दहावी-बारावीचे निकाल विद्यार्थ्यांच्या आयुष्याला निर्णयक वळण देण्यासाठी महत्त्वाचे असतात. निकालाची अनिश्चितता आणि भविष्याची चिंता यामुळे निकाल लागण्याची वाट पाहत बसणे तरुणांना अनेकदा अस्वस्थ करणारे असते. दुसरीकडे नोकरी आणि पहिली कमाई यांचे आकर्षण तर असतेच... त्यामुळे निकालापर्यंतच्या सुट्ट्यांचा 'सदुपयोग' करण्यासाठी अनेकजण नोकरी- कामधंदा शोधतात. पुढे निकाल मनाप्रमाणे लागला नाही तर या तरुणांपैकी अनेकजण शिक्षण अर्धवट सोडून मिळेल तो कामधंदा करणे पसंद करतात. मात्र अर्धवट शिक्षणामुळे बहुतेक तरुणांना क्षमता असूनही मोठी मजल मारता येत नाही, तर काही जण आपले शिक्षण पूर्ण करून आपले ध्येय गाठतात. या वयोगटातील मुलांचे भावविश्व उलगडून दाखवणारा एका डॉक्टरांचा अनुभवात्मक लेख...
मी काही लेखक नाही... तरी माझ्या अनुभवाबद्दल लिहावे असे खूप दिवसांपासून वाटत होते... पण वेळ मिळत नव्हता. मला कोरोना झाल्याने आणि तो सौम्य तीव्रतेचा असल्यामुळे घरीच आयसोलेट राहून उपचार घेतले. साधना साप्ताहिकात प्रसिद्ध झालेले मोहिब कादरी सरांचे आत्मकथनात्मक सदर वाचल्यामुळे माझेही अनुभव शब्दबद्ध करण्याची प्रेरणा मला मिळाली. माझी कथा मार्च 1992 ते जून 1992 यादरम्यानची आहे.
बारावी सायन्सची परीक्षा संपल्यामुळे मी रिकामाच होतो. लहान असताना दिवाळीच्या सुट्टीत व उन्हाळ्याच्या सुट्टीत उदगीरला मामाकडे जाऊन मामाला त्याच्या किराणा दुकानात मदत करायची व त्याच्याकडेच राहायचे हा शिरस्ताच होता... मात्र आता मी उदगीरलाच रूम करुन असल्यामुळे आणि मामांच्यामध्ये वाटणी झाली असल्यामुळे तिथे करण्यालायक जास्त काम नव्हते.
गावाकडे शेती होती पण त्यातून फार काही उत्पादन होत नव्हते. वडिलांचे खरेदीविक्रीचे दुकान होते... पण तोटा झाल्यामुळे ते बंद केले होते. घरात पैशाची चणचण होतीच. घरची आर्थिक परिस्थिती पाहता आपण काहीतरी करायला पाहिजे असे मला वाटू लागले. माझ्या आतेभावाशी माझी चांगली मैत्री होती. त्याच्या घरची परिस्थिती चागंली होती... मात्र घरी चार भाऊ आणि चार बहिणी असे मोठे कुटुंब असल्यमुळे त्याला घरात कोणी विचारत नाही असे त्याला वाटायचे.
मी उदगीरला गेलो की आम्ही सोबतच असायचो. एकदा दोघांनी हैदराबादला पळून जायचे ठरवले. त्यासाठी कधी जायचे, कोणत्या गाडीने जायचे असे सगळे ठरवले. मी पूर्वी मामासोबत खरेदीसाठी एकदोन वेळेस हैदराबादला गेलो असल्यामुळे त्या शहराची थोडीबहुत माहिती होती. रूमवर जे काही सामान होते ते गावाकडे जाणाऱ्या टेम्पोमध्ये टाकले, बाकीचे सामान सायकलवर लादून उदगीर ते हाडोळती असा चाळीस किलोमीटरचा प्रवास सायकलने केला... मात्र त्याचे काही वाटले नाही कारण सारे लक्ष हैदराबादला निघायच्या दिवसाकडे होते.
