जो बायडन: अमेरिकेचे संभाव्य राष्ट्राध्यक्ष?

फोटो सौजन्य: Scott Olson/ Getty Images

अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे पडघम सध्या जोरात वाजत आहेत. 3 नोव्हेंबर 2020 रोजी त्याची निवडणूक आहे. 2016 च्या निवडणुकीत अनपेक्षितपणे निवडून आलेले डोनाल्ड ट्रम्प सध्या बरेच मागे पडले आहेत. जर आज निवडणूक झाली तर डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन हे दणदणीत विजय मिळवून यशस्वी होतील, असे मतचाचणी अंदाज सांगत आहेत. 'ट्रम्पसारख्या नेत्याला हरवू शकतील असे जो बायडन नक्की आहेत तरी कोण? त्यांची राजकीय विचारसरणी काय आहे? त्यांच्यात आणि ट्रम्प यामध्ये काय फरक आहे? आणि ते निवडून आले तर भारत-अमेरिका संबंधांवर कसा परिणाम होईल?' या प्रश्नांवर ओझरता दृष्टिक्षेप टाकणारा हा लेख.

जो बायडन यांच्याविषयी मला पहिल्यांदा कधी कळाले हे आठवत नाही, पण कसे ते स्पष्ट आठवत आहे. जो बायडन हे अमेरिकेच्या सेनेटमध्ये डेलावेअर राज्याचे सेनेटर (खासदार/प्रतिनिधी) आहेत आणि ते सर्वांत गरीब राजकारणी आहेत, असे मी 12-15 वर्षांपूर्वी  कुठे तरी वाचले होते. त्यावेळी खासदार म्हणून त्यांच्या कारकिर्दीची 33 वर्षे पूर्ण झाली होती. इतकी वर्षे खासदार असूनही ते रोज डेलावेअर शहर ते राजधानी वॉशिंग्टन डीसी असा तब्बल 131 कि.मी.चा प्रवास रेल्वेच्या सेकंड क्लासने करत आणि संध्याकाळी परत घरी येत असत.  तीन दशके खासदार म्हणून राहिलेल्या या व्यक्तीची संपत्ती त्यावेळी केवळ चार लाख डॉलर्स म्हणजे अमेरिकेतील साधारण मध्यमवर्गीयाइतकीच होती. या गोष्टींचे मला खूप नवल वाटले. स्वच्छ आणि कर्तृत्ववान अशा या नेत्याबद्दल तेव्हापासून माझ्या मनात जो आदर निर्माण झाला तो कायम राहिला, किंबहुना तो वाढतच गेला आहे. 

बायडन वयाच्या 30 व्या वर्षी सिनेटर झाले. दुर्दैवाने शपथविधीच्या एक महिन्याआधीच त्यांची बायको आणि एक वर्षाची मुलगी कार अपघातात मरण पावल्या. या आकस्मिक आघातामुळे कॅथलीक असूनही बायडेन देवावर नाराज झाले. सेनेटचा राजीनामा देण्यापासून त्यांचे मन वळवण्यात त्यांच्या सहकाऱ्यांना यश आले, परंतु एकीकडे दोन लहान मुलांची जबाबदारी, तर दुसरीकडे बायको आणि मुलगी मेल्याचे दु:ख, यांमुळे बायडन सैरभैर झाले होते. 'ही व्यक्ती पुन्हा सेनेटमध्ये येणार नाही', असे त्यावेळी त्यांच्या कर्मचारीवर्गालाही वाटू लागले होते. सुदैवाने  जिल या शिक्षिकेशी जो यांची ओळख झाली. पुढे दोघेही विवाहबंधनात अडकले आणि बायडन यांना आयुष्यात पुन्हा एकदा स्थैर्य आणि समाधान लाले.

