आत्मविश्वास, अहंगंड, स्वकेंद्रीपणा आणि अधिकारी वृत्ती

स्त्री चळवळीची सामाजिक परिणामकारकता आणि युवा भान प्रकल्पावरील लेखमाला : 7/12

dreamstime.com

गेली अनेक शतके जी तरुण स्त्री घरात इतरांची कामे करत मुकाट वावरली आहे, जिला स्वत:ला काय आवडते, काय करावेसे वाटते याचा धांडोळा घेण्याची मुभाच मिळाली नव्हती; जिच्या अडचणी, इच्छा, गाऱ्हाणी ऐकून घेण्यात घरात आणि घराबाहेर कधी कुणाला रसच वाटला नाही; ती स्त्री जर स्वप्ने रंगवू लागली, इच्छा बोलून दाखवू लागली, मते मांडू लागली, आणि पुरुषाच्या बरोबरीने स्वत:च्याही आकांक्षा पुढे रेटू लागली, तर काही टक्के लोकांना ती आता स्वकेंद्री झाली आहे असे वाटणारच. आत्मभान आलेली स्त्री पूर्वीसारखी फक्त आणि फक्त इतरांसाठी जगणार नाही, हे आधुनिक वास्तव आहे. 

सर्वेक्षणामध्ये एक प्रश्न विचारला होता: स्त्रियांमधील अहंगंड किंवा स्वकेंद्रीपणा वाढला असून त्यास स्त्री चळवळीने हातभार लावला असे वाटते का?

वरील प्रश्नास उत्तर देताना 203पैकी 62 व्यक्तींनी (30.69%) म्हटले की, स्त्रियांमधील अहंगंड किंवा स्वकेंद्रीपणा वाढला आहे असे त्यांना वाटत नाही आणि तसा तो वाढण्यास स्त्री चळवळ हातभार लावते असेही त्यांना वाटत नाही. या उलट 98 व्यक्ती (48.51%) म्हणाल्या की, हो, स्त्रियांमधील अहंगंड किंवा स्वकेंद्रीपणा वाढला असून त्यास स्त्री चळवळीने हातभार लावला आहे. 22 व्यक्तींचे (10.89%) मत पडले की, असे घडण्यास काही प्रमाणात स्त्री चळवळीने हातभार लावला हे खरे; पण त्यास इतरही कारणे आहेत.

शिक्षण मिळाले, आत्मभान आले, स्वत:ची इच्छा आणि मते तयार झाली आणि ती व्यक्त करण्याचा आत्मविश्वास आला, की व्यक्ती या जगाच्या पसाऱ्यात स्वत:चे स्थान शोधू लागते; ते न मिळाल्यास निर्माण करू बघते. त्यामुळे आत्मविश्वासातून साधणारे ‘स्व’चे व्यक्तीकरण आणि अहंगंड; महत्त्वाकांक्षा आणि स्वकेंद्रीपणा यांतल्या सीमारेषा ती स्वत: आणि तिच्या आजूबाजूचे लोक कुठे आखतात यांत फरक पडतो. त्या व्यक्तीला जी ‘स्व’ च्या इच्छा-आकांक्षांसाठी केलेली कृती वाटते; ती समोरच्या माणसाला स्वार्थीपणा, स्वकेंद्रीपणा वाटू शकतो. इथे पुन्हा, संबंधित सर्व जण किती तारतम्य बाळगतात यावर परिस्थितीचे आकलन अवलंबून राहते. आपल्या उत्तरदात्यांनी हे वास्तव लक्षात घेतले आहे, हे त्यांच्या टिप्पण्यांवरून लक्षात येते. म्हणूनच उत्तरदात्यांनी खालीलप्रमाणे जास्तीच्या पुस्त्या जोडल्या:

