सांस्कृतिक भौतिकवादाच्या अंगाने इतिहासलेखनाची उर्मी वाढवणारा ग्रंथ

'लातूर : परिघावरील आवाज' या पुस्तकाचा परिचय

आपल्या वाटेला आलेल्या जीवनाचा काही अंश खांद्यावर घेऊन पुढे जाणारा लोकसमूह आणि अशा अर्थाने समाजात जगणारे विविध समाजगट आणि त्यांचे भयंकर अशा प्रकारचे प्रश्न (समजलेले आणि न समजलेले), भरडल्या गेलेल्या/जाणाऱ्या, उपेक्षित/वंचित असणाऱ्या, परिघावर वावरणाऱ्या/जीवनातील अनेक गोष्टींचा स्पर्शही न झालेला अशा व्यापक अर्थाने पसरलेला गरीब, कष्टकरी आणि श्रमिक समाज, ज्याला आपण इंग्रजीत 'मास' (mass) असे म्हणतो, म्हणजे साधारणपणे समाजातील 'जनता' या लोकजीवन घटिताचा खोलवर वेध घेऊन त्याची चिकित्सा, विवरण करत अशा प्रकारच्या नव्या इतिहासासाठी लेखन करण्याची उर्मी हा ग्रंथ वाढवतो. 

सांस्कृतिक भौतिकवाद (Cultural Materialism) अशी एक सैद्धांतिक संकल्पना विसाव्या शतकातील मार्क्सवादी विचारवंत आणि सैद्धांतिक रेमंड विल्यम्स (1921-1988) यांनी मांडलेली आहे. 'संस्कृती' या शीर्षकाखाली एक प्रकरण त्यांनी 'मार्क्सवाद आणि साहित्य' (Marxism and Literature 1977; Reprint, 1978, OUP, pp. 11-20) या पुस्तकात लिहिले आहे. याशिवाय 'संस्कृती आणि समाज' ' (Culture and Society: 1780-1950; Anchor Books, London, 1960) असेही ‘संस्कृती’ या संकल्पनेवर वेगळा प्रकाश टाकणारे त्यांचे एक महत्त्वाचे पुस्तक आहे. या दोन्हीही संहितांमध्ये 'सांस्कृतिक भौतिकवाद' या सैद्धांतिक संकल्पनेबद्दल विस्ताराने विवेचन आले आहे.

संस्कृती समजावून घेण्याच्या प्रयत्नात सांस्कृतिक ऐतिहासिक द्वंद्वात (Historical Dialectics) मानवी संस्कृतीची विविध रूपे आणि विरूपे कशी निर्माण होतात किंवा ती कशी केली निर्माण केली जातात या गोष्टींची विस्तृत आणि खोलवर चर्चा प्रथमत: रेमंड विल्यम्स यांनी केली (यातूनच पुढे ‘संस्कृती अभ्यास’ नावाची एक वेगळी ज्ञानशाखा निर्माण झाली). संस्कृती म्हणजे जगण्याचा एक मार्ग. संस्कृती म्हणजे केवळ कला, साहित्य, संगीत नव्हे किंवा कपडेलत्ते, रंग, नृत्य, शृंगार, चित्रकला, नाटक, चित्रपट पाहणे किंवा त्याबद्दल काही बोलणे नव्हे. तर संस्कृती म्हणजे, रोजच्या जगण्यातील कलह, संघर्ष आणि या जगण्याच्या संघर्षांना, समस्यांना सामोरे जाण्याचा जीवनातील एक मार्ग. 'लातूर : परिघावरील आवाज' या पुस्तकात एका महानगरातील जगण्याचा कलह, संघर्ष आणि समस्यांचा सांगोपांग विचार आणि विवेचन येते. या अंगाने विचार केल्यास 'सांस्कृतिक भौतिकवाद' या विल्यम्स यांच्या विचारांशी मिळतीजुळती अशी ही चर्चा या पुस्तकात आली आहे असे मला स्वतःला वाटते.

