युवा पिढी आणि तिची धर्मभावना

स्त्री चळवळीची सामाजिक परिणामकारकता आणि युवा भान प्रकल्पावरील लेखमाला : 9/12

platformwomen.org

धर्मग्रंथांतील तत्वज्ञान, त्याचे कालमानानुसार जनमानसात रुजणारे अर्थविवरण, त्यांत यथावकाश निर्माण होणारे पाठभेद, त्यांचा स्वत:च्या सोयीने सत्ताधारी वर्गाकडून वापर आणि अखेरीस राजसत्ता किंवा समूहसत्ता यांच्या बळावर स्वत:स श्रेयस्कर अशा धर्मविचारांचा प्रचार, प्रसार आणि सक्ती असाच धर्मांचा प्रवास असतो. त्यामुळे धर्म नावाच्या पोतडीत तत्त्वज्ञानापासून, ते कर्मकांडे, रूढी-परंपरा, त्यांची पुनश्च सोयीस्कर तोडमोड हे सर्व येते. व त्यांचा साकल्याने विचार केल्यास त्यांमध्ये भरपूर स्त्री-पुरुष विषमता रुजली आहे, हे मान्य करावे लागते. या विषमतेस पुन:पुन्हा धर्मग्रंथांमध्ये आधारपण शोधला जातो.

‘जगातील सर्व धर्म पुरुषांनी स्थापन केलेले असल्यामुळे कुठल्याच धर्मात स्त्री-पुरुषांचा दर्जा समान मानलेला नाही.’ स्त्री चळवळच नाही, तर सर्वच परिवर्तनवादी चळवळींना स्त्रीवादाची ही भूमिका मान्य असते. या भूमिकेशी युवा पिढी किती प्रमाणात सहमत वा असहमत आहे, हे जाणून घेण्याचा सर्वेक्षणादरम्यान प्रयत्न करण्यात आला. 203 पैकी 95 जणांनी (47%) वरील भूमिकेशी सहमत दर्शवली. 14% जण ‘काही सांगू शकत नाही', असे म्हणाले. या उलट 37% उत्तरदाते म्हणाले की, धर्मांमध्ये स्त्री-पुरुष विषमता असते असे काही आम्हाला वाटत नाही. काहींनी खालीलप्रमाणे टिप्पण्याही केल्या.

आता बदलायला लागले आहे. (1 पुरुष)
हिंदू धर्मात म्हणजे हिंदू तत्त्वज्ञानात तसे नाही. पण हिंदुंच्या आचरणात समानता उतरत नाही (2 पुरुष)
भारतात स्त्रियांना देवी मानले जाते, पण त्याचे इम्प्लीमेंटेशन होत नाही. (1 पुरुष), (1 स्त्री)
भारतात मातृसत्ताक व्यवस्था होती. (1 पुरुष)
हिंदू धर्मात ब्रह्मा, विष्णू, महेश यांची व्युत्पत्ती आदिशक्तीपासून झाली. आपल्याकडे देवांपेक्षा देव्यांची मंदिरे जास्त आहेत. मासिक पाळीत कष्टाची कामं असल्याने तिला बाजूला ठेवायचे. (1 पुरुष)
इतर काही धर्मांमध्ये (म्हणजे ज्यू, ख्रिश्चन, बौध्द) बायकांना जरा चांगला दर्जा दिला आहे. (1 पुरुष)
तसं धर्मात कुठेच लिहिलेलं नाहीय. (1 पुरुष)
हिंदू धर्मात नक्कीच समानता नाही. (1 स्त्री)
हिंदू धर्मात देवानेच स्त्री-पुरुषांना समान दर्जा दिलेला आहे म्हणून तर आपल्याकडे अर्धनारीनटेश्वर आहे. माझ्या धर्मात स्त्री-पुरुष दर्जा समान आहे. (1 पुरुष)
स्त्री मोलकरीण तरी असते, नाही तर देवी (1 स्त्री)
अब ऐसा नही है (1 स्त्री)
धर्म स्त्री-पुरुषांना वेगवेगळे वागवतो यावर माझा विश्वास नाही. (1 स्त्री)
लग्नसमारंभात जे विधी स्त्रीबरोबर केले जातात, फक्त तिथेच तिला मान दिला जातो, इतर ठिकाणी नाही. (1 स्त्री)
इस्लाम-ख्रिश्चन काहीही असो, देव नेहमी ‘तो’ असतो. (1 पुरुष)
हो, अजूनही आपल्याकडे गुरुजी पुरुषच हवा, कन्यादान पुरुषानेच करायचे, असे नियम आहेत.
इंडियामध्ये तरी कधी लहानपणापासून असं जाणवलं नाही (धर्मातील स्त्री-पुरुष विषमता).  (1 पुरुष)
ख्रिश्चन धर्मात समानता आहे. (1 स्त्री)
लिंग-विषमता असते, पण तरीही स्त्रिया धर्म पाळायचे सोडत नाहीत. त्यांना धर्माचे व्यसन असते. (स्त्री)
खरा धर्म आपल्याला कळतच नाही. धर्मगुरू आपल्यासमोर तसे मांडतात. प्रत्येक धर्मात इतरांचा रिस्पेक्ट करायला सांगितले आहे. (1 पुरुष)

