वाचकांनी माझ्या अस्तित्वाचा स्वीकार केला...

 माझी कथायात्रा - पूर्वार्ध 

हिंदीच्या प्रसिद्ध लेखिका मन्नू भंडारी यांचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी निधन (15 नोव्हेंबर रोजी) झाले. 1957 मध्ये त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली. त्यानंतर त्यांनी सातत्यपूर्ण लेखन केले. 'महाभोज' आणि 'आपका बंटी' या कादंबऱ्यांनी त्यांना वेगळी ओळख मिळवून दिली. 'मैं हार गई', 'तीन निगाहों की एक तस्वीर', 'एक प्लेट सैलाब', 'यही सच है', 'आंखों देखा झूठ', 'त्रिशंकु' यांसारख्या त्यांच्या कलाकृतींनी हिंदी साहित्यावर अमीट छाप सोडली. 2008 मध्ये राधाकृष्ण प्रकाशनाकडून आलेल्या 'संपूर्ण कहानियाँ' या पुस्तकात त्यांनी 'मेरी कथायात्रा' हा आत्मचरित्रपर लेख लिहिला आहे. त्यांच्या कथांचा मराठी अनुवाद करणारे चंद्रकांत भोंजाळ यांनी या लेखाचा अनुवाद केला असून कर्तव्यवरून तो दोन भागांमध्ये प्रसिद्ध करत आहोत. 

माझ्या कथायात्रेच्या आरंभबिंदूचा विचार मनात येताच डोळ्यांसमोर मी पहिली कथा लिहिली तो काळ उभा राहतो. एम.ए ची परीक्षा उत्तीर्ण होताच मी कलकत्त्याच्या ‘बालीगंज सदन’ मध्ये शिकवायला सुरुवात केली होती. त्या शाळेच्या व्यतिरिक्त मी त्या वेळच्या कलकत्त्यातील ‘अनामिका’या प्रसिद्ध नाट्यसंस्थेशी जोडली गेले होते. ‘अनामिका’ ही संस्था हिंदी नाटकांचे प्रयोग करण्यासाठी आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी प्रसिद्ध होती. त्यांचे कार्यक्रम सतत होत असत.

ज्या भावाच्या आणि बहिणीच्या घरी मी राहिले होते, तिथे सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध होत्या. आणि माझ्यावर जबाबदारी अशी कोणतीही नव्हती. त्यामुळं मी इतर काहीतरी करण्यासाठी धडपडत असे. मी कलकत्त्याला जाण्याच्या आधीच श्रीयुत भंवरमलजी सिंधी यांच्या नेतृत्वाखाली मारवाडी समाजामध्ये समाजसुधारणेची क्रांतिकारक चळवळ सुरु झालेली होती. त्यामध्ये माझ्या मोठ्या बहिणीचा, सुशीलाचा पुढाकार होता. त्यासाठीच ती प्रसिद्ध होती. तिचं कार्य अजूनही सुरूच होतं... याचाच अर्थ वातावरणात एक प्रकारचा जिवंतपणा होता. आणि काहीतरी करण्याची इच्छा माझ्या मनात होती. अगदी काहीच नाही तर साहित्याच्या क्षेत्रात राहण्याची तरी माझी इच्छा होती.

वाचण्याची आवड घरामध्ये आणि बाहेरही मित्रांमध्ये सगळ्यांनाच होती... सगळे जण खूप वाचत असत. चर्चा आणि वादविवादही खूप होत. पण हे सगळं मन रमवण्यासाठी चाललं होतं. त्यात आमचा वेळही छान जात असे. अशा वातावरणात कुणाचंही मार्गदर्शन नसताना, प्रोत्साहन नसताना मी माझी पहिली कथा ‘मैं हार गई’ कशी लिहिली हे माझं मलाच माहीत नाही.

