गडचिरोलीच्या पूर्व टोकावर नेलगुंडा या लहानश्या गावात असलेली आमची साधना विद्यालय ही शाळा. अतिशय दुर्गम अशा या भागात अत्यंत दर्जेदार शिक्षण मिळावं या हेतूनं परीसरातील नागरिक व लोक बिरादरी प्रकल्प यांनी मिळून 2015 मध्ये बालवाडी ते पाचवी पर्यंतची इंग्रजी माध्यमातील ही शाळा सुरु केली. या शाळेतलं आपलं हे शेवटचं वर्षं असल्यानं आपली लांब कुठेतरी सहल जाणार, हे आमच्या पाचवीच्या मुलांना नक्की माहिती होतं. वर्ष सुरू होताच पाचवीच्या मुलांनी माझ्या मागं 'We want to see the sea, we want to see a fort!!!' असा धोशा लावला होता. मुलांशी आणि शिक्षकांशी चर्चा केल्यावर मुंबईला सहल न्यावी हे निश्चित झालं.
वैभवी पोकळे साधना विद्यालय परिवारातलीच पण सध्या मुंबईत असते. त्यामुळं या सहलीच्या नियोजनाची जबाबदारी तिनं आनंदानं स्वीकारली. मग काय नुसता धुमाकूळ! मुलांना काय पाहायला आवडेल आणि त्यांच्या समाजिक वाढीच्या दृष्टीने त्यांनी पाहायला हवीत अशी ठिकाणं, व्यक्ती आणि संस्था यांच्या याद्या तयार होऊ लागल्या. मग मी आणि वैभवीताईंनी चर्चा, वाद करत त्यातल्या निवडक गोष्टीच निश्चित केल्या. त्यांची उपलब्धता, सोय, प्रवास, अंतर अशा सगळ्या गोष्टीचा विचार करून एक एक बाब निश्चित होत गेली. अनेक स्नेही-मित्र मैत्रिणींना या निमित्ताने जोडता आलं. जेवणाची सोय शक्यतो साधना विद्यालयाच्या स्नेह्यांकरवी करण्याचं नियोजन केलं.
शाळेतील वातावरण तर भलतंच पेटलं होतं. ही सहल विनामूल्य असल्याचं आम्ही मुलांना आधी सांगितलंच नाही. उलट या सहलीला अंदाजे किती खर्च येईल हे त्यांनाच काढायला लावलं. मुलांनी कधीही पैसे देऊन बस किंवा अन्य साधनांनी प्रवास केलेला नसल्यानं, सहलीचा खर्च काढणं ही त्यांच्यासाठी फारच abstract गोष्ट होती. या आधी संस्थेतर्फे मुलांना आलापल्ली, वरोरा, नागपूर ही शहरं व आसपासची ठिकाणं दाखवली होती. हा सगळा प्रवास त्यांनी संस्थेच्या बसने केला होता. साधारण आलापल्ली पर्यंतचा बसखर्च विचारात घेऊन त्यांनी एकूण सहलीचा खर्च काढायला सुरुवात केली.
या सगळ्यांत आम्ही ताई-दादा त्यांची नुसती मजा पाहत होतो. 'जेवणाचं कसं?' असं विचारल्यावर 'आपण आपला शिधा घेऊन जाऊ' इतका सहज उपाय त्यांनी शोधला. शिधा शिजवायला मुंबईत सरपण अगदी सहज उपलब्ध असेल हे त्यांनी गृहीतच धरलं होतं. खूप दिवस विचार केल्यावर एका मुलाचा खर्च साधारण तीन हजार रुपये इतका येईल असं त्यांनी मला सांगितलं. ‘एवढा खर्च आम्हाला परवडणार नाहीये. आम्ही अर्धेच भरू शकतो’ असंही सांगितलं. मी म्हटलं, ‘आता राहायचं कुठे ते सांगा?’. यावर ते म्हणाले, ‘आम्ही वैभवीताई किंवा कल्पेशदादाच्या घरी राहू’. (कल्पेशदादा हा सुद्धा शाळेच्या परिवारातील, ठाण्यात राहणारा अतिशय कष्टाळू व जबाबदार युवक आहे.)