जन्मदात्यांप्रमाणे धर्मसुध्दा जन्मापासूनच आपल्या आयुष्यात येतो. तो बदलण्याचे स्वातंत्र्य लोकशाही राष्ट्रांमध्ये असले, तरी सहसा हे स्वातंत्र्य कुणाला घ्यायचे नसते. धर्म आणि जन्मदाते आईवडील यांमधील आणखी एक साम्य म्हणजे आपल्याला त्यांविषयी उपजत आपुलकी असते. मोठे होऊ तसे आपल्याला आई-वडिलांमधील काही दोष दिसू लागतात, तरी त्यांच्याविषयी आपुलकीची भावना टिकून राहते. तसेच काहीसे धर्माबाबतीतपण होते. जाण आली, थोडे डोळसपणे बघितले की स्वत:च्या आणि इतरांच्यापण धर्मांमधील काही गोष्टी खटकू लागतात. तरीसुध्दा आपण ज्या धर्मात जन्मलो, त्याच्याविषयीचे ममत्व टिकून राहते. बालपणापासून बोललेली भाषा, खाण्या-पिण्याच्या सवयी बदलणे जसे अवघड जाते, तसेच स्वत:च्या धर्माशी निगडीत सणवार, चूक-बरोबरच्या कल्पना बदलणे अवघड जाते. धर्मांबाबत आणखी एक गोष्ट घडते. ती म्हणजे दुसऱ्याच्या धर्मातील कुसळसुध्दा दिसते, पण स्वत:च्या धर्मातील मुसळ दिसत नाही. स्त्रीवादाने मात्र सर्वच धर्मांतील कुसळ आणि मुसळ दोन्ही शोधण्याचा प्रयत्न केला आहे. ख्रिश्चन धर्माचा विज्ञानाला विरोध, इस्लामचा ‘अल्ला हेच एकमेव आराध्य’, हा कडवा आग्रह आणि त्यातील स्त्री संतांचा संपूर्ण अभाव, बौध्द धर्मातील भिख्खुणींना मठांमध्ये मज्जाव, जैन धर्मातील स्त्री तीर्थंकरांचा अभाव, हिंदू धर्मात वर्णव्यवस्थेला मिळालेले अधिष्ठान आणि कर्मकांडांचे स्तोम या सगळ्याची चर्चा केवळ स्त्रीवादानेच नव्हे तर इतरही अभ्यासकांनी केली आहे. त्यांतूनच स्त्रीवादी या निष्कर्षाला आले की, सर्व धर्म पुरुषांनी स्थापन केलेले असल्याने त्यांत स्त्रीला दुय्यम स्थानावरच ठेवलेले आहे.


हेही वाचा : डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती विशेषांक : धर्माने मला काय दिले?


‘पुरुष देव तयार करतात आणि स्त्रिया त्यांना भजतात’ हेपण वचन प्रसिध्द आहे, परंतु ते स्त्री चळवळीतून उदय पावलेले नसून जेम्स फ्रेझर या स्कॉटिश मानववंशशास्त्रज्ञाने म्हटले आहे. ते त्यांनी अप्रगत समाजातील धर्मभावना, कर्मकांडे व त्यांचे आधुनिक समाजमनावरील प्रभाव यांचा अभ्यास करून केलेले विधान आहे. धर्मांचे तत्त्वज्ञान, धर्मग्रंथांत उद्धृत असलेले यम-नियम पुरुषनिर्मित असतात. यथावकाश ते सत्ताकारणाचे साधन बनतात. धर्मांची अधिसत्ता मनावर चालते आणि ती सर्वांत प्रभावशाली सत्ता असते, कारण कुठलीही बाह्य आयुधे तिच्याशी सहजी टक्कर घेऊ शकत नाहीत.