अखेर तो दिवस उजाडला. कसे करावे? जावे की नाही? जायचे तर आईला काय सांगायचे? असे असे अनेक प्रश्न पडू लागले. शेवटी दुपारी जेवण करताना आईला म्हटले, 'उदगीरला कॉलेजचे थोडे काम आहे, जाऊन उद्या परत येतो.' जवळ दीडशे ते दोनशे रुपये होते. आईकडून तिकिटासाठी वीस रुपये घेतले. त्याकाळी तिकिटाला सात-आठ रुपये लागायचे. सोबत एक ड्रेस घेतला. उदगीरला भरपूर नातेवाईक असल्यामुळे आईने खायला काही दिले नव्हते. उदगीरहून हैदराबादसाठीची रेल्वे रात्री साडेदहाला होती... त्यामुळे थोडा निवांतच म्हणजे चार वाजता घरून निघालो. सायंकाळी सहासातच्या दरम्यान उमा चौकात उतरून रेल्वेस्टेशन गाठले.
त्याकाळी हैदराबादला जाणाऱ्यांची संख्या भरपूर असायची. खेड्यापाड्यांतील लोक सायंकाळपासूनच स्टेशनवर गर्दी करायचे... मात्र सर्व लक्ष बाहेरून येणाऱ्या लोकांवरच होते... कारण आतेभाऊ सोबत येणार होता. आठ वाजले, नऊ वाजले भरपूर वाट पाहिली... पण तो आला नव्हता. शेवटी रेल्वे यायची वेळ झाली. झुकझुक करत ती स्टेशनवर येऊन थांबली. जागा पकडून ठेवण्यासाठी सर्व लोकांची एकच झुंबड उडाली.
मला तोवर फक्त जनरल डबाच माहीत होता. गाडीला एसी आणि स्लिपर कोच असतात हे माहितीच नव्हते. जनरल डब्यात एक फेरी मारली. जागा काही पकडली नाही. त्या काळात स्टेशनवर रेल्वे भरपूर वेळ थांबायच्या. शेवटी शिट्टी वाजली. आतेभावाची वाट पाहण्याच्या नादात मी तिकीटही काढायचे विसरून गेलो होतो... त्यामुळे मी रेल्वेतून खाली उतरलो.
आतेभाऊ येतो सांगून आला नव्हता. एकट्याने हैदराबादला जायची हिंमत होत नव्हती. रेल्वे गेली तेव्हा रात्रीचे अकरा-साडेअकरा वाजले असतील. त्या मार्गावर इतर फारशा गाड्या नसल्यामुळे जवळपास सगळे स्टेशन रिकामे झाले होते. काय करावे काही कळेना. मामाकडे जावे तर एवढ्या उशिरा कुठून आलो म्हणून काय सांगायचे... हा प्रश्न होता.
भूकपण लागली होती. हॉटेलवाल्याकडून पारलेचा एक बिस्कीटपुडा घेऊन खाल्ला. नळाचे पाणी पिऊन शेवटी एका कडेचा बाक पकडला आणि झोपी गेलो. सकाळी जाग आली ती गार्डच्या खेकसण्याने. तो काठी आपटत म्हणाला, 'काय पळून जायचे होते की काय? इथे का येऊन झोपला? उठ जा घरी.' त्याने तिकडून पिटाळून लावले.
रेल्वे स्टेशनवरच्या नळाला हातपाय, तोंड धुतले आणि आतेभावाच्या घराकडे निघालो. आदल्या दिवशी दिवसभर फिरून नंतर स्टेशनवरच झोपल्यामुळे अंगावरचे कपडे फार खराब झाले होते. आत्याकडे पाहुणा म्हणून जाण्यासारखी परिस्थिती नव्हती. आत्याचे घर फार मोठे होते. त्यांच्याकडे भरपूर भाडेकरू राहत. आतेभावाची रूम माडीवर होती. तिचा जिना बाहेरूनच असल्याने थेट रूम गाठली.
भाऊ तिथे होताच. त्याला स्टेशनवर न येण्याचे कारण विचारले. तो म्हणाला, 'मला वाटले की, तूच आला नसशील म्हणून मीही नाही आलो.' त्या काळी संपर्कासाठी फोनची काही सुविधा नव्हती... त्यामुळे काही इलाज नव्हता. पुढे काय करायचे, पळून जायचे की नाही हे मी त्याला विचारले. तो म्हणाला, ‘जाऊ या.’ मग मी खाली गेलो. अंघोळ करून कपडे धुऊन टाकले. जेवण केले. गावाकडे जातो असे सांगून पाच वाजता मी आत्याचा निरोप घेतला व परत रेल्वे स्टेशन गाठले. नंतर सात-आठच्या आसपास आतेभाऊही आला. माझा जीव भांड्यात पडला. आम्ही तिकीट काढले आणि रेल्वेची वाट पाहत बसलो.
