28 फेब्रुवारी 2020 रोजी प्रदर्शित झालेला ‘थप्पड’ हा सिनेमा दोन आठवड्यानंतर आजही प्रेक्षागृहात सुरु आहे. ‘मुल्क’, ‘आर्टिकल 15’ यांच्या नंतर अनुभव सिन्हा या दिग्दर्शकाने भारतीय समाजातील अजून एका प्रश्नावर बोट ठेवलेले आहे. ‘मुल्क’ मधून धर्म, ‘आर्टिकल 15’ मधून जात आणि आता ‘थप्पड’मधून लिंग; अशा तीन प्रकारच्या भेदभावांविषयी त्यांचे सिनेमे बोलत असल्याचे लक्षात येते. नुकत्याच होऊन गेलेल्या महिला दिनानिमित्ताने ‘थप्पड’वर बरीच चर्चा घडून आली.
‘उसने मुझे मारा, पहली बार. नहीं मार सकता. बस इतनीसी बात है. और मेरी पिटीशनभी इतनी सी है|’ असं म्हणणारी या सिनेमाची नायिका अमु (तापसी पन्नू) ही एका उच्चभ्रू नवऱ्याची गृहिणी आहे. तिचं आयुष्य साधं, सरळ, ठरलेल्या दिनक्रमात चालू आहे. अशातच एक दिवस घरी चालू असलेल्या एका पार्टीमध्ये तिचा नवरा त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी वादावादी करायला लागतो. त्याला अडवण्यासाठी त्याला बाजूला ओढू पाहणाऱ्या अमुला तो थप्पड मारतो. या थपडेनंतर खूप काळ अमु फक्त शांत राहते, विचार करत राहते. बरोबरचे लोक अमुला समजुतीने घ्यायला, बर्दाश्त करायला सांगत राहतात. तिला गृहीत धरणं, तिचं अस्तित्वच नसणं, तिची किंमत नसणं अशा अनेक गोष्टी एका थपडेने लख्खं दिसायला लागतात. आणि यानंतर अमुचा स्वतःशी सुरु झालेला झगडा नवऱ्याविरुद्धचा लढा बनतो. साधारण अशी सिनेमाची मध्यवर्ती कल्पना आहे.
सिनेमा जसजसा पुढे सरकतो तसं आपल्या लक्षात येतं की स्त्रीच्या अस्तित्वाच्या अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ज्या आपण आतापर्यंत सोडून देत आलो आहोत पण त्या तशा दुर्लक्ष करता येण्यासारख्या नाहीत. तर स्त्रीने आपल्या साध्यासुध्या हक्कांच्या बाबतीत जागं होण्यासाठी, आपल्या बाबतीत घडणाऱ्या अनेक 'अनफेअर' गोष्टी तिला स्पष्ट दिसण्यासाठी ही ‘थप्पड’ आहे. 'Inspired by- you and her' असे म्हणत ‘थप्पड’ आला. या थपडेच्या आघाताने आपण प्रेक्षक uncomfortable होतो आणि हेच सिनेमा बनवणाऱ्या टीमला साधायचे आहे.
‘थप्पड’चे लेखन अनुभव सिन्हा आणि मृण्मयी लागू यांनी केलेले आहे. यामध्ये ‘अमु’च्या आईची भूमिका साकारली आहे रत्ना पाठक शहा यांनी. आपण अनेकदा पाहतो की सहन करण्याचे, संस्कार जपण्याचे किंवा पुरुषी व्यवस्थेत स्वतःचे मन मारण्याचे बाळकडू मुलींना आईकडूनच मिळते. मुलींची पारंपरिक वाढ करण्यात आयाच अग्रेसर असतात. आणि बहुतेकवेळा सासरी मुलीच्या वागणुकीसाठी देखील आईच जबाबदार मानली जाते. सिनेमातही त्याचा प्रत्यय येतोच. या पार्श्वभूमीवर रत्ना पाठक शाह यांच्याशी केलेली हितगुज.