गेली अनेक शतके जी तरुण स्त्री घरात इतरांची कामे करत मुकाट वावरली आहे, जिला स्वत:ला काय आवडते, काय करावेसे वाटते याचा धांडोळा घेण्याची मुभाच मिळाली नव्हती; जिच्या अडचणी, इच्छा, गाऱ्हाणी ऐकून घेण्यात घरात आणि घराबाहेर कधी कुणाला रसच वाटला नाही; ती स्त्री जर स्वप्ने रंगवू लागली, इच्छा बोलून दाखवू लागली, मते मांडू लागली, आणि पुरुषाच्या बरोबरीने स्वत:च्याही आकांक्षा पुढे रेटू लागली, तर काही टक्के लोकांना ती आता स्वकेंद्री झाली आहे असे वाटणारच. आत्मभान आलेली स्त्री पूर्वीसारखी फक्त आणि फक्त इतरांसाठी जगणार नाही, हे आधुनिक वास्तव आहे. आता कुटुंबात आणि समाजात तिच्याही इच्छा-आकांक्षांना जागा करून द्यावी लागणार आहे. आनंदाची बाब म्हणजे हेपण भान उत्तरदात्यांना आलेले दिसते. म्हणून तर एक युवक म्हणाला की, “स्त्री किंवा पुरुष आपापल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडत असतील, तर त्यांच्यामध्ये अहंगड आणि स्वकेंद्रीपणा आल्यास हरकत काय?”

काही उत्तरदाते म्हणतात की, ‘मी’, ‘माझे’ हे तरुण मुलींमध्ये फार वाढले आहे. किंवा ‘आम्ही काहीच ऐकून घेणार नाही, काहीच सहन करणार नाही, कुठेच सोडतं घेणार नाही असा त्यांचा दृष्टिकोन असतो.’ येथे पुन्हा तारतम्याचा मुद्दा येतो. ‘मनासारखे न होणे’ आणि ‘अन्याय होणे’ या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अनेकदा प्रतिकूल परिस्थितीमुळे मनाजोगते होत नाही. कधी समोरची व्यक्ती ‘तिच्या’ इच्छांना अनुसरते, म्हणून ‘आपल्या’ मनासारखे होत नाही आणि आपण खट्टू होतो. पण दरवेळी तो घोर अन्यायच असतो असे नाही. त्यामुळे कशाला अन्याय म्हणायचे आणि त्याविरुद्ध पेटून उठायचे, हे तारतम्याने ठरवावे लागते. मनाविरुद्ध काही झाल्यास संघर्ष करायचा, की अधूनमधून होणारे अपेक्षाभंग हा सहजीवनाचा अटळ पैलू आहे असे म्हणून थोडे सोडते घ्यायचे, हा व्यक्तिगत निर्णय असतो. जोपर्यत कुटुंबात सहन करण्याची, सोडते घेण्याची मात्रा सर्वांच्या वाट्याला थोडयाफार फरकाने समान येते, तोपर्यंत त्याकडे स्त्रीवादी भिंगातून बघण्याची गरज नसते. मात्र जेव्हा तू स्त्री आहेस म्हणून तूच जास्त सहन केले पाहिजे, सोडते घेतले पाहिजे, असा कुटुंब किंवा समाज आग्रह धरतो, तेव्हा त्यामागे पितृप्रधानता कार्यरत असते, व त्याचा परामर्श स्त्रीवादाला घ्यावा लागतो. उदाहरणार्थ, नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध असल्यास स्त्रीने मुलाबाळांकडे बघून जरा सोडते घ्यावे असा समाजाचा दृष्टिकोन असतो, पण स्त्रीचा विवाहबाह्य संबंध मात्र पुरुषाने अजिबात सहन करू नये, तिला ताबडतोब घरातून हाकलून द्यावे असा समाजाचा आग्रह असतो. तिची मुले तिच्याकडून काढून घ्यावीत, तिला चोप देऊन वठणीवर आणावे, किंवा तिला मारून टाकले तरी हरकत नाही, येथपर्यंत काहींची मजल जाते.

अर्थात अशी टोकाची उदाहरणे घराघरात घडत नाहीत. पण दैनंदिन जीवनात सोडते घेणे किंवा स्वत:चा मुद्दा लावून धरणे हा मामला रोजचा असतो. आणि तो पूर्णपणे वैयक्तिक निर्णयच असतो. जेव्हा स्त्री कधीच सोडते घ्यायला तयार होत नाही, आकांडतांडव करून स्वत:च्या मनाचे खरे करते, घरातील इतरांना गृहीत धरते, तेव्हा तो स्त्रीवादाचा नाही, तर तारतम्याचा आणि भावनिक प्रगल्भतेचा मुद्दा होतो. स्त्री स्वत:च्या हटवादीपणापायी कुटुंबीयांना वेठीला धरते, तेव्हा ती कुठल्याही प्रकारे स्त्री चळवळीची भूमिका आचरणात आणत नसते, तर स्वत:मधील असमंजसपणा दाखवून देत असते. अशा वेळी तिला केवळ स्त्री म्हणून नको त्या सवलती देऊन संपूर्ण घरावर अन्याय करण्याचे काहीच कारण नाही. स्त्री माणूस आहे आणि माणूस असण्यातील सर्व गुणदोष तिच्यामध्ये असणारच आहेत, असे स्त्री चळवळीचे म्हणणे असते. त्यामुळे ती माणूस म्हणून चुकत असेल, तर तिची चूक दाखवून देण्यात काही गैर नाही. फक्त स्त्रीची चूक झाली की तिला मारझोड करणे, घरातून हकलून देणे हे योग्य नाही. तिचे वर्तन असह्य झाल्यास कायद्याच्या चौकटीत राहून तिला समज देण्यात काही वावगे आहे, असे स्त्री चळवळ मानत नाही.


