समतेच्या आकाशातील ध्रुवतारा

आफ्रिकेतील वर्णद्वेषविरोधी चळवळीचे अध्वर्यू डेस्मंड टुटू यांचे नुकतेच निधन झाले 

"एखाद्यावर अन्याय होत असतानाही जर तुम्ही शांतपणे पाहत असाल तर तुम्ही अन्यायकर्त्याच्या बाजूचे आहेत असा अर्थ निघतो. एखाद्या बलाढ्य हत्तीने उंदराच्या शेपटीवर पाय दिला असेल आणि तुम्ही 'मला काय त्याचे!' असे म्हणून नामानिराळे राहत असाल तर उंदीर कधीच तुमच्या तटस्थपणाची वाहवा करणार नाही." हे शब्द आहेत प्रसिद्ध समतावादी विचारवंत आणि आफ्रिकेतील वर्णद्वेषविरोधी चळवळीचे अध्वर्यू डेस्मंड टुटू यांचे!

7 ऑक्टोबर 1931 रोजी दक्षिण आफ्रिकेतील क्लर्क्सडोर्प शहरात ऍलन मार्थार्ले आणि झाकरिया टुटू या कृष्णवर्णीय दांपत्याच्या पोटी जन्मलेले डेस्मंड टुटू वयाची 19 वर्षे होईपर्यंत बॉक्सबर्ग या आपल्या आईच्या गावी लहानाचे मोठे झाले. वयाच्या 19व्या वर्षी नेमालिझो यांच्याशी विवाह झाल्यानंतर ते परत क्लर्क्सडोर्प या आपल्या मूळ गावी आले. त्यांचे वडील तेथील मिशनरी प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक होते. त्यामुळे त्यांच्यावर ख्रिश्चन धर्माचे संस्कार होत गेले. साहजिकच येशूची शिकवण आणि संस्कार अंगी बाणवले असल्याने ते एक शिस्तप्रिय आणि संस्कारक्षम शिक्षक म्हणून नावारूपास आले. त्यांच्या अंगी असलेल्या सभ्यपणा, सुसंस्कृतपणा, नम्रता आणि अखंड ज्ञानप्राप्तीचा व नावीन्याचा ध्यास या गुणांमुळे स्थानिक चर्चमध्ये त्यांची पाद्री म्हणून नेमणूक झाली.

त्यांच्यातील गुणवत्ता आणि धार्मिक ओढ लक्षात घेता 1962 मध्ये  त्यांना इंग्लंडमधील किंग्ज महाविद्यालयात धर्मशास्त्रांचे शिक्षण घेण्यासाठी पाठवण्यात आले. 1966 मध्ये ते आफ्रिकेला परतले ते जगातील पोपच्या आणि धर्मगुरूंच्या वर्तुळात ब्रह्मज्ञानी म्हणून मान्यता पावलेले धर्मगुरू म्हणूनच! त्यानंतर 1972 मध्ये आफ्रिकेतील धर्मशास्त्र निधीचे संचालकपदी तर 1975 मध्ये जोहन्सबर्गमधील सेंट मेरी कॅथेड्रलचे अधिष्ठातापदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. 1978 ते 1985 या कालावधीत आफ्रिकेतील चर्चेसचे महासचिव म्हणून काम पाहिले. धार्मिक क्षेत्रात नवनवी शिखरे पादाक्रांत करत असतानाही त्यांनी समता आणि मानवी हक्क चळवळीशी असलेली आपली नाळ तुटू दिली नाही.

