ईश्वरश्रद्धा आणि मानसशास्त्रीय संशोधने

‘ईश्वरश्रद्धा व मानसिक आरोग्य’ या दीर्घ लेखाचा भाग 3

फोटो सौजन्य: iStock

29 मार्च 2020 रोजी नाशिक येथे नास्तिक मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार होते. या मेळाव्यात प्रमुख वक्त्यांपैकी एक असलेल्या डॉ. अंजली जोशी यांच्या व्याख्यानाचा विषय होता 'ईश्वरश्रद्धा व मानसिक आरोग्य'. परंतु  25 मार्च पासून लागू झालेल्या देशव्यापी टाळेबंदीमुळे हा मेळावा होऊ शकला नाही. त्यामुळे 'ईश्वरश्रद्धा व मानसिक आरोग्य' हे व्याख्यान लेखरूपाने तीन भागांत प्रसिद्ध करत आहोत. पहिल्या भागात, एकूण आठ व्यक्तिमत्त्व वैशिष्ट्यांपैकी पहिली पाच वैशिष्ट्ये आणि ईश्वरश्रद्धा यांचे विश्लेषण करण्यात आले होते. दुसऱ्या भागात उर्वरित तीन व्यक्तिमत्त्व वैशिष्ट्ये आणि  ईश्वरश्रद्धा यांचे विश्लेषण करण्यात आले होते. दीर्घ लेखाच्या या अंतिम भागात ईश्वरश्रद्धा असण्याचा किंवा नसण्याचा मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो, हे पाहणारी जी मानसशास्त्रीय संशोधने झाली आहेत त्यांच्यावर ओझरता दृष्टीक्षेप टाकण्यात आला असून, लेखाच्या शेवटी काही मुद्दे व निरीक्षणे मांडण्यात आली आहेत. 

मानसशास्त्रीय संशोधन 

धर्मश्रद्धा व मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम मोजणारी अनेक संशोधने आजवर झाली आहेत. ईश्वरश्रद्धा असली की धर्मश्रद्धा असणारच, म्हणजे ते एकच पॅकेज आहे असे गृहीत धरल्यामुळे ईश्वरश्रद्धा हे स्वतंत्र परिवर्तक घेऊन त्याचा मानसिक स्वास्थ्यावरील परिणाम मोजणारी संशोधने विरळ आहेत. 

धर्मश्रद्धेवरील काही संशोधनात (1,2,3) मानसिक आरोग्याचे विविध घटक, उदाहरणार्थ भावनिक बुदधिमत्ता, आनंद, आत्मविश्वास, क्षमाशीलता इत्यादींमध्ये धर्मश्रद्धा मनुष्यास मदत करते असे आढळून येते, तर काहींमध्ये (4) धर्मश्रद्धेमुळे जीवनाचा अर्थ, नीतिमत्ता, सामाजिक मान्यता यांस हातभार लागतो व मानसिक आरोग्य सुधारते, असेही दिसून आले आहे. 

काही अभ्यासांत (5,6,7) धर्मश्रद्धा असलेल्या व्यक्तींत चिंता, स्वशंका, अपराधिपणा, नैराश्य, आत्मटीका हे घटक जास्त प्रमाणात आढळून येतात, म्हणजेच ती मानसिक आरोग्याला मारक असते, असे दिसून आले आहे. परंतु  ईश्वरश्रद्धा मानसिक आरोग्याच्या अनेक घटकांत तारक ठरत असल्याची संशोधने ती मारक असल्याच्या संशोधनांपेक्षा तुलनेने जास्त आहेत. तसेच ईश्वरश्रद्धा मानसिक आरोग्याला तारक ठरते हे ती सांगत असली तरी ती का तारक ठरतात किंवा त्याची कारणमीमांसा शोधणारी संशोधने विरळ आहेत.  

धर्मश्रद्धेचा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम मोजणारी जशी विपुल संशोधने आढळून येतात त्या मानाने निरीश्वरवाद्यांचे मानसिक आरोग्य मोजणारी संशोधने (8,9) तुटपुंजी आहेत. जरी अलीकडील ‘नवनिरीश्वरवाद’ (New Atheism) चळवळीमुळे ईश्वरश्रद्धा नसण्याकडे पाश्चात्य देशातील व्यक्तींचा कल वाढला असला तरी निरीश्वरवाद्यांचे मानसिक आरोग्य हा मानसशास्त्रीय संशोधनांत दुर्लक्षित राहिलेला विषय आहे. 