मुलांचे उत्तर ऐकल्यावर माझ्या लक्षात आलं की, मुंबईचा आवाका-विस्तार त्यांना अजून झेपत नाहीये. त्यांच्यासाठी मुंबई म्हणजे त्यांच्याच गावासारखं अजून एखादं गावच आहे, कदाचित काहीसं मोठं असेल पण गावच. मग आमच्या यतीशदादानं मुलांना मुंबईचे काही व्हिडिओ दाखवले, आम्ही जिथे जाणार होतो त्या ठिकाणांची माहिती दिली. हे सगळं महिनाभर सुरु होतं. यतीशदादा स्वत: मुंबईत अनेक वर्ष राहिल्यानं त्यानं सगळी माहिती अतिशय विस्तृतपणे व न कंटाळता मुलांना दिली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे, मुंबईत गेल्यावर वागायचं कसं हे गौरवदादा व यतीशदादानं समजावून सांगितलं.
'मुंबईत गेल्यावर किंवा ट्रेनच्या प्रवासात कोणावरही विश्वास ठेवायचा नाही, अनोळखी लोकांकडून काहीही खायला घ्यायचं नाही' ही आम्ही मुलांना दिलेली पहिली सूचना. ती देताना आम्हाला खूप वाईट वाटत होतं. या सूचनांमुळे मुलं पुरती गोंधळून गेली होती. कारण या प्रकारच्या सूचना त्यांनी आमच्याकडून पहिल्यांदाच ऐकल्या होत्या. त्यांनी आपल्या आजूबाजूला असं वातावरण कधीच अनुभवलं नव्हतं. त्यामुळं त्यांना हे सगळं पटवून देण्यासाठी आम्हाला थोडा वेळ घ्यावा लागला आणि मुलांनाही तसाच वेळ द्यावा लागला.
साधारण महिनाभर या विषयांवर चर्चा चालू होती. माझा आणि यतीशदादाचा मोबाईल नंबर आम्ही मुलांकडून तोंडपाठ करून घेतला. हरवल्यावर काय काय करायचं आणि काय करायचं नाही याची चक्क ड्रिलच घेतली. मुलांसोबतच आम्हालाही काळजी आणि चिंता होतीच.
पालकांची सभा घेऊन मुलांना सहलीसाठी कुठे नेत आहोत वगैरे सगळी माहिती दिली. दोन तीन पालक नागपूर व इतर शहरांत जाऊन आलेले असल्याने, त्यांनी इतर पालकांना समजावून सांगायला मदत केली. कोणीही काहीही प्रश्न विचारले नाहीत. उलट ते म्हणाले, 'तू नेतीयस ना, मग नीटच होईल सगळं.' पालकांनी शाळेवर व माझ्यावर डोळे झाकून ठेवलेला विश्वास खूपच overwhelming होता.
अनेक दिवस सूचना आणि माहिती देण्यात गेले. सगळी शाळाच पाचवीच्या सहलीची दिवस दिवस चर्चा करत होती. मुलं नकाशे बघून एकमेकांत गप्पा मारताना दिसू लागली. ती प्रचंड उत्सुक होती आणि त्याच वेळेस थोडी घाबरलेलीसुद्धा. त्यांच्यासाठी सगळंच नवखं आणि पहिल्यांदा असणार होतं. आम्ही मुलांच्या मनाची तयारी केली होती, पण तरीही प्रत्यक्ष अनुभवाची सगळ्यांनाच उत्सुकता होती.
या आधीच्या सहलीमध्ये मुलांनी वेफर-बिस्किटं वगैरे सोडून अन्य काही खरेदी केली नव्हती. 'तुम्ही काय विकत घेणार?' असा प्रश्न विचारल्यावर पुन्हा जोरदार चर्चा! आपल्या घरच्यांसाठी काहीतरी आणावं, असं या इतक्या लहान मुलांनाही वाटत होतं, याचं मला विशेष वाटलं. आणि ते काहीतरी टिकल्या, बांगड्या यांच्या पलीकडं सरकत नव्हते, हे देखील विलक्षण होतं. दिलीप मात्र 'मी मुंबईला जाऊन विमान विकत घेणार' असं सांगून मोकळा झाला होता.
मुलांना मी सतत विचारायचे ‘तुम्हाला तिथेच राहायचं आहे, का परत घरी यायचं आहे?’ तर सगळी मुलं एका सुरात म्हणायची, ‘घरी परत यायचं आहे.’ अर्थातच सगळ्या मुलांना समुद्र बघायचा होता, त्यात खेळायचं, भिजायचं होतं आणि समुद्राचं एक बाटली खारं पाणी शाळेतल्या इतर मुलांना दाखवायला आणायचं होतं. अखेरीस या सतरा मुलांसह आम्ही नेलगुंड्याहून निघाली.
