एकविसाव्या शतकातल्या तरुण मुस्लीम स्त्रीचा प्रवास नाटक अतिशय सहजपणे दाखवते. काळानुसार बदलत गेलेल्या जगात शिक्षण, करिअर, मैत्री, प्रेम, स्वतःचे निर्णय स्वतः घेणं याबद्दल तिची स्वप्नं आणि आकांक्षा बदलत गेल्या आहेत. समाज मात्र फारसा बदलतच नाही. महाराष्ट्रातल्या आधुनिक मुस्लीम स्त्रीचं हे वास्तव विशेष महत्त्वाचं आहे. ती जात, वर्ग, धर्म आणि लिंग या सगळ्यांच्या छेदनबिंदूवर उभी असते. तिच्या मनावर समुदायाच्या अपेक्षा आणि समुदायाबाहेरच्या समाजाचे पूर्वग्रह यांचं दुप्पट ओझं आहे. आजूबाजूला वाढत चाललेल्या धर्माच्या राजकारणामुळे, धर्मांध वातावरणामुळे आणि पुरुषी वर्चस्वामुळे रोजच्या जगण्यात ती प्रचंड मानसिक ताणाखाली वावरते आहे. स्वतःचा आवाज शोधते आहे.
काही लोकांचा आवाज ऐकू येत नाही. ती माणसं हळू बोलतात म्हणून नव्हे; तर तो आवाज ऐकायला समाजाचे कान तयारच नसतात, म्हणून! ‘ए बिस्मिल्ला’ हा अशाच एका आवाजाचा रंगमंचीय शोध आहे. हा दीर्घांक हिनाकौसर खान यांच्या संवेदनशील लेखणीतून आणि रसिका आगाशे यांच्या प्रभावी दिग्दर्शन-अभिनयातून रंगमंचावर साकार झालेला आहे.
हिनाकौसर खान या आधुनिक मराठी साहित्यविश्वातल्या एक विशेष लक्षणीय लेखिका आहेत. त्या कथाकार, कादंबरीकार आणि अभ्यासक आहेत. ‘तीन तलाक विरुद्ध पाच महिला’, ‘धर्मरेषा ओलांडताना’, ‘इत्रनामा’, ‘इज्तिहाद’, ‘स्टिअरींग’ आणि ‘फोटोग्राफ’ यांसारख्या पुस्तकांतून त्यांनी समाजाचा वेगळा पैलू समोर आणला आहे. ‘साथी’, ‘सोपेकॉम’ आणि ‘मासूम’ यांसारख्या सामाजिक संस्थांमधून त्यांनी केलेल्या प्रत्यक्ष कामाचं प्रतिबिंब त्यांच्या लेखनात दिसतं. महाराष्ट्रातली मुस्लीम ‘माणसं’ आणि विशेषतः स्त्रिया यांच्या एकविसाव्या शतकातल्या वास्तवाचे संदर्भ त्यांनी साहित्यात आणले आहेत.
‘ए बिस्मिल्ला’ मध्ये हा संदर्भ आपल्याला सापडतो तो बिस्मिल्ला नावाच्या शहरातल्या मुस्लीम वस्तीत राहणाऱ्या आणि आर्थिकदृष्ट्या मध्यमवर्गीय असलेल्या एका स्त्रीच्या रूपात. बिस्मिल्ला तिची स्वतःची गोष्ट आपल्याला सांगते. तिच्या आणि तिच्या गोष्टीतल्या इतर सगळ्या जणींच्या निमित्ताने एक अस्वस्थ करणारा सल प्रेक्षकांच्या मनात राहतो.
नाटकाच्या प्रवासात भीतीचे अनेक पदर दृष्टीस पडतात. कधी ती भीती अगदी टोकाची आहे धर्माच्या नावावर झालेली दंगल, पिसाळलेल्या जमावाकडून निर्घृणपणे मारहाण आणि हत्या, सामूहिक हिंसा, कत्तली यांसारख्या प्रसंगांची. कधी आसपास पडलेली ‘लव्ह जिहाद’च्या भीतीची सावली मोठी होते, कधी धर्मावरून विनाकारण टोमणेबाजी सहन करावी लागते. डॉक्टर होण्याची तिची वैयक्तिक महत्त्वाकांक्षा केवळ मुस्लीम असल्यामुळे पूर्ण होऊ शकत नाही. बिस्मिल्ला आणखी-आणखी घाबरतच जाते.
