नव्या स्त्रीवादी ज्ञानशास्त्राची गरज

'ज्ञानरचना आणि स्त्री' या दीर्घ लेखाचा उत्तरार्ध

(या लेखाचा पूर्वार्ध)

एकीकडे स्त्री ही वैज्ञानिक ज्ञानाला लायक नाही या समजाशी लढायचं, दुसरीकडे पुरातन काळापासूनचं स्त्रीचं ज्ञान-विज्ञानातील योगदान शोधून काढून त्याला प्रसिद्धी द्यायची आणि शिवाय संकुचित पुरुषी दृष्टिकोनाचे घातक परिणाम सिद्ध करून त्याविरुद्ध लढायचं असा तिहेरी लढा स्त्रीवादिनींना द्यावा लागला. यात ‘स्त्रीवरील अन्याय दूर करणे’ हे लक्ष्य होतंच पण ज्ञानाचा एकारलेपणा ही त्रुटी दूर करण्याची दृष्टी होती हे लक्षात घेतलं पाहिजे.

वैज्ञानिक पद्धतीने मिळालेलं ज्ञान आणि त्याची वस्तुनिष्ठा व वैश्विकता या बाबी एका मर्यादेपर्यंत आणि भौतिक विज्ञानापुरत्या खऱ्या आहेत. पण मग ज्या क्षेत्रांना ही पद्धत लागू होऊ शकत नाही त्यांचं काय? ही क्षेत्रं ज्ञानविषय का होऊ शकत नाहीत? प्रचलित पद्धतीत अचानक प्रकाश पडणे, क्षणार्धात शोध लागणे या गोष्टी धरल्या जात नाहीत. पण बेन्झीनच्या रेणुंची रचना ऑगस्त केकुले या शास्त्रज्ञाला झोपेत दिसली असं म्हणतात. आणि आपल्याला सगळ्यांना आर्किमेडीजची गोष्ट माहिती असतेच.

सतराव्या शतकापर्यंतची समाजरचना जगभर अशी होती की स्त्रियांना बौद्धिकतेचं, बुद्धिवादाचं, बुद्धिप्रामाण्याचं कठोर प्रशिक्षण मिळणारच नाही. त्यामुळे त्यांच्यात सतराव्या शतकापर्यंतची विचारपद्धती शिल्लक राहिली. भावना, स्वप्नरंजन, ऐन्द्रीयता, इ. गोष्टींमध्ये ती अडकून राहिली. ‘मॅन ऑफ रीझन’ घडताना पुरुषाला या सर्व गोष्टी सोडून दयाव्या लागल्या होत्या. त्या सर्व आपल्यात सामावून घेवून पुरुषाला भावनिक उब आणि ऐंद्रिय अनुभव पुरवणं हे स्त्रीचं विहित कर्म झाले. काटेकोर वैज्ञानिक ज्ञानरचनेत ती खूप मागे पडली.

मग आता ही ऐतिहासिक घडामोड दुरुस्त केली आणि स्त्रीला भावना, स्वप्नरंजन, ऐन्द्रियता सोडून देण्याचं प्रशिक्षण दिलं तर ती प्रचलित ज्ञानरचनेत सहभागी होऊ शकते का? तर इथे मोठा पेच आहे. सुमारे 1980 पासून स्त्रीवादी तत्त्वज्ञ एक वेगळाच मुद्दा मांडतात. मुळात वैश्विक, वस्तुनिष्ठ ज्ञान शक्य आहे का? सर्वसामान्य म्हणजे सर्वांना सर्वत्र सारखेपणाने प्रतीत होईल असं ज्ञान असू शकतं का? स्त्रीवादिनी म्हणतात, ‘ते शक्यच नाही’. कारण सर्वांना सर्वत्र सारखेपणाने प्रतीत होईल असे जे काही असेल त्याने सामाजिकतेचा पैलू गमावलेला असेल. सर्वांना एखादी गोष्ट सारखेपणाने प्रतीत होणारच नाही, कारण सर्व सारखे नसतात. वंश, वर्ग, वर्ण, लिंग, संस्कृती, वय, राष्ट्रीयत्व यामुळे ‘सर्व’ खूप वेगवेगळे असतात. सामाजिक-आर्थिक-राजकीय दृष्ट्या उच्चस्तरावरच्या ‘ज्ञात्यांनी निर्माण केलेलं ज्ञान खालच्या स्तरावरच्या (subaltern) ‘ज्ञात्यां’ना जसंच्या तसं स्वीकारता येत नाही. हा ‘वैश्विक’ आणि ‘विशिष्ट’ यातला विरोध आहे. तो मिटता मिटत नाही. वैश्विक म्हणजे अस्सल, निष्कलंक आणि विशिष्ट म्हणजे निःकृष्ट असं काहीतरी धरलं जातं. 

इथे मला थोड्या जुन्या काळातलं उदाहरण आठवतं. भारतीय डॉक्टर उच्च शिक्षणासाठी परदेशी दोन-चार वर्षे काढून आधुनिक पाश्चात्य वैद्यकाचं - वैश्विक समजलं गेलेलं - ज्ञान घेऊन इथे परत आले तर त्यांना इथले रोग आणि रोगी यांची फारशी माहिती नसल्यामुळे त्या वैश्विक शिक्षणाचा फारसा उपयोग होत नसे.