जिल यांनी जो बायडेन यांच्या दोन्ही मुलांचा आनंदाने स्वीकार केला. दरम्यान, बायडन यांची कारकीर्दही बहरली. त्यांचा अतिशय तरुण आणि होतकरू मुलगा बो बायडन अगदी कमी वयातच अमेरिकन सैन्यात न्यायाधीश आणि नंतर डेलावेअर राज्याचा महाधिवक्ता म्हणजे ऍटर्नी जनरल झाला होता. बायडन यांना त्याचा अतिशय अभिमान होता. परंतु नियतीच्या मनात वेगळेच होते. 2015 मध्ये तो कॅन्सरने मृत्यू पावला. आयुष्यात असे अनेक आघात सोसल्यामुळे की काय, बायडन हे अतिशय समंजस मध्यममार्गी आणि कणव असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.

आपल्या संपूर्ण कारकिर्दीत बायडन यांनी मध्यमवर्ग, कामगार आणि उपेक्षित वर्ग यांची सातत्याने बाजू घेतली आहे. पर्यावरण, मजुरांचे हक्क, ग्राहकांचे हक्क हे त्यांचे जिव्हाळ्याचे विषय आहेत. त्यांनी अमेरिकन संसदेच्या परराष्ट्र आणि न्याय समितीचे अध्यक्षपदही भूषविले आहे. बराक ओबामा यांच्या कारकिर्दीत 2008 मधील मंदीतून अमेरिकेला बाहेर काढण्यासाठी त्यांनी विशेष यशस्वी योगदान दिले. ओबामा यांच्या कार्यकाळात ते आठ वर्षे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष होते. आणि आता सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध ते डेमोक्रॅटिक पक्षाचे नामांकन जिंकून राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत.

78 वर्षीय जो बायडन 3 नोव्हेंबरला होणारी निवडणूक जिंकले, तर ते अमेरिकेचे सर्वांत वयस्कर राष्ट्राध्यक्ष ठरतील. मात्र वयस्कर असले तरी ते तडफदार आहेत. ते अजूनही रोज तासभर व्यायाम करतात आणि चाळिशीतल्या तरुणाला लाजवेल असा त्यांच्या कामाचा आवाका आहे. प्रामाणिक व्यक्तिमत्त्व, विविध विषयांचे ज्ञान, प्रदीर्घ अनुभव व योगदान, आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे चांगली मूल्ये असलेले त्यांचे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व या सर्वांचे अमेरिकन मतदारांना मोठे आकर्षण आहे. 

अध्यक्ष ट्रम्प यांच्या विचित्र कारभारामुळे अमेरिकन जनता चार वर्षांतच त्रस्त झाली आहे आणि या पार्श्वभूमीवर बायडन यांचे व्यक्तिमत्त्व अधिक उठून दिसत आहेत. ट्रम्प यांच्या कारकिर्दीत अमेरिकेमध्ये टोकाची मतभिन्नता निर्माण झाली आहे आणि देशात दुफळी माजली आहे. बायडन यांचे समन्वय साधणारे व्यक्तिमत्त्व ही दुफळी जोडू शकेल आणि देशातील दुभंगलेली मने एकत्र आणू शकेल असे वाटते. ही प्रक्रिया अमेरिकेसाठीच नव्हे तर जगासाठी आश्वासक आहे. 

बायडन आणि ट्रम्प या दोघांची तुलना केली असता दोघांमध्ये फारशी समानता आढळत नाही. दोघांचे वय 70 च्या पुढे आहे आणि दोघेही वंशाने गोरे आहेत, इतकेच काय ते साम्य. बाकी दोघांमध्ये टोकाचा विरोधाभास आहे. ट्रम्प हे श्रीमंतीत वाढलेले. त्यांचे आजोबा वेश्यागृह चालवायचे, तर वडील बांधकाम व्यावसायिक होते. स्वतः ट्रम्प यांनी वेगवेगळे व्यवसाय केले आणि अनेकदा अपयशी ठरले. त्यांनी अनेकदा दिवाळखोरीही जाहीर केली, परंतु विविध क्लृप्त्या करून यशाचा आभास निर्माण केला. 