मी कथा तर लिहिली, पण ती कुणाला दाखवावी हेच समजत नव्हतं. कथा वाचायला देऊन मार्गदर्शन मिळवावं असं कुणीही परिचयाचंही नव्हतं. सेंगरजी (मोहनसिंह सेंगर) हे त्या वेळी ‘नया समाज’चे संपादन करीत होते. त्यांची संध्याकाळ बहुतेक करून माझ्या बहिणीबरोबर आणि जिजाजींबरोबरच जात असे. पण संकोचामुळे माझी त्यांच्याशी बोलण्याची हिंमतच होत नव्हती. पण लिहिलेली कथा स्वस्थ बसूही देत नव्हती. शेवटी संकोच सोडून मी ती कथा ‘कहानी’ या मासिकासाठी पाठवून दिली. आणि श्वास रोखून मी त्यांच्या उत्तराची वाट पाहत राहिले.

कितीतरी दिवस उलटले, पण त्यांच्याकडून काहीच उत्तर आलं नाही. पण ‘माझ्या कथेचं काय झालं?’ असं त्यांना रिमाइंडर पाठवून विचारायची हिंमत होईना. त्यांनी जर कथेबाबत काही विचार केला असताच तर त्यांनी उत्तर दिलंच असतं, असंही वाटत होतं. त्यांनी माझी कथा केराच्या टोपलीत टाकली असावी. मग ते उत्तर तरी काय देणार होते? मग मी कथेबाबत विचार करणंच सोडून दिलं. मी कथा लिहिली होती हेच जवळजवळ विसरले. तेव्हाच भैरवप्रसाद गुप्त यांचं उत्तर आलं. त्यांनी पत्रातून माझ्या कथेचं खूप कौतुक केलं होतं. आणि पुढच्या अंकात ती कथा छापलीही गेली.

मासिकात छापलेली आपली कथा पहाणं हा माझ्यासाठी रोमांचक अनुभव होता. त्यानंतर कितीतरी महत्त्वपूर्ण प्रसंग माझ्या आयुष्यात घडले, पण तसे थ्रील, तसा रोमांच मी त्यानंतर कधीही अनुभवला नाही. माझ्या कथेवर बनलेला ‘रजनीगंधा’ हा चित्रपट. त्याची सिल्व्हर ज्युबिली... ‘धर्मयुग’ मध्ये क्रमशः छापली गेलेली ‘आपका बंटी’ ही कादंबरी... त्यावरच्या वाचकांच्या प्रतिक्रिया... ‘महाभोज’चा अविस्मरणीय प्रयोग... आणि सगळ्या वृत्तपत्रांतून त्याची आलेली परीक्षणं...पण पहिल्या कथेच्या वेळेचा रोमांचक अनुभव मला पुन्हा कधीही आला नाही हे मात्र खरं.

आज विचार करते तेव्हा आश्चर्य वाटतं की, कथा लिहिताना मनात पेच होता, संकोच होता... आपण जे काही लिहिलं आहे ते बरं म्हणण्याच्या लायकीचे तरी आहे का, या बाबत विश्वास वाटत नव्हता. पण ती कथा छापून येताच मन आत्मविश्वासानं ओसंडून गेलं. माझी कथा फक्त छापलीच गेलीये असं नाही, तर वाचकांनी एक प्रकारे मला स्वीकारलं आहे, माझ्या अस्तित्वाचा स्वीकार केलाय, आपली एक विशिष्ट ओळख निर्माण झालीय, असं मला वाटू लागलं.

स्वीकृतीच्या आश्वासनामुळंच आत्मविश्वासाला एक प्रकारची धार येते.
कितीतरी वेळा माझ्या मनात विचार येतो की, जर माझी कथा साभार परत आलेली असती तर मी पुढं लिहीत राहिले असते का? की माझा छंद मी सोडून दिला असता? कारण मागं वळून पहाते तेव्हा लक्षात येतं की त्या वेळी लेखनात एक प्रकारचा उत्साह होता, बेचैनी होती, आग्रह होता. हा उत्साह भैरवजींनी कौतुक केल्यावर आणि वाचकांची पसंती कळल्यावर द्विगुणित झाला होता. पण तो केवळ उत्साहच होता... मनात घोळणाऱ्या घटना गोष्टींमध्ये गुंफून सांगण्याचा. त्यामागं एखादा गंभीर विचार किंवा जबाबदारीची जाणीव वगैरे असं काहीही  नव्हतं.