संस्कृती ही एक वादग्रस्त संकल्पना  आहे. त्याचबरोबर ती एक ऐतिहासिक समस्या ही आहे. संस्कृतीचा अर्थ हा कृषी जीवनाशी (cultivation/culture) जोडला जातो/जोडता येतो. संस्कृतीचे अर्थांतरण हे मानवी श्रमसंस्कृतीला कवटाळणारे आहे. अर्थात संस्कृतीचा हा एकच अर्थ आहे असे म्हणता येणार नाही. संस्कृतीची तुलना civilization शी (महासंस्कृती) केली तर, civilization ही एक व्यापक संकल्पना आहे आणि ऐतिहासिक कालप्रवाहात ही संकल्पना मानवी आणि भौतिक संस्कृतीचे बाह्य अंगाचे रूप विशद करते, असे दिसते. संस्कृती ही व्यक्तीची आंतरिक प्रेरणा, आध्यात्मिक भावना किंवा याबद्दलची ती अभिव्यक्ती असते, असे ढोबळमानाने म्हणता येईल. Civilization ही केवळ एक व्यवस्था, संपत्ती आणि नीटनेटकेपणाच निर्माण करत नाही तर ती दारिद्र्य, अराजकता, अवहेलना, उपेक्षा, टंचाई आणि ऱ्हास यांचीही निर्मिती करत असते. 'लातूर : परिघावरील आवाज' या पुस्तकात या अंगाने विचार झाला आहे. या अनुषंगाने एका विशिष्ट कालखंडातले विशेषतः दडपलेल्या, दाबल्या गेलेल्या, परिघावर राहणाऱ्या लोकांचे सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दस्तावेजीकरण या पुस्तकात झाले आहे असे म्हणता येईल.

या पुस्तकाचे उप-शीर्षक 'परिघावरील आवाज' हे या पुस्तकाचा परिप्रेक्ष्य आणि दृष्टिकोन स्पष्ट करणारे आहे. 'परिघ' ही संकल्पना विसाव्या शतकातील उत्तरआधुनिक पण वादग्रस्त फ्रेंच विचारवंत, झाक देरिदा (1930-2004) यांच्या विरचनावाद (Deconstructionism) या सिद्धांतनात परत परत येणारी संकल्पना आहे. याचा या पुस्तकातील मजकुराशी फार जवळचा संबंध आहे, असे मला स्वतःला वाटते. तत्पूर्वी थोडेसे या संकल्पनेबद्दल. 'परिघ' (Periphery) ही संकल्पना 'केंद्र' (Centre) या संकल्पनेशी जोडलेली आहे. द्विपदी विरोध (Binary Opposition) ही अजून एक महत्त्वाची संकल्पना या सिद्धांतनात परत परत येणारी आहे. विरचनावाद यात वर उल्लेख केलेल्या परिघ आणि केंद्र या संकल्पनांशी ती निगडीत आहे. समाजात उपस्थित असलेला कलह यातून देरिदा यांनी दाखवला आहे. केंद्र आणि परिघ यांच्यातून व्यक्त होत जाणारे सत्तासंबंध यातून दिसतात. केंद्र या ठिकाणी स्थापित असलेले परिघावर असणाऱ्यांना विस्थापित अवस्थेत कायम ठेवण्याचे राजकारण करत असतात. समाजामध्ये हा कलह आणि संघर्ष कायम उपस्थित राहतो (कधीकधी परिघावरील केंद्राकडे जाता जाता ते केंद्रातही जाऊ शकतात आणि मग केंद्रातून विस्थापित झालेले परिघावर फेकले जातात. ते मग परत केंद्राकडे येण्याचा म्हणजेच प्रस्थापित होण्याचा प्रयत्न करत राहतात. 'स्थापित होणे आणि परत विस्थापित होणे' हा एक न संपणारा संघर्ष आणि कलह आहे. तो समाजात सातत्याने उपस्थित राहतो असे देरिदा यांचे प्रतिपादन आहे. हा एक वेगळाच प्रश्न आहे आणि एक वेगळा विषयही. तो वरवर पाहता सोपा वाटत असला तरी, तो तसा नाही). परिघावरचा आवाज दडपण्याचे, त्यावर वर्चस्व गाजविण्याचे, त्याला प्रसंगी चिरडण्याचे प्रयत्न हे सातत्याने होत राहतात. या परिघावरच्या आवाजाला 'खरा आवाज' देण्याचा प्रयत्न म्हणजे या पुस्तकात झालेली दीर्घ चर्चा असे मला वाटते.