मुस्लीम नसलेल्या आणि असलेल्याही पुरुषी व्यवस्थेचीही तिला भीती आहे. कोणाशी बोलावं, कुठे जावं, केव्हा जावं, हिंदू पुरुषाशी बोलावं की न बोलावं, मित्राच्या गाडीवर बसावं की न बसावं, बुरखा घालावा की न घालावा, कशाचे नेमके काय परिणाम होतील, एक ना अनेक - असंख्य प्रकारची भीती. आपण केलेली बिर्याणी नवऱ्याच्या मित्रांना आवडेल का, बाजारात गर्दी असेल का, यासारख्या वरकरणी किरकोळ दिसणाऱ्या कारणांनी ती घाबरते. शाळेत मुलाच्या डब्यातली पनीर भुर्जी अंड्याच्या भुर्जीसारखी दिसते म्हणून त्याला शिक्षा होईल का याची भीती आईला वाटणं हे पाहून तर मनाचा थरकाप होतो. या भीतीच्या छायेतच बिस्मिल्लाचं व्यक्तिमत्त्व घडतं. या सगळ्याचा परिणाम तिच्या मनावर होतो. तिला गर्दीची भीती वाटायला लागते. तिचा आत्मविश्वास कमी होतो. तीसुद्धा तिच्या आजीसारखी, आईसारखी स्वतःशी बोलायला लागते.
या बाईची बोलण्याची गरज आणि तिने बोललेलं कोणीतरी ऐकण्याची गरज हा या नाटकातला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा. नाटकातल्या मागच्या पिढ्यांतल्या स्त्रिया सतत स्वतःशीच बोलत राहतात, त्यांचं कुणी ऐकत नाही. त्या मोठ्याने ओरडल्या तरी कुणी लक्ष देत नाही. त्यांना “आपलं ऐकलं जाईल” अशी खात्री वाटावी, हक्क वाटावा अशी जागाच नाही. त्यांनी स्वतःचा आवाजही खऱ्या अर्थाने ऐकलेला नाही आणि एकमेकींसाठीही त्यांचा कान उघडा नाही. “आपल्याला आवाज आहे आणि तो ऐकला गेला पाहिजे” ही जाणीव तरी त्यातल्या किती जणींना होती याचाही शोधच घ्यावा लागेल. घरातल्या किंवा नात्यातल्या किंवा समाजातल्या पुरुषांशी संवादाची शक्यता तर आणखीनच दूरची. त्यामुळे नुसतं बोलत जाणं हीच त्यांची जगण्याची पद्धत होती. त्यांच्या त्या अंतहीन स्वगतांमधला एकाकीपणा, दडपण, चिडचिड, तर नाटकातून अधोरेखित होतेच पण अति झालं नि हसू आलं पद्धतीचा किंवा कुढत न बसता स्वतःच्या आयुष्याचीच गंमत करून घेण्याच्या वृत्तीतून जन्माला आलेला विनोदही दिसतो.
नाटकाचा प्रयोग सुरू होताना एका मुलीची असलेली ही गोष्ट प्रयोग संपतो तेव्हा unheard असलेल्या प्रत्येकाची होते. धर्म, लिंग, कुटुंब, समाज आणि पूर्वग्रह यांच्या पसाऱ्यामध्ये हरवून गेलेल्या व्यक्तीला स्वतःचा आवाज शोधावासा वाटण्याची शक्यता सापडते. नाटक प्रेक्षकाला एक poignant प्रश्न विचारतं - आपण किमान आपल्या आजूबाजूच्या लोकांचा तरी आवाज ऐकतो का?
