2023 या वर्षी साधना साप्ताहिकाच्या वतीने दिलेल्या तांबे-रायमाने अभ्यासवृत्तीतून आलेल्या तिघांचे व यदुनाथ थत्ते अभ्यासवृत्तीतून आलेल्या तिघांचे, असे एकूण सहा जणांचे लेखन प्रसिद्ध करीत आहोत. त्यापैकी विवेक वाघे, प्रतिक राऊत व विकास वाळके या तिघांचे दीर्घ लेख, साधनाच्या 13 जानेवारी 2024 च्या विशेषांकात प्रसिद्ध झाले आहेत. (याच अंकांच्या संपादकीयात या अभ्यासवृत्तीची संपूर्ण प्रक्रिया सविस्तर मांडली आहे, येथे क्लिक करून ते वाचता येईल.) तर अविनाश पोईनकर, वैभव वाळुंज आणि प्रिया अक्कर व नेहा राणे (दोंघीनी संयुक्त लिहिलेला) यांचे तीन दीर्घ लेख प्रत्येकी तीन किंवा चार भागांत ‘कर्तव्य साधना’वरून प्रसिद्ध करीत आहेत. त्यापैकी हा दुसरा लेख सलग तीन भागांत देत आहोत..
पूर्वपीठिका
"जात ही भारताची स्थानिक समस्या आहे, परंतु त्यामध्ये फार मोठा खोडसाळपणा घडवून आणण्याची क्षमता आहे. जोपर्यंत जात अस्तित्वात आहे तोपर्यंत हिंदू बाहेरील जातीच्या लोकांशी सामाजिक संबंध ठेवणार नाहीत. जर हिंदू भारतभूमी सोडून इतर प्रदेशांमध्ये राहावयास गेले तर भारतीय जात ही जागतिक समस्या बनेल. त्यामुळे जातीचा अभ्यास करताना वेळ, काळ आणि दूरदृष्टी या तीनही पातळ्यांवर मी जातव्यवस्थेला मर्यादित स्वरूपात अभ्यासलं आहे."
- बी. आर. आंबेडकर, भारतातील जाती - पद्धती, उगम आणि विकास, 9 मे 1916 (मानव्यशास्त्र विभागाच्या सेमिनार दरम्यान डॉ. ए. ए. गोल्डवाईझर या कोलंबिया विद्यापीठातील प्राध्यापकांसमोर सादर केलेल्या प्रबंधातून).
बाबासाहेबांनी 100 वर्षांपूर्वी केलेलं हे वक्तव्य आज तंतोतंत खरं ठरलं आहे. भारतीयांनी आपल्यासोबत जात जगाच्या कानाकोपऱ्यात पोचवली आहे. अशावेळी, जातीचं आकलन आणि विवेचन नव्यानं मांडण्याची गरज आहे. भारताच्या बाहेर जात कशी काम करते? तिचे पेच सोडवण्यात सरकारी आणि सामाजिक पातळीवर कोणत्या नव्या अडचणी येतात? यासंबंधी होणाऱ्या चळवळीतून भारतातल्या जातीअंताच्या मोहिमांना काय शिकता येईल? वेळ, काळ आणि दूरदृष्टी या तीनही पातळ्यांवर जातव्यवस्थेला इंग्लंडच्या पार्श्वभूमीवर विस्तृत स्वरूपात अभ्यासण्याचा प्रयत्न मी या संशोधनातून केला आहे.
इंग्लंडमध्ये जातीयता नष्ट करण्यासाठी कायदा करण्याची मागणी तुलनेनं नवीन असली तरी जात आणि इंग्लंड यांचा परस्परसंबंध भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून जोडलेला दिसतो. अमेरिका आणि जगाच्या इतर भागात सध्या सुरू असणाऱ्या जातिविरोधी आंदोलनांच्या तुलनेत इंग्लंडमध्ये सुरू असणाऱ्या जातिविरोधी चळवळीवर डॉ. आंबेडकरांच्या कार्याची दीर्घ छाया असून प्रत्यक्ष संबंधदेखील आहे. इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी दीर्घकाळ राहिल्यानंतरही आंबेडकर या ठिकाणी सातत्यानं येत राहिले आणि इथल्या आंबेडकरवाद्यांची मोठी फळी कालांतराने तयार झाली; ज्याद्वारे इंग्लंडमध्ये यासंबधी जागृती होत गेली.
