गाळ हा कुठेही असो - मग तो डोंगरमाथ्यावर निर्माण होणारा असो अथवा नदी पात्रात - तो मानवनिर्मित असतो. म्हणूनच तो पर्यावरणाचा मुख्य शत्रूदेखील आहे. प्राणवायू तोडणाऱ्या या गाळाची आणि चिखलाची निर्मिती थांबली तरच श्वासासाठी धडपणारा सह्याद्रीमधील प्रत्येक जीव सुरक्षित राहू शकतो. ‘माळीण’ आणि ‘तळीये’ने आपल्याला हे आधीच दाखविले होते. हाच आरसा आता इर्शाळवाडीने आपल्याला पुन्हा दाखवला. आरशामधील प्रतिमा निसर्गसंपन्न समतोल राखणाऱ्या गावाची असावी की उध्वस्त, असमतोल असलेल्या गावांची; हे आपणच ठरवावयाचे आहे.
‘इर्शाळवाडीवर मृत्यूची दरड’, ‘आणखी एका गावाला डोंगर समाधी’, ‘दुःखाचे डोंगर’ यांसारखे वृत्तपत्रामधील ठळक मथळे वाचले की वाटते, या नैसर्गिक घटनेमागे दोष कुणाचा असावा? डॉ. माधवराव गाडगीळ या जैवविज्ञान अभ्यासकाचा पश्चिम घाटावरील अभ्यासपूर्ण अहवाल विकासकांच्या आर्थिक वज्रमुठीच्या भितीने केंद्र शासनाने स्वीकारला नाही आणि त्यास पर्याय म्हणून डॉ. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली शासनाला हवा तसा पूरक अहवाल तयार करून तो स्विकारण्यात आला. अहवाल स्विकारणे आणि न स्विकारणे या दोन परस्परविरोधी घटनांमध्ये कुणाची प्रतिष्ठा पणाला लागली हे ठाऊक नाही; पण पश्चिम घाटामधील डोंगरदऱ्यांच्या कुशीत हजारो वर्षांपासून वसलेली छोटी गावे, लहान वाड्या यांचे अस्तित्व मात्र पणाला लागले होते, हे 19 जुलै 2023 च्या इर्शाळवाडीच्या घटनेने पुन्हा एकदा जगासमोर आले आहे. डॉ गाडगीळ यांनी असे म्हटले होते की, ‘वातावरणबदलाच्या पार्श्वभूमीवर या सर्व वाड्यांना सह्याद्रीची संरक्षक ढाल फार दिवस टिकणार नाही.’ तेथे मोठ्या प्रमाणावर होत असलेला वृक्षसंहार आणि पश्चिम घाटाचा प्रथम क्रमांकाचा शत्रू : ‘जेसीबी’ मशीन याची विकास नावाच्या क्रूर राक्षसाबरोबर असणारी मैत्री यांपासून त्यांनी शासनास वेळोवेळी सावध केले होते. केंद्र शासनासाठी प. घाटासंबंधीचा अहवाल लिहिताना हा थोर शास्त्रज्ञ त्याच्या वातानुकूलित कक्षात बसून पांढऱ्यावर काळे करत नव्हता; तर या घाटाच्या डोंगरकुशीमधील प्रत्येक गावात, वाडीत स्वतः पायी फिरत तो स्थानिक शेतकऱ्यांच्या, आदिवासींच्या वेदना वाचत होता.
