खळाळता अवखळ झरा आणि इतर कथा : अनुभवाचा गोष्टीरूप आविष्कार

एकनाथ आव्हाड यांच्या बालकथासंग्रहाचा परिचय

एकनाथ आव्हाड यांचे ‘आनंदाची बाग’, ‘एकदा काय झालं’ हे यापूर्वीचे बालकथासंग्रह प्रसिद्ध आहेतच! त्यातच आता ‘खळाळता अवखळ झरा आणि इतर कथा’ मेहता पब्लिशिंग हाऊस या नामांकित प्रकाशनाने नुकताच प्रकाशित केला आहे. 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात लेखक विश्वास पाटील यांच्या हस्ते हा कथासंग्रह प्रकाशित झाला. त्यात एकूण सोळा कथा असून त्यात सोळा संस्काराची बीजे पेरली आहेत असे वाटण्याइतक्या त्या अस्सल आहेत.

मराठी बालकथांमधील मूल्यनिष्ठा, मुलांच्या मनातील स्पंदने आणि अनुभवाच्या अस्सल नोंदी करताना एकनाथ आव्हाड यांनी ‘खळाळता अवखळ झरा आणि इतर कथा’ या बालकथासंग्रहात मुलांच्या भावविश्वातील संकल्पना समर्थपणे पेलून येथे रेखाटल्या आहेत.

आपल्या लाडक्या लेकीला म्हणजे वैष्णवीला हा बालकथा संग्रह त्यांनी अर्पण केला आहे. ‘खळाळता अवखळ झरा’ या शीर्षकात निसर्गाची विविधांगी निसर्गरुपे आणि त्यातील द्वंद्व उतरल्याची खात्री पटते हे मात्र निश्चित! एकनाथ आव्हाड यांचे ‘आनंदाची बाग’, ‘एकदा काय झालं’ हे यापूर्वीचे बालकथासंग्रह प्रसिद्ध आहेतच! त्यातच आता ‘खळाळता अवखळ झरा आणि इतर कथा’ मेहता पब्लिशिंग हाऊस या नामांकित प्रकाशनाने नुकताच प्रकाशित केला आहे. 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात लेखक विश्वास पाटील यांच्या हस्ते हा कथासंग्रह प्रकाशित झाला. त्यात एकूण सोळा कथा असून त्यात सोळा संस्काराची बीजे पेरली आहेत असे वाटण्याइतक्या त्या अस्सल आहेत.

या बालकथेतील व्यक्तिरेखा सर्वसामान्य पातळीवरील असल्याने ग्रामीण भागातील व शहरी भागातील मुलांना त्यातील संवाद सहजसाध्य होतात हेच एकनाथ आव्हाड यांचे यश आहे. एकनाथ आव्हाड आपल्या लेखणीतून दरवेळी एक नवा आविष्कार जन्माला घालतात. एक उपक्रमशील लेखक, प्रेमळ शिक्षक, मुलांशी संवाद साधणारा अवलिया आणि थेट हृदयाला भिडणारा त्यांचा विचार यामुळे ते जाणिवांची अभिव्यक्ती व्यक्त करणारा एकमेव बालसाहित्यिक वाटतात आणि आहेतच!

या संग्रहातील कुठलीही कथा म्हणजे पराजयाचे गीत न गाता मुलांना जगण्याची काठिण्यपातळी ओलांडायला लावणारे संगीत आहे, असेच प्रत्येक कथा वाचताना वाटत राहते. कथालेखक एकनाथ आव्हाड यांनी बऱ्याच कथा बाळू, शमी या व्यक्तिरेखाभोवती फिरवलेल्या आहेत. त्यामुळे त्या अधिक रंजक, रोचक, आणि भावना सांभाळणाऱ्या झाल्या आहेत. आपला सभोवताल, आपल्या शाळेतील शैक्षणिक वातावरण आणि एकंदर महानगरीय जीवनात जगण्याची होणारी दमछाक यावरही त्यांनी या छोट्या पण संस्कारयुक्त कथेतून प्रकाश टाकला आहे हे विशेष!