मुलांसारखेच आम्ही ताई-दादा पण खूप उत्सुक होतो. शाळेतले यतीशदादा व सपनाताई मुलांसोबत असणार होते. सपनाताई लोक बिरादरी शाळेच्या माजी विद्यार्थिनी आहेत. त्यासुद्धा प्रथमच ट्रेनमध्ये बसणार होत्या. सहलीच्या आदल्या रात्रीच, म्हणजे 20 फेब्रुवारी रोजी मुलांना हेमलकसाला आणलं. दुसऱ्या दिवशी सकाळी हलका नाश्ता करून मुलं निघाली. त्यांना गाडीच्या प्रवासाची सवय नसल्यानं गाडी लागण्याचा खूप त्रास झाला. सपनाताई आणि यतीशदादा पण उत्सुकता आणि काळजी अशा दोन्ही भावना अनुभवत होते.
नागपूर ते मुंबई प्रवास दुरांतो या रेल्वेगाडीने असल्याने, मुलं मधेच उतरण्याचा किंवा गैरप्रकार होण्याचा तसा प्रश्न नव्हता. तरीही सपनाताई रात्री झोपणार नव्हत्याच. दिवसभर प्रवास झाल्यानं मुलं थकली होती. सुरुवातीला असलेली नाविन्याची उत्सुकता शमल्यावर ट्रेनमध्ये मुलं झोपी गेली. पण रोज लवकर उठायची सवय असल्यानं सगळी पहाटे चार साडेचारलाच उठून बसली आणि मस्ती करायला लागली. बर्थवरून मुलं पडत तर नाहीयेत ना, या काळजीनं ताई-दादांना मात्र रात्रभर नीट झोप लागली नाही.
22 तारखेला सकाळी मुंबई स्टेशनवर वैभवीताई व कल्पेशदादा हजर होते. सोबत पुण्याचे मकरंददादा मुलांच्या स्वागतासाठी फुलं घेऊन तयार होते. मकरंददादा अभियंता आहेत. ते गेली अनेक वर्षं अमेरिकेत स्थायिक होते. काही दिवस शाळेत शिकवल्यावर तेही आमच्या कुंटुंबाचे अविभाज्य घटक बनले. सगळे एकमेकांना भेटून, मिठ्या मारून, नाचून आनंद व्यक्त करत होते.
चंद्रपूर जिल्हयाचे माजी कलेक्टर आशुतोष सलील सर यांनी मुंबई महानगरपालिकेच्या एका सदनिकेत मुलांची राहण्याची उत्तम व्यवस्था केली. मुलांना फिरण्यासाठी गाडी भाड्याने घेतली होती. आमचा मित्र उमेश जोशी याच्यामुळं हे शक्य झालं.
पहिल्या दिवशी, मुंबईला पाणी पुरवठा करणारा वरळीचा वॉटर स्टोरेज प्लांट मुलांनी बघितला. नंतर तिथल्याच जवळच्या एका बागेत मुलांना नेलं. इतक्या साध्या बागेत येऊनसुद्धा मुलं जाम खुश झाली. निरनिराळ्या खेळण्यांवर आनंदानं बागडू लागली. जवळच असलेलं नेहरू तारांगणही त्यांनी पाहिलं. कृत्रिम अवकाशाच्या दर्शनानं तर मुलं भारावून गेली होती. संध्याकाळी डेव्हिड ससून लायब्ररीच्या वर्धापनदिन कार्यक्रमाला मुलांनी उपस्थिती लावली. तिथे गाण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. माईकवर गाणं म्हणत नाचणारे स्त्री-पुरुष पाहून मुलांना फारच मजा वाटत होती.
23 तारखेला रविवारी सकाळी 6 वाजता मुलांना गिरगाव चौपाटीवर नेलं. Down to earth नावाची एक सामाजिक संस्था वस्तीतल्या मुलांसाठी अल्टिमेट फ्रिस्बीचे प्रशिक्षण देते, तिथे मुलांनी भेट दिली. मुलांच्या समाजिक वाढीच्या हेतूनं आम्ही वस्तीत राहणाऱ्या मुलांचा आणि आमच्या मुलांचा संवाद व्हावा, ओळख व्हावी यासाठी ही भेट आयोजली होती.
वेगवेगळ्या प्रदेशांतून आलेल्या या मुलांनी एकत्र खेळावं असा घाट घातला. त्यांच्या सोबत मुलांनी समुद्राकाठी खेळण्याचा आनंद घेतला. सकाळची वेळ असल्यानं वातावरण प्रसन्न होतं. मुलांनाही मजा आली. महाराष्ट्राच्या दोन टोकांची ही मुलं, खेळताना एकमेकांना मूकपणे पारखत होती. खेळून झाल्यावर मुलांनी वाळूत थोडी धम्माल केली. इतक्या बोटी आणि मासे पकडण्याची वेगळी पद्धत यांचं मुलं बारकाईने निरीक्षण करत होती. प्रश्न विचारून अधिक समजून घेत होती. काहीजण मस्तपैकी वाळूत पहुडली देखील.
