स्त्रीच्या दृष्टीतून दिसणारी जगाची प्रतिमा

डॉ. प्रवीण घोडेस्वार लिखित ‘कॅमेऱ्यामागची ती’ या पुस्तकाचा परिचय

गृहिणीच्या भूमिकेला जोडून, किंवा त्या भूमिकेतून बाहेर पडून इतर अनेक भूमिका लीलया पेलणारी स्त्री महाराष्ट्राने किमान शतकभर अनुभवलेली आहे. आणि म्हणूनच कर्तृत्ववान स्त्रीकडे किंवा स्त्रीने मिळवलेल्या यशाकडे स्वतंत्रपणे बघण्याचा दृष्टीकोन, त्यातल्या त्यात महाराष्ट्रातल्या पुरुषांमध्ये, बऱ्यापैकी विकसित होतो आहे असं म्हणायला वाव आहे. डॉ. प्रवीण घोडेस्वार यांच्या आजवरच्या लेखनात हा दृष्टीकोन वारंवार दिसून आला आहे. ते स्त्रियांविषयी आत्मीयतेने आणि त्यांच्या वाटचालीविषयी संवेदनशीलतेने लिहितात. ‘ओळख कर्तृत्ववान महिलांची’, ‘स्त्रीत्वाच्या गाथा’, ‘अर्ध्या दुनियेच्या शिलेदार’, ‘कमला भसीन : स्त्रीवादी तत्त्वचिंतक’, ‘स्त्रीदास्य मुक्तीचा महानायक’, ‘पुष्पा भावे : समकालीन आणि अभिजात’, ‘गुटेनबर्गच्या सावल्या’ यासारख्या अनेक पुस्तकांमधून त्यांनी स्त्रिया, स्त्रीवाद, स्त्रियांचं समाजातलं स्थान, स्त्रियांचं कर्तृत्व या सगळ्या विषयांची आजच्या काळाला अनुरूप अशी ओळख मराठी वाचकांना नव्याने करून दिली आहे. ‘कॅमेऱ्यामागची ती’ हे पुस्तक त्यांच्या त्याच लेखणीचं पुढचं पाऊल आहे.

स्त्रीकडे बघण्याचा जगाचा दृष्टीकोन याविषयी आपण पुष्कळ चर्चा करतो. पण स्त्रीचा जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन ज्यातून दिसतो, त्याविषयी मात्र तुलनेने कमी विचारमंथन होतं. जेव्हा एखादी स्त्री स्वतःच्या नजरेला दिसणारं जग छायाचित्र किंवा व्हिडिओच्या स्वरूपात टिपते, तेव्हा त्यातून जगाकडे बघण्याचा तिचा दृष्टीकोन दिसतो. त्याला गवसणी घालण्याचा प्रयत्न ‘कॅमेऱ्यामागची ती’ या पुस्तकातून घोडेस्वार यांनी केला आहे. इतर अनेक व्यावसायिक क्षेत्रांप्रमाणे फोटोग्राफी हे क्षेत्रही पूर्वापार पुरुषांच्या ताब्यात होतं. त्या क्षेत्रात उत्तम काम करणाऱ्या 40 महिलांच्या कामाचा परिचय त्यांनी या पुस्तकातून वाचकांना करून दिला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या राज्यकर उपआयुक्त आणि उपसंचालक म्हणून कार्यरत असलेल्या आणि स्वतः कवी असलेल्या अंजली ढमाळ यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे. एकविसाव्या शतकाची पंचवीस वर्षं उलटून गेलेली असली तरी आपण अजूनही प्रामुख्याने एखाद्या स्त्रीच्या सोशिकतेविषयी, गोडव्याविषयी, प्रेमळपणाविषयी, तिच्या कष्टाळूपणाविषयी किंवा फार तर तिच्या संघर्षाविषयी बोलतो. मात्र अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितीत एखाद्या स्त्रीने मिळवलेल्या यशाभोवती ‘एक स्त्री असूनही तिने मिळवलेलं यश’ किंवा ‘आजपर्यंत मुख्यतः पुरुष करत आलेल्या एखाद्या कामात एका स्त्रीने मिळवलेलं यश’ अशी काही ना काही चौकट लावण्याची प्रवृत्ती अजूनही दिसते. स्त्रीकडे एक स्वतंत्र, संपूर्ण व्यक्ती म्हणून पाहायला आपण अजूनही शिकलेलो नाही.