जेव्हा वृत्तपत्रे, रेडिओ-टीव्हीवरील बातम्या किंवा आधुनिक संपर्क साधने अस्तित्वात नव्हती, तेव्हा धार्मिक पोथ्या-पुराणे, प्रवचने आणि कीर्तने हीच प्रभावशाली प्रसारमाध्यमे म्हणून कार्यरत होती. लोकशिक्षण मर्यादित असताना चर्चमधील धर्मगुरूंचे प्रवचन, मंदिरामधील कीर्तनकारांचे कीर्तन आणि मुल्ला-मौलवींच्या सूचना हे आजच्या प्रचार माध्यमांचेच कार्य पार पाडत असत. लोकांच्या विचारांवर अधिराज्य करण्याची ताकद या धार्मिक साधनांमध्ये होती. ती ओळखून धर्माला स्वत:स सोयीस्कर रूप देण्याचे प्रयत्न सत्ताधारी नेहमीच करत आलेले आहेत.

या पृथ्वीतलावर अनेक महासत्ता आल्या आणि गेल्या, अनेक राजवटी काही शतके राज्य करून लोप पावल्या. पण त्यांतील एक महासत्ता फार म्हणजे फार चिवट निघाली आणि आजही ती मोठ्या प्रमाणात टिकून आहे. ती महासत्ता म्हणजे पुरुषसत्ता. तिला किंचितसा धक्का लागण्यास जेमतेम तीनशे वर्षांपूर्वी सुरुवात झाली. पण आजही तिची तटबंदी भरभक्कम उभी आहे. 

स्त्रीवाद म्हणतो की, सर्वच धर्म पुरुषांची अधिसत्ता शाबूत ठेवण्याचे काम चोख करत करतात. आजही, अगदी लोकशाही स्थिरावलेल्या देशांतसुध्दा स्त्रीने समान नागरिक म्हणून केलेली एखादी मागणी धर्मपरंपरेला छेद देत असेल, तर धर्ममार्तंडांचा निर्णय स्त्रीच्या विरोधातच जातो आणि दैवदुर्विलास असा की, कोर्टाच्या आदेशांपेक्षा तो वरचढ ठरतो. कधी सत्ताधारी घाबरून त्याच्यापुढे मान तुकवतात, कधी समाज संविधानिक मूल्ये बेदखल करत परंपरा पुढे सुरु ठेवतात. कॅथलिक देशांमधील गर्भपातास कायदेशीर मान्यतेची मागणी, मुस्लीम देशांमधील स्त्रीस वाहन परवान्यांची आणि आधुनिक खेळांमध्ये आवश्यकतेनुसार कपडे घालून भाग घेण्याची मागणी, भारतात शहाबानोने घटस्फोटानंतर नवऱ्याकडे केलेली पोटगीची मागणी, सर्व देवालयांमध्ये सर्व वयातील स्त्रियांना गर्भगृहात प्रवेश मिळावा ही हिंदू स्त्रियांची मागणी, यांना धर्मशास्त्रातील अधिकारी व्यक्ती किंवा देवस्थानांचे प्रमुख यांचा विरोधच असतो. ज्या स्त्रीला धर्मसंमत पुरुष जोडीदार नाही, त्या स्त्रीला अनेक धार्मिक अधिकार डावलले जातात, ही वस्तुस्थिती आहे. कॅथालिक ख्रिश्चन स्त्री एकटीने मूल दत्तक घेऊ शकत नाही. विवाहाच्या वेळी ख्रिश्चन स्त्रीला ‘मी पतीची आज्ञा पाळेन’, अशी शपथ घ्यावी लागते. हिंदू स्त्री एकटयाने स्वत:च्या मुलामुलीचे लग्न लावू शकत नाही. मुस्लीम स्त्री नमाज अदा करण्यासाठी मशिदीत जाऊ शकत नाही. धार्मिक रूढी पुरुषाला श्रेष्ठ आणि स्त्रीला दुय्यम समजतात हे वास्तव आहे. ते कुणीही नाकारू शकत नाही. मुद्दा हा आहे की, धर्मांमधील स्त्रीचे दुय्यमीकरण युवकांना जाणवते का आणि जाणवत असल्यास ते दूर करण्यासाठी तरुण पिढी काही सक्रिय पावले उचलू इच्छिते का? आपल्या सर्वेक्षणातून तरी तशी काही चिन्हे दिसली नाहीत. मुळात सुमारे 37 टक्के युवक-युवतींना धर्म पुरुषाला झुकते माप देतो आणि स्त्रियांना दुय्यम स्थानावर ठेवतो असे वाटतच नाही. सुमारे 14% उत्तरदात्यांनी धर्म आणि लिंगसमानता या मुद्द्यावर काही विचार केलेला नाही आणि तो करण्यास ते उत्सुकपण दिसले नाहीत. गेली 30 वर्षे या देशाचे राजकारण धर्म या मुद्द्यावर फेर धरत असताना आणि धार्मिक अस्मिता नागरिकांचे भावजीवन व्यापून असताना शिक्षित युवा पिढीच्या वरील धर्मजाणिवांना नक्की कसे भिडावे?

