'विषमताग्रस्त माणूस' हा सुभाष वाघमारे यांच्या कवितेचा केंद्रबिंदू आहे. झोपडी ते माडी हे अंतर संपुष्टात यावे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अष्टौप्रहर कष्ट करून संविधानाची निर्मिती केली. तरीही विषमतेची मुळे अजून हद्दपार झाली नाहीत, याची कवीला खंत वाटते. कवी आपल्या मनोगतात एके ठिकाणी म्हणतो, "माझी कविता गाव पेटवून देण्यासाठी निर्माण झालेली नाही. विध्वंसक काही न करता विधायक करावे हीच भावना आहे.'' कवीची हीच भावना त्यांच्या समग्र कवितेतून प्रतिबिंबित झाली आहे.
कवी सुभाष वाघमारे ग्रामीण जीवनाची जाण आणि भान असलेला एक परिवर्तनवादी कवी आहे. 'संविधानाच्या स्वप्नातलं गाव' (5 जून 2021) हा त्यांचा पहिलाच कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला. बहुसंख्य सवर्णांकडून अल्पसंख्याक समुहाचा होणारा छळ, कष्टकरी वर्गाच्या वाटयाला आलेली गुलामगिरी, विषम व्यवस्थेमुळे गावाचा बिघडलेला समतोल, लोकशाही असूनही गावखेड्यात सत्तेचे न होणारे विकेंद्रीकरण आणि गावापासून ते शहरापर्यत संविधान मूल्यांचे होत असलेले अवमूल्यन असे कितीतरी प्रश्न कवी सुभाष वाघमारे आपल्या कवितेतून धारदारपणे उभे करतात. गाव समस्यामुक्त व्हावा, विषमतामुक्त व्हावा, तो संविधानाच्या वाटेने चालावा, म्हणून कवी वाघमारे सांविधानिक मूल्यांची पायाभरणी मोठ्या नेटाने आपल्या कवितेत करतात. व्यवस्थेवर बोट ठेवणारी, व्यवस्थेला प्रश्न विचारणारी त्यांची लेखणी व्यवस्थेला शहाणे करण्यासाठीही पुढाकार घेते. देश-विदेशात घडत असलेल्या अराजकाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा नवा कवितासंग्रह साहित्य अन् समाजाच्या प्रांतात महत्त्वाची भूमिका बजावेल यात शंका नाही.
कवी सुभाष वाघमारे हे मुळचे सोलापूर जिल्ह्यातील मळोली (माळशिरस) गावचे. याच गावात त्यांचे बालपण गेले. त्या बालवयात त्यांच्यावर अनेक संस्कार झाले. तसे त्यांच्या वाटयाला असंख्य दाहक अनुभवही आले. पुढे शिक्षण- नोकरीच्या निमित्ताने, त्यांनी सामाजिक सुधारणेच्या चळवळीत स्वतःला झोकून दिले. फुले, शाहू, आंबेडकर, दाभोळकर आदि समाजसुधारकांच्या विचारांवर त्यांची निष्ठा आहे. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वावर गावजीवनाचा जितका प्रभाव आहे, तितकाच समाजसुधारकांच्या विचार-कार्याचाही आहे.
कवी सुभाष वाघमारे यांची कविता गावखेडयातील जगण्याचे सारे भोगवटे ताणतणावासह मांडते. त्यांची कविता केवळ विषमतेचं दर्शन घडवत नाही तर भारतीय खेड्यांचं चरित्रच एका अर्थाने ती वाचकासमोर मांडते आहे. आपला अवताल-भवताल, आपली सुप्त स्वप्ने, जगण्याची ध्येय उद्दिष्टये, माणसांच्या कल्याणाची सुक्ते ती पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत संवादरूपी शब्दातून मांडत राहते.