पण कोणत्याही अडचणीशिवाय दोन-तीन कथा छापून आल्यानंतर आणि वाचकांच्या अधिकतर प्रशंसात्मक प्रतिक्रिया आल्यावर मात्र मी कोणत्याही संकोचाशिवाय  आत्मविश्वासानं कथा लिहू लागले. इथं एक गोष्ट सांगायलाच हवी की, या कथांबरोबर माझा फोटो छापला गेलेला नव्हता. आणि माझ्या नावामुळं वाचकांचा गोंधळ होऊन बहुतेकांनी मला पत्र लिहिताना ‘प्रिय भाई’ असंच संबोधलं होतं. मला खूप हसू आलं.पण एका गोष्टीचा आनंदही झाला की, हे कौतुक मी स्त्री म्हणून होत नसून... कथा खरेच आवडली आहे म्हणून केलं जात आहे. माझा फोटो कथेबरोबर छापला जाऊ लागल्यावर लोकांचा हा गैरसमजही दूर झाला होता. तोपर्यंत मी एका बैठकीत कथा लिहीत असे. अगदी सहजपणे. कलात्मकता, शैली, प्रतिमा, प्रतीके वगैरे गोष्टी माझ्या कल्पनेपलीकडच्या होत्या... पण एक प्रकारचा उत्साह होता. आणि ज्यांच्या आयुष्यातील घटनांविषयी लिहावं असं वाटत होतं ती सगळी माणसं ओळखीची होती.त्यांना कथेत गुंफून वाचकांसमोर मांडण्यासाठी मनाची तगमग होत होती. सुरुवातीच्या कथा याच उत्साहात लिहिल्या गेल्या.

सात कथा लिहिल्यानंतर माझी राजेंद्र यादव यांच्याशी ओळख झाली. आणि दोनचार भेटींनंतर ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं. त्या वेळी आमच्या मैत्रीचा आधार मुख्यत: लेखन हाच होता. राजेंद्र माझ्या कथा ऐकत आणि त्यावर चर्चा करीत असत. ते मला सूचनाही करीत असत. पण मला त्यांचे काही मुद्देच पटत असत. कारण त्यांच्या काही सूचना या माझ्या कल्पनेपलीकडच्या होत्या. माझ्या कथा साध्या, सहज आणि पारदर्शी असत. (तुम्ही त्यांना निरर्थकही म्हणू शकता.) आणि राजेंद्रजींच्या सूचना मोठ्या नाट्यपूर्ण असत. पण मला कथेसंबंधात त्यांच्याशी वाद घालण्याइतपत समज आलेली  होती. काहीही असो, राजेंद्र यांच्या सूचना असोत किंवा त्यांच्याशी झालेले वाद असोत, त्यामुळे मी कधीही निराशा झाले नाही. उलट मला प्रोत्साहनच मिळालं. आणि माझ्या मगदुराप्रमाणे मी कथा लिहित राहिले. त्या छापूनही येत राहिल्या.

1957 मध्ये ‘मैं हार गई’ या शीर्षकानं ‘राजकमल’ प्रकाशनातर्फे माझा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला. ‘कहानी’सारख्या प्रतिष्ठित मासिकात पहिली कथा छापून येणं आणि ‘राजकमल’सारख्या मोठ्या प्रकाशनाकडून पहिला कथासंग्रह प्रकाशित होणं... या गोष्टीचं महत्त्व त्या वेळी मला फारसं वाटलं नाही. पण आज मागं वळून पहाते तेव्हा लक्षात येतं की, १९५७ मध्ये अमृतरायजींनी इतर काही लेखकांच्या मदतीनं अलाहाबाद इथं मोठ्या स्तरावर प्रगतिशील लेखकांचं एक संमेलन आयोजित केलं होतं. त्यात सर्व पिढीतील लेखकांचा सहभाग होता. त्यांचं निमंत्रण आल्यावर मी खूपच भारावले होते. पण हे मात्र खरंच की, राजेंद्र यांची सोबत मिळाली नसती तर त्या संमेलनाला मी एकटी कधीच गेले नसते.