वंश, वर्ग, वर्ण, संस्कृती, वय या पेक्षाही ‘ज्ञात्या’ला लिंग असते हा पेच जास्त कठीण व व्यापक आहे; कारण अगदी एकाच वर्णाच्या, वंशाच्या, वर्गाच्या ‘ज्ञात्यां’मध्येही लिंगामुळे भेद पडणारच आहे. पारंपरिक (म्हणजे पौर्वात्य नव्हे, तर प्रचलित पाश्चात्त्य) तत्त्वज्ञानाला हा प्रश्न हाती घ्यावा लागेल.

एकीकडे स्त्री ही वैज्ञानिक ज्ञानाला लायक नाही या समजाशी लढायचं, दुसरीकडे पुरातन काळापासूनचं स्त्रीचं ज्ञान-विज्ञानातील योगदान शोधून काढून त्याला प्रसिद्धी द्यायची आणि शिवाय संकुचित पुरुषी दृष्टिकोनाचे घातक परिणाम सिद्ध करून त्याविरुद्ध लढायचं असा तिहेरी लढा स्त्रीवादिनींना द्यावा लागला. यात ‘स्त्रीवरील अन्याय दूर करणे’ हे लक्ष्य होतंच पण ज्ञानाचा एकारलेपणा ही त्रुटी दूर करण्याची दृष्टी होती हे लक्षात घेतलं पाहिजे.

ऐंशीच्या दशकात कर्करोगाची समस्या उग्र व्हायला लागल्यावर पाश्चात्य जगात 'वॉर ऑन कॅन्सर' नावाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरु झाले. स्तनाच्या कर्करोगामध्ये फारसा विचार न करता ताबडतोब स्तन काढून टाकण्याचा सल्ला मिळत असे. हे ऑपरेशन न करता कमी आक्रमक अशा अन्य उपायांचा विचार करावा अशी मोहीम उघडून, हे शक्य आहे असे स्त्रियांनी संशोधनाने दाखवून दिल्याने आता हा मुळात शेवटचा असलेला उपाय पाहिल्यांदाच केला जात नाही आणि स्त्रियांना स्तन गमवावा लागत नाही. बरेचदा सर्व रिसर्च डेटा हा केवळ पुरुषांवर प्रयोग करून मिळवला जातो. सँपलमध्ये स्त्रियांचा समावेशच नसतो. ऐंशीच्या दशकात हृदयविकारावरच्या संशोधनातही तीच स्थिती होती. सर्व औषधांवरील संशोधन - इस्त्रोजेनसारखे प्रश्न गुंतलेले असले तरीसुद्धा - केवळ पुरुषांच्या सँपलवर होत असतं.

या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी क्लिक करा.

स्त्रीवादिनींना ज्ञानाची अटळ लिंगसापेक्षता सिद्ध करून तिला मान्यता मिळवायची आहे. आज समाजजीवनात सर्वच क्षेत्रांत परिघाकडून मध्याकडे जो रेटा आहे त्याचा हा तत्त्वज्ञानातील आविष्कार आहे. ‘परिघावरचं ज्ञान हे काँक्रीट आणि विशिष्ट असतं, त्याला केंद्रवर्ती ज्ञानाची वैश्विकता म्हणजे पूर्णता नसते’ या समजाशी लढायचं आहे. आणि वैश्विकता हा तर ज्ञानाचा महत्त्वाचा पैलू मानला गेलेला आहे. तेव्हा हा एक सत्ताशास्त्रीय (सन्मानाने टिकून राहण्यासाठीचा) संघर्ष आहे. परिघावरून पाहताना स्त्रियांना, स्त्रीवादिनींना तथाकथित केंद्रवर्ती ज्ञान हे ‘अँड्रोसेन्ट्रिक’ म्हणजे पुरुषी आहे हे लक्षात आलं. सौंदर्यशास्त्र, नीतिशास्त्र, विज्ञानाचं तत्त्वज्ञान या क्षेत्रांमध्ये पुरुषी दृष्टीकोन हा वैश्विक, सर्वसामान्य असल्याचं भासवीत वावरत होता. (संस्कृत साहित्यशास्त्रातील स्त्रीच्या स्तनाच्या आकारावरून केलेलं स्त्रियांचं वर्गीकरण पाहावं; सुलभा, दमयंती वगैरे स्त्रियांची नावे पाहावीत.) 

