सध्या 90% मधुमेही हे ‘टाईप 2’चे असतात. त्यांच्या शरीरात इन्सुलिन हे साखर पचवणारे संप्रेरक तयार करणार्या स्वादुपिंडातल्या पेशी शाबूत असतात. म्हणजे इन्सुलिन तयार होत असतं, तरीही ग्लुकोज वाढत असतं ते का, याचं स्पष्टीकरण देण्यासाठी ‘इन्सुलिन-विरोध’ ही भ्रामक कल्पना तयार केली गेली. म्हणजे शरीरात इन्सुलिन तर आहे, पण ते त्याचं काम करत नाही. गेली 50 वर्षं टाईप 2 मधुमेहाचं हेच कारण मानलं गेलं. हा विरोध लठ्ठपणामुळे किंवा स्निग्ध पदार्थांच्या अतिसेवनामुळे होतो, असंही मानलं गेलं. सध्या मात्र साखर ही आरोपी आहे.
मधुमेह आपल्या देशात आणि जगभरही खूप फैलावतो आहे, असं सध्या सतत वाचनात येतं. वय, लिंग, प्रदेश, प्रकृतीचा प्रकार यांपैकी कशानेही फरक पडत नाही. मधुमेह परतवून लावतो असं सांगणार्या उपायांचाही सुकाळ आहे. सर्व उपायांमध्ये साखरेला मुख्य शत्रू मानलेलं आहे.
एप्रिल 2022 मध्ये मधुमेहासाठी साखर हा गुन्हेगारच नाही असं जाहीर करणारं एक पुस्तक पुण्याच्या ‘सकाळ प्रकाशना’ने प्रसिद्ध केलं आहे, त्याकडे वाचकांचं, मधुमेह्यांचं फारसं लक्ष गेलेलं दिसत नाही. डॉ. मिलिंद वाटवे हे सूक्ष्मजीवशास्त्राचे आयसर (IISER) मधले संशोधक प्राध्यापक, डॉ. प्रमोद पाटील हे फिजिओलॉजी म्हणजे शारीरक्रियाशास्त्राचे उच्च पदवीधर डॉक्टर आणि डॉ. अश्विनी केसकर ह्या मूलभूत जीवशास्त्राच्या प्राध्यापक ह्या संशोधक त्रयीने ‘उत्क्रांती’ ह्या संपूर्ण वेगळ्या भूमिकेवरून अभ्यास करून मधुमेहाची ‘बिनसाखरे’ची थिअरी मांडली आहे. निसर्ग आणि उत्क्रांती हा तिघांच्याही कायमचा अभ्यासाचा विषय आहे. त्यांच्या मते मधुमेह ह्या विषयात आता साचलेपण आलं आहे. वरवर पाहता अनेक तज्ज्ञ अनेक उपाय सांगत आहेत : दर दोन तासांनी खा, फक्त दोनदा खा, कधीही खा पण कमीच खा, दूध लोणी वगैरे पांढरे पदार्थ टाळा. सकाळी सकाळी अमुक स्मूदी प्या, अमुक योगासनं करा, अशा रामबाण उपायांचा गदारोळ उडाला आहे. पण पूर्ण रोगमुक्ती मिळालेले किती?
आहार आणि मधुमेह किंवा रक्तदाब, हृदयरोग यांचा संबंध दाखवणारे सर्व अभ्यास एखाद्याच विशिष्ट समाजातल्या, एखाद्याच वयोगटातल्या, एखाद्याच घटकाचा अभ्यास करून तो नियम संपूर्ण मानवजातीला लागू असण्याचा दावा करतात. जगातल्या कुठल्याही भागातल्या, कुठल्याही वंशाच्या, कुठल्याही माणसाची रक्तशर्करा 140च्या खाली असणं ही मधुमेह नसण्याची एकमेव खूण असणं कसं शक्य आहे? ऍव्हरेज आणि नॉर्म म्हणजे सरासरी आणि कित्तानमुना यांत फरक न करण्याची ही मखलाशी आहे. एके काळी ही नॉर्म 200 होती, ती औषधनिर्मिती कंपन्यांच्या दबावामुळे खाली खाली येत 140 झाली आहे. म्हणजे 140 ते 200 मधले पेशंट्स जाळ्यात सापडले.
