चांद्रयान 3 च्या यशानंतर त्या प्रकल्पाशी संबंधितांची इस्रोमधील जी छायाचित्रे किंवा चित्रफिती सर्वत्र प्रसृत झाल्या. त्यातल्या स्त्रियांच्या 'अस्सल भारतीय' वेशभूषेची चर्चा समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात झाली. बहुसंख्येच्या दृष्टीने आजच्या काळात देखील, ज्ञानविज्ञानाच्या आधुनिक शाखांशी संबंधित स्त्रियांचा गौरव करण्यासाठी त्यांचे ज्ञानकर्तृत्व पुरेसे ठरत नाही; तर साडी, फुलांच्या वेण्या याद्वारे संस्कृती व परंपरा यांचे तथाकथित पालन करण्याचा गुणवत्तानिकष प्रबळ ठरताना दिसतो. त्यानिमित्ताने, याच्या मुळाशी जात एकंदर ज्ञानरचनेमध्येच स्त्रियांची दखल किती प्रमाणात व कोणत्या प्रकारे घेतली गेली आहे याची तात्त्विक चिकित्सा करणारा हा दीर्घ लेख दोन भागांत प्रसिद्ध करत आहोत.
‘एक इंच आलं’ या शब्दांनी एकेकाळी काही पुरुषांची खूप करमणूक केलेली आहे. ज्या वस्तुची नीट कल्पना येण्यासाठी तिन्ही मापे (मिती) सांगायला हवीत त्या वस्तुचे एकच माप सांगण्याची चूक स्त्रियांच्या पाकशास्त्र लिखाणात सापडत असे. ही गोष्ट तमाम स्त्रीजातीच्या मर्यादित बुद्धीचे लक्षण म्हणून दाखवली जायची. वास्तविक बरेच पुरुषही तर्कदुष्ट विधाने करत असतात, पण ती समस्त पुरुष वर्गाच्या डोक्यावर थोपली जात नाहीत. तर्कशुद्ध पद्धतीने विचार आणि संशोधन करण्याची क्षमता स्त्रीमध्ये नाही असा पठडीबद्ध विचार प्रचलित होता. आम्हाला साधारण आमच्या पंचविशीत स्त्रीवादाचा शोध लागेपर्यत यात काहीतरी चुकतंय असं वाटलं तरी विरोध करण्याचं धारिष्ट्य नव्हतं. नंतर कधीतरी असं जाणवलं की, ‘स्त्री म्हणून आपली बुद्धी कमी बिमी नसली तरी विचाराची पद्धत वेगळी असते की काय? म्हणजेच स्त्रीचं ज्ञानशास्त्र वेगळं असतं की काय?’
आमच्यातल्या एका मैत्रिणीला वाटतं की, ‘नाहीये ना आपल्याला बुद्धी कमी आणि आता निदान उघडपणे तसं कोणी म्हणत नाही ना? मग हे इतिहासातले अन्याय कशाला खणून काढायचे? त्यापेक्षा प्रत्यक्ष कामाला लागावं.’ तुमच्यापैकीही काहींना असं वाटत असेल. पण दीर्घ इतिहास असलेले अन्याय असे सहजी नाहीसे होत नाहीत, पुनःपुन्हा डोकं वर काढतात, रूप बदलून येतात. म्हणून इतिहासाची जाणीव ठेवली पाहिजे. आणि स्त्रीचं ज्ञानशास्त्र काही वेगळं असेल तर त्याचा वेध घेतला पाहिजे. म्हणून एक अगदी सामान्य अभ्यासक या भूमिकेतून जे काही समजून घेतलं ते तुमच्यापुढे ठेवते.
