गर्दी वाढू लागली आहे...

इफ्फी डायरी 2019 या विशेष लेखमालेतील दुसरा लेख

पहिल्या दिवशी जरा शांत शांत वाटणारा कला अकादमी आणि आयनॉक्सचा परिसर आता चांगलाच गजबजून गेलाय. थिएटर्सच्या बाहेर लांबच लांब रांगा लागू लागल्या आहेत. आणि नेहमीप्रमाणे प्रोग्रॅमिंगवरून उलटसुलट चर्चाही सुरू झालीये. या वर्षी पहिल्यांदाच इफीमध्ये कागदी तिकिटं देणं बंद केलंय. सगळं बुकींग ऑनलाईन. त्यामुळे कागदाची बचत होतेय, गोंधळ कमी झालाय. तुमच्या फोनमध्ये तिकीट बुक झाल्याची मेल येते, एसएमएस येतो की झालं काम. थिएटरमध्ये शिरताना केवळ दिलेला गळ्यातला बॅज दाखवावा लागतो. अर्थात, यावरही अनेकांनी नाराजी व्यक्त केलीये. ‘सगळं ऑनलाईन करायचं म्हणजे, ज्यांच्याकडे स्मार्ट फोन नाही, त्यांनी सिनेमे बघायचे नाहीत असं सांगण्यासारखं आहे,’ एका ज्येष्ठ नागरिकाने रागारागाने माझ्या कौतुकावर प्रतिक्रिया दिली.

तक्रारीचे आणखीही काही मुद्दे होते. इंटरनॅशनल कॉम्पिटिशनमधले सिनेमे सकाळी साडेआठ वाजता आहेत आणि महत्त्वाच्या दिग्दर्शकांचे किंवा गाजलेले सिनेमे रात्री साडेदहा, पावणेअकरा वाजता! दोन्ही वेळा जुळवता येणं कठीण असल्यामुळे काही सिनेमांवर पाणी सोडावं लागतंय. याचा एक अर्थ असाही होतो की या वर्षी चांगल्या सिनेमांना अगदी पहिल्या दिवसापासूनच सुरुवात झालीये.

केन लोआ, फत्तेह अकीन, कॉस्टा ग्राव्हास, पेद्रो आल्मादोवर, यांच्यासारख्या नामवंतांबरोबरच रशियाच्या सिनेमांवर खास फोकस आहे. 1925 सालचा ‘बॅटलशिप पोटेमकिन’ (दिग्दर्शक सेर्जी आयझेनस्टाईन), 1929 सालचा ‘पॅन्डोराज बॉक्स’ (दिग्दर्शक जी. डब्ल्यू पाब्स्ट) आणि आल्फे्रड हिचकॉकचा ‘ब्लॅकमेल’ (1929) हे सिनेमेही चुकवू नयेत असे. इंडियन पॅनोरामाची सुरुवात ज्या गुजराती सिनेमाने झाली त्या ‘हेल्लारो’चं तर प्रचंड कौतुक होतंय. या वर्षीचा सर्वोत्कृष्ट सिनेमाचा राष्ट्रीय (सुवर्णकमळ) पुरस्कार दिग्दर्शक अभिषेक शहा यांच्या या सिनेमाला मिळाला आहे. मात्र ऑस्करसाठी भारतीय एन्ट्री म्हणून ‘हेल्लारो’चा विचार व्हायला हवा होता असं अनेकांचं म्हणणं आहे. ज्या गावात बायकांना गरबा खेळण्याची, संगीतात रमण्याची बंदी आहे अशा गावातल्या बायका बंधन झुगारून नृत्य करू लागतात, त्याची ही गोष्ट आहे. हा सिनेमा 8 नोव्हेंबरला मुंबईसह देशभरातील प्रमुख शहरांमध्ये प्रदर्शित झाला. मात्र, ज्यांनी तो बघितला नसेल त्यांनी जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा तो पहायला हवा. (या सिनेमाचा ट्रेलर येथे पाहा)