हा ग्रंथ तसा साडेतीनशे पानांचा मोठा ग्रंथ आहे. यामध्ये एकूण पाच भाग येतात आणि 45 लेख. लातूर शहराची सांस्कृतिक आणि सामाजिक जडणघडण, राजकारण आणि शहर, लिंगभाव आणि शहर, शहराच्या विकासातील अंतर्विरोध, आणि शेवटचा भाग हा जाती-जमाती आणि शहर असा आहे. या भागांच्या शीर्षकांकडे जरी लक्ष दिले तर या पुस्तकाचा आशय हा साधारण किंवा हॅपझर्ड नाही हे सहज लक्षात येते. विशेष म्हणजे यातील लेखक हे प्रस्थापित लेखक नाहीत. प्रमुख संपादक अनिल जायभाये (शिवाय, पंचशील डावकर, महेश गुंड आणि किरण पवार यांनी या ग्रंथासाठी मौलिक संपादकीय साहाय्य दिले आहे) यांनी आपल्याच विद्यार्थ्यांना गेल्या दोन दशकांत या शहराच्या विविध विषयांवर, अनेक अंगांवर संशोधन प्रकल्पाचा भाग म्हणून त्यांना कार्यप्रवण केले. त्यांनी अनेक संशोधन प्रकल्प या विद्यार्थ्यांना दिले. त्यातून हे लेखन निर्माण झाले आहे. म्हणून हे फार आगळेवेगळे लिखाण झाले आहे. पुस्तक निर्मितीचा विचार झाल्यानंतर अर्थात यामध्ये काही निमंत्रित अशा लेखकांना नंतर संपादकांनी या विषयाच्या अंगाने लिहिण्यास प्रवृत्त केले आहे.


हेही वाचा : गावखेडयातील विषमतेचं समग्र चिंतन मांडणारी कविता - आबासाहेब सरवदे


एखाद्या नगराचा किंवा महानगराचा वेध घेणे, त्या शहराचा इतिहास, परंपरा, रूढी, तेथील सामाजिक, सांस्कृतिक घटना, त्या भाषेत लिहिले गेलेले साहित्य, उत्सव, लोक कसे विचार करतात? किंवा कसे करत नाही? आणि ते तसे का करत नसावेत? वगैरे अनेक गोष्टींचा यात समावेश आणि उहापोह होऊ शकतो. अनेक धर्मीय, अनेक पंथीय लोक यात मिसळलेले असतात. त्याचे काय करायचे? या शहराला 250 ते 300 वर्षांपासून निजाम राजवटीचा इतिहास आहे. तरीही या शहरांमध्ये मुस्लिम हिंदू लक्षणीय म्हणता येतील (काही अपवाद वगळता) असे जातीय दंगे झाले नाहीत, ही एक विशेष गोष्ट म्हणावी लागेल. आंतर भारती, युवक क्रांती दल (युक्रांद), दलित चळवळ, आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची अंनिस अशा अनेक चळवळी या शहरात उभ्या राहिल्या. प्राचार्य ना. य. डोळे, जनार्दन वाघमारे, विठ्ठल मोरे, विठ्ठल दुडिले वगैरे विचारवंत, लेखक, कार्यकर्त्यांनी येथील वैचारिक व्यासपीठे उभी केली. पण जागतिकीकरणानंतर चंगळवाद माजला (हे घटित साधारणपणे सगळीकडेच पाहायला मिळते) आणि बौद्धिक क्षेत्र केवळ मोजक्या लोकांकडे गेले आहे. भ्रष्टाचाराचा प्रश्न, शैक्षणिक क्षेत्राप्रमाणेच इतरही क्षेत्रात संसर्गित रोगाप्रमाणे पसरत गेला. अशा नोंदी सूर्यनारायण रणसुभे यांनी केल्या आहेत.

