर्थिक संकट आणि राजकीय संकट अशा गोष्टींमुळे अमेरिकेतील वातावरण अतिशय ढवळून निघाले आहे. अमेरिकेच्या अस्थिरतेचा जगावर प्रतिकूल परिणाम होतो... त्यामुळे अमेरिकेचे नेतृत्व समजूतदार असण्यात फक्त अमेरिकेचे नाही... तर जगाचे हित आहे... त्यामुळे या निवडणुकांमधून मतदार स्वच्छ कौल देतील आणि सत्तांतर शांततेत पार पडेल अशी आशा आपण करू यात.
- पराग जगताप
paraglj@gmail.com
(लेखक, खाजगी व्यावसायिक असून गेल्या 20 वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्यास आहेत.)
हा लेखही वाचा - जो बायडन: अमेरिकेचे संभाव्य राष्ट्राध्यक्ष?
Tags: अमेरिका निवडणूक सुनील देशमुख जो बायडन डोनाल्ड ट्रम्प राजकारण Ameican Election Sunil Deshmukh Joe Biden Donald Trump American Election Proccess पराग जगताप Parag Jagtap Load More Tags
Add Comment