तसेच निरीश्वरवाद्यांमध्येही अज्ञेयवादी, संभाव्य नास्तिक, अधार्मिक, असंलग्न, आध्यात्मिक पण ईश्वरश्रद्धा नाकारणारे अशा अनेकांचा समावेश होत असल्यामुळे फक्त ‘ईश्वरश्रद्धा नसणे’ हे स्वतंत्र परिवर्तक घेऊन त्याचा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम मोजलेला फारसा आढळून येत नाही. 

निरीश्वरवाद्यांच्या मानसिक आरोग्यावर जी काही थोडीफार संशोधने झाली आहेत त्यामध्येही मिश्र निष्कर्ष आढळून येतात. काही अभ्यासांत (10) निरीश्वरवाद्यांत चिंता, संशयवृत्ती, पछाडलेपणा, अनिवार्यता हे कमी असल्यामुळे त्यांचे मानसिक स्वास्थ्य उच्च असल्याचे दिसून आले आहे; तर काहींमध्ये (11) राग, एकटेपणा, नैराश्य, आत्मगौरव अशा मानसिक आरोग्यास हानिकारक घटकांचे प्राबल्य जास्त असल्याचे दिसून येते. 

काही तुलनात्मक अभ्यासांत (10,4) निरीश्वरवाद्यांचे मानसिक आरोग्य ईश्वरवाद्यांपेक्षा उच्च असल्याचे दिसून आले आहे तर काहींमध्ये (1) ईश्वरवाद्यांचे मानसिक आरोग्य उच्च असल्याचे आढळले आहे. काहींत (4) तर दोन्ही गटांतील व्यक्तींमध्ये समान मानसिक आरोग्य दिसून आले आहे.

अशा परस्परविरोधी निष्कर्षांमुळे ईश्वरश्रद्धेचा मानसिक आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो याबाबत एकच एक ठोस निष्कर्ष काढणे कठीण आहे. या संशोधनांचा आढावा घेतला तर दोन अनुमाने निघू शकतात. 

1. ईश्वरश्रद्धा हा घटक मानसिक आरोग्याशी संबंधित नसावा. म्हणजेच ईश्वरश्रद्धेचा मानसिक आरोग्याशी संबंधच नसावा. त्यामुळे ती असली काय किंवा नसली काय, मानसिक आरोग्यावर ती कुठलाच परिणाम करत नसावी. याचाच अर्थ मानसिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक हे ईश्वरश्रद्धेपेक्षा वेगळे असावेत. 

2. आजतागायत झालेली संशोधने ही अपुरी असल्यामुळे या विषयावर अजून सखोल संशोधनाची गरज आहे. ईश्वरश्रद्धा ठेवणारे व न ठेवणारे असे दोन्ही गट एकत्रित घेऊन व उर्वरित परिवर्तके स्थिर ठेवून त्यांच्या मानसिक स्वास्थ्याचे मापन केले तर अचूक निष्कर्ष मिळू शकतील. परंतु अशा प्रकारचे प्रयत्न अभावानेच आढळून येत असल्यामुळे ते जास्त बळकट करण्याची गरज आहे. 

पहिल्या अनुमानाचा विचार केला तर ईश्वरश्रद्धा मानसिक आरोग्याशी असंबंधित असल्याचा निष्कर्ष कुठल्याही संशोधनात दिसून येत नाही. त्यामुळे ते अनुमान सत्य असण्याची शक्यता कमी वाटते. परंतु दुसऱ्या अनुमानास अनेक संशोधकांनी (8) दुजोरा दिल्यामुळे हे अनुमान जास्त सयुक्तिक वाटते. 

या विवेचनावरून व्याख्यानातील दुसऱ्या मुद्दयाचा असा निष्कर्ष निघू शकतो की ईश्वरश्रद्धा मानसिक आरोग्याचे जतन करते का नाही, हे सिद्ध करणारा निर्णायक पुरावा मानसशास्त्रीय संशोधनांत आढळून येत नाही व या विषयावर अधिक संशोधन करण्याची आवश्यकता आहे. 

आता मी शेवटच्या मुद्दयाकडे वळते. या विषयाचे समग्रपणे सिंहावलोकन करताना मला काही मुद्दे ठळकपणे जाणवतात. तसेच काही निरीक्षणे नोंदविणेही मला आवश्यक वाटते. हे मुद्दे व निरीक्षणे यांची चर्चाकरून मी समारोप करणार आहे. 