एकनाथ आव्हाड हे बालकांशी एकनिष्ठ झालेले लेखक आहेत. शिवाय त्यांचे मन अत्यंत संवेदनशील आहे. याची प्रचिती त्यांनी कथासंग्रहाला ज्या कथेचे नाव दिले आहे त्या ‘खळाळता अवखळ झरा आणि इतर कथा’ या कथेतून डोकावताना दिसते. बाळू आणि शमीच्या मामानं सर्कस संपल्यावर त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना विदूषकाची भेट घडवून आणली. कमी उंची लाभलेला विदूषक दुःख न करता इतरांना हसवण्याचं काम करतो. त्याच्या वडिलांना दमा आहे. त्याची आई दुसऱ्यांच्या शेतावर दिवसभर मजुरीला जाते. शाळेला सुट्या असल्या की तो सर्कशीत कामाला येतो. हे कळल्यावर शमी म्हणाली, “ए, विदूषकदादा, तू उद्या आमच्या घरी येशील का? तेव्हा विदूषक हसला आणि म्हणाला, “माझं नाव विदूषक नाही, वीरेंद्र आहे.” त्यांच्या आग्रहाखातर विदूषक सकाळी आठच्या ठोक्याला दारात हजर झाला. चहा-नाष्टा, गप्पा झाल्यावर शमीनं त्याला कागदात बांधलेला खाऊ दिला आणि त्याला उघडायला सांगितला तर कागदातून बाहेर चक्क बाबा भांड यांचे धर्मा, ना.धो.ताम्हणकर यांचे गोट्या आणि साने गुरुजींची श्यामची आई ही तीन पुस्तकं. वीरेंद्रलाही खूप आवडली. वीरेंद्रचे डोळे भरून आले. तो निरोप घेऊन गेला खरा पण सगळ्यांना तो ‘अवखळ खळाळता झरा’ वाटला!

कथेचा शेवट करताना एकनाथ आव्हाड कमालीचा उच्च विचार देऊन जातात. मुळात एकनाथ आव्हाड हे प्रथितयश बालकवी असल्याने त्यांच्या प्रत्येक कथेत कविता डोकावताना दिसते. याही कथेत त्यांनी विदूषकाविषयी म्हटलंय-
‘सर्कशीचा खरा प्राण, तोच आहे खरा
त्याच्याशिवाय खेळ होत नाही पुरा’

मुलांनी शाळाबाह्य राहता कामा नये. त्यांनी शिक्षण घ्यावं, स्वावलंबी व्हावं, कष्ट करावेत, जिद्द बाळगावी. त्यांनी अपराधी भावनेने जीवन का जगावं? ही प्रश्नाची गुंतावळ आपल्या कथेतून एकनाथ आव्हाड सहज सोडवताना यशस्वी होतात. तीव्र सुखदुःखाचे चटके खात जीवन कंठणाऱ्या माणसांचे, त्यांच्या प्रापंचिक व्यवहाराचे चित्रण त्यांनी ‘सुंदर लखलखीत मन’ या कथेत केलेलं आहे.

निव्वळ कथा सांगणे हा एकनाथ आव्हाड यांचा स्वभाव नाही तर कथेत सामान्य ज्ञानाची त्यांनी भर घातली आहे. कल्हईवाल्याची कथा सांगताना तांब्याच्या भांड्यात आंबट किंवा आम्लधर्मी पदार्थ बनविले, की त्यांच्यात रासायनिक प्रक्रिया होऊन अन्न बिघडण्याची शक्यता अधिक असते तर कधी अन्नपदार्थातून विषबाधा होण्याची शक्यता अधिक असते हा वैज्ञानिक दृष्टिकोन ते सांगताना दिसतात. भांडं तापवून त्यात नवसागराची म्हणजे अमोनियम क्लोराईडची भुकटी वापरून आतून स्वच्छ केलं जातं. मग ते थंड झालं, की त्यात कथिलाचा तुकडा टाकतात मग परतवून घेतात. ही माहिती ऐकून शमी, बाळू हरखले! हा विचार सांगता सांगता भांडे घेऊन सकाळी हजर झालेल्या कल्हईवाल्याचं व यदुनाथचं व्यक्तिमत्त्व लेखकाने सिद्ध केलंय. लेखक एका प्रसंगात लिहितो - कल्हईवाला म्हणाला, “ताई, आम्ही काल आलो नाही. रागावू नका, तुम्हाला वाटलं असेल ‘भांडी गेली’ परंतु ताई , जिथे कष्टाचंच पुरत नाही तिथं हरामाचं कसं पुरेलं आयुष्याला? कष्टाची अर्धी भाकरीच आमच्यासाठी गोड आहे. लांडीलबाडी करून मग देवाला तोंड कसं दाखवू वरती गेल्यावर?” आईलाच काय पण बाबांना, बाळूला व शमीलाही कल्हईवाल्याच्या आणि यदुनाथच्या लखलखीत, नितळ, नितांतसुंदर अंतर्मनाचं दर्शन झालं. प्रत्येक कथेच्या गाभार्‍यात ‘मुले शाळाबाह्य राहू नयेत’ या अट्टाहासाचा आणि विचारांचा दीप आव्हाडांनी तेवत ठेवलाय. प्रत्येक कथा अर्थपूर्ण करण्याचा त्यांचा हा प्रांजळ प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे.


