हैद्राबाद, मुरका आणि उन्नाव येथे घडलेल्या बलात्कारांच्या तीन घटना लागोपाठ समोर आल्या. तीनही घटनांमधील विकृती आणि कौर्यामध्ये थक्क करणारं साम्य होतं. याविषयीची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरु असतानाच हैद्राबाद प्रकरणातील चारही आरोपींना काल पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार करण्यात आलं. परंतु अशा प्रकारच्या कृत्यांमागची विकृत मानसिकता तयार होण्यामागे सर्वकालीन कारणं काय आहेत; त्यात पोर्नोग्राफीचा वाटा किती आहे आणि भारतासारख्या देशामध्ये त्याचं स्वरूप काय आहे, याविषयीची निरीक्षणं नोंदवली आहेत मुक्ता चैतन्य यांनी...
कामाच्या निमित्ताने लहान मुलामुलींशी गप्पाटप्पा सुरु होत्या. तितक्यात एक पाचवीतली मुलगी म्हणाली, “ताई, थ्री इडियट्समध्ये तो सीन आहे ना, चमत्कार-बलात्कारवाला..त्यातला बलात्कार म्हणजे नक्की काय?” माझ्यासह शिक्षकांच्या काळजाचा क्षणभर ठोका चुकला. आमीर खान आणि तमाम थ्री इडियटस् च्या टीमने मुलं हा प्रश्न विचारू शकतात याचा विचार सीन तयार करताना आणि संवाद लिहिताना केला असेल का? टीव्हीवर हा सिनेमा पाहणाऱ्या अनेक लहानग्यांना असे प्रश्न पडले असतील. काय सांगायचं त्यांना?
चिमुरडीच्या त्या प्रश्नाने डोक्यात विचारांचं वादळ आलं. डोळ्यासमोरून अशा अनेक जाहिराती जायला लागल्या, जिथं स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाचं भांडवल केलं गेलं होतं. पुरुषांच्या पाशवी आणि विकृत प्रवृत्तीला जाहिरातीत ग्लॅमर देऊन पैसे कमावण्याची पद्धतही आपल्याकडे आहेच. थ्री इडियटस् मधला तो सीन हे त्याचं एक उदाहरण आणि दुसरं राज शेट्ये या भारतीय छायाचित्रकारानं दिल्लीतील निर्भया केसवरून केलेलं ‘द राँग टर्न’ नावाचं फोटोशूट. यात अत्यंत ग्लॅमरस लुक आणि कपड्यांमधील पुरुष मॉडेल्स तितक्याच ग्लॅमरस स्त्री मॉडेलवर बसमध्ये अत्याचार करतानाच्या पोजमध्ये चित्रित केले गेले होते. या फोटोशूटच्या रिलीजनंतर बराच वादंग झाला. बलात्कारासारख्या पाशवी वृत्तीला ग्लॅमर लूक दिल्याबद्दल बरीच चर्चा झाली. राज शेट्ये यांचंही त्याबद्दलचं काही म्हणणं होतं. पण या सगळ्यात, अशा सीन्सचे आणि फोटोशूटचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम होत असतात, याकडे मात्र लक्ष दिले जात नाही.
हैद्राबादमध्ये घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. बलात्कार करणारे पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारले गेले. पोलिसांनी जे केले ते योग्यच केले इथपासून, त्यांनी बलात्कार केलाय हे कोर्टात सिद्ध झालेलं नसताना त्यांना गुन्हेगार कसं म्हणता येईल वगैरे चर्चांना समाजमाध्यमांवर ऊत आला आहे. पण या सगळ्यात आपण ‘रेप कल्चर’ निर्माण करतोय, जपतोय आणि वाढवतोय हे कुणाच्या लक्षात येतंय का?