स्वतः कृष्णवर्णीय असल्याने त्यांना आफ्रिकेतील श्वेतवर्णीय लोकांकडून कृष्णवर्णीय लोकांवर होणाऱ्या अन्याय-अत्याचारांची जाणीव होतीच. ते महासचिव असतानाच्या काळातच संपूर्ण दक्षिण आफ्रिका वर्णभेदाच्या (Apartheid) विळख्यात सापडला होता. कृष्णवर्णीय लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी नेल्सन मंडेला रस्त्यावर उतरून संघर्ष करतच होते. अल्पसंख्य असूनही श्वेतवर्णीय लोक कृष्णवर्णीय लोकांवर अनन्वित अत्याचार करत होते. यावर काहीतरी ठाम भूमिका घेण्याची गरज निर्माण झाली तेव्हा टुटू शांत बसले नाहीत की तटस्थही राहिले नाहीत. आपल्या निरूपणातून आणि भाषणांतून त्यांनी समता आणि मानवी हक्कांची शिकवण आफ्रिकन नागरिकांना दिलीच होती. त्यामुळे या संघर्षाच्या काळात डेस्मंड टुटू यांची संपूर्ण जगाला खरी ओळख झाली ती समतेचे आणि मानवी हक्काचे दूत म्हणूनच! मानवी हक्क आणि समतेच्या वाटेवर चालत असताना त्यांनीही ती ओळख प्रामाणिकपणे जपली.

त्यांच्या वाटचालीला सुरुवात झाली तीच मुळात दक्षिण आफ्रिकेतील मानवी हक्क चळवळीतील कार्यकर्ते म्हणून. मानवी हक्कांची चळवळ चालविताना त्यांचा ज्या ज्या लोकांशी संपर्क आणि संबंध आला ते सगळे त्यांचे मित्र, शिष्य आणि चाहते झाले. यात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिक, पुरुष, स्त्रिया व श्वेतवर्णीय अशा सर्वांचाच समावेश होता. स्वतः कृष्णवर्णीय असूनही त्यांच्या आजूबाजूला श्वेतवर्णीय लोकही होते, हे त्यांचे आणखी एक वेगळेपण! वर्णभेदाच्या वणव्यात संपूर्ण आफ्रिका खंड होरपळून निघत असताना डेस्मंड टुटू यांनी तेथील कृष्णवर्णीय जनतेच्या जखमांवर हळुवार फुंकर तर घातलीच; पण त्या जास्त चिघळू नयेत यासाठी अविरत प्रयत्न केले. आणि त्यात त्यांना भरीव यशही मिळाले.

दक्षिण आफ्रिकेत अल्पसंख्याक सत्ताधारी श्वेतवर्णीय राजवटीविरुद्ध बहुसंख्य कृष्णवर्णीय जनतेचा लढा सुरू असताना नेल्सन मंडेला या लढ्याचे नेतृत्व करत होते. त्यांच्या या संघर्षाला सोव्हिएत रशियाची फूस आहे, असा आरोप ठेवून तेथील सरकारने 1962 मध्ये त्यांना अटक करून तुरुंगात डांबले. सरकार कृष्णवर्णीय आंदोलकांवर सशस्त्र अन्याय-अत्याचार करत होते, त्या वेळी टुटू नुकतेच आफ्रिकेतील स्थानिक चर्चमध्ये देवदूत (प्रधान बिशप) म्हणून नियुक्त झाले होते. मंडेलांच्या गैरहजेरीत टुटूंनी आपल्या या सर्वोच्च पदाचा सुयोग्य वापर करून श्वेतवर्णीय सरकारच्या कृष्णवर्णीयांवरील अन्याय-अत्याचारांविरुद्ध आवाज उठविला. त्या वेळी चर्चमध्ये आणि चर्चच्या बाहेरही कृष्णवर्णीयांसह श्वेतवर्णीयही त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकत असत. अत्यंत सभ्यपणे, शांतपणे आणि नम्रपणे टुटू श्वेतवर्णीय सरकारच्या चुका लोकांसमोर मांडत असत आणि त्यांच्या गळीही उतरवत असत.