ठळक मुद्दे व निरीक्षणे 

1. ईश्वरश्रद्धा असणारी माणसे आंतरिक घटकांमुळे म्हणजे केवळ श्रद्धा वाटते म्हणूनच ती बाळगतात असे नव्हे तर ईश्वरश्रद्धेचे काही सामाजिक फायदेही असतात. (1) उदाहरणार्थ, समाजातील बहुसंख्य लोक ती बाळगत असल्यामुळे या माणसांना सामाजिक मान्यता मिळते, सामाजिक पाठिंबा मिळतो, सुरक्षितता मिळते, सन्मानाने वागवले जाते, इत्यादी. या घटकांना बाह्य घटक म्हणता येईल.

बाह्य घटकांपेक्षा आंतरिक घटकांमुळे ईश्वरश्रद्धा जोपासणाऱ्या व्यक्तींचे मानसिक स्वास्थ्य जास्त चांगले असते. धर्मश्रद्धेवरील ज्या अभ्यासांत ईश्वरश्रद्धेबद्दलचे धनात्मक निष्कर्ष आले आहेत, त्यामध्ये आंतरिक घटकांमुळे त्यांचे मानसिक आरोग्य चांगले आहे, का बाह्य म्हणजे सामाजिक फायद्यांमुळे चांगले आहे ते शोधता येणे कठीण आहे.

त्या तुलनेत ईश्वरश्रद्धा नसणाऱ्या व्यक्ती या आंतरिक घटकांमुळेच तसे करीत असतात. कारण ही श्रद्धा न ठेवून त्यांना फायदे तर काहीच होत नाहीत. झालेच तर तोटे होतात. उदाहरणार्थ, त्यांना सामाजिक पाठिंबा मिळत नाही, फारशी समाजमान्यता मिळत नाही, मुख्य समाजधारणेपासून ते वेगळे पडतात. इतकेच नव्हे तर बहुसंख्य समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही नकारात्मक असतो. (12) त्यामुळे एकटेपणा येऊन त्यांचे मानसिक आरोग्य खालावू शकते. 

निरीश्वरवाद्यांवर झालेल्या ज्या अभ्यासांत निरीश्वरवाद्यांचे मानसिक आरोग्य निम्न आले आहे, ते ईश्वरश्रद्धा नसल्यामुळे का सामाजिक तोट्यांमुळे ते ठरविता येणे कठीण आहे. परंतु ज्या अभ्यांसात निरीश्वरवाद्यांचे मानसिक स्वास्थ्य उच्च आले आहे त्यांच्यात तोटे सहन करून उभे राहण्याची खंबीरता असली पाहिजे. तसेच वैफल्य सहनशीलताही फार उच्च असली पाहिजे. ईश्वरश्रद्ध मनुष्य ईश्वराचा आधार घेतो. पण ईश्वरश्रद्धा नसणाऱ्याला मात्र कुठल्याही आधाराशिवाय संपूर्णपणे स्वतःवर विसंबून राहावे लागते. त्यामुळे त्यांची आत्मनिर्भरताही उच्च असली पाहिजे. 

2. स्वतःपलीकडे जाऊन विश्वाला जोडून घेण्याची व त्यासाठी कार्यरत राहण्याची प्रेरणा ही निकोप मानसिकतेचे एक लक्षण आहे असे काही मानसशास्त्रज्ञांनी (13,19,20) प्रतिपादन केले आहे. या प्रेरणेस ‘Self-Transcedence’ म्हणजे ‘परात्परता’ असे म्हटले जाते.
 
अब्राहम मॅस्लो हे त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात या प्रेरणेवर संशोधन करीत होते व ही प्रेरणा त्यांना इतकी महत्त्वाची वाटत होती की प्रेरणांच्या क्रमवारीत ती आत्मप्रगटीकरणाच्या वरच्या स्थानावर म्हणजे अत्युच्च स्थानावर येईल असे त्यांना वाटत होते. 

या प्रेरणेवरचे त्यांचे संशोधन पूर्ण झाले नाही. परंतु ही प्रेरणा आध्यात्मिकतेशी जोडून घेतल्यामुळे व आध्यात्मिकतेत धार्मिकता गृहीत धरल्यामुळे या प्रेरणेचे आजवर धार्मिक अंगानेच विश्लेषण झाले आहे. या प्रेरणेवरचे संशोधन अजून बाल्यावस्थेत आहे. 