प्रश्न: ‘थप्पड’ या नुकत्याच आलेल्या सिनेमामध्ये तुम्ही ‘अमु’च्या आईची भूमिका निभावली आहे. या आईचं वागणं चारचौघींसारखं स्वाभाविकसुद्धा आहे आणि गुंतागुंतीचं सुद्धा. तुम्हाला ही आई नक्की कशी दाखवायची होती?
- सगळ्यांच्या आईसारखीच. खरं सांगायचं तर मी वेगळ्याने या भूमिकेचा काही अभ्यास वा तयारी केलेली नाही. या सिनेमाचे लेखक अनुभव सिन्हा व मृण्मयी लागू यांच्या लिखाणामध्ये एवढी स्पष्टता होती की, त्यांनी लिहिलंय तसं जसंच्या तसं काम करून ही भूमिका मी केलेली आहे. आपल्या सगळ्यांची आई अशीच असते. आणि मुळात आपण कोणीच सुटसुटीत प्रवृत्तीचे नसतो. 'ब्लॅक अॅन्ड व्हाईट'मध्ये माणूस तोलता येत नाही. आपल्या व्यक्तिमत्वाला अनेक छटा असतातच की! हां पण अशी गुंतागुंतीची, वास्तववादी पात्रं भारतीय सिनेमात आणि तेही मुख्य प्रवाहातील सिनेमात बघायची आपल्याला सवय नाही. ज्या पद्धतीने थप्पड सिनेमा बांधलाय त्यात एकही व्हिलन नाही याचा मला आनंद झाला. संपूर्ण निगेटिव्ह पात्रं एकही नाही. सगळे परिस्थितीनुसार स्वाभाविक वाटावेत असे आहेत. आणि मग त्या स्वाभाविक वास्तववादी परिस्थितीमध्ये संघर्ष सुरु होतो.
नवऱ्याला सोडून आलेली आपली मुलगी आई होणार आहे हे कळल्यावर या आईची पहिली प्रतिक्रिया आनंदाची नाही. काळजीपोटी आलेली पण निगेटिव्ह प्रतिक्रिया आहे. आणि अगदी पुढच्याच क्षणी बाळ आनंदी जन्मावं म्हणून बाळाच्या आईला खुश ठेवलं पाहिजे असा विचार करून, हिच आई अमुला झोपाळ्यावर घेऊन बसलेली आहे, स्वतःच्या लग्नाचे-अमुच्या जन्माचे किस्से सांगत आहे. अमुची आईच काय अमुची सासू देखील आई म्हणून, स्त्री म्हणून एक स्वाभाविक आणि तरीही गुंतागुंतीचं पात्रं आहे, जसे आपण सगळे असतो असं मला वाटतं.
प्रश्न: त्या पार्टीमध्ये जेव्हा अमुला तिचा नवरा विक्रम (पवेल गुलाटी) थप्पड मारतो तेव्हा खरंतर त्याच घरात अमुची आई म्हणजे तुम्ही आहात. पण तुम्ही आतल्या बाजूला आहात आणि तुम्ही ती थप्पड बघत नाही. थप्पड मारताना आईनं प्रत्यक्ष न बघणं हे ठरवून करण्यात आलं होतं? यामागं काही विचार होता?
- हो नक्कीच ठरवून केलेलं होतं. तुम्ही बघा ही थप्पड मी बघत नाही. अमुची सासू बघत नाही. दिया मिर्झा बघत नाही. कोण बघतं? अमुचे वडील आणि सासरे बघतात. भाऊ बघतो. दिया मिर्झाची वयात येऊ लागलेली मुलगी बघते आणि अमुच्या भावाची मैत्रीण बघते. हे बघून दुसऱ्या दिवशी वडिलांना ताप येतो इतकी ही गोष्ट ते मनाला लावून घेतात. दिया मिर्झाची मुलगीदेखील या घटनेने हादरते. ती आपल्या आईला विचारते, ‘माझ्या बाबांनी तुला कधी मारलंय का?’ आणि तिसरी अमुच्या भावाची मैत्रिण जी वकील आहे आणि पुढे जाऊन अमुला तिच्या संघर्षात मदत करते.