हेही वाचा : वाचकांनी माझ्या अस्तित्वाचा स्वीकार केला... - मन्नू भंडारी


येथे आणखी एक बाब आवर्जून नमूद करायला हवी. आजकालच्या मुली केवळ मिळालेत म्हणून खूप अधिकार गाजवतात हे निरीक्षण एकांगी आहे. मुलाचे लग्न झाले आणि सून आली की स्त्रीला खूप अधिकार मिळतात हे पितृकेंद्री कुटुंबव्यवस्थेतील पुरातन वास्तव आहे. त्यामुळे घराघरांत स्त्रिया विवाहित मुलग्यांवर आणि सुनांवर अधिकार गाजवताना दिसतच होत्या. आजही रूढीप्रिय, ग्रामीण कुटुंबांमध्ये तेच चित्र दिसते. आपल्या सर्वेक्षणातील 3-4 पुरुष आणि 7-8 युवतींनी अशीच गाऱ्हाणी मांडली आहेत. त्यातील मुलग्यांनी मांडलेली काही पुढीलप्रमाणे: ‘सगळा पगार आईकडे सुपूर्त करावा लागतो, बायकोची अगदी साधी हौसपण पुरी करता येत नाही’. ‘बायको हुशार आहे, पण तिला प्रोत्साहन दिलं की आई मला जोरू का गुलाम म्हणते’. ‘बायको बाळंतपणासाठी माहेरी गेली. तिच्या डिलिव्हरीच्या वेळी तिच्याबरोबर असावं असं मला वाटत होतं, पण सासरी जाऊन जावयाचा मान कमी होतो असं म्हणून आईनी मला जाऊ दिलं नाही’. ‘मला वक्तृत्व, नाटक या सगळ्याची खूप हौस होती, सदैव मुलामुलींच्या गराड्यात असायचो. त्याने आई अस्वस्थ व्हायची. हा एक दिवस स्वत:च्या मनाजोगती बायको करून आणेल म्हणून आईनी मामांच्या मदतीने एक मुलगी पसंत करून माझ्या इच्छेविरुद्ध माझा साखरपुडा उरकला’. ‘लग्नानंतर एकाच वर्षात माझी मुंबईला बदली झाली, पण आईने बायकोला गावीच ठेवून घेतले; ती मुंबईला गेली, तर आमचं कोण करणार असं म्हणाली.’ इत्यादी इत्यादी.

ज्या स्त्रिया मुलग्यांवर एवढा अधिकार गाजवतात, त्या सुनांवर किती गाजवत असतील, याची आपण कल्पना करू शकतो. एका बहुराष्ट्रीय कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करणारी तरुणी म्हणालीच, “कामाच्या जागी स्त्री-पुरुष भेद फारसा जाणवत नाही, घरात मात्र त्याचा काच होतो. कधी कधी असं वाटतं, थोडं तरी मनासारखं जगावं, पण सासूसासऱ्यांपुढे खूप दबून राहावं लागतं.” मुद्दा हा आहे की, अधिकारांचा गैरवापर करण्याची संधी काही आजच्याच तरुणींना मिळते असे नाही, पूर्वीच्यापण स्त्रिया ती घेत होत्या. आपल्या पारंपरिक कुटुंबव्यवस्थेत सत्तेची काटेकोर उतरंड आहे. तिथे लोकशाही आणायला खूप काळ जावा लागेल. पण आज साठीला आलेली शहरी आईवडिलांची पिढी लेकी-सुनांशी बरीच लोकशाही वृत्तीने वागताना दिसते. म्हणून तर 67% उत्तरदाते म्हणाले की, स्त्रियांना होणारा जाचक रुढींचा त्रास शहरांमध्ये पुष्कळ सौम्य झाला आहे. पण याच लोकशाहीवादी बुजुर्ग पिढीचा गैरफायदा घेणारी तरुण पिढीपण दिसू लागली आहे. म्हणून तर या प्रकरणाचा प्रपंच करावा लागत आहे.

