बदलत्या काळात ऑनलाईन शिक्षणही गरजेचे...

ऑनलाईन शिक्षण आणि आपण  हा लेख 22 जून  2020 रोजी कर्तव्य साधनावर प्रसिद्ध झाला होता. ऑनलाईन शिक्षण, त्यातील अडचणी व मर्यादा यांविषयीची आपली मते स्नेहलता जाधव यांनी त्या लेखात मांडली होती. त्या लेखावर प्रतिक्रिया देणारा व ऑनलाईन शिक्षणाचे स्वरूप, त्याचे फायदे आणि जगभर या तंत्रज्ञानाचा होणारा वापर यांवर ओझरता दृष्टीक्षेप टाकणारा हा लेख...

बदलत्या काळाबरोबरच शैक्षणिक क्षेत्रामध्ये पात्र शिक्षकांच्या संख्येत प्रचंड वाढ (exponential increase) झाली आहे. परिणामी (पुरवठा वाढल्यामुळे) बाजाराच्या नियमाप्रमाणे, शिकवण्यासाठी मिळणाऱ्या मोबदल्यातही त्याच गतीने कपात झाली. त्याचवेळी शिक्षण घेण्यासाठी लागणाऱ्या खर्चात मात्र अवास्तव वाढ झाली आहे. 

सरकारी अनुदानावर चालणाऱ्या संस्थांना खाजगी (आजच्या परिप्रेक्ष्यात सांगायचे झाले तर व्यावसायिक) शिक्षण संस्थांनी संख्येच्या बाबतीत कधीच मागे टाकले आहे. शिक्षकांचे वेतन असो किंवा उत्साही व नव्या दमाच्या विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी पायाभूत सुविधा उभ्या करणे असो, निधी उभा करण्याचा प्रश्न या खाजगी संस्थांना कायमच सतावत राहातो. आणि जेव्हा या विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांच्या शैक्षणिक पात्रतेची सत्यता कळते तेव्हा त्यांच्या उत्साहावर विरजण पडते. (म्हणजे, मला स्वतःला एका अननुभवी, तासावर शिकवणाऱ्या आणि सोबतच डॉक्टरेटचा अभ्यास करणाऱ्या एका शिक्षकाने शिकवले आहे.)

बऱ्याच खाजगी संस्थांमध्ये एखाद्या कोर्ससाठी आवश्यक असणाऱ्या प्राथमिक सोयी-सुविधांचाही अभाव असतो. खर्चाचा विचार करताना दर्जेदार शिक्षणाएवजी व्यावसायिक दृष्टीकोन समोर ठेवल्यामुळे या संस्था ‘कॉस्ट कटिंग’च्या नावाखाली पूर्णवेळ कर्मचाऱ्यांएवजी कॉन्ट्रॅक्ट बेसवरच शिक्षकांची भरती करतात. मात्र याचा मोठा परिणाम तेथील शिक्षणाच्या दर्जावर होतो. सरकारी संस्थांमध्येही कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्यामुळे तेथेही दुर्दैवाने याच पद्धतीचा अवलंब केला जात आहे. परिणामी, उच्च क्षमतेचे पात्र उमेदवार शिक्षकी पेशाकडे पाठ फिरवून इतर क्षेत्रांना पसंती देताना दिसतात.   

शैक्षणिक पात्रतेवर आधारलेली चाचणी कौशल्याधारित चाचणीपेक्षा वरचढ ठरते, आणि त्यामुळे शिकवण्याची उत्तम कौशल्ये असलेले शिक्षक या स्पर्धेतून बाद होतात. म्हणजेच, शैक्षणिक संस्थाही टीव्ही- डीटीएच चॅनलच्या पॅकेजप्रमाणे झाल्या आहेत, जिथे तुमच्या आवडीचे चॅनल निवडताना नकोसे असणारे चॅनलही तुम्हाला पॅकेजमध्ये घ्यावे लागतात.   

आज अस्तित्वात असलेले ज्ञानाचे जाळे (consortium) हे प्रचंड वेगाने वाढणारे आणि रोजच्या रोज अद्ययावत होणारे आहे. शिक्षकांच्या विकासाशी संबंधित युजीसीच्या नियमांमध्ये नियमितपणे बदल होत असले तरी विद्यार्थ्यांच्या क्षमतांवर या सर्वांचा म्हणावा तसा ठसा उमटत नाही. (आकडेवारीनुसार, यशस्वी म्हणता येतील अशा विद्यार्थ्यांची संख्या नगण्यच आहे.)

विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून पाहता, ‘व्यक्ती ते व्यक्ती’ या स्वरूपाच्या शिक्षणाच्या अनेक मर्यादा आहे. उदा., वेळेची मर्यादा, शिक्षकांची अनुपलब्धता, विसंवाद, वयाचा आणि लिंगाचा भेद, अपुऱ्या आत्मविश्वासामुळे शिक्षकांशी संवाद साधताना येणाऱ्या अडचणी वगैरे. 

