डॉ. प्रगती पाटील लिखित 'त्रिकोणी साहस' या पुस्तकाचे प्रकाशन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख अतिथी अभिनेत्री गौरी देशपांडे यांच्या हस्ते, 25 ऑगस्ट 2024 रोजी, पुणे येथील साधना साप्ताहिकाच्या कार्यालयात झाले. या पुस्तकाला 2024 मधील सर्वोत्कृष्ट बाल साहित्य निर्मितीसाठीचा 'लोकमत साहित्य पुरस्कार' नुकताच जाहीर झाला. त्यानिमित्त या पुस्तकाचा एक कुमारवयाचा वाचक शर्व गाडगीळ याने लिहिलेला हा पुस्तक परिचय प्रसिद्ध करत आहोत.
‘त्रिकोणी साहस’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला साधना प्रकाशनाच्या सभागृहात मी उपस्थित होतो. हे पुस्तक लिहिण्याची कल्पना लेखिका डॉ. प्रगती पाटील यांना कशी सुचली, आणि ती तडीस नेताना त्यांनी काय विचार केला हे ऐकून मी खूप प्रभावित झालो. त्यांच्या मुलांना आवडणाऱ्या परदेशी लेखकांच्या तोडीचं, त्यांच्या मुलांना आवडेल आणि उगाच गोड गोड परिकथा नसतील अशी गोष्ट प्रभावीपणे सांगणारं पुस्तक आपणही लिहायला पाहिजे या जिद्दीने त्यांनी हे पुस्तक लिहायला घेतलं. त्या व्यवसायाने सैन्यातल्या डॉक्टर आहेत, त्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या आहेत, वेगवेगळ्या चळवळींशी जोडलेल्या आहेत, आणि त्यांचं वाचन अफाट आहे.
'माझे अनुभव, वैचारिक भूमिका, संवेदनशीलता हे पुस्तक लिहिताना कामी आली आहे, 10-16 वयातल्या मुलांना वाचायला आवडेल असं पुस्तक मी लिहिलं आहे', असं त्यांनी समारंभात सांगितलं. त्यामुळे माझं कुतूहल वाढलं. पुस्तकाचं नावच कोड्यात पाडणारं आहे. पुस्तक वाचता वाचता हे नावाचं कोडं तर सुटलंच, पण इतर अनेक ‘out of this world’ अशी पण काही कोडी सुटली. पुस्तकाचं मुखपृष्ठ हे पुस्तकातल्या पहिल्याच प्रसंगावर आधारित आहे. फुग्यांच्या साह्याने उडत असलेल्या खुर्चीवर बसलेला साहस समुद्रात वेगाने पडतो आहे असं चित्र आहे. त्या प्रसंगापासूनच वाचणारी मुलं साहसच्या प्रवासात ओढली जातात, त्यामुळे गिरीश सहस्रबुद्धे यांनी केलेलं, पुस्तकात ओढून घेणारं मुखपृष्ठ पण मला छान वाटलं.
या पुस्तकाचा 12 वर्षांचा नायक साहस श्वेतम हा पृथ्वीपासून खूप प्रकाशवर्षं दूर असलेल्या श्वेतालिया नावाच्या ग्रहावर राहतो. त्या ग्रहाला चार सूर्य (रवी) असतात. श्वेतरवी सकाळी उगवतो, नीलरवी दुपारी उगवतो, ज्वालरवी संध्याकाळी उगवतो आणि कालरवी रात्री उगवतो. हे चारही रवी प्रत्येकी सहा सहा सहा तास आकाशात दिसतात. प्रत्येक रवीचे वेगवेगळे उपासकही असतात. श्वेतरवीचे उपासक श्वेत, नीलरवीचे नीर, ज्वालरवीचे ज्वाल, आणि कालरवीचे मरुत अशी त्या समूहांची नावं आहेत. त्या समूहांच्यात चढाओढी आणि संघर्ष आहेत. चौघांची वेगवेगळी राहायची ठिकाणं सांगितलेली आहेत.