आता मुद्दा येतो सहनशीलतेचा. याबाबत एक निरीक्षण असे आहे की, संपूर्ण समाजाचीच वाट बघण्याची, सहन करण्याची पातळी कमी झाली आहे. तंत्रज्ञानाची उपलब्धी, संपर्क साधनांत वाढ, उंचावलेला आर्थिक स्तर, अतिशय व्यग्र जीवनशैली यांमुळे सगळे झटपट मिळण्याची सवय होते आणि त्वरेने कृती करण्याचा उतावीळपणा वाढतो. तो संपूर्ण समाजात वाढला आहे. कुटुंबे विभक्त झाली, अपत्यसंख्या एक किंवा दोनवर स्थिरावली की गरजेच्या वस्तूंसाठी वाट बघावी लागत नाही, त्या तत्काळ मिळतात. कुणाबरोबर काही वाटून घ्यायचे प्रसंग कमी होतात. स्वत:ला कमी घेऊन दुसऱ्याला पुरेसे देण्याची वेळच येत नाही. स्वत:ला काही घेताना इतरांचाही विचार करायचा असतो, या वृत्तीचा परिचयसुध्दा होत नाही. स्वत:चे वेळापत्रक इतरांच्या वेळापत्रकाशी जुळवून घ्यायची गरज पडावी असे प्रसंग अनुभवालाच येत नाहीत. त्यामुळे नकळत स्वकेंद्रीपणा वाढत जातो. यास खरे तर स्वकेंद्रीपणा म्हणण्यापेक्षा ‘पर’दखलतेचा अभाव असे म्हणणे अधिक योग्य होईल. आपले उत्तरदाते ज्या सामाजिक आणि आर्थिक स्तरातील आहेत, तेथे हा ‘पर’दखलतेचा अभाव केवळ स्त्रियाच नाही, तर आबाल-वृद्धांमध्येसुध्दा वाढला आहे.

तरुण मुलींमधील स्वकेंद्रीपणा वाढला आहे असे जर कुणाचे निरीक्षण असेल, तर त्यास आज साठीच्या आसपास पोचलेल्या पालकांचे वर्तनसुध्दा मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे असे म्हणता येईल. (स्वकेंद्रीपणा तरुणांमध्येपण वाढला आहे, पण त्याग, समर्पण, सोडते घेणे, इतरांसाठी स्वत:चे प्राधान्यक्रम आणि इच्छा बाजूला ठेवणे या अपेक्षा मुलग्यांपेक्षा मुलींकडून जास्त केल्या जातात. त्या पार्श्वभूमीवर मुलींच्या स्वकेंद्रीपणावर अधिक टिप्पणी होते.)