बाबासाहेबांनी जातीच्या संदर्भात विचार करताना आपल्या इंग्लंडमध्ये शिकलेल्या सर्व पूर्वसुरींच्या तत्त्वज्ञानावर आणि राजकारणावर एकाच वेळी मात केली. त्यांनी जातीच्या संदर्भात केलेल्या प्रयत्नांमध्ये तीन गोष्टी तोवरच्या नेत्यांच्याहून वेगळ्या होत्या:
1. अस्पृश्यतेच्या निर्मूलनासारखेच जातीयतेचेही निर्मूलन व जातीच्या व्यवस्थापनाला विरोध
2. सामाजिक सुधारण्याच्या प्रयत्नांना दिलेली राजकीय सुधारणांची जोड
3. जातीचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याचा प्रयत्न
यातील तिसरा प्रयत्न आपल्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा आहे. त्यांनी जपान, नायजेरिया व इतर भागातील जातीव्यवस्था मिटवण्यासाठी काम करणाऱ्या संघटनांच्या नेत्यांप्रमाणे ‘आपल्या देशाची जातीव्यवस्था फक्त अंतर्गत बाबींतून मिटेल’, या निष्कर्षावर फार उशिरा विश्वास ठेवला. त्यापूर्वी आपल्या लंडनमधील अनुभवांतून लेखनातून तसेच कामातून त्यांनी जातीचं पुरेसं आंतरराष्ट्रीयीकरण केलं होतं. त्यांनी अमेरिकन कृष्णवर्णीय नेते ड्यु बॉयस यांच्याशीही पत्रव्यवहार केला होता.
आंबेडकरांनी युनायटेड नेशन्सला जातीय भेदभाव मिटवण्यासाठी एक स्वतंत्र समिती नेमावी व त्यात या भेदभावाला रोखण्यासाठी काम करावं, असं लिहिण्याचा विचार केला होता. मात्र नव्याने स्वतंत्र झालेल्या देशात कायदामंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर यासाठी त्यांनी स्वतःच कायदे केले व हा बेत रद्द केला, याचा उल्लेख सुखदेव थोरात आणि उमाकांत यांनी लिहिलेल्या ‘वंश, जात आणि भेदाभेद’ या पुस्तकात केलेला आढळतो. पण त्याआधीही जातीचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला व ब्रिटिशांनी याबाबतीत मदत करावी, यासाठी पहिल्या दोन गोलमेज परिषदांमध्ये त्यांनी जोरदार प्रयत्न केले. या संदर्भात आपल्या भेटीदरम्यान त्यांनी येथील अनेक खासदारांची भेट घेतली.