ईश्वरश्रद्धेशी जोडल्या गेलेल्या विश्वकल्याण, अंतिम सत्य, मोक्ष, इत्यादी संकल्पना उदात्त हेतुने कार्यरत होण्यास व्यक्तिस चालना देत असाव्यात. त्यामुळे परात्परतेची प्रेरणा ईश्वरश्रद्धा ठेवणाऱ्या व्यक्तींमध्ये प्रबळ असावी. ज्या अभ्यासांत ईश्वरश्रद्धा असणाऱ्यांचे मानसिक आरोग्य उच्च आले आहे, त्यांच्यात ही प्रेरणाही उच्च होती का हे पाहणे उद्बोधक ठरेल. मानसिक आरोग्य संवर्धन होण्यासाठी ही प्रेरणा उपयोगी पडत असेल तर ईश्वरश्रद्धा न ठेवताही त्या प्रेरणेचे संवर्धन कसे करता येईल याचाही विचार करणे गरजेचे आहे. 

ईश्वरश्रद्धा नसणाऱ्या व्यक्ती या बहुधा स्वतःची दृष्टी ऐहिक, इहवादी जगापुरती मर्यादित ठेवत असल्यामुळे स्वतःचा परीघ एका मर्यादेपलीकडे विस्तारणे त्यांना कठीण जात असावे. 

परंतु हा परीघ विस्तारला जाऊ शकतो. सध्या सॅम हॅरीससारखे (14) नवनिरीश्वरवादी ‘अधार्मिक आध्यात्मिकतेचा’ पुरस्कार करीत आहेत. त्यामुळे ईश्वरश्रद्धा न ठेवताही आध्यात्मिक राहण्याचा विचार मूळ धरत आहे. या पार्श्वभूमीवर आध्यात्मिकतेशी संलग्न असणारी परात्परतेची प्रेरणा ईश्वरश्रद्धा नसण्याच्या बरोबरीने जोपासली गेली तर मानसिक आरोग्यात वृद्धी होऊ शकेल.

3. जरी वेगवगेगळ्या देवदेवतांवर श्रद्धा असली तरी ईश्वरश्रद्धा ही सर्व ईश्वरभक्तांना एकत्र बांधून ठेवू शकते. कुठल्याही एकाच विचारसरणीचा असा एकछत्री अंमल निरीश्वरवाद्यांवर नसतो. ‘ईश्वरश्रद्धा नसणे’ या एका मुद्यावर ते सहमत असले तरी त्या अंतर्गत अनेक विचारधारांशी त्यांची बांधिलकी असते. हल्ली या गटाला एकत्रितपणे ‘Nones’ असे संबोधले जाते. 

पण ईश्वरश्रद्धा असणाऱ्यांमध्ये ग्रंथ, प्रमुख, उपासना किंवा संघटना यामध्ये जशी समानता दिसून येते तशी निरीश्वरवाद्यांमध्ये दिसून येत नाही. किंबहुना तशी ती नसणे हीच त्यांची ओळख असते. परंतु ते त्यामुळे इतके विखुरलेले असतात की संशोधकांना निरीश्वरवाद्यांचा प्रदत्त गोळा करणे अवघड जाते. 

ईश्वरश्रद्धा जशी मिरवता येते तशी ती ‘नसणे’ मिरवता येत नसल्यामुळे काहीजण त्याबाबत मौन बाळगतात. काही समाजाच्या नकारात्मक अभिवृत्तींना तोंड देणे टाळण्यासाठी उघड भूमिका घेणे टाळतात तर काही स्वतःच्या निर्णयावर ठाम नसतात किंवा काहीजण वाच्यता न करता वैयक्तिकरीत्या त़िचे पालन करण्यावर भर देतात. याचा परिणाम म्हणजे ईश्वरश्रद्धा नसणाऱ्यांचा नेमका आकडा कळणे कठीण जाते. मानसशास्त्रीय संशोधनात निरीश्वरवाद्यांकडे दुर्लक्ष झाले आहे त्याचे कारण या अडचणींत असावे.  

4. ईश्वरश्रद्धा नसण्याचा उगम हा बौद्धिक घटकांत म्हणजेच स्वतंत्र विचार किंवा तर्क करण्यात आहे, असा सर्वसाधारण समज आहे. परंतु अनेकदा अबौद्धिक घटकांमुळेही ईश्वरश्रद्धा नाकारली जाऊ शकते. 

उदाहरणार्थ, ईश्वराबद्दलचा भ्रमनिरास, राग, दुखावले जाणे, अविश्वास इत्यादी. अशा नकारात्मक भावना ईश्वरश्रद्धा झुगारून देण्यास कारणीभूत झाल्या असतील तर मनुष्याचे मानसिक स्वास्थ्य धोक्यात येऊ शकते. 

