फेमिनिझम - काळ आणि प्रवाह

महिला दिन विशेष लेख-2

फोटो सौजन्य: Getty Images

स्त्रीस्वातंत्र्याची चळवळ वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या काळांत एकोणिसाव्या शतकापासून सुरू झाली. सॅफ्रेजेट मुव्हमेंट (Suffragette Movement) म्हणजे बायकांना मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून ब्रिटनमध्ये आणि त्यानंतर युरोपात आणि अमेरिकेत सुरू झाली. त्याला ‘फर्स्टवेव्ह फेमिनिस्ट मुव्हमेंट’ (First wave feminist movement) म्हणजे स्त्रीवादाची प्रथम लाट म्हटलं गेलं. महात्मा जोतीराव फुले यांनी भारतातून त्या स्त्रियांना एक पत्र लिहिलं होतं आणि त्यांच्या या विचारांचं स्वागत केलं होतं.

द मॅडवूमन इन द अ‍ॅटीक (The madwoman in the attic) नावाच्या सॅन्ड्रा एम गिलबर्ट (Sandra Gilbert) आणि सुझान गुबार (Susan Gubar) या दोन लेखिकांचं पुस्तक. वेगवेगळ्या स्त्रीलेखिकांच्या साहित्यावर प्रकाश टाकणारं आणि त्या त्यांच्या लेखनातून पुरुषप्रधान व्यवस्थेला कसा प्रश्न विचारत गेल्या याचं एक संकलन. त्यांच्या पुस्तकाच्या सुरुवातीलाच एक संदर्भ येतो... गेरार्ड मॅन्ले हॉपकिन्स (Gerard Manley Hopkins) या कवीचा. ज्यानं आपल्या मित्राला पत्र लिहिताना अशा अर्थाचं लिहिलं आहे की - सर्जनशीलता हे पुरुषाला मिळालेलं बक्षीस आहे... जे फक्त त्याच्या मनात नसून त्याच्या तारुण्यात (Puberty) दडली आहे. त्याची लैंगिकता किंवा केवळ लिंगानं पुरुष असणं हा त्यांच्या सर्जनशीलतेचा स्रोत आहे. त्यानं आणि त्याच्यासारख्या अनेक लेखकांनी पेन हे अक्षरशः पेनीसचं (पुरुषाच्या लिंगाचं) प्रतीक मानलं.

लेखन हे एक उदाहरण झालं... पण मुळातच सर्जनशीलतेवर पुरुषांची मक्तेदारी आधीपासून आहे. आपल्याकडे तर स्त्रियांना शिक्षणाचाच अधिकार नव्हता... त्यामुळे साहित्य क्षेत्रात स्त्रियांचा सहभागच उशिरा सुरू झाला... पण संतसाहित्य आणि मौखिक परंपरेमुळे बायकांच्या ओव्या, अभंग हे होते. त्यामुळे सरळसरळ सर्जनशीलतेवरची मक्तेदारी ही संकल्पना ब्रिटिश काळात लिखित साहित्यानंतर आली असावी. त्याआधी पुरुषप्रधानता नव्हती असं नाही... पण मौखिक परंपरेमुळे बायकांना व्यक्त व्हायला जागा होती. जनाबाई, मुक्ताई, कान्होपात्रा यांसारख्या संतकवयित्रींमुळे स्त्री ‘काव्य’ करू शकते हे समाजमान्य होतं... पण तरीही प्रत्येकच क्षेत्रात आधी केवळ आणि केवळ पुरुषांची मक्तेदारी होती. मग ते वैद्यकीय क्षेत्र असो की राजकारण... पण स्त्रियांच्या चळवळींमुळे ही दरी हळूहळू कमी होत गेली. 

स्त्रीस्वातंत्र्याची चळवळ वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या काळांत एकोणिसाव्या शतकापासून सुरू झाली. सॅफ्रेजेट मुव्हमेंट (suffragette movement) म्हणजे बायकांना मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून ब्रिटनमध्ये आणि त्यानंतर युरोपात आणि अमेरिकेत सुरू झाली. त्याला ‘फर्स्टवेव्ह फेमिनिस्ट मुव्हमेंट’ (First wave feminist movement) म्हणजे स्त्रीवादाची प्रथम लाट म्हटलं गेलं. महात्मा जोतीराव फुले यांनी भारतातून त्या स्त्रियांना एक पत्र लिहिलं होतं आणि त्यांच्या या विचारांचं स्वागत केलं होतं. 