ज्ञान म्हणजे काय, त्याच्या शक्यता आणि मर्यादा कुठल्या, ज्ञान कसं होतं, कशाकशाचं होतं, कोणाला होतं, जगातल्या सर्व गोष्टींचं पूर्ण ज्ञान होऊ शकेल का, ते कसं आकाराला येतं आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपली समजूत किंवा धारणा (बिलिफ) म्हणजे ज्ञानच, हे कशाच्या जोरावर ठरवता येईल हे तत्त्वज्ञानाच्या ‘ज्ञानमीमांसा’ (epistemology) या शाखेतले प्रश्न. (मी तत्त्वज्ञान शिकलेली नाही, पण त्याबद्दल कुतूहल आहे.) तत्त्वज्ञानाची दोन कार्ये मानली जातात. ‘सत्याचा शोध’ आणि ‘भवताल समजून घेणे’ (Search for truth and contemplation of reality). ज्ञान होण्यासाठी बुद्धी प्राथम्याने आवश्यक की अनुभव या प्रश्नाचं बऱ्यापैकी निर्णायक उत्तर पाश्चात्य तत्त्वज्ञानाने दिलं आहे. ते म्हणजे, बुद्धिप्रामाण्य मानणारी वैज्ञानिक पद्धती. परंतु बुद्धी कमी असलेल्या माणसाला जो काही अनुभव मिळू शकतो त्यातून ज्ञान आकाराला येत नाही का? भवताल समजून घेणे या अर्थाने त्याला ज्ञान होतच नाही का? तो त्याच्या भवतालाशी जे काही समायोजन साधू शकतो ते ज्ञान नसतं का? आपल्याला ‘नाही’ असं उत्तर देण्याचा मोह होईल, पण एक शक्यता अशी की, ते ज्ञान तो तुम्हा-आम्हाला समजेल अशा पद्धतीने मांडू शकत नाही, एवढंच.
मात्र ज्ञान या संकल्पनेविषयी विचार करताना अनेक प्रश्नांचा जंजाळ निर्माण होतो. ज्ञानाच्या सर्व प्रकारांचा एकमेकांशी काय संबंध आहे? त्यांच्यात उच्चनीचता आहे का? ते ज्ञान व्यक्त करणारी भाषा, ती ज्ञानाच्या उतरंडीत कुठे बसते? अमुकतमुक व्यक्ती भोळी आहे हे ज्ञान म्हणजे वस्तुस्थिती की माझी वैयक्तिक धारणा? ती व्यक्ती तितकीशी भोळी नाही बरं का असं नंतर जाणवलं तर मग कुठलं ज्ञान खरं?
जे ज्ञान माणसाच्या वैयक्तिक रागालोभावर म्हणजेच भावनांवर नाही, तर वस्तुस्थितीवर आधारलेलं असतं ते खरं ज्ञान हे उत्तर आज आपण सहज देऊ; पण वस्तुस्थिती कशी ठरवायची, तिचे निकष कोणते हे प्रश्न उरतातच.
या प्रश्नांतून तत्त्वज्ञानाने कसा मार्ग काढला ते पाहायचं तर युरोपचा मध्ययुगाच्या शेवटापासूनचा इतिहास बघावा लागेल. चर्चचा प्रभाव ओसरायला लागला आणि चर्चची मान्यता असलेल्या ज्ञानाबद्दल वैचारिक खळबळ सुरु झाली. धर्माच्या छत्राखाली नांदणारी समाजजीवनाची क्षेत्रं स्वतंत्र होऊ लागली. युरोपातली ख्रिश्चन धर्मसत्ता कमकुवत होत गेली, तिथपासूनच्या काळाला ‘आधुनिक काळ’ असं नाव मिळालं. ‘आधुनिक’चा अर्थ केवळ ‘पुरातन नव्हे तो काळ’ एवढाच नाही; विवेक आणि श्रद्धा यांच्यामधील द्वंद्व संपवून विवेक (बुद्धी) म्हणजेच दोन भिन्न वस्तूंमध्ये फरक करू शकणारी शक्ती ही स्वायत्त आणि स्वयंपूर्ण ज्ञानशक्ती आहे अशी भूमिका हे नाव जाहीर करतं.