स्त्रियांचं समाजातलं स्थान बदलतं आहे. समाजाच्या अनेक स्तरांमध्ये स्त्री आज केवळ गृहिणीच्या रूपात राहिलेली नाही, हे जरी खरं असलं तरी स्त्रीला बरोबरीचं स्थान मिळालं आहे असं मात्र म्हणता येत नाही. आणि या पार्श्वभूमीवर फोटोग्राफीसारखं आव्हानात्मक क्षेत्र करिअर म्हणून निवडणाऱ्या, त्यात आर्थिक आणि सामाजिक पातळीवर यश मिळवणाऱ्या आणि या क्षेत्रात समाजाभिमुख काम करून दाखवणाऱ्या स्त्रियांचं, तसंच लेखक डॉ. प्रवीण घोडेस्वार यांच्या संवेदनशील लेखनाचं कौतुक त्यांनी प्रस्तावनेत केलं आहे.

भारतात स्त्रियांनी फोटोग्राफी करायला सुरुवात केली त्याला शतक लोटलं आहे. ही प्रथा कधी आणि कशी सुरू झाली याचं रोचक वर्णन लेखकाने केलं आहे. त्या काळात बंगालमधल्या श्रीमंत, घरंदाज स्त्रिया आपला चेहरा परपुरुषांना दाखवू शकत नव्हत्या. पण या श्रीमंत कुटुंबांमध्ये ब्रिटिशांच्या प्रभावामुळे स्त्रियांचेही फोटो काढण्याची पद्धत सुरू झाली. ते फोटो काढण्यासाठी पुरुष फोटोग्राफर्स आपल्या पत्नीला फोटो काढायला शिकवत असत. कुटुंबाचे फोटो काढताना ती उपस्थित राहत असे. पुरुष फोटोग्राफर्स जेव्हा कॅमेऱ्याची तयारी करत, तेव्हा या स्त्रिया चेहऱ्यावर पदर ओढून बसत. तयारी झाली की फोटोग्राफर बाहेर जात. त्यांची पत्नी स्त्रियांसमोर येत असे आणि मग त्या स्त्रिया चेहऱ्यावरचा पदर बाजूला घेत. त्यानंतर फोटोग्राफरची पत्नी फोटो क्लिक करत असे.

अशा पद्धतीने आपल्या कुटुंबातल्या पुरुष फोटोग्राफर्सकडून फोटोग्राफी शिकणाऱ्या, त्यांना या व्यवसायात मदत करणाऱ्या पहिल्या ज्ञात फोटोग्राफर स्त्रियांपासून ते आजपर्यंतचा मागोवा घोडेस्वार यांनी आपल्या मनोगतात घेतला आहे. सरोजिनी घोष, होमी व्यारावाला, अन्नपूर्णा दत्त मनमोहिनी, ज्ञाननंदिनी देवी, देवालिना आणि मनोबिना सेन रॉय या भगिनी, अशा अनेक स्त्रियांनी स्त्रियांसाठी छायाचित्रणाची पायवाट हळूहळू कशी रुंद करत नेली, या ऐतिहासिक वाटचालीचा संक्षिप्त आढावा घेऊन ते आपल्याला आजच्या काळातल्या स्त्री फोटोग्राफर्सपर्यंत आणून सोडतात. आणि मग पुढे प्रत्येक लेखातून त्यांच्या कर्तृत्वाचा स्वतंत्रपणे वेध घेतात.