ठरलेल्या वेळी रेल्वे आली. आम्ही रेल्वेत बसलो. प्रवासात आता एकाला दोघे सोबत होतो... त्यामुळे कशाची भीती नव्हती. मस्त गप्पागोष्टी करत... उद्या कायकाय करायचे याचे नियोजन करत झोपी गेलो. सकाळी जाग आली तेव्हा रेल्वे विकाराबाद स्टेशनवर होती. आता थोड्याच वेळात नामपली हे मुख्य स्टेशन येणार होते. आम्हाला तिथे उतरायचे होते. दोनतीन स्टेशनांनंतर आमचे ठिकाण आले.
रेल्वेतून उतरून बाहेर आलो. चारमिनार या वास्तूचे फार आधीपासून आकर्षण असल्यामुळे बस पकडून आधी तिकडे गेलो. तिथे सार्वजनिक स्वच्छतागृहाची व्यवस्था होती. तिथेच फ्रेश होऊन जवळच्याच टपरीवर चहा घेतला. आता वेळ होती काम शोधण्याची. चहा पीत असताना त्याच टपरीवाल्याकडे काम कुठे मिळेल याची विचारणा केली. त्याने एकदोन ठिकाणे सांगितली. तिथे चौकशी केली की तो दुसरे ठिकाण सांगायचा. जवळच्या ठिकाणी पायी तर दूरच्या ठिकाणी रिक्षाने जाऊन चौकशी केली... मात्र काम कुठेच मिळत नव्हते.
दुपारचा एक वाजत आला. एका कागद कारखान्यात काम मिळेल असे कळले. पत्ता घेऊन कारखाना गाठला... पण तिथेही सध्या काम नाही म्हणून कळले. तिथे एक मुस्लीम माणूस भेटला. तो म्हणाला, 'काम देतो, सोबत चला.' कामाच्या शोधातच असल्यामुळे आम्ही एका दमात होकार दिला आणि त्याच्या बरोबर निघालो. तो आम्हाला एकदोन ठिकाणी घेऊनही गेला... पण काही उपयोग झाला नाही. 'तुम्ही फार थकाला आहात, थोडे फ्रेश व्हा. अंघोळ करा.' असे म्हणत त्याने आम्हाला एका मस्जिदमध्ये नेले आणि थोड्या वेळात परत येतो म्हणत तो निघून गेला.
मस्जिदमध्ये पाण्याचा एक हौद भरून ठेवलेला होता. जाण्यापूर्वी त्याने मग आणि बादली आणून दिली होती. त्या मस्जिदमध्ये दुसरे कुणीच नसल्यामुळे आम्हाला काहीशी भीतीही वाटत होती. आम्ही अंघोळ आटोपली. कपडे धुऊन वाळायला टाकले. तासाभरात ती व्यक्ती परत आली. 'झाला का पोरांनो फ्रेश... चला मग आता.' असे म्हणत तो आम्हाला घेऊन तिथून निघाला.
हा अनोळखी माणूस आता कुठे घेऊन जातो याची काहीच कल्पना नसल्याने मनात थोडी भीतीही वाटत होती. काही अंतर चालत गेल्यावर तिथे असलेल्या एका चांगल्या हॉटेलमध्ये तो आम्हाला घेऊन गेला. त्याने तीन प्लेट पुरीभाजीची ऑर्डर दिली. आमच्याकडे मोजकेच पैसे होते. त्यातही कामाच्या शोधात बरेच खर्चही झाले होते... त्यामुळे इतक्या मोठ्या हॉटेलचे जेवणाचे बिल आम्ही कुठून देणार हा प्रश्न अस्वस्थ करत होता.
त्या माणसाचे जेवण आमच्याआधीच उरकले. 'तुमच्यासाठी कुठे नोकरी मिळते का याची चौकशी करतो. तुम्ही इथेच बसा.' असे म्हणून तो गेला. मग आम्ही दोघांनी पटापट जेवण उरकले. त्याची भीतीच अधिक वाटत असल्यामुळे आम्ही हॉटेलचे बिल देऊन तिकडून पोबारा केला.
