मिझोराममधील निवडणुकांचे पडघम

मिझोराममध्ये उद्या (7 नोव्हेंबर) विधानसभेच्या 40 जागांवर मतदान होते आहे. 

सध्या भारतातील चार राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, यात सर्व प्रथम ईशान्य भारतातील मिझोरामसारख्या आकाराने आणि लोकसंख्येने लहान असलेल्या या राज्यात निवडणुका होत आहेत आणि त्यांचा प्रचारही येथे जोर धरत आहे. विधानसभेच्या एकूण 40 जागा असलेल्या या राज्यात येथील प्रमुख प्रादेशिक पक्ष, सध्या सत्तेत असलेला मिझो नॅशनल फ्रंट (MNF), झोराम पीपल्स मुव्हमेन्ट (ZPM) आहेत बरोबरच, काँग्रेस, भाजपसारखे प्रमुख राष्ट्रीय पक्ष उतरले आहेत. याच बरोबर पहिल्यांदाच आम आदमी पक्षानेदेखील 5 उमेदवार दिले आहेत. येत्या 7 तारखेला विधानसभेच्या 40 जागांवर येथे मतदान होणार आहे. 

या निवडणुकीत खरी लढत, मिझो स्वातंत्र्य चळवळीच्या काळात स्थापन झालेल्या आणि मागील 5 वर्षांपासून सत्तेत असलेल्या मिझो नॅशनल फ्रंट, नवखा असलेल्या झोराम पीपल्स मुव्हमेन्ट (ZPM) आणि काँग्रेस या तीन पक्षांमध्येच मानली जात आहे. मिझो नॅशनल फ्रंट हा पक्ष सध्याचे मुख्यमंत्री झोरमथांगा यांच्या नेतृत्वाखाली लढत आहे. आणि भाजपशासित मणिपूरमधील कुकी समुदायावर ओढवलेल्या परिस्थितीवर भाष्य करून मिझो मतदारांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न करत आहे.

मागील महिन्यात प्रदर्शित झालेला ‘अंबूश’ हा चित्रपट 70 च्या दशकातील ‘मिझो राष्ट्रीय फ्रंट’च्या मिझो स्वातंत्र्य चळवळीतल्या योगदानावर भाष्य करतो. हा चित्रपट सध्या गावोगावी शाळा कॉलेजेसमध्ये दाखवला जातोय. मुख्यमंत्री झोरामथागा यांच्या हस्ते या चित्रपटाचं अनावरण करण्यात आलं होतं. त्यामुळे एकप्रकारे, मिझो नॅशनल फ्रंटच्या राजकीय प्रचाराचा भाग म्हणून याकडे पहिलं जात आहे. प्रचारात भाजपवर टीका करतानाच, ‘आपण भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि उत्तर-पूर्व लोकशाही आघाडी (नॉर्थ-इस्ट डेमोक्रॅटिक अलायन्स) यांत सामील असलो तरी मिझो समाजाच्या प्रश्नांना प्राधान्य देणार आहोत’ असे ते वेळोवेळी सांगत आले आहेत. 


‘अंबूश’चा ट्रेलर :

झोराम पीपल्स मोव्हमेन्ट (ZPM) हा प्रमुख विरोधी पक्ष, माजी पोलीस अधिकारी आणि माजी खासदार लालडूहोमा यांच्या नेतृत्वात लढतो आहे. भ्रष्टाचार, बेरोजगारी, पायाभूत सुविधा यांसारख्या प्रमुख प्रश्नांवर ते सरकारला प्रश्न विचारत आहेत आणि एक पर्याय म्हणून लोकांपर्यंत जात आहेत, यात विशेषतः तरुणांचा मोठा पाठिंबा या पक्षाला मिळत आहे. यात या वर्षी एप्रिलमध्ये घेतल्या गेलेल्या, दक्षिणेला असलेल्या लुंगलाई नगरपालिका निवडणुकीत सगळ्या, म्हणजे 11 जागा जिंकल्याने पक्षाचे महत्त्व आणखी वाढले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे सध्या सत्तेत असलेल्या मिझो नॅशनल फ्रंटला येथे एकही जागा जिंकता आलेली नव्हती. मागील निवडणुकीत 6 आमदार असलेल्या या पक्षाला यंदा सत्तेचा 21 चा जादुई आकडा खुणावत आहे. 

काँग्रेसने देखील सर्व जागांवर उमेदवार देऊन रंगत वाढवली आहे. मागील निवडणुकीतील पराभवातून सावरून पुन्हा 2013 सारखी एकहाती सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे आणि याचाच भाग म्हणून राहुल गांधींना प्रचारासाठी उतरवून तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला आहे. 