स्पर्धेतले सिनेमे पहायला मिळाले की साधारणपणे आज जगभरात कोणत्या प्रकारचे सिनेमे बनताहेत याची एक छोटीशी झलक बघायला मिळते. तिथल्या संस्कृतींची ओळख नाही म्हणता येणार, पण किमान तोंडओळख होते. इराणचा ‘सन मदर’ नावाचा सिनेमा पाहून काहीसं असंच झालं. दिग्दर्शक मोहम्मद रसौलॉफ यांचा हा सिनेमा, म्हटलं तर साधासाच आहे. एक विधवा आई - लैला आणि आमीरअली या बारा वर्षाच्या मुलाची. लैलाला एक लहान मुलगीही आहे. आर्थिक चणचण आणि त्यात नोकरी गमावलेली, यामुळे एक खडतर भविष्य लैलाच्या समोर उभं आहे. अशातच काझेम तिला लग्नाची मागणी घालतो. पण त्याची एक अट आहे. काझेमला आमीरअलीच्याच वयाची मुलगी आहे. तिचं लग्न झाल्याशिवाय आमीरअलीला आपल्या घरी आणणं म्हणजे समाजाला चर्चा करायला वाव देणं. त्यामुळे आपल्या मुलीचं लग्न होईपर्यंत लैलाने आमीरअलीची व्यवस्था दुसरीकडे लावावी अशी त्याची इच्छा आहे. 

लैला त्याला नकार देत राहते, पण नंतर गरिबीमुळे लग्नाला तयार होते. लग्नानंतर आपण काझेमला पटवू अशी आशा तिला असते. दरम्यान, दोन चार महिन्यांसाठी आमीरअलीची रवानगी एका मूकबधीर मुलांच्या शाळेत केली जाते. तिथे काम करणाऱ्या बीबीचा हा प्लॅन असतो. आमीरअलीला आता आपण मूकबधीर आहोत एवढाच काय तो अभिनय करायचा असतो. आई आणि मुलाच्या या भावनिक ओढाताणीत खलनायक नाही. काझेमही चांगला माणूस आहे, पण समाजातल्या रितीरिवाजांचा बळी आहे. बीबीही लैलाचं भलं व्हावं म्हणून धडपडतेय. पण परिस्थितीच त्यांच्या विरोधात आहे आणि त्यात ही दोन माणसं भरडली जाताहेत. (या सिनेमाचा ट्रेलर येथे पाहा)

पहिल्या दोन तीन दिवसांमध्येच जर तीन चार चांगले सिनेमे मिळाले, त्यातला एखादा अप्रतिम निघाला की मुळातच असलेला उत्साह आणखी वाढतो. केन लोआ या ब्रिटिश दिग्दर्शकाचा ‘रेट्रोस्पेक्टिव्ह’ या महोत्सवामध्ये आहे. 83व्या वर्षी त्यांनी केलेला ‘सॉरी वुई मिस्ड यू’ हा सिनेमा म्हणजे या मास्टर दिग्दर्शकाच्या शिरपेचातला आणखी एक मानाचा तुरा म्हणायला हवा. त्यांचा ‘आय डॅनिएल ब्लेक’ तूफान गाजला होता. स्वाभाविकच त्यांचे ‘रिफ रॅफ’,‘केस’, ‘फादरलँड’, ‘रेनिंग स्टोन्स’ आणि ‘स्विट सिक्सटीन’ हे सिनेमे पहायला मिळणं म्हणजे सिनेप्रेमींसाठी पर्वणीच म्हणायला हवी.

मीना कर्णिक 
meenakarnik@gmail.com

इफ्फी डायरी 2019 विशेष लेखमालेतील पहिला लेख : 'उत्सवाला सुरुवात...'

Tags: सिनेमा इफ्फी 2019 cinema meena karnik iffi 2019 Load More Tags

Comments:

लतिका जाधव

फारच छान अनुभव देणारा लेख.धन्यवाद.

Add Comment