कथा लिहिणं, त्या छापल्या जाणं आणि एक संग्रह प्रकाशित झाल्यावरही मी स्वत:ला कथाकार समाजत नव्हते. त्यामुळे साहित्य संमेलनात भाग घेण्याचं धारिष्ट्य माझ्यामध्ये नव्हतं. तिथं पहिल्यांदा मोहन राकेश, कमलेश्वर, रेणू, अमरकांत, आणि नामावर सिंह यांची गाठ पडली होती. कमलेश्वरजींना त्या संमेलनात झपाटल्यासारखं काम करतानाही पाहिलं होतं. महादेवी वर्मा, आणि हजारीप्रसाद द्विवेदी यांची अद्‌भुत आणि अविस्मरणीय भाषणंही ऐकली होती. या सगळ्यांचा उत्साह बघितला होता. वेगवेगळ्या परिसंवादातून त्यांचे विचार ऐकायला मिळाले होते. तिथून परतल्यानंतर काही दिवसांनी राकेशजी आणि कमलेश्वरजी यांच्याशी पत्रव्यवहारही सुरू झाला होता. कमलेश्वरजींनी आपल्या नव्यानं सुरू केलेल्या ‘श्रमजीवी प्रकाशना’साठी पुस्तक मागितल्यावर मी त्यांना आपल्या ‘तीन निगाहों की एक तस्वीर’ या  दुसऱ्या कथासंग्रहाची फाईल पाठवून दिली होती. 1958 मध्ये माझा दुसरा कथासंग्रह प्रकाशित झाला. आता या लोकांच्या समूहात आपण सामील झालो आहोत असं मला वाटू लागलं होतं. माझ्या मनामध्ये एक नवीन विश्व आकाराला येत होतं.

राजेंद्रजींच्या मैत्रीची दिशा हळूहळू वेगळ्या दिशेला गेली आणि नोव्हेंबरमध्ये आम्ही विवाहबद्ध झालो. त्यामुळं सगळं वातावरणच बदललं. एका बाजूनं पुस्तकं, मासिकं, साहित्यिकांशी भेटीगाठी,चर्चा, वादविवाद  हे सगळं लिहिण्यासाठी प्रेरणादायी होतं... तर दुसरीकडे नोकरी आणि घरातल्या जबाबदाऱ्याही होत्या. आत्तापर्यंत मी घरातल्या जबाबदाऱ्यांपासून मुक्तच होते. राजेंद्रजींबरोबरचे संबंध लग्नानंतर बदलले. ते बंधनकारक वाटू लागले होते. काहीही असलं तरी लेखन मात्र चालूच होतं. कारण त्या दिवसांत लिहिणं हे माझ्यासाठी कष्टसाध्य नव्हतं.

कलकत्त्यावरून प्रकाशित होणाऱ्या ‘ज्ञानोदय’ या मासिकात काही दिवसांपूर्वी एक प्रायोगिक कादंबरी दहा लेखकांनी लिहिली होती. ‘ग्यारह सपनों का देश’ ही ती कादंबरी दहा लेखकांनी लिहिली होती. ती पूर्णपणे फसली होती. श्री लक्ष्मीचंद्र जैन यांनी एक प्रस्ताव आणला. मी आणि राजेंद्र यांनी मिळून एक प्रायोगिक कादंबरी ‘ज्ञानोदय’साठी लिहावी असं त्यांचं म्हणणं होतं. त्या कादंबरीचं एक प्रकरण मी लिहायचं आणि एक राजेंद्र यांनी लिहायचं अशी त्यांची कल्पना होती. दोघे लेखक एकाच ठिकाणी राहत असल्यामुळं कथा मनमानी पद्धतीनं लिहिली जाणार नाही. चर्चा करून कादंबरीची ढोबळ पद्धतीनं सुरुवात ठरवता येईल असं त्यांना वाटत होतं. या कादंबरीच्या यशाबद्दल त्यांना सुरुवातीपासूनच खात्री वाटत होती.

थोड्याशा चर्चेनंतर, वादविवादानंतर राजेंद्रजींचीदेखील खात्री पटली. पण माझ्या मनात शंका होती. ती शंका प्रयोगाबद्दल होती की माझ्यामधे आत्मविश्वासाची कमतरता असल्यामुळे होती कुणास ठाऊक? काहीही असलं तरी शेवटी मी तशा पद्धतीने कादंबरी लिहायला तयार झाले. आणि जानेवारी 1961 पासून डिसेंबर 1961 पर्यंत ‘ज्ञानोदय मध्ये ‘एक इंच मुस्कान’ही आमची प्रायोगिक कादंबरी छापली गेली. पण पहिलं प्रकरण लिहून राजेंद्रजींनी त्या कादंबरीची सुरुवात केली होती आणि शेवटचं प्रकरण लिहून मी कादंबरीचा शेवट केला होता.