चर्चचा आधार घेऊन त्यांनी हा संघर्ष आफ्रिकेच्या बाहेर नेला आणि जगभर पोहोचवला. पाश्चिमात्य देश- विशेषतः ब्रिटनच्या राणीलाही टुटू यांच्याविषयी आदर होता. तिला त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे लागत असे आणि त्याही शांतपणे ऐकत असत. त्याचा मोठा फायदा आफ्रिकेतील वर्णभेद विरोधी चळवळीला झाला. अनेक कर्मठ आणि कट्टर श्वेतवर्णीय लोकांनी आणि धर्मव्यवस्थेतील पदाधिकाऱ्यांनी त्यांना दुष्ट, राक्षस, धर्मबुडवा म्हणून त्यांच्यावर टीका आणि त्यांची निर्भर्त्सना केली. पण ते आपले विचार आणि ध्येय यांपासून तसूभरही ढळले नाहीत की कोणाला विरोध करत बसले नाहीत. टीकाकारांना उत्तर देताना ते म्हणायचे, ‘‘आपण सगळी त्या एकाच देवाची मुले असून आपण सगळे म्हणजे एक कुटुंब आहोत आणि आपली निर्मिती देवाने काहीतरी चांगले आणि समाजासाठी भरीव करण्यासाठी केली आहे’’. त्यांच्या या उत्तराला विरोध करण्यासाठी त्यांच्या विरोधकांकडे शब्दच शिल्लक नसायचे इतके त्यांचे शब्द सौम्य आणि सभ्य असायचे. त्यांचे विरोधक त्यावर हताश व्हायचे आणि त्यांच्या भाषणांतून किंवा चर्चेतून काढता पाय घ्यायचे.

साहजिकच हे जिंकणे त्यांच्यासाठी नित्याचेच झालेले असायचे. त्यांचे सहकारी आणि चर्चला भेट देणारे साधक त्यांना म्हणायचे, ‘‘तुम्हांला कर्मठ लोक इतके वाईट आणि टोकाचे बोलतात, त्याचा राग येत नाही का?’’ त्यावर तितक्याच नम्रपणे टुटू म्हणायचे, "एखाद्या माणसाने वाईट वागले किंवा वाईट कृत्य केले म्हणून त्याला दोष देत बसण्यापेक्षा किंवा त्याची निर्भर्त्सना करण्यापेक्षा त्याला त्याबद्दल माफ करणे म्हणजे त्याला चांगले वागण्यासाठी किंवा काहीतरी चांगले करण्यासाठी दुसरी संधी देणे होय आणि मीही तेच करतो. साहजिकच त्या व्यक्तीवर काहीतरी चांगले आणि भरीव करण्याची जबाबदारी येते".

सगळ्यांत महत्त्वाचे काय असेल तर टुटू यांचे महात्मा गांधी यांच्याबद्दलचे आकलन! आपल्या वाटचालीबद्दल आणि विचारधारेबद्दल बोलताना टुटू यांनी आपल्या यशाचे सारे श्रेय महात्मा गांधींना दिले. "मी महात्मा गांधींच्या वाटेने जाणारा वाटसरू आहे इतकेच!" हे त्यांचे गांधीजींबद्दलचे उद्गार आपल्याला बरेच काही सांगून जातात. भारत सरकारने 2005 मध्ये  त्यांना ‘गांधी शांतता पुरस्कार’ देऊन सन्मानित केले. त्या कार्यक्रमात आपल्या सत्काराला उत्तर देताना "संपूर्ण दक्षिण आफ्रिका महात्मा गांधींचे देणे लागतो," या शब्दांत त्यांनी महात्मा गांधींच्या कार्याचा आणि तत्त्वज्ञानाचा गौरव केला होता. नेल्सन मंडेला यांच्यानंतर गांधी शांतता पुरस्कार मिळविणारे ते एकमेव आफ्रिकन आहेत.

टुटू यांच्या अहिंसात्मक आंदोलनामुळे दक्षिण आफ्रिका गुलामगिरीतून मुक्त व्हायला मदत तर झालीच; पण नेल्सन मंडेला यांचीही तत्कालीन सरकारला 27 वर्षांच्या तुरुंगवासातून 1990 मध्ये  मुक्तता करावी लागली. दक्षिण आफ्रिका स्वतंत्र झाल्यानंतर 1994 मध्ये नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष झाले. त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी 'सत्यशोधन समिती'ची स्थापना केली होती. झालेल्या हिंसाचाराची निष्पक्ष आणि तटस्थपणे चौकशी व्हावी म्हणून त्यांनी टुटू यांची या समितीच्या अध्यक्षपदी निवड केली होती. टुटू यांनीही कोणतीही तमा न बाळगता आणि कोणाच्याही दबावाला बळी न पडता सदर चौकशी पूर्ण केली. या समितीवर आणि तिच्या अहवालावर कोणीही आणि कसल्याही प्रकारचे आक्षेप नोंदविले नाहीत की संशय घेतला नाही. इतक्या तटस्थपणे त्यांनी चौकशीचे काम पूर्ण केले होते.