एक युवक आणि एक युवती म्हणतात की, भारतात आणि हिंदू धर्मात तरी त्यांना कधी लिंग-विषमता जाणवली नाही. ज्या धर्मांत विधवा किंवा मासिक पाळी सुरु असलेल्या स्त्रीच्या हातचे पाणीसुध्दा धर्मकार्यांच्या वेळी चालत नाही, त्या धर्मातील लिंग-विषमता युवकांना कधी जाणवूच नये ही काळजी करण्यासारखी बाब आहे. या युवकांच्या मते हिंदू ‘तत्त्वज्ञान’ स्त्री-पुरुषांना विषम दर्जा देत नसल्याने हिंदुंच्या ‘आचरणात’ दिसणाऱ्या विषमतेसाठी ‘धर्माला’ दोष देणे योग्य नाही. हिंदू धर्मात स्त्री दैवते भरपूर आहेत, धर्मानेच अर्धनारीनटेश्वर ही देवता मान्य केली आहे, त्यामुळे स्त्री-पुरुष समानता हिंदू धर्मात अनुस्यूतच आहे, असा त्यांचा युक्तिवाद होता. या त्यांच्या युक्तिवादावर जास्तीत जास्त तटस्थपणे विचार करणे गरजेचे आहे.

इतर कुठल्याही धर्मात नाहीत एवढी स्त्री दैवते हिंदू धर्मात आहेत हे मान्य. इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मांत ती नाहीत याबद्दल अनेकदा त्या धर्मांच्या अनुयायांकडून वैषम्य व्यक्त होत असते. उपनिषदे हा जर हिंदू तत्त्वज्ञानाचा गाभा समजला तर त्यात स्त्री-दास्याचे आणि जातिव्यवस्थेचे समर्थन सापडत नाही, हेपण मान्य आणि त्याबद्दल हिंदुंना समाधान वाटणे समर्थनीयपण ठरते. हिंदू धर्मातील सणवार, रूढी यांमध्ये पर्यावरणाचा संवेदनशील विचार आहे, प्राणिजगताबद्दल कृतज्ञतेची भावना आहे, प्रत्येक गोष्टीत ईश्वर बघण्याचे औदार्य आहे, हे पैलू लोभसच आहेत. परंतु प्रश्न असा आहे की, धर्म म्हणजे फक्त आणि फक्त तत्त्वज्ञान समजायचे का? हिंदू धर्म म्हणजे फक्त वेदांत तत्त्वज्ञान, की श्रुती, स्मृती, पुराणे, पोथ्या, पूजा-अर्चा, यज्ञ-याग, हिंदू देवस्थानांचे रूढी-नियम आणि स्वत:ला हिंदू म्हणवून घेणारा समाज पाळतो ती कर्मकांडेसुध्दा? आज एकविसाव्या शतकात धर्म म्हणून जे आचरले जाते, ज्याचा आग्रह धरला जातो, तोपण धर्माचा भाग समजायचा की नाही? या रूढींमध्ये स्त्री-पुरुष विषमता ठासून भरलेली आहे. स्त्रियांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नाही, गणपतीची प्राणप्रतिष्ठा पुरुषानेच करायची, मुंज फक्त उच्चवर्णीय मुलग्यांचीच होणार, विधवेने देवीची ओटी भरायची नाही, हिंदूंच्या चार पीठांचे शंकराचार्य पुरुषच असणार, इत्यादी इत्यादी.