गाडगीळांच्या 522 पानांच्या अहवालात या वाड्यांना पुढील तीन-चार दशकांत कसे वाचवता येईल यासाठी त्यांनी निसर्गाला बरोबर घेऊन कितीतरी साध्या-सोप्या उपाययोजना सूचित केल्या होत्या. त्यांच्या या सूचनांचे पालन त्याच वेळी झाले असते तर 30 जुलै 2014 ला दरड कोसळल्याने उध्वस्त झालेल्या माळीण गावात मृत्यूने गिळलेले 151 जीव आणि 22 जुलै 2021 रोजी महाडमधील तळीयेने गावात मृत्यूने स्वाहा केलेले 85 जीव वाचले असते. आणि आता रायगड जिल्ह्यामधील इर्शाळवाडीमधल्या नागरिकांना 19 जुलै 2023 ची काळरात्र दिसली नसती. या छोट्या आदिवासी पाड्यामधील सर्वच्या सर्व, म्हणजे 40 घरे मध्यरात्री ढिगाऱ्याखाली गाडली गेली. गावामधील 48 कुटुंबे आणि त्यामधील 229 आदिवासी निसर्गास धरून या दुर्गम भागामध्ये गुण्यागोविंदाने राहत होती. ढिगाऱ्याखाली सर्व जण दबले गेले, त्यातही जे थोडे वरच्या भागात अडकले होते - जेथपर्यंत प्राणवायू पोहचत होता - ते 103 जण जखमी अवस्थेत बाहेर आले. यात एकूण 16 जणांचा मृत्यू झाला आणि उर्वरित 106 बेपत्ता आहेत.
के. कस्तुरीरंगन माधव गाडगीळ
प. घाटामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू असलेली विकासकामे, मोठमोठ्या स्थानिक वृक्षांचे धरणीमातेस आलिंगन, पायवाटांचे पक्क्या रस्त्यामध्ये झालेले रुपांतर, धबधब्यांचे सौंदर्य लुटण्यासाठी पर्यटकांची त्यांच्या वाहनासह होणारी गर्दी, शेतकऱ्यांकडून होणारा रासायनिक खतांचा वापर या आणि अशा विविध कारणांनी सह्याद्रीची सेंद्रिय माती खिळखिळीत झाली. मुबलक पडणारा मुसळधार पाऊस या मोकळ्या मातीत सहज मुरू लागला. वृक्षतोडीमुळे मातीला धरून ठेवणारी वृक्षमुळे शिल्लकच राहिली नाहीत. ‘कसेल त्याची जमीन’ अशी घोषणा देत मोकळी वनजमीन शेतीसाठी ताब्यात घेतली गेली. त्यात शासनपुरस्कृत रासायनिक खत टाकले गेले, डोंगर, दरडी वृक्षाविना बोडख्या झाल्या, उघड्या मातीचा चिखल झाला आणि संततधार पावसात ही माती आधाराविना सैल होऊन खालच्या बाजूने घसरू लागली, वरून प्रचंड मोठ्या ओल्या थराचा दाब तिच्यावर पडला आणि क्षणात होत्याचे नव्हते झाले... जुलै महिना आणि सह्याद्रीच्या रांगा यांचे सध्यातरी बिनसलेले दिसत आहे आणि हे वितुष्ट निर्माण करणारा मानवी घटकच आहे हे सर्वांना माहीत असूनही निरपराधांचे जीव जात आहेत, भविष्यात अजूनही जाणार आहेत ही काळ्या पाषाणावरील पांढरी रेघ आहे आणि यास कारणीभूत आहे तो सर्वात जास्त कोसळणारा जुलै महिन्यातील अनियंत्रित पाऊस, ज्याचे प्रमाण यापुढे हवामान बदलामुळे असेच सातत्याने वाढणार आहे.
प्रचंड मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड, सतत कोसळणारा पाऊस, डोंगरांचे सातत्याने होणारे उत्खनन आणि सपाटीकरण, नद्यांमधील संपलेली वाळू, वाढती रासायनिक शेती आणि अतिदुर्गम भागातही पर्यटन आणि पर्यटकांसाठी टाकलेल्या पायघड्या यामुळेच या घटना वारंवार घडत आहेत. प. घाटामधील 11 संवेदनशील जिल्हे, त्यामधील पठारी भाग आणि त्याच्या पायथ्याला असलेल्या हजारो आदिवासी पाड्यांचा डॉ. गाडगीळ यांनी त्यांच्या अहवालात संपूर्ण आढावा घेऊन त्यांना संवेदनशील म्हणून जाहीर केले होते, ‘वृक्षतोड थांबवा’, ‘डोंगर फोडण्यास व सपाटीकरणास बंदी घाला’, ‘कुठेही माती उघडी ठेवू नका’, ‘जेथे वृक्ष नसेल तेथे घनदाट गवत लावा’, ‘रासायनिक खते वापरू नका फक्त सेंद्रिय शेतीलाच प्रोत्साहन द्या’ या त्यांच्या सुचनांचा अवलंब कुठेही झाला नाही.
