चीनबद्दलचे मराठीतील उत्कृष्ट पुस्तक

साधना प्रकाशनाच्या 'चिनी महासत्तेचा उदय' या पुस्तकाचा परिचय

1949 मध्ये माओच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये क्रांती झाली. आणि 1978 मध्ये डेंग यांच्या नेतृत्वाखाली चीनने नवे वळण घेऊन महासत्ता होण्याच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली. त्यानंतरच्या चाळीस वर्षात चीनने अर्थव्यवस्था अधिकाधिक खुली करीत जोमाने आर्थिक विकास साधला. कोट्यवधी गरीब लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढून मानाने जगायला शिकविले.जलद आर्थिक विकासामुळे चीनने आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत मनाचे स्थान प्राप्त केले खरे! मात्र त्या विकासप्रक्रियेत अनेक परपस्पर विरोध सामावले आहेत. चीनचे एक भव्य स्वप्नही आहे, जगाचे नेतृत्व करुन आंतरराष्ट्रीय व्यवस्थेवर मोठा प्रभाव टाकण्याचे! चीनच्या या विकासशैलीमुळे चीनमध्ये आणि जगात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. चीनचे जागतिक व्यवस्थेमध्ये शांततापूर्ण मार्गाने सामिलीकरण कसे करायचे, हा आता जगापुढील मोठा प्रश्न आहे. मागील चाळीस वर्षांतील चीनच्या या आर्थिक आणि राजकीय वाटचालीचा, त्यामागील विविध प्रेरणांचा आणि त्यमुळे निर्माण झालेल्या प्रश्नांचा मागोवा घेणारे सतीश बागल यांचे 'चिनी महासत्तेचा उदय' हे पुस्तक साधना प्रकाशनाकडून आले आहे. 

'चिनी महासत्तेचा उदय' हे श्री सतीश बागल यांनी लिहिलेले पुस्तक वाचनात आले. हे पुस्तक 2022 मध्ये जानेवारी महिन्यात साधना प्रकाशनाकडून प्रकाशित झाले आहे. पुस्तकातील लेखकाचे मनोगत वाचूनच या पुस्तकाविषयी रुची व गोडी निर्माण होते. पुस्तकासाठी लेखकाने किती मेहनत घेतली असेल याचा अंदाज येतो. पुस्तकाचे बायडिंग सुरेख आहे, आतील चित्रेही वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

मुळात सर्वसामान्य भारतीय नागरिकांना, विशेषतः महाराष्ट्रातील जनतेला चीनबद्दल फारशी माहिती नाही; उलट चीनविषयी त्यांच्या मनात एक प्रकारची घृणा व चीड आहे. 1962मध्ये झालेल्या भारत-चीन युद्धात आपण व आपले राज्यकर्ते गाफील राहिलो आणि आपल्याला माघार घ्यावी लागली, याची आठवण आजही भारतीयांच्या मनात सलत असते. पण गेल्या पन्नास-साठ वर्षांत चीनने नेत्रदीपक आर्थिक प्रगती केलेली आहे. शेजारच्या  अनेक देशांना कर्ज देऊन मिंधे केलेले आहे. ते देश कर्जामध्ये बुडालेले आहेत, चीनच्या अटी मान्य करण्याशिवाय सध्यातरी त्या देशांकडे दुसरा पर्याय राहिलेला नाही. चीनची भूमिका ताठर आहे. आणि चिनी राज्यकर्ते दूरदृष्टीने शेजार्‍यांना अंकित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

चीनमधील नेत्यांची नावेसुद्धा आपल्याला नीट माहीत नसतात, फार पूर्वीपासून चौ एन लाय, माओ त्से तुंग हीच काय ती नावे आपल्याला माहीत असतात, पण अलीकडच्या दोन-तीन दशकांपासून डेंग झिओपिंग व सध्याचे क्षी जिनपिंग या दोन सत्ताधाऱ्यांचा चीनमध्ये उदय झालेला आहे. त्यांनी चीनमध्ये आमूलाग्र बदल  केलेला आहे. लेखकाने अतिशय छान पद्धतीने त्यांच्या प्रगतीचा आलेख सादर केलेला आहे.