जागतिकीकरणानंतर चंगळवाद बोकाळला हे संपूर्णतः नसले तरी अंशतः खरेच आहे. वर्चस्ववादी आणि उच्चवर्णीयांचा हा चंगळवाद पूर्वीही सुरू होताच; तो बहुजन समाजामध्ये या कारणामुळे थोडा विस्तारला. हा चंगळवादी (परिप्रेक्ष्य) ठळकपणे त्यांच्यापर्यंत आज पोचला आहे, यात काहीच शंका नाही (त्याचे काय परिणाम व्हायचे आणि झालेत हा एक मोठा अभ्यासाचा विषय आहे). हे असे आज झाले असले तरी अतिजागतिकीकरण (Super-Globalisation) आणि उत्तरआधुनिक (Postmodernist) कालखंडात बौद्धिक क्षेत्र हे केवळ मोजक्या लोकांकडे आहे किंवा गेले आहे, हे काही पटत नाही. उलट तंत्रज्ञान, मायाजालचा अतिविस्तार, त्याचा सहज होणारा वापर, ऑनलाइन आणि नेटच्या सहज उपलब्धतेमुळे इंस्टाग्राम, ब्लॉग, फेसबुक, व्हाट्सअप या अशा अनेक ऑनलाइन संकेतस्थळांच्या आणि अमाप सुविधा उपलब्ध झाल्यामुळे बौद्धिक क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात प्रत्येकाला व्यक्त होण्याची आणि काही सांगण्याची संधी उपलब्ध झाली आहे. हा प्रश्न या पुस्तकाच्या माध्यमातून संपादक अनिल जायभाये यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. यानिमित्ताने तरुण मुलांना प्रोत्साहित करून त्यांना विशिष्ट अशा प्रकारचे प्रशिक्षण दिले आहे, ज्ञानाची हाताळणी कशी करावी याबद्दलचे नियमित पाठ आणि सक्षम धडेच त्यांनी दिले आहेत. 1990 पूर्वी बौद्धिक क्षेत्राची सत्ता आणि मोनोपॉली वर्चस्ववादी जातवर्गाची ठळकपणे होती. उलट ती 1990 नंतर कोसळून पडली आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. युगोस्लाव्हीयन मार्क्सवादी मानसशास्त्रज्ञ, स्लावोज झिझेक (1949-) यांनी यासंदर्भात व्यापक विवेचन केले आहे (The Sublime Object of Ideology 1989, Verso Books).

लातूर शहर हे पुरोगामी चळवळीचे केंद्र असल्यामुळे 'पुरोगामी चळवळ जडण-घडण आणि आव्हाने' हा सुभाष भिंगे यांचा दीर्घ लेख वाचण्यासारखा आहे. हैदराबाद मुक्ती आंदोलनात या शहराचा सहभाग मोठा राहिला. अस्पृश्यता निवारण आणि आंतरजातीय विवाह यांचे प्रमाण या गावात नेहमीच मोठे राहिले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वातंत्र्योत्तर काळापर्यंत घडलेल्या अनेक राजकीय घटनांची नोंद या लेखात आहे. 1960 मध्ये महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले ही घटना असो किंवा 1978 मधला मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा प्रश्न असो या सगळ्या महत्त्वाच्या घटनांचा इत्यंभूत आढावा या लेखात आला आहे. पण 1999 मध्ये विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्वच पुरोगामी चळवळी मोडीत निघाल्या. निरनिराळ्या कारणांनी डावे आणि पुरोगामी हतबल व निराश झाले. राजकीयदृष्ट्या डाव्या पुरोगामी संघटना, दलित संघटना क्षीण झाल्या. हे असे का व्हावे, यामागे नेमके राजकारण कोणते होते या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा एक प्रयत्न या लेखात दिसतो.