त्यांच्या राहायच्या ठिकाणानुसार आणि त्यांच्या सूर्याच्या रंगानुसार त्यांचे खायचे वेगवेगळे पदार्थ, त्यांचे कपडे त्यांचे सण, त्यांची संस्कृती हे खूप लॉजिकली आणि संदर्भासह मांडलेलं आहे. त्यांच्या भाषा, भाषेतल्या गमती जमती यांचा सुद्धा खूप तपशीलवार विचार केलेला आहे. या चार समूहांची वर्णनं पहिली तर पृथ्वीवरच्या वेगवेगळ्या देशांत, वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांत, वेगवेगळ्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीत राहणाऱ्या, आणि एकमेकांशी विशेष चांगले संबंध नसलेल्या समूहांची आठवण येते. श्रीमंत, गरीब, शहरी, ग्रामीण, आदिवासी असे फरक अप्रत्यक्षपणे अंदाजाने जाणवतात.
साहसला त्याच्या वाढदिवसाला एक रहस्यमय संदेश मिळतो आणि त्या संदेशाचा पाठपुरावा करत करत तो एका exciting adventure मध्ये ओढला जातो. या adventure मध्ये त्याची सगळी बुद्धिमत्ता आणि धाडस पणाला लागतं. त्यात त्याला त्याची मैत्रीण हॅना, आणि विहंगा - व्होल्गा हे दोन मित्र मदत करतात. आणि त्या प्रवासात अजूनही काही भारी भारी त्याला मित्र मिळतात. श्वेतालियावरील चारी समूहांतील लोकांचे एकमेकांविषयीचे कलुषित दृष्टिकोन बदलण्यासाठी आणि सलोख्यासाठी साहस आणि मंडळी (म्हणजेच टीम शॉक) प्रयत्न करतात. त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या आणि पूर्वीपासून समन्वयाचे प्रयत्न करत असलेल्या लोकांची (टीम नेक) साथ त्याला मिळते. या प्रयत्नात त्यांच्यापुढे कोणीतरी मुद्दाम निर्माण केलेले अडथळे येतात, बरीच आव्हानं येतात आणि ती सर्वजण एकत्रितपणे कशी पार करतात; गणित, भाषा, विज्ञान, इतिहास, भूगोल, लॉजिक, यांतल्या आपापल्या हुशारीच्या बळावर सगळे एकमेकांना कशी साथ देतात, त्यांचं धाडस आणि बुद्धी कशी पणाला लागते, हा या कादंबरीचा गाभा आहे. साहसच्या या प्रवासात तीन हा आकडा आणि त्रिकोण हा आकार याचं खूप महत्व आहे, आणि त्यावरूनच त्रिकोणी साहस हे पुस्तकाचं नावही अगदी समर्पक ठरलं आहे.
श्वेतालियाचा ग्रहावरचा भेदभाव नष्ट करणं हे या मुलांचं उद्दिष्ट आहे. त्यानिमित्ताने माणसामाणसांमधला भेदभाव हा कसा चुकीचा आहे किंवा प्रेमाने राहणं हेच कसं गरजेचं आहे अशा पद्धतीचा संदेश लेखिकेला द्यायचा आहे. पण तो संदेश उपदेश करून न देता रंजक कथेच्या माध्यमातून त्यांनी दिला आहे.
लेखिकेने वेगवेगळ्या व्यक्तिरेखा खूप मनापासून रंगवलेल्या आहेत. त्या त्या व्यक्तीचे गुणदोष रंगावताना खूप छोट्या छोट्या गोष्टींचा विचार त्यांनी केलेला आहे. हॅना, साहस, साहसची आई या व्यक्तिरेखा खूप छान आहेत. साहसची आई एक शूर सैनिक आहे, बुद्धीने जीनियस आहे, ती तिच्या वेळची अजिंक्य वनातली टॉपर आहे, तिचे विचार परिवर्तनवादी आहेत. ही व्यक्तिरेखा खुद्द लेखिकेसारखीच रंगवली आहे, असं मला वाटलं. प्रिशा आणि निर्मिक ही अत्यंत रहस्यमय आणि वरवर स्वतःशीच विसंगत वाटणारी दोन पात्रं आहेत. त्यांचा थांगपत्ताच लागत नाही. नीर समूहातला, अत्यंत हुशार असलेला आणि साहसला प्रोत्साहन देणारा, वेगवेगळ्या टप्प्यांवर मुलांना मदत करणारा, श्वेतालियातील ‘अजिंक्य वन’ या विद्यापीठात शिकवणारा प्राध्यापक अश्वथ नीरम ही व्यक्तिरेखा मला सर्वांत आवडली. शिक्षक असे हवेत!