'चिनी साम्राज्याचा अंत' या प्रकरणात लेखकाने चीनमध्ये कसे सत्तांतर घडून आले. त्यात लोकांमध्ये असलेली मानसिकता, जुनी सरंजामशाही, पाश्चात्त्य संस्कृतीचा कसा उदय होत गेला याचे थोडक्यात वर्णन केलेले आहे. हा सर्व भाग आपल्याला किचकट वाटतो व त्याच्याशी आपण समरस होऊ शकत नाही. एक म्हणजे, त्यांत असलेली नावे आपल्याला अति लांबची वाटतात. 


हेही वाचा : बलाढ्य चीन भारताला का घाबरतो? -  प्रभाकर देवधर


माओ हे चीनमधील मुख्य नेते होते. अनेक लोक त्यांच्या जवळ आले, माओंनी त्यांचा हवा तसा उपयोग करून घेतल्यावर त्यांची हकालपट्टी केली. झियांग शिंग, मार्शल बिआओ, डेंग, जियांग जेमिन, हुं जिंताओ ही त्यातील काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची नावे. माओंनी गरज पडेल तसा या अधिकाऱ्यांचा उपयोग करून घेतला. गरजेनुसार त्यांना हटवले, पदभ्रष्ट केले. मोठ्या कुशलतेने त्यांचा उपयोग करुन माओंनी संस्थाची पुनर्बाधणी  केली आणि नव्या युगाची पहाट केली. आर्थिक विकासाचे ध्येय गाठण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेच्या जवळ जाऊन सामान्य जनतेचा फायदा कसा होईल हा विचार मनात ठेवून त्यासाठी आड येणाऱ्या लाखो बुद्धिवंतांना देशोधडीस लावले, अनेकांना तुरुंगवास भोगायला लावला, आपल्या हातून झालेल्या चुका मोठ्या शिताफीने खालच्या अधिकाऱ्यांवर लादून त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली.

यातील काही जण मृत्यूमुळे, काहीजण तब्येतीच्या कारणास्तव पुढे जाण्यात यशस्वी झाले नाही. डेंग शाओपेंग यांच्या आयुष्यात अनेक बिकट प्रसंग आले. प्रसंगी त्यांना अपमानितही व्हावे लागले पण अतिशय हुशारीने आणि कल्पकतेने ते त्या प्रसंगांतून बाहेर पडले. माओचा मृत्यू 1972 साली झाला, नंतरची सत्ता ही जियाग शिंग यांच्याकडे होती. डेंग यांच्याकडे सत्ता येण्याचा मार्ग बराच सुकर झाला. अर्थात ही सर्व प्रकरणे वाचकांना थोडीशी क्लिष्ट वाटतील अशीच आहेत पण ज्यांना चीनचे रुपडे कसे बदलले याचा सखोल अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी हे पुस्तक निश्‍चित उपयुक्त आहे.

चीनमध्ये घटना व कायदे असूनही न्यायालये स्वतंत्र नाहीत. हु जिंताओ यांच्या काळात दंडेली व सत्तेचा गैरवापर खूप होता, न्यायालये सत्तेच्या विरुद्ध कधीच जात नसत. चिनी पदाधिकाऱ्यांनी पहिल्यापासून लोकांना आर्थिक विकासाचा मार्ग दाखवला, सर्वसामान्य लोकांची लुडबुड राजकारणात होऊ दिली नाही. लाखो मुलांना उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत पाठवले. जवळजवळ दहा लाख चीनी विद्यार्थ्यांनी अमेरिकेत शिक्षण घेतले. अर्थशास्त्र, राजकारण, आधुनिक तंत्रज्ञान, कम्प्युटर कम्युनिकेशन सिस्टीम यांमध्ये ही तरुण पिढी पारंगत झाली आणि आपल्या देशात परत येऊन अनेक संस्था त्यांनी विकसित केल्या. अनेक चीनी बुद्धिवंतांना असे वाटत होते की, लोकशाही पद्धतीने देशाचा विकास होईल पण राज्यकर्त्यांनी अतिशय कणखर धोरण बाळगले व सर्वसामान्यांचा प्रवेश राजकारणात होऊ दिला नाही. सत्तेची पकड जनमानसावर कायम ठेवली. आणि या मार्गात जी माणसे आडवी आली त्यांना कापून काढण्यात आले. चीनची आजची प्रगती एका दिवसात झालेली नाही. 