बायडन मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मले. स्वकष्टाने शिकत केवळ वकीलीच केली असे नाही, तर एका वकिली कंपनीत भागीदारही बनले. परंतु काही वर्षांतच यशस्वी वकिली पेशा आणि लाखो डॉलर्सचे उत्पन्न यांवर पाणी सोडत त्यांनी स्वतःला जनसेवेसाठी कायमचे झोकून दिले. ट्रम्प यांचे बोलणे अनेकदा अतिरेकी आणि विषारी असते. बायडन मात्र अतिशय संयमी आणि मैत्रीपूर्ण आहेत. ट्रम्प यांचा पैशावर आणि स्वतः:वर अमाप विश्वास आहे. बायडेन हे अभ्यासू आहेत. ते सहकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतात, आणि मग निर्णय घेतात. जनतेच्या एकजुटीवर आणि अमेरिकेच्या सांस्कृतिक मूल्यांवर त्यांचा अमाप विश्वास आहे.

ट्रम्प यांचे वागणे भ्रष्ट या सदरात मोडणारे आहे. सरकारी पैशाचा वापर ते स्वतःच्याच गोल्फ कोर्ससाठी करतात आणि आपला व्यवसायी ब्रँड प्रमोट करतात. याउलट बायडन यांची कारकीर्द स्वच्छ आणि पारदर्शक आहे. 2015 मध्ये थोरला मुलगा - बो - कॅन्सर मुळे मृत्यू पावला; त्यावेळी अमेरिकेचे उपराष्ट्रपती असूनसुद्धा मुलाच्या आजारपणाच्या खर्चामुळे बायडन आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले होते. तेव्हा बराक आणि मिशेल ओबामा यांनी त्यांना आर्थिक मदत केली होती. 50 वर्षे राजकारणात आणि तेही सर्वोच्चस्थानी घालवलेली व्यक्ती आर्थिकदृष्टया इतकी दुर्बल आहे, याचा अर्थच असा की त्यांनी स्वत:साठी सत्तेचा कधी गैरवापर केला नाही. 

बायडन यांची स्वच्छ, सौम्य आणि प्रागतिक प्रतिमा केवळ अमेरिकाच नव्हे तर जगासाठी आश्वासक आहे. अमेरिका हा केवळ श्रीमंतच नाही तर बव्हंशी चांगली मूल्ये असलेला देश आहे. अमेरिकेतील युद्धखोर प्रवृत्ती जगभर युद्धे करायला उत्सुक असतात, कारण त्यात त्यांना पैसे कमावता येतात. परंतु मोठया संख्येने अमेरिकन जनता युद्धांच्या विरुद्ध आहे. युद्ध हा एक भाग वगळला तर अमेरिकेच्या नेतृत्वाची आणि मूल्यांची जगाला गरज आहे. बायडन यांच्यामुळे अमेरिकेची प्रतिमा पुन्हा एकदा सुधारेल आणि जगभर जे एक अस्थैर्याचे वातावरण निर्माण झाले आहे ते निवळेल. 

भारत आणि अमेरिका हे नैसर्गिक मित्र देश आहेत, कारण दोन्ही देश लोकशाही देश आहेत आणि दोन्ही देशांची संस्कृती मोकळी आणि आत्मविश्वासपूर्ण आहे. दोन्ही देशाचे लोक बव्हंशी मध्यममार्गी आहेत. दुर्दैवाने ट्रम्प यांच्या काळात भारत अमेरिका संबंध संस्थात्मक न राहता व्यक्तीकेंद्रित झाले आहेत. ट्रम्प यांच्यामुळे भारतीयांना अमेरिकेमध्ये ग्रीन कार्ड आणि H1B व्हिसा मिळणे अवघड झाले आहे. काश्मीरसारख्या द्विपक्षीय प्रकरणातही अमेरिकेने कारण नसता नाक खुपसण्याचा प्रयत्न केला होता, परंतु भारताने ही मध्यस्ती सौजन्यपूर्वक नाकारली. मध्यंतरी COVID-19 च्या उपचारासाठी महत्त्वाचे ठरलेले 'हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन हे औषध अमेरिकेला निर्यात करा', असा धमकीवजा आदेश ट्रम्प यांनी भारताला दिला आणि भारताने ते निमूटपणे मान्यही केले. या गोष्टी अमेरिका आणि भारत या दोघांच्या मैत्रीला आणि गौरवाला साजेशा नव्हत्या. 