तनुजा येलाले यांचा लातूर शहराच्या स्थित्यंतराबद्दल लेख आहे. यात त्यांनी तीन भाग केले आहेत. 1947 ते 1970, 1970 ते  1990 आणि 1990 ते सद्य:काळ. या अशा अनेक लेखांमध्ये वेगवेगळ्या अर्थाने तपशिलांचा पुनरूच्चार बऱ्याच ठिकाणी झाला आहे (हे असे होणे साहजिकही आहे). निर्माता, लेखक, दिग्दर्शक श्रीराम गोजमगुंडे आणि अभिनेता रितेश देशमुख यांच्या सिनेमा क्षेत्रातील कामगिरीची नोंद घेणारा विवेक कुलकर्णी यांचा ‘लातूरचे सिनेविश्व’ असा एक लेखही यात आहे. आंतरजातीय विवाह हे जातिअंताच्या संभाषिताला पूरक आहे. जातिसंस्थेच्या उच्चाटनाचा हा एक मार्ग आहे असे समर्थन डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते कॉम्रेड शरद पाटील यांच्या संभाषितांत आलेले आहे. पण आंतरजातीय विवाह ही एक समस्या म्हणून त्याचे निवारण कसे करता येईल यावर समुपदेशन वगैरे गोष्टींची गरज आहे. त्यादृष्टीने लातूर शहरात कोणकोणते प्रकल्प राबवले गेले. अंनिसच्या माध्यमातून केले गेलेले कार्य याचा एक संक्षिप्त पण चिकित्सक आढावा भाऊसाहेब उमाटे यांच्या लेखात आला आहे. 

महाराष्ट्रात बारावीच्या परीक्षांमध्ये मेरीट यादीत झळकणारे विद्यार्थी हे लातूर शहराचे वैशिष्ट्य सतत बरीच वर्षं टिकून राहिले. यातून निर्माण झालेल्या 'लातूर पॅटर्न'चा महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्येही बराच गवगवा झाला. खासगी क्लासेस/ ट्युशन्स आणि त्यातील पैशाचे गणित; केवळ विज्ञान शाखेतील विषय आणि इंग्रजी हा विषय याचाच अभ्यास, परीक्षेत अधिकाधिक गुण कसे मिळवावेत यासंबंधीचा सराव. पण कला, साहित्य, सामाजिक शास्त्रे, वाणिज्य शाखेतील इतर विषय यांबद्दल प्रचंड अनास्था का? शैक्षणिक क्षेत्रात केवळ कागदावरील गुणवत्ता प्राप्त करण्याचे (विशेषतः मध्यम आणि उच्च मध्यमवर्गीय कुटुंबांतील केवळ डॉक्टर आणि इंजिनियर होण्यासाठी/या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्राप्तीची गुणवत्ता प्राप्त करण्यासाठी) हे नेमके राजकारण काय आहे? याचा अनेकांगी वेध महेश गुंड यांनी 'लातूर पॅटर्न की आलेख !' या लेखात घेतला.

समाजशास्त्रीय, आर्थिक आणि सांस्कृतिक कोलाहलात विकसित होत जाणारी गुंतागुंत समजावून घेणे ही गोष्ट तशी मूलतः आव्हानात्मक असते. भांडवली व्यवस्थेत शिक्षणाची भूमिका ही भांडवली व्यवस्थेलाच उपकारक असणारी असते, हे एक उघड सत्य आहे. शिक्षणातून परिवर्तन, व्यक्तीचा विकास, उत्कर्ष वगैरे ह्या गोष्टी म्हणजे एक मिथकच (Myth) असतात.  हर्षवर्धन कोल्हापुरे यांचा 'दलित बहुजनांच्या शिक्षणातील विषमता' हा शिक्षणविषयक लेखही या ग्रंथात आहे. याशिवाय लातूरमधील गणेशोत्सव, वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण, दलित बहुजनांच्या शिक्षणातील विषमता, गंजगोलाई : एक अद्भुत व्यापार पेठ, शहरातील पानसंस्कृती, राजकीय महिला नेतृत्व, शहरातील मराठा क्रांती मोर्चा अशाही बहुतेक दुर्लक्षित आणि उपेक्षित असणाऱ्या अनेक विषयांवर लातूर शहराच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जडणघडणीतील योगदान नोंदवणाऱ्या नोंदी या लेखांत आल्या आहेत. 