आता सध्या अमेरिकेत स्त्रीवादाची चौथी लाट सुरू आहे असं म्हणतात आणि इतक्या वर्षांनंतरही अजूनही फक्त भारतातच नाही किंवा अविकसित देशांमध्येच नाही तर अमेरिकेसारख्या महसत्तेतही स्त्रियांना स्वातंत्र्यासाठी लढा द्यावाच लागतो आहे. 

अमेरिकेत विसाव्या शतकाच्या मध्यात जेव्हा स्त्रीवादाची दुसरी लाट (second wave feminism) ) आली... तेव्हा समान अधिकाराची मागणी बायकांनी केली. समान वेतन. समान हक्क. समान वागणूक. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकन स्त्रियांसाठी बरीच क्षेत्रं गरज म्हणून खुली झाली. जसं की, वैद्यकीय, अभियंता ही क्षेत्रं... पण तरी तिथे स्त्रियांना बरोबरीच्या नात्यानं वागवलं जात नव्हतं... त्यामुळे एकोणीसशे साठसत्तरनंतर अमेरिकेत ही चळवळ सुरू झाली आणि खूप मोठे बदल त्या चळवळीने जगभरात घडवून आणले. याच काळात बायकांचा स्वतःच्या शरीरावर स्वतःचा हक्क आहे ही संकल्पना उदयाला आली, रुजली. गर्भपाताच्या अधिकारासाठी स्त्रिया लढल्या. त्या सेकंडवेव्हच्या चळवळीचं घोषवाक्य होतं ‘पर्सनल ईज पोलिटिकल’. यात सर्व प्रकारच्या स्त्रिया हिरिरीने एकत्र आल्या. त्यात अफ्रिकन, अमेरिकन स्त्रियांचा खूप मोठा सहभाग होता. 

...पण त्यानंतरच्या काळात अफ्रिकन, अमेरिकन स्त्रियांना लक्षात आलं की, सर्व स्त्रिया असं जेव्हा ‘व्हाईट स्त्रिया’ संबोधतात तेव्हा त्या फक्त अमेरिकेतल्या गोऱ्या स्त्रियांनाच त्यात गणत आहेत. ‘फेमिनाईन मिस्टीक’ (The Feminine Mystique)हे फेमिनिझममधलं महत्त्वाचं पुस्तक. बेट्टी फ्रिडमन (Betty Friedan) हिनं अमेरिकन गृहिणींचा अभ्यास करून त्यावर हे पुस्तक लिहिलं आहे. एक प्रकारचा कंटाळा, निराशा आणि निष्क्रियता यांमधून त्या का जात आहेत वगैरे. बेल हुक्स (Bell Hooks) या ‘फेमिनिस्ट स्कॉलर’नं मात्र या पुस्तकावर टीका करत म्हटले आहे की, सर्व ‘अमेरिकन स्त्रिया’ असं यात जेव्हा म्हटलं जातं तेव्हा फक्त व्हाईट मध्यमवर्गीय स्त्रियांचा अभ्यास केला जातो. त्यांत बाकी संस्कृतींच्या, वंशांच्या आणि वर्णांच्या स्त्रियांचा अंतर्भाव नसतो... म्हणजेच स्त्रियांना स्वातंत्र्य मिळावं असं जेव्हा या व्हाईट स्त्रिया बोलातात तेव्हा त्यांना फक्त व्हाईट स्त्रियांना मिळणार स्वातंत्र्य दिसत असतं. 

बेल हुक्स म्हणते की, या ‘व्हाईट स्त्रियां’ची ‘कलर्ड’ स्त्रियांकडून हीच अपेक्षा असते की, यांनी मुलं जन्माला घालावीत, यांनी कुटुंबव्यवस्था सांभाळावी आणि बंडखोरीचे अणि स्त्रीमुक्तीचे सर्व फायदे मात्र केवळ व्हाईट स्त्रियांनी उपभोगावेत. जर आपण समान हक्कासाठी भांडतो तर आपणच भेदभाव करू शकत नाही असं अफ्रिकन-अमेरिकन स्त्रियांचं म्हणणं होतं. तसंच प्रत्येक संस्कृतीप्रमाणे स्त्रीमुक्तीचा लढा, अभ्यास आणि त्याकडे बघायचा दृष्टीकोन ठरत असतो. ज्यातून स्त्रीमुक्ती चळवळीची तिसरी लाट (Third wave feminism) आली. त्याची व्याख्या शोधली तर ही सापडते... ‘The third-wave sees women's lives as intersectional, demonstrating how race, ethnicity, class, religion, gender, and nationality are all significant factors when discussing feminism. It examines issues related to women's lives on an international basis.’