सुमारे 30-35 वर्षांपासून पाल्याच्या दहावी-बारावीतील गुणांना अतोनात महत्त्व आले. इच्छित अभ्यासशाखेत प्रवेश मिळेल की नाही, हे बारावीच्या आणि विविध प्रवेश परीक्षांमधील कामगिरीवर अवलंबून राहू लागले. त्यासाठी पालक मुलांच्या शिकवणी वर्गांवर अतोनात खर्च करू लागले. पाल्याच्या अभ्यासात व्यत्यय नको म्हणून सर्वतोपरी काळजी घेऊ लागले. ज्या घरात मुलगा-मुलगी शालांत परीक्षा किंवा स्पर्धा परीक्षांना बसतात त्या घरात पाहुण्यांना मज्जाव, सण-समारंभांना फाटा, मित्र-मैत्रिणी, गप्पा यांना बंदी असा शिरस्ता पडला. ते घर जणू ‘मुलांचा अभ्यास’ हा एककलमी कार्यक्रम राबवता राबवता बाकी जगणेच थांबवू लागले. दहावीपासून सुरु झालेला असा जीवनक्रम मूल व्यावसायिक पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण होईपर्यत सुरु राहू लागला. म्हणजे मुलांवर त्यांच्या वयाच्या 15 ते 25 या वर्षांत फक्त आणि फक्त स्वत:चा अभ्यास आणि करिअर यालाच महत्त्व आहे, बाकी कशातही पडायचे नाही, असे संस्कार होऊ लागले. घरात कितीही काम असले, तरी अभ्यास करणाऱ्या मुलामुलींना थोडेसुध्दा मदतीसाठी उठवायचे नाही ही जणू रीतच झाली. घरात इतर कुणाचे आजारपण, लग्नकार्य असले, तरी त्यात गुंतायचे नाही अशीच शिकवण त्यांना मिळू लागली. एवढी सगळी तटबंदी असूनही कुणी भेटायला घरी आलेच, तर मुलांनी खोलीबाहेर येऊन पाहुण्यांशी चार शब्द बोलावेत हीसुध्दा अपेक्षा पालक करेनासे झाले. नव्हे, काही पालकांना तर असा व्यत्यय अतोनात खटकू लागला. मुलांच्या अत्यंत संस्कारक्षम वयात ‘फक्त स्वत:चे ध्येय हाच आयुष्याचा एकमेव केंद्रबिंदू आहे’ असा मुलांचा समज करून दिला जाऊ लागला.

अशी मानसिकता तयार झालेली असताना डोक्यावर अक्षता पडल्याक्षणी तरुण मुला-मुलींनी कुटुंबातील इतरांच्या सोयी-गैरसोयींचा, अडीअडचणींचा, इच्छांचा विचार करावा ही अपेक्षा पूर्ण होणारी नाहीच. आपल्याला कुटुंबसंस्था टिकून हवी असते, पण आपण आपल्या मुला-मुलींना ही संस्था न्याय्य पद्धतीने चालवण्यासाठी तयार करत नाही, हे खरे दुखणे आहे. त्याच वेळी बदलत्या परिस्थितीनुसार तरुण पिढीच्या योग्य-अयोग्यच्या कल्पना आणि त्यांचे प्राधान्यक्रम वेगळे असणार आहेत, हे बुजुर्ग पिढीला मनापासून स्वीकारता येत नाही. ‘आईवडील तिशीच्या मुला-मुलींकडून 100 टक्के आज्ञाधारकतेची अपेक्षा करतात त्याने खूप कुचंबणा होते’ असे एका 32 वर्षीय, पीएचडीधारक तरुणाने सांगितले. तर एक तिशीतलीच इंजिनिअर तरुणी म्हणाली की, ‘सासूसासऱ्यांचे एखादे मत पटले नाही आणि तसे बोलून दाखवले, तर मी त्यांचा उपमर्द केला असे नवऱ्यासकट सर्वांना वाटते आणि सगळे नाराज होतात.’ वेगळे मत मांडणे म्हणजे अपमान करणे नाही. परंतु कुटुंबात ज्या व्यक्तींचा वट्ट असतो त्यांना निराळे मत असणाऱ्या व्यक्ती सहन होत नाहीत व त्यामुळे पडखाऊ सदस्यांची कुचंबणा होते.


हेही वाचा : पाच राज्यांतील सत्तासंघर्ष - विवेक घोटाळे


तरुण पिढीच्या स्वकेंद्रीपणाकडे बोट दाखवताना तीन बोटे पालकांच्या पिढीकडे वळतात हे वास्तव आहे. गेल्या 20-25 वर्षांपासून घरगुती समारंभांत तरूण पिढी सजून-धजून मिरवण्यापुरती दिसते, पण अंग झडझडून काम करताना गायब असते. कुणी तासभर तोंड दाखवून ट्रेकिंगला निघून जाते, कुणी नाटकाच्या तालमी उरकून सगळा समारंभ उरकल्यावर पोचते, कुणी रजा न घेता फक्त लंच ब्रेकमध्ये जेवण्यापुरते हजेरी लावते. थोडक्यात कौटुंबिक कार्यक्रमांसाठी कुणीही आपल्या दिनचर्येत थोडादेखील बदल करायला तयार नसते. सगळ्या रजा ट्रेकिंगला, सहलीला, दूरच्या प्रवासाला जाण्यासाठी, मित्र-मैत्रिणींच्या लग्नांसाठी, किंवा स्वत:च्या वाढदिवसासाठी राखून ठेवलेल्या असतात. कुटुंबाचा आधार गृहीत धरायचा, पण कुटुंबासाठी काहीच खस्ता खायच्या नाहीत हेच वळण जर कळत्या वयापासून मनाला लागले असेल, तर स्वत:च्या संसारात पडल्यावर ही पिढी कुटुंबाचा विचार कसा करणार? आज शहरी, शिक्षित स्तरांत अनेक घरांमध्ये नाराजीचा सूर ऐकू येतो की, तरुण पिढी आई-वडील किंवा सासू-सासरे यांना गृहीत धरते. पण अशा स्वकेंद्री वृत्तीची बीजे शहरी, शिक्षित अशा बुजुर्ग पिढीनेच त्यांच्यामध्ये नकळत रुजवली आहेत, हे कटू वास्तव आहे.