विवेक घोटाळे यांचा ‘काँग्रेस वर्चस्वाला आव्हान - भाजपचे अन् जातीय हितसंबंधाचे’ आणि अशोक नारनवरे यांचा ‘दलित चळवळ : संघटना आणि राजकारण’ असे दोन दीर्घ संशोधनात्मक लेख या पुस्तकात आहेत. हे मुळातून वाचायला हवेत असेच आहेत. याशिवाय लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न (आनंद मुसळे), हंगामी कामगारांचे स्थलांतर आणि त्यांचे प्रश्न (निशिकांत वारभुवन), भूजल वास्तव आणि उपाय योजना (बी. एन. संगनवार), असंघटित श्रमिकांचे प्रश्न (अनिल जायभाये) अशा विविध विषयांवरचे लेख 'शहराच्या विकासातील अंतर्विरोध' या विभागात आलेले आहेत. लिंगभाव आणि शहर असा एक महत्त्वाचा विभाग या पुस्तकात आहे. लैंगिकता, लैंगिकतेचे स्वरूप, सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि लिंगभावविषमता, झोपडपट्ट्यांमधील स्त्री संघर्ष, घरकामगार स्त्रियांचे प्रश्न, मुलींमधील खडू पेन्सिल खाण्याची सवय, लिंगभावात्मक आरोग्याचे राजकारण, महिला सुरक्षा कर्मचारी यांची सुरक्षितता, शहरातील फूटपाथ, सावकारी प्रश्न, वृद्धाश्रम, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, अपंगत्वाचे प्रश्न असेही लेख या पुस्तकात सक्षमतेने हाताळले गेले आहेत. अशा अनेक नाजूक आणि संवेदनक्षम विषयांवर अभ्यासपूर्ण निरीक्षणे आणि नोंदी या लेखांमधून आलेली आहेत. अखिलेश आयलाने, दत्तात्रय आदमाने, राहुल थोरात, पूजा तिप्पणबोने, पंचशील डावकर, स्नेहा चामले या (हे तरूण संशोधक विद्यार्थी आहेत) लेखकांनी या अभ्यासपूर्ण नोंदी केलेल्या  आहेत. ‘लातूर शहरातील मुस्लीम समाज समजून घेताना’ (शेहजादी मेहबूब शेख), ‘शहरातील भटके’ (स्मितल वाघमारे) असे लेखही ‘जाती-जमाती आणि शहर’ या परिप्रेक्ष्यातूनदेखील या पुस्तकात आले आहेत.


हेही वाचा : महाराष्ट्राचा उपेक्षित मानकरी (लोकहितवादींच्या जन्म-द्विशताब्दी वर्षाचा प्रारंभ) - डॅनिअल मस्करणीस


या ग्रंथाचे प्रमुख संपादक अनिल जायभाये यांचा 'विकासातील अंतर्विरोध' हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे. विकासाचे राजकारण, त्याचे नेमके उद्देश, पाश्चात्य जगातील रेनेसाँ या सोळाव्या शतकातील इंग्लंडमधल्या सुधारणावादी चळवळीपासून रशियामध्ये झालेल्या साम्यवादी चळवळीतून 'कल्याणकारी राज्य' (welfare state) नावाची जी गोष्ट नंतर जगभर पसरली आणि त्यातून विविधांगी विकासाची जी रूपे विकसित होत गेली त्यांचा एक चिकित्सक आढावा या लेखात आहे. या अंगाने 'विकास' या घटिताचाच एक जागतिक इतिहास आणि त्यात असणारे अनेक अंतर्विरोध लातूर शहराचा इतिहास सांगण्याच्या निमित्ताने यात आले आहेत.

