दलवाईंचा वैचारिक वारसा हेच मंडळाचे बलस्थान

मुस्लीम सत्यशोधक मंडळ येत्या 22 मार्च रोजी 53वा वर्धापनदिन साजरा करीत आहे.

मुस्लीम समाज प्रबोधन करायचे असेल तर मुस्लीम जमातवाद्यांचे नेमके मूळ कशात आहे हे शोधले पाहिजे अशी भूमिका घेऊन कार्य करताना हमीद दलवाई यांच्या लक्षात आले की, इस्लाम आणि मुस्लीम इतिहासाची कठोर चिकित्सा आवश्यक आहे. त्यादृष्टीने अभ्यास, अभ्यास दौरा आणि चिंतन करून त्यांनी लेखन आणि पत्रकारिता केली. लेखन आणि बौद्धिक चर्चा आवश्यक असली तरी तेवढे पुरेसे नाही, हे इंडियन सेक्युलर सोसायटीच्या स्थापनेनंतर त्यांच्या लक्षात आले. यातून 22 मार्च 1970 रोजी साधना कार्यालयात ‘मुस्लीम सत्यशोधक मंडळा’ची स्थापना झाली.

तोंडी तलाक, बहुपत्नीत्व आणि यासारखे मुस्लीम महिलांचे प्रश्न घेऊन त्यांनी कामाला सुरुवात केली. लोकसंख्या नियंत्रण, पारंपरिक शिक्षण, जमातवादी राजकारण, अलगता आणि अस्मिता जपण्याच्या मानसिकतेतून निर्माण झालेले प्रश्न घेऊन दलवाईंनी ‘मुस्लीम सत्यशोधक’मार्फत प्रबोधनाचे मुद्दे छेडले. अर्थात मुस्लीम धर्मवादी राजकारण्यांनी दलवाईंना वेळोवेळी विरोध केला. दलवाईंच्या हेतूवर शंका घेतली. अपप्रचार केला, अवमान केला. मात्र दलवाईंनी शांत आणि संविधानिक पद्धतीने संवाद करण्याची भूमिका घेतली. दलवाईंनी मुस्लीम जमातवाद्यांना इशारा दिला होता की, अशाप्रकारच्या अनाठायी विरोधामुळे समाजाचे नुकसान तर होणारच आहे; शिवाय हे वर्तन भविष्यात हिंदुत्ववादी शक्ती वाढण्यास कारणीभूत ठरणार. आज दलवाईंचे हे भाकित सत्यात उतरले आहे. मुस्लीम समाजप्रबोधनाचा गाडा काही प्रमाणात पुढे सरकला असला तरी हिंदुत्ववाद्यांनी भारतात आणि मुस्लीम जगतातील मूलतत्त्ववाद्यांनी जो धर्मांधतेचा उच्छाद मांडला आहे तो मानवतेसाठी अपरिमित नुकसानकारक आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या आणि राज्यघटनेच्या अमृतमहोत्सवी वर्षात आपण आहोत. लोकशाही, समान नागरिकत्व, धर्मनिरपेक्षता हे आपल्या घटनेचा गाभा आहे. मात्र आपण अद्याप समता, बंधुता आणि वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित धर्मनिरपेक्ष एकात्म समाज उभा करण्यात अपयशी ठरलो. याची खंत वाटण्याऐवजी हे मुद्दे जल्लोषाचे होत आहेत. मुस्लीम अनुनय हा जवळपास सर्व राजकीय पक्षांकडून होत होता. आता मात्र कोणत्याही राजकीय पक्षाला मुस्लीम प्रश्नांची पर्वा वाटत नाही. मागच्या वर्षी पुण्यात काँग्रेसचे एक युवा नेते आले होते. त्यांच्याशी पुण्यातील काही कार्यकर्त्यांशी संवाद - चर्चा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी या युवा नेत्यानी बोलून दाखवले होते की, ‘आता काँग्रेसला तुमची गरज नाही, तुम्हाला कॉंग्रेसची गरज आहे.’ अर्थात अनेकांना हे सत्य वास्तवाच्या खूप जवळ जाणारे आहे असे वाटते.  शहाबानो प्रकरण, रथयात्रा, बाबरीचा पडाव, साखळी बाँबस्फोट, गुजरात हिंसाचार, दहशतवादी कारवाया अशा घटनांमुळे राष्ट्रीय आणि सामाजिक एकतेचा विचका उडाला आहे. अलीकडे तर गोरक्षकांची झुंडशाही, मॉब लिंचिंग, लव्ह जिहाद, लँड जिहाद, आय ए एस जिहाद, अपप्रचार, अल्पसंख्यांकाची शिष्यवृत्ती, छात्रवृत्ती बंद करणे यातून सामाजिक व राजकीय  वातावरण दूषित झाल्याचे लक्षात येते. विषेशतः अलिकडे हिंदुत्ववादी संघटना एकत्र येऊन जन आक्रोश मोर्चा काढत आहेत, मुस्लीमविरोधी विखारी वक्तव्ये करत आहेत, पोस्टर्स, घोषणा यांचा वापर करत आहेत. अनेक ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे नेते, कार्यकर्ते त्यात सहभागी होत आहेत. हे अत्यंत भयानक चित्र जागोजागी दिसून येत आहे.