आधुनिक पाश्चात्य ज्ञानमीमांसेला सतराव्या शतकात सुरुवात झाली असं ढोबळपणे म्हणता येईल. माणूस तर्कबुद्धीने काम करू लागला आणि ज्ञानाचा साठा वाढत गेला; इतका की आज त्याबद्दल आपण ‘ज्ञानाचा स्फोट’ ही कल्पना वापरतो. मात्र, एवढ्या ज्ञानसाठ्याला जन्म देणारा ‘माणूस’ हा शब्द द्विलिंगी /उभयलिंगी नाही! सतराव्या शतकाच्या आधीपासूनच स्त्री आणि ज्ञान यांचं जुळू दिलेलं नव्हतं. रेनेसान्स काळात माणसाची प्रतिष्ठा, पूर्णत्व असे चर्चेचे विषय होते. पण स्त्री-पुरुष दोघांनाही एकच नैतिकता लागू नव्हती. स्त्रीला देण्याच्या शिक्षणात शुद्धता किंवा निर्दोषत्त्व (चॅसटीटी) हे महत्वाचं मूल्य राहिलं. स्त्री आणि पुरुष यांच्याकडून समान गुणांची अपेक्षा, असं झालं नाही. पुरुष ही देवाची प्रतिकृती आणि स्त्री ही शब्दश: आणि तात्त्विकदृष्ट्याही त्याची अर्धांगी; म्हणजे पलीकडे, थोड्या अंतरावर ठेवण्याची दुय्यम कृती अशी धारणा राहिली.
अठराव्या शतकात विवेकवाद आणि इंद्रियानुभववाद यांच्यामधील विवाद संपून शेवटी विज्ञानाच्या प्रगतीला आवश्यक अशी विवेकाधिष्ठ वैज्ञानिक पद्धत रूढ झाली. वस्तू, घटना यांचे काळजीपूर्वक निरीक्षण करून गोळा केलेला पुरावा, शक्यतो गणिती परिभाषेत मांडलेला तात्पुरता सिद्धांत, या सिद्धान्तापासून अनुमानाने प्राप्त करून घेतलेले, निरीक्षणाने पडताळा घेता येईल असे निष्कर्ष आणि हे निष्कर्ष पडताळा घेताना निरीक्षणांशी सुसंगत ठरले तर आणि तरच तात्पुरत्या सिद्धांताचा शेवटी सृष्टीचा नियम म्हणून स्वीकार अशी ही पद्धत. आज ज्ञान म्हणजे केवळ याच पद्धतीने मिळालेले विज्ञान, भौतिक विज्ञाने असा कित्येकांचा ग्रह होऊन बसला आहे. हे आधुनिक, पाश्चात्त्य विज्ञान हीच जगभर ज्ञानाची मध्यवर्ती धारा (Mainstream Knowledge) म्हणून मान्यता पावली आहे. इतर सर्व धारांचा समूळ उच्छेद जरी झालेला नसला तरी त्यांना केवळ ‘अन्य’ other म्हणून मान्यता असते. जे निश्चित नाही, ज्याचे मोजमाप घेता येत नाही, जे कार्यकारणाच्या नियमात बसत नाही ते या पद्धतीनुसार ‘ज्ञान’ होऊ शकत नाही.
या पद्धतीत ज्ञान मिळविण्याची धडपड करणारा, ज्ञान ज्याला होते तो, कर्ता किंवा माणूस कोण, कुठला, कसा हे लक्षात घेतले जात नाही. ज्ञाता म्हणजेच त्याची निष्कर्षण करणारी सारासार विवेकबुद्धी. इथे विवेक म्हणजे दोन वस्तूंमध्ये अचूक फरक करणारी, तर्कशुद्ध विश्लेषण करणारी बुद्धी (रॅशनॅलिटी). ज्याला ती असेल आणि जो त्या विशिष्ट पद्धतीने पुढे जाईल त्याला ज्ञान होईल. हे ज्ञान लिंगनिरपेक्ष (non-sexual), वैश्विक (universal) आणि वस्तुनिष्ठ (objective) असतं. या ज्ञानरचनेत तर्कबुद्धी म्हणजे (Rationality) किंवा (Reasoning) ला महत्त्व आहे. आणि स्त्रिया तर भावनाप्रधान! त्यांना तर्कबुद्धी नसतेच! त्यामुळे शूद्रांप्रमाणे त्या ‘ताडन की अधिकारी’.
अशरीरी बुद्धी?
