साहित्यावर वंचितांची प्रखर नाममुद्रा उमटवणारा महत्तम आंबेडकरी लेखक 

20 सप्टेंबर : दया पवार यांच्या 25 व्या स्मृतिदिनानिमित्त

दलित-शोषित-पीडित यांचा मराठी वाङ्मयाच्या इतिहासातील आवाज बुलंद करणारा, साहित्यप्रतलावर वंचितांची प्रखर नाममुद्रा उमटवणारा या शतकातील महत्तम आंबेडकरी लेखक म्हणून दया पवार यांचे नाव घ्यावे लागते. भाषेच्या रणांगणावर रात्रंदिन युद्धरत असणाऱ्या या लढाऊ बाण्याच्या लेखकाला स्वतःची जन्मतारीख माहीत नव्हती. हजारो वर्षांपासून अज्ञानाच्या अंधार कोठडीत डांबून ठेवलेल्या त्यांच्या वंशावळीला तारीख-महिना-वर्ष यांचे हिशोबच माहीत नव्हते. त्यामुळे जन्मदिनांक नोंदवून ठेवण्याइतकीही अक्षरओळख कुणाजवळ असण्याची शक्यताच नव्हती. आईवडील, दोघं अडाणी त्यामुळे अंदाजे 1935 असा त्यांचा जन्म नोंदवला गेला.

त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील धामणगाव या गावी झाला. गाव तसे छोटे पण निसर्गसौंदर्याने नटलेले. सह्याद्रीच्या उंचच उंच डोंगररांगा. शेजारी दुथडी भरून वाहणारी प्रवरा नदी आणि नदीच्या काठावर एका छोट्याशा डोंगराच्या कुशीत वसलेले हे धामणगाव. परंतु सारे जगणेच अनैसर्गिक झाले असेल तर त्या निसर्गाचा आनंद तरी कसा घेता येणार?

दया पवारांचा जन्मच गावकुसाबाहेरच्या कोंडवाड्यात झाला. या कोंडवाड्यात अभाव, अपमान, भूक, दुःख अशी असंख्य श्वापदे कायमच दबा धरून बसलेली होती. सभोवतालच्या दाहक वास्तवाचे चटके शरीरमनाला बसत असताना त्यांचे लक्ष निसर्गाकडे वळले नाही हेदेखील नैसर्गिकच आहे.

दया पवारांचे मूळ नाव दगडू. दगडू हे नाव तसे अवमानकारक. विशेषतः दलित बहुजन दगडासारखे बिनडोक आणि अडाणचोट असतात या परंपरागत धारणेतून अशी नावे पाडली जात असत. म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक या नावाचा त्याग करून ‘दया’ हे नाव धारण केले. हे नाव त्यांच्या स्वभावाला साजेसेच होते. त्यांच्या वडिलांचे नाव मारोती तर आईचे नाव सखूबाई. गावकुसाबाहेरचे पिढीजात दारिद्र्य त्यांच्याही वाट्याला आलेले. वडील कष्टाळू पण छंदीफंदी स्वभावाचे. ते शेतमजूर म्हणून काम करायचे, वाजंत्रीच्या ताफ्यात काम करायचे, मुंबईला जाऊन गोदीत कचरा जाळण्याचे काम करायचे परंतु दारूचे व्यसन असल्याने पैसा टिकत नव्हता. त्यातच त्यांचे लवकर निधन झाले. त्यामुळे कुटुंबाची सगळी जबाबदारी एकट्या आईवर म्हणजे सखूबाईवर येऊन पडली. सखूबाईने मोलमजुरी करून नेटाने कुटुंबाचा गाडा ओढला. दुसऱ्या लग्नासाठी आग्रह होत असताना केवळ आपल्या मुलांसाठी तिने लग्नाला ठाम नकार दिला आणि स्वतःच त्यांची बाप झाली. आईने आपल्यासाठी एवढ्या खस्ता खाल्ल्या नसत्या तर आपण शिकलोही नसतो आणि लेखक म्हणून घडलोही नसतो याची तीव्र जाणीव दया पवारांना होती. म्हणून आईबद्दलची कृतज्ञता त्यांच्या लेखनात जागोजागी सापडते. 