भाषिक खेळ, गणिती कोडी किंवा त्रिकोणावर आधारित आकृत्या पुस्तकामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांची मांडणी चपखल आहे, साहससोबत आपणही त्यांची उत्तरं नकळतपणे शोधायला लागतो. त्रिकोणा शी संबंधित ‘वर्किंग फॉर्म्स’ पुस्तकामध्ये दिसतात, ते कसे हे वाचूनच समजून घ्यायला हवं. साहसकडे एक स्पायरॅङ्गल नावाचं हत्यार आहे, ते एकाच वेळी त्रिकोणी आणि नागमोडी आहे, आव्हानं पार करत असताना त्रिकोणाच्या वेगवेगळ्या जटिल कृती असतात. त्या पूर्ण करण्यासाठी, स्वतःची सुटका करून घेण्यासाठी, गुप्त त्रिकोणी portals (ऱ्हस्वर्ग) निर्माण करण्यासाठी वगैरे स्पायरॅङ्गलचा उपयोग होतो. ते थरारक प्रसंग खूप मस्त रंगवले आहेत.
फास्टर फेणे, प्रेषितसारख्या विज्ञानकथा, साने गुरुजींचं धडपडणारी मुले, अशी काही खास कुमारांसाठी असलेली पुस्तकं मी वाचली आहेत. शाळेच्या पुस्तकांतून वेगवेगळ्या कथा-कादंबऱ्या, आणि कुमारवयातील नायक यांची तोंडओळख मला झाली आहे. हे पुस्तक वाचताना त्यांतले काही संदर्भ मला आठवले. आणि त्याचसोबत साय-फाय (SCIence-FIction) आणि फॅंटसी अशा प्रकारच्या जपानी कॉमिक बुक (मांगा) मध्ये वाचलेल्या आणि हॉलीवूड आणि जपानमधल्या अॅनिमेशन चित्रपटांत पाहिलेल्या कथांमधलेही काही संदर्भ आठवले. म्हणजे ती कॉपी नाहीये, पण त्यातली मुलांची नैसर्गिक भाबडी भावना, त्यांची मोठी ध्येयं, धाडस, गुंतागुंतीच्या व्यक्तिरेखा, exciting घटना, जादूसदृश नैसर्गिक / वैज्ञानिक संकल्पना, रहस्यं, वाचकांना नीट झेपेल अशा पद्धतीने गुंतागुंतीचे तपशील मांडण्याची शैली वगैरे गोष्टींत सारखेपणा वाटला.
हेही पाहा - 'त्रिकोणी साहस' या पुस्तकाच्या लेखिका डॉ. प्रगती पाटील यांचे प्रकाशन समारंभातील मनोगत
पुस्तकाची भाषा आपल्या नेहमीच्या वापरातल्या मराठी आणि इंग्रजीपेक्षा थोडी जड-पुस्तकी करून वापरली आहे. परग्रहावरची भाषा आपल्यापेक्षा वेगळी वाटावी म्हणून कदाचित जाणीवपूर्वक असं केलेलं असू शकेल. सगळीच कॅरेक्टर्स अतिशय हुशार आहेत आणि ती एकमेकांशी बोलताना साधं बोलत नाहीत. म्हणजे इंग्लिश शब्दांना मराठी प्रतिशब्द तयार करणं, संयुक्त शब्द तयार करणं किंवा वेगवेगळे भाषिक खेळ करणं, दुसऱ्याच्या बोलण्यात झालेले भाषिक खेळ ओळखून त्याच्यावरती काहीतरी कमेंट करणं असं त्यांचं नॉर्मल बोलणं आहे. भाषिक दृष्ट्या खूप ‘इंटलेक्चुअल’ संवाद आहेत त्यांचे. पण कधी कधी जेव्हा जीवन मरणाच्या प्रसंगातही जेव्हा ‘अरे हा तर oxymoron झाला’ किंवा तत्सम काहीतरी ते बोलतात, ते खूप कृत्रिम वाटतं. अर्थात ते ‘त्यांचं नॉर्मल’ असल्यामुळे त्यांना असं बोलणं अडचणीच्या वेळीही सुचू शकतं असं समजायलाही वाव आहे. मात्र काही ठिकाणी गरज नसताना अवास्तव भाषिक खेळ आणि अवघड शब्दांचा वापर केला आहे, असं मला वाटलं.