एखादी गोष्ट प्रत्यक्ष समोर घडल्यानंतर त्याचा परिणाम अधिक असू शकतो. दोन्ही आयांच्या प्रतिक्रिया या बऱ्याच अंशी पारंपरिक आहेत. आणि घरात एखादा कार्यक्रम असेल तर असं बऱ्याचदा होतंच की, एका कोपऱ्यात काहीतरी घडतं आणि बाकीच्यांना ते कळत सुद्धा नाही.
प्रश्न: आपण पाहतो मुली संघर्ष निवडत नाहीत. समजूतदारपणा दाखवून सांभाळून घेतात. तुम्हाला काय वाटतं, आई वडिलांची यामध्ये काय भूमिका असते?
- खूपच महत्त्वाची भूमिका असते. कुठल्याही झगड्याच्या वेळी प्रत्येकाला कुटुंबाच्या नैतिक आधाराची गरज असते. पण एक लक्षात घ्या. हे आई बाबा पण याच पितृसत्ताक समाजातून येतात. ते याच संस्कारात वाढलेले आहेत आणि याच समाजात राहिलेले आहेत. त्यामुळे ते क्षणिक घटनेचा विचार करून निर्णय घेऊ शकत नाहीत. आपली मुलगी तिचं सासर सोडून आली तर एकटीने तिचा कसा निभाव लागायचा, मुल असेल तर अजून काळजी, मुलगी सुंदर असेल तर अजून जास्त काळजी. खरं सांगू का? प्रत्यक्ष आयुष्यात मी या परिस्थितीत असते आणि माझ्या मुलीच्या बाबतीत असं काही झालं असतं, तर मी देखील सिनेमातल्या आईसारखाच सगळ्या बाजूने विचार केला असता. कारण या समाजात इतकी वर्षं घालवल्यानंतर त्यांना पुढची ती संकटं दिसतात जी तरुण रक्ताला कदाचित दिसत नाहीत. तुमच्या एका संघर्षाने क्रांती होत नाही. बदल हे अत्यंत धिम्या गतीने होत असतात. हां पण आई वडीलच मुलांना अशा संघर्षासाठी तयार करत असतात. त्यांच्या पाठींब्याशिवाय अशा लढाया लढणं अवघड असतं.
प्रश्न: 'अमु'ची आई तरुणपणी गायची. तिला गाण्यात पुढे जाऊन काहीतरी करण्याची इच्छादेखील होती. पण संसारात पडल्यावर सगळंच राहून गेलं. स्वतःच्या पत्नीच्या बाबतीत कळत-नकळत 'अमु'च्या वडिलांकडून अन्याय झालेला आहे. पण ते अमुच्या हक्क-अधिकार आणि मतांच्या बाबतीत इतके जागृत आहेत. हा बदल तुम्ही कसा पाहता?
- पुरुष म्हणून हा त्यांचा सुधारण्याचा प्रवास आहे असं मला वाटतं. परंपरा, रूढी, समाज या सगळ्याला त्यांनी मागच्या पानावरून पुढे असं स्वीकारलेलं नाहीय. त्यांनी आपल्या आजूबाजूच्या गोष्टींवर विचार केलेला आहे. स्वतःला बदलण्याची संधी दिलेली आहे. लग्नानंतर फिरायला गेल्यावर पत्नीला हिंदी सिनेमातली गाणी किंवा डायलॉग ऐकवणारा पुरुष नाहीय तो. दिनकरांच्या कविता वाचून दाखवणारा, जाणिवा जागृत असणारा माणूस आहे.
मला हा बदल खूप सकारात्मक वाटतो. या बदलामागे एक महत्वाचं कारण त्यांना स्वतःला मुलगी होणं हे देखील आहे. स्वतःच्या पत्नीवर अन्याय करणारा पुरुष, बाप असतो तेव्हा स्वतःच्या मुलीवर झालेला अन्याय सहन करू शकत नाही. स्त्रीकडे बघण्याची त्याची दृष्टी त्याच्या स्वतःच्या मुलीमुळे बदलू शकते.