शहर आणि खेडे या दोहोंची वेस त्यांना ओलांडता आली नाही. त्यांचे दुसरीपर्यंतचे शिक्षण मुंबईतील कांवखान्यातील म्युन्सिपालटीच्या शाळेत झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना गावी पाठवण्यात आले, परंतु तिथे इतर मुलांपेक्षा त्यांना वेगळी वागणूक मिळायची. पिण्यासाठी पाणीही मिळत नसे. तिसरी–चौथी गावात झाल्यानंतर पाचवी ते दहावीच्या शिक्षणासाठी ते संगमनेरला गेले. तिथल्या बोर्डिंगमध्ये त्यांची आई भाकरी थापण्याचे काम करत असे. पुढचे शिक्षण घेण्यासाठी ते पुन्हा मुंबईला गेले आणि रुपारेल कॉलेजमध्ये दाखल झाले. पण त्यांना आता नोकरीची गरज होती. नोकरीची शोधाशोध सुरू केली, पण सगळीकडून नकार मिळत होता. शेवटी आई पुन्हा कामाला लागली. ती कांवखान्यातील बायकांसोबत बाजारातील कागद गोळा करायला जाऊ लागली. दया पवारांना तिचे हाल पाहवत नव्हते पण इलाज नव्हता. शेवटी त्यांना परेल येथील व्हेटरनरी कॉलेजमध्ये नोकरी मिळाली. पण तिथे जनावरांचे शेण, मूत्र, चामडी काढणे अशी निकृष्ट दर्जाची कामे वाट्याला आली. आधुनिक काळातही परंपरागतच काम मिळाल्याने ते विचारप्रवृत्त झाले. ही आधुनिक जातिव्यवस्था त्यांच्यासाठी चीड आणणारी होती. महारवाड्यातील रितीरिवाज, गावातील राजकारण, स्पृश्य-अस्पृश्यता, शहरातील बेकारी, गिरणी कामगारांच्या हालअपेष्टा, झोपडपट्टीतील बकाल जीवन, चाळीतील कलह आणि लहानपणी बघितलेली किळसवाणी संभोगचित्रे यांचा खोलवर परिणाम त्यांच्या मनावर झाला. हे अनुभवाचे संचित त्यांच्या लेखनाची सामग्री झाले, तर आंबेडकरी चळवळीने लेखनासाठी ऊर्जा पुरवली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतरची दोन दशके प्रचंड धामधुमीची होती. सामाजिक चळवळींनी जोर धरला होता. त्याला समांतर दलित साहित्याची चळवळ सुरू झाली. दलित कविता आणि आत्मकथन या दोन साहित्यप्रकारांनी तर मराठी साहित्यात अभूतपूर्व परिवर्तन घडवून आणले. दलित साहित्यप्रवाहाच्या शिलेदारांपैकी दया पवार हे एक महत्त्वाचे लेखक होते. लेखनाला त्यांनी उशिरा सुरुवात केली... मात्र त्यानंतर त्यांची लेखणी मृत्यूपर्यंत विसावली नाही. ‘कोंडवाडा’, ‘पाणी कुठवर आलं गं बाई’ (कवितासंग्रह); ‘जागल्या’, ‘विटाळ’ (कथासंग्रह); ‘बलुतं’ (आत्मकथन); ‘पासंग’, ‘चावडी’ (ललित लेखसंग्रह); ‘बलुतं - एक वादळ’ (पत्र संकलन); ‘एकला चलो रे’ (प्रवासवर्णन); ‘धम्मपद’ (अनुवाद); ‘कल्लपा) यशवंत ढाले यांची रोजनिशी’ (संपादन) अशी विपुल साहित्यसंपदा त्यांच्या नावावर आहे. त्यांचे लेखन इतरही अनेक भाषांमध्ये अनुवादित झालेले आहे. म्हणून दया पवारांना ओलांडून ना दलित साहित्याचा इतिहास पूर्ण होतो ना मराठी साहित्याचा! मराठी साहित्याचा झेंडा साता समुद्रापार रोवणारा हा लेखक मराठी भाषेचा आणि मराठी भाषकांचा मानबिंदू आहे.