हेही वाचा : महुआ मोइत्रा - दिलीप लाठी


ख्रिश्चनबहुल असणाऱ्या मिझोराममध्ये सध्या केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपला इथे 2018 च्या निवडणुकीत केवळ एका जागेव्यतिरिक्त म्हणावं असं यश मिळवता आलेलं नाही. यावेळी भाजपने विधानसभेच्या 40 जागांवर 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहेत. मिझो नॅशनल फ्रंट मधील प्रमुख नेते आणि विधानसभा अध्यक्ष लालरिंलिआणा सैलो यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाला प्रथमच मोठा चेहरा मिळाला आहे. दक्षिणेला असलेल्या मारा ऑटोनॉमस कौन्सिल अंतर्गत 41 गावांमध्ये निवडून आल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. परंतु भाजपला इथे म्हणावं तसं अस्तित्व निर्माण करता आलेलं नाही. 

या निवडणुकीला मणिपूरमधील वांशिक संघर्ष आणि अस्थिर राजकीय स्थितीची देखील किनार आहे. मिझो समाज मणिपूरमधील कुकी समुदायाला स्वतःच्या कुटुंबातील सदस्य मानतो. त्यामुळे या संघर्षाच्या विरोधात मिझो समाजाने वेळोवेळी आवाज उठवलेला आहे. मिझोराममध्ये साधारण 12 हजार मणिपुरी कुकी विस्थापित आहेत. याचा सगळ्यात जास्त प्रभाव येणाऱ्या निवडणुकीत पडताना दिसू शकतो.

मिझोरामचे मुख्यमंत्री सभा झोरामथंगा याची सभा  

यासंदर्भात राजकीय विश्लेषक आणि मिझोराम विद्यापीठातील प्राध्यापक, डॉ. जे. डॉन्जेल यांच्याशी संवाद साधला असता त्यांच्या मते “खरी लढत झोराम पीपल्स मुव्हमेंट आणि मिझो नॅशनल फ्रंट यांमध्येच असून ते काँग्रेसएवढा प्रभाव पाडू शकणार नाहीत, तसेच मणिपूर मधील परिस्थितीमुळे, मोदी आणि भाजपविषयी लोकांच्या मनात रोष वाढत आहे”. 

मिझो समाजात स्त्रियांचा सर्वच क्षेत्रांत वावर असला तरी अद्याप मिझो स्त्रियांना राजकारणात आपलं अस्तित्व निर्माण करता आलेलं नाही. मागील निवडणुकीत आणि सध्याच्या विधानसभेत एकही महिला आमदार नसणे ही शरमेची आणि तेवढीच चिंतेची बाब आहे. यावेळी सर्वच प्रमुख पक्षांनी मिळून एकूण 16 महिलांना उमेदवारी देऊ केली आहे परंतु यातील किती महिला निवडून येतील हे येणारा काळच ठरवेल. पुरुषसत्ताक असलेल्या मिझो समाजात महिलांचा राजकारणात वावर वाढणं नितांत गरजेचे आहे. पोटगी, मालमत्तेत समान अधिकार, कुमारी मातांचे वाढते प्रमाण यांसारखे महत्त्वाचे प्रश्न मिझो महिलांपुढे आहेत. 

आकाराने आणि लोकसंख्येने हे राज्य लहान असले तरी पूर्वेला म्यानमार आणि पश्चिमेला बांगलादेशच्या सीमा लागून असल्याने मिझोरामचे महत्त्व आणखी वाढते. परंतु उत्तम साक्षरता असूनदेखील वाढती बेरोजगारीचे प्रमाण, आरोग्याच्या अपुऱ्या पायाभूत सुविधा, तरुण पिढीतली अंमली पदार्थांची वाढती व्यसनाधीनता, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांची कमतरता, वाढती महागाई आणि म्यानमार-बांगलादेशमधील राजकीय अस्थिरता यामुळे मोठ्या प्रमाणात आलेले निर्वासित यांसारखे प्रमुख महत्त्वाचे प्रश्न मिझोरामपुढे उभे आहेत. 

-   विकास वाळके 
walkevikas7171@gmail.com 
(लेखक, मिझोराममध्ये 'महात्मा गांधी राष्ट्रीय फेलो' म्हणून कार्यरत आहेत.)

Tags: mizoram bangla desh politics BJP Congress Rahul Gandhi Rajnath Singh Ambush movie Load More Tags

Add Comment