पुस्तकाच्या अखेरच्या प्रकरणात आपल्या देशाच्या भविष्याविषयीच्या दोघांच्याही चिंतनावर भाष्य केलेले आहे. लेखकाने याकरिता स्वामीजींच्या ‘आधुनिक भारत’ या विस्तृत लेखाचा व गांधीजींच्या ‘मेरे सपनों का भारत‘ या ग्रंथाचा संदर्भ दिला आहे. ‘आगामी 50 वर्षे आपली थोर भारतमाता हीच आपली आराध्यदेवता असली पाहिजे. अन्य सर्व देवदेवता काही काळ आपल्या मनातून दूर राहू द्या. विराटाची पूजा करणे आवश्यक आहे. विराट म्हणजे आपल्या भोवताली असणारे सर्व जीव. माणूस व पशु हे सर्व आपले देव आहेत.’ असे स्वामीजी सांगतात. तर ‘या मूक देशवासियांच्या सेवेच्या माध्यमातून मी सत्यरूपी ईश्वर वा ईश्वररूपी सत्याची आराधना करतो’ असे गांधीजी म्हणत.
स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधी यांचे गारुड भारतातच नाही तर जगभर आजही आहे. या दोन विभूतींच्या व्यक्तिमत्त्वांनी व विचारांनी आजवर अनेक अभ्यासक आणि विचारवंत भारावून गेले आहेत. त्यामुळे या दोघांच्यावर अमाप ग्रंथसंपदा उपलब्ध असली तरी त्यात सतत नवी भर पडत असते. याचाच दाखला म्हणजे नुकतेच प्रकाशित झालेले, प्रा. डॉ. विश्वास पाटील यांचे ‘स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधी’ हे पुस्तक होय. आजपर्यंत फारशा चर्चिल्या न गेलेल्या मुद्द्यांना लेखकाने या पुस्तकात हात घातला आहे. लेखकाचा सखोल अभ्यास, साधी पण चित्तवेधक भाषा, एक नवीन मांडणी, नवा विचार वाचकाचे चित्त वेधून घेतो.
गांधीजी आणि स्वामीजी तसे समकालीन. दोघांचीही कार्यक्षेत्रे भिन्नच; स्वामीजी संन्यासी आणि आध्यात्मिक जीवनाला झोकून दिलेले व्यक्तिमत्त्व तर गांधीजी राजकारणी व समाजकारणी. असे असले तरी प्रस्तुत पुस्तक 'दोघांच्या कार्याचा उद्देश समान होता' ही बाब अधोरेखित करते. तळथरातील मानवाचे उन्नयन हा दोघांच्या जिव्हाळ्याचा समान विषय होता. या एकाच बिंदूभोवती दोघांनी आपापले कार्यक्षेत्र विस्तारले, अधिक व्यापक केले. पुस्तक त्यांच्या कार्यारंभावर प्रकाश टाकत त्यांच्या जीवनातील साम्याचे दर्शन घडवते. तत्कालीन गुंतागुंतीच्या काळाच्या पार्श्वभूमीवर दोघांचे कार्य किती अवघड आणि कठीण होते हे दाखवते. तत्कालीन समाजाला जागे करत कार्य करत असताना, समता, परस्पर आदर, सौजन्य या आध्यात्मिक मूल्यांचे जागरण करत असताना आपण नवीन काही करत नाही असे या दोघांनीही प्रांजळपणे म्हटले होते. या त्यांच्या स्वभावातील नम्रतेच्या समान मूल्याकडे लेखकाने वाचकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
लेखक म्हणतो, ‘दोघांचा काळ विलक्षण घालमेलीचा होता. एकोणिसावे शतक सरत होते आणि विसाव्या शतकाचा उदय होत होता. सरत्या शतकाच्या उत्तरार्धात जगाचे रूप पार विस्कटून गेले होते. मनात एक आणि ओठांवर एक, अशी द्विधा परिस्थिती होती. या काळात केवळ विज्ञानाचा नव्हे, तर तंत्रज्ञानाचा पदरव ऐकायला येत होता. उत्पादन असो वा वितरण, व्यवस्थापन असो वा रचना, वाहतूक असो वा संवाद–संपर्क. सारे मानदंड धडाधड कोसळत होते... समाजव्यवस्था ढासळत होती’... अशा परिस्थितीत दोघांनीही प्रचंड कार्य केले. स्वामीजी आणि गांधीजी यांनी भारतभ्रमण केले. या भ्रमणातून त्यांना तत्कालीन सामाजिक परिस्थितीची जाणीव झाली. जमीनदारांची अमानुषता, पुरोहितांचा तळथरातील जनतेवर असणारा दबाव, त्यांची दांभिकता, जातीव्यवस्थेची जुलूमशाही, अंधश्रद्धा, कर्मकांडे, निरक्षरता, गरिबी, दुख: यांनी थैमान मांडले होते. ही बाब स्वामीजींच्या नजरेतून सुटली नाही. गांधीजींना आपल्या भारतभ्रमणामध्ये दिसले, दुख:, गरिबी, भय आणि विषमता.
