29 मार्च 2020 रोजी नाशिक येथे नास्तिक मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार होते. या मेळाव्यात प्रमुख वक्त्यांपैकी एक असलेल्या डॉ. अंजली जोशी यांच्या व्याख्यानाचा विषय होता 'ईश्वरश्रद्धा व मानसिक आरोग्य'. परंतु 25 मार्च पासून लागू झालेल्या देशव्यापी टाळेबंदीमुळे हा मेळावा होऊ शकला नाही. त्यामुळे 'ईश्वरश्रद्धा व मानसिक आरोग्य' हे व्याख्यान लेखरूपाने तीन भागांत प्रसिद्ध करत आहोत. पहिल्या भागात, एकूण आठ व्यक्तिमत्त्व वैशिष्ट्यांपैकी पहिली पाच वैशिष्ट्ये आणि ईश्वरश्रद्धा यांचे विश्लेषण करण्यात आले होते. तर या दुसऱ्या भागात उर्वरित तीन व्यक्तिमत्त्व वैशिष्ट्ये आणि ईश्वरश्रद्धा यांचे विश्लेषण करण्यात आले आहे. या दीर्घ लेखाचा अंतिम भाग उद्या प्रसिद्ध होईल.
स्वावलंबन
जेव्हा मनुष्य संकटप्रसंगी ईश्वराची प्रार्थना करीत असतो, त्याचा धावा करीत असतो, तो मला आधार देईल असे म्हणत असतो, तेव्हा तो स्वावलंबनापासून दूर पळत असतो. संकटातून मार्ग काढण्यास आपण स्वतः समर्थ नाही तर स्वतःपेक्षा अन्य कुणीतरी आपल्याला आधार दिला पाहिजे, आपले सांत्वन केले पाहिजे किंवा आपल्याला मार्ग दाखविला पाहिजे अशी परावलंबी मानसिकता त्याच्या मनात तयार होते.
यावर काही जण असे विचारतील की आपणही संकटे किंवा समस्या आली की त्यांचे निराकरण करावयास समुपदेशकाकडे जातोच की! मग तेही परावलंबनच आहे. उलट समुपदेशकाकडून जशी वेळ मागून घ्यावयास लागते किंवा त्यास फी द्यावी लागते तसे ईश्वरप्रार्थनेत करावे लागत नाही. ईश्वराच्या प्रार्थनेसाठी ना वेळ घ्यावी लागत ना त्याला फी द्यावी लागते. म्हणजे ईश्वर अधिक सोयीचा नाही का? याचे उत्तर मिळण्यासाठी समुपदेशक व ईश्वर यांच्याकडे मदत मागायला जाण्याच्या मानसिकतेतला फरक समजून घ्यावा लागेल. येथे समुपदेशन हे विज्ञान असल्यामुळे समुपदेशक हा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अवलंब करीत असेल हे मी गृहीत धरते. समुपदेशक व ईश्वर यांच्या मदतीतला फरक कळण्यास सोपा जावा म्हणून भाविक कुठल्या प्रकारची प्रार्थना करून ईश्वराची मदत मागत असतो, ते आधी समजून घेऊ.
ईश्वरप्रार्थनांचे तीन मुख्य प्रकार सांगता येतील. पहिला प्रकार म्हणजे ईश्वराचे गुणवर्णन करणाऱ्या प्रार्थना. दुसऱ्या प्रकारात जीवनोपयोगी संदेश असतात व तिसऱ्या प्रकारच्या प्रार्थना या कल्याणकारी म्हणजे स्वतःचे व जगाचे कल्याण चिंतणाऱ्या असतात. या प्रार्थना मनुष्यास स्वावलंबनाचे बळ पुरवितात का ते पाहू.