'Tata Institute of Fundamental Research' मध्ये विज्ञान दिवस साजरा होत असल्यामुळं मुलांना तिथं घेऊन गेलो. तेथील मंडळीनी अतिशय प्रेमाने मुलांना काही प्रयोग व वैज्ञानिक संकल्पना समजावून सांगितल्या. अनेक संकल्पना मुलांसाठी खूपच अमूर्त होत्या. मात्र काही संकल्पना त्यांना फार आवडल्या. द्रव नायट्रोजेनचे असेच एक प्रात्यक्षिक मुलांना फार आनंदी व विस्मयचकित करणारे होते. त्यानंतर आमचे स्नेही नवीन काळे यांनी मुलांना रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये नेलं व त्यांच्या आवाजात काही गाणी रेकॉर्ड केली. कवितेचं गाणं कसं बनतं हे अर्चना गोरे ताईंनी अतिशय उत्तमरित्या समजावून सांगितलं.
नवीन काळे राहत असलेल्या सदनिकेतील बिऱ्हाडांनी दोन-दोन मुलांना आपल्या घरी नेलं व प्रेमाने आदरातिथ्य केलं. जेवण व गप्पा आटोपल्यावर, काजलच्या यजमान कुटुंबानं तिला पाहण्यासाठी TV लावून दिला. हे सर्व नवीनच असल्यामुळे ती घाबरली. तिला वाटलं हे आता आपल्याला जाऊ देणार नाहीत. सोबत सपना ताई असल्यानं त्यांनी तिला सांभाळून घेतलं.
सोमवारी, 24 तारखेला, एक मुंबई स्पेशल अशी भेट मुलांसाठी ठरवली होती, मुलं एस्सेल वर्ल्ड व वॉटर किंग्डमला जाणार होती. गोराई ते एस्सेल वर्ल्डचा बोटीचा प्रवास मुलांना फार आवडला. इतकी मोठी बोट आणि तिही यंत्रचलीत. त्यांना फार मजा वाटली. पाण्यात उतरल्यावर तर नुसता धिंगाणा. त्यात सुद्धा घसरगुंडी वरून घसरायला मुलं फारशी उत्सुक नव्हती. एकदा सगळं करून पाहिल्यावर पाण्यात खेळण्यातच त्यांना जास्त आनंद होता.
लोकबिरादरी प्रकल्पाचे शुभचिंतक कृष्णा महाडिक यांनी मुलांना अगदी VIP वागणूक मिळेल अशी व्यवस्था करून ठेवली होती. ज्या ठिकाणी बाहेरचं पाणीसुद्धा चालत नाही, तिथं आमच्या मुलांसाठी टेबल-खुर्च्या लावून सौ. महाडिक यांनी स्वत: घरी बनवलेलं जेवण वाढलं गेलं. अर्थात हे privilege मुलांना समजत नव्हतं. ते त्या सगळ्याचा निरागसपणे आनंद लुटण्यात मग्न होते. संध्याकाळी परत येताना मुलं पार थकून गेली होती. आमचे स्नेही आशुतोष ठाकूर यांनी अतिशय प्रेमाने मुलांसाठी रात्रीच्या जेवणाची सोय केली.
मंगळवारी, 25 तारखेला, विशेष बाब म्हणून आम्हाला राजभवन दाखवण्यात आले. राजभवनचं महत्व, त्याची सामाजिक प्रतिष्ठा यांविषयी कल्पेश दादा मुलांना समजावून सांगत होता, तेव्हा मुलांच्या चेहऱ्यावरील भाव विलक्षण होते. रमेश येवले यांनी सकाळी सहाला हजर राहून अतिशय प्रेमाने आम्हाला परिसर दाखवला. राजभवनचं सौंदर्य मोहून टाकणारं आहे. टपोरी मोहक रंगांची फुलं पाहून मुलं जामच खुश झाली. आमचा या फुलांसोबत फोटो काढा असंही म्हणाली.