इथून पुढे युरोपीय परंपरेत बुद्धी ही ज्ञानाची एकमेव कारक झाली. ‘रीझनिन्ग’च्या म्हणजेच वैज्ञानिक सिद्धान्तनाच्या घटक कृती निश्चित करून, नंतर घटक कृतींचेही घटक निश्चित करून, म्हणजेच मुलभूत घटक शोधून निश्चित क्रमाने या पायऱ्या घेत पुढे जाण्याची सवय बुद्धीला लावणे, निरभ्र आणि लक्ष्यवेधी मनाने निव्वळ विवेकाच्या प्रकाशात दृढ, निश्चित संकल्पना मिळवणे आणि या संकल्पना ‘intuition’पासून पुढे नेऊन एकमेकीशी लागाबांधा असलेली संकल्पनांची (एकीतून दुसरी, पुढची निर्माण होते अशी पायऱ्यांची रचना) साखळी निर्माण करून सिद्धान्तापर्यंत येणे. केवळ याच कृतीने ज्ञानाचा सर्व आवाका गाठता येईल आणि या दोन्हींव्यतिरिक्त अन्य कुठलीही कृती ज्ञानसाधनेला अडथळा ठरेल अशी आधुनिक विज्ञानाची धारणा आहे.
विवेकाच्या प्रकाशात हे करणे म्हणजे अबौद्धिक असे सर्व काही काढून टाकणे. यासाठी कठोर प्रशिक्षणाची आवश्यकता असते. हे प्रशिक्षण म्हणजे भावना सोडून देणे, काल्पनिकाला हाकलून लावणे. सैरावैरा धावणाऱ्या प्रमादशील, कल्पनारम्य रचनांमधून सुस्पष्ट आणि स्वतंत्र विचार-वस्तू मिळवणे. जणू काही मानवी शरीरातून तर्कबुद्धी बाजूला काढून तिला मानवी इच्छा, आकांक्षा, लालसा यांच्या प्रभावातून मुक्त करून कामाला लावणे. मग ही बुद्धी संकुचित विशिष्टत्व टाळण्यासाठी ‘view from nowhere’ घेते. म्हणजे विशिष्ट दर्शनबिंदू नाही. सर्व दर्शनबिंदू अशरीरी बुद्धीत सामावलेले. त्यामुळे पूर्ण दर्शन होते आणि वैश्विक ज्ञान हाती येते. एकदा अशी कडकडीत वस्तुनिष्ठा साधली की वास्तव हाती लागते. या ज्ञानाला ‘S knows that P’ या प्रकारचं ज्ञान असं म्हणता येईल. कोणीही ती पद्धत पाळून कुठेही त्याच कृती केल्या तर तेच ज्ञान मिळेल. या पद्धतीने ज्ञाता हा ‘जेनेरिक’ झाला. म्हणजे एकाच्या जागी दुसरा अगदी सहज चपखल बसेल. यात ज्ञात्याचं वैशिष्ट्य तर लक्षात घेतलेलं नाहीच पण ज्ञानाची सामाजिकता हा पैलूसुद्धा लक्षात घेतलेला नाही.
या विज्ञानाने म्हणजे त्यातून उद्भवलेल्या तंत्रज्ञानाने आपलं जीवन इतकं सुखी आणि विनाकष्ट करून ठेवलंय की त्याच्या मर्यादांकडे आपण डोळेझाक करतो. काही उदाहरणं बघू.
उदाहरण 1) आपला अनुभव असा आहे की, त्याच वस्तू त्याच प्रमाणात सांगितलेल्या क्रमाने घातल्या तरी नवशिक्या व्यक्तीला पहिल्या फटक्यात एखादा नवा खाद्यपदार्थ जमत नाही, चार वेळा बिघडल्यावरच जमतो. किंवा पोळ्यांची कृती वाचून पोळ्या जमणे अगदी अशक्य, महिना-दोन महिने सलग न कंटाळता त्या व्यक्तीने पोळ्या केल्या तर आणि इतरांनी त्या न कंटाळता, टिंगल न करता खाल्ल्या तर जमतील. म्हणजे कर्त्याचं व्यक्तिमत्त्व महत्त्वाचं आहे आणि आजूबाजूचा समाजही महत्त्वाचा आहे. पोळ्या करण्याची कृती गणिती परिभाषेत मांडणे शक्य नाही, किंवा खूपच कठीण आहे. परंतु पोळ्या करत करत पोळी या वस्तूविषयी अंतःप्रज्ञेने ज्ञान होत जाते आणि वाढतही जाते, म्हणून त्या जास्ती जास्ती चांगल्या होऊ लागतात. ह्या ज्ञानाला कमी लेखावं असं तुम्हाला वाटतं का?