या वर्षभरात त्या कादंबरीची सहा प्रकरणं लिहिणं आणि एका मुलीला जन्म देणं या व्यतिरिक्त मी काहीही करू शकले नव्हते. मी प्रकरणंही कशी लिहिली हे माझ्या व्यतिरिक्त ‘ज्ञानोदय’चे संपादक शरद देवडा हेच जाणत होते. तर कादंबरीच्या मध्यातच मी मुलीला जन्म देण्याव्यतिरिक्त ही जबाबदारी कशीतरी निभावली. आनंदाची गोष्ट इतकीच की, कादंबरीवरील प्रतिक्रिया संतोषजनक होत्या. ती कादंबरी पूर्ण झाल्यावर तो प्रयोग यशस्वी झाला इतकंच मानले गेलं असं नाही, तर त्या प्रयोगाचं खूप कौतकही झालं. आणि आज 40 वर्षांनंतरही त्यातून मिळणारी रॉयल्टी हेच दर्शवते की, ती आजही  बऱ्यापैकी विकली जाते आहे.

1962 मधे भैरवप्रसाद गुप्त यांनी ‘नयी कहानियाँ’चा राजीनामा दिल्यानंतर  (काही वर्षांपूर्वी भैरवजी ‘कहानी’ मासिकातून ‘नयी कहानियाँ’ मधे आले होते.) मला ओमप्रकाशजींचं पत्र आलं. त्यात त्यांनी लिहिलं होतं की, जोपर्यंत त्यांना सक्षम संपादक मिळत नाही, तोपर्यंत ते अतिथी संपादक नेमून अंक प्रकाशित करणार आहेत. त्यांनी पुढं लिहिलं होतं की, त्यातल्या पहिल्या अंकाचं संपादन मी करावं.

दोन कथासंग्रह प्रसिद्ध होऊनही आणि कथाकारांच्या वर्तुळात मला मानसन्मान मिळत असूनही ही जबाबदारी अंगावर घेण्याचं धाडस मला होत नव्हतं. मी संपादन करू शकेन का?  मी मागितल्यावर कुणी कथा पाठवील का? अशा अनेक शंका मनांत उपस्थित झाल्या. त्यामुळं त्यांना होकार द्यायला मला थोडासा वेळ लागला. पण शेवटी मी त्यांचा प्रस्ताव स्वीकारला. आणि भराभर अनेक लोकांना कथा पाठविण्यासंदर्भात पत्रं टाकून दिली. अधिकतर प्रमुख लेखकांच्या पहिल्या प्रतिक्रिया सकारात्मक होत्या. आणि हळूहळू कथाही आल्या. कथांचा दर्जादेखील चांगला होता. माझ्या आठवणीप्रमाणे राजेंद्रजींची सर्वश्रेष्ठ कथा ‘टूटना’ ही याच अंकात प्रकाशित झाली होती. अंक खूपच चांगला झाला होता. त्या अंकानं फक्त माझा आत्मविश्वासच वाढवला नाही तर कथेकडं मला अधिक गंभीरपणे पहायला शिकवलं.

हळूहळू हे समजू लागलं की शीर्षकापासून लेखकाला जे काही सांगायचं आहे त्यापर्यंतचा प्रवास, घटनेतले बारकावे आणि पात्रांची स्वभाववैशिष्ट्ये यांचा तोल संभाळत संयत, संतुलित आणि सांकेतिक पद्धतीनं करणं म्हणजे कथालेखन होय. पण हे समजू लागल्यानंच संकटं उभी राहिली. सुरुवातीला कथेतली पात्रं माझ्या बरोबरीनं चालत असत. पण नंतर ती जणू समोर येऊन उभी राहू लागली. सुरुवातीच्या घटना आपोआप जुळत असत... एकामागून एक...सहज... विनासायास. पण आता एक घटना आपण शब्दांत पकडण्याचा प्रयत्न केला की, चार घटना समोर येऊन उभ्या राहू लागल्या... नव्या दृष्टिकोनाची, नवीन विश्लेषणाची मागणी करू लागल्या. आता एकपदरी पात्रांच्या ऐवजी अंतरद्वंद्वामध्ये जगणारी पात्रं मला आकर्षित करू लागली.