हेही वाचा : शब्दांची नवलाई : विद्यार्थ्यांना मराठीचा लळा लावणारा कवितासंग्रह - उमेश घेवरीकर


‘म्हणीची गंमत, गप्पांची संगत’ या कथेत ‘म्हणीचा खेळ’ या नव्या शालेय खेळाचा जणू आव्हाड सरांनी शोधच लावलाय! शमी, कृतिका, ऐश्वर्या, अनन्या, शर्वरी या मुलींनी म्हणीचा अर्थही सांगितला. ही कथा वाचल्यानंतर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील अध्ययन-अध्यापनाची आंतरक्रिया सहज सोपी होईल हे मात्र निश्चित! बालकांच्या जीवनातील घटना-प्रसंग समजून घेण्याची लेखकांची क्षमता ही उच्च कोटीची आहे. सूक्ष्मदर्शी नोंदी त्यांनी कथेत साकारलेल्या आहेत. ‘चिमुकला हात’ या कथेत प्रेमळपणा, सहानुभूती, सहिष्णुता, प्रसन्नता या गोष्टी सहज आविष्कृत होताना पाहायला मिळतात. ‘स्वातंत्र्याचे मोल’ या कथेतला बाळू पिंजऱ्यातल्या पक्ष्यांना स्वातंत्र्य मिळवून देतो, परिणाम पक्षी विकणाऱ्याला रोजगार मिळतो आणि त्याच्या मुलांना शाळा मिळते.

‘भाषेची गोडी’ या कथेत तर ‘ऐकूया चला’ ही कविताच आव्हाड सरांनी अंतर्भूत केली आणि ध्वनीदर्शक शब्दांचा अभ्यास झाला. त्याचा एक नमुना -
‘कबुतराचे गुटर्रघुम ,मांजराचे म्यॉव म्यॉव
ध्वनीदर्शक शब्द सारे, ऐकूया चला राव’

तर ‘श्रावणसरी आल्या घरी’ या कथेत बाळू, शमी या मुलांना बाबाच्या माध्यमातून कवींची, लेखकांची कितीतरी टोपणनावे माहीत झाली. कुसुमाग्रज, आरती प्रभू, बालकवी, बी, केशवकुमार, केशवसुत, समर्थ रामदास स्वामी, अनिल, ग्रेस, सौमित्र यांची पूर्ण नावेसुद्धा या कथेत समाविष्ट आहेत. ज्ञानाचे दृढीकरण झाले पाहिजे हा प्रधान हेतू ठेवून या कथा आव्हाडांनी लिहिल्या आहेत. गुगलआजी हे आजींना केलेले सार्थ नामकरण ‘गुगलआजी’ या कथेलाही शोभून दिसेल असंच आहे. कारण आजीच्या ज्ञानाच्या पोतडीत अनेक ज्ञानाचे शिक्के आहेत. ते ती कौशल्याने बाहेर काढते. ती मुलांना प्रश्न विचारते -

“मुलांनो, सिंहाचं सामर्थ्य कशात आहे? हत्तीचं बळ कशात? बैलाची शक्ती कशात? आणि माणसाची ताकद कशात?” प्रश्नाचं उत्तर मुलं सांगतात पण माणसाची ताकद - हुशारी डोक्यात असते हे उत्तर आजींनाच द्यावं लागतं. ही कथा आजीच्या अनुभवाच्या अस्सल ज्ञानाभोवती लेखकांनी फिरवली आहे. त्यामुळे आजीच खरी ‘गुगल’ वाटते!

झाडाविषयी ममत्व भाव बाळगताना व त्याची महती विशद करताना मराठी साहित्यात झाडांना ‘परोपकारी संत’ ही पदवी केवळ आव्हाडांनी बहाल केल्याचं ऐकिवात आहे. मुळेबाई, शमूची आई यांचं यथार्थ योगदान सिद्ध करत, ‘झाड फार गुणी असतं. भरभरून देतं, मायेनं साऱ्यांना सावलीत घेतं. कुर्‍हाड घेऊन तोडणाऱ्यांना पण सावली आणि पालनपोषण करणाऱ्यांना पण सावली देणारं झाड हे परोपकारी संतच असतं’ हा परोपकाराचा, दुसऱ्याच्या हिताचा, आणि सर्वसमानतेचा उपदेश झाड हे प्रतीक वापरून आव्हाड सरांनी केला आहे.