प्रस्तुत काव्यसंग्रहाचे शीर्षकच मोठे अर्थपूर्ण आणि विधायक आहे. तर काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ आशावर्धक आणि चिरंतन विश्वास पेरणारे आहे. प्रस्तुत कवितासंग्रहात एकूण 121 कविता समाविष्ट आहेत. त्यातील सर्वच कविता आशय, विषय आणि शीर्षकाने अर्थपूर्ण आहेत. त्यांच्या कवितासंग्रहात आत्मपर, सामाजिक, कौटुंबिक, स्त्रीवादी, विवेकवादी, विज्ञानवादी, विषमतावादी आणि संविधानमूल्यवादी कविता प्रामुख्याने आढळून येतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले 'भारतीय संविधान' 26 जानेवारी 1950 पासून भारतात लागू झाले आणि भारत 'प्रजासत्ताक देश' म्हणून ओळखला जाऊ लागला. परंतु ज्या संविधानाने बलशाली आणि कल्याणकारी भारताचे स्वप्न पाहिले, ते स्वप्न काही अंशाने सत्यात उतरले असले तरी अजून पूर्ण झालेले नाही. कारण अर्धा भारत खेडयात अन् अर्धा शहरात आहे. अजूनही गाव-शहरातून अन्याय-अत्याचाराचे, उच्च-नीचतेचे, बलात्काराचे, सरंजामी वृत्तीचे, गुलामीचे, लाचारीचे, भ्रष्टाचाराचे अन् बेकारीचे सूर बेसूरपणे ऐकू येतात. हीच गोष्ट कवीला खूप छळते, घायाळ करते, अस्वस्थ करते. या अस्वस्थेतूनच कवी सुभाष वाघमारे यांची कविता जन्माला आली आहे.
"होता प्रेमळ निर्मळ पिंपळाचा मळा
पाणी आटतच गेले आता लागतात झळा " (पृ. 41)
कवीची प्रेरणास्थाने अनेक आहेत. खुद्द कवीची आई, तिचे जीवन, आजूबाजूच्या आयाबाया, मावशा अन् समाजासाठी आयुष्य समर्पित केलेले सगळे समाजसुधारक कवीच्या प्रेरणास्थानी आणि आदरस्थानी आहेत. गावातल्या जुन्या आठवणी कवीच्या मनपटलावर टचकन उभ्या राहतात. 'पाणी आटतच गेले' ही ओळ गावातल्या विस्कटलेपणाची जाणीव करून देते.
कवी सुभाष वाघमारे यांची कविता गावाचं चरित्र वाचकासमोर मांडते. खेडयामध्ये 'वाडा संस्कृती'ला एकेकाळी खूप महत्त्वाचे स्थान होते. वाडा म्हणेल तेच खरं, असं म्हणून चालण्याची एक परंपरा होती. पुढे भारतीय संविधान अस्तित्वात आल्यानंतर वाडा संस्कृती संपुष्टात आली. परंतु 'वाडा'समर्थकांनी लोकशाहीचे स्वागत करण्याऐवजी लोकशाहीच्या नावाने गळे काढायला सुरुवात केली. वाडा संस्कृतीधारकांची ही मनोवृत्ती कवीने अगदी नेमक्या शब्दांत टिपली आहे.
''सत्ता गेली मत्ता गेली
जाळ का वाढू लागला
एका भकास संध्याकाळी
वाडा आता रडू लागला
कालपर्यंत बरे होते
वाडयाचेच खरे होते
सत्य गाडून
मुर्दाडपणे लपवलेले सुरे होते (पृ. 113)
सत्याचा खून करणाऱ्या वाडयाची तुलना कवी सुऱ्यांशी करतो. यावरून 'वाडा संस्कृती' किती घातक होती अन् आहे, याची जाणीव होते. कवी सुभाष वाघमारे यांची कविता खेडयातील विषमतेचं दर्शन अगदी ठळकपणे मांडते.
''मित्रा तू आहे माडीत
मी आहे झोपडीत
दोघात एक धागा
मी अजून जागा आहे'' (पृ. 81)
'विषमताग्रस्त माणूस' हा त्यांच्या कवितेचा केंद्रबिंदू आहे. झोपडी ते माडी हे अंतर संपुष्टात यावे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अष्टौप्रहर कष्ट करून संविधानाची निर्मिती केली. तरीही विषमतेची मुळे अजून हद्दपार झाली नाहीत, याची कवीला खंत वाटते. कवी आपल्या मनोगतात एके ठिकाणी म्हणतो, "माझी कविता गाव पेटवून देण्यासाठी निर्माण झालेली नाही. विध्वंसक काही न करता विधायक करावे हीच भावना आहे.'' (पृ. 36) कवीची हीच भावना त्यांच्या समग्र कवितेतून प्रतिबिंबित झाली आहे.
