शाळेचा शेवटचा दिवस सगळ्यांच्याच आयुष्यात येतो. फारच भावनिक क्षण असतो तो. आपली शाळा, त्या भिंती, ते बेंचेस काही एक परत दिसणार नाही म्हणून एक अनामिक बेचैनी घर करून राहते. सगळ्यांचंच होतं. तुमचंही अन माझंही...
त्याबद्दल आपण नंतर आठवणीही काढतो. पण दोन दिवसांपूर्वी एक घटना पाहण्यात आली, अन आपलं 'शाळेवरचं प्रेम खरंच विशुद्ध होतं का?' असा प्रश्न मनात पिंगा घालू लागला..
प्रश्न पडण्याचं कारण आधी सांगतो.. जरी शेवटच्या दिवशी आपण शाळेबद्दल भावनिक झालो, तरी आपण गेली कित्येक वर्षे शाळेला नावंच ठेवत आलेलो असतो. पण फक्त शेवटच्या दिवशी वाईट वाटतं.
पण जो प्रसंग मी सांगणार आहे, त्यावरून माझ्या लक्षात आलं, की शेवटच्या दिवशी जे काही वाटतं, ती फक्त एक प्रासंगिक भावना असते. त्याला 'Pure Love' असं म्हणणं थोडसं घाईचं वाटतं.
साधना विद्यालय, नेलगुंडा इथे पाचवीपर्यंत इंग्लिश मिडीयम शाळा आहे, जी तिथल्याच आदिवासी मुलांसाठी 2015 पासून चालवली जाते. कोरोनामुळे या मुलांना मार्च मध्येच घरी जावं लागलं. 15 दिवसांनी परत यायचंच आहे, म्हणून ही मुलं फक्त पुस्तकं आणि वह्या बरोबर घेऊन गेली. म्हणजे त्यांचं शाळेतलं दप्तर, त्यात पेन्सिल इत्यादी साहित्य, जेवणाचं ताट वगैरे सगळंच शाळेच्या वर्गातच राहिलं.
मे महिन्यात मुलांना त्यांचा रिझल्ट आणि शाळा सोडल्याचा दाखलाही (TC) देऊन टाकलेला होता. परवा साडेतीन महिन्यानंतर ही मुलं राहिलेलं साहित्य घ्यायला आली. वर्ग मार्चपासून बंदच होता, त्यामुळे फारसा घाण झाला नव्हता. पण चोहोबाजूंनी जंगल असल्याने पालापाचोळा अन थोडीफार धूळ वर्गात जमली होती. या मुलांनी ते पाहिलं, अन क्षणार्धात, 'आपला वर्ग किती घाण झालाय' असं म्हणून कोपऱ्यातील दोन-चार झाडू घेऊन सर्व अगदी स्वच्छ करून टाकलं. मी समोरच होतो. त्यांनी ना मला 'हे साफ करू का? म्हणून विचारलं, ना 'हे आपण करायला हवं का'? असला विचार केला. एकाच्याही मनात, 'आता हा आपला वर्ग राहिलेला नाहीये, इतकंच काय तर शाळाही आपली नाहीच आता' असला कोता, मतलबी विचार आला नाही.
मी नेहमी मुलांची टिंगल करतो, चिडवतो. ते ही माझ्यासोबत चिडवाचिडविचा खेळ खेळतात. मुलं जेव्हा झाडू लागली, तेव्हा मी चिडवण्यासाठी, 'हा वर्ग, ही शाळा तुमची कुठाय आता?' असं म्हणणार होतो... पण मुलांच्या प्रेमातून निर्माण झालेल्या त्या कृतीची टिंगल करण्याचं धाडस मला झालं नाही. प्रेमाच्या संस्कारापुढे टिंगलीचा विकार कधीच लोप पावला होता. मी त्या कृतीने इतका भारावून गेलो की मला पूर्ण दिवस भरून आल्यासारखं वाटत होतं. आपल्या शाळेवर इतकं विशुद्ध प्रेम करणं आपल्याला जमलं होतं का? हा प्रश्नही तेव्हापासून मनात पिंगा घालतोय...
शाळा सोडताना वाईट वाटणं ही एक तात्कालिक भावना असते, हे तेव्हा कळलं. पण पाचवीच्या चिमुकल्या मुलांच्या मनातून निर्माण झालेलं हे प्रेम, हा आपलेपणा नैमित्तिक नव्हतं, तर चिरकाल टिकणार शाश्वत सत्य आहे.
कारण, आपण जेव्हा पाचवीमध्ये होतो (लक्षात घ्या आपण 15-16 वर्षांचे जाणते झाल्यावर शाळा सोडतो.) तेव्हा आपण असा विचार केला असता का? अन तेही रिझल्ट, दाखला वगैरे सोपस्कार आधीच पार पडल्यावर? भले आपण नंतर मोठेपणी आपल्या शाळेसाठी देणग्या देऊ, मदत करू, पण त्याची बरोबरी या निरागस प्रेमाशी नाही होऊ शकणार.
एक शिक्षक म्हणून हे माझं यश आहे का? तर नाही. कारण गेले काही महिनेच मी मुलांबरोबर आहे. जिथे शिक्षकांना, 'सर,मॅडम' ऐवजी 'दादा, ताई' म्हंटल जातं, तिथे हे प्रेम या शाळेच्या कणाकणातच भिनलेलं आहे. ती आपुलकी उपजतंच मुलांमध्ये जन्म घेते. लोकबिरादरी प्रकल्पाच्या सेवारूपी वृक्षाला आलेली ही 'फळे रसाळ गोमटी' आहेत. शुद्ध बीजापोटी विशुद्ध प्रेमाचं बीज जोपासलं जातंय.
- गौरव नायगांवकर
(लेखक, लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा (गडचिरोली) तर्फे नेलगुंडा येथे चालवल्या जाणाऱ्या साधना विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.)
BE Mechanical, MBA HR असे शिक्षण घेतल्यानंतर गौरवने जाणीवपूर्वक या प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली आहे.
- संपादक
याच शाळेतील मुलांची सहा महिन्यांपूर्वी मुंबईला सहल गेली होती, त्याचे वर्णन करणारा समीक्षा गोडसे यांचा लेख: नेलगुंडाची मुले मुंबईला...
मागील महिन्यात प्रकाशित झालेला अमित कोहली यांचा लेख: शिक्षण सुरूच राहावे यासाठी… - 'शिक्षणाच्या लॉकडाऊन' वर मात करणाऱ्या लोक बिरादरी प्रकल्पाच्या तीन शाळा
Tags: गौरव नायगांवकर लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा शाळा शिक्षण विद्यार्थी शिक्षक प्रेम साधना विद्यालय नेलगुंडा आदिवासी भाग Gaurav Naygaonkar Lok Biradari Prakalp Hemalkasa School Education Students Teacher Love Sadhana Vidyalaya Nelgunda Adivasi Region Load More Tags
Add Comment