मुस्लीम समाजाने सामाजिक सुधारणेस प्रतिकार केला म्हणून हिंदुत्ववाद वाढण्यास खतपाणी मिळाले यात तथ्य असले तरी हमीद दलवाई यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, हिंदुत्ववादी शक्ती वाढणे हे स्वतः हिंदू समाजाच्याही हिताचे नाही.


Read Also : Muslim Satyashodhak in a four way blockade - Editor


या वर्षी महात्मा फुले - सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील समाज उभा करण्याविरोधात प्रतिगामी शक्ती एकवटली आहे आणि अशा शक्तीला राजाश्रय मिळत आहे. मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या स्थापनाकाळात हिंदू समाजातील प्रबोधनाच्या चळवळी संदर्भ म्हणून समोर होत्या. आजमितीला हिंदू समाजातील प्रबोधनाच्या चळवळींना संविधानिक पाठबळ असतानाही प्रबोधनाची मानक मूल्ये पेचात असलेली पाहताना मुस्लीम प्रबोधनाचा विषय किती मागे फेकला जाणार याची काळजी वाटते.

मुस्लीम सत्यशोधक मंडळाने अर्धशतक पूर्ण केले. कोरोना विषाणूचे थैमान असताना मंडळाचा सुवर्णजयंती महोत्सव साजरा करणे अपेक्षित नव्हते. आज कोरोनावर मात करण्यात यश मिळाले आहे. मात्र या काळातही धर्मद्वेषाचे विषाणू पेरण्यात आलेत. आज हा धर्मद्वेषाचा विषाणू ज्या पद्धतीने धुमाकूळ घालत आहे ते वातावरण प्रबोधन कार्यकर्त्यांना नाउमेद करणारे आहे.