कवीचे संविधानमूल्यांवर खूप प्रेम आहे. शाळेत समता, बंधुता शिकवणारी ही मूल्ये वय वाढल्यानंतर नाशिवंत का होतात? हा कवीचा प्रश्न समग्र वाचकांना अंतर्मुख करणारा आहे.
"शाळेत गेला तेव्हा
गाणे म्हणालात
आभाळची आम्ही लेकरे
काळी माती आई
या भारतात बंधुभाव
नित्य वसू दे
कळते झालात तेव्हा कळाले
फाळणी का झाली?
गांधीजीना कोणी मारले?
बाबरी मशीद कोणी पाडली?
दलितावर अत्याचार कोण करते (पृ. क्र.114)
शाळेत शिकवलेली समता जेव्हा व्यवहारात विषम होते तेव्हा समाजाचे, देशाचे अधःपतनच होते. म्हणून भारतात जन्माला येणाऱ्या मुलांनी संविधान मूल्यांची आठवण ठेवायला हवी, शाळेतला संस्कार आयुष्यभर जपायला हवा, 'अच्छे दिन'चे वायदे करून, दिशाभूल करणाऱ्यांना योग्य वेळी योग्य धडा शिकवायला हवा अशी रास्त अपेक्षाही कवी बाळगतो.
कवी वाघमारे यांच्या सामाजिक कविता माणसाला आत्मभान देऊन थांबत नाहीत, तर माणसाला अधिकाधिक सजग करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. विधायक कामासाठी माणसाला कृतीशील बनवणं हे त्यांच्या कवितेचं व्यवच्छेदक लक्षण आहे.
''पण लक्षात असू द्या
माणसात मुंगुसही असतं
तेच वाचवतील लोकशाही
स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय
तुम्ही उलटे काटे फिरवू नका राव (पृ. 164)
'चांगल्याचा रक्षणकर्ता' अशी मुंगुसाची ओळख आहे. लोकशाहीचा खून करू पाहणाऱ्यांनी, मुंगुसरूपी माणसाकडे दुर्लक्ष करू नये असा इशारा कवी देतो. स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय हीच माणसाच्या जगण्याची चतुःसुत्री असली पाहिजे. लोकशाही मूल्येच माणसांच्या आयुष्याचे सोनं करतील,अशी खात्री कवी आपल्या कवितेतून वाचकांना देतो.
हेही वाचा : पुरोगामी चळवळीतील एक लढवय्या नेता : प्रा.डॉ.एन.डी. पाटील - आबासाहेब सरवदे
अलीकडच्या काळात बाबासाहेबाच्या जयंतीला जत्रेचे आलेले स्वरूप कवीला भयावह करते.
''बाबा! तुमच्या जयजयकाराने
उचंबळून आलाय बहुजन भारत
तुमच्या विचारांच्या विजा कडाडतात
जसे कावंदानाने उडवावा धुरळा
चौफेर
तरीही बाबा! पाऊस का पडत नाही" (पृ. 146)
देवीच्या छबिन्यासारखा बाबासाहेबाचा छबिना काढून, त्यापुढं नाचगाणं करणं, स्वतःला मिरवणं हे बाबासाहेबांच्या विचाराला धरून नाही, म्हणूनच आज देखील बहुजन भारत, ग्रामीण भारत अस्वस्थ आहे, असुरक्षित आहे.
श्रीपाल सबनीस त्यांच्या कवितेबद्दल म्हणतात, "कवी सुभाष वाघमारे यांच्या आत्मपर कविता मनाला पाझर फोडतात आणि जगण्याचे एक तपस्वी अंगणही समोर आणतात." (पृ. 14, प्रस्तावना) सुभाष वाघमारे यांची कविता आत्मपर असली, तरी त्या कवितांना सामाजिक जीवनाचा गंध आणि स्पर्श आहे.