पुस्तकात दोन भाग आहेत. पहिल्या भागामध्ये महाराष्ट्रात सध्या कार्यरत असलेल्या तेवीस फोटोग्राफर्सचा समावेश आहे. या फोटोग्राफर्सना कमी-अधिक प्रमाणात प्रसिद्धीचं वलयही मिळालेलं आहे. फोटोग्राफी हे करिअर म्हणून निवडणाऱ्या महाराष्ट्रातील महिलांचा शोध घेऊन त्यांचं मनोगत, त्यांचा प्रवास, त्यांच्या मार्गातले अडथळे, आव्हानं आणि त्यांची भविष्यातली स्वप्नं यांचा वेध घेण्याचा प्रयत्न घोडेस्वार यांनी केला आहे. संगीता महाजन, विद्या कुलकर्णी, प्रियांका सातपुते, नीलिमा पाका-टाक, प्रणाली आणि चैताली या देवळाणकर भगिनी, साक्षी साळी-पाटील, स्नेहल महाले, ईशा मोहिनी अजित, सीमा जोशी, अमृषा अत्रे, सेजल चौकवाले, प्रतिभा औन्धकर, पद्मावती वेल्हाळ, अनघा जांभूळकर, अनुश्री फडणवीस, आभा चौबळ, शीतल विसपुते, सोनाली जोशी, स्वाती खेकाळे, गायत्री हसबनीस-पिंपळे, अवंती कंसारा-तांबट, प्राजक्ता इखणकर, झोया थॉमस-लोबो यांचा समावेश या पहिल्या भागात आहे.

यात त्यांनी फोटोग्राफीचं कोणतंही क्षेत्र वर्ज्य मानलेलं नाही. जाणीवपूर्वक फोटोग्राफीचं कौशल्य विकसित करून आपला दृष्टीकोन आणि आपल्याला दिसणारं जग दाखवून देणाऱ्या सर्व प्रकारची फोटोग्राफी करणाऱ्या महिला फोटोग्राफर्सची त्यांनी नोंद घेतली आहे. केवळ वार्तांकन म्हणून, दस्तऐवजीकरण म्हणून, कलात्मक अभिव्यक्ती म्हणून किंवा एक सामाजिक योगदान म्हणून कॅमेऱ्याचा वापर करणाऱ्या स्त्रियाच नव्हे, तर छंद म्हणून, आवड म्हणून, व्यवसाय म्हणून फोटोग्राफी करणाऱ्या महिलांचाही यात समावेश आहे. फॅशन फोटोग्राफी, जाहिरातींसाठी व्यक्ती आणि वस्तूंची फोटोग्राफी, वेगवेगळ्या प्रकारच्या इव्हेंट्सची, लग्नकार्यासारख्या समारंभांची फोटोग्राफी, प्री-वेडिंग, प्रेग्नन्सी, बर्थ फोटोग्राफी, लहान मुलांचे कलात्मक फोटो अशा नव्याने उदयाला आलेल्या फोटोग्राफीच्या प्रकारांमध्ये काम करणाऱ्या महिलांचीही दखल त्यांनी घेतली आहे.

दुसऱ्या भागातल्या सतरा फोटोग्राफर्सनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःच्या कॅमेऱ्याचा ठसा उमटवला आहे. त्यातल्या काही महाराष्ट्राबाहेरच्या, तर काही देशाबाहेरच्या आहेत. त्यांनी फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफीचा उपयोग सर्जनशीलता, पत्रकारिता, राजकारण आणि आंदोलन यासारख्या क्षेत्रांमध्ये एक आयुध म्हणून केला आहे. तसंच या क्षेत्रातील पुरुषांची मक्तेदारी मोडून काढून स्त्रियांसाठी हे क्षेत्र अधिक खुलं करण्यामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. या क्षेत्रातली आव्हानं पेलून, त्यांच्यावर मात करून त्यांनी या क्षेत्रात एक स्त्री म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून स्वतःचा प्रभाव निर्माण केला आहे. होमी व्यारावाला, साहिबा वानी, शीतल मल्लार, रिचेल कोशी, ऐश्वर्या श्रीधर, दयानिता सिंह, केतकी सेठ, अवनी राय, पौलोमी बसू, रतिका रामास्वामी, गीतिका तालुकदार, गौरी गिल, आरजू खुराणा, अन्नपूर्णा दत्त, दीप्ती अस्थाना, आरती कुमार-राव आणि इराणमधली छायाचित्र पत्रकार फरो अलाई यांच्या कारकीर्दीवर आणि योगदानावर लेखकाने प्रकाश टाकला आहे.