त्याच काळात अफ्रिकन-अमेरिकन स्त्रियांचे साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले होते. सांस्कृतिक विविधतेमुळे प्रत्येक संस्कृतीतली आणि सांस्कृतिक संकरातली पुरुषप्रधान व्यवस्था स्त्रियांकडून वेगळ्या मागण्या करते. प्रत्येक ठिकाणचं शोषण वेगवेगळं असतं हा विचार हळूहळू मान्य व्हायला लागला आणि अफ्रिकन-अमेरिकन स्त्रियांचं मुख्य प्रवाहातलं प्रतिनिधित्व वाढायला लागलं. अगदी साहित्य, चित्रपट आणि इतर दृकश्राव्य माध्यमांतलं चित्रसुद्धा बदललं. 

आधी मिडियामध्ये अफ्रिनक-अमेरिकन स्त्रिया जाड, कजाग, मूर्ख, ‘कॉमिक रिलिफ’ म्हणून दाखवल्या जायच्या किंवा सेक्स सिंबॉल... कुणाहीसोबत झोपायला तयार असलेली स्त्री, सेक्ससाठी सतत भुकेली आणि ते दाखवणारी ‘व्हॅम्प’ असं ते चित्रं असायचं... कारण त्या काळी सेक्सची इच्छा व्यक्त करणारी नायिका अमेरिकेतही वाईटच मानली जायची आणि मग ती ‘व्हाईट स्त्री’ कशी असणार? कारण मदर मेरी - ती व्हाईट... त्यामुळे सहसा अफ्रिकन-अमेरिकन स्त्रियांचंच तसं चित्रंण केलं जायचं आणि जनमानसातही असाच समज रुढ होत गेला की, या बायका अशाच असतात.

...पण मागच्या दोन दशकांत हळूहळू हे चित्र खूप मोठ्या प्रमाणात बदललं. मार्व्हल्ससारख्या सुपरहिरोज्‌च्या सिरीजमध्ये, मुख्य प्रवाहातील सिनेमात आज अफ्रिकन-अमेरिकन स्त्री नायिका दिसते. केवळ अन्यायग्रस्त किंवा विशिष्ट विचारधारेचं प्रतिनिधित्व करणारी पात्रंच केवळ अफ्रिकन-अमेरिकन नसतात तर सामान्य कुठल्याही प्रकारची पात्रं जशी गोरी असू शकतात तशी अफ्रिकन-अमेरिकन असू शकतात. अर्थात जॉर्ज फ्लॉईडच्या घटनेला फार दिवस झालेले नाहीत आणि वर्णद्वेश अमेरिकेत किती आहे हे आपल्याला माहिती आहे. तरी ‘पोलिटिकली करेक्ट’ असण्यासाठी का होईना... चित्रपटांत, वेबसिरीजमध्ये आणि इतर सर्व माध्यमांत अफ्रिकन-अमेरिकन प्रतिनिधित्व वाढलेलं दिसतं. हे स्त्रीवादी चळवळींचं (फेमिनिस्ट मुव्हमेंट) योगदान आहे. 

चौथा स्त्रीवादी प्रवाह (Forth wave feminism) हा दोन हजार बारानंतर सुरू झाला. यात इंटरनेटचं मोठं योगदान आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, ब्लॉग्ज, यूट्यूबवरचे व्हिडिओ ब्लॉग्ज यांतून स्त्रियांच्या प्रश्नांबद्दल मांडणी केली जाते, आवाज उठवला जातो. #मीटू चळवळ (#metoo मुव्हमेंट) ही यातूनच निर्माण झालेली आहे. एलजीबीटीक्यू (LGBTQ) यांच्या चळवळीला (मुव्हमेंटला) मीटू चळवळ पाठिंबा देते. त्यांच्या समान हक्कांसाठी आवाज उठवते. #yesallwomen, #girlglaze, #trasphobia अशा हॅशटॅग्जचा सोशल मिडियावर वापर करून याबद्दलचा अवेअरनेस वाढवला जातोय. चौथी लाट ही भांडवलदारांचा (कंझ्युमॅरिझम) हात धरून आली आहे. हासुद्धा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे आणि कंझ्युमॅरिझम हा सतत चेहरा बदलणारा राक्षस असल्यानं तो कधीही कुठलीही बाजू पलटू शकतो. हा या काळाचा धोका मानावा लागेल. 