दया पवारांच्या लेखनाची सुरुवात कवितेने झाली. ‘कोंडवाडा’ आणि ‘पाणी कुठवर आलं गं बाई’ हे त्यांचे दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले. त्यांची कविता तत्कालीन दलित कवितेमध्ये वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरली. तो काळच विद्रोही कवितेचा होता. दलित कविता म्हणजे धगधगते अग्निकुंड असे समीकरण झाले होते... परंतु दया पवारांची कविता विद्रोहदेखील अतिशय सयंतपणे मांडत होती. ही कविता सौम्यपणे, हळुवारपणे आपल्या मनातील भळभळती जखम उघडी करून दाखवत होती, परंतु त्यामागे दयाभाव अजिबात नव्हता. या कवितेतून एका शांत आणि समजूतदार मनाचे दर्शन घडते. कदाचित यामागील प्रेरणा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होती. दारिद्र्य आणि अस्पृश्यता यांच्या चटक्यांनी व्याकूळ झालेले मन त्यांच्या कवितेतून प्रकट होत होते.

“आज विषाद वाटतो कशा वागविल्या मणामणाच्या बेड्या
गाळात हत्ती कळप रुतावा तशा ध्येय आकांक्षा रुतलेल्या
शिळेखाली हात होता तरी फोडला नाही हंबरडा
किती जन्मांची कैद? कुणी निर्मिला कोंडवाडा?”

दया पवारांच्या कवितेत अंतर्मुख करणारी वेदना आढळते आणि वाचकांच्या काळजाला कायम एक बारीक काच लावून जाते. ‘पाणी कुठंवर आलं गं बाई” या कवितासंग्रहातल्या कविता लोकगीतांचा बाज घेऊन प्रकट झालेल्या आहेत. दलित कष्टकरी स्त्रियांच्या दुःखाचा आर्त स्वर या कवितांमधून उमटलेला आहे. ‘बाई मी धरण बांधिते’ ही फार लोकप्रिय कविता आहे. ही कविता माहीत नसणारा एकही माणूस महाराष्ट्रात सापडणार नाही.

दया पवारांना खरी ओळख दिली ती ‘बलुतं’ या आत्मकथनाने. 1978मध्ये हे आत्मकथन प्रसिद्ध झाले आणि मराठी साहित्यात एक मोठे वादळ निर्माण झाले. ‘बलुतं’ हा शब्द दलित समाजात महारकीच्या कामाचा मोबदला म्हणून ओळखला जातो. परंतु दया पवारांनी आपल्या आत्मकथनातून या शीर्षकाला अनेकार्थता प्राप्त करून दिली आहे. हे बलुतं केवळ एकट्या दगडू मारुती पवारांचं राहिलं नाही, तर ती अखिल शोषित-पीडित समूहाची अभिव्यक्ती झाली. दलित समाजात असणारे दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा, परस्परांविषयीचे प्रेम, माया, द्वेष, मत्सर यांचे अतिशय बारकाईने चित्रण केले आहे. परंतु यांतली दुःखाची आणि करुणेची धार अधिक धारदार आहे... म्हणून पु. ल. देशपांडेंनी या आत्मकथनाला ‘एक दुःखाने गदगदलेले झाड’ असे म्हटले आहे. हे आत्मकथन अत्यंत आखीवरेखीव आहे. त्यातील घटना आणि प्रसंग यांमध्ये एकसंधता आहे, भाषा ओघवती आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे अधिष्ठान असल्यामुळे ते लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचू शकले. दया पवार यांना आयुष्यात आलेले अनुभव, त्याला चिंतनाची असणारी जोड, अत्यंत वैयक्तिक स्वरूपाच्या दुःखानुभवाचे चित्रण करणारी दृष्टी, तरल आणि निर्मळ वृत्ती आणि आत्मनिष्ठ अभिव्यक्ती यांमुळे ‘बलुतं’ हे आत्मकथन मराठी साहित्यात अजरामर झाले आहे.