प्रार्थनेच्या पहिल्या प्रकारात ईश्वराला अनेक अतिनैसर्गिक गुण बहाल करून त्याची स्तुती केली तर तो आपल्याला मदत करेल या हेतुने या प्रार्थना केल्या जातात. आपल्याला संकटातून तारून नेणारा ईश्वर हा शक्तिशाली आहे असे येथे गृहीत धरावे लागते. त्याच्या शक्तीचा प्रत्यय मिळण्यासाठी त्याच्यावर स्तुतीसुमने उधळावयास लागतात. त्याची करुणा भाकावी लागते. त्याने अनुग्रह करावा म्हणून त्याच्या चरणांशी मस्तक टेकावे लागते. म्हणजे ईश्वराला येन केन प्रकारे खूश करणे इथे महत्त्वाचे असते. याउलट समुपदेशकाकडे जाताना मात्र समुपदेशकास खूश करणे हे उद्दिष्ट नसून समस्या निराकरण करणे हे उद्दिष्ट असते.
समुपदेशकाची प्रार्थना करावी लागत नाही की त्याची स्तुतीसुमने आळवायला लागत नाही. तो शक्तिशाली आहे, असेही गृहीत धरले जात नाही. तो आपल्यासारखाच एक मर्त्य मनुष्य आहे पण या विषयातील ज्ञान घेतल्यामुळे तो तज्ज्ञ आहे म्हणून त्याची मदत घेतली जाते. तो वस्तुनिष्ठतेने काही पर्याय समोर ठेवतो. पण निवड व्यक्तीलाच करावयास सांगतो. म्हणजेच समुपदेशक व्यक्तीस स्वावलंबन शिकवतो. जीवनातले निर्णय स्वतःच घ्यावयास प्रोत्साहित करीत असतो. व्यक्तीस आधार देणे हे त्याचे उद्दिष्ट नसते, तर जीवनातील खडतर प्रसंगी आधाराशिवायही उभे राहण्यास त्यास आत्मनिर्भर करणे हे त्याचे उद्दिष्ट असते.
आत्मनिर्भरतेसाठी महत्त्वाचा असणारा विशेष म्हणजे स्वतंत्र विचार करण्याची क्षमता. बरट्रँड रसेल (1) यांचे एक सुप्रसिद्ध वचन आहे. ते म्हणतात, ‘मनुष्य हा विचारशील प्राणी आहे, असे ॲरिस्टॉटलने लिहून ठेवले आहे. माझे संपूर्ण आयुष्य मी याचा पुरावा शोधत आहे, पण मला अजूनही मिळाला नाही.’ मनुष्याला विचारशक्तीची देणगी मिळाली असूनही त्याचा फारसा वापर केला जात नाही, याबाबत रसेल यांनी केलेली ही टिप्पणी मार्मिक आहे. येथे नुसता विचार करणे रसेलना अभिप्रेत नाही. कारण नुसता विचार तर सगळेच करतात, पण स्वतंत्र विचार करण्याची मात्र वानवा आहे, हे त्यांचे निरीक्षण अचूक आहे.
ईश्वरश्रद्धा ठेवणारा मनुष्य स्वतंत्र विचार कितपत करू शकतो, ते आता पाहू. तुम्ही ईश्वरावर श्रद्धा ठेवणे कसे निवडले असे भाविकांना विचारले तर बहुतेक उत्तरे अशी मिळतात की लहानपणापासूनच आम्हांला तशी शिकवण मिळाली आहे, वडीलधाऱ्यांनी सांगितले आहे, अनेकजण तशी श्रद्धा ठेवत असतात किंवा तशी श्रद्धा ठेवणे म्हणजे सुसंस्कार आहेत किंवा ती ठेवली नाही तर ईश्वराचा कोप होईल, इत्यादी. याचा अर्थ ईश्वरश्रद्धा ठेवण्याचा मार्ग फारसा स्वतंत्र विचार करून निवडलेला नसतो तर तो मार्ग निवडण्याचे मुख्य कारण असते, ते म्हणजे- ‘गतानुगतिकता’.