काही काही वाक्यरचनांचा वापर सारखा सारखा केला आहे, उदाहरणार्थ ‘इतका तीव्र प्रकाश निर्माण झाला की त्याच्यामुळे त्यांचे डोळे दिपले’ किंवा दोन मित्र एकमेकांशी बोलताना ‘कसं वाटलं हे?’ – ‘अप्रतिम! (किंवा उत्तम)’ – ‘थॅंक्स!’ असं सारखं म्हणतात. ‘मला तू एवढा आवडलेला आहेस’, ‘मला तुझं इतकं हे पटलेलं आहे’, ‘तुझं हे ऋण आहे’ अशी वाक्यं अनेकदा बोलतात. प्रत्यक्षात सारखं सारखं असं बोलायची, ठरवून कॉम्प्लिमेंट देण्याची गरज नसते, कधी नुसतं हसून बघणं, एखादा शेक हँड, थम्ब्स अप, हातवारा, पाठीवर थाप किंवा तत्सम गोष्टींतून कौतुक अधिक नैसर्गिकपणे दाखवता आलं असतं. दरच वेळी त्याचं संवादात रूपांतर करायची गरज नसते. कधी कधी सात आठ वर्षांचा मुलगा आणि 18-19 वर्षांचा तरुण यांची बोलण्याची पद्धत सारखीच वाटते किंवा 13 वर्षांची दोन मुलं एकमेकांशी बोलताना ‘आपण लहान निरागस बालके आहोत, आपली मने स्वच्छ आहेत, आपण शुद्ध विचारांचे आहोत’ असं बोलतात, अशा काही ठिकाणी ही भाषा कृत्रिम आणि आपल्या मानाने विनोदी वाटते. पण आधी म्हटलं तसं ही ‘परग्रहावरची माणसं आणि त्यांची भाषा आहे.’ त्यामुळे हे वेगळेपण लेखिकेने ठरवून आणलेलं असावं, आणि त्या पद्धतीने त्याचा विचार वाचताना आपण करावा.
एकूणात काय, तर आता शाळांची उन्हाळी सुट्टी सुरू होते आहे, त्या सुट्टीत नक्की वाचायला हवं असं हे पुस्तक आहे. त्रिकोणी साहस ही अत्यंत रंजक आणि उत्कंठावर्धक गोष्ट आहे, ज्या वयोगटातल्या मुलांना यातल्या भाषिक आणि गणिती संकल्पना माहीत झालेल्या आहेत, अशा म्हणजे साधारण 12-13 वर्षांपासून पुढच्या मुलांना हे पुस्तक वाचून गोष्ट आणि कोडी यांचा नीट आनंद घेता येईल. मोठ्या माणसांनाही ते नक्की आवडेल असं मला वाटतं.
आणि जाता जाता एक महत्त्वाची गोष्ट - पुस्तकाचा शेवट एकदम उत्कंठावर्धक आहे. त्या वेळी घडणाऱ्या घटना खूप वेगात घडतात, परिस्थिती वेगाने बिघडत जाते, पण त्यावरचा उपाय नेमकेपणाने सापडत नाही. आधीचेही काही काही प्रसंग ‘आता पुढे काय घडणार?’ अशी उत्कंठा वाटत असताना संपतात, काही काही पात्रांच्या बाबतीत ‘हे असं का वागतात?’ हे कळत नाही, पण ती त्रुटी नाही तर या पुस्तकाच्या पुढच्या भागासाठी केलेली पेरणी आहे, त्यामुळे पुढच्या भागाची आता मी वाट पाहतो आहे.
त्रिकोणी साहस
लेखक – डॉ. प्रगती पाटील
प्रकाशक – साधना प्रकाशन
पृष्ठसंख्या – 622
किंमत – रु. 600/-
- शर्व गाडगीळ
मोबाईल - +91 9175517505
ईमेल - sharvagadgil2009@gmail.com
(लेखक शालेय विद्यार्थी आहे.)
Add Comment