गावमातीवर आणि संविधानावर कवीचे अलोट प्रेम आहे. गावातल्या सगळ्या आस्था, श्रध्दा कवीच्या आत्मियतेचा विषय असल्या तरी आसवांची नाती जोडणाऱ्या आणि माती करणाऱ्या प्रवृत्तीला कवी शह देतो.
"तुझ्या बापजाद्यांचे सांस्कृतिक वर्चस्व
आमच्या उरावर बसवतोस
थांब! त्यासाठीच
माझी लेखणी सुरू आहे" (पृ. 150)
सरंजामशाहीने, एकाधिकारशाहीने गरिबांचे प्रचंड शोषण केले, काहींचे आयुष्य मातीमोल केले. म्हणून गावागावात तयार झालेले सांस्कृतिक वर्चस्व कवीला हद्दपार करायचे आहे. त्यासाठी कवीची लेखणी सज्ज आहे. कारण कवीला आनंदी गाव हवे आहे.
"पण आता आभाळ होऊन
लढतात अनुयायी
बनतील ढग पडेल पाऊस
भिजेल हळूहळू धरणी
उगवतील वाढतील नव्या व्यवस्थेचे कोंब" (पृ. 148)
आंबेडकरी विचार आभाळाइतका मोठा आहे. ढगासारखा धावणारा आहे. सगळ्या धरतीला चिंब भिजवणाऱ्या पावसासारखा आहे. आंबेडकरी विचारांचा पाऊस व्यवस्थेला नवे कोंब आणणारा ठरेल, हा कवीचा आशावाद सार्थ वाटतो.
कवीच्या जगण्यातले अनेक संदर्भ कवितेचे विषय झाले आहेत. आपल्या कवितेबद्दल कवी एके ठिकाणी म्हणतो, "माझी कविता उद्याच्या अधिक चांगल्या गावासाठी जाब विचारते, कधी वेदना व्यक्त करते, कधी प्रश्न उपस्थित करते, कधी आत्मपरिक्षण करते, कधी विद्रोह प्रकट करते तर कधी हक्कांसाठी संघर्ष करते." (पृ. 24, मनोगत) कवीचा हा दृष्टिकोन सर्वमान्य होणारा आहे. कविता समाजाच्या मांगल्यासाठीच असते अन् असावी. कारण तोच तिचा धर्म आहे.
मानवतेचे मित्र इतके वाढले पाहिजेत की, शत्रू नावालाही उरू नयेत. हा कवीचा विचार खूप सुंदर वाटतो. ही कविता नवे संस्कारसूत्र पेरते. कवी केशवसुत, मर्ढेकर, बहिणाबाई यांच्या कवितेशी नाळ जोडणारी त्यांची कविता कधी क्रांतिकारक विचार तर कधी जीवनाचे तत्वज्ञान मांडते.
"आरं आरं हिटलरा
तुझी मोठी शिरीमंती
माझ्या झोपडीचे दार
करी जगावर प्रीती" (पृ. 47)
झोपडीतल्या प्रेमापुढे हिटलरची श्रीमंती फिकी आहे. हुकूमशाहीची जाणीव करून देणारी ही कविता झोपडीतल्या प्रेमाचे सामर्थ्य अधोरेखित करते. श्रीमंतीतून हिटलर जन्माला येतात, तर झोपडीतून प्रेम. ही सूचकता फार महत्त्वाची वाटते.
अलीकडच्या काळात विज्ञाननिष्ठ विचारवंताच्या झालेल्या हत्या, हा सर्वांच्या दृष्टीने चिंतनाचा विषय आहे. ह्या विषयावर भाष्य करणारी त्यांची कविता उद्बोधक आहे.