कोलेस्टेरॉल हा अन्नघटक कित्येक वर्षं लठ्ठपणा आणि हृदयरोग यांचं कारण मानला गेला. 2015 मध्ये अमेरिकन तज्ज्ञांनी त्याला आरोपमुक्त केलं, ते पुरेसा पुरावा नाही म्हणून. याचा अर्थ कित्येक वर्षं पुरेसा पुरावा नव्हता तरी आरोप चालूच होता. तेच मीठ आणि रक्तदाबाबद्दल. ‘या दोन्हीत कार्यकारण संबंध आहे’ असं सांगणारे जितके शोधनिबंध आहेत, तेवढेच ‘असा संबंध नाही’ असं सिद्ध करणारे आहेत.
याचा अर्थ वैद्यक हे क्षेत्र काटेकोर नाही. पायाभूत विचार चुकीचा असेल तर चाचपडत ठेवणारे निकाल येतात. तो विचारच सोडून देऊन संपूर्ण नवा विचार, नवी दिशा पकडावी असा निर्णय घ्यायला खूप धैर्य आणि खात्री लागते. ती सगळ्यांकडे नसते.
एखाद्या रोगाची संपूर्ण कारणमीमांसा करण्यासाठी कधीकधी पूर्णपणे नव्या अशा ‘विचारधरे’ची गरज असते, असं लेखकांचं प्रतिपादन आहे. धरा म्हणजे भूमी. विचारधरा म्हणजे Paradigm; म्हणजेच ‘नवीन संकल्पनेचा मनोरा’ जिथे उभारायचा ती पायाची भूमी. नव्या भूमीचा शोध न घेता आहे त्याच मर्यादित विचारसरीत मारून मुटकून तो रोग बसवला जातो आणि निर्विवाद पुरावा नसला तरी तीच औषधयोजना चालू राहते.
औषध कशाला म्हणावं याची पुस्तकाच्या शेवटी समर्पक व्याख्या चौकटीत आहे. ‘जे रोगाला बरं करून स्वत:ची आवश्यकता नाहीशी करतं त्याला औषध म्हणावं.’ एखादं औषध जन्मभर घ्यावं लागणार असेल, तर तो औषध ह्या संकल्पनेचा पराभव आहे. आयुष्यभर करावा लागणं हा तो उपचार निरूपयोगी असल्याचा पुरावा आहे. पण योग्य आहारविहार हे उपचार नसून जीवनाधार आहेत. मधुमेहासाठीच्या योग्य जीवनाधारापर्यंत पुस्तकातलं प्रतिपादन आपल्याला घेऊन जातं.
रोग एकतर जंतूंमुळे होतात. सदोष - कमतरतापूर्ण आहारामुळे होतात किंवा जनुकीय कारणांमुळे होतात अशी आजच्या वैद्यकाची समज आहे. मधुमेहाची मीमांसा ह्या तिन्हीतूनही होत नाही. पण वैद्यकशास्त्र कारणमीमांसा पूर्ण होईपर्यंत थांबत नाही, कारण त्याला उपचार सुरू करण्याची घाई असते. मग एखादी अर्धवट थिअरीच पूर्ण म्हणून मांडली जाते. आणि तिच्याबद्दल ‘श्रद्धा’ निर्माण केली जाते आणि श्रद्धा आली की प्रश्न - शंका यांना थारा नसतो.
माणूसप्राण्याचे सर्व गुणावगुण डॉक्टर, संशोधक वगैरे मंडळींनाही लागू असतात. एखादी गोष्ट सोयीची नसेल आणि तिचा तर्कशुद्ध प्रतिवाद जमत नाही अशा वेळी ते तिच्याकडे दुर्लक्ष करून ती हाणून पाडतात. जर ती खालच्या सामाजिक स्तरावरच्या, मोठी प्रतिष्ठा नसलेल्या व्यक्तीने मांडली असेल तर उपेक्षा हमखास. वैद्यकाच्या इतिहासातल्या स्कर्व्ही आणि बेरीबेरी ह्या रोगांच्या बाबतीत दोन-अडीच वर्षांपूर्वी असंच झालं, त्याची कथा विस्ताराने सांगितली गेली आहे.