ज्या व्यक्तींनी नकारात्मक भावनांमुळे ईश्वरश्रद्धा नाकारली त्यांच्यात राग, भय, स्वामित्वभावना अशा मानसिक स्वास्थ्यास हानीकारक भावना मोठ्या प्रमाणात आढळून आल्या. (15) याचा अर्थ केवळ ईश्वरश्रद्धा नसणे हे वर्तन न अभ्यासता, ते का केले जाते याची कारणमीमांसा मानसिक स्वास्थ्याच्या संदर्भात महत्वाची ठरते. 

5. बहुतेक संशोधनांत एका निष्कर्षावर शिक्कामोर्तब झाले आहे. तो म्हणजे- एखाद्या गोष्टीवर श्रद्धा असली तर ती मानसिक आरोग्याला हानीकारक नसते. पण ती जर कडवी, कट्टर व हटवादी असली तर मानसिक आरोग्य धोक्यात येऊ शकते. म्हणजे केवळ ईश्वरश्रद्धा आहे यापेक्षा ती किती कट्टर आहे, यावर मानसिक स्वास्थ्य अवलंबून असते. 

उदाहरणार्थ, अमुक एका ईश्वरावर माझी श्रद्धा आहे असे जर एखादा मनुष्य म्हणत असेल तर त्याच्या मानसिक स्वास्थ्यास धोका नसतो. पण त्याने  जर अशी हटवादी भूमिका घेतली की मी पूजतो तोच ईश्वर सर्वश्रेष्ठ आहे व त्याचेच पालन इतरांनी करावयास हवे, तर त्याच्या मानसिक आरोग्याचे नुकसान होऊ शकते. 

‘अमेरिकन सायकॉलॉजीकल असोसिएशन’ या आघाडीच्या संस्थेने अलीकडे केलेल्या दीर्घकालीन संशोधनात (16) कट्टर ईश्वरभक्त चिंता, विभ्रम, संशयविकृती, अशा विकारांना लवकर बळी पडतात असे दिसून आले आहे.

परंतु अशी हटवादी विचारसरणी केवळ ईश्वरश्रद्धेबाबतच नव्हे तर कुठल्याही विचारसरणीबाबत म्हणजे नास्तिकतेबाबतही असू शकते. याचाच अर्थ ईश्वरश्रद्धा नसण्याचाही दुराग्रह बाळगला जाऊ शकतो व तो मानसिक आरोग्यास हानी पोहोचवू शकतो. 

उदाहरणार्थ, ईश्वरश्रद्धा नसणे या एकमेव मार्गानेच सत्य कळू शकते, असा दुराग्रह एखादा मनुष्य बाळगत असेल तर त्याच्या मानसिक स्वास्थ्यास धोका पोहोचू शकतो, कारण तो इतरांबाबत अधिकाधिक असहिष्णु होत जातो. प्रसिद्ध लेखिका व विचारवंत ॲन रँड यांचे उदाहरण याबाबतीत घेता येईल. त्यांनी मांडलेल्या `Objectivism'  या जीवनतत्त्वज्ञानात जरी निरीश्वरवादाचा पुरस्कार केला असला तरी त्यांची निरीश्वरवादी भूमिका हेकट व हटवादी आहे व असहिष्णुततेला खतपाणी घालणारी आहे, अशी टीका त्यांच्यावर झाली होती. (17)

अलीकडचे उदाहरण घ्यायचे तर नवनिरीश्वरवाद्यांचे घेता येईल. ते ज्या संज्ञा वापरतात त्या ‘नेहमी, कधीच नाही, नक्कीच, प्रत्येक’ अशा ‘पूर्ण वा शून्य ’ (All or None) स्वरुपाच्या म्हणजेच कट्टरपणाकडे झुकलेल्या आहेत, अशी टीका त्यांच्यावर जोनाथन हाईड्‌ट (18) या मानसशास्त्रज्ञांनी केली आहे. 

आपण बोलताना व लिहिताना जी भाषा वापरतो, तिच्यावरून आपली मानसिकता प्रगट होत असते, असे भाषातज्ञ म्हणतात. त्यामुळे नवनिरीश्वरवाद्यांच्या केलेल्या भाषाविश्लेषणात वर नोंदविलेले जे हटवादी, कट्टर शब्द येतात त्यावरून त्यांची अपरिवर्तनीय मानसिकता लक्षात येते, असे निरीक्षण हाईड्‌ट नोंदवितात. 