कुणी सांगितले आहे, आदेश दिला आहे, ग्रंथात लिहिले आहे, वडीलधाऱ्यांनी सांगितले आहे म्हणून कुठलेही प्रश्न न विचारता ईश्वरश्रद्धा निमुट स्वीकारलेली असते. ती मला पटते का, ती माझ्या हिताची आहे का, माझ्या धारणांशी अनुकूल आहे का अशी कुठलीही चाळणी न लावता तिचे अंधपणे अनुकरण केले असते. भावनिक परावलंबानाची सुरुवात तिथपासूनच झाली असते.हळूहळू कुठलेच प्रश्न न करता मुकाटपणे सर्व स्वीकारण्याची सवय व्यक्ती स्वतःला जडवून घेते.
अशाच परावलंबनाच्या मानसिकतेतून दुसऱ्या प्रकारच्या प्रार्थनेतील संदेशही व्यक्ती निमुटपणे स्वीकारते. यातील काही संदेश जीवनोपयोगी असले तरी काही स्वावलंबनाऐवजी पराधीनता शिकविणारे असतात. उदाहरणार्थ, माझ्या वाट्याला आज जे कर्म आले आहे ते पूर्वजन्मीच्या पाप-पुण्याचे फळ आहे, हा आपल्याकडचा एक प्रचिलत संदेश. इतर प्रार्थनांमध्ये स्वर्ग-नरक यासंबंधी संदेश असू शकतील. खरे तर अशा संदेशामधील तथ्यांश पडताळून पाहून मग तो स्वीकारायचा का नाही हे व्यक्तीने ठरवावयास हवे. पण मुकाटपणाची सवय जडवून घेतल्यामुळे आपण स्वतंत्र विचार करू शकतो, याचाच तिला विसर पडलेला असतो. वास्तविक तिच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले पाहिजेत.
‘मला जर आत्मविकास करायचा असेल तर मी मागच्या जन्मात काय पाप केले होते ते कळले तर मी स्वतःत बदल घडवेन. पण मागच्या जन्मातले आठवतच नसेल तर ते मी सुधारणार कसे? मागच्या जन्मातल्या कर्माचे फळ मला त्याच जन्मात का मिळत नाही? ते मिळावयास दुसऱ्या जन्माची का वाट पाहावी लागते? इतक्या प्रदीर्घ काळानंतर जर मला फळ मिळत असेल तर ते मिळून न मिळाल्यासारखेच आहे. कारण न्यायतत्त्वाप्रमाणे न्याय उशीरा मिळणे म्हणजे तो न मिळाल्यासारखे आहे. चांगले किंवा वाईट कर्म हे परिस्थितीसापेक्ष असते. ते काळानुसार बदलते. मी मागच्या जन्मी केलेले सत्कर्म या जन्मात दुष्कर्म म्हटले गेले तर मला त्या कर्माचे फळ मिळणार का शिक्षा? जर मागच्या जन्मात मी शत्रुसैनिकांना मारले असेल व या जन्मात मी शत्रुंच्या देशात जन्मलो असेन तर मला मागच्या जन्मातल्या शौर्याबद्दल फळ मिळेल का या जन्मातील स्वकीयांना मारले म्हणून शिक्षा? दोन जन्मांचे तर सोडूनच द्या, पण एका जन्मातही सत्कर्म व दुष्कर्मांचे निकष बदलत राहतात. मग फळ किंवा शिक्षा मिळण्यासाठी नक्की कुठले निकष लावले जाणार? ’
पण एकदा का ईश्वरश्रद्धा मानली की अशा प्रश्नांना मूठमाती द्यावी लागते. याच्या नेमके उलट समुपदेशनात घडते. समुपदेशक व्यक्तीला अनेक प्रश्न स्वतःला विचारण्यास उद्युक्त करतो. आत्मविश्लेषण करावयास चालना देतो. प्रार्थनेत दिली जातात तशी रेडिमेड उत्तरे तो देत नाही, तर प्रत्येक समस्येला एकच एक सार्वत्रिक उत्तर नसते, ते प्रत्येकास स्वतःचे स्वतः शोधून काढावे लागते, हे तो समुपदेशनातून ठसवत असतो.