बाळाचा जन्म होत असतानाचे फोटो / व्हिडिओ काढण्याची पद्धत परदेशात रूढ झाली आहे आणि भारतातही हळूहळू सुरू झाली आहे. प्रसूतीच्या प्रसंगाची फोटोग्राफी करण्यासाठी साहजिकच महिला फोटोग्राफर्सना अधिक पसंती मिळते. किंबहुना, तसा आग्रहच धरला जातो. भारतीय संस्कृतीच्या नैतिक आचारसंहितेचा विचार करता, भारतात हे क्षेत्र निश्चितपणे केवळ महिलांसाठी आहे असंही म्हणता येऊ शकतं. केरळमधली फोटोग्राफर रिचेल कोशी या क्षेत्रात लक्षणीय काम करते आहे.

राजकीय आणि सामाजिक संघर्षांचं चित्रण करणाऱ्या फोटोग्राफर-पत्रकार पौलोमी बसू यांचं काम विशेष आहे. नेपाळमध्ये द्रौपदी / छौपदी नावाची प्रथा होती. हिंदू स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात आणि प्रसूतीनंतरच्या रक्तस्त्रावाच्या काळात घरातून हाकलून दिलं जात असे आणि बाहेर झोपडीत राहावं लागत असे. पौलोमीने ‘ब्लड स्पीक्स : अ रिचुअल ऑफ एक्झाईल’ या फोटोमालिकेच्या माध्यमातून या अन्यायाला वाचा फोडली. त्याची दखल घेऊन 2018 मध्ये नेपाळ सरकारने कायदा करून ही प्रथा बंद केली. भारत सरकार आणि माओवादी पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी यांच्यातील संघर्षाबद्दलचं ‘सेंट्रलिया’ नावाचं त्यांचं फोटोबुक आहे. ‘टू काँकर हर लँड’ या फोटोमालिकेत त्यांनी भारत-पाकिस्तान सीमेवर कार्यरत असलेल्या भारतीय सैन्यातल्या पहिल्या महिला सैनिकांचं चित्रण केलं आहे. आंतरराष्ट्रीय राजकीय प्रश्न, निसर्ग, पर्यावरण, स्त्रीवाद यांच्याशी संबंधित सामाजिक फोटोग्राफी हे त्यांचं कार्यक्षेत्र आहे.

काश्मीरमध्ये महिला छायाचित्रकारांची एक नवीन पिढीच उदयाला येते आहे. लग्नाच्या फोटोग्राफीच्या व्यवसायात स्त्रिया एक नवा दृष्टीकोन घेऊन काम करत आहेत. त्या केवळ प्रसंग टिपत नाहीत, तर काश्मीरचे सांस्कृतिक बारकावे, परंपरा आणि आधुनिकता यांची सांगड घालत आहेत. पारंपरिक लैंगिक भूमिकांना आव्हान देत आहेत. साहिबा वानी ही तरुणी या चळवळीची प्रणेती आहे.

झोया थॉमस लोबो हिचा जन्म मुलगा म्हणून झाला असला तरी तिची ओळख पारलिंगी व्यक्ती म्हणून झाली आहे. फोटोग्राफीच्या माध्यमातून ती समाजातल्या दुर्लक्षित, उपेक्षित, वंचित, पीडित आणि अन्यायग्रस्त लोकांचे प्रश्न मांडते आहे. अर्थातच त्यात पारलिंगी समूह केंद्रस्थानी असतो.

स्त्रियांवर कठोर नियंत्रण ठेवून त्यांचं नियमन करण्याचा हट्टीपणा इराणमधले राज्यकर्ते करत आहेत. नवऱ्याच्या परवानगीशिवाय नोकरी करणाऱ्या किंवा सार्वजनिक जीवनात वावर असणाऱ्या स्त्रियांवर बंधनं लादण्यात आली. फरो अलाई या फोटोग्राफर महिलेने आपापल्या परीने आवाज उठवणाऱ्या आणि निर्भयपणे जगणाऱ्या स्त्रियांचे फोटो प्रसिद्ध करायला सुरुवात केली. मुष्टियोद्ध्या, गिर्यारोहक, नृत्यांगना, कार मेकॅनिक, चित्रकार, आईस हॉकी खेळाडू, स्टंटवूमन अशा ‘रोल मॉडेल’ महिलांचा यात समावेश आहे.