निसर्गाचा कुठेही समतोल नाहीच. पूर्वी जिथे फक्त वृक्षकुशीत नैसर्गिक पायवाटा होत्या त्या सर्व ठिकाणी आता चारचाकी वाहने सहज डोंगर चढून जातात. पाहावे तेथे उघडे बोडके डोंगर दिसतात. शेकडो वर्षांची जुनी वृक्षसंपदा नष्ट करून ती मोकळी जागा काजू, आंबा लागवडीने व्यापलेली आहे. या जुन्या स्थानिक पारंपरिक वृक्षांची मुळे जमिनीत 50-60 फूट खोल जाऊन मातीस धरून ठेवत असतात. अशा पारंपरिक वृक्षांना कापून, शेकडो टन माती बाहेर काढून त्या जागी लावलेल्या काजुसारख्या लहान वृक्षाकडून पूर्ण डोंगराचे संरक्षण आपण कसे अपेक्षित करणार? हा सर्व भूकंपप्रवण प्रदेश आहे. त्याच्या लहानशा सौम्य धक्क्यानेसुद्धा जमिनीस नकळत तडे जातात. नंतर हे तडे मोठे होतात आणि त्याचे रुपांतर इर्शाळवाडीसारख्या घटनेत होते. इथे तीन हजार मिमीच्या वर पाऊस पडतो. उतारावर वसलेल्या लहान वाड्यांमध्ये या पावसाचा निचरा होण्यासाठी गावकऱ्यांनी लोकसहभागातून खोदलेले चर अशा परिस्थितीत मातीवरील ताण वाढवतात. हे सर्व थांबवण्यासाठी गाव परिसरात वृक्ष लागवडीबरोबरच रासायनिक शेतीवर बंदी हवी. दरडी, कडे यांचा नियमित अभ्यास केला गेला पाहिजे. प्रत्येक गावात तीन-चार संरक्षक भिंती उभारून त्या खचत आहेत का, त्यांना तडे जात आहेत का ते नियमितपणे पाहिले जायला हवे. जानेवारी महिन्यानंतर अचानक गाव परिसरातील जमिनीत ओल अथवा पाणी आढळते का याची पाहणी केली जायला हवी. प्रत्येक गावातील एखाद्या सुशिक्षित युवकाला या विषयीचे योग्य शिक्षण देऊन त्याच्याकडे ही सर्व जबाबदारी द्यावी आणि प्रत्येक महिन्यात त्याच्याकडून माहिती मागवून त्यावर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास होणे गरजेचे आहे.
हेही वाचा : पृथ्वी आणि अंतराळाला जोडणारा चमत्कार - लोणार सरोवर - विशाल इंगोले
गावकरी त्याच्या गाव परिसरात अथवा वाडी भागात खाली-वर कमीत कमी आठ ते दहा किमी फिरत असतो. कळत नकळत त्याचे भौगोलिक निरीक्षण सुरू असते, प्रत्येक महिन्याच्या ग्रामसभेत या अशा स्थानिक लोकांना शासन प्रतिनिधींच्या उपस्थितीत बोलते केले तर सह्याद्री घाटामधील हजारो संवेदनशील गावे सुरक्षित राहण्याची शक्यता आहे. गाळ हा कुठेही असो - मग तो डोंगरमाथ्यावर निर्माण होणारा असो अथवा नदी पात्रात - तो मानवनिर्मित असतो. म्हणूनच तो पर्यावरणाचा मुख्य शत्रूदेखील आहे. प्राणवायू तोडणाऱ्या या गाळाची आणि चिखलाची निर्मिती थांबली तरच श्वासासाठी धडपणारा सह्याद्रीमधील प्रत्येक जीव सुरक्षित राहू शकतो. ‘माळीण’ आणि ‘तळीये’ने आपल्याला हे आधीच दाखविले होते. हाच आरसा आता इर्शाळवाडीने आपल्याला पुन्हा दाखवला. आरशामधील प्रतिमा निसर्गसंपन्न समतोल राखणाऱ्या गावाची असावी की उध्वस्त, असमतोल असलेल्या गावांची; हे आपणच ठरवावयाचे आहे.