‘जागल्या’ आणि ‘विटाळ’ हे त्यांचे दोन कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कथा जीवनानुभवाच्या खोल डोहातून उसळी मारून वर आलेल्या असल्याने त्यात अस्सलता आहे. त्यात अखिल मानवमुक्तीचा उद्घोष आहे त्यामुळे या कथा विशिष्ट संकल्पनेपुरत्या मर्यादित न राहता त्या संपूर्ण मानवतेचे गाऱ्हाणे होतात. जागल्यातल्या कथा ग्राम बोलीत साकारलेल्या आहेत. यातल्या कथा म्हणजे दलितांच्या सामाजिक आणि राजकीय चळवळीवरचे प्रखर भाष्य आहे. यात त्यांनी  आत्मशोधाचा आणि आत्मटीकेचा मार्ग अनुसरला आहे. त्यामुळे त्यांना टीकेचे धनीही व्हावे लागले. परंतु त्याकडे अजिबात लक्ष न देता त्यांनी लेखन चालूच ठेवले. ‘विटाळ’मध्ये दलित जाणिवेसोबतच दलितेतर समाजातल्या जाणिवाही आढळून येतात. त्यांच्या काही कथा या व्यक्तिचित्रणात्मक स्वरूपाच्याही आहेत. 

‘पासंग’ हा त्यांचा ललितलेखांचा संग्रह आहे. दलित राजकारण त्यांना पासंगासारखे वाटते. पासंग म्हणजे तराजूला समतोल ठेवण्यासाठी दांड्याला बांधलेले वजन होय. या पासंगासारखे दलितांनी समांतर राहावे अशी त्यांची अपेक्षा होती. त्या अपेक्षेनेच त्यांनी ललितलेखन केले आहे. यात जातिधर्मनिरपेक्ष अशा अनेक घटना आणि व्यक्तिरेखा आलेल्या आहेत. त्यातून त्यांनी केवळ दलितांचे अथवा केवळ दलित चळवळीचेच उदात्तीकरण केलेले नसून जे-जे उदात्त आहे, मानुषी आहे त्याचे उदात्तीकरण केलेले आहे. उलट दलितांच्या स्वार्थी आणि संकुचित व्यवहारावर कठोर आघात केले आहेत. ‘मागोवा’ या साप्ताहिकातून त्यांनी 1979 ते 1980दरम्यान दलित साहित्य चळवळीविषयी डोळसपणे जे लेखन केले होते ते ‘चावडी’ या पुस्तकात संकलित केलेले आहे. यातून त्यांनी सामाजिक चळवळीतील व्यंगावर, विसंगतीवर बोट ठेवले आहे. 

त्यांच्या 'बलुतं' या आत्मकथनावर अनेकांनी आक्षेप नोंदवले. काहींना ते खोटे वाटले. त्यांच्या प्रश्नांना लेखकांनी पत्राद्वारे उत्तरे दिली, त्याचे पुस्तक ‘बलुतं - एक वादळ’ या नावाने प्रसिद्ध आहे. त्यात बऱ्यावाईट अशा सगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियांचा समावेश आहे. ‘एकाला चलो रे’ हे त्यांचे आगळेवेगळे प्रवासवर्णन प्रसिद्ध आहे. हे प्रवासवर्णन मराठीतल्या इतर प्रवासवर्णनापेक्षा अनेक अर्थांनी वेगळे आहे. प्रवासातील त्यांची असुरक्षिततेची भावना, भिन्न भाषक प्रदेशातील भाषिक अडचण, प्रवासात भेटलेली चांगलीवाईट माणसे यांचे मनस्वी दर्शन त्यांनी घडवले आहे. त्या-त्या प्रदेशातील सामाजिक-सांस्कृतिक जीवनाचा, तेथील वास्तवाचा, दलितत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. 