फॅशन फोटोग्राफर साक्षी साळी-पाटील, वाईल्डलाईफ फोटोग्राफी करणारी सोनाली जोशी, स्वतःच्या आणि आजूबाजूच्या जीवनाकडे बघण्याची एक दृष्टी म्हणून फोटोग्राफीकडे बघणारी शीतल मल्लार, आपल्या फोटोग्राफीतून पर्यावरणीय प्रश्नांकडे लक्ष वेधणारी पद्मावती वेल्हाळ, फॅशन, वेडिंग, मॅटर्निटी, नवजात बालकं आणि लहान मुलांची फोटोग्राफी, समारंभ, जाहीर कार्यक्रम, जाहिराती, फूड फोटोग्राफी, वाईल्डलाईफ फोटोग्राफी आणि पर्यावरणविषयक फोटोग्राफी अशा क्षेत्रांत मुक्त संचार करणाऱ्या प्रणाली-चैताली या देवळाणकर भगिनी, अशीच वेगवेगळी कामं करून शिवाय फोटोग्राफीचं प्रशिक्षण देणारी प्रतिभा औंधकर, वर्तमानपत्रांसाठी आवश्यक असणारे समारंभांचे आणि व्यक्तींचे, नामवंत व्यक्तींचे फोटो काढणारी सीमा जोशी, शोधपत्रकारिता आणि अपघातांचं दस्तऐवजीकरण यासाठी फोटो काढणारी गांधीवादी विचारांची संगीता महाजन — या आणि पुस्तकात ज्यांची माहिती आहे त्या सर्वच फोटोग्राफर्सचं काम उल्लेखनीय आहे.

या सर्वांशी झालेल्या संवादात फोटोग्राफीविषयीचे काही समान मुद्दे अधोरेखित होतात. फोटोग्राफर ही एक कलाकार असते. काय बघायचं आणि ते कसं टिपायचं याची दृष्टी तिच्याकडे असावी लागते. आपल्याला जे भावतं, जे नजरेला दिसतं ते कॅमेऱ्यात टिपण्याची (पॉईंट अँड शूट) सवय लावून घेतली पाहिजे. ते टिपण्यासाठी चांगला कॅमेरा, लेन्स, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तांत्रिक प्रशिक्षण यांचा उपयोग निश्चित होतो. मात्र “Camera doesn’t take pictures, photographers do” हे सूत्र कायम लक्षात ठेवलं पाहिजे.

आजकाल मोबाईल फोनमध्ये उत्तम कॅमेरे असतात. पण तरीही ज्या व्यक्तीकडे लाईट सेन्स आणि व्ह्यूफाइंडरमधल्या कंपोझिशनच्या चौकोनाची आणि लेन्सची दृष्टी आहे, ती व्यक्ती मोबाईल फोटोग्राफीच्या नक्कीच दहा पावलं पुढे असणार आहे. आणि म्हणूनच प्रत्येकाच्या हातात फोन असला तरी व्यावसायिक फोटोग्राफर्सची मागणी वाढतेच आहे. फोटोग्राफरकडे सर्जनशीलता आणि कलात्मकता असणं आवश्यक आहे.

विशिष्ट सामाजिक भान किंवा दृष्टीकोन बाळगून छायाचित्रण करणाऱ्या महिलांची विशेष नोंद घेतली जाते, घेतली जायलाही हवी. ते काम महत्त्वाचं आहेच. पण फॅशन फोटोग्राफी, मॉडेल फोटोग्राफी, वेडिंग फोटोग्राफी ह्यादेखील अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कारण फॅशन हे एक स्वतंत्र कार्यक्षेत्र आहे आणि आपल्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या प्रसंगांची आठवण देखण्या स्वरूपात लोकांना हवी असते, हे सत्य आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या फोटोग्राफीला एक स्वतंत्र आणि महत्त्वाचं स्थान आहे. ही बाबदेखील या लेखांतून स्पष्टपणे पुढे येते. प्रवीण घोडेस्वार यांनी त्या त्या फोटोग्राफरचं बलस्थान, तिचे विचार, तिची पार्श्वभूमी, तिचं प्रशिक्षण, तिची दृष्टी आणि तिचा दृष्टीकोन यांचा सांगोपांग विचार करून नेमकेपणाने आणि नेटकेपणाने मांडणी केली आहे.