दरिद्री लोकांविषयी स्वामींना वाटणारी कणव ही त्यांना त्यांच्या आयुष्यात जो दुखा:चा सामना करावा लागला, उपाशी व अर्धपोटी राहावे लागले, आई आणि भावंडे अन्नाला महाग झालेली पाहावे लागले याचा परिपाक होता. स्वामी विवेकानंदांची ही स्थिती; तर गांधीजींना आपल्या जीवनाच्या आरंभीच्या काळात आलेले व्यावसायिक अपयश, स्वामीजींची न टिकलेली शिक्षकाची नोकरी तर गांधीजींना न मिळालेली शिक्षकाची नोकरी या गोष्टींकडे लक्ष वेधत लेखक दोघांचे उर्वरित आयुष्य हे ‘वाटेवर काटे वेचित चाललो, वाटले जगा फुलाफुलांत चाललो’ या कवी अनिल यांच्या उक्तीप्रमाणे होते याची आठवण करून देतो. लेखक पुढे म्हणतो, ‘दोघांनी अभिनव मार्ग शोधला. जनांना दाखवला, अंधाराचे जाळे फेडले. पद-प्रतिष्ठा, लाभ-लोभ, प्रसिद्धी-जयजयकार, मोह-ममता, सारे सोडले’. आणि न भूतो न भविष्यती असे कार्य उभे केले. हे करत असताना त्यांनी ‘माझे ते खरे’ म्हणण्याऐवजी ‘खरे ते माझे’, असे म्हणण्यावर भर दिला. समन्वय साधला. दोघेही समस्त मानवजातीला आणि विशेषकरून दलित, वंचित, शोषित, तळथरातील लोकांना सुखी करण्याची जबरदस्त तळमळ असलेले क्रांतिकारक होते. स्वामीजी आणि गांधीजी या दोघांनी समाजातील अखेरच्या माणसाचे हित पाहिले. या दोन महान विभूतींनी धर्म आणि परमात्मा यांची सोपी, सरळ व्याख्या करत त्यांना मानवसेवेशी जोडले. ‘तुम्ही सारे भक्त आहात हे अगदी खरे आहे; पण तुम्ही सारे शब्दांत अडकून राहिलेले अडाणी आहात. धर्म कशाला म्हणतात, याची तुम्हाला कल्पना आहे काय? महाभयानक, भीषण अंधारात आपले सारे देशबांधव बुडून गेले आहेत. त्यांना त्यांच्या पायावर उभे करावयाचे आहे... हे साधण्यासाठी मी हजार वेळा नरकात जाण्यास तयार आहे’. हे स्वामीजींचे म्हणणे तर ‘परमात्म्याप्रत पोहोचायचा सर्वात सोपा उपाय मनुष्यसेवेचा आहे... ईश्वराची खरी सेवा ही मानवसेवाच आहे’ असे गांधीजींनी म्हटले आहे. या साम्याकडे लक्ष वेधताना लेखक नकळत आपली कानउघाडणी करतो.
खरे तर आत्मकेंद्री, स्वार्थी आणि संवाद हरवलेल्या आपल्या समाजाला हे पुस्तक जागे करते. रिकामा वेळ मिळाला की, मोबाईल हातात घेणाऱ्या तरुण पिढीला चांगल्या पुस्तकांकडे कसे वळवायचे हा प्रश्नच आहे. आजच्या चंगळवादी, भोगवादी आणि धर्माच्या नावावर अनिष्ट प्रथांना थारा देणाऱ्या समाजाला हे पुस्तक मार्गदर्शक तर आहेच. पण व्यक्तिमत्त्व विकासासाठीसुद्धा हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.