या संदर्भात दोन अत्यंत व्यक्तिगत उदाहरणे देण्याचा मोह मला आवरत नाही.

माझी मुलगी नववीत असताना खूप आजारी पडली (आज ती 32 वर्षांची आहे.) त्यात दीड महिना तिची शाळा बुडली. तिचा बुडलेला अभ्यास उतरून काढण्यासाठी मी वर्गशिक्षिकेच्या परवानगीने तिच्या वर्गात जाऊन 4-5 दिवसांसाठी कुणी आलटून पालटून वेगवेगळ्या विषयांच्या वह्या देईल का अशी विचारणा केली. खेदाची बाब म्हणजे एकाही मुलाने वा मुलीने स्वत:च्या वह्या देण्याची तयारी दाखवली नाही. मुलीच्या दोन-तीन मैत्रिणी तयार होत्या, पण आई नाही म्हणाली असे त्यांनी सांगितले. अखेरीस शिकवणी वर्ग चालवणाऱ्या आमच्या इमारतीतील एका बाईंनी मुलीला झेपेल अशा बेताने दोन महिने घरी येऊन तिला सर्व अभ्यासक्रम शिकवला. स्वत:स अत्यंत सुसंस्कृत, शिक्षित समजणारे पालक जर आपल्या मुलांना आजारी व्यक्तीविषयी एवढी असंवेदनशीलता शिकवत असतील, तर आजच्या मुली स्वकेंद्री झाल्या आहेत, अशी तक्रार आपण कोणत्या अधिकारात करणार? सर्वच पालक असे असतात आणि प्रत्येक तरुण-तरुणी स्वकेंद्री असतात असे मुळीच नाही. पण समाजात असा वर्तनप्रघात वाढताना दिसतो आहे, हे नक्की.

आपली औपचारिक शिक्षणव्यवस्थासुध्दा कुटुंबाला गृहीत धरण्यास शिकवते असे खेदाने म्हणावेसे वाटते. आज व्यक्तिमत्त्व विकासाचा भाग म्हणून शाळा अनेक अभ्यासबाह्य उपक्रम चालवतात. ते चांगलेच आहे. पण समाजाप्रती संवेदनशीलता शिकवताना त्यात कुटुंबाचा समावेश होत नाही. आज शहरांमधील अनेक नावाजलेल्या शाळांमध्ये वर्षभर काही ना काही उपक्रम सुरु असतात आणि त्यांत भाग घेणे विद्यार्थ्यांना सक्तीचे असते. यातही गैर काही नाही, परंतु या उपक्रमांत कुटुंबाच्या अडचणी समजून घेणे, घरातील वृद्ध, लहान मुले, आजारी माणसे यांना मदत करणे या शिकवणीचा लवलेशही नसतो. घरात राखीपौर्णिमेसाठी आई-वडिलांची आणि स्वत:ची भावंडे जमलेली असताना, स्वच्छतेपासून ते स्वयंपाकापर्यंत खूप काम पडलेले असताना घरातील मुले मात्र शाळेने लावलेल्या राखीच्या स्टॉलवर राख्या विकायला उभी! घरात गणपती बसवायची धांदल असताना ती शाळेच्या गणपतीपुढे रांगोळ्या काढायला आणि सजावट करायला दोन दिवसांपासून शाळेत!! घरात आजोबा रुग्णालयात दाखल असताना किंवा आई दाढ ठणकते म्हणून झोपून असताना मुलगा मात्र शाळेने दत्तक घेतलेल्या कुठल्या तरी खेडयात श्रमदान करायला, आणि मुलगी एड्सवरचे पथनाट्य करायला बाहेर!!! कुटुंबात अडचण आहे म्हणून शाळेतला उपक्रम बाजूला ठेवावा हे ना शाळेला पटते, ना मुलांना. काही पालकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली, तर शाळा त्यांना सामाजिक बांधिलकीविषयी चार बोल सुनवते. जणू काही कुटुंब हा समाजाचा भाग नाहीच. ‘चॅरिटी बिगिन्स अ‍ॅट होम’ ही उक्ती शाळा आणि मुले दोघांनाही मान्य नसते.

