महिलांच्या हक्कांसाठी लढणारे मौलाना... 

महिला दिन विशेष लेख - 3

कालच महिला दिन झाला. महिला दिन म्हटलं की महिलांच्या गौरवाचा दिवस असं एक समीकरणच होऊन बसलं आहे... आणि म्हणूनच असं वाटलं की, महिलांविषयी संवेदनशील असणाऱ्या, त्यांच्या दुःखाचा आणि त्रासाचा तळ समजून घेणाऱ्या एखाद्या कार्यकर्त्याची ओळख करून दिली तर... आणि त्यातच हा कार्यकर्ता जर एखाद्या मदरशात धार्मिक शिक्षण देणारा मौलवी असेल तर...!! अशाच एक मौलानांच्या भेटीनं माझ्या स्टिरिओटिपिकल धारणांना हादरा तर दिलाच... शिवाय त्यांच्यातल्या अस्सल स्त्रीवादी कार्यकर्तेपणानं सुखद धक्काही दिला.

बऱ्याचदा मौलाना म्हटलं की सफेद सदरा-पायजमा, सफेद टोपी, राखलेली दाढी असा एक अतिधार्मिक, कट्टर पुरुष असणार... असंच चित्र माझ्यासह अनेकांच्या डोळ्यांसमोर येतं. मग पुरुषसत्तेत वाढलेले मौलाना धार्मिक कट्टर असणार, स्त्रीविरोधी असणार, समाजसुधारणेशी फटकून वागणार... इत्यादी समजुती आपल्या मनात घर करून राहतात. असं माझ्या बाबतीतही झालं... पण जेव्हा मुंबईच्या गोवंडीतल्या शिवाजीनगर परिसरात स्त्रियांच्या प्रश्नांवर काम करणारे मौलाना हुसैन मोहम्मद शेख मला एका परिषदेत भेटले तेव्हा माझं कुतूहल चाळवलं गेलं... आणि त्यातून जे माहीत होत गेलं ते अफलातून आहे..ते तर मी मांडणारच आहे... पण त्याआधी त्यांच्या कार्याची चुणूक दाखवणारा एक प्रसंग सांगते. 

रुबिना (नाव बदललेलं आहे) गोवंडीतल्या शिवाजीनगर परिसरात राहणारी तरुणी. तिला आईवडील नाहीत, तिचे काही नातेवाईक शिवाजीनगरमध्ये राहतात. घरची गरिबी. रुबिना लग्न होऊन सासरी गेल्यापासून तिचा दररोज छळ सुरू होता. तिचा नवरा, दीर यांच्याबरोबरच तिची जाऊही तिला मारहाण करत होती. लॉकडाऊनमध्ये याचं प्रमाण खूप वाढलं होतं... पण लॉकडाऊन शिथिल होताच संधी साधून रुबिना गोवंडीला पळून आली आणि थेट मौलाना शेख यांना भेटली. 

रुबिना मौलानांकडे आली तेव्हा तिची स्थिती पाहून मौलानांनी ‘कोरो’ (CORO) संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांशी संपर्क साधला आणि तिला घेऊन ताबडतोब शिवाजीनगर पोलीस स्टेशन गाठलं. तिथे गुन्हा दाखल करून घ्यायला पोलीस टाळाटाळ करत होते, रुबिनाची वैद्यकीय तपासणी झाल्यावरच गुन्हा नोंदवू असं त्यांचं म्हणण होतं...

रुबिनाला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवल्यावर तिच्या शरीरावरच्या, गुप्तांगांवरच्या जखमा पाहून डॉक्टरच हादरले. त्यांनी हे प्रकरण गंभीर असून त्वरित गुन्हा दाखल करून घ्यावा या शेऱ्यासह पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल पाठवला. डॉक्टरांनी तिच्या जखमांचे फोटोही पोलिसांना आणि मौलानांना पाठवले. त्यानंतर मग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रुबिनाच्या नवऱ्यानं अटकपूर्व जामिनासाठी तयारी केली. पोलिसांवरच दबाव आणण्याची, प्रचंड पैसा खर्च करण्याची तयारी दाखवली. त्या वेळी तिच्या नवऱ्याला जामीन मिळू नये याकरता मॅजिस्ट्रेटपर्यंत रुबिनाच्या मारहाणीचे फोटो पोहोचावेत यासाठी मौलानांनी धडपड केली. ‘कोरो’च्या कार्यकर्त्या मुमताज शेख यांनाही ते फोटो आणि इतर तपशील त्यांनी पाठवले. रुबिनाच्या नवऱ्याचा अटकपूर्व जामीन तर रद्द झालाच आणि सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. 