30 जुलै 2014 ला घडलेली माळीण दुर्घटना
‘पॉपलर’सारखा सरळ, उंच, वेगाने वाढणारा वृक्ष आपल्याला गावावर येऊ घातलेल्या अशा संकटाची जाणीव करून देतो. प्रत्येक गाव अथवा वाडी परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी असे पाच-सहा वृक्ष मापदंड म्हणून लावावे. सरळ उंच वाढत असलेला हा वृक्ष जर एका बाजूस कलंडत असेल तर ती येणाऱ्या संकटाची चाहूल समजावी. कुठलीही दरड अचानक कोसळत नाही. त्या आधी तिची पाच-सहा वर्षे तयारीत जातात, तिच्याकडून कोसळण्याआधी अनेक सूचना संदेश दिले जातात. फक्त ते समजून, अभ्यासून त्यावर त्वरित मार्ग काढणारे कुणीही नाही याची खंत वाटते. डोंगर-कपारीमध्ये राहणारी, शेकडो वर्षांचा इतिहास असलेली ही गावे केवळ दरडप्रवण क्षेत्र म्हणून स्थलांतरीत करणे हा त्यावरचा कायमचा उपाय नाही. गायरान निर्मिती, कुऱ्हाड बंदी, डोंगरामधील खाणकाम व सपाटीकरण थांबविणे, वृक्ष लागवड, सेंद्रिय शेती, जीवाश्म इंधनावर चालणाऱ्या वाहनास गाव परिसरात बंदी, शासनाच्या आरोग्य व शिक्षण सुविधा हाकेच्या अंतरावर, पारंपरिक शेतीला प्रोत्साहन हे साधे-सोपे उपाय प्रत्येक गावास, वाडीस पावसाळयात सुरक्षित ठेवू शकतात. निसर्ग हा कधीच संहारक नसतो, आपणच त्याला संहार करण्यास प्रोत्साहित करतो हे निर्विवाद सत्य आहे; फक्त ते पचविणे अवघड आहे एवढेच.
कोकणात दरडींचा धोका असणारी 566 गावे आहेत. इर्शाळवाडीचा त्यात समावेश नव्हता. यावरून एक कठोर सत्य अधोरेखित होते की, सद्यपरिस्थितीत सह्याद्रीच्या कुशीत वसलेली प्रत्येक वाडी, लहान गाव हे दरडप्रवण क्षेत्रात मोडत आहे. त्यांना वाचवायचे असेल तर विकास नावाच्या बुरख्यात लपलेल्या धनदांडग्यांच्या, त्यांच्या गावावरच्या व वाडीवरच्या नकली प्रेमाला गावकऱ्यांनी विरोध करावयास हवा. तरच हे सामुहिक मृत्यू थांबू शकतील. निसर्गाच्या धड्यांची पाने उलटताना यापुढे माळीण, तळीये आणि इर्शाळवाडीवरील अप्रिय धडे आपल्या समोर येतील. या धड्यांची पाने उलटण्यापूर्वी आपण त्यांचा सखोल अभ्यास करावा, कारणे शोधावी. त्यावर स्वतंत्र प्रश्नपत्रिका तयार करावी, ती मनापासून सोडवावी. तरच तुम्हास प. घाटाचा राग समजला असे मला तरी निश्चित वाटेल.
- डॉ. नागेश टेकाळे, मुंबई
nstekale@gmail.com
(लेखक, वनस्पतीशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक असून ठाणे व पालघर जिल्ह्यांतील आदिवासी भागासाठी 'नवदृष्टी' नावाची स्वयंसेवी संस्था चालवतात.)
Tags: माळीण दुर्घटना पर्यावरण गाडगीळ समिती कस्तुरीरंगन समिती आदिवासी पश्चिम घाट वातावरणबदल हवामानबदल शेती Load More Tags
Add Comment