उदाहरण 2) मी 1972 मध्ये एम.ए. झाले. तोपर्यंत आमचे गुरुजन आम्हाला गोळाबेरीज मार्क देत असत. आम्ही शिक्षक झाल्यावर तीच पद्धत वापरू लागलो. पण तोवर अमेरिकन भाषावैज्ञानिक (भाषाशास्त्र नव्हे. शास्त्र हे जुनाट, अनमानधपक्याचं; विज्ञान आधुनिक, काटेकोर मोजणीचं) पद्धतीचा गवगवा होऊ लागला होता आणि आमच्या शिक्षक प्रशिक्षणात तिचा अंतर्भावही झाला. त्याप्रमाणे उत्तराची शब्दसंख्या मोजायची, चुकांचे वर्गीकरण करायचे, चुकांच्या प्रकाराचे तुलनात्मक गांभीर्य ठरवायचे; म्हणजे उदा., आवश्यक तिथे स्वल्पविराम न देणे किंवा नको तिथे देणे या चुकीसाठी पाव मार्क कापायचा; त्यापेक्षा गंभीर चुकीला अर्धा, अगदी भयंकर गंभीर चुकीला एक अख्खा मार्क कापायचा, मग उत्तरातले सर्व शब्द मोजून ह्या चुकांची टक्केवारी ठरवायची; आणि शेवटी एकदा ए, बी, सी, डी, एफ अशा पाच आकडी स्केलवर ग्रेड दयायची. अनेक वेळा हे उत्तरपत्रिकेला आधी गोळाबेरीज पद्धतीने जो निकाल असायचा तोच निकाल एवढे सव्यापसव्य करून यायचा. फक्त एकेका पेपरला तीन तास लागायचे. मग काम करून आलेल्या अनुभवाचा फायदा घेऊन अंतःप्रज्ञेने, साकल्याने मार्क द्यावेत की एवढा वेळ घालवावा? आणि कित्येकदा सर्व चुकांचे मार्क वजा झाल्यावर उणे मार्क यायचे. ते आपल्या ढिसाळ शिक्षणव्यवस्थेला परवडत नाही, मग शेवटी क्लार्कच्या स्तरावर भरपूर पाणी ओतून निकाल लावायचे हे असतंच.
उदाहरण 3) ऋजुता दिवेकर या आहारशास्त्रज्ञ स्त्रीचे होकारात्मक उदाहरण. स्वतःची प्रकृती चांगली ठेवायची इच्छा असेल तर लक्षपूर्वक स्वतःच्या शरीराचे अंतर्ज्ञान मिळवा, आपल्या पोटाचा सांगावा ऐका, मी आहार मोजून मापून देणार नाही असे ती म्हणते. काटेकोर मोजमापे करू पाहणारी वैज्ञानिक पद्धती सर्वत्र उपयोगाची नाही म्हणून ऋजुता ही नाकारते तर आहेच पण अन्तःप्रज्ञेचा वापर करायला सांगते आहे.
म्हणजे मनापासून, आवडीने, सातत्याने केलेल्या कामातून तीच वैज्ञानिक सत्यं गवसतात आणि मानवी इच्छा, आकांक्षा, लालसा यांचा ज्ञानाच्या साधनेत फायदा होतो असं म्हणता येईल. आणि जाता जाता लाखो माणसांना गॅस चेम्बरमध्ये मारण्याचं तंत्रज्ञान विकसित होऊ शकलं किंवा आजही मोठा संहार घडवून आणणारी शस्त्रास्त्रं निघतातच आहेत हा इच्छा, आकांक्षा, भावनांपासून अलिप्त अशा अशरीरी न-नैतिक बुद्धीचा विलास आहे अशी टीका पाश्चात्त्य देशातही होत असते. हे ज्ञान वांछनीय आहे का?
(उत्तरार्ध वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
- शर्मिष्ठा खेर, पुणे
anjookher@gmail.com
(लेखिका, फर्गसन कॉलेज, पुणे येथून जर्मन विषयाच्या विभागप्रमुख म्हणून निवृत्त झाल्या आहेत.)
Tags: स्त्रीवाद स्त्री शिक्षण ज्ञानरचना रेनेसाँ सबलीकरण तत्त्वज्ञान दीर्घ लेख विज्ञान Load More Tags
Add Comment