या सगळ्यात मौलानांची भूमिका फारच महत्त्वाची ठरली. तिच्या शोहरच्या वागण्याचं अप्रत्यक्षही समर्थन करण्याच्या वा ‘समेट’ वगैरेच्या भानगडीत ते पडले नाहीत. उलट कायद्याची मदत घेणं गरजेचंच आहे हे ताडलं आणि ‘पोलिसांत जा...’ असा नुसता तिला सल्ला दिला नाही... तर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पूर्ण वेळ तिला सहकार्य केलं. 

मौलानांचं हे वागणं मानवतेला धरूनच आहे... पण त्यात त्यांनी एक वेगळा मुद्दा मांडला. मौलाना म्हणतात, ‘आमच्यात (इस्लाममध्ये) परस्त्रीचे फोटोसुद्धा मोबाईलमध्ये ठेवणं गैर मानलं जातं. त्यात रुबिनाच्या मारहाणीचे फोटो खूपच हेलावून टाकणारे होते. अर्धनग्न, शरीराच्या अनेक भागांवरच्या जखमा दाखवण्यासाठी, त्यावरचे कपडे काढून टाकलेले असे होते. असे फोटो एक मौलाना पाहतो हे लोकांना कळलं तर या गोष्टीमुळेही गहजब उडू शकतो... पण रुबिनाचा जीव महत्त्वाचा होता... म्हणून पापपुण्याचा विचार न करता केसमध्ये त्या फोटोंचा वापर कसा होईल यासाठी प्रयत्न केला.’ हे ऐकताना लक्षात आलं की, मौलानांना धर्माबाबत असलेल्या स्वतःच्या धारणांशी झगडून पुढे जाण्याच्या आव्हानाला सामोरं जावं लागतंय आणि म्हणूनच त्यांच्या वस्तीत ते जे काम करत आहेत ते समजून घेणं अधिकच आवश्यक भासलं.

मौलाना दहा वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशमधून शिवाजीनगरच्या वस्तीत आले. ते ‘जामिया दावत उल हक एज्युकेशनल अँड वेलफेअर ट्रस्ट’अंतर्गत या परिसरात सुरू केलेला एक मदरसा चालवतात. आजूबाजूची गरिबी, बकाल वस्ती, शिक्षणाच्या सोयीचा अभाव, पायाभूत सोयींची वानवा असं सगळं वातावरण बघून त्यांना इथं काम करण्याची गरज वाटली. मदरशातून त्यांनी आसपासच्या गरीब मुलामुलींना धार्मिक शिक्षण द्यायला सुरुवात केली. त्यानंतर पाचसहा वर्षांपूर्वी त्यांचा ‘कोरो’ या संस्थेशी संबंध आला. 

या संस्थेचे कार्यकर्ते शिवाजीनगर भागात महिलांच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी यायचे. या महिल्या कार्यकर्त्यांबाबत मौलानांचं मत एकदम नकारात्मक होतं. ‘या महिला रिकामटेकड्या आहेत, चांगली घरं फोडण्याशिवाय, दुसऱ्यांच्या भानगडीत नाक खुपसण्याशिवाय यांना काही काम नाही.’ असं मौलानांचं मत होतं... त्यामुळे वस्तीतल्या कुणी त्यांना थारा देऊ नये असं ते सुचवायचे... पण कोरोच्या महिला कार्यकर्त्यांनी, विशेषतः त्या भागातल्या स्थानिक प्रश्नांची आणि वातