शब्दांची नवलाई : विद्यार्थ्यांना मराठीचा लळा लावणारा कवितासंग्रह

एकनाथ आव्हाड यांच्या ‘शब्दांची नवलाई’ला राज्यशासनाचा 'बालकवी पुरस्कार' जाहीर झाला आहे.

‘मराठीचे भले व्हावे’ असे मनापासून वाटत असेल तर मराठी भाषेची आवड मुलांमध्ये शालेय काळातच निर्माण करायला हवी ही झाली अपेक्षा. पण त्यासाठी नेमके काय करायला हवे हे समजून घ्यायचे असेल तर हाडाचे शिक्षक असणारे आणि निरंतर विद्यार्थीहिताचे व मराठी भाषेच्या उत्कर्षाचे चिंतन आपल्या बालसाहित्यामधून करणारे बालसाहित्यिक श्री. एकनाथ आव्हाड यांचा ‘शब्दांची नवलाई’ हा कवितासंग्रह शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी आवर्जून वाचायलाच हवा. नुकताच त्याला राज्यशासनाचा 'बालकवी पुरस्कार' पुरस्कार जाहीर झालेला आहे!

शालेय जीवनात प्रत्येक गावातील, प्रत्येक शाळेतील, प्रत्येक वर्गातील, प्रत्येक विद्यार्थ्याला मराठी भाषा शिकताना व्याकरण आणि विरामचिन्हांचे बोट धरून चालावे लागते. त्याला मराठी विषय शिकवणाऱ्या शिक्षकांचा मराठी भाषेचा व्यासंग, त्यांचे वाचन, त्यांची तळमळ आणि उपक्रमशीलता यावरच त्यांच्या विद्यार्थ्यांना मातृभाषेची गोडी लागेल का हे अवलंबून असते. मराठी शिकवणे म्हणजे, सत्यनारायणाची कथा वाचावी तसे पाठ्यपुस्तक वाचून दाखवणारेच आज बहुसंख्य आहेत! व्याकरण फक्त वाचून दाखवले आणि पाठ्यपुस्तकातून जसेच्या तसे वहीत उतरवून दिले तर विद्यार्थ्यांना व्याकरणाचे नीट आकलन होणार नाही, आणि त्यांचा मराठी भाषेचा पायाच कच्चा राहण्याची शक्यता जास्त. मात्र याच मुलांनी भविष्यात मराठी वाचन संस्कृतीची पालखी आपल्या खांद्यावर वाहून न्यायला हवी अशी सगळ्यांची अपेक्षा असते.

‘मराठीचे भले व्हावे’ असे मनापासून वाटत असेल तर मराठी भाषेची आवड मुलांमध्ये शालेय काळातच निर्माण करायला हवी ही झाली अपेक्षा. पण त्यासाठी नेमके काय करायला हवे हे समजून घ्यायचे असेल तर हाडाचे शिक्षक असणारे आणि निरंतर विद्यार्थीहिताचे व मराठी भाषेच्या उत्कर्षाचे चिंतन आपल्या बालसाहित्यामधून करणारे बालसाहित्यिक श्री. एकनाथ आव्हाड यांचा ‘शब्दांची नवलाई’ हा कवितासंग्रह शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी आवर्जून वाचायलाच हवा. नुकताच त्याला राज्यशासनाचा 'बालकवी पुरस्कार' पुरस्कार जाहीर झालेला आहे!

शालेय वयात बालकुमारांना नादमय शब्दांचे भारी आकर्षण असते. गद्य पाठांपेक्षा कविता सहज पाठ होतात, लक्षात राहतात. कारण, मुले त्या आधीच्या वयाच्या टप्प्यावर बडबडगीते ऐकत वाढलेली असतात. जड आणि अगम्य भाषेपेक्षा सहज सोपी शब्दरचना त्यांना अधिक जवळची वाटते. हे बालमानसशास्त्र अचूक ओळखून आव्हाडांनी या संग्रहात अशा साध्या- सोप्या शब्दांत फार मोठा आणि महत्त्वाचा आशय सांगणाऱ्या कविता लिहिल्या आहेत.


हेही वाचा : गावखेडयातील विषमतेचं समग्र चिंतन मांडणारी कविता - आबासाहेब सरवदे


एकाच शब्दाचे तीन, तीन अर्थ सांगणाऱ्या ‘आमच्या बाई’ या कवितेत, 
‘आश्चर्याला म्हणतात त्या, अचंबा, नवल, विस्मय
घराला  म्हणतात त्या, सदन, निवास, आलय’

अशी हलकी फुलकी शब्दरचना करत ते शब्दांच्या विविध अर्थच्छटा हळूवारपणे उलगडवून दाखवतात. बालकुमार वयोगटातील मुलांना सलग चार-पाच तास वर्गात बसून राहणे फारसे आवडणारे नसते; पण कल्पकतेने, वर्गातल्या वर्गात घेतलेले भाषेचे खेळ त्यांना समृद्ध करतील हा आशावाद मांडत जाणारी त्यांची ‘नवे खेळ’ ही कविता शिक्षकांच्या उपक्रमशीलतेचे मोल आणि अध्यापनातील उपक्रमशीलतेची गरज अधोरेखित करणारी आहे

‘चला मुलांनो खेळूया, करू नका झगडा
तीन अक्षरी शब्द सांगा, ज्याच्या शेवटी डा
जो रस्ता सरळ नाही, तो असतो वाकडा
बैलगाडीला म्हणतात, गावोगावी छकडा..’

मुलांच्या मनावर अजिबात दडपण न देता त्यांच्या सहभागातून नवे शब्द शिकवणारी ही कविता ज्ञानरचनावाद कृतीतून उतरवते. ही लयबद्ध पण तितकीच सहज सोपी मांडणी मुलांच्या मनात हलकेच रुजत जाणारी असल्याने मुलांची या कवितांशी मस्त गट्टी होऊन जाते.

व्याकरणातील महत्त्वाची अंगे म्हणजे विरामचिन्हे. पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम, अपूर्णविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारचिन्ह, एकेरी व दुहेरी अवतरणचिन्हे यांचा वापर नेमका कसा आणि कुठे करावा याबाबत लहानांच्या मनात तर सोडाच पण अनेकदा मोठ्यांच्या मनातसुद्धा संभ्रम दिसून येतो. योग्य वयातच यासंदर्भात सुस्पष्टता यावी यासाठी ‘चिन्हाचा खेळ’ या कवितेत,

‘शब्दांवर जोर पाडी, अवतरणचिन्ह एकेरी
कुणी बोले तिथेच दिसे, अवतरणचिन्ह दुहेरी  
एका जातीच्या शब्दांमध्ये, येऊन बसे स्वल्पविराम
वाक्याच्या शेवटी बोले, तपशिलात अपूर्णविराम..’

अशी मांडणी करत ते विरामचिन्हांचे उपयोजन सुलभ करतात.  

नाम, विशेष नाम, भाववाचक नाम, क्रियापद, जोडशब्द, यांची अचूक माहिती आणि उपयोग शिकवणाऱ्या अनेक कविता या संग्रहात आपल्याला भेटतात आणि व्याकरण शिकणे आणि शिकवणे म्हणजे अगदीच दुर्बोध, रुक्ष व कंटाळवाणे हा समज ठामपणे खोडून काढत व्याकरण शिकवण्याची नवी दृष्टी शिक्षक आणि पालकांना देऊन जातात हे या संग्रहाचे वैशिष्ट्य ठरते. ही दृष्टी उद्याचे वाचक आणि लेखक घडवण्यासाठी आणि त्यांचे भाषिक भावविश्व समृद्ध करण्यासाठी उपयुक्त ठरणारी आहे.

‘वाक्प्रचार’ हे मराठी भाषेचे सौष्ठव! या वाक्प्रचारांना सहजी गुंफत, त्यांचे अर्थ समजून देणाऱ्या, ‘ज्ञानाच्या खाणी’ समजल्या जाणाऱ्या ‘म्हणीची गंमत’ सांगणाऱ्या, हात-तोंड या अवयवांवरून तयार होणाऱ्या विविध वाक्प्रचारांचा अर्थ सांगत त्यांची माला गुंफणाऱ्या, नादमयता जपत मुलांच्या मनाशी लाडीगोडी करणाऱ्या, मराठीचे वैविध्य दर्शवत भाषेची गंमत वाढवणाऱ्या एकाहून एक सरस कविता मुलांचे भावविश्व प्रकाशमान करण्याऱ्या आहेत.

...पण ही ‘शब्दांची नवलाई’ इथेच थांबत नाही तर कवीची कल्पनाशक्ती आणि नाविन्याची ओढ यांची साक्ष देणाऱ्या या संग्रहातील काही कविता, जे विषय सर्वसामान्य वाचकाच्या मनातही येणे अवघड असते अशा विषयांना स्पर्श करून सुखद धक्का देतात. पशुपक्ष्यांचे गमतीदार आवाज हा नेहमीच मुलांच्या कुतूहलाचा विषय असतो. ‘शब्दांची गोडी’ या कवितेतून केकारव, कलरव, चिवचिव, कावकाव, हंबरणे, गर्जना, फूत्कार, घूत्कार या ध्वनीदर्शक शब्दांची मनोहरी रचना येतात. ‘उत्स्फूर्त उद्गार’ या कवितेत, शब्दांच्या जातीतील आठवा प्रकार असलेल्या केवलप्रयोगी अव्ययाचे आठही प्रकार दिसतात. तर ‘अलंकार’ या कवितेत लंकेची पार्वती, पिकले पान, एरंडाचे गुऱ्हाळ अशा अनेक आलंकारिक शब्दांचे विलक्षण सौंदर्य त्यांनी समोर ठेवले आहे. 