सुरूवातीला रेमंड विल्यम्स यांच्या नावाचा उल्लेख आलाच आहे. त्यांनी या संदर्भात काही महत्त्वाची निरीक्षणे केली आहेत; ती सर्व निरीक्षणे या ग्रंथाला लागू पडतात असे मला स्वतःला वाटते. संस्कृतीच्या अंगाने काही शोध आणि बोध घेत असताना, ती मानवी कलहाच्या ऐतिहासिक प्रवाहात कशा पद्धतीने एकमेकांत मिसळत जातात, हा एक महत्त्वाचा विवेचनाचा मुद्दा या ग्रंथातील जवळपास प्रत्येक लेखात प्रतिबिंबित झाला आहे. या अनुषंगाने पाहिल्यास संस्कृतीचे संदर्भ हे सातत्याने विस्तारतात किंवा उलट विचार करता, संकुचितही होऊ शकतात. विशिष्ट कालखंडातील वेळोवेळीचे आकळणारे अर्थ (meanings) आणि अर्थांतरणे (interpretations) यांचे संदर्भही बदलत जातात किंवा त्यांची मांडणी वेगळ्या पद्धतीने केली जाते किंवा करायला भाग पाडली जाते. त्यांना दिला गेलेला प्रतिसाद हा सरळसाधा नसतो. त्यामध्ये अनेक गोष्टींची मिसळण होऊ शकते. यातून बौद्धिक, नैतिक, वैचारिक, राजकीय, आर्थिक, लिंगभावात्मक या व अशा अनेक गुंतागुंतीच्या व्यावहारिक पातळीवर घडणाऱ्या प्रक्रियांतून काही समाजशास्त्रीय आणि सांस्कृतिक निवाडा  किंवा पर्याय शोधण्याच्या वाटा खुल्या होतात किंवा त्या बंदही होतात अथवा बंद केल्या जाऊ शकतात. संस्कृतीचा ऐतिहासिकदृष्टीने होणारा विकास किंवा ऱ्हास ही सर्वात महत्त्वाची बाब असते. यातून जीवनाचा बदलणारा अर्थ, अनर्थ किंवा जगण्याचा अनुभव, उपेक्षा, अपमान, अवहेलना, टंचाईग्रस्त जगण्याच्या, भरडून निघाल्याच्या जिवंत ज्वाळा, धर्म, जात, वर्ग, लिंगभाव, राजकारण वगैरे चरख्यातून पिळले गेलेले हैराण जीव, आणि त्यातून निर्माण झालेली विविधांगी भावना, दृष्टिकोन, परिप्रेक्ष्य आणि एकत्रितपणे निर्माण झालेल्या/बांधल्या गेलेल्या अर्थांतरणाची किंवा संभाषिताची जोड या व अशा अनेक गोष्टी या संस्कृतीच्या ऐतिहासिक प्रवासाच्या थांब्यावर झळकत राहतात. त्याचे अनावरण आणि निवारण (अर्थात, निवारणाचा एक प्रयत्न) या ग्रंथात झाले आहे.

मानवी संस्कृतीचे अर्थ हे साधारणपणे मानवी जीवनानुभवाच्या प्रमुख आणि सर्वसामान्य जगण्याच्या स्थिती आणि गतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पण ते आपण नेहमी शोधण्याचा प्रयत्न करतोच असे नाही (वस्तुतः हे आपण करायला हवे. सदर ग्रंथ हा त्याचाच एक वस्तुपाठ आहे). आपल्याला बऱ्याचवेळा या गोष्टी सापडतही नाहीत. अनेक प्रश्नांचा गुंता कधीकधी यक्षप्रश्न म्हणून आपल्यासमोर उभा राहतो. काहीच समजत नाही; कशाचेच काही आकलन होत नाही. अशावेळी असे ग्रंथ आपणांस मार्गदर्शक ठरतात. प्रातिनिधिक दृष्टिकोनातून विचार करता हा ग्रंथ केवळ लातूर या शहराचाच 'सांस्कृतिक भौतिकवाद' मांडणारा ग्रंथ आहे असे अजिबात वाटत नाही. कमी-अधिक प्रमाणांमध्ये अशाच गोष्टी अनेक शहरांच्या निर्मितीमध्ये आपणांस सापडू शकतात (म्हणून प्रत्येक महानगराचा/शहराचा/ गावाचा/गावपाड्याचा अशा प्रकारचा सांस्कृतिक इतिहास लिहिला गेला तर, एकूण महाराष्ट्राचाच सांस्कृतिक भौतिकवाद आपल्यासमोर उभा राहू शकतो).