दलितांच्या हक्कांचे पहिले उल्लेख हॅनसाड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रिटिश संसदेच्या दस्तऐवजात सापडतात. लंडनमधील बाबासाहेबांच्या 1930च्या गोलमेज परिषदेच्या दरम्यानच्या भेटीनंतरही हे संदर्भ सापडतात. इंग्लंडमध्ये समता आधारीत कायद्याची उभारणी व्हावी, याचा पाया या चर्चांमधून घातला गेला असल्यानं बाबासाहेबांचं नाव समानता, मानवाधिकार, आधुनिक वेठबिगारी तसेच जातीअंताच्या विविध चर्चांमध्ये अनेकदा घेतले गेलं आहे. बाबासाहेबांच्या उद्धरणाचा या दस्तऐवजात सर्वात पहिला उल्लेख भारतीय जातव्यवस्थेच्या संदर्भात 18 मार्च 1931 रोजी केलेला सापडतो. तेव्हाचे भारतासाठीचे सचिव लॉर्ड विल्यम पिल यांनी जातीय निर्मूलन करण्यासाठी आंबेडकरांशी झालेल्या भेटीचा दाखला दिला होता. खासदार इलेनॉर रॅथबोन यांनी 28 मार्च 1933 रोजी ब्रिटिशांनी भारत सोडून चालतं होण्यापूर्वी तेथील दलितांच्या समस्येवर काहीतरी तोडगा काढावा, असं सुचवलं. "तुम्ही गेली 150 वर्षं भारतात आहात. तुम्ही तिथे गेलात तेव्हा तिथे डिप्रेस्ड क्लास म्हणवला जाणारा दलित वर्ग होता आणि आता तुम्ही तिथून निघून चाललात तेव्हाही तिथे हा वर्ग अस्तित्वात आहे. या वर्गासाठी तुम्ही काय केलंत? हाच प्रश्न भारतातील स्त्रियांच्या संदर्भातही विचारता येईल", असा सवाल त्यांनी संसदेसमोर मांडला. जातीचे असे उल्लेख अनेक तत्कालीन आणि आताच्या खासदारांनी संसदेत केल्याचं दिसतं. अशा प्रकारे इंग्लंडमध्ये जातीची चर्चा व्हावी यासाठी एक पार्श्वभूमी आंबेडकरांनी कळत-नकळत रुजवून ठेवली होती असं दिसतं. अर्थात त्यांनी लंडनमधून परत आल्यानंतर जवळपास 40 वर्षे जात आणि निर्मूलन या एकाच विषयावर पुन्हा उघड राजकीय चर्चा झाल्याचं दिसत नाही.
इंग्लंडमधील भारतीय समाज: भेदांची निर्यात
इंग्लंडमध्ये भारतीय व्यक्तींवर होणाऱ्या शेरेवजा विनोदाची सुरुवात शक्यतो "मी एकदा कोपऱ्यावर मिस्टर आणि मिसेस पटेल यांच्या दुकानात गेलो तेव्हा…" अशी होते. भारतात एखाद्या श्रीमंत व्यक्तीचं वाटेल तेच हे वर्णन इंग्लंडमध्ये देशभरात ठिकठिकाणी व्यवसायात अग्रेसर असणाऱ्या भारतीय समाजाचा तिरकस द्वेष म्हणून व्यक्त होतं. पटेल या नावाला असणारं जातीय वलय आणि उतरंडीत असणारं मध्ययुगीन उच्चवर्णाचं स्थान या विनोदात नाही, तर हीन, जगावेगळे म्हणून डागाळलेलं वांशिक शेरा म्हणून इंग्रजी समाजात या विनोदाचं महत्त्व आहे. भारतीय समाज इंग्लंडमध्ये स्वतः एक अल्पसंख्यांक समाज आहे, ज्याचं वांशिक आधारावर उत्पिडन होत असल्याचे अनेक पुरावे आढळतात.
'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांचे प्राध्यापक व सहाध्यायींसमवेत
अनेकदा मोठा स्थलांतरित गट म्हणून दीर्घकाळ भेदभावाचा सामना केलेल्या भारतीयांनी अलीकडच्या काळात राजकीय क्षेत्रात आपलं नाव कमावलं आहे. या समाजाच्या राजकीय आणि सामाजिक सहभागासाठी सरकारनं काही विशेष तरतुदी केल्या गेल्या नाहीत, म्हणून त्यांचा व्यवस्थेतील समावेश फक्त भांडवल आणि काही अंशी मतांच्या राजकारणाद्वारे झाला आहे. यात नेमके दलित किती याचा ठाम आकडा कुणीच सांगू शकत नसलं तरी त्यांची संख्या 50,000 ते 2,00,000 या दरम्यान असावी असं दलित संस्थांच्या अहवालांमध्ये आढळून येतं. यात अनेक संप्रदायांचा समावेश होतो; ज्यात प्रामुख्याने पंजाबमधून आलेल्या वाल्मिकी आणि रविदासिया यांच्यासोबतच पाकिस्तानमधील ख्रिश्चन तसेच महाराष्ट्रातून गेलेल्या नवबौद्ध समाजाचाही समावेश आहे.