आम्ही चारमिनारपासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर होतो. बस पकडून पुन्हा चारमिनार परिसरात आलो आणि कामाची शोधाशोध सुरू केली. 'तुम्ही चांगल्या घरचे दिसताय. पळून आलात का? पुन्हा घरी जा. असे काम करून कोणी मोठा होत नाही...' असा चांगला सल्लाही आम्हाला दिला गेला. संध्याकाळ होत आली होती. तिथे कोणा स्थानिक व्यक्तीची ओळख नसल्यामुळे आम्हाला कुणी कामावर ठेवून घेत नव्हते.
बहुतेक तो रमजानचा महिना होता. ईद एकदोन दिवसांवर आली असल्यामुळे बाजारात गर्दीच गर्दी होती. असंख्य स्टॉल लागलेले होते. आम्ही बाजार पाहत इकडून तिकडे फिरत होतो. रात्री साधारणपणे बाराएक वाजेपर्यंत तो बाजार सुरू होता. फिरून-फिरून थकल्यामुळे शेवटी एका बंद दुकानाच्या ओट्यावर पेपर अंथरून आम्ही दोघे झोपी गेलो.
दोनतीन तासच झोप झाली असेल... तेवढ्यात रस्त्यावर गस्त घालणाऱ्या गुरख्याने येऊन 'इथे का झोपलात? असे कुठेही झोपता येणार नाही...' असे म्हणत आम्हाला उठवले. डोळे चोळत उठलो आणि दुसरीकडे गेलो. तासा-दीडतासाने दिवस उजाडला. मग आम्ही पुन्हा चारमिनारच्या दिशेने निघालो. तेथील स्वच्छतागृहात फ्रेश झालो आणि पुन्हा नोकरीच्या शोधात निघालो.
दिवसभर असंख्य ठिकाणी नोकरीबाबत विचारणा केली... मात्र आमची कोण्या स्थानिक व्यक्तीशी ओळख नसल्यामुळे काम मिळवण्यात अडचण येतच होती. त्या काळी आधारकार्ड, पॅनकार्ड यांसारखी ओळखपत्रे नसल्यामुळे स्वतःची ओळख पटवून देता येत नव्हती. शेवटी चार वाजता एका हॉटेलवाल्याने आम्हाला कामावर घेण्याची तयारी दाखवली. रोजचा पंधरा रुपये पगार आणि दोन वेळेचे जेवण असा व्यवहार ठरला.
आम्ही दोघे काम शोधून थकलो होतो... त्यामुळे ताबडतोब होकार दिला. त्याच्याकडेच जेवण केले. थोडा आराम करावा या उद्देशाने रात्री झोपायच्या व्यवस्थेविषयी मालकाला विचारले. त्याने झोपायची जागा दाखवली. ती दहा बाय दहाची खोली सामानाने पूर्णपणे भरून गेली होती. तिथे पाय ठेवायलाही जागा शिल्लक नव्हती. स्वच्छतागृहही सार्वजनिक होते आणि ते बाहेर रस्त्यावर होते. एकंदरीतच तिथे राहायला आमचे मन काही तयार होईना. शेवटी आम्ही ती जागा सोडली. दोन दिवसांमध्ये आलेले अनुभव पाहता इथे आपले काही खरे नाही अशी खूणगाठ बांधून घरी जाण्याच्या उद्देशाने आम्ही तडक रेल्वे स्टेशन गाठले.
रेल्वे रात्री आठ वाजता असल्यामुळे तोवर वाट पाहत बसलो. आतातर तिकिटापुरतेही पैसे शिल्लक नव्हते. दोघांकडे मिळून केवळ दहापंधरा रुपये होते... त्यामुळे तिकीट न काढताच प्रवास करायचा ठरवले. रेल्वे आली आणि आम्ही जनरल डब्यातील एका कोपऱ्यात अंग चोरून बसलो. टीसी येईल याची सारखी भीती वाटत होती... पण तो काही आला नाही. फेरीवाल्याकडून दहा रुपयांची मिसळ घेतली. दोघांनी ती पुरवून-पुरवून खाल्ली आणि झोपी गेलो.