नेल्सन मंडेला यांचे समकालीन म्हणून त्यांची ओळख असली तरी त्यांच्या समाजसुधारणांच्या प्रयत्नांना धार्मिक किनार असल्यामुळे नेल्सन मंडेला यांना लाभली इतकी प्रसिद्धी आणि वलय त्यांना लाभले नाही. धर्माच्या चौकटीतील सुधारक म्हणून नेल्सन मंडेला यांच्याइतका संघर्ष त्यांना करावा लागला नाही हे खरे असले तरी त्यांचे मानवी हक्क आणि समतेच्या चळवळीतील योगदान आपल्याला नाकारता येत नाही. सामाजिक सुधारणांना पाठिंबा देताना आणि मानवी हक्कांची बूज राखताना त्यांनी श्वेतवर्णीयांना कधीही झुकते माप दिले नाही. त्यामुळे त्यांचा लढा एक प्रकारे श्वेतवर्णीय समाजाच्या विरोधातला असूनही श्वेतवर्णीय आणि त्यातही पाश्चिमात्य प्रतिष्ठित लोकांचे वर्चस्व असलेल्या नोबेल शांतता पुरस्कार समितीला त्यांच्या मानवी हक्क आणि समतेच्या चळवळीतील योगदानाची दखल घ्यावी लागली.  यथावकाश त्यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कारही द्यावा लागला. 1984 या वर्षी त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील अल्पसंख्य श्वेतवर्णीय  सरकारने आफ्रिकेतील बहुसंख्य कृष्णवर्णीय लोकांवर लादलेली वर्णभेदी राजवट संपुष्टात आणण्यासाठी केलेल्या संघर्षाबद्दल त्यांना शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार देण्यात आला.

मानवाधिकार आणि समतेच्या चळवळीतील कार्यकर्ते- इतक्यावरच न थांबता त्यांनी आपले विचार कागदावर उतरविले. मानवतेला दिशा देणारे विपुल लेखन त्यांच्या नावावर जमा आहे. 'नो फ्यूचर विदाउट फरगिव्हनेस', 'इन गॉड्स हँड : दि आर्चबिशप ऑफ कॅन्टरबरीज लेंट बुक', 'दि बुक ऑफ फरगिव्हिंग : द फोरफोल्ड पाथ ऑफ अवरसेल्व्ह अँड अवर वर्ल्ड', 'दि रेंबो पीपल ऑफ गॉड' या पुस्तकांबरोबरच त्यांनी लहान मुलांसाठी रंजक आणि संस्कारक्षम पुस्तकेही लिहिली. त्यात प्रामुख्याने 'गॉड्स ड्रीम', 'डेस्मंड अँड व्हेरी मिन वर्ल्ड', ‘लेट देअर बी लाइट' यांचा समावेश होतो. त्याचबरोबर बौद्ध धर्मगुरू दलाई लामा आणि डेस्मंड टुटू यांच्यातील संवादही पुस्तकरूपाने आला असून तो 'दि बुक ऑफ जॉय : लास्टिंग हॅपीनेस इन चेंजिंग वर्ल्ड' या नावाने प्रसिद्ध झाला आहे.

शेवटपर्यंत मानवाधिकार आणि समतेच्या चळवळीसाठी आयुष्य वाहिलेला समतेच्या आकाशातील हा ध्रुवतारा रविवारी 26 डिसेंबर रोजी वयाच्या 90व्या वर्षी निखळला. त्यांच्या विचारांनी दाखवलेल्या वाटेने पुढे जाणे हीच त्यांना वाहिलेली आदरांजली ठरेल!

- के. राहुल
srass229@gmail.com

(लेखक बारामती येथील महाविद्यालयात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)

Tags: के. राहुल डेस्मंड टुटू आफ्रिका वर्णद्वेष दक्षिण आफ्रिका व्यक्तिवेध Marathi K. Rahul Desmond Tutu Africa South Africa Apartheid Load More Tags

Add Comment