आपल्या वाटेला आलेल्या जीवनाचा काही अंश खांद्यावर घेऊन पुढे जाणारा लोकसमूह आणि अशा अर्थाने समाजात जगणारे विविध समाजगट आणि त्यांचे भयंकर अशा प्रकारचे प्रश्न (समजलेले आणि न समजलेले), भरडल्या गेलेल्या/जाणाऱ्या, उपेक्षित/वंचित असणाऱ्या, परिघावर वावरणाऱ्या/जीवनातील अनेक गोष्टींचा स्पर्शही न झालेला अशा व्यापक अर्थाने पसरलेला गरीब, कष्टकरी आणि श्रमिक समाज, ज्याला आपण इंग्रजीत 'मास' (mass) असे म्हणतो, म्हणजे साधारणपणे समाजातील 'जनता' या लोकजीवन घटिताचा खोलवर वेध घेऊन त्याची चिकित्सा, विवरण करत अशा प्रकारच्या नव्या इतिहासासाठी लेखन करण्याची उर्मी हा ग्रंथ वाढवतो. या संहितेचा हा अन्वय आहे, याबद्दल कुठलीही शंका वाटत नाही. भारतीय साहित्याचे समीक्षक आणि भाषाशास्त्राचे गाढे अभ्यासक, डॉ. गणेश देवी यांनी म्हटल्याप्रमाणे या पुस्तकाने मराठीत सामाजिक शास्त्रांचे एक नवे दालन खुले केले आहे. हे अगदी तंतोतंत खरे आहे. महाराष्ट्रातील अनेक शहर वसाहतींची अशा प्रकारची मीमांसा व्हायला हवी असे या निमित्ताने आवर्जून म्हणावेसे वाटते.

सदर ग्रंथ हा प्रामुख्याने लातूर शहराचा काही दशकांचा 'सांस्कृतिक भौतिकवाद' सांगणारा दस्ताऐवज आहे. गेल्या वीस वर्षांतील संशोधनाचे हे फलित आहे. त्यामुळे वाचकांना यातील स्पष्टीकरणांची आणि तपशिलांची गांभीर्याने नोंद घ्यावी लागेल.

पुस्तकाचे नाव: लातूर : परिघावरील आवाज 
संपादक : अनिल जायभाये
संपादक सहायक :  पंचशील गावकर, महेश गुंड व किरण पवार
प्रकाशक : हरिती पब्लिकेशन, पुणे
एकूण पाने : 352, किंमत : 450 रुपये
पुस्तक मिळण्यासाठी संपर्क:  राहुल 7385521336 

- डॉ. दीपक बोरगावे, पुणे 
deepak.borgave7@gmail.com 

Tags: लातूर मराठी साहित्य पुस्तके शहर सामाजिक साहित्य सांस्कृतिक भौतिकवाद Load More Tags

Comments:

अनिल जायभाये

सर्वांचे धन्यवाद..

Anil Jaybhaye

Thanks for your feedback.

Dr. Bhausaheb Adamane

यातील बरेचसे लेख नवोदित लेखकांनी विद्यार्थ्यांनी लिहिले आहेत. परंतु नवोदित लेखकांना पुढे येऊ न देण्याची व त्यांच्या लिखाणाला वाव व प्रसिद्धी न देण्याची आपली परंपरा आहे.

डाॅ.अशोक नारनवरे

खूप चांगले परिक्षण.

Rajkranti Walse

This is an excellent book for all those who want to look deep into their history and surrounding

Add Comment