सध्या 90% मधुमेही हे ‘टाईप 2’चे असतात. त्यांच्या शरीरात इन्सुलिन हे साखर पचवणारे संप्रेरक तयार करणार्या स्वादुपिंडातल्या पेशी शाबूत असतात. म्हणजे इन्सुलिन तयार होत असतं, तरीही ग्लुकोज वाढत असतं ते का, याचं स्पष्टीकरण देण्यासाठी ‘इन्सुलिन-विरोध’ ही भ्रामक कल्पना तयार केली गेली. म्हणजे शरीरात इन्सुलिन तर आहे, पण ते त्याचं काम करत नाही. गेली 50 वर्षं टाईप 2 मधुमेहाचं हेच कारण मानलं गेलं. हा विरोध लठ्ठपणामुळे किंवा स्निग्ध पदार्थांच्या अतिसेवनामुळे होतो, असंही मानलं गेलं. सध्या मात्र साखर ही आरोपी आहे.
पण साखर पूर्ण नियंत्रणात ठेवली तर मधुमेहाचे दुष्परिणाम कमी करायला फायदा होतो, असा पुरावा नाही. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर झालेल्या दोन वेगवेगळ्या चाचण्यांची माहिती लेखकांनी दिली आहे. ‘UGDP’ म्हणजे ‘University Group Diabetes Programme’ नावाच्या 1960 मध्ये अमेरिकेत झालेल्या एका मोठ्या चाचणीतून साखरेसंबंधीच्या दाव्यावर मोठा आघात करणारा पुरावा निष्पन्न झाला. मग चाचणीवरच प्रचंड टीका झाली. डिझाईन सदोष होते अशी टीका झाली. चाचणीचा पुनर्विचार करण्यासाठी दोन समित्या नेमल्या गेल्या. दोन्ही समित्यांनी चाचणी निर्दोष असल्याचा निर्वाळा दिला. इतकंच नव्हे, डिझाईन आदर्श होतं अशी प्रशस्ती दिली.
इंग्लंडमध्ये ‘UKPDS’ नावाने झालेल्या चाचणीची वेगळीच गत आहे. ही चाचणी दहा वर्षं चालू होती. औषधाचे जे अनेक फायदे अपेक्षित होते, त्यापैकी फक्त एका प्रकारात संख्याशास्त्राला मान्य प्रमाणात तो दिसला. मग आकड्यांचे खेळ करत ती विशिष्ट औषध घेऊन साखर मर्यादेत ठेवली पाहिजे असा निकाल आला आणि आपल्या ‘श्रद्धे’शी सुसंगत असल्यामुळे बहुतेक डॉक्टरांनी तो स्वीकारला. या चाचणीची ‘संख्याशास्त्राची क्रूर थट्टा’ अशी प्रसिद्धी आहे.
‘Accord’ नावाच्या अजून एक चाचणीत तर काटेकोर ग्लुकोज नियंत्रण असणार्या गटात मृत्युदर एवढा वाढला की, अनेक वर्षं चालणार होती ती चाचणी तीन वर्षांत थांबवावी लागली. अन्य काही चाचण्यांमध्ये रक्तशर्करा पूर्ण नियंत्रणात ठेवण्याचा काहीही फायदा न दिसता तोटाच दिसला. तरीही आजतागायत साखरेचं नियंत्रण हीच उपचाराची दिशा राहिली आहे. कारण तशी डॉक्टरांची ‘श्रद्धा’ आहे.