ही कर्मकांडे आणि ही विषमता हिंदू तत्त्वज्ञानात नव्हती हे मान्य. पण मग आज स्वत:ला हिंदू म्हणवणारे त्यांविरुद्ध कधी आवाज उठवतात का? फार कमी. जे उठवतात, त्यांची संभावनाच होते. दैनंदिन धर्माचरणात अशी विषमता पाळण्याने हिंदू तत्वज्ञानाची विटंबना होते व ती ताबडतोब थांबली पाहिजे असा आग्रह कुणी धरते का? सर्वसामान्यांचे जाऊ द्या, पीठाधिपती शंकराचार्यांनी तरी अशा विटंबनेविरोधात कधी प्रबोधन केले का? उलट शंकराचार्य तर तत्त्वज्ञानाचे शुध्द स्वरूप सोपे करून सांगण्याऐवजी प्रथा-परंपराच शिरोधार्य मानतात. शबरीमला देवालयात रजस्व वयातील स्त्रीला प्रवेश देणे धर्मास अमान्य आहे, असे म्हणत भारतीय संविधानास आव्हान देतात. एखाद-दुसरे स्वामी अग्निवेश यांसारखे कार्यकर्तेच फक्त धर्माच्या नावाखाली सुरु असणाऱ्या अंधश्रद्धेस आणि शोषणास धर्मग्रंथातील दाखले देऊन विरोध करताना दिसायचे.

भारत हे हिंदूबहुल राष्ट्र आहे, आणि सर्वत्र हिंदू प्रथा-परंपरांच्या पुनरुज्जीवनाचे वारे वाहतायत म्हणून आधी हिंदू धर्माविषयी बोलू या. आज स्वत:ला हिंदू समजणाऱ्या आणि घरातील लग्न-मुंज-श्राध्द-पक्ष-पूजा-अर्चा, उपास-तापास, व्रत-वैकल्ये आदी विधी तथाकथित हिंदू पद्धतीने करणाऱ्यांतील 10% लोकांनासुध्दा वेदांत तत्त्वज्ञान नक्की काय सांगते हे ठाऊक नसेल. मग हिंदू धर्माच्या नावाने ते जे काही अवैज्ञानिक, तर्कविसंगत किंवा अन्याय्य करत असतात त्याची जबाबदारी कुणावर टाकायची? धर्म म्हणजे फक्त तत्त्वज्ञान असेल, तर मग विधवा स्त्रीवर केशवपनाची सक्ती होत होती ती कुणाच्या सांगण्यावरून? ब्रिटिशांनी तर तसा सरकारी कायदा नक्की केला नव्हता. एकोणिसाव्या शतकात डॉ. रखमाबाईंनी स्वत:चा बालवयातील विवाह अमान्य करून नवऱ्याच्या घरी नांदायला जाण्यास नकार. त्याबद्दल त्यांना सरकारी न्यायालयात दंड ठोठावण्यात आला, तो कशाच्या आधारे? रखमाबाई नवऱ्याच्या घरी नांदायला जात नाही, हा गुन्हा होय, असा निवाडा धर्मशास्त्रे तपासून धर्ममार्तंडानीच दिला होता. ब्रिटिशांनी तो शिरोधार्य मानला, एवढेच. जर फक्त आणि फक्त तत्त्वज्ञान म्हणजे हिंदू धर्म असे म्हणायचे झाले, तर मग आज ते तत्वज्ञान तसूभरही माहीत नसणाऱ्या करोडो हिंदूंना स्वत:स हिंदू म्हणून घ्यायचा अधिकारच राहणार नाही.

ख्रिश्चन धर्मग्रंथात विश्वाच्या व्युत्पत्तीचे जे कारण दिले आहे, ते पूर्णपणे तर्कविसंगत आणि अवैज्ञानिक आहे. म्हणूनच अनेक ख्रिश्चन राष्ट्रांमध्ये आजही डार्विनचा उत्क्रांतिवाद शाळांमध्ये शिकवण्यास विरोध होतो. आजही ख्रिश्चन धर्मपीठाकडून ‘संत’ हा किताब मिळण्यासाठी ज्या अटी आहेत, त्यात एक तरी चमत्कार नावावर असला पाहिजे हा निकष आहे आणि तो अवैज्ञानिकच आहे. आजही, धर्मास मान्य नाही म्हणून ख्रिश्चनांसकट इतरही धर्मांतील अनेक पंथ आपल्या मुलांना लस देत नाहीत, गंभीर आजारातही कुणाचे रक्त स्वीकारत नाहीत, मग तो रुग्ण मेला तरी त्यांना खंत नसते. कुठलेही धर्मग्रंथ लिहिले गेले त्यावेळी लसही अस्तित्वात नव्हती, आणि रक्त देण्या-घेण्याचे तंत्रही विकसित झालेले नव्हते. तरी धर्माच्या ढालीआडून हे प्रघात सुरु ठेवले जातात. धर्म सांगतो म्हणून आजही काही समाजांत मुस्लीम मुलींची सुंता करून त्यांना आजन्म वेदना सहन करायला लावतात. हे सर्व धर्माच्या नावाखाली चालते, म्हणून त्याची जबाबदारीपण धर्मावर आणि धर्मपंडितांवर येऊन पडते.