आता तिसऱ्या प्रकारच्या प्रार्थना पाहू. या कल्याणकारी प्रार्थना असतात. ‘जग मंगल आहे. तुमचे सगळे चांगलेच होईल’, अशा प्रकारची शिकवण या प्रार्थना देतात. या शिकवणुकीतून सकारात्मकता रुजवली जात असली तरी ती अनेकदा आभासी सकारात्मकता असते. कारण यात जगात घडणाऱ्या नकारात्मक गोष्टी दुर्लक्षिल्या जातात व मनुष्य त्यांना तोंड देण्यास सज्ज राहत नाही. त्यामुळे दुर्धर परिस्थिती ओढवली की तिला धैर्याने तोंड देण्याऐवजी तिचे खरे स्वरूप मंगलमयच आहे, असा खोटा दिलासा तो स्वतःला देत राहतो व जीवनाच्या रणांगणातून पळ काढतो. समुपदेशक मात्र असा पळ काढण्यापासून त्यास परावृत्त करतो व संकटाशी दोन हात करण्याची तंत्रे शिकवतो.
ईश्वरप्रार्थनांतून अनेकदा सदाचरणाची शिकवण दिली जाते, हे खरे असले तरी त्याबरोबर चांगल्या कामाचे नेहमी चांगलेच फळ मिळते, अशी शिकवणही दिली जाते. मनुष्यास सदाचारास प्रवृत्त करणारी ही शिकवण असली तरी ती सत्याकडे डोळेझाक करणारी आहे. तसेच यामुळे सदाचार हा त्याच्या अंगभूत गुणांमुळे केला पाहिजे असे मनावर न रुजता काहीतरी प्राप्त (चांगले फळ) होईल म्हणून केला पाहिजे असे मनावर रुजते. मनुष्यास असे वाटत राहते की जर मी इतरांशी चांगला वागलो, तर इतरही माझ्याशी चांगले वागतील.
पण वास्तव जीवनात त्याला असे आढळून येते की सदाचार करूनही त्याच्या वाट्याला नेहमीच चांगली फळे येत नाहीत किंवा तो इतरांशी चांगला वागला तरी इतर त्याच्याशी तसे वागतातच असे नाही. याचाच अर्थ मनुष्यास खोटे आश्वासन देऊन फसवले जाते.अशा वेळी त्या माणसाचा भ्रमनिरास होऊन तो एकतर भावनिकदृष्ट्या कोसळून पडतो किंवा माझेच काहीतरी चुकले असेल म्हणून स्वतःला कोसत राहतो. कधी माझेच नशीब फुटके म्हणून आत्मकरुणेत लोटून देतो अथवा या जन्मातल्या सत्कृत्यांचे फळ मला पुढच्या जन्मात मिळेल म्हणून कर्तव्यशून्य होतो. थोडक्यात अशा शिकवणुकीचा पाईक असलेल्या मनुष्यास भावनिक अस्वस्थेतची फार मोठी किंमत चुकवावी लागते.
‘चांगल्याचे चांगले व वाईटाचे वाईट’ अशा शिकवणुकीपासून मुक्त असलेला मनुष्य हा सदाचार त्याचे उपयुक्तता मूल्य न पाहता त्यातील अंगभूत गुणांमुळे करतो. न्याय ही कल्पना मानवनिर्मित आहे, याचे भान त्याला असते व त्यामुळे ‘जगात नैसर्गिकरीत्या न्याय अस्तित्वात असतो’, या भ्रामक समजुतीला तो बळी पडत नाही. जग नैसर्गिक नियमांनी बद्ध आहे परंतु या नियमांचा मनुष्यजीवनाशी संबंध नसतो. एखादा मनुष्य भला आहे म्हणून निसर्ग त्याला दीर्घायुष्य देईल किंवा तसे नसणाऱ्यास अल्पायुष्य देईल असे नसते. त्यामुळे ‘चांगल्या कामाचे चांगले व वाईट कामाचे वाईट फळ’ अशा भ्रमात तो राहात नाही.