माणूस क्रूरच आहे. त्याच्या क्रौर्याच्या तीव्र इच्छा पूर्ण करण्यासाठी तो काहीबाही शोधत असतो. त्यातूनच एकीकडे विचित्र, विक्षिप्त आणि भयानक प्रथा निर्माण होतात तर दुसरीकडे अब्यूजचा खेळ प्रत्यक्षात नाही पण निदान आभासी जगात खेळता यावा यासाठी माणूस प्रयत्न करत राहतो. बायकांवर होणारं गलिच्छ ट्रोलिंग हा व्हर्चुअल बलात्काराचाच प्रकार आहे. एखादीला ट्रोल करताना तिच्यावर कसा बलात्कार केला जाईल याची वर्णनं लिहिणं हा प्रकार प्रत्यक्ष बलात्कार करण्याइतकाच क्रूर, गलिच्छ, ओंगळवाणा आणि भयानक आहे. पण त्याकडे आपण तितक्या गांभीर्याने बघत नाही. तोच प्रकार पॉर्न साईटस् वरच्या रेप किंवा अब्युज व्हिडीओजचा. पोर्नग्राफीमध्ये ज्याप्रमाणे एरोटिक व्हिडीओज् आहेत तसेच अब्युज व्हिडीओजही मोठ्याप्रमाणावर बघितले जातात. व्हॉटस्अॅप युनिव्हर्सिटी खऱ्या आणि पॉर्न साईट्ससाठी तयार केलेल्या रेप व्हिडिओचा खजिना आहे. व्हॉटस्अॅपवरुन रोज करोडो रेप व्हिडीओज व्हायरल, शेअर आणि फॉरवर्ड होत असतात. मोठ्या चवीने बघितले जातात. त्यावर रेपइतकीच गलिच्छ चर्चा होत असते. हे सगळं आपल्या आजूबाजूला सतत सुरु आहे.
पॉर्न बघण्यामध्ये भारत आघाडीवर आहे. जागतिक क्रमवारीत आपला तिसरा क्रमांक लागतो. 2015 च्या आकडेवारीनुसार भारतीय सरासरी 9.30 मिनिटं पॉर्न साईट्सवर घालवतात. दिवसभरात किती वेळा जातात, हे व्यक्तीनुसार बदलतं.या देशात आपण सेक्सबद्दल बोलत नाही. वयात येणाऱ्या मुलांना त्यांची लैंगिकता समजावून सांगत नाही. वयात येणाऱ्या मुलांच्या शरीरात होणाऱ्या बदलांबद्दल बोलणं आपल्याला आवश्यक वाटत नाही. मुलींना आपण काहीबाही सांगतो कारण त्यांना पाळी येते. त्यापलीकडे मुलींशीही त्यांच्या लैंगिक जाणिवांबद्दल बोलणं आपल्याला आवश्यक वाटत नाही. सेक्सबद्दल बोलणं, लिहिणं, चर्चा करणं निषिद्ध असल्यासारखा आपला समाज आहे आणि याचा आपल्याला विलक्षण अभिमान आहे. पण तोच आपला समाज पॉर्न बघण्यात मात्र आघाडीवर आहे. तोच आपला समाज चाईल्ड पॉर्न बघण्यातही आघाडीवर आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पॉर्न जगतातल्या अब्युज व्हिडिओचा भारत किती मोठा ग्राहक आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही.
हैद्राबाद बलात्कार प्रकरणानंतर त्याचा काही व्हिडीओ बघायला मिळतोय का याचा 80 लाख भारतीयांनी शोध घेतलाय. बलात्कारात मृत झालेल्या त्या भगिनींच्या नावाचा हॅशटॅग पॉर्न साईटवर घटना घडल्याच्या दिवसापासून पुढचे आठ दिवस ट्रेंड करत होता. माणसं हपापल्यासारखी काहीतरी बघायला मिळेल आणि आपली कामवासना तृप्त होईल, यासाठी धडपडत होते. 80 लाख हा आकडा छोटा नाहीये, हे लक्षात घ्या. याचाच अर्थ असाही होतो कि 80 लाख लोकांना रेप बघायला आवडतो. त्यांना त्यांची कामवासना पूर्ण करण्यासाठी स्त्रीवर होणारे अन्याय बघणं आवडतं. त्यात त्यांना काहीही गैर वाटत नाही. 80 लाख हा आकडा सर्च केल्यामुळे दिसला तरी, पण त्यापलीकडे अशी छुपी इच्छा बाळगणारे किती लोक असतील याचा विचार न केलेला बरा!