सकाळी जाग आली तेव्हा रेल्वे बिदरच्या पुढे आली होती. गाव जवळ येत होते तसे बरे वाटत होते... पण गेली दोन दिवस कुठे होतो याविषयी घरी काय सांगावे हा प्रश्न पडला होता. या विचारात असतानाच टीसी आमच्या समोर येऊन उभा राहिला आणि तिकीट विचारू लागला. आम्ही मागच्याच स्टेशनवर चढलो आहोत... पण आमच्याकडे तिकिटाइतके पेसे नाहीत असे सांगत आम्ही त्याला उरलेले पाच रुपये दिले. तो निघून गेला.
एकदाचे उदगीर आले. आतेभाऊ त्याच्या घरी गेला. मला पुढे गावाकडे जायचे होते... मात्र तिकिटासाठी पैसे नव्हते. जवळच मामाच्या मुलाचे ऑटोमोबाइलचे दुकान होते. त्याच्याकडे जाऊन 15 रुपये उसने मागितले आणि ते घेऊन घर गाठले.
घरी आल्यावर आईने हजेरी घेतली. तिला सर्व हकिकत सांगितली. हैदराबादला गेलो पण काम काही मिळाले नाही म्हणून परतल्याचे सांगितले. उन्हाळ्याचे दिवस होते. काही केल्या करमत नव्हते. हैदराबादला कोणाची ओळख नसल्यामुळे काम मिळाले नसल्याचे सांगितल्यावर आई म्हणाली, 'माझी एक चुलत बहीण तिथे राहते. निदान जाताना तिचा पत्ता तरी घेऊन जायचास.' हैदराबादला गेल्यावर मला तिची आठवण झाली होती... मात्र त्या काळी फोन वगैरेसारख्या संपर्काच्या सुविधा नव्हत्या आणि हैदराबाद हे काही छोटे गाव नव्हते.
घरी एकदोन दिवस कसेबसे काढले. मग आईला म्हणालो, 'मी आक्काचा पूर्ण पत्ता घेऊन पुन्हा हैदराबादला जातो. तिच्या ओळखीचे व्यापारी आहेत, ते मला कुठे ना कुठे काम मिळवून देतीलच.' आक्का म्हणजे माझी मोठी चुलत बहीण. तिचे मिस्टर लहानपणापासून हैदराबादला राहत होते. त्यांचा प्रिंटिग प्रेसचा व्यवसाय आहे हे मला माहिती होते. आईची परवानगी घेतली आणि पुन्हा एकट्यानेच हैदराबाद गाठायचे ठरवले.
ठरल्याप्रमाणे एक दिवस दुपारी चार वाजता निघालो. बहिणीच्या घरचा पत्ता वगैरे सोबत घेतला होता. तिच्या माहेरहून काही निरोप आहे का ते विचारून घेतले. सोबत दोन ड्रेस व खाण्यासाठी दशम्या-चिवडा घेतला. परत तोच प्रवास करून सकाळी हैदराबादला पोहोचलो. आक्काचे घर मलकपेठ परिसरात होते. स्टेशनवर उतरून चौकशी केल्यावर कळले की, दोन ठिकाणी बस बदलून जावे लागेल.
एकदाचा मलकपेठला पोहोचलो. तेथे एक जुना कागद कारखाना होता. आता तो बंद पडला असला तरी सर्वांना त्याविषयी माहिती होती. आक्काचे तिथून जवळच राहत असल्यामुळे घर लवकर सापडले. मला पाहून आक्काला आनंद झाला. आक्काचे मिस्टर माझ्या दुसऱ्या एका आत्याचा मुलगाच होता... त्यामुळे दोन्हीकडून जवळचे नाते होते.
ते आधीपासूनच हैदराबादला वास्तव्यास होते. ते ज्या ठिकाणी रहात, त्या घरमालकाचा प्रिंटिंग प्रेस होता. हे दोघेही त्यांच्याकडेच कामाला होते. नंतर त्यांनी स्वतंत्र प्रेस टाकण्याचा प्रयत्न केला पण तो चालला नाही... त्यामुळे नव्या प्रेसचे सर्व सामान त्यांनी घरीच आणून ठेवले होतो. आता ते बाहेरून कामे घेऊन घरूनच ते करून द्यायचे. कामे काही जास्त नसायची.