हमीद दलवाईंनी मुस्लीम सत्यशोधक चळवळ सुरू केली. त्यांचे स्वागत मुस्लीम समाजाने किंवा समाजातील धार्मिक-राजकीय लोकांनी स्वीकारले नाही. काही अपवाद वगळता मोठ्या प्रमाणात विरोधच झाला. मात्र दलवाईंच्या पाठीशी अनेक नामवंत साहित्यिक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेते होते. तत्कालीन पुरोगामी, समतावादी, सेक्युलर संस्थांनी पाठिंबा दिला. ध्येयवादी कार्यकर्त्यांची मोठी ताकद उभी राहिली. याचे महत्त्व असे की दलवाई नंतर ही चळवळ संपली नाही. नेतृत्वातील काही मर्यादा आणि मतभेद लक्षात घेऊनही नंतरच्या कार्यकर्त्यांनी मोठे योगदान दिले आहे. ‘मुस्लीम सत्यशोधक’साठी आजची स्थिती अधिक आव्हानात्मक आहे. अजूनही दलवाईंचे नाव घेताना नाक मुरडली जातात. “आम्ही दलवाई आणि मुस्लीम सत्यशोधक पासून फारकत घेतली” असे सांगून मुस्लीम समाजाची स्वीकृती मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. अत्यंत मर्यादित संसाधनात चळवळ पुढे घेऊन जाताना दमछाक होते. अवतीभवतीचे वातावरण उत्साह कमी करणारे आहे. मुस्लीम सत्यशोधकला जवळ करणे अनेकांना न परवडणारे वाटायला लागले आहे. अशा परिस्थितीतही मंडळ पांढरे निशाण दाखवत नाही. आजही दलवाई आणि मुस्लीम सत्यशोधकवर प्रेम करणाऱ्या व्यक्ती आणि संघटना आहेत, ती आमची खरी ऊर्जा आहे. दलवाईंचा वैभवशाली वैचारिक आणि कार्यात्मक वारसा आजच्या कार्यकर्त्यांची प्रेरणा आहे. या प्रेरणेतून मंडळ विविध उपक्रम राबवीत आहे. मुस्लीम सत्यशोधक पत्रिका, फातिमाबी शेख महिला मंच आणि महिला मदत केंद्र, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी असलेले तिमिरभेद मंच, हमीद दलवाई स्टडी सर्कल, बकरी ईद निमित्त रक्तदान अभियान, समविचारी संघटनांच्या समवेत उपक्रम, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील परिषदांचे आयोजन आणि संघर्षात्मक कार्यक्रम सातत्याने चालू आहेत. मुस्लीम समाज प्रबोधनाचे कार्य करताना हिंदुत्ववाद्यांकडून उभे करण्यात येत असलेली आव्हाने शमवण्यासाठी आता अतिरिक्त कामे करावी लागत आहेत. ‘भारतीयत्वाचा अभिमान आणि संविधानाचा सन्मान’ हे ब्रीद घेऊन सत्यशोधकी - संविधानवादी समाज निर्माण करणारी ही चळवळ येत्या 22 मार्च रोजी 53वा वर्धापनदिन साजरा करीत आहे. या कार्यक्रमात आपले हार्दिक स्वागत आहे.

- डॉ. शमसुद्दीन तांबोळी
tambolimm@rediffmail.com 
(अध्यक्ष, मुस्लीम सत्यशोधक मंडळ)


Tags: मुस्लीम सत्यशोधक मंडळ हमीद दलवाई भारतीय मुसलमान हिंदू-मुस्लीम संविधान वर्धापनदिन समाजवाद muslim satyashodhk mandal hamid dalwai shamsuddin tamboli hindu muslim pune love jihad Load More Tags

Comments:

anjani kher

आपापले वेगळे अस्तित्व ठेवून सुद्धा सर्व मुस्लीम संघाताणाई एकत्र यायला हवे. ते घडते आहे का ? असे काय भयंकर टोकाचे मतभेद आहेत की एकमेकांबरोबर काम करता येत नाही ? मी सलोखा गटात आहे. तिथे मला एकही मुस्लीम स्त्री अजून दिसलेली नाही. माझ्यासाठी हे गूढच आहे.

Prof Navanath Raskar

आपले काम चळवळीचे काम मुस्लिम सत्यशोधक असो की अन्य कोणतीही सत्यशोधक चळवळ असो शेवटी विचारधारा कमी अधिक फरकाने सारखीच आहे त्याचे कारण आपले ध्येय मानव कल्याणाचे ध्येय आहे, कोणतीही प्रबोधनाची चळवळ ही विशिष्ट काळापूरती नसते तर ती कायम चालणारी अशी प्रक्रिया असते त्यामुळे नाउमेद न होता काम करीत राहणे हेच आपले कर्तव्य राहिले पाहिजे या कामासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा

Add Comment