निरीश्वरवाद्यांचा दुराग्रह व तर्ककर्कशता हा अनेकदा टीकेचा विषय झाला आहे. असा दुराग्रह केवळ मानसिक स्वास्थ्यावरच परिणाम करतो असे नाही तर समाजाभिमुखतेतही अडथळा आणतो. तो बाळगला नाही तर ‘ईश्वरश्रद्धा असणारे सर्वच अज्ञ व अडाणी असतात’ असे न म्हणता ईश्वरश्रद्धा असणाऱ्यांचीही एक बाजू असते. ती मला पटो वा ना पटो. ती मी ऐकून घेतली पाहिजे, अशा समंजस व सह्रदय भूमिकेचा स्वीकार ते करू शकतील. 

प्रत्येक मनुष्य जीवनप्रवासात वेगवेगळ्या मार्गांनी सुखसंवर्धन करण्याचा प्रयत्न करीत असतो. स्वतःच्या धारणेशी अनुकूल किंवा प्रतिकुल असलेले हे सर्व मार्ग समजून घेण्याचे कुतुहल निरीश्वरवाद्यांनी शाबूत ठेवले तर हा दुराग्रह कमी होऊ शकतो. तसेच यातील काही मार्ग माझ्या मार्गापेक्षा वेगळे असतील, तरी मला जसा माझे मार्ग निवडण्याचा अधिकार आहे, तसाच इतरांनाही त्यांचे मार्ग निवडण्याचा अधिकार आहे, अशी सहिष्णु भूमिका ते घेऊ शकतील. ईश्वरश्रद्धा नसणाऱ्यांनी जर ‘समंजस निरीश्वरवादाचा’ पुरस्कार केला तर त्यांचे मानसिक स्वास्थ्य ते चांगले राखू शकतील.  

6. ईश्वरश्रद्धा न ठेवण्यामध्ये नकारात्मकता आहे असा आक्षेप निरीश्वरवाद्यांवर घेतला जातो. यावर ईश्वरश्रद्धा नसणे (lack of belief) व ती नाकारणे (disbelief in god) यात फरक आहे व नाकारण्यात नकारात्मकता असते, श्रद्धा न मानण्यात नाही असे प्रत्युत्तर ते देतात. तरीही ‘नसणे’ किंवा ‘नाही’ यामुळे नकारात्मक मानसिकता निर्माण होते, हे टीकाकारांचे म्हणणे अमान्य करता येत नाही. 

‘नसणे’ ही एक उदासिन भूमिका (apathy) आहे. ‘असणे’ ही भूमिका घेतल्यामुळे ईश्वरश्रद्धेचा युक्तिवाद करण्याची जबाबदारी ईश्वरभक्तांवर फारशी पडत नाही. पण ‘नसणे’ ही भूमिका घेतल्यामुळे  मात्र आपण तो का मानत नाही याचा युक्तिवाद करण्याची जबाबदारी सर्वस्वी निरीश्वरवाद्यांवर येऊन पडते. त्यामुळे त्यांना सतत आत्मसंरक्षक (defensive) पवित्रा घ्यावा लागतो व स्वतःच्या भूमिकेचे समर्थन द्यावे लागते. जर ईश्वरश्रद्धा नसण्याच्या जोडीने ‘काहीतरी असण्याचा’ पर्याय दिला तर हे टळू शकते व क्रिया प्रतिक्रियात्मक विचार मांडण्यात खर्च होत असलेली त्यांची बुद्धी व शक्ती अधिक विधायकतेने वापरली जाऊ शकते.

मनुष्यप्राण्यात संलग्नतेची उपजत प्रेरणा कमी-जास्त प्रमाणात असते व ती ‘नसणे’ या भूमिकेमुळे भागली जात नाही. ‘नसणे’ म्हटल्यावर एक पोकळी तयार होते. तिची जागा भरून काढण्यासाठी ‘काहीतरी भरीव असण्याची’ जोड देण्याची आवश्यकता आहे. ईश्वरश्रद्धेत जसा ‘ईश्वर असण्याचा’ पर्याय आहे तसा ‘कल्याणकारी कार्याचा म्हणजेच काहीतरी असण्याचा सक्षम व सकारात्मक पर्याय ईश्वर श्रद्धा नसण्याच्या जोडीने ठेवावयास हवा. तो पर्याय जर समाजाभिमुख व सह्रदय असेल तर तो स्वीकारार्ह ठरण्याची शक्यता वाढते व ‘ईश्वरश्रद्धा नसण्याच्या’ मुख्य भूमिकेला बळ मिळू शकते.