मग असा प्रश्न उभा राहतो की मग जर चांगले फळ मिळणार नसेल तर सदाचार का करावा? याची तीन कारणे हा मनुष्य देऊ शकेल. पहिले म्हणजे सदाचार हा त्यातील उपयुक्तता मूल्यामळे नव्हे तर त्यातील अंगभूत गुणांमुळे केला पाहिजे. दुसरे असे की समाजव्यवस्था सुस्थितीत राखण्यासाठी सदाचार करणे आवश्यक आहे व तिसरे म्हणजे एखादा मनुष्य जेव्हा सदाचार करतो तेव्हा इतरांनाही तसे वागण्यास प्रोत्साहन मिळते व तेही सदाचार करण्याची संभाव्यता वाढते. थोडक्यात त्यामुळे चांगल्याचे चांगले व वाईटाचे वाईट फळ मिळूही शकते पण तसे व्हायलाच पाहिजे असा अविवेकी हट्ट हा मनुष्य करीत नाही. अर्थातच त्याचे मानसिक आरोग्य सुस्थितीत राहण्याची शक्यताही अधिक असते.
स्वीकार- स्वतःचा व इतरांचा
ईश्वरश्रद्धा मानली की पाप व पुण्य या संकल्पना मान्य कराव्या लागतात. एकदा त्या मान्य केल्या की तसे करणाऱ्या व्यक्तीच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर ठपका ठेवला जातो. एखाद्या व्यक्तीस ‘पापी’ म्हटले की ती व्यक्ती तिरस्करणीय, निंदनीय ठरते. तिच्या व्यक्तिमत्वातल्या जमेच्या बाजू दुर्लक्षिल्या जातात. त्या व्यक्तीच्या दुष्कृत्यांची शिक्षा म्हणजे तिची रवानगी नरकात करावयास हवी किंवा तिचा जगण्याचा अधिकार हिरावून घ्यावयास हवा, अशा प्रकारच्या मनोधारणेस चालना मिळते. तसेच जी व्यक्ती पुण्य करते तिचे ‘पुण्यवान’ म्हणून दैवतीकरण केले जाते. तिच्या व्यक्तिमत्त्वातल्या कमतरता कुणी दाखवून दिल्या तर तिचे भक्त मानून घेणाऱ्यांना ती बदनामी वाटते. म्हणजेच कुठल्याही व्यक्तीस ‘कृष्ण किंवा धवल’ (Black and White) मोजपट्टीतूनच मोजण्याची मानसिकता तयार होते. अशी मानसिकता इतरांना त्यांच्या गुणावगुणांसह एक ‘मनुष्य’ म्हणून स्वीकारण्यात अडथळा आणते.
ईश्वरश्रद्धा नसणारा मनुष्य बहुधा निधर्मी नीतीशास्त्र मानणारा असतो. अन्य व्यक्ती दुष्कृत्य करत असेल तर त्या दुष्कृत्याची मर्यादा तो त्या विशिष्ट वर्तनापुरतीच सीमित ठेवतो. त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर ‘पापी’ असा ठपका ठेवून तो मरेपर्यंत तसेच वर्तन करेल असे म्हणत नाही. तो बदलू शकतो, असा सहिष्णु दृष्टिकोन बाळगतो. अर्थातच एक ‘मनुष्य’ म्हणून त्यांचा स्वीकार तो अधिक मोकळेपणे करू शकतो. हा मनुष्य केवळ इतरांचाच नाही तर स्वतःचा स्वीकारही चांगल्या वा वाईट गुणांसकट करतो. आपल्या हातून झालेल्या चुकीच्या कृत्यांबद्दल पश्चाताप (regret) व्यक्त करतो व त्या परत न करण्याची दक्षता घेतो. तो स्वतःच्या चुकांवर पांघरुण घालत नाही, पण कठोर आत्मपीडन करीत स्वतःला कायमचे अपराधी ठरवून स्वतःच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर ‘पापी’ असा शिक्का मारीत नाही. मनुष्य हा प्रमादशील प्राणी आहे, याचा विसर तो स्वतःला पडू देत नाही. व त्यामुळे त्याचा आत्मस्वीकारही उच्च असतो. ईश्वरश्रद्धा मानणाऱ्या मनुष्यास स्वतःच्या माणूसपणाचा स्वीकार करण्यास ती श्रद्धा अडथळा आणते. त्याच्या हातून एखादे दुष्कृत्य घडले तर स्वतःला ‘पापी’ संबोधून सतत अपराधीपणाच्या ओझ्याखाली वाकून जातो नाहीतर आयुष्यभर पापक्षालन करीत राहतो.