दया पवारांनी कधीही जातीय अहंभाव जपला नाही. प्रसंगी स्वजातीयांची कठोर चिकित्सा केली. त्यामुळे अनेक जवळची माणसे त्यांच्यापासून दुरावली गेली. अनेक हितशत्रू निर्माण झाले. एकीकडे व्यवस्थेकडून अवहेलना सहन करावी लागत होती. तर दुसरीकडे स्वजातीयांकडूनही अवहेलना वाट्याला येत होती. त्यामुळे ते प्रचंड नैराश्यात ओढले गेले. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी पाली भाषेतील ‘धम्मपद’चे वाचन सुरू केले आणि त्याचा मराठी अनुवादही केला. मनाचे संतुलन राखण्यासाठी या धम्मपदाचा मोठा उपयोग त्यांना झाला. 1911मध्ये एलएलबी झालेल्या दलित समाजातील कल्लपा यशवंत ढाले यांची मोडी लिपीतील रोजनिशी दया पवार यांच्या हाती लागली. त्यात 1911 ते 1919पर्यंतच्या नोंदी आढळतात. ते दया पवारांनी मराठीत अनुवाद करून प्रकाशित केले. दलित आत्मकथनात हे पहिले आत्मकथन मानण्यास हरकत नाही असे स्वतः दया पवार  यांनी म्हटले आहे.

दया पवार हे केवळ दलित साहित्यातील नाही तर मराठीतील आणि एकूणच भारतीय साहित्यातील अढळ असे नाव आहे. त्यांच्याकडे अनुभवाचे एवढे मोठे संचित होते की, त्यांना भाषिक कलाकुसरीची गरज अजिबात पडली नाही. जे आहे, जसे आहे तसे त्यांनी ते मांडले. त्यासाठी भाषेची मोडतोड करण्याचीही गरज त्यांना पडली नाही. सोपेपणा, सहजता हे त्यांच्या लेखनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य. आरपार पारदर्शकतेमुळे आणि अनुभवाच्या सच्चेपणामुळे अत्यंत खासगी गोष्टीदेखील त्यांच्या लेखनाचा विषय झालेल्या आहेत. त्यामुळे त्यांना स्वकीयांच्या रोषालाही सामोरे जावे लागले... परंतु लेखक म्हणून ते आपल्या भूमिकेशी ठाम राहिले. असा लेखक शतकातून एकदाच जन्माला येतो. त्यांचे ऋण मराठीवर आणि मराठी माणसावर कायम राहतील.

त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!

- डॉ. सुदाम राठोड, नाशिक.
sud.rath@gmail.com

(लेखक युवा साहित्यिक असून 'आपल्यात कुणीही युद्धखोर नव्हते!' हा त्यांचा कवितासंग्रह विशेष महत्त्वाचा आहे. सध्या ते सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.)
 

Tags: साहित्य दया पवार सुदाम राठोड दलित साहित्य बलुतं व्यक्तिवेध Marathi Literature Dalit Literature Daya Pawar Sudam Rathod Death Anniversary Biography Load More Tags

Comments:

Hiraj janardan

अतिसुंदर. नेमकी व नेटकी मांडणी. एक उल्लेख दुरुस्त करता येईल का? शालेय शिक्षण त्यावेळी दहावीऐवजी अकरावीपर्यंत होते.

संजीवनी मानेगावकर

दया पवारांबद्दल विस्तृत लेखन सोप्या भाषेत करणं सोपं नाहीये.ते तुम्ही करून दाखवलंय. *अभिनंदन* !

Add Comment