‘मानवतावाद’ हा एक सशक्त पर्याय असू शकतो व ‘नसण्याने’ जे समाजापासून तुटलेपण येते ते मानवतावादात अभिप्रेत असलेल्या कल्याणकारी कार्याने भरुन निघू शकते व समाजाशी नाळ जोडली जाऊ शकते. पण मानवतावादामध्येही अनेक प्रकार आहेत. ‘ऐहिक मानवतावाद’ नसण्याची पोकळी भरून काढेल का? का त्याचीही एक चौकट तयार होईल? वर नमूद केलेल्या परात्परतेच्या प्रेरणेचा या संदर्भात विचार करता येईल का? का सर्वस्वी वेगळ्या अशा नव्या पर्यायाची जोड द्यावी लागेल? अशा प्रश्नांवर विचारविनिमय होण्याची गरज आहे. तो झाला तर मानसिक स्वास्थ्य संवर्धनासाठी एक पाऊल पुढे उचलले गेले असे म्हणता येईल.  

- डॉ. अंजली जोशी

(लेखिका, मानसोपचारतज्ज्ञ असून मुंबईतील नामांकित इन्स्टिट्यूटमध्ये 'असोसिएट डीन' म्हणून कार्यरत आहेत. त्यांची आतापर्यंत सात पुस्तके प्रकाशित झाली असून, त्यापैकी 'मी अल्बर्ट एलिस' या पुस्तकाला वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे, तर 'विरंगी मी, विमुक्त मी' या पुस्तकाला महाराष्ट्र फाउंडेशनच्या ललित ग्रंथ पुरस्कारासह इतरही अनेक पुरस्कार मिळाले आहेत.)

संदर्भ:

1. Behere, P;  Das, A;  Yadav, R. & Behere, A.  (Jan 2013).  Religion and mental health. Indian J Psychiatry. 2013 Jan; 55(Suppl 2): S187–S194.–Retrived from https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3705681/
2. Lowicki, P. & Zajenkowski (2016) On the Link Between Emotional Intelligence and Religious Belief, Journal of Religion and Health, December 2017, Volume 56, Issue 6, pp 1998–2009 
3. Joseph S. & Murray, J. (2003),Religiosity and its association with happiness, purpose in life, and self-actualisation" is published in Mental Health, Religion & Culture, Volume 2 (2).  Retreived from https://warwick.ac.uk/newsandevents/pressreleases/ne100000008548/
4. Whitley, R (Dec,2018). The Mental Health of Atheists and the "Nones" . Psychology Today. Retreived from https://www.psychologytoday.com/us/blog/talking-about-men/201812/the-mental-health-atheists-and-the-nones
5. Agarwal AK. (1989). Religion and mental health. Editorial. Indian J Psychiatry. ;31:185–6.
6. Moreira-Almeida A: LotufoNeto F&  Koenig Harold G. (2006). Religiousness and mental health: A review. Rev. Bras. Psiquiatr. ; 28  
7. Wig NN. (1970). Influence of religion on mental illness in India. International Congress of Social Psychiatry, Yoguslavia.
8. Whitley, R.(April, 2010). Atheism and Mental Health. Harvard Review of Psychiatry. 18(3):190–194
9. Brewster, M. E., Robinson, M. A., Sandil, R., Esposito, J., & Geiger, E. (2014). Arrantly absent: Atheism in psychological science from 2001 to 2012 ψ. The Counseling Psychologist, 42(5), 628–663. Retrived from https://doi.org/10.1177/0011000014528051  
10. Baker, J. Stroope, S. & Walker, M. (July, 2018) Secularity, religiosity, and health: Physical and mental health differences