प्रश्न: ‘थप्पड’मध्ये मूळ कथेच्या बरोबरीनं अनेक छोट्या-मोठ्या कथा येतात. संवाद, मौन, सिनेमातील पात्रांचं वागणं सगळ्यांमध्ये दिग्दर्शकाचं म्हणणं इतक्या बारकाव्याने कोरलेलं आहे की, सिनेमा बघताना एका क्षणासाठी तुमचं दुर्लक्ष झालं तर तुम्ही काहीतरी महत्वाचं गमावलेलं असेल. सिनेमाच्या केवळ मध्यवर्ती कथेवर उथळ चर्चा होताना पाहिल्यावर वाटतं की, यांनी सिनेमा नीट पाहिलाय ना...
- हो, कारण आपल्याकडे सिनेमा पाहायचा कसा हे शिकवलंच जात नाही. थप्पड ही सिनेमातली एक घटना झाली. त्याला अनेक कंगोरे आहेत. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या अनेक प्रश्न उघडे करून दाखवण्याचा प्रयत्न या सिनेमाच्या माध्यमातून केलेला आहे. तो एकंदरीत अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर सिनेमा 'बघता' यायला हवा. पूर्वी सरकारी शाळांमध्ये सिनेमे दाखवले जायचे, पण आता शाळा-महाविद्यालयांमध्ये सिनेमा दाखवणे आपण बंद केलेले आहे. मुद्दामहून सिनेमाचा अभ्यास करायला जाणाऱ्या मुलांना ते शिकायला मिळतं. बाकी मुलांना मात्र त्यातलं प्राथमिक ज्ञानदेखील मिळत नाही. सिनेमा हे इतकं प्रभावी माध्यम आहे असं आपण म्हणतो, पण ते कसं बघायचं हे आपण शिकवतच नाही.
तरी मला अलीकडचे हिंदी सिनेमातील बदल सकारात्मक वाटतात. खूप वेगवेगळे विषय वेगवेगळ्या पद्धतीने हाताळले जात आहेत. इंटरनेटमुळे परीक्षणं, पॉडकास्ट अशा माध्यमांतून, स्वयंशिक्षणातून आत्ताची पिढी सिनेमे समजून घेत आहे. वर्षानुवर्षे आपण तेच तेच बनवत होतो आणि पाहत होतो. आता बदल होतायत. ‘कामयाब’ सारखा सिनेमा येतोय. मी कालच पाहिला. संजय मिश्रा त्यामध्ये मुख्य भूमिकेत आहे. त्याला अशा प्रकारची भूमिका करायला मिळाली याचा आनंद आहे. - क्या बताऊँ, मेरा तो जी भर आया. हळूहळू सिनेमा सर्वंकषपणे पाहायला हवा ही समज वाढेल, अशी अपेक्षा ठेवता येईलच.
प्रश्न: ‘एक थप्पड की ही तो बात है’ या विधानाला काय प्रतिक्रिया द्याल?
- थप्पडमध्येच रामधारी सिंह दिनकर यांच्या कवितेच्या दोन ओळी वापरल्या आहेत,
'समर शेष है, नहीं पाप का भागी केवल व्याध,
जो तटस्थ है, समय लीखेगा उनके भी अपराध..'