पण या सर्व गोष्टींची मांडणी करत असताना एक महत्त्वाची बाब म्हणजे इंग्लंडमध्ये असणारा भारतीय समाज हा एकसंघ आणि एकच एक घटक नाही. इतर देशांच्या बाबतीत परदेशी स्थायिक झालेला गट काही प्रमाणत एकसंध असतो पण भारतीय परदेशी गेल्यानंतर त्यांच्यात स्थिती आणि काळ यांच्या अनुरूप अनेक भेद दिसून येतात. ज्याप्रमाणे फिजी या बेटावर स्थलांतरित झालेल्या अनेक भारतीयांमध्ये जातीने वेगळे रूप धारण केलं, त्याचं कारण तेथे गेलेल्या भारतीयांचं एकूण सामाजिक स्थान व ज्या परिस्थितीत भारतीय तिथे गेले ते होतं, त्याच अर्थाने ब्रिटनमध्ये आलेल्या भारतीय समुदायांमध्ये असणारे विविध फरक या दोन मुद्द्यावरून काढता येतात.
इंग्लंडमध्ये नेमकी भारतीय वंशाची जनता किती आहे याचा नक्की आकडा नसला तरी सरासरी एकूण 15 लाखांच्या आसपास आहे. त्यात दरवर्षी इंग्लंडमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि तंत्रज्ञांची गणती लक्षात घेतलेली नाही. या सर्वांचा विचार करता हा आकडा जवळपास वीस लाखांच्या वर जातो. 2011च्या जनगणनेनुसार इंग्लंड देशात भारतीय उपखंडातील वंशांचे सत्तावीस लाख मुस्लीम, साडेआठ लाख हिंदू, साडेचार लाख शीख आणि अडीच लाख बौद्ध नागरिक असल्याचा आढळून आलं. यातही चार मुख्य गट दिसून येतात -
1. बांगलादेशचे सिल्हेट प्रांतातील मुस्लीम
2. भारत व पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील शीख व मुस्लीम
3. काश्मिरच्या मीरपूर जिल्ह्यातील मीरपुरी नागरिक
4. भारताच्या गुजरातमधील हिंदू, जैन व्यापारी.
इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाल्यानंतर भारतीय नागरिकांनी वेगवेगळ्या प्रमाणात वेगवेगळ्या टप्प्यांवर ब्रिटनमध्ये स्थलांतर केलं असलं, तरी बहुतांश भारतीय नागरिकांचे ब्रिटनमध्ये येण्याचे दोन प्रमुख टप्पे आढळतात व याच दोन प्रमुख गटांमध्ये असणारी एकूण चुरस आजच्या ब्रिटनच्या राजकारणात केंद्रस्थानी आलेली दिसते.
पहिल्या गटात पंजाब आणि इतर भागांमधून नोकरीच्या शोधार्थ गेलेल्यांच्या अंतर्भाव होतो. 1950च्या काळात दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटनमध्ये श्रम करणाऱ्या व्यक्तींची चणचण भासू लागल्यानंतर जगाच्या जमेल त्या भागातून स्वस्त मजुरांचा पुरवठा करण्यासाठी गरीब कुटुंबांची थेट आयात करण्यात आली. तत्कालीन इंग्लंडमध्ये व्हिसा मिळण्याची कोणतीही अट नसल्यामुळे आर्थिक चणचण भासत असलेल्या अनेक भारतीय मजुरांनी आपल्या नव्यानं स्वतंत्र झालेल्या आणि मोठ्या प्रमाणात उपासमारीला तोंड देणाऱ्या देशाला सोडून इंग्लंडकडे प्रयाण केलं. या कुटुंबातील अनेक लोकांना गांधीजींच्या तसेच पंजाबमधील विविध पक्षीय नेतृत्वाच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा वारसा होता. पंजाबमध्ये आणि त्यानंतर जगाच्या इतर भागात पसरलेली गदर पार्टी तसेच उधमसिंग, भगतसिंग आणि हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन अशा विविध मजूर व कम्युनिस्ट संघटनांच्या माध्यमातून जागृती झालेल्या या समाजाने लंडनच्या अनेक झोपडपट्ट्यावजा मजूर वस्त्यांमध्ये राहत असताना इंडियन वर्कर्स असोसिएशन तसेच विटांच्या कारखान्यात काम करणाऱ्या मजुरांच्या विविध संघटना तयार करायला सुरुवात केली. साहजिकच, हे नागरिक व त्यांच्या येणाऱ्या पिढ्याही बहुतांश प्रमाणात मजूर पक्षाच्या पाठीमागे उभ्या राहिल्या. जातीयंताची चळवळ झालेली नसताना ही कुटुंबे इंग्लंडला गेली मात्र यामध्ये सवर्ण कुटुंबांचा फार थोड्या प्रमाणात समावेश होता. यातील बहुतेक कुटुंबे दलित व बहुजन समुदायातून आलेली होती.