विचार आणि संस्कार यांच्या द्वंद्वात मधेच लटकणारी ‘त्रिशंकू’मधील माँ असो किंवा मातृत्व आणि स्त्रीत्व यांच्या द्वंद्वात सापडलेली ‘आपका बंटी’मधील शकुन असो, आदर्श आणि यथार्थ, स्वप्न आणि वास्तव, यांच्यामध्ये चिरडली जाणारी ‘क्षय’मधील ‘कुंती’ असो किंवा ‘तिसरा हिस्सा’मधील शेराबाबू असोत, अशी पात्रं भावुक न होता चित्रित करणं केवळ आकर्षकच नाही तर आव्हानात्मक वाटू लागलं. आणि लेखनासाठी अनिवार्यदेखील. पण या जाणिवेमुळं लेखन कष्टसाध्य झालं. आता उत्साहानं कथा लिहिण्याचा काळ मागं पडला. आणि कथा ‘लिहायला’ सुरुवात झाली.

विचार, विवेक, आणि अंतर्दृष्टी हाच कथालेखनाचा आधार बनला. यामुळं कथालेखनावर असा अंकुश लागला की, आता एका बैठकीत कथा लिहिणं शक्यच होईना. कोणती घटना किंवा पात्रं, कोणता विचार कथा लिहायला प्रेरणा देई तेव्हा वास्तवाला सर्जनापर्यंत पोहोचण्यासाठी  कितीतरी पायऱ्या चढाव्या लागू लागल्या. छोट्या घटनेला मोठ्या संदर्भाशी जोडण्यासाठी  कितीतरी प्रयत्न करावे लागू लागले. मनांत कितीतरी भावभावना जगवाव्या लागल्या. तर कधी दडपाव्या लागल्या... भाषाशैलीबाबत सजगता बाळगावी लागली.

आश्चर्याची  गोष्ट अशी की, माझ्या सुरुवातीच्या कथांत... ज्या मी एका बैठकीत लिहून पूर्ण केल्या होत्या, त्यांत हे काहीही नसतानादेखील नकळतपणे माझ्या मनातील रचना प्रक्रिया हेच काम करीत होती. त्यामुळेच कदाचित मी कलकत्त्यात सातआठ वर्षं राहूनही मी लिहायला सुरुवात केली तेव्हा माझ्या सुरुवातीच्या कथेतील पात्रं अजमेर इथल्या ब्रह्मपुरी परिसरातील होती. त्या परिसरात मी माझं लहानपण घालवलेलं होतं. ‘अकेली’ या कथेतील सोमाबुआ, ‘नशा’मधील आनंदी, ‘मजबुरी’मधील दादी अशी करुण पात्रं असोत किंवा ‘दिवार, बच्चे आणि बारीश’मधील क्रांतिकारक नायिका असो, ही सगळी ब्रह्मपुरीमधील जिवंत माणसंच होती. ज्यांना मी केवळ पाहिलंच  नव्हतं तर मी यांच्याशी जोडली गेले होते.

लिहिणं सुरु झाल्यावर ही सगळी पात्रं नव्या संदर्भात आणि नवीन अर्थ घेऊन जिवंत होऊन माझ्याभोवती फिरू लागली. सोफिया कॉलेजमधील एक घटना मी फक्त ऐकली होती. त्यात एका ननने वर्गात किट्सची एक कविता शिकवताना एका मुलीला मिठीत घेऊन तिचं चुंबन घेतलं होतं. तीच घटना  ईसा के घर इन्सान’मध्ये थोडा बदल घडून आली. तर शेजारी राहणाऱ्या कवी सरसयोगीनं आपली कथा सांगितली होती. तीच कथा ‘कील और कसक’मध्ये अवतीर्ण झाली.