बायडन हे भारतीय कामगार व अनिवासी भारतीय यांचा आदर आणि स्वागत करणारे आहेत. त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीत H1B विरोधी वातावरण निवळायला मदत होईल असा विश्वास वाटतो. ते अध्यक्षपदी निवडून आल्यास भारत आणि अमेरिका या दोन देशांचे संस्थात्मक नैसर्गिक मैत्रीचे संबंध पुन्हा पूर्ववत होतील, कारण हे संबंध व्यक्तीपेक्षा देशांचे परस्पर हित व आदर यांवर उभारलेले असतील, आणि भारतासाठी ही बाब सर्वांत फायदेशीर ठरेल यात शंका नाही. 

- पराग जगताप     
paraglj@gmail.com
 

(लेखक, खाजगी व्यावसायिक असून गेल्या 20 वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्यास आहेत.) 

Tags:Load More Tags

Comments: Show All Comments

Mansing patil

सुंदर मांडणी,दर्जेदार लेखन

Ashwini Funde

राजकारण नि निवडणूक हा भारतीयांचा आवडीचा विषय! मग छोट्या गावातील ग्रामपंचायतीची असो की पार अमेरिकेची! त्यामुळे हा लेख चटकन वाचला... अगदी सरळ, साधे, सोपं नि ओघवत्या शैलीत लिहिल्यामुळे आवडला....

Shiva V

प्रथमच जो बायडन या महान नेत्याबद्दल माहिती मिळाली, लेख फारच छान, आता आणखी curiosity वाढत आहे, पण त्यांना माझ्या शुभेच्छा, ग्रेट रिअल हिरो

Rahul Ramesh Gudadhe

छान लेख आहे. आभारी आहे लेखकाचा

Vinayak Dhamdhere

खूप चांगली माहिती मिळाली या लेखांमधून जो बायडन बद्दल..

Vilas G Patil

अमेरीकेसाठी बायडन अध्यक्षीय उमेदवार लाभत आहेत हे चांगले आहे. सर्वाना बरोबर घेऊन अमेरीकन वर्चस्व अभादीत ठेवणारा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे. अभ्यासपुर्ण लिखाण आवडले. धन्यवाद.

संजय देवगोंडा पाटील, सर.

अमेरिकेत होणा-या निवडणूक संदर्भात लेख वाचला आणि मग डोनाल्ड द्रम्प सारख्या स्वार्थी व्यक्तीच्या हाती अमेरिका सारखा देश जाता कामा नये.बायडन सारखी व्यक्ती जर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या जागेवर येत असेल तर ती खुपचं चांगली गोष्ट आहे.भारतासाठी ही बाब निश्चितच स्पृहणीय ठरणार आहे. लेख खुपचं अभ्यासपूर्ण वाटला. धन्यवाद!!!.

Dilip Akode

Very useful information. Keep updated about Indian

Prof Annasaheb shrimant Bhagaje

Very useful and Thoughtful information Thanks a lot Sir.

vijay tambe

Then why he published agenda for Muslims touching many subjects in which he had no business to talk like kashmiri muslims,border issue etc. When asked by Hindus to publish agenda for Hindus,he is taking time & as per information not yet published. Also why Pakistan awarded him Nishan E Pakistan honour.These things we need to ponder.He may be good but should be seen in actionns

Dr.pawar Dr.deepti pawar

Very good parag keep it up

Vishal

Thanx for informative article

Anup Priolkar

Nice Article about the journey of prospective president of USA.he had passed through very challenging and difficult life. Look like very humble and sensitive. All the best.

amol

liked your discription

Mahesh Jagtap

Nice

Sunil Naniwadekar

I liked your article about possible Joe Biden president.lf he wins in November,he will make a good president.Also Indo. American relations will be one of his priority . Please do write more articles up to November election.

Girish

Factual write-up, also very timely one. Thanks! You may also want to have a follow-up write-up highlighting few of the key aspects which probably are to play decisive role in the upcoming election.... Joe Biden's (a) chemistry with Obama, (b) across the aisle reach especially to non-Trumper republicans, and (c) potential health concerns/gaffes

Marshal Pereira

America will change drastically if Joe Biden is elected as President of America and there will be peace in America.

Add Comment