हे नाटक प्रथम रंगमंचावर आलं तेव्हा मानसरंग नाट्य प्रक्रियेचा भाग होतं. अतुल पेठे, राजीव नाईक आणि डॉ. हमीद दाभोलकर यांच्या पुढाकाराने ही प्रक्रिया चालू झाली. मनोव्यापार हा नाटकाचा केंद्रबिंदू असतो. मनाच्या खेळांचे नाट्यमय जिवंत खेळ रंगमंचावर घडत असतात. ‘मानसरंग नाट्य’ ही प्रक्रिया याच खेळांना थोडं वेगळं वळण देणारी होती. मानसिक आजारांची कारणं, लक्षणं आणि उपाय केंद्रस्थानी ठेवून त्याचप्रमाणे विशिष्ट आजारात जखडलेल्या किंवा त्यातून मुक्त झालेल्या व्यक्तींची उदाहरणं लक्षात घेऊन लिहिलेली आणि सादर केलेली ही नाटकं होती. लेखक, दिग्दर्शक, अभिनेते सर्वांनीच आपल्या अभिव्यक्तीत या गोष्टीचं भान राखून काम केलं होतं. त्यामुळे या कथेत अनपेक्षितपणे बिस्मिल्ला थेरपीसुद्धा घेते. भीती कमी करण्याचा, आत्मविश्वासाने वावरण्याचा प्रयत्न करते. महत्त्वाचं म्हणजे त्यामुळे तिला आता जाणीव झालेली आहे की, आपल्याला आवाज आहे, तो ऐकला गेला पाहिजे आणि तो ऐकला जाईलच अशी किमान एक तरी सुरक्षित आणि हक्काची जागा पाहिजे.
एकविसाव्या शतकातल्या तरुण मुस्लीम स्त्रीचा प्रवास नाटक अतिशय सहजपणे दाखवते. काळानुसार बदलत गेलेल्या जगात शिक्षण, करिअर, मैत्री, प्रेम, स्वतःचे निर्णय स्वतः घेणं याबद्दल तिची स्वप्नं आणि आकांक्षा बदलत गेल्या आहेत. समाज मात्र फारसा बदलतच नाही. महाराष्ट्रातल्या आधुनिक मुस्लीम स्त्रीचं हे वास्तव विशेष महत्त्वाचं आहे. ती जात, वर्ग, धर्म आणि लिंग या सगळ्यांच्या छेदनबिंदूवर उभी असते. तिच्या मनावर समुदायाच्या अपेक्षा आणि समुदायाबाहेरच्या समाजाचे पूर्वग्रह यांचं दुप्पट ओझं आहे. आजूबाजूला वाढत चाललेल्या धर्माच्या राजकारणामुळे, धर्मांध वातावरणामुळे आणि पुरुषी वर्चस्वामुळे रोजच्या जगण्यात ती प्रचंड मानसिक ताणाखाली वावरते आहे. स्वतःचा आवाज शोधते आहे.
मुस्लीम समाज आर्थिकदृष्ट्या मागास आणि धार्मिकदृष्ट्या कट्टर आहे हा स्टीरिओटाईप हिनाकौसरनी या गोष्टीत मोडला आहे. आणि हिंदू समाजातून थेटपणे वाट्याला येणाऱ्या दुस्वासाबरोबरच, त्यांच्या वरवर चांगल्या पण पॅसिव्ह अॅग्रेसिव्ह पद्धतीच्या वागण्यामुळे वाटणाऱ्या भीतीकडे लक्ष वेधले आहे. ‘ती मुस्लीम असूनही चांगली आहे’ हा वरकरणी कौतुकाचा वाटणारा उद्गार प्रत्यक्षात प्रचंड अपमानकारक आहे. कारण त्या एका ‘मुस्लीम असूनही’ मध्ये गृहीतच धरलेलं आहे की मुस्लीम असणं आणि चांगलं असणं या दोन परस्परविरोधी गोष्टी आहेत. ही गोष्ट नाटकात स्पष्ट शब्दांत सांगितलेली नसली तरी नाटकातल्या घटना बघून जाणवल्याशिवाय राहत नाही