शिक्षकांच्या दृष्टीने विचार केला तर तिथेही अडचणी आहेतच मात्र त्यावर अजून म्हणावी तशी चर्चा झालेली नाही. शैक्षणिक कर्तव्ये बजावण्यासाठी अपुरा वेळ, उद्धटपणा, शिकवण्याची असमर्थता, विद्यार्थ्यांना समजून घेता न येणे, अपुरे ज्ञान, बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची असमर्थता, विद्यार्थ्यांच्या क्षमतांना कमी लेखणे अशा अनेक समस्या आहेत. कटू असले तरी हे सत्य आहे. खरे पाहता, एक विद्यार्थी केवळ आपल्या शिक्षकाइतकाच उत्तम होऊ शकतो. आपल्या देशामध्ये या रूढ अकादामिक उतरंडीएवजी हे नाते ‘विद्यार्थी आणि मार्गदर्शक’ असेच असायला हवे. 

सध्या ऑनलाईन शिक्षणाच्या परिदृश्याने शिकवण्याचा उत्साह असणाऱ्या मंडळींना एक मंच उपलब्ध करून दिले आहे. मात्र ऑनलाईन प्रशिक्षण व शिक्षण यांच्या चांगल्या व वाईट अशा दोन्ही बाजू आहेत. या तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करायचा हे सर्वस्वी त्याचा वापर करणाऱ्यावर अवलंबून आहे. 

मोकळ्या वेळेत शिकण्यासाठीचा हा उत्तम पर्याय आहे. या तंत्रज्ञानाच्या आधारे प्रत्येक विद्यार्थी हा चेहऱ्याविना संवाद (a faceless communication) साधू शकतो, सभ्यपणे चर्चा करू शकतो, दादागिरी- छळवणूक यांपासून स्वतःचा बचाव करू शकतो. यासोबतच त्याला ज्ञानाचे मुक्त आदानप्रदान करता येऊ शकते आणि आजच्या व्यावसायिक जगात आवश्यक असणारे व्यावसायिक शिक्षणही घेता येऊ शकते. आजच्या रूढ शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थ्याला संस्थेबाहेर जाता येत नाही, मिळवलेल्या शिक्षणाचा कुठे योग्य उपयोग होऊ शकेल हे त्याला तपासता येत नाही, पालक व शिक्षक सांगतील त्यावरच त्याला अवलंबून राहावे लागते. 

केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाचे ‘स्वयम’ (SWAYAM) हे उच्च शिक्षण देणारे आजच्या काळातील महत्त्वाचे ऑनलाईन व्यासपीठ आहे, मात्र सध्या ते विकसनशील अवस्थेत असल्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचे प्रमुख प्रारूप (Model) म्हणून त्याकडे पाहता येणार नाही. 

मात्र इतरांच्या तुलनेत माहितीचा सर्वांत विश्वसनिय स्रोत म्हणून स्वयमने आपली विश्वासार्हता जपली आले. तर दुसरीकडे, युट्यूबकडेही विविध प्रशिक्षण तंत्र आहेत, इंटरॅक्टीव्ह अ‍ॅनिमेशन्स आहेत, मार्गदर्शक निवडण्याचे स्वातंत्र्य आहे, त्यांचे अध्यापनशास्त्र रूढ अकादमिक अभ्यासापेक्षा इन्फोटेन्मेंटच्या वळणाने जाणारे आहे. 

ऑनलाईन शिक्षणाच्या प्रारुपाचा विचार करत असताना, विद्यार्थ्यांना कोणती शिक्षण पद्धती अधिक भावते यावर संशोधन होणे गरजेचे आहे, जेणेकरून ऑनलाईन शिक्षणाची संपुर्ण संकल्पनाच यशस्वी होऊ शकेल. शासनाने स्वीकृती दिलेल्या स्रोतांशिवाय इतर ऑनलाईन साहित्याची विश्वासार्हता हा सुद्धा एक वादाचा मुद्दा आहेच. 

ऑनलाईन व्यासपीठावर तुमची कल्पनाशक्ती हीच तुमची मर्यादा आहे. मी जीव-विज्ञानाचा विद्यार्थी होतो. मात्र मी (कम्प्युटर प्रोग्रामिंगसाठीचे) कोडींग शिकलो, सांख्यिकी सॉफ्टवेअर वापरायला शिकलो, MS-office शिकलो, Citation Managers, Adobe Photoshop, CorelDRAW, Outlook इत्यादीही शिकलो. जोडीला इंग्रजी चित्रपटांचे सबटाईटल्स वाचता वाचता इंग्रजीही शिकलो. माझे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करण्यासाठी यांपैकी काहीच अनिवार्य नव्हते. मात्र भविष्यात ही सर्व कौशल्ये मला प्रचंड उपयोगी पडली. सांगायचे तात्पर्य हेच, की माझ्या शिक्षण संस्थेमुळे नव्हे तर ऑनलाईन व्यासपीठाद्वारे मी ही कौशल्ये आत्मसात केली. 

तुमचे विचारविश्व शिक्षकाच्या ज्ञानापुरतेच मर्यादित राहते. एक मार्गदर्शक मात्र प्रश्न उपस्थित करतो आणि विद्यार्थी त्यांच्या उत्तरांचा शोध घेत असतो. असे अनेक घटक आहेत जे शिकणे आवश्यक असते मात्र आपल्या अभ्यासक्रमात त्यांचा समावेश करण्यात आलेला नसतो. ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून ही दरी भरून काढता येते. 