कार्यानुभव या विषयात कधीच प्राथमिक पाककौशल्य शिकून आठवड्यातून एकदा तरी स्वयंपाकघरात मदत करणे, घरातील फ्रिजची स्वच्छता, रद्दी आवरणे असे एक काम पूर्ण करून पालकांची सही आणणे, भाजीपाला, किराणासामान यांच्या खरेदीतील खाचाखोचा समजून घेणे, वाणसामान भरून ठेवणे, भाज्या निवडणे अशी व्यावहारिक कौशल्ये शिकवली जात नाहीत. याचा परिणाम असा होतो की, ही कामे करण्याचे कंत्राटच जणू तरुण पिढी आई-वडील वा सासू-सासरे यांना देऊन त्याबाबतीत स्वत: पूर्णपणे नामानिराळी राहते.

स्वत:च्या वयाच्या मुलामुलींबरोबर हसतखेळत काम करण्याने श्रम झाले, तरी त्यात मजापण खूप असते. या उलट घरात एकट्याने स्वच्छता, आजारी व्यक्तीला सोबत किंवा आईला स्वयंपाकात मदत ही कामे कंटाळवाणी असतात. ती कर्तव्यबुध्दीने आणि सहसंवेदनेनेच करावी लागते. त्यासाठी मुलांमध्ये कर्तव्यांची जाणीव आणि त्यागाची भावना प्रयत्नपूर्वक रुजवावी लागते. अन्यथा पुढची पिढी थोडाही त्याग करायला आणि कर्तव्य बजावायला टाळाटाळ करणार हे नक्की.

पाच-सहा वर्षांपूर्वी दोन अमेरिकन तरुणी स्टुडंट एक्स्चेंज प्रोग्रॅमखाली माझ्या ऑफिसमध्ये कामाचा अनुभव घ्यायला आल्या होत्या. आमच्या तरुण कर्मचारी वर्गाला त्या कामात मदत करायच्या. तीन महिन्यांचे वास्तव्य आटोपून मायदेशी परतताना त्या त्यांच्या येथील अनुभवांवर बोलल्या. दोघींच्याही कथनात एक मुद्दा सामायिक होता. तो म्हणजे येथील तरुण-तरुणींना घरच्यांचा खूप आधार आणि मदत असते. त्यालाच जोडून त्यांनी हेपण म्हटले की, अगदी तिशी-पस्तीशीतील तरुणांचीसुध्दा अनेक कामे त्यांचे आई-वडील करतात हे बघून आम्हाला फार आश्चर्य वाटले.

आई-वडिलांचा आधार असणे ही चांगलीच गोष्ट आहे, पण आता तो एकतर्फी होत आहे का, आधार घेता घेता आधीच्या पिढीला गृहीत धरले जात आहे का, या मुद्द्यांचा विचार करायची वेळ आली आहे.  

- करुणा गोखले
karunagokhale@gmail.com  
(मराठी लेखिका, अनुवादक, संपादक व स्त्रीमुक्ती चळवळीच्या कार्यकर्त्या / विश्वस्त)


भाग 1 स्त्रीमुक्ती चळवळ - संशोधनावर आधारित लेखाजोखा
भाग 2 या घरकामाचे करायचे काय? (पूर्वार्ध)
          या घरकामाचे करायचे काय? (उत्तरार्ध)
भाग 3 आक्रमकता आणि अधिकारांचा गैरवापर
भाग 4 संवादाचा अतिरेक आणि अभाव
भाग 5 स्त्री मुक्तीच्या विपर्यस्त कल्पना
भाग 6 स्त्री चळवळीचे पुरुषांना जाणवणारे (स्त्रियांवरील) दुष्परिणाम

Tags: स्त्रीवाद स्त्री-पुरुष स्त्रीवादी विचारसरणी करुणा गोखले Load More Tags

Add Comment

संबंधित लेख