काळ बदलला असला तरी स्त्रियांचे प्रश्न कमी झालेले नाहीत. ते अधिक गुंतागुंतीचे झाले आहेत... म्हणजे आधी माहीत होतं की, आपण कुठल्या हक्कासाठी भांडत आहोत, कशाला विरोध केला जात आहे. जसा मतदानाचा हक्क हवा आहे... म्हणून चळवळ होती... पण आता स्त्रियांना मतदानाचा हक्क आहे, आरक्षण आहे... पण सरळ बोट ठेवता येणार नाही असं ‘पॅसिव्ह पुरुषी अ‍ॅग्रेशन’ आहे. त्याच्याशी कसं लढायचं? 

उघडउघड कुणी काही फार बोलत नसेल, वागत नसेल... पण जो समाज स्त्रियांचा मानसिक छळ (टॉर्चर) करतो... त्याच्याशी कसं लढायचं हा प्रश्न अख्ख्या जगासमोर आहे. कौटुंबिक हिंसाचार, बलात्कार, इंटरनेटवरच्या अश्लाघ्य भाषेतल्या कॉमेंट्स आणि धमक्या, सततचं चारित्र्यहनन... प्रत्येक जागी म्हणजे सोशल मिडियापासून आपल्या घरच्या गल्लीपर्यंत, शेजारपाजारच्या लोकांपासून ऑफिसमधल्या सहकाऱ्यांपर्यंत, फोटोवर ट्रोल करणाऱ्या अनोळखी लोकांपासून फेसबुकवर भांडणाऱ्या फेसबुक फ्रेंडपर्यंत आणि ग्रामपंचायतीपासून संसदेपर्यंत हे सर्वत्र अस्तित्वात आहे. 

बेल हुक्स सांगते त्याप्रकारचं सोशल स्ट्रक्चर आपल्याकडेही आहे. आपल्याकडचा जातिभेद हा तिथल्या वर्णभेदासारखा आहे. खूप आत रुतलेला आणि विषमतेचा उदोउदो करणारा. तिथे अफ्रिकन-अमेरिकन स्त्रियांना जे भोगावं लागलं ते आपल्याकडच्या दलित आणि बहुजन स्त्रियांना भोगावं लागत आहे. जसं तिथल्या ब्लॅक स्त्रीची प्रतिमा कजाग किंवा ब्लॅक पुरुषाची प्रतिमा पुरुषी ॲबेक्ट किंवा पुरुषी पोलादी आणि अॅग्रेसिव्ह अशी केली गेली...  तसंच आपल्याकडे दलित पुरुषाची, बहुजन पुरुषाची इमेज निर्माण केली गेली. 

मल्लिका अमरशेखच्या ‘मला उद्धस्त व्हायचंय...’ या पुस्तकानं तर जवळपास त्याला पुष्टीच दिली, ते आत्मकथन महत्त्वाचं होतं... पण त्याचा उपयोग दलित पुरुषाचं एकमितीय कॅरॅक्टरायझेशन (व्यक्तिचित्रण)  करण्यासाठी झाला आणि मग विजय तेंडुलकरांच्या ‘कन्यादान’ नाटकासारख्या साहित्यकृतींनी ही प्रतिमा अजूनच ग्लोरिफाय केली... त्यामुळे मग नाटक-सिनेमातला ‘अँग्री यंग मॅन’ म्हणूनच सातत्यानं दलित पुरुष चित्रित झाला. जणू सर्व दलित पुरुष बायकांवर हात उगारतात आणि सर्व ब्राह्मण पुरुष मात्र हाताची घडीच घालून असतात. कधीच ते डॉमेस्टीक व्हॉयलन्स करत नाहीत. ही प्रतिमा आपल्याकडे इतकी घट्ट रुतली की, ज्या उच्चवर्णीय उच्चजातीय पुरुषांकडून स्त्रियांना मारहाण होत होती किंवा त्यांचं शोषण होत होतं त्या स्त्रियांना आपल्यावर होणारा अत्याचार कधीच मोकळेपणानं सांगता आला नाही... कारण तसं सांगितलं तर अख्ख्या समूहाच्या प्रतिमेला तडा जाईल ही भीती त्यांच्या मनात भरवली गेली.

मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये दलित स्त्रीचं चित्रण अगदीच कमी दिसतं... मात्र इतर कुठेच ती कधीच दिसली नाही, जवळपास नाही. दलित पुरुष असतो... पण तोही अजूनही शोषणाविरुद्ध लढणारा किंवा स्वतः गुंड, दोन नंबरचे धंदे करणारा किंवा पोलीस. यांपलीकडे दलित पात्रं लिहिली जात नाहीत. बहुजन पात्रंही लिहिली जात नाहीत. जातीच्या ओळखीच्या पलीकडे जाऊन एखाद्या लव्ह स्टोरीतलं एक पात्र दलित आहे असं दिसत नाही. अग्रवाल, शर्मा, पटवर्धन यांच्याच लव्हस्टोरीज्‌ आपण बघतो आणि त्यातही ब्राह्मण जातीतली पुरुषप्रधानता किंवा शोषण इथे अधोरेखित केलेलं नसतं. उलट उच्चवर्ग आणि उच्चवर्णीय भारतीयांनी स्त्रियांचं स्वातंत्र्य जवळपास स्वीकारलेलं आहे असं त्यात दाखवलेलं असतं. 

याशिवाय आपल्याकडचा वर्णद्वेष - ‘रेसिझम’ तर भयंकर आहे. नटनट्या गोऱ्याच लागतात. सावळ्या स्त्रियांबद्दलचे स्टिरिओटाइप्स असतात. लोकांना त्या स्त्रिया बघायला आवडत नाहीत वगैरे किंवा गावातल्या स्त्रीचं चित्रण करायचं असेल तर मग सावळी स्त्री. शहरी, शिक्षित स्त्री मात्र गोरी. अर्थात याला अपवाद तेव्हाच निर्माण होतो जेव्हा मुखर्जी कुटुंबातली काजोल सावळी निपजते. मग तेव्हा तिच्यासाठी सावळं असणं मान्यं केलं जातं... पण परत काजोलनंतर मागच्या वीस वर्षांत बोटावर मोजण्याइतक्याच सावळ्या स्त्रिया चित्रपटसृष्टीत आलेल्या दिसतात... म्हणजेच तुमच्यासाठी वेगळे नियम. ते का? कारण तुम्ही वरच्या जातीतले नाही, वर्गातले नाही, बहुसंख्याकांच्या धर्मातले नाही.

अनेकदा उच्चभ्रू आणि उच्चजातीय लोकांना बंडखोरी हीही त्यांची मक्तेदारी वाटते. त्यांच्या मुलांनी अपत्य होऊ न देणं हे सर्वसामान्य. ते आजच्या काळाचं प्रतिनिधित्व... पण खालच्या वर्गातल्या आणि जातीतल्या लोकांनी असा निर्णय घेणं म्हणजे काहीतरी ‘प्रॉब्लेम’ असेल अशी धारणा. आपण आपल्या मेंदूला असं कंडिशन करून ठेवलं आहे की, विचारांची प्रगल्भता, सर्जनात्मकता किंवा बंडखोरी हीही अनुवांशिक असते असं आपल्याला वाटतं. 

फेमिनिझम जर समानतेचा पुरस्कार करतो तर उच्चजातीय स्त्रियांसाठी आणि बहुजन स्त्रियांसाठी त्याचे नियम वेगळे नकोत. ‘ब्लॅक फेमिनिझम’चं जगातलं जे स्थान आहे... तेच आपल्याकडच्या दलित, बहुजन, मुस्लीम स्त्रीवादाचं असायला हवं... पण आपल्याकडच्या उच्चभ्रू समाजाला अनेकदा हे समजतच नाही की, ते वागतायत यात एक प्रकारचा भेदभाव आहे. पिकूसारख्या अत्यंत आजच्या काळातल्या सिनेमात, घरातला नोकर जेव्हा गाडीत नायकाच्या सोबतीनं समोर बसतो तेव्हा नायकाला आवडत नाही आणि मग नायिका नोकराला मागे बसायला सांगते. नोकरावरून त्यात विनोदही केले गेले आहेत. कुठल्यातरी जातीचं वर्चस्व आपल्या आत इतकं मुरलं आहे की, अत्यंत सहज, नकळत त्यांच्याकडून वागलं जातं, व्यक्तं केलं जातं आणि तेच आपल्या कलाकृतीत येतं. स्त्रीवाद आणि आपल्याकडची जात याचं नातं खोल आहे. ते नाकारून स्त्रीमुक्तीचा लढा देणं अशक्य आहे.