हिंदू तत्वज्ञानाने दिलेले विश्वाच्या व्युत्पत्तीचे स्पष्टीकरण शास्त्रीयदृष्ट्या अधिक तर्कसंगत आहे म्हणून हिंदू समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन अधिक वेगाने आणि अधिक दृढ झाला असे म्हणता येणार नाही. इस्लाममध्ये स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीने अधिकार दिले आहेत असे इस्लामचे समर्थक म्हणतात, पण आजमितीस स्त्रीवर सर्वाधिक बंधने मुस्लिम समाजातच दिसून येतात.

धर्मग्रंथांतील तत्वज्ञान, त्याचे कालमानानुसार जनमानसात रुजणारे अर्थविवरण, त्यांत यथावकाश निर्माण होणारे पाठभेद, त्यांचा स्वत:च्या सोयीने सत्ताधारी वर्गाकडून वापर आणि अखेरीस राजसत्ता किंवा समूहसत्ता यांच्या बळावर स्वत:स श्रेयस्कर अशा धर्मविचारांचा प्रचार, प्रसार आणि सक्ती असाच धर्मांचा प्रवास असतो. त्यामुळे धर्म नावाच्या पोतडीत तत्त्वज्ञानापासून, ते कर्मकांडे, रूढी-परंपरा, त्यांची पुनश्च सोयीस्कर तोडमोड हे सर्व येते. व त्यांचा साकल्याने विचार केल्यास त्यांमध्ये भरपूर स्त्री-पुरुष विषमता रुजली आहे, हे मान्य करावे लागते. या विषमतेस पुन:पुन्हा धर्मग्रंथांमध्ये आधारपण शोधला जातो.

आपल्याच सर्वेक्षणातील एक तरुण वैषम्याने म्हणाला की, आजकाल मुस्लीम विवाह सोहळ्यांमध्ये खुद्द नवरी मुलगीच कुठे दिसत नाही. आमंत्रणपत्रिकेमध्ये तिचे नाव नसते. लग्नसमारंभाच्या दिवशी लोक वराला भेटतात, वधुपित्याला भेटतात, जेवतात आणि निघून जातात. यात वधू सहभागी होतच नाही. याविषयी नाराजी व्यक्त केली, तर म्हणतात, ‘महंमद पैगंबरांनी त्यांच्या मुलीचा निकाह केला, तेव्हा ती स्वयंपाकघरात काम करत होती. मग आपल्या घरच्या नवरीला तरी चार लोकांत आणायची काय गरज आहे?’ स्त्रीचे सामाजिक क्षितिज अधिकाधिक आवळण्यासाठी धर्मग्रंथातच समर्थने कशी शोधली जातात, याचे हे उत्तम उदाहरण आहे.