हेही वाचा : वैज्ञानिक संशोधनातल्या लैंगिक असमतोलाचे दुष्परिणाम - डॉ. पद्माकर पंडित
मात्र या पुस्तकाचे लेखक म्हणतात की, मधुमेहात परतीचे दोर कापलेली (उदाहरणार्थ, हात-पाय अपघातात तुटले तर परत उगवत नाहीत.) एकही प्रक्रिया नाही. म्हणून मधुमेह बरा होणं शक्य आहे. वर्तनसत्त्वाच्या गोळ्या घेतल्या तर! ग्लुकोज - इन्सुलिनभोवती फिरत राहिलेली थिअरी बाद करून त्यांनी जी नवीन थिअरी मांडली आहे. ती अशी :
मधुमेहाच्या प्रक्रियेत ग्लुकोज - इन्सुलिन यांचं स्थान नगण्य आहे. अनेक प्रकारचे रेणू, संप्रेरके, स्नायू आणि त्यांनी सोडलेले संदेश, मूत्रपिंडे, मेदपेशी, बदललेला चयापचय, आतड्यांच्या आकुंचन-प्रसरणाची गती आणि ‘ग्रोथ फॅक्टर’ हे महत्त्वाचे आहेत. ग्रोथ फॅक्टरला लेखकांनी मराठी नाव दिलं आहे ते म्हणजे ‘पेशीसुधा’, सुधा म्हणजे अमृत हा मराठीतला अर्थ माहिती असेल तर ग्रोथ फॅक्टरच्या कामाचा खूपच नीट बोध होतो. 24 पेक्षा जास्त पेशीसुद्धा आवश्यक असतात. त्यांचं काम सुरळीत असेल तर प्रकृती सुदृढ. मधुमेहात पेशीसुधांचे व्यवहार बदलतात. इन्सुलिनकडे ग्लुकोज परिचालनाव्यतिरिक्त इतर अनेक कामं असतात. तर मधुमेह हे 350 धागे आणि 70 गाठी असलेलं महागुंतागुंतीचं जाळं आहे. ग्लुकोज आणि इन्सुलिन यातल्या केवळ दोन गाठी. महाजाळ्याची व्याप्ती बघता अगदीच किरकोळ! ग्लुकोजची पातळी आदर्श ठेवून मधुमेह बरा होणार नाही, पण मधुमेह बरा झाला की ती आपोआप खाली येईल. कारण साखर हा परिणाम आहे, कारण नव्हे.
वैद्यकाच्या शिक्षणात उत्क्रांती शिकवली जात नाही. ज्या प्रकारचं जीवन जगत माणूस उत्क्रांत झाला ते आपण आज जगत नाही. आजचं आपलं जीवन सुखासीन आहे. जंगलात फिरून अन्न गोळा करणार्या मानवाला ऊन-पाऊस-थंडी-वारा, खाबडखुबड रस्ते, अचानक समोर ठाकणारे जंगली पशू यांचा सामना करावा लागे. टोचणं, बोचणं, खरचटणं, ओरखडणं, किडामुंग्यांचे चावे असं छोटे-मोठे आघात झेलावे लागत असत. या सगळ्यांमुळे शरीरक्रियांमध्ये बदल होतात. अगदी लहानशा ओरखड्यामुळेही पांढर्या पेशी रक्तवाहिन्यांमधून बाहेर पडून जखमेकडे धावतात. आजच्या आपल्या सुखासीन आयुष्यातून टोच, बोच, जखम, हलका आघात नाहीसे झालं आहे. त्यामुळे पांढर्या पेशी रक्तवाहिन्यांमध्येच पडून राहतात. त्यामुळे पांढर्या पेशींचं बदललेलं वर्तन रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम करतं. लहान-सहान जखमांवर पेशीसुधांची निर्मिती वाढत असते. त्याला आपण आज मुकलो आहोत. वर्तन आणि शरीरक्रिया यांचं एकमेकांशी कार्यकारणभावी नातं आहे. आक्रमकता, लढाऊ वृत्ती ह्या आजच्या समाजधारणेच्या तत्त्वांनुसार संपल्या आहेत. अवांछनीय आहेत. पण शरीराला जशी जीवनसत्वे आवश्यक तशी ही वर्तनं आवश्यक आहेत. ती आजच्या आपल्या जीवनातून नाहीशी झाली आहेत. ती पुन्हा मिळवायला हवीत.
सुमारे 240 पानांमध्ये आणि 10 प्रकरणांमध्ये मिळून एक संपूर्ण नवा विचार मांडलेला आहे. प्रकरणांची नावं ‘लठ्ठपणाची लुकडी समज’, ‘कामाचे काय काम?’ असा लक्षवेधी शब्दखेळ करत दिली आहेत. विशेष उल्लेखनीय हे वाटतं की, मधुमेहासंदर्भात कामप्रेरणेचा संबंध प्रथमच दाखवला गेला आहे. कामप्रेरणा आणि तिची पूर्ती हेही एक वर्तनसत्त्व आहे. प्रौढपणी जेव्हा मधुमेहाची लक्षणं दिसायला लागतात, तेव्हा कामजीवनाबद्दल ‘झालं की आता सगळं. आता काय करायचंय ते?’ अशी भूमिका घेतली जाते. कामजीवनातलं वैगुण्य, त्रुटी आणि मधुमेह यांचा कार्यकारणसंबंध आहे. लैंगिक समस्यांमुळे मधुमेहाची शक्यता वाढते. आजच्या समाजाची नैतिक धारणा, कुटुंबव्यवस्था इत्यादी मोडीत न काढताही लैंगिक जीवनातील त्रुटी पूर्ण करण्याचे मार्ग आहेत; ते सांगत ‘दुसर्या व्यक्तीला त्रास किंवा हिंसक वर्तन एवढी एकच गोष्ट अनैतिक आहे’ असं स्पष्ट प्रतिपादन केलं आहे, हे क्रांतिकारक आहे.