आजच्या काळात स्त्रियांच्या चळवळीसमोरचे प्रश्न अजूनच गुंतागुंतीचे झाले आहेत. त्यात मिडियानं तयार केलेल्या आदर्श स्त्रीची प्रतिमा ही अनेकदा स्त्रीवादातली प्रतीकं घेऊन तयार केलेली असते. बाहेरचं पॅकेजिंग फेमिनिस्ट... पण आतली मूल्यव्यवस्था मात्र जुनी... त्यामुळे वरवर पाहून असं वाटतं की, वाह! हे तर आपल्या बाजूचं आहे... म्हणून आपण ते स्वीकारतो आणि नवीन गिल्ट, नवीन जबाबदाऱ्या आणि आदर्श स्त्रीच्या प्रतिमेत स्वतःलाच अडकवत जातो. 

...शिवाय जगभरात मूलतत्त्ववादाचा प्रभाव वाढत आहे. परिणामी आपल्याकडचे नेतेसुद्धा सती प्रथेचा पुरस्कार करताना दिसतात... शिवाय फेमिनिस्ट स्टडीच्या ऐवजी ‘विमेन अँड फॅमिली स्टडीज’ सेंटर उघडली जात आहेत. बलात्काराचं आणि अॅब्यूजचं सामान्यीकरण केलं जात आहे. इतकी वर्षं स्त्रियांच्या बरोबरीसाठीचा जो लढा लढला गेला आहे त्याला हळूहळू रीतसर पद्धतीनं पुसून टाकलं जात आहे आणि एक प्रकारची दहशत निर्माण केली जातेय. भीती... एखाद्या टॉक्सिक पर्सनॅलिटिसोबत राहताना जसं आपला आत्मविश्वास डळमळीत होतो आणि कुठल्याही प्रकारे आपलं मत मांडलं तर आपल्याला चुकीचं ठरवलं जाणार आहे हे माहीत असतं... तसं आपण टॉक्सीक सरकारसोबत राहत आहोत... त्यामुळे स्त्रीवादातले सर्व प्रवाह लक्षात घेऊन आत्ता आपापसांत वाद न करता या  सनातनी विचारांच्या नॉर्मलीकरणाच्या वादळाला जरा नीट विचारपूर्वक उत्तर देऊन स्त्रीवादाची आणि समानतेची मूल्यं जपण्याची गरज आहे असं या निमित्तानं प्रकर्षानं वाटतं. 

- मनस्विनी लता रवींद्र
manaswini.lr@gmail.com

(मनस्विनी लता रवींद्र या लेखिका, नाटककार आणि दिग्दर्शिका आहेत. त्यांना ‘ब्लॉगच्या आरशापल्याड’ या कथासंग्रहासाठी ‘साहित्य अकादमी’चा युवा पुरस्कार (2016) मिळाला आहे.)


महिला दिन विशेष हे लेखही वाचा :
स्त्रीवादी विचारसरणी मानवकल्याणाची जबाबदारी पेलेल!

Tags: मराठी स्त्रीवाद महिला महिला दिन मनस्विनी लता रवींद्र Manaswani Lata Ravindra Women Womens Day Load More Tags

Comments: Show All Comments

अंजली मुळे

मनस्विनी, स्त्रीवादी चळवळीचा थोडक्यात छान आढावा घेतला आहेस. आताच्या तरुण मुलींसमोरची आव्हानं खूप वाढली आहेत ,पण त्यामानाने स्त्रीवादाचा विचार मात्र त्यांच्यात कमी दिसतो.शिक्षण ,आर्थिक स्वातंत्र्य यातून चंगळवादच वाढला आहे ! निदान उच्चवर्गात तरी .

PraDnya G

खुप महत्वाचे सविस्तर लिखाण मनस्विनी ❤️

Anjani Kher

इतके इंग्लिश शब्द आणि संकल्पना वापराव्या लागतात हे कशाचं द्योतक आहे ? परसनल इज पोलीटिकल हे कधीच उदाहरणे देऊन नीट उलगडून सांगितल जात नाही. तरुण, प्रथम असं काही वाचणाऱ्या मुलीना यातून काय कळेल ?

Yamini Kharkar Kolhe

खूप छान लिखाण.

स्वातीजा मनोरमा

अभिनंदन, सखोल आणि व्यापक मांडणी केल्याबद्दल!

संजय मेश्राम

खूप छान माहितीपूर्ण लेख. धन्यवाद!

Add Comment