मुळात ‘एक थप्पड की ही तो बात थी..उसमे क्या?’ अशी प्रेक्षकांकडून प्रतिक्रिया येणं यातून दोन गोष्टी कळतात. पहिली गोष्ट म्हणजे, आपल्याकडे पितृसत्ताक व्यवस्था किती मुरलेली आहे आणि म्हणूनच आजही अशा सिनेमांची आपल्याला किती गरज आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, अशा प्रतिक्रिया देणाऱ्या व्यक्तींनी सिनेमाच नीट पाहिलेला नाही. सिनेमामें बस एक थप्पड की बात नहीं है. थप्पडच्या बरोबरीने अजून अनेक गोष्टी या कथेच्या, संकल्पनेच्या भाग आहेत आणि त्या दुर्लक्ष करण्यासारख्या नाहीत. आपण त्या गांभीर्याने घेतल्या पाहिजेत. प्रेक्षकांना अस्वस्थ करणारा हा सिनेमा आहे. हिंदी सिनेमाच्या मुख्य प्रवाहात गोड गोड विषयाचे आणि गोड शेवटाचे सिनेमे बघून आपल्याला तसेच सिनेमे पहायची सवय झालेली आहे. थप्पड सारखे प्रेक्षकांना uncomfortable करणारे सिनेमे अधिक यायला हवेत. सिनेमा आणि आशय न समजल्यामुळेही ‘बस एक थप्पड की बात’ वाटू शकते. पण लेखकाला आणि दिग्दर्शकाला याहून खूप जास्त काहीतरी खोल सांगायचं आहे. आपण सिनेमा अजून गांभीर्याने बघावा असेच मी सांगेन.
प्रश्न: या सिनेमाच्या निमित्ताने तुमच्या लक्षात राहिलेली एखादी प्रतिक्रिया..
- मी मागच्या दोन-तीन दिवसांत थप्पडच्या संध्याकाळच्या एका शोला सहज गेले होते. अनेक महिला आधीचा शो बघून बाहेर पडत होत्या. माझ्याशी बोलायला आल्या. विचार करायला लावणारा सिनेमा आहे असं म्हणाल्या. माझा नेहमीचा अनुभव आहे की, हल्ली प्रेक्षक कुठेही भेटले तरी त्यांना आधी फोटो किंवा सेल्फी घ्यायचा असतो. मात्र त्या महिलांच्या गराड्यात एकही जण फोटो घेऊया म्हणाली नाही. आणि म्हणूनच ‘विचार करायला लावणारा सिनेमा आहे’ ही त्यांची प्रतिक्रिया मला खरी वाटली. त्या सिनेमातून बाहेर आल्या नव्हत्या. त्या विचार करायला लागल्या होत्या. मला सिनेमा वसूल झाल्यासारखं वाटलं. तिथेच एक पन्नाशीचे गृहस्थ भेटले. सिनेमा आवडल्याचं त्यांनी अगदी गहिवरून सांगितलं. घरी जाऊन बायकोला एक 'झप्पी' देणार आहे असंही ते म्हणाले.
प्रश्न: तुमच्याकडे या सिनेमाविषयी सांगण्यासारखं अजून बरंच काही असेल.. आत्तापर्यंत मारलेल्या गप्पांतून सुटलं पण महत्त्वाचं असं काही सांगाल..
- दोन गोष्टी सांगायला आवडतील. सिनेमाच्या बाबत म्हणाल तर सिनेमाच्या लेखक, दिग्दर्शकांनी समाजातील सर्व वर्गातील स्त्रियांचे चित्रण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिक्षण, कामाचे स्वरूप, कौटुंबिक वातावरण, वय, आर्थिक स्थिती अशा सगळ्या पार्श्वभूमींवर ‘ती’ च्या अस्तित्वाच्या प्रश्नातील सारखेपणा अगदी सहज अधोरेखित करून दाखवलेला आहे. ती ‘ऑरेंज कॅन्डी’ सगळ्यांच्या जीवनात आहे.
आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे समानता, स्त्रीवादी भूमिका निवडणं हे सर्व खुद्द स्त्रीसाठी सुद्धा सोपं नाही, असं मला वाटतं. पुरुषसत्ताक समाजात स्वतःच्या हक्क, अधिकारांसाठी तिला संघर्ष करावा लागतो हे तर आहेच. पण त्याच बरोबरीने तिला तिचे विशेषाधिकार सुद्धा सोडून द्यावे लागतात. स्त्री म्हणून मिळणा-या स्पेशल वागणूकीचा जाणीवपूर्वक त्याग करावा लागतो. समानता और स्त्रीवाद का स्वीकार करना आसान नहीं है, पर यही सही है.
(मुलाखत - मृदगंधा दीक्षित)
Tags:Load More Tags
Add Comment