ऑनलाईन शिक्षण तितकेसे यशस्वी होऊ शकलेले नाही कारण बरेचदा विद्यार्थी एखादा अभ्यासक्रम आपल्या मर्जीने निवडत नाहीत, तर त्यांच्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीमुळे नाईलाजाने ते त्या अभ्यासक्रमाची निवड करतात. त्यामुळे ज्ञान मिळवण्याच्या बाबतीत ते अनिच्छूक असतात, केवळ उत्तीर्ण होणे हे एकच ध्येय त्यांच्यासमोर असते.   
    
मी जिथून डॉक्टरेट केली, त्या संस्थेने मला शैक्षणिक प्रवाहांची विविध क्षितिजे दाखवली. कुंभार असो की काचकाम करणारा कारागीर, शिल्पकार असो की काष्ठशिल्पकार या सर्वांनी डॉक्टरेटच्या पातळीचे शिक्षण घेतलेले असू शकते, आणि योग्य माध्यमातून पोहोचता आले तर त्यांनाही एका डॉक्टरेट झालेल्या व्यक्तीइतकेच वेतन मिळू शकते. विद्यार्थ्याला स्वतःची आवड कळायला हवी आणि त्यावर मार्गक्रमण करण्यासाठी अथक परिश्रम करायला हवेत. त्यासाठीचे मार्गदर्शन आणि दिशादर्शन तुम्हाला ऑनलाईन माध्यमांद्वारे मिळते. 

व्यावहारिक शिक्षणही तितकेच महत्त्वाचे असल्यामुळे ऑनलाईन प्रशिक्षणाचे व्यासपीठ हे मुख्य प्रवाहातील व्यावसायिक प्रशिक्षणाचे परिपूर्ण प्रारूप होऊ शकणार नाही. विकसित राष्ट्रांमध्ये मुख्यप्रवाहातील शैक्षणिक अभ्यासक्रम आणि ऑनलाईन अभ्यासक्रम यांचा मिलाफ असतो. कारण, केवळ ऑनलाईन शिक्षणावर अवलंबून राहिल्यास विद्यार्थी सामाजिक शिक्षणापासून दुरावले जातात, चारचौघांत बोलण्याची आणि समाजकंटकांना सामोरे जाण्याची त्यांची क्षमताही कमी होते.    

चुकीच्या शिक्षकांच्या अभ्यासक्रमाची निवड, नावडत्या विषयांची निवड, इंटरॅक्टीव्ह (परस्परसंवादी) नसलेले किंवा मुल्यांकन न करणाऱ्या अभ्यासक्रमांची निवड इत्यादी गोष्टी विद्यार्थ्यांसाठी फलदायी ठरत नाही. यामुळे ते शिक्षणापासून परावृत्त होतात आणि शिक्षणेतर मनोरंजनाकडे वळतात. 

वैविध्यपूर्ण विषयांवरील अभ्यासक्रम ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या MOOC (Massive Open Online Course) संकल्पनेचा वापर, सोबतच मुख्य प्रवाहातील अभ्यासक्रम आणि यांच्या जोडीला इंटरनेटची उपलब्धता, ही त्रिसूत्री जगभर वापरण्यात येत आहे. विकसित देशांमध्ये ही पद्धती प्रभावी ठरली असली तरी तिसऱ्या जगातील राष्ट्रांमध्ये मात्र या त्रिसूत्रीचा उपयोग प्रभावीपणे करण्यात आलेला नाही. 

त्यामुळे प्रत्येक व्यक्तीसाठी हे व्यासपीठ मुक्तस्रोत म्हणून उपलब्ध करून दिल्यास आणि त्यावर आशय निर्मिती करणाऱ्यांना (content creators) संधी उपलब्ध करून दिल्यास MOOC संकल्पनेमध्ये क्रांती घडवण्याची दृष्टी मनुष्यबळ विकास केंद्रांना (HRDC) प्राप्त होईल. 

(अनुवाद- समीर शेख)

- डॉ. अभिजीत सुरवसे 
arsurvase@gmail.com

(लेखक, उद्योजक असून अ‍ॅग्रीकल्चरल मायक्रोबायोलॉजी व ऑरगॅनिक फार्मिंग यांवर संशोधन करत आहेत. त्यांनी ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड विद्यापीठातून बायोटेक्नोलॉजी या विषयात डॉक्टरेट मिळवली आहे.)

वाचा हा लेख मूळ इंग्रजीमध्ये: On an online platform, your imagination is your limit...

Tags: शिक्षण ऑनलाईन शिक्षण स्वयम अभिजीत सुरवसे तंत्रज्ञान Education Online Education Teaching शिक्षक Teacher SWAYAM MOOC Abhijeet Suravse Load More Tags

Comments:

विश्वास पेंडसे

नवीन विषयाला वाट करून देणारा लेख! मात्र ह्यासाठी सातत्याने इंटरनेटची गरज भासणार!

Add Comment