या क्षेत्रात महिलांचं प्रमाण कमी असण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे महिलांवर असलेल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या, असं यातल्या बहुतेक सर्व फोटोग्राफर्सना वाटतं. स्त्रियांनी घरासाठी, कुटुंबासाठी किती वेळ दिला पाहिजे, घराबाहेर किती आणि कोणता वेळ घालवला तर चालेल, कोणत्या वेळी त्यांनी बाहेर असताच कामा नये, कोणत्या वेळेपर्यंत त्यांनी बाहेरून घरी आलेलं असलंच पाहिजे, अशा बाबतीत समाजाने स्त्रियांवर घातलेली बंधनं खूप आहेत. बरीचशी बंधनं स्त्रियांनी स्वीकारलेलीही आहेत.

फोटोग्राफीचं कौशल्य आत्मसात करणं फारसं अवघड नसतं. मात्र ते आत्मसात केल्यानंतर त्याचा व्यवसाय म्हणून विचार करताना फोटोग्राफरला प्रचंड वेळ द्यावा लागतो. आणि आपल्या समाजामध्ये स्त्रीला तेवढा वेळ तिच्या कामावर किंवा कलेवर गुंतवण्याची परवानगी नसते. हा एक समान धागा या सर्व संवादांमधून आपल्याला दिसतो.

पुस्तकात फोटोग्राफीबरोबर व्हिडिओग्राफीदेखील करणाऱ्या काही महिलांचा उल्लेख आहे. पण विशेषतः व्हिडिओग्राफी करणाऱ्या महिलांना मात्र स्थान दिसत नाही. कदाचित तो वेगळ्या पुस्तकाचा विषय ठरू शकेल. या क्षेत्रात महिलांसाठी काय विशेष संधी आहेत किंवा काय विशिष्ट मर्यादा आहेत, या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये बरीच पुनरावृत्ती दिसते. आणि दोन-तीन लेख वाचून झाल्यावर पुढचे लेख वाचताना आता पुढे काय मुद्दा आहे आणि तो कोणत्या शब्दांत येणार आहे, याचा अंदाज येऊ लागतो. समाजातलं वास्तव, संवादाची रूपरेषा, बोलण्यातले मुद्दे आणि लेखकाची शैली ह्या गोष्टी सर्व लेखांत सामायिक असल्यामुळे ही पुनरावृत्ती जाणवते, हे जरी खरं असलं लेखाची मांडणी करताना त्यात अभिव्यक्तीचं थोडं वैविध्य आणलं असतं तर जास्त योग्य झालं असतं.

दैनिक नवशक्तीने हा विषय त्यांच्या पुरवणीतून हाताळला, याबद्दल नवशक्तीच्या तत्कालीन फीचर एडिटर संध्या नरे-पवार, उपसंपादक क्रांती गोडबोले-पाटील आणि संपादक प्रकाश सावंत यांचंही अभिनंदन केलं पाहिजे. आणि याला पुस्तकाचं रूप देताना केलेले काही बदल, त्या त्या कलाकारांनी काढलेल्या छायाचित्रांची पानं, गौरीश सोनार यांचं उत्तम मुखपृष्ठ आणि जुळणी यांचाही उल्लेख आवर्जून करायला हवा.

पुस्तक अवश्य वाचनीय आणि संग्राह्य तर आहेच; शिवाय या क्षेत्रातल्या महिलांची माहिती मिळवायची असेल, तर ते आपलं कुतूहलही जागं करणारंही आहे.

- ऋचा मुळे
kartavyasadhana@gmail.com


शीर्षक : ‘कॅमेऱ्यामागची ती’
लेखक: डॉ. प्रवीण घोडेस्वार
प्रकाशक : भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर
पृष्ठसंख्या : 128 + 50 फोटोची पाने
किंमत : रु. 350

Tags: फोटोग्राफी फोटोग्राफर महिला फोटोग्राफर स्त्री फोटोग्राफर होमी व्यरावाला पौलोमी बसू Load More Tags

Add Comment