घटना आणि रचना यांच्यामधील हा खेळ पुढंही चालत राहिला. आणि नंतर तर तो माझ्या लेखनातील एक अनिवार्य घटकच बनला. कोणतीही घटना, पात्र किंवा एखादी ‘आयडीया’ ‘क्लिक’ होताच ती डायरीत नोंदवून ठेवण्याबरोबरच मनातही नोंदवली जाऊ लागली. काही काळानंतर या ‘रॉ मटेरियल’मधील बरंचसं धुकं पुसलं जातं. बऱ्याचशा गोष्टी अप्रासंगिक आणि निरर्थक वाटू लागतात. पण बरंचसं काळाबरोबर मनात खोलवर उतरलं जातं. आणि त्यात कोणतीतरी रसायनं मिसळत जातात. ते माझं होत जातं. आणि हे माझं झालेलं इतर ‘मी’ शी जोडलं जाऊ लागतं. हे बाहेरचं ‘मी’ आतल्या ‘मी’ मध्ये काही भर टाकत जातात. आणि बाहेरची ही प्रक्रिया कशी घटीत होते हे मला सांगता येणार नाही. पण याची जाणीव जेव्हा हे सगळं माझ्या कथेत उतरतं तेव्हाच होतं. ती तयार झालेली कथा आपल्या मूळ रूपापेक्षा अतिशय भिन्न असते. कधीकधी तर मलाही ती ओळखू येत नाही. मूळ घटना केवळ ‘स्टार्टिंग पॉईंट’ चं काम करते.

हा जो वेळ मी घेते ती कदाचित माझी मर्यादादेखील असू शकेल. कानपूरमध्ये तीन बहिणींनी पंख्याला लटकावून आत्महत्या केली होती. ही हृदयद्रावक घटना घडल्यावर मी त्यावर काहीही लिहू शकले नव्हते. मी असंवेदनशील आहे अशी माझ्यावर टीकाही झाली होती. प्रत्येक दिवशी अशा धक्कादायक घटना वृत्तपत्रांतून येतच असतात. काही काही तर तुमच्या डोळ्यांसमोर घडतात. पण तरीही त्या घटनेवर कथा लिहिली जात नाही. ही माझी मर्यादा असेल का?  कदाचित हो. पण कथेला वृत्तपत्रातील घटनेपासून वेगळं ठेवणं ही माझी जबाबदारीही असू शकते.

या रचनाप्रक्रियेत काही गोष्टी अचानकच माझ्या समोर आल्या. आपल्या आंतरिक ‘मी’ला बाहेरच्या अनेक ‘मी’शी जोडण्याच्या इच्छेनं ‘मी कशासाठी लिहिते?’ या प्रश्नाचं उत्तर मला सापडलं. मी लिहायला सुरुवात केली तेव्हापासून मला या प्रश्नाला अनेक वेळा तोंड द्यावं लागलेलं आहे. पण त्याचं कधीही समाधानकारक उत्तर मी स्वतःलाच देऊ शकलेले नव्हते. मग मी दुसऱ्यांना याचं काय उत्तर देणार होते? 

या सगळ्या प्रक्रियेनं मला उत्तराच्या ज्या टोकावर आणून उभं केलं होतं, ते एकमात्र अंतिम उत्तर आहे असा दावा मी आजही करू शकणार नाही. पण हा एक महत्त्वपूर्ण दृष्टिकोन आहेच. 

 (अनुवाद - चंद्रकांत भोंजाळ)

- मन्नू भंडारी


वाचा 'मेरी कथायात्रा' या आत्मचरित्रपर लेखाचा उत्तरार्ध 
वाचकांना विचार करायला भाग पाडणं हीच माझ्या सार्थकतेची  कसोटी...

Tags: हिंदी अनुवाद मन्नू भंडारी चंद्रकांत भोंजाळ कथा लेखक लेखन लेखनप्रक्रिया व्यक्तिवेध हिंदी साहित्य स्त्रीवाद स्त्री रचनाप्रक्रिया Marathi Hindi Translation Mannu Bhandari Chandrakant Bhonjal Story Writing Proccess Autobigraphical Women Novel Hindi Literature Literature Load More Tags

Comments:

अनुया अहिरे

धन्यवाद या उपक्रमाबद्दल!

संजय मेश्राम

खूप छान माहिती. उत्तम अनुवाद. (नामावर सिंह नव्हे, नामवर सिंह)

Add Comment