एखाद्या स्त्रीची हतबलता, मदतीसाठी किंचाळणं, सोडून देण्यासाठी दयेची भीक मागणं या सगळ्या गोष्टी ‘टर्न ऑन’ फॅक्टर्स असतात हे आकडेवारीसकट समोर आलं, हे एका अर्थाने बरंच झालं. आपला दांभिक मुखवटा टराटरा फाटला. पॉर्न साईटवर झालेल्या सर्चच्या बातम्या बघत असताना मला जुन्या हिंदी सिनेमांमधले सीन्स आठवले. व्हिलन हिरोच्या बहिणीवर बलात्कार करतानाचे.. ती ओरडत असते, किंचाळत असते आणि ऑडियन्स मजा घेत असतो. पॉर्न साईटवर सर्च झाला म्हणून आपल्याला शॉक बसतो पण आपली ही ‘नियत’ फार जुनी आहे हे विसरून कसं चालेल!
कालपर्यंत बलात्काराचे अभिनय बघून चेकाळायाला होत होतं; आता पॉर्नमुळे बलात्काराच्या खऱ्या घटनांचे व्हिडीओज् बनवले जातात, व्हायरल केले जातात. त्यामुळे आता निव्वळ अभिनयानं तहान भागात नाही. माणसातली क्रूरता पुढच्या पायरीवर गेली आहे. भारतातून सगळ्यात जास्त सर्च होतो, तो भाभी देवर कॉम्बिनेशसाठी!
पॉर्नवर काय विकलं जातं? - तर फक्त हिंसा! हे ऐकायला कितीही अवघडल्यासारखं वाटलं तरी पॉर्न साईट्सवर जे काही बघितलं जातं त्यातलं 90 टक्के लैंगिक हिंसेशी संबंधित असतं. व्हॉयलन्स – हिंसा पॉर्न इंडस्ट्रीचा ‘यूएसपी’ आहे. त्यात अभिनयासहित म्हणजेच ‘reel’ लैंगिक अत्याचारांचे व्हिडीओ असतात तसेच खऱ्या घडलेल्या घटनांचेही असतात. आणि हे दोन्ही प्रकार तिथे लैंगिकतेतल्या हिंसेचा आनंद घेण्यासाठी येणारे शोधत असतात. हैद्राबादच्या दुर्दैवी घटनेचा शोध, याच शोधाचा भाग आहे.
अग्रेसिव्ह बिहेविअर या जर्नलमध्ये हिंसक पॉर्न आणि प्रत्यक्षात महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार यांचा एकमेकांशी संबंध आहे, असं नमूद करण्यात आलं आहे. सतत जर हिंसक सेक्स बघण्याची एखाद्या व्यक्तीला सवय असेल तर तो जे बघतोय ते करुन बघण्याचीही त्याला तीव्र इच्छा होऊ शकते. मग त्याच्या गरजा फक्त बघण्यापुरत्या मर्यादित राहात नाहीत, हे लक्षात घेतलं पाहिजे. सतत देखणे फूड चॅनल्स बघितले की ते पदार्थ करुन बघावेसे वाटतात. तसंच हेही आहे. जे सतत बघतोय ते बघण्याची तीव्र इच्छा हा हिंसक पॉर्नचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम आहे. अब्युसीव्ह पॉर्न बघणं मग फँटसीपुरतं मर्यादित राहत नाही. ते त्यापलीकडे जातं आणि माणसं प्रत्यक्षात एखाद्या स्त्रीला इजा पोचवण्यापर्यंत येऊन पोचू शकतात.
कोलंबिया विद्यापीठातले मनोविकारतज्ज्ञ नॉर्मन डोईज यांच्या म्हणण्यानुसार, “सतत पॉर्न बघणाऱ्या व्यक्तीच्या मेंदूत एक नवा मॅप तयार होतो. जो त्याने बघितलेल्या व्हिडीओ आणि फोटोंच्या अनुषंगाने असतो. पॉर्न माणसांचा दृष्टिकोन बदलण्यास कारणीभूत ठरू शकतं.” याचाच अर्थ जर एखादी व्यक्ती सतत स्त्रियांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचे व्हिडीओ बघत असेल तर त्याचा त्या व्यक्तीच्या मानसिकतेवर नक्कीच परिणाम होणार.