त्यांना सहा वर्षांचा मुलगा व पाच वर्षांची मुलगी होती. त्यांचे बिऱ्हाड एकाच खोलीत राहायचे. मी त्यांना माझ्या येण्याचे प्रयोजन सांगितले. दोघेही खूप प्रेमळ होते. माझ्यावर रागावले नाहीत की इतक्या छोट्या जागेत कसे होणार म्हणून कपाळावर आठ्याही पडल्या नाहीत. आतेभाऊ आणि आक्का यांचे घर छोटे असले तरी मन मात्र मोठे होते.
उन्हाळ्याचे दिवस होते. माझ्या कामासाठी आतेभावाने बऱ्याच ठिकाणी चौकशी केली. अनेकदा ते मला सोबत घेऊन फिरायचे. शेवटी वजनकाटे विकणाऱ्या एका शेठजीने मला कामावर ठेवले. साडेचारशे रुपये महिना पगार ठरला. इतर कुठेच काम न मिळाल्याने हे काम स्वीकारण्याशिवाय पर्याय नव्हता. कामाचे ठिकाण घरापासून बरेच लांब होते. दोनदा बस बदलावी लागे.
एका तिकिटाचे तरी पैसे वाचावे म्हणून परतताना बसने जाण्याऐवजी मी बरेचदा पायीच जायचो. गावाकडे शेतात बरेच काम केले असल्यामुळे चालायला काही वाटायचे नाही. दर गुरुवारी कामाला सुट्टी आसायची. आक्काच्या लहान मुलांसोबत खेळून मी सुट्टीचा दिवस घालवायचो. हा दिनक्रम दोन महिने चालला.
आता मला माझ्या बारावीच्या निकालाचे वेध लागले होते. लवकरच निकाल लागणार असल्यामुळे गावाकडे जायला पाहिजे असे वाटू लागले. आक्काला आणि आतेभावाला याची कल्पना दिली. मग त्यांच्यासोबत कामाच्या ठिकाणी गेलो आणि हिशोब केला. ठरल्याप्रमाणे शेटजीने दोन महिन्यांचे नऊशे रुपये दिले आणि मी चांगले काम केले म्हणून पन्नास रुपये बक्षीस म्हणून अधिकचे दिले. अशा रितीने दोन महिन्यांच्या मेहनतीचे मला साडेनऊशे रुपये मिळाले होते.मी गावाकडे निघालो. गावाला पोहोचेपर्यंत बारावीचा निकाल लागला होता. मी चांगल्या गुणांनी पासही झालो होतो. पुढे मेडिकलला प्रवेश घेतला. पदवी घेऊन चागंला डॉक्टरही झालो.
माझ्या पहिल्या कमाईचा अनुभव लिहिण्यामागे विशेष कारण आहे. साधारणपणे आठवी ते बारावी शिक्षण घेणारी मुले 'पैसे कमावण्याच्या उद्देशाने' शिक्षण सोडून घरातून पळून जातात आणि एखादे शहर गाठतात. त्यांपैकी अनेक जण बिगारी काम करण्यात आपले आयुष्य घालवतात. शिक्षण अर्धवट सोडलेल्या या मुलांपैकी एखादाच पुढे जात असेल. याउलट शिक्षण अर्धवट न सोडता ते पूर्ण करणाऱ्या बहुतांश मुलांना भविष्यात चांगले काम मिळणारच असते हे मुलांनी लक्षात घ्यायला हवे... त्यामुळे शिकण्याच्या वयात शिक्षणावर आणि त्यातल्या त्यात उच्चशिक्षणावर भर दिला पाहिजे. त्या वेळी मी जर साडेनऊशे रुपयांवर समाधान मानून शिक्षण अर्धवट सोडले असते तर आज मला डॉक्टर होऊन रुग्णसेवा करता आलीच नसती.
- डॉ. शिवप्रकाश काशिनाथअप्पा निजवंते
धन्वंतरी हॉस्पिटल,
मु. पो. हाडोळती, ता. अहमदपूर, जि. लातूर.
Tags: अनुभव डॉ. शिवप्रकाश निजवंते शिक्षण हैदराबाद कमाई Dr Shivprakash Nijvante Education Hyderabad Earnings Load More Tags
Add Comment