आपल्या सर्वेक्षणातील अनेक उत्तरदात्यांसाठी तृप्ती देसाई यांचा शनिशिंगणापूर मंदिर प्रवेशाचा लढा, शबरीमला मंदिरप्रवेशासाठी स्त्रियांनी केलेली बंडखोरी हाच स्त्री चळवळीचा परिचित चेहरा होता असे दिसून आले. तरीसुध्दा “धर्म स्त्री-पुरुषांना वेगवेगळे वागवतो यावर माझा विश्वास नाही.” किंवा “इंडियामध्ये तरी धर्मांत स्त्रीचा दर्जा दुय्यम असतो असं लहानपणापासून कधी जाणवलं नाही” अशा टिप्पण्या केल्या गेल्या. उत्तरदात्यांमधील हिंदूधर्मीय जेव्हा ‘आमच्या धर्मात समानता आहेच, ब्रह्मा, विष्णू, महेशांची व्युत्पत्ती आदिशक्तीतून झाली आहे,’ असे म्हणाले, तेव्हा त्यांना आठवण करून द्यावी लागली की, आजही बहुसंख्य घरांत अविवाहित, घटस्फोटित, विधवा स्त्रीला सत्यनारायणाच्या किंवा इतर मोठ्या पूजेला बसवले जात नाही. पूजा सांगणाऱ्या पुरोहिताससुद्धा ते मान्य होत नाही. यास क्वचित एखादा अपवाद सापडतो, पण तो रिवाज होण्याइतका सर्वमान्य नाही. गमतीची बाब म्हणजे ही वस्तुस्थिती लक्षात आणून दिल्यावर उत्तरदात्यांनी ती नाकारली नाही. काहींनी ,”अरे हो, खरंच की”, असे विधानही केले. यावरून एक लक्षात येते की, बहुसंख्य लोक जन्माने मिळालेला धर्म मुख्यत्वे कर्मकांडांच्या रुपात डोळे झाकून स्वीकारतात. धर्माच्या नावाने आपण जे करतो, ते तर्कास, न्यायास, आधुनिक मूल्यांना छेद देणारे तर नाही, याची चिकित्सा करण्याची गरज त्यांना वाटत नाही. त्यातले सगळे त्यांना पटतेच असे नसते. पण न पटणारे बदलावे, त्याविषयी नाराजी व्यक्त करावी, एवढे त्यांना ते अगत्याचे वाटत नसते. पुराणातील वानगी पुराणात या भूमिकेतून ते कर्मकांडांपुरती लिंगाधारित विषमता, वर्णव्यवस्था चार घटका स्वीकारतात, पूजा-अर्चा संपली की पुनश्च आधुनिक जीवनशैली स्वीकारून कामाला लागतात. 


हेही वाचा : बात बस एक थप्पड़ की नहीं है... 'थप्पड' या सिनेमाच्या निमित्ताने अभिनेत्री रत्ना पाठक शाह यांची मुलाखत


नेहमीच हे इतके निरुपद्रवी असते, तर स्त्रीवाद त्यात पडलाही नसता. पण धर्म हे स्त्रियांच्या शोषणाचे, खच्चीकरणाचे आणि अवमानाचे साधन म्हणून वापरले जाते. वधूला तिच्या स्वत:च्या विवाहसोहळ्यात मिरवण्याचा आनंद मिळू देत नाहीत त्यामागे जर धर्म असेल, तर स्त्रीवादाला धर्माची चिकित्सा करणे अनिवार्य होऊन बसते. धर्माच्या आधारे तिला मंदिरप्रवेश नाकारला जात असेल, तर त्याची दखल घ्यावी लागते. एखादी स्त्री विधवा आहे म्हणून जर धर्मपीठाचे अत्युच्च अधिकारी तिला भेट नाकारत असतील, तर त्याविरोधात आवाज उठवावा लागतो.