द व्हीदरस्पून इन्स्टिट्यूटच्या ‘द सोशल कॉस्ट ऑफ पोर्नोग्राफी: अ स्टेटमेंट ऑफ फायनडींग्स अँड रेकमेंडेशन्स’ या अहवालानुसार पॉर्नचे परिणाम सगळ्यांवर होतात. सतत लैंगिक उत्तेजना जर अश्लीलतेतून, हिंसेतून निर्माण होत असेल तर ही मोठीच समस्या आहे. हिंसक लैंगिक कृत्ये सतत प्रदर्शित होत असतील, पुन्हा पुन्हा दाखवली जात असतील, बघण्यासाठी प्रोत्साहित केलं जात असेल तर ते निरोगीपणाचे लक्षण नाही. आदर, संमती आणि निरोगी लैंगिक संबंध न शिकवता, हिंसक लैंगिकता खुलेआम उपलब्ध असण्यातून जाणीव नसलेला आणि बेशुद्ध समाज तयार होतो. असा पॉर्न धोकादायक समाजनिर्मितीला हातभार लावू शकतो.
थोडक्यात सांगायचं तर, हिंसक सेक्स कंटेन्टवर पॉर्न इंडस्ट्री उभी आहे. आणि तिथली हिंसा तिथल्यापुरतीच मर्यादित नाही. आजच्या घडीला पॉर्न इंडस्ट्री काहीशे अब्ज रुपयांची आहे. हिंसा विकली जातेय म्हणून दाखवली जातेय. 2018 मध्ये झालेल्या एका सर्वेक्षणात चाईल्ड सेक्शुअल अब्युझ फोटो बघण्यामध्ये 35 टक्के वाढ झाल्याचं लक्षात आलं आहे. चाईल्ड पोर्नोग्राफी हा झपाट्याने वाढणारा धंदा आहे. डार्क वेबमध्ये फक्त तीनच गोष्टी विकल्या जातात - ड्रग्जस, शस्त्र आणि चाईल्ड पॉर्न. केवळ गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्याच व्यक्ती चाईल्ड पॉर्न बघतात असं नाही. ते तुमच्या आमच्या आजूबाजूचे कुणीही असू शकतात.
स्त्रियांवर होणारे लैंगिक अत्याचार आणि चाईल्ड पॉर्न बघणारा आपला समाज आहे, हे वास्तव कितीही किळसवाणं वाटलं तरीही त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. माणसाच्या क्रूरतेला पॉर्नमुळे सहज माध्यम मिळालं आहे. ज्यामुळे सेक्शुअल फॅंटसीज सीमा ओलांडून प्रत्यक्ष आयुष्यात शिरकाव करू बघत आहेत. अजूनही आपण सेक्सबद्दल मोकळेपणाने बोलायला तयार नाही. स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या शरीराचा आदर करायला आपण मुलांना शिकवत नाही हे कुपोषित आणि आजारी समाजाचं लक्षण आहे.
अनेक वर्कशॉप्समध्ये, मित्रपरिवारात अनेक पुरुष हे मान्य करतात की सेक्स ही पुरुषाची गरज आणि बाईने फक्त साथ द्यायची इतकीच त्यांची कल्पना होती. स्त्रीच्या लैंगिकतेबद्दल पुरुषांचे बहुतांशी जग अनभिज्ञ आहे. अशातच ‘बिग स्मॉल स्टेप्स’या संस्थेने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणाचे तपशील खरंतर आपल्या समाजाचा खरा चेहरा दाखवणारे आहेत. कुटुंब एकत्र राखण्यासाठी बायकांनी शारीरिक छळ सहन केला पाहिजे असं भारतातल्या 42.6 टक्के पुरुष वर्गाला वाटतं असं या सर्वेक्षणातून पुढे आले आहे.
वर नमूद केलेल्या सर्व निरीक्षणांचा निष्कर्ष काय तर भारतातल्या पुरुषांच्या मानसिकतेवर प्रचंड काम करण्याची गरज आहे. स्त्रीला उपभोगाची वस्तू आता कुणी मानत नाही असं जर आपण म्हणणार असू तर आपण आपलीच दिशाभूल करतो आहोत. भारतातलं पॉर्न बूम आपण रोखू शकत नाही. पण निदान पुरुषांना स्वतःच्या आणि इतरांच्या लैंगिकतेबद्दल सजग आणि संवेदनशील करण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो. जो घराघरातून, शाळा कॉलेजातून व्हायला हवा.
काळ कठीण आहे, जागतं राहायला हवं!
मुक्ता चैतन्य
muktaachaitanya@gmail.com
(मुक्ता चैतन्य या डिजिटल माध्यमाच्या अभ्यासक आहेत.)
हेही वाचा : बलात्कार आणि सामाजिक धास्ती!
Tags: मुक्ता चैतन्य mukta chaitanya rape pornography Load More Tags
Add Comment