आशावाद
आता थोड्या वेगळ्या निष्कर्षांकडे मी आपले लक्ष वेधणार आहे. हे निष्कर्ष आहेत, आशावादाबद्दल. आशावादामुळे मानसिक स्वास्थ्याचे संवर्धन होते, असे प्रतिपादन अलीकडील मानसशास्त्रज्ञ करीत आहेत. आनंदी मानसिक स्वास्थ्याची एक चळवळ त्यातून उभी राहिली आहे. मार्टिन सेलिग्मनसारखे मानसशास्त्रज्ञ या चळवळीचे अर्ध्वयु आहेत. आशावादाची जोपासना करण्यात ईश्वरश्रद्धा काय भूमिका बजावते ते पाहू.
ईश्वरश्रद्धा असलेला मनुष्य बहुधा आशावादी असतो. उदाहरणार्थ, ईश्वर आपले सदैव भलेच करेल अशी आशा त्याला वाटते किंवा पुढील जीवनात चांगली फळे मिळतील असा विश्वास ईश्वरश्रद्धा देत असल्याने प्रतिकुल परिस्थितीतही पुढील जन्मात अनुकूल घडण्याची आशा तो बाळगतो. स्वर्गप्राप्ती, मोक्ष, पुनर्जन्म अशा कल्पनांंवरील विश्वास ईश्वरश्रद्धा दृढ करीत असल्यामुळे तो मृत्युकडेही सकारात्मकतेने पाहू शकतो. मृत्युस पूर्णविराम न समजता तो परलोक प्रवासातील एक मुक्काम आहे व आपला पुढील प्रवास बाकी आहे असे मानल्यामुळे तो आशावादी राहतो. इथे असा प्रश्न उभा राहतो की असत्य कल्पनांच्या पायावर उभा राह़िलेला असा भाबडा आशावाद मनुष्याला कितपत मदत करेल? कारण पुराव्याच्या आधारावर सिद्ध न झालेल्या खोट्या कल्पना त्याच्या मुळाशी असतात.असा आशावाद एका सदोष विचारपद्धतीला जन्म देतो. ती म्हणजे ‘आशेचा पूर्वग्रह’ (Optimism bias). याचा अर्थ पुरावा नसला तरी ‘माझ्या आयुष्यात सगळे अनुकूलच घडणार’, असे गृहीत धरणे.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, ज्याप्रमाणे ईश्वरश्रद्धा असलेल्या व्यक्तींत ‘आशेचा पूर्वग्रह’ आढळण्याची शक्यता जास्त असते त्याप्रमाणे ईश्वरश्रद्धा नसलेल्या व्यक्तींत ‘निराशेचा पूर्वग्रह’ (Pessimism bias) आढळण्याची शक्यता जास्त असते. याचे कारण ईश्वरश्रद्धा नसलेला मनुष्य वास्तववादी असल्यामुळे माझे सगळे चांगलेच होईल अशा स्वप्नरंजनात रममाण होत नाही. आपल्याला स्वबळावर कठोर वास्तवाला तोंड द्यायचे आहे, याचे भान असल्यामुळे तो स्वतःला नेहमी सज्ज ठेवत असतो व त्याची तयारी करण्यासाठी वास्तवातल्या ऋणात्मक बाजूंवर त्याचे लक्ष जास्त केंद्रित होते. यामुळे त्याची मानसिकता नकारात्मकतेकडे झुकण्याचा संभव असतो. तो ऐहिक दृष्टिकोनातून मृत्युकडे पाहत असल्यामुळे मृत्यु हा जीवनाची इतिश्री मानत असतो. त्यामुळे त्यास तो भयाण, भयावह वाटू शकतो. मृत्युनंतर पुढे काहीच नसल्यामुळे मृत्युनंतर काही चांगले घडेल अशी आशा तो ठेवू शकत नाही. हळूहळू तो निराशावादाकडे वाटचाल करतो व ईश्वरश्रद्धा असलेल्या व्यक्तींच्या उलट्या टोकाला जाऊन ‘माझ्या आयुष्यात सगळे प्रतिकुलच घडणार’ असे गृहीत धरतो.