"गोळ्या घालून लपले सारे
विचार मरतील आस मोठी
उगवून आली नवी पाती
सांगा त्यांना आता गोळ्या शिल्लक किती" (पृ. 72)
विज्ञाननिष्ठ विचार मारण्याचा झालेला प्रयत्न कवीला अयशस्वी वाटतो. गोळ्यांनी माणूस मारता येतो, पण विचार नाही. कारण विचारांना मरण नाही. क्रांतिकारक विचार हे कालातीत आणि वादातीत असतात. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी जरी गेले तरी त्यांच्या विचारांचे हजारो कार्यकर्ते आज तयार झाले.
हेही वाचा : हुड सावल्या उन्हाच्या : कवितेमागची कथा - कल्पना दुधाळ
कवी अवताल-भवतालच्या दुःखाने उदास किंवा निराश होत नाही. कारण कवीची प्रज्ञा त्याला कायम सतेज आणि आशावादी ठेवते. कवीला धर्मयुद्धाने किंवा जातियुध्दाने पृथ्वी रिकामी करायची नाही तर सदाचाराने, लोकशाहीमूल्यांनी ती सुंदर करायची आहे.
"अश्रू आनंदाचे सारे
माझ्या डोळ्यामध्ये येवो
संविधानासारखा आता
माझा गाव होवो" (पृ. 184)
गावाच्या कल्याणाचं पसायदान मागणारी ही कविता कवीच्या क्रांतिकारक स्वप्नांची जाणीव करून देते.
प्रस्तुत कवितासंग्रहात काही बालकविताही चित्रित झालेल्या आहेत. परंतु त्या तितक्या भावताना दिसत नाहीत. कारण कवीने गावखेड्यातील सामाजिक जीवनाचा मांडलेला पट, मन सुन्न करणारा अन् अस्वस्थ करणारा असल्यामुळे, बालजीवनातली रंगत संगत मनाची पकड घेत नाही.
कवी सुभाष वाघमारे यांच्या सर्व कविता सचित्र आहेत. हा त्यांच्या कवितेचा विशेष गुण आहे. गावातली जुलुमशाही, हुकूमशाही, सरंजामशाही, सावकारशाही अन् अत्याचारी वृत्ती कवितेच्या बाजूला रेखाटलेल्या चित्रातून प्रभावीपणे व्यक्त होते.
कवी सुभाष वाघमारे यांच्या प्रस्तुत कवितासंग्रहात काही दीर्घ कविता आहेत. एकच विषय अनेक कवितातून डोकावत असला तरी तो कवीचा दोष नसून कवीची अपरिहार्यता आहे. काही किरकोळ दुर्बोध शब्द सोडले तर कविता रोजच्या भाषेतून व्यक्त होताना दिसते. ती कुठल्याही व्रताच्या, छंदाच्या चौकटीत अडकत नाही. वर्तमान गाव, समाज, देश आणि व्यवस्था शब्दबद्ध करताना कवितेत आलेला उपरोध, उपहास हा विखाराच्या दिशेने नव्हे; तर गुणवत्तेचे दिशेने वाटचाल करताना दिसतो. त्यांच्या कवितेला कल्पनेचे नव्हे तर वास्तवाचे पंख आहेत. व्यवस्थेला प्रश्न विचारणारी ही कविता, व्यवस्थेतल्या विषमतेवर आसूड ओढते. व्यवस्थेत समता नांदावी म्हणून ती व्यवस्थेलाच शहाणी करते. राष्ट्रीय एकात्मतेचा बंध गुंफणारी ही कविता गावखेडयातील विषमतेचं समग्र चिंतन मांडून संविधानाच्या स्वप्नातल्या गावाचा आकृतिबंध जगासमोर ठेवते.
सगळ्यांना सोबत घेऊन, सगळ्यांचं भलं चिंतणाऱ्या कवीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा...
कवितासंग्रह - संविधानाच्या स्वप्नातलं गाव
कवी - डॉ. सुभाष वाघमारे
प्रकाशन वर्ष - 2021 प्रथमावृत्ती
प्रकाशन संस्था - साहित्यविश्व प्रकाशन पुणे
मूल्ये - 250, पृष्ठे - 184
- आबासाहेब सरवदे
sarvadeaba@gmail.com
(लेखक वाशी, येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये अध्यापनाचे काम करतात.)
Add Comment