हेही वाचा : शालेय शिक्षणात जमातींचा सहभाग - अमित कोहली


पशुपक्षांच्या निवाऱ्याच्या जागासुद्धा त्यांच्या शोधक नजरेतून सुटलेल्या नाहीत. शब्दांच्या जाती, वाक्प्रचार, म्हणी, समूहदर्शक शब्द, विरामचिन्हे, अलंकार, समानार्थी व विरुद्धार्थी शब्द हा खरेतर मराठी व्याकरणाचा पाया. अभ्यासातील या सर्व घटकांवर, लहान मुलांना सहज समजतील अशा कविता लिहिणे ही एका दृष्टीने अग्निपरीक्षाच! पण भाषेची समृद्ध जाण, विद्यार्थीहिताची अकृत्रिम तळमळ आणि बालसाहित्याचे सातत्यपूर्ण चिंतन या शिदोरीच्या बळावर एकनाथ आव्हाड यांच्यातील उपक्रमशील शिक्षकाने ती परीक्षा ‘सुवर्णपदकासह विशेष योग्यता श्रेणी’ मध्ये उत्तीर्ण केली आहे असे म्हणणे हा ‘अतिशयोक्ती अलंकार’ नक्कीच ठरणार नाही. 

डॉ. सुरेश सावंत यांची संग्रहातील सर्व कवितांचा आणि त्यामागील लेखनप्रेरणेचा सांगोपांग आढावा घेणारी समर्पक प्रस्तावना आणि चित्रकार श्री.संतोष धोंगडे यांचे अर्थपूर्ण मुखपृष्ठ, बालमनाला भुरळ घालणारी पुस्तकातील समर्पक चित्रे यांनी पुस्तकाच्या मुळच्या सौंदर्यात मोलाची भर घातली आहे.

वर्तमानात इंग्रजी माध्यमाचे वाढते स्तोम थोपवत विद्यार्थी संख्या टिकवणे हे मराठी माध्यमाच्या शाळांपुढे आणि शिक्षकांपुढे मोठे आव्हान आहे. मात्र ते परतवून लावण्यासाठी मराठीच्या अध्ययन-अध्यापनाचा दर्जा उंचावत राहणे आपल्याच हातात आहे. त्यासाठी मराठी भाषा, मराठी शाळा आणि मराठी माध्यमातील विद्यार्थी यावर सातत्याने चिंतन करत, मराठीचा लळा लावणाऱ्या ‘शब्दांची नवलाई’सारख्या साहित्याची निर्मिती करणाऱ्या सृजनशील शिक्षकांची नितांत गरज आहे. अशा शिक्षकांनाही प्रेरणा देणारा ‘शब्दांची नवलाई’ हा कवितासंग्रह हे त्या दिशेने टाकलेले शुभंकर चिन्ह आहे. मराठी भाषेचा अभिमान, आवड आणि काळजी असणारे नागरिक, राज्यातील सर्व संस्थाचालक, शिक्षक, पालक आणि बालवाचकांनी ही ‘नवलाई’ आपल्या संग्रही ठेवणे ही आपली जबाबदारी मानायला हवी. 

शब्दांची नवलाई
लेखक - एकनाथ आव्हाड
प्रकाशक - दिलीपराज प्रकाशन, पुणे
पृष्ठ्ये - 64 किंमत - 150 रु. 

- उमेश घेवरीकर, अहमदनगर
umesh.ghevarikar@gmail.com

Tags: बालकुमार विद्यार्थी शिक्षण मराठी भाषा शाळा Load More Tags

Comments:

विष्णू दाते (कांदिवली)

"शब्दांची नवलाई " नावंच खूप काव्यमय आहे! मराठी भाषा वृद्धींगत होण्यासाठी मोलाची भर घालणारा हा काव्य संग्रह खूपच मोलाचा ठरेल! एकनाथ आव्हाडांचे त्यासाठी अभिनंदन!

Eknath Avhad

सर खूपच नेमकेपणाने आणि अभ्यासपूर्ण लिहिलंय आपण.

उमेश मधुकर कुंदे

खुप छान.

Add Comment