विचारांना चालना देणारी, शमूला व बाळूला मार्गदर्शन करणारी व सुर्यास्ताचं दर्शन घडवणारी ‘कहाणी घडलेल्या दिवसाची’ ही कथा उद्बोधक आहे. रूप लहान परंतु विचार महान अशा आशयाच्या कथा लिहिण्यात आव्हाडांचा हात सकस व सरस आहे. बालसृष्टी हा त्यांच्या जिव्हाळ्याचा व आत्मीयतेचा विषय आहे. प्रतिकूल परिस्थितीशी झगडत शिक्षणाची पायवाट चालणाऱ्या ‘शिक्षेतून दीक्षा’ या कथेत लक्ष्मण केरकर यांची बालपणाची गोष्ट, शाळेतील प्रसंग, गावकर सरांची बदलती दृष्टी, दोन आणे दंडाची सूचना रद्द करण्याची सहानुभूती ही सगळी सूत्रे एकनाथ आव्हाडांनी या कथेत आशयपूर्णरित्या मांडली आहेत.

तसेच ‘प्रयत्नांची खरी ताकद’ या कथेत पराजयातच जय दडलेला असतो. पराजय सुद्धा खिलाडूवृत्तीनं स्वीकारायला हवा ही शिकवण त्यात आहे. ‘कमलची जिद्द’ या कथेत कांबळे गुरुजींनी जीवनाची प्रकाशवाट दाखवली, कमलने दाद दिली मग कमलच आईला म्हणाली, “खरं सांगू का? अगं आई, “शाळा आपल्यासाठी भाकरीचा गोळा आहे.” शाळेचं महत्त्व आईला समजावून सांगणारी कमल ही कमालीच्या परिवर्तनाची नांदी कशी ठरली याचं खुमासदार वर्णन एकनाथ आव्हाड यांनी केलं आहे. ‘पावसाची कविता’ या कथेत थोरात सरांचा गैरसमज बाळूच्या धाडसामुळं दूर झाला. रमेशचा खरा चेहरा सरांना वाचता आला. त्याच्या उदबत्ती विकण्यामागचं रहस्य गुरुजींना समजलं. ‘मधूला स्वेटर नाही’ हे बाईंना कळल्यावर आणि नाचून, गाणी म्हणून आपण थंडीला पळवून लावू असं बाईंनी म्हटल्यावर मधू हरखला! मुलांचे आनंदी चेहरे पाहून बाईचा चेहरा खुलला होता. बाईचं टेबलावरील स्वेटरकडे सहज लक्ष गेलं तर टेबलावरचा स्वेटर बाईंना उगाचच मलूल, कोमेजलेला भासत होता. आणि मुलांचे चेहरे जणू फुलंच वाटत होते. कथेचं असं भेदक वर्णन करताना आव्हाडांची लेखनशैली अख्खं आभाळ कवेत घेताना दिसते. ‘थँक्यू’मध्ये गांधीजींच्या प्रवासवर्णनातील गोष्ट सांगून त्यांनी मुलांमध्ये सहनशीलतेची जाणीव निर्माण करून दिली.

एकंदरीत एकनाथ आव्हाड यांच्या कल्पनाशक्तीला सतत नवे धुमारे फुटत असतात. नवा उन्मेष, नवी झळाळी घेऊन लेखन करणारे एकनाथ आव्हाड हे प्रवाही लेखक आहेत. त्यांनी ‘खळाळता अवखळ झरा आणि इतर कथा’ या संग्रहात दया, जिव्हाळा, आपलेपण यांचा संस्कार जपत शब्दसामर्थ्यानिशी कथा शब्दबद्ध केल्या आहेत. त्यांच्या यमक साधण्याचा व आशयघन कथालेखनाचा अधिकार अधोरेखित करावा असाच आहे.

खळाळता अवखळ झरा आणि इतर कथा (बालकथा)
एकनाथ आव्हाड
मेहता पब्लिशिंग हाऊस
पृष्ठे - 96 मूल्य - 195 रुपये.

- वीरभद्र मिरेवाड, नायगाव (बा)
virbhadra.mirewad@gmail.com

Tags: बालवाङ्मय साहित्य लहान मुलांसाठी कथा शिक्षण Load More Tags

Comments:

सदानंद पुंडपाळ

खूप सुंदर परीक्षण केले असून हा दर्जेदार कथासंग्रह केवळ बालकुमारांसाठी नसून प्रौढांनीही वाचावा असा आहे

विष्णू दाते

"खळाळता अवखळ झरा" ह्या नावातच पुस्तकाचा आवाका लक्षात येतो, पुस्तक वाचावेसे वाटते,हेच लेखकाचे यश आहे!

अशोक कोळी

खूप सुंदर परिचय करून दिलाय सर पुस्तकाचा... खळाळता अवखळ झरा वाचण्याची उत्सुकता निर्माण केलीत...

SHIVAJI PITALEWAD

खूप छान सर आजच पुस्तक मागून घेतो. साधना विरभद्र मिरेवाड सरांचे खूप खूप आभार!

Add Comment

संबंधित लेख