मानवाच्या उत्क्रांतीचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञसुद्धा पुरुषी दृष्टीकोन ठेवतात. पुरुष हा शिकारी, लांबवर मजल मारून शिकार साधणारा, त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे दगड घासून त्याने लहान-मोठी शस्त्रं तयार केली. त्याच्या चलनवलनात सामाजिकता होती, स्त्री मात्र घराच्या आसपास जे काही झाडाखाली पडलेलं असेल ते गोळा तयार करण्याचं अकुशल काम करायची. जर शस्त्रं तयार करून अंगठा विकसित झाला असेल तर ते न करणारी स्त्री सुद्धा तेवढीच आणि तशीच विकसित कशी काय झाली? आणि स्त्रियांचा अंगठा आज तर अंमळ जास्तीच काम करतो. इतक्या प्राचीन काळी कामाची लिंगाधारित विभागणी होती हे शक्य वाटत नाही. शिवाय काही पुरात्त्वशास्त्रीय फॉसील पुरावे नाहीत.

त्यामुळे स्त्रीवादिनी नवं ज्ञानशास्त्र उभारण्याच्या खटपटीत आहेत. आजपर्यंत जे दखलपात्र नव्हते अशा अनेकांच्या भूमिकांना न्याय देत त्या ज्ञानरचनाशास्त्र घडवू बघत आहेत. या पद्धतीला ‘भूमिकाप्रणित ज्ञानरचनाशास्त्र’ (standpoint epistemology) असं म्हणता येईल. डायऱ्या, आठवणी, लोकसाहित्य, तोंडी चर्चा हे सर्व त्या यासाठीचे स्रोत म्हणून वापरतात. ‘ज्ञानप्राप्तीची क्रिया वैश्विक असायला हवी ही समजूत एकदा दुरुस्त केली आणि ज्ञात्याचे ऐतिहासिक-सामाजिक संदर्भ तोडून टाकणं शक्य नाही हे मान्य केलं की उलट वस्तुनिष्ठता वाढते’ असं सँड्रा हार्डिंग म्हणते.

त्या स्त्रीवादालाही झुकते माप देऊ इच्छित नाहीत. कारण लिंगभाव हा एकल, एकसुरी, एकजिनसी नाही, तर अतिक्लिष्ट आहे. त्याचा एकच एक परिणाम असणार नाही. तो परिणाम ओळखणं, अभ्यासणं अतिकठीण आहे. त्यामुळे तो फारसा उपयुक्त निकष नाही. स्त्रीवादी ज्ञानशास्त्र हे लिंगभावाला प्राथमिकता देणारं नाही, तर दमनाच्या सर्व शक्यता शोधून त्यांच्यावर उपाय शोधू पाहणारं ज्ञानशास्त्र आहे. कारण जिथे जिथे दमन आहे तिथे स्त्रिया आहेतच, ती सर्व क्षेत्रं सत्ताकारणासाठी तपासायला हवीत. मात्र स्त्रीचा लिंगभाव ही कॅटेगरी जेवढी निरुपयोगी तेवढीच वैश्विकता, विश्वमानव, अशरीरी बुद्धी हीसुद्धा. कारण बरंचसं ज्ञान हे व्यक्ती-व्यक्तींमधील आंतरक्रियेतून जन्माला येतं.

मात्र समाजात आणि सामाजिक संबंधात मुळं असलेलं, तोच पाया असलेलं ज्ञान हे मुख्य प्रवाहात केवळ एक विशिष्ट मत म्हणून मोजलं जातं, त्याला ज्ञानाचा दर्जा मिळत नाही. विशिष्ट इतिहास, विशिष्ट प्रदेश, विशिष्ट मूल्यव्यवस्था आणि विशिष्ट लक्ष्य वगैरे गोष्टींची बंधनं ओलांडून पलीकडे जाणाऱ्या ज्ञानालाच खऱ्या ज्ञानाचा दर्जा दिला जातो. या अडचणीतून मार्ग काढू पाहणाऱ्या ज्ञानशास्त्राला ‘भूमिकाप्रणित ज्ञानरचनाशास्त्र’ असं म्हटलं जातं.

मुख्यप्रवाही तत्त्वज्ञान वैश्विकता ही कॅटेगरी अजून घट्ट पकडून आहे. हे ज्ञान स्वतःला कर्त्याशिवाय सदर करतं; म्हणजे मूल्यनिरपेक्ष, संदर्भहीन घटिते असं आपलं स्वरूप दाखविण्याचा प्रयास करतं. परंतु यामागे स्वार्थी सत्ता असते. कारण, ‘शास्त्र असे म्हणते की ...’ हे वाक्य या प्रकारात परत परत येतं. स्त्रीवादिनी म्हणतात, “कुणाचं शास्त्र? सिगारेट आणि औषधनिर्मिती कंपन्यांचं सौदर्यप्रसाधन कंपन्यांचं, शिक्षणमंत्री किंवा आरोग्यमंत्री यांचं, कंपन्यांच्या पैशांवर पोसलेल्या सर्जन जनरलचं की सर्व नॅशनल इन्स्टिट्यूटांचं?”

- शर्मिष्ठा खेर, पुणे
anjookher@gmail.com 
(लेखिका, फर्गसन कॉलेज, पुणे येथून जर्मन विषयाच्या विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाल्या आहेत.)

Tags: स्त्रीवाद स्त्री शिक्षण ज्ञानरचना रेनेसाँ सबलीकरण तत्त्वज्ञान दीर्घ लेख विज्ञान Load More Tags

Add Comment

संबंधित लेख