दुसरा गट 1970-90मध्ये आफ्रिकेतून ब्रिटनला गेलेल्या गुजराती निर्वासितांचा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी आपल्या पूर्व आफ्रिकेतील केनिया युगांडा आणि टांझानिया या देशांमध्ये असणाऱ्या वसाहतींमध्ये कामांसाठी भारतातून हजारो नागरिकांना सोबत नेलं. यात प्रामुख्याने गुजराती, गोवन आणि किनारपट्टीवर राहणाऱ्या नागरिकांचा समावेश होता. अनेकदा पूर्व आफ्रिकेला 'हिंदूंची अमेरिका' असे संबोधले जाई. कारण एका नव्या खंडावर जाऊन आपलं आर्थिक आणि सामाजिक वर्चस्व प्रस्थापित करण्यामध्ये भारतीयांना तिथे यश आलं होतं. महात्मा गांधी याच भारतीयांना ब्रिटिशांच्या निम्नस्तरावर राहणाऱ्या नागरिकांना आपले हक्क मिळवून देण्यासाठी आणि त्याच अर्थी स्वतःला व भारतीय समुदायाला तेथील बहुसंख्य कृष्णवर्णीय समुदायापासून वेगळे करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत गेले होते. बोअर युद्धात त्यांनी ब्रिटिशांना दिलेली साथ आणि इथे राहिलेल्या अनेक ब्रिटिश फौज व पोलिसांमधील भारतीय नागरिकांनी स्थानिक कृष्णवर्णीय समुदायावर ब्रिटिश सत्तेच्या अनुषंगाने केलेले जुलूम अजूनही पूर्व आफ्रिकन समाजाच्या इतिहासात नोंदवले आहेत. 1963साली जेव्हा केनियाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा शेतीखाली नसणारी देशातील जवळपास दोन तृतीयांश जमीन भारतीय लोकांच्या ताब्यात होती. साहजिकच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशांनी आपली स्वतःची सत्ता स्थापन करत येथे असलेल्या हिंदू आणि शीख समुदायाला पिटाळून लावण्याचा प्रयत्न केला. विविध व्यापारांमधून आणि स्थानिक वसाहतींमधून प्रचंड पैसा कमावलेले भारतीय आफ्रिकन देशांच्या स्वातंत्र्यानंतर पुन्हा भारतात जाण्याऐवजी त्यांनी ब्रिटनमध्ये प्रयाण केलं व ब्रिटनमधल्या नव्या श्रीमंत भारतीय नागरिकांच्या इतिहासाचा नवा अध्याय सुरू झाला. या लोकांकडे असणाऱ्या तीन महत्त्वाच्या बाबी तत्कालीन ब्रिटनमध्ये सत्तास्थानी असणाऱ्या हूजुर पक्षाशी जुळणाऱ्या होत्या -
1. भांडवल व व्यापारउदीम
2. प्रचारासाठी लागणारा पैसा
3. एकत्र कुटुंब पद्धती आणि रूढीवादी मूल्ये
या वर्गाला ब्रिटनमध्ये 'दुहेरी स्थलांतरित लोक' म्हणून संबोधलं जातं. मजूर पक्ष जरी भारतीय नागरिकांसाठी तसेच भांडवली सत्तांच्या विरोधात आवाज उठवणारा पक्ष असला तरी हुजूर पक्षानेही आपल्या राजकारणात अश्वेत नागरिकांना मोठ्या प्रमाणात स्थान दिलं. याविषयी सांगताना माझ्या विद्यापीठातील प्राध्यापक मिक मूर म्हणाले की, प्रामुख्याने सत्तरच्या व ऐंशीच्या दशकात मार्गरेट त्याच्यावर यांनी दूरदृष्टीने इंग्लंडमध्ये दाखल झालेल्या अनेक हिंदू आणि जीवनागरिकांना आपल्या सोबतीला घेऊन मजबूत हुजूर पक्षाची मुहूर्तमेढ श्रीमंत निर्वासितांमध्ये ठोकली. 