हिनानी महाराष्ट्रातल्या अनेक मुस्लीम कुटुंबांत नैसर्गिकपणे ऐकू येणाऱ्या कर्णमधुर दखनी भाषेत हे नाटक लिहिलं आहे आणि या एकल सादरीकरणात दिग्दर्शक आणि अभिनेत्री म्हणून रसिकानीही ती लीलया पेलली आहे. रंगमंचावर व्यक्ती एकच असली तरी या नाटकाला रूढार्थाने एकपात्री प्रयोग म्हणणे काहीसे अपुरे ठरेल. एकीच्या माध्यमातून अनेक पिढ्यांमधल्या, अनेक वयोगटांतल्या आणि आर्थिक सामाजिक स्तरांमधल्या अनेक व्यक्तींचे अनुभव बोलके होतात. पात्रांची वेगवेगळी ओळख निर्माण करण्यासाठी वापरलेल्या स्कार्फ, ओढण्या, बुरखा यांसारख्या कमीतकमी साधनांच्या मदतीने अनेक व्यक्तिरेखा आणि प्रसंग उभे करण्याची ही रंगमंचीय कल्पना अतिशय परिणामकारक आहे. त्या संदर्भात रसिका आगाशे यांच्या दिग्दर्शनाबरोबरच त्यांच्या अभिनयाचाही विशेष उल्लेख केला पाहिजे. सामाजिक आणि राजकीय आशय असलेल्या कलाकृतींशी त्यांचा गेल्या दोन दशकभरांचा संबंध आहे. लिंग, जात आणि धार्मिक भेदभावासारखे महत्त्वाचे विषय त्यांनी आपल्या लेखनातून तसेच दिग्दर्शक आणि अभिनेत्री म्हणून नाटकांतून हाताळले आहेत. याही नाटकाची हाताळणी त्यांनी अत्यंत संयतपणे आणि प्रगल्भतेने केली आहे. “पर्सनल इज पॉलिटिकल” असं आपण नेहमी ऐकतो. पण जे पॉलिटिकल आहे, ते पर्सनल कसं होत जातं, हे या नाटकात आपल्याला बघायला मिळतं.
काही नाटकं अशी असतात की त्यांना एक विशिष्ट प्रकारचा प्रेक्षक हमखास मिळतो. ‘ए बिस्मिल्ला’च्या बाबतीत असंच काहीसं म्हणता येईल. नाटक ज्या अनुभवविश्वाबद्दल बोलतं, त्याच्याशी आधीपासून जोडलेले, त्या बाबतीत संवेदनशील असलेले, त्याविषयी आस्था किंवा किमान कुतूहल असलेले लोक नाटकाला चांगला प्रतिसाद देतात. पण त्या परिघाबाहेरच्या प्रेक्षकापर्यंत, म्हणजेच खरं तर जिथे तो मुद्दा पोहोचणं आणि संवेदनशीलता वाढणं अपेक्षित असतं, तिथे ते कदाचित पुरेसं पोहोचलेलं नाही. वास्तवाशी जाणूनबुजून फारकत घेतलेल्या किंवा त्यापासून अनभिज्ञ असलेल्या प्रेक्षकांपर्यंत हे महत्त्वाचं नाटक पोहोचवण्याचा प्रयत्न कलावंतांनी करायला हवा, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे कम्फर्ट झोनच्या बाहेरचं, डिस्टर्ब करणारं हे नाटक प्रेक्षकांनी आवर्जून पाहायला हवं.
नाटकातून समाजातल्या धार्मिक ध्रुवीकरणाचा आणि सहिष्णुतेचा प्रश्न आपल्यापुढे येतो तो अटळ वास्तवाच्या स्वरूपात. तो सोपा करून सोडवण्याचा अट्टहास किंवा तो मांडण्याचा फार मोठा देखावा हे नाटक करत नाही. पण एका निमशहरी वातावरणातल्या मध्यमवर्गीय मुस्लीम स्त्रीचा वैयक्तिक स्वरूपाचा मानसिक प्रश्न मांडताना अपरिहार्यपणे प्रेक्षकांना आपण धार्मिकदृष्ट्या संवेदनशील आणि समंजस आहोत का? याचा विचार करायला हे नाटक भाग पाडतं. आणि म्हणूनच ते ‘मस्ट वॉच’ प्रकारात मोडतं.
- ऋचा मुळे
kartavyasadhana@gmail.com
Tags: साधना डिजिटल ए बिस्मिल्ला रसिका आगाशे हिनाकौसर खान मुस्लीम मुस्लीम समाज मुस्लीम स्त्रिया मानसरंग भीती मनोविकार धर्माचे राजकारण धार्मिक ध्रुवीकरण धर्माच्या नावाखाली भीती मॉब लिंचिंग दंगल communalism fanaticism बुरखा स्त्रीस्वातंत्र्य Load More Tags
Add Comment