स्वामीजींनी जात, चमत्कार, अंधविश्वास, ज्योतिष, गूढविद्या, जादूटोणा या गोष्टी ठामपणे नाकारल्या. तर गांधीजी ज्योतिष, गूढचमत्कार वा अंधश्रद्धा यांच्या विरोधात होते. दोघांचे कार्य करण्याचे मार्ग जरी भिन्नभिन्न असले तरी त्यांच्या आचार-विचारांत ते किती परस्परपूरक होते याची जाणीव हे पुस्तक करून देते. स्वामीजींनी मठांची स्थापना केली तर गांधीजींनी आश्रम उभारले. आश्रम व मठ हे सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह या नियमांचे प्रतीक होते. स्वामीजी या नियमांचे मूर्तिमंत उदाहरण होते. या पुढे जाऊन गांधीजींनी नियमाऐवजी व्रत या शब्दाचा प्रयोग केला. प्रस्तुत पुस्तकात लेखकाने गांधीजींनी या व्रतांना वैयक्तिक पालनाबरोबर आश्रमाद्वारे सामाजिक रूप कसे दिले याचे तपशीलवार वर्णन केले आहे. स्वामीजींना ईश्वर ‘सत्य’ वाटत असे तर गांधीजींना ‘सत्य’ हे ईश्वररूप वाटत असे. ‘ही एकादश सेवावी’ या मथळ्याखाली लेखकाने प्रस्तुत नियमांचे/व्रतांचे सखोल विवेचन केले आहे. अर्थात हे विवेचन गांधीजींच्या संदर्भात जास्त आहे. त्यात ‘अभय’, ‘आस्वाद’, ‘स्वदेशी’, ‘शरीरश्रम’ यांचा समावेश केला आहे. हे प्रकरण मूळापासून वाचणे आवश्यक आहे. या पुस्तकातील ‘मी–तूपण गेले वाया’ हे प्रकरण या पुस्तकाचा गाभा आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
जातीयता, अस्पृश्यता, जातीभेद, सामाजिक विषमता या विषयांवर दोघांचे विचार व आचार तत्कालीन काळाच्या किती पुढे जाणारे होते याचे भान लेखक आपणाला देतो. स्वामीजींनी धर्माचा खरा अर्थ सांगितला तर गांधीजींनी उत्कृष्ट कर्मयोगी कसे असावे हे सांगितले. स्वामीजींनी आपल्या अध्यात्मविचाराला सामाजिक बांधिलकीचा आयाम दिला तर गांधीजींनी आपल्या राजकीय स्वातंत्र्यलढ्याला सामाजिक समतेचा आयाम दिला. गांधीजी राजकारणात होते तर स्वामीजी राजकारणात नव्हते. स्त्री मुक्ती, समाजवाद, हिंदू–मुस्लीम ऐक्य, सार्वत्रिक साक्षरता आणि अनौपचारिक शिक्षण यांद्वारे आधुनिक भारताच्या उभारणीसाठी स्वामीजींचे योगदान कसे होते याकडे लेखक निर्देश करतो. आपल्या पत्रलेखनातून त्यांनी वेळोवेळी तात्कालीन ब्रिटीश राजवटीवर घणाघाती टीका केलेली आहे. ‘आपल्या उपासमारीला ही राजवट जबाबदार आहे’ असे लिहिताना त्यांची लेखणी कचरली नाही, हे सांगत लेखकाने ‘राजकारणाच्या क्षेत्रात स्वामीजींनी पायाभूत काम केले’ तर ‘गांधीजींनी राजकारणाचे आध्यात्मिकीकरण केले’ असे प्रतिपादन केले आहे. स्वामीजींचे मठ व गांधीजींचे आश्रम या केवळ आध्यात्मिक वास्तू नव्हत्या तर ते मानवसेवेचे, समाजसेवेचे स्रोत होते. समाजकल्याणाचा व्यापक परीघ होते. ‘विवेकतरूचे अभिनव उद्यान’ या प्रकरणात लेखकाने यावर सविस्तर व सखोल विवेचन केले आहे.
केवळ मते वा सिद्धांत यांच्या जंजाळात अडकून पडणारी ही व्यक्तिमत्त्वे नव्हती तर प्रत्यक्ष कार्यावर त्यांचा भर होता असे लेखक मांडतो. आजकाल पुरोगामी विचारांवर लंबेचवडे भाष्य करणाऱ्यांची फौज राजकारणात आणि राजकारणाबाहेरही काही कमी नाही पण प्रत्यक्ष कृतीचा अभाव मात्र जाणवतो. स्वामीजींनी आणि गांधीजींनी अनुक्रमे अध्यात्म आणि राजकारण यांचा विचार प्रसारीत करतानाच जातीयतेचे उच्चाटन करण्याचा प्रयत्न केला. पण आजचे राजकारण असो वा धर्मकारण, माणसामाणसांतील भेद अधिक गडद होताना दिसतात ही दुर्दैवी बाब आहे. समाजामध्ये शांतता, प्रेम, परस्पर आदर, आणि साहचर्य नांदायचे असेल तर स्वामीजी आणि गांधीजींच्या विचारांच्या आचरणाशिवाय पर्याय नाही ही बाब हे पुस्तक अधोरेखित करते.