1988 मध्ये लंडनमधील भारतीय उच्चायुक्त कार्यालयात नवीन अधिकारी आल्यानंतर त्यांच्या स्वागतार्थ मार्गारेट थॅचर यांनी केलेल्या भाषणामध्ये त्यांनी भारतीय समुदायाची मोठ्या प्रमाणात प्रशंसा केली. इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेला भांडवली स्वरूप देणाऱ्या त्याच्या यांनी आफ्रिकेतून प्रचंड पैसा घेऊन येणाऱ्या भारतीय निर्वासितांचे स्वागत केलं. "विविध संसाधने घेऊन येणाऱ्या भारतीय समुदायाचं आम्ही येथे स्वागत करतो. कुटुंब व्यवस्था, कठोर मेहनत आणि त्यातून नवं आयुष्य घडवण्याची जिद्द या तुमच्या गुणांचं येथे स्वागतच होईल. नवीन उद्योग आणि व्यवसायांची उभारणी करणाऱ्या तुमच्या कामाचं फक्त तुमचं कुटुंब आणि तुम्हीच नाही, तर आम्ही सर्व ब्रिटिश नागरिकही वाटेकरी होऊ" असं त्यांनी यावेळी सांगितलं. त्यावेळी कुटुंब व्यवस्था आणि शिस्त अशा गोष्टींना प्राधान्य देणाऱ्या भारतीय आणि ज्यू धर्माच्या लोकांची हुजुर पक्षात मोठ्या प्रमाणावर भरती झाली. यातील अनेक कुटुंबे गर्भश्रीमंत होती आणि हुजुर पक्षाला निवडणुका, युद्धे, इस्लाम-विरोध आणि नववसाहतवाद मान्य करण्यासाठी हवी असणारी अश्र्वेत नागरिकांच्या दिखाऊ चमडीची 'टोकन' किंवा कांशीराम म्हणायचे ती 'stooges वा चमचे' म्हणून असणारी कुमक नव्यानं आलेल्या भारतीय कुटुंबांनी पुरवली.
अशा प्रकारे, भारतीयांचा 1940-70 पर्यंतचा गट मजूर पक्षाच्या तर 1970-90 पर्यंतचा गट हुजूर पक्षाच्या वळचणीला गेला. या गटांची आर्थिक, सामाजिक, राजकीय स्थिती एकमेकांच्या अगदी विरोधात होती. अर्थात या भेदात मुख्यतः आर्थिक बाबींचा समावेश असला तरी त्याला उच्चवर्णीय विरुद्ध पूर्वाश्रमीचे दलित असं अस्तर होतं. इंग्लंडमध्ये होणाऱ्या सामाजिक व आर्थिक अभिसरणाच्या काळात या दोन्ही गटातील वर्चस्ववादी आर्थिक व सामाजिक दृष्ट्या पुढारलेले गट एकत्र येऊन हुजूर पक्षाकडे झुकत गेले तर दलित आणि मुख्यत्वे मजूर म्हणून श्रमावर आधारित असलेले अनेक गट मजूर पक्षाच्या विविध संघटनांच्या सोबतीने डावे बनत गेले.
तरीही जातीय भेदाचे पहिले आंबेडकरोत्तर उल्लेख हिंदू विरुद्ध दलित नसून ते श्वेतवर्णीय पांढरे विरुद्ध दलित असे असल्याचं आढळतं.
(क्रमशः)
- वैभव वाळुंज, युके
vaiwalunj@gmail.com
Tags: caste england babasaheb ambedkar dalits anti-caste united kingdom vaibhav walunj Load More Tags
Add Comment