हेही वाचा : चिनी वस्तूंवरील बहिष्कारामागील वास्तविकता - महेंद्र पाटील


क्षी जिनपिंग हे 2013 साली सत्तेवर आले. ते चीनमधील सर्वोच्च नेते झाले, कारण त्यांचा प्रामाणिकपणा, त्यांच्या मनात सर्वसामान्य जनतेविषयी असलेला जिव्हाळा आणि निष्ठापूर्वक काम करण्याची वृत्ती. याशिवाय त्यांच्या वडिलांनी केलेले कार्य हीदेखील एक जमेची बाजू होती.

2013 साली सत्तेवर आल्यानंतर क्षी जिनपिंग यांनी कोट्यवधी माणसे दारिद्र्यरेषेतून बाहेर काढली. जगामध्ये त्यांनी स्वतःचा दबदबा निर्माण केला, अमेरिकेलाही आव्हान देण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. हे सर्व आपण अचंबित होऊन वाचतो. 'चीनबद्दलची माहिती सहजासहजी उपलब्ध होत नाही', 'चीन एक आयर्न कर्टन आहे', 'भारत-चीन संबंध तणावाचे आहेत' या प्रकारच्या चर्चा आपण वेळोवेळी वर्तमानपत्रांतून वाचतो. भविष्यात हे चित्र कसे असणार याबद्दल आपल्याला उत्सुकता आहे, तसेच चिंताही आहे. लेखकाने याबाबत खूप स्पष्टपणे लिहिले आहे.

चीनचे लष्करी सामर्थ्य आपण समजून घेतले पाहिजे. चीन व भारत शेजारी राष्ट्रे आहेत तरी आपल्यादरम्यानच्या व्यापाराव्यतिरिक्त आपल्याला चीनची फारशी माहिती नाही. दोन्ही देशांच्या नागरिकांमध्ये आपापल्या देशाबद्दल तीव्र प्रेम आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे तरच काळाच्या ओघात आपल्याला त्यांच्याबरोबर प्रतिस्पर्धी म्हणून टिकून राहता येईल.

क्षी जिनपिंग यांच्या काळात इंटरनेटची सेवा सरकारच्या आधिपत्याखाली आली. राष्ट्रीय धोरण अधिक कडक होत गेले. शेजारी राष्ट्रांना चीनबद्दल संशय निर्माण होऊ लागला. सर्व सत्ता क्षी जिनपीग यांच्या हाती एकवटली. न्यायालयीन कामकाज नावाला राहिले. क्षी जिनपिंग यांना चीनला महासत्ता बनवण्याचे वेध लागले. लेखकाने आपली बलस्थाने व आपल्यापुढे असलेली आव्हाने यांची फार सुंदर चर्चा केली आहे. इथून पुढे भारत कशी प्रगती करतो, आपल्या शेजारी देशांशी कसे संबंध प्रस्थापित करतो हे पाहणे महत्वाचे आहे.

या पुस्तकातील काही प्रसंग टाळता आले असते तर पृष्ठसंख्या कमी होऊ शकली असती‌. या कमी-अधिक उणीवा असल्या तरी डॉ. बागल आणि साधना प्रकाशन यांनी निश्चितच मराठीत चीनबद्दलचे आजच्या घडीला उत्कृष्ट पुस्तक उपलब्ध करुन दिले आहे.

- चंद्रकांत गवांदे, पुणे
chandrakant8343@gmail.com 

चिनी महासत्तेचा उदय हे पुस्तक AMAZON वर उपलब्ध आहे. 

Tags: नवे पुस्तक चीन भारत चीनी महासत्तेचा उदय सतीश बागल Load More Tags

Add Comment