इतर कुठल्याही व्यवस्थेप्रमाणे स्त्रीवादाने धर्मसंस्थेचाही खोलात अभ्यास केला, त्यातील विषमता दूर करण्याचा आग्रह धरला, कारण आधी म्हटल्याप्रमाणे धर्म हे स्त्रीला कब्जात ठेवण्याचे साधन आहे. देवदासी प्रथा, वाघ्या-मुरळी प्रथा, स्त्रीची सुंता करण्याची प्रथा, नाकापर्यंत घुंघट ओढण्याची, जीवघेण्या उकाड्यातसुध्दा हिजाब आणि बुरखा घालण्याची सक्ती, इंटरनेट आणि मोबाईल फोन वापरण्यास मज्जाव, या स्त्रीपीडक प्रथा धर्माच्या नावाखाली चालतात. म्हणूनच त्यांविषयी समाजाला जागरूक करणे हे स्त्रीवादाने स्वत:चे कर्तव्य समजले. आपल्या सर्वेक्षणातील किमान 47 टक्के उत्तरदात्यांना स्त्रीचे दुय्यमत्व आणि धर्म यांमधील परस्पर संबंधांची जाणीव आहे, हे चांगलेच आहे. पण त्याहून अधिक लोकांना हा संबंध जाणवत नाही ही अधिक चिंतेची बाब आहे. कारण आज शिक्षण, आरोग्य, शाश्वत विकास, शांती आणि सौहार्द यांपेक्षा धर्माचे महत्त्व जास्त वाटणारे तरुण-तरुणी संख्येने आणि बळाने वाढत आहेत. आज लोकशाही हक्कांच्या नावाखाली, धर्माचरणाचे स्वातंत्र्य असे गोंडस नाव देऊन स्त्रीवरील बंधने, सक्ती, वाढवण्याचा उद्योग सुरु आहे. धर्म कुठलाही असो, धार्मिक रूढी-परंपरांमध्ये स्त्रीच्या स्वातंत्र्याचा संकोचच असतो, त्यांत तिला निवडीचा किंवा नाकारण्याचा पर्याय उपलब्ध नसतो. पण या वास्तवाचे भान जावे, एवढी धर्मभावनांना धार केली जात आहे. स्त्रीशिक्षणापेक्षा हिजाबबंदी किंवा हिजाबहक्क महत्त्वाचा वाटू लागतो, तेव्हा तरुणांचा बुध्दिभेद कोणत्या थराला जाऊन पोचला आहे, हे बघून घाबरायला होते. दोन धर्मांच्या आणि राजकारण्यांच्या हातातली आपण प्यादी आहोत, हेच तरुण-तरुणींना कळत नसेल, तर त्यांच्यात रूज(व)लेली विचारशून्यता या समाजाला किती भरकटवणार याची चिंता वाटू लागते. भरदिवसा, महाविद्यालयाच्या आवारात, एका नि:शस्त्र तरुणीला ती बुरख्यात आहे म्हणून पाचपन्नास युवक बेमुर्वतपणे घेरतात हे जेवढे संतापजनक आहे, तेवढेच ही तरुणी प्रथेला चिकटून राहण्याचे धाडस दाखवते म्हणून तिचा सत्कार होतो, तिच्या कृत्यावर प्रतिक्रिया म्हणून हिंदू तरुणी गळ्यात केशरी दुपट्टे फलकावत वर्गात येतात हेपण भयप्रद आहे. त्या तरुणीचे अविचल धार्ष्ट्य कौतुकास्पदच आहे, पण ते तिने अधिक समाजोपयोगी कारणासाठी दाखवले असते, तर चांगले झाले असते. पण मग तिचा इतक्या तत्परतेने सत्कार झालाच असता असे नाही. क्रिया-प्रतिक्रियांचे हे विष वाढत जाणार आहे. कुणी सांगावे, उद्या काही हिंदू स्त्रिया म्हणू लागतील, “वैधव्यानंतर तांबडे आलवण नेसणे, केशवपन करणे ही उच्चवर्णीय हिंदूंची प्रथा आहे. ती प्रथा पाळणे हे आमचे कर्तव्य, नव्हे; हक्क आहे.” अशा स्त्रियांचा कुणी तरी सत्कारही करेल.

धर्म या अफूच्या गोळीची मात्रा दिवसेंदिवस वाढते आहे. अशा वेळी 37 टक्के युवकांना त्याचा धोका जाणवू नये, धर्मकारणातील सत्ताकारण दिसूच नये आणि 14 टक्के युवक-युवतींना त्याविषयी विचारही करावासा वाटू नये हे वास्तव काळजी करण्यासारखे आहे.

आपल्या सर्वेक्षणात सहभागी झालेली एक तरुणी म्हणाली, “धर्मांमध्ये स्त्री-पुरुष विषमता भरपूर असते. पण तरी स्त्रिया काही देव देव करणे सोडत नाहीत; स्त्रियांना धर्माचे व्यसन असते.” तिचे म्हणणे 100 टक्के खरे आहे. धर्म ही अफूची गोळी आहेच, पण ती अधिक प्रभावशाली ‘झोपेची गोळी’ आहे की काय असे वाटू लागले आहे. धर्माच्या नावाखाली आज सर्वत्र जे सुरु आहे, त्यामध्ये आज युवा पिढी सामील तरी होते आहे, किंवा त्याकडे डोळेझाक तरी करते आहे. हे वैचारिक निद्रिस्ततेचेच लक्षण म्हणावे लागेल.

- करुणा गोखले 
karunagokhale@gmail.com 
(मराठी लेखिका, अनुवादक, संपादक व स्त्रीमुक्ती चळवळीच्या कार्यकर्त्या / विश्वस्त)


स्त्री चळवळीची सामाजिक परिणामकारकता आणि युवा भान प्रकल्पावरील लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Tags: male domination patriarchal societies political leadership moral authority social privilege पितृतंत्र पुरुष-प्रधान सामाजिक व्‍यवस्‍था पुरुषसत्ताक व्यवस्था कुटुंब व्यवस्था धर्म Load More Tags

Add Comment