सुमारे 30 पानांची प्रकरणांनुसार दिलेली संदर्भसूची हा सगळ्या प्रतिपादनाचा भक्कम वैज्ञानिक आधार आहे. पुण्यातल्या प्रथितयश डॉक्टर मंडळींनी पुस्तकाला मन:पूर्वक प्रशस्ती दिली आहे. परंतु ‘डायबेटिक असोसिएशन’सारख्या संघटनेचं मतही आवश्यक होतं.
पुस्तकाची भाषा विशेष उल्लेखनीय वाटते. सर्व खंडनमंडन बोलीच्या शैलीत आहे. उपरोध, दृष्टान्त, ऐतिहासिक दाखले भरपूर आहेत. वाचकाचा रस टिकून राहतो आणि तो वेगाने वाचत पुढे जातो.
मात्र आता साखर हे मधुमेहाचं कारणच नाही, तर खाऊया आता साखर असं म्हणत उतावळी खादाड माणसं स्वत:ला परवानगी देऊन टाकतील अशी शक्यता आहे. म्हणून साखरेविषयी अजून विवेचन हवं होतं. साखर हे कारण नसून परिणाम असला, तरी वाढलेली साखर ही अनिष्ट आहे की संपूर्ण दुर्लक्षित करता येईल अशी बाब आहे, असा संदेह शिल्लक राहतो.
वर्तनसमृद्ध व्यायाम आणि खेळ यांची गरज पटलेल्या रुग्णांसाठी तशी सोय करणार्या व्यायामशाळा जास्त संख्येने उघडायला हव्यात. सध्या अस्तित्वात असलेल्या शाळांच्या चालकांना ही थिअरी पटवून द्यायला हवी.
प्रौढ विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात, साहित्य-कला शाखेत आणि कॉमर्सकडेही उत्क्रांती हा किमान अर्ध्या क्रेडिटचा कोर्स समाविष्ट व्हायला हवा; तोही उत्क्रांतीची तत्त्वे सांगणारा, केवळ इतिहास सांगणारा नव्हे. पशुपक्ष्यांशी संबंध हेही एक वर्तनसत्व होईल का, असा विचार चमकून गेला. शहरी जीवनात, जागेच्या अडचणीमुळे बर्याच माणसांना पशु-पक्ष्यांचा सहवास मिळत नाही. खरा प्रश्न हा आहे की, लहानपणापासून आयुष्यात ही त्रुटी राहून गेल्यामुळे मोठेपणी तात्विक पातळीवर हे पटलं तरी अगदी पाळीव कुत्र्या-मांजरांशीही जमवून घेता येत नाही.
पुस्तकाची भौतिक निर्मितीमूल्यं दर्जेदार आहेत. जवळपास 300 पानांच्या पुस्तकाची रुपये 340/- ही किंमत ठीक आहे. मुखपृष्ठ समर्पक आहे. परंतु पृष्ठक्रमांकाबरोबर प्रकरण क्रमांकही आला असता तर संदर्भसूची वापरणं सोपं गेलं असतं. वरवर वाचन न करणार्या वाचकाची सोय बघायला हवी. त्याचप्रमाणे शेवटी दोन-तीन कोरी पानं असली तर ताबडतोब वाचता वाचता नोंदी करणं सोपं जातं. अभ्यासू वाचकांची ही सोय बघणं कठीण नाही. मुद्रितशोधनाचे काम समाधानकारक आहे.
एकंदरीने पुस्तक सकस वाचनाचे समाधान देते.
- शर्मिष्ठा खेर
anjookher@gmail.com
साधना प्रकाशनाचे 'रुग्णानुबंध' हे पुस्तक वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.
Tags: आरोग्यविषयक पुस्तके वैद्यक आरोग्य मधुमेह डायबेटीस सकाळ प्रकाशन Load More Tags
Add Comment