तिथून आम्ही गेलो गेटवे ऑफ इंडियाला. खूप वेळ त्या भव्य वास्तूच्या आजूबाजूला फिरत होतो, मोठाल्या बोटी पाहत होतो. खूप काही पाहिल्यावर समजून, घेतल्यावर हा समुद्राकाठचा निवांतपणा मुलांना आवडला. तिथं बराच वेळ नुसतंच फिरलो. मन भरल्यावर निघालो. तिथं अनेक फोटोग्राफर फोटो काढून द्यायला व प्रिंट द्यायला तयार असतात. असाच एक फोटो आम्हीसुद्धा काढला आणि सगळ्यांनी स्वतःकडे एक-एक प्रत ठेवली. तो फोटो पाहून मला 'फोटोग्राफ' या सिनेमातला नवाजुद्दिन सिद्दिकीचा डायलॉग आठवला, 'सालो बाद ये फोटो देखोगी मॅडम, तो आपको चेहेरे पे यही धूप दिखाई देगी'. आमच्या सगळ्यांचं अगदी तसंच झालं होतं. लवकरच ही सगळी पाखरं दूर उडून जातील आणि मग राहतील त्या फक्त आठवणी!!
काहीशा भावनिक वातावरणानंतर आम्ही पोचलो back bay आगारात. ज्या मुलांसोबत काल फ्रिस्बी खेळली होती, ती मुलं यांना वस्तीतील आपल्या घरी घेऊन जाणार होती. हा अनुभव मात्र मुलांना आतून बाहेरून हादरून टाकणारा होता. इतकी दाटी-वाटी मुलांना नवीन होती. एका मुलीच्या घरी जायचा बोळ इतका अरुंद होता, की सरळ चालताच येत नव्हतं. माझ्यासोबत सरजू होता, तो आत यायला तयारच होईना. मलाही धाकधूक होतीच, पण थोडा धीर दिल्यावर तो आत आला.
एरवी आम्ही जात असलेली ठिकाणं पाहण्याची उत्सुकता काही वेळाने कमी होताना आम्ही बघत होतो. तरीही मुलांची बडबड कधीच थांबत नव्हती. पण इथे मात्र एकही शब्द बोलायला त्यांना सुचत नव्हतं. सहा बाय चारची मुंबईतील घरं पाहून मुलं अंतर्मुख होऊन गेली होती. चमचमणाऱ्या मुंबईचा हाही चेहरा मुलांनी जवळून अनुभवावा, हाच आमचा हेतू होता. या संस्थेत अहोरात्र काम करणारे देव तायडे, मानसी तायडे आणि श्रीमती नक्की दीदी यांच्याविषयी आम्हाला आदर वाटला. रात्रीचे जेवण दादरच्या पै सरांनी आपल्या सदनिकेत आयोजित केले होते. अनेक स्नेह्यांनी मुलांसाठी फळे व नाश्ता वेळोवेळी आणून दिला होता.
सहलीचा शेवटचा दिवस असल्याने जास्त काही प्रवास नियोजला नव्हता. संस्थेचे हितचिंतक हरीश शहा व त्यांची कन्या अमीरा शहा-छाब्रा यांनी वांद्रे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) मध्ये दुपारच्या जेवणाची सोय केली होती. MCA चे उपाध्यक्ष अजय देसाई हयांनी अतिशय प्रेमानं परिसर दाखवला, तसंच इनडोअर स्टेडियममध्ये मुलांना काही वेळ खेळूही दिलं. MCA च्या उच्चभ्रू वातावरणातदेखील मुलं अजिबात बुजली नाहीत. दंगा मस्ती करत ते सगळं समजून घेत होती हे विशेष. सर्वांच्याच लाडक्या सचिनने, म्हणजे सचिन तेंडूलकरने मुलांसाठी क्रिकेटचे साहित्य पाठवले होते.
सहलीचा शेवटचा दिवस संपला होता आणि अखेर निरोपाची वेळ आली होती. मकरंददादांना मुलांचा निरोप घेताना गहिवरून आलं होतं, तर कल्पेशदादा आणि वैभवीताई आपापल्या भावना आवरत होते. त्यांचा निरोप घेताना मुलांचे डोळेही पाणावले होते. अखेर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून रात्री सव्वा आठ वाजता आमची गाडी निघाली आणि माझ्या डोळ्यांसमोर हा सगळा प्रवास सरकत गेला.
27 तारखेला आम्ही सर्व पुन्हा आपल्या गावी, नेलगुंडा इथं पोहोचलो. शाळेच्या बोर्डावर लावलेला 'गेटवे ऑफ इंडिया'वरील आमचा फोटो पाहून मात्र आजही तेच ऊन आणि तेच हास्य चेहऱ्यावर आल्यावाचून राहत नाही!
- समीक्षा गोडसे, हेमलकसा
sam.aqua18@gmail.com
Tags: लोकबिरादरी सहल मुंबई समीक्षा गोडसे बाबा आमटे Samiksha Godse Lokbiradari Prakalp Mumbai Baba Amte Load More Tags
Add Comment