याचा अर्थ ईश्वरश्रद्धा असली किंवा नसली तरी ती वास्तव आशावादाची जोपासना करणे कठीण असते. ‘वास्तव आशावाद’ मानसिक आरोग्य उत्तम ठेवतो, हे खरे. पण जर भाबडा आशावाद व निराशावाद यातून निवड करावयाची पाळी आली तर मानसशास्त्रज्ञ भाबड्या आशावादाला कौल देतात. कारण निराशावाद मानसिक आरोग्याची जेवढी हानी करतो त्या तुलनेत भाबडा आशावाद कमी हानी करतो. तो व्यक्तीस तात्पुरता तरी तारून नेतो व भविष्याची आशा दाखवितो. निराशावादात मात्र आशेचे सर्व मार्ग बंद झालेले असतात. तसेच आशावादाला चालना देणाऱ्या सकारात्मकता, कृतज्ञताभाव, सह्रदयता, सेवाभाव अशा भावना ईश्वरश्रद्ध व्यक्तींत तुलनेने जास्त आढळतात. थोडक्यात, ईश्वरश्रद्धा आशावादाच्या बाबतीत थोडीफार उपयोगी पडू शकत असली तरी ‘वास्तव आशावादाची’ पाठराखण ती करू शकत नाही.
व्यक्तिमत्त्व वैशिष्ट्यांच्या या विवेचनावरून आपण व्याख्यानातील पहिल्या मुद्दयाचा असा निष्कर्ष काढू शकतो की तर्कनिष्ठतेने विचार केला तर वरील बहुतांशी वैशिष्ट्यांची जोपासना करण्यास ईश्वरश्रद्धा फारशी उपकारक ठरत नाही.
(या विषयावर झालेल्या संशोधनांत काय निष्कर्ष आले आहेत त्याचा गोषवारा घेऊ भाग 3 मध्ये.)
- डॉ. अंजली जोशी
anjaleejoshi@gmail.com
(लेखिका, मानसोपचारतज्ज्ञ असून मुंबईतील नामांकित इन्स्टिट्यूटमध्ये 'असोसिएट डीन' म्हणून कार्यरत आहेत. त्यांची आतापर्यंत सात पुस्तके प्रकाशित झाली असून, त्यापैकी 'मी अल्बर्ट एलिस' या पुस्तकाला वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे, तर 'विरंगी मी, विमुक्त मी' या पुस्तकाला महाराष्ट्र फाउंडेशनच्या ललित ग्रंथ पुरस्कारासह इतरही अनेक पुरस्कार मिळाले आहेत.)
संदर्भ:
1. Russell, B. (2009). The Basic Writings of Bertrand Russell, The Bertrand Russell Peace Foundation Ltd. p. 45
Tags:Load More Tags
Add Comment