between atheists, agnostics, and nonaffiliated theists compared to religiously affiliated individual. Social Sceince Research, 75. Retrived from https://www.researchgate.net/publication/326517642_Secularity_religiosity_and_health_Physical_and_mental_health_differences_between_atheists_agnostics_and_nonaffiliated_theists_compared_to_religiously_affiliated_individuals
11. Exline, J. J., Park, C. L., Smyth, J. M., & Carey, M. P. (2011). Anger toward God: Social-cognitive predictors, prevalence, and links with adjustment to bereavement and cancer. Journal of Personality and Social Psychology, 100, 129-148.  
12. Weber, S. R.; Pargament K, I; Kunik, M. E.; Lomax, J. W.  2nd; Stanley, M. A. (2012)Psychological distress among religious nonbelievers: a systematic review.J Relig Health. 2012 Mar;51(1):72-86.
13. Coward, Doris D. (1996). Self-transcendence and correlates in a healthy population. Nursing research 45.2,116−121.
14. Harris, S. (2014). Waking Up: A Guide to Spirituality Without Religion. Simon & Schuster. 1st edition
15. Tix, A. (May, 2016). The New Psychology of Atheism. Paychology Today. Retrived from https://www.psychologytoday.com/us/blog/the-pursuit-peace/201603/the-new-psychology-atheism
16. Surendran, V. (July 20, 2015). Do you believe in God? Some consider it a mental illness? India Today. Retrievd from https://www.indiatoday.in/world/story/belief-in-god-mental-illness-283376-2015-07-20
17. Ellis, A. (1968). Is Objectivisim a Religion? New York:Lyle Stuart, Rev.ed. Ayn Rand: Her Fascistic and Fanatically Religious Philosophy.
18. Haidt, J. (February 3, 2014 8:36 pm ) Why Sam Harris is Unlikely to Change his Mind. Retrived from https://evolution-institute.org/why-sam-harris-is-unlikely-to-change-his-mind10/
19. Allport, G. (1961). Pattern and Growth in Personality. New York: Holt, Rinehart & Winston. 
20. Peterson, C&Seligman, M. (April, 2004). Character Strengths and Virtues: A Handbook and Classification. OUP USA . First Edition. 

 

वाचा ‘ईश्वरश्रद्धा व मानसिक आरोग्य’ या दीर्घ लेखाचे इतर दोन भाग:
1. मानसिक आरोग्य सुस्थितीत ठेवण्यासाठी ईश्वरश्रद्धा तारक ठरते का?
2. आत्मनिर्भरता आणि ईश्वरश्रद्धा

Tags:Load More Tags

Comments: Show All Comments

Chandrashekhar Yengde

मॅडम आपले तीनही लेख वाचले.अत्यंत तर्कशुद्ध मांडणी केली आहे.आपल्या लेखांमुळे विचारात अधिक प्रगल्भता आली.

कर्तव्य साधना

संजीव वाडीकर, असंबंधित शब्द योग्य आहे. पहिले अनुमान आहे की ईश्वरश्रद्धा हा घटक मानसिक आरोग्याशी संबंधित नसावा. म्हणजेच असंबंधित असावा. परंतु तसा निष्कर्ष संशोधनात दिसून येत नसल्यामुळे ते अनुमान सत्य ठरविता येणार नाही. अनुमान परत वाचून पाहिल्यास कळू शकेल. - अंजली जोशी

Sanjeev Manohar Wadikar

माननीय महोदया , सादर नमस्कार एक संगणकीय छपाईची चूक वाटते आहे , त्यासंबंधी .. सुरुवातीच्या लिखाणात जी दोन अनुमाने काढली आहेत , त्यातील दुसऱ्या अनुमानानंतरच्या परिच्छेदात , दुसऱ्या ओळीचा तिसरा शब्द " असंबंधित " असा छापला आहे. तो वाक्यात विरोधाभासात्मक वाटतो. तो शब्द ' संबंधित ' असा हवा आहे काय? ( माझ्याकडून चूक होत नसल्यास ) हे संपूर्ण शास्त्राधारित विवेचनात्मक लिखाण अत्यंत तर्कसुसंगत आहे. परंतू " अद्याप अशी पहाणी झाली नाही वा हे संशोधन व्हायचे आहे " अशा अभ्यासातील उणिवांमुळे , विचारांस आधार देणारे संदर्भ कमी झाले आहेत. आपल्या अभ्यासपूर्ण , स्पष्टीकरणाची जोड लाभलेल्या व वाचण्यास सुलभ असलेल्या लिखाणामुळे विचार / कल्पना सुस्पष्ट झाल्या. मनःपूर्वक धन्यवाद.

मुकुंद नगराळे

तिन्ही लेख वाचले.मी आधीपासूनच निरीश्वरवादी विचारांचा आहेच. परंतु विषय मांडताना/बाजू मांडताना येणाऱ्या अडचणी आपल्या लेखांमुळे दूर झाल्या. ठामपणे मांडता येतील. धन्यवाद.

Daniel Mascarenhas

तिन्ही लेख आवडले...

Sanjeev Manohar Wadikar

आदरणीय डॉक्टर महोदया .. नमस्कार प्रतिसाद दिल्याबद्दल आणि शंकानिरसन केल्याबद्दल मनापासून आभार.

Add Comment