पुस्तकामध्ये स्वामीजी आणि गांधीजींच्या संगीत आणि कलाविषयक मतांची अतिशय सखोल व विस्तृत चर्चा केलेली आहे. त्यासाठी हे पुस्तक वाचावयालाच हवे. यंत्राच्या बाबतीत दोघांची विचारधारा समान होती. ‘यंत्र मानवाला गुलाम बनवेल’ असे स्वामीजी म्हणत, गांधीजींचे ही तेच म्हणणे होते. हे दोन महानायक किती दृष्टे होते याची प्रचिती आज मोबाईलच्या जमान्यामध्ये आपणाला येते.
पुस्तकाच्या अखेरच्या प्रकरणात आपल्या देशाच्या भविष्याविषयी दोघांच्याही चिंतनावर भाष्य केलेले आहे. लेखकाने याकरिता स्वामीजींच्या ‘आधुनिक भारत’ या विस्तृत लेखाचा व गांधीजींच्या ‘मेरे सपनों का भारत‘ या ग्रंथाचा संदर्भ दिला आहे. ‘आगामी 50 वर्षे आपली थोर भारतमाता हीच आपली आराध्यदेवता असली पाहिजे. अन्य सर्व देवदेवता काही काळ आपल्या मनातून दूर राहू द्या. विराटाची पूजा करणे आवश्यक आहे. विराट म्हणजे आपल्या भोवताली असणारे सर्व जीव. माणूस व पशु हे सर्व आपले देव आहेत.’ असे स्वामीजी सांगतात तर ‘या मूक देशवासियांच्या सेवेच्या माध्यमातून मी सत्यरूपी ईश्वर वा ईश्वररूपी सत्याची आराधना करतो’ असे गांधीजी म्हणत. दोघांनीही सत्य भारतीय समाजासमोर ठेवले. ‘विवेकें दृढ धरावी वाट सत्याची’ या समर्थ रामदासांच्या उक्तीप्रमाणे या दोन महानायकांनी आपल्या जीवनात वाटचाल केली. दोघेही सत्याला चिकटून राहिले. प्रत्येक गोष्ट सत्याच्या कसोटीवर तपासून पाहिली आणि सत्याचीच मांडणी केली. मग तो विधवा-प्रश्न असो किंवा विज्ञान. या दोघांनीही विचार आणि उक्ती यांमध्ये भेद केला नाही. दोघांचेही वाचन व व्यासंग प्रचंड होता. स्वामीजींच्यावर ‘इमिटेशन ऑफ ख्रिस्त्’ या ग्रंथाचा प्रभाव होता तर गांधीजींच्यावर ‘Unto This Last’ या ग्रंथाचा प्रभाव होता.
पुस्तक सर्वांगाने वाचनीय आहे. विस्तृत आणि सखोल विवेचन हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. आजच्या तरुण पिढीला हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार आहे. एका नव्या विचाराची सुंदर मांडणी वाचकांना नक्कीच आवडेल यात शंका नाही. वाचकांना, अभ्यासकांना हे पुस्तक एक पर्वणी आहे. पुस्तक वाचत असताना संत कबीराचा हा दोहा मनात रेंगाळत होता.
सांच बराबर तप नहीं, झूठ बराबर पाप I
जाके हिरदे सांच है, ताके हिरदे आप II
स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधी
लेखक : डॉ. विश्वास पाटील
विश्वकर्मा पब्लिकेशन, पुणे.
किंमत : 350 रुपये, पृष्ठे : 241
- डॉ. अद्वैत धोंडीराम जोशी
(लेखक, सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय, मुरगुड येथे इंग्रजी विभाग प्रमुख आहेत.)
Tags: mahatma gandhi vivekanand marathi books vishwas patil नवे पुस्तक स्वामी विवेकानंद महात्मा गांधी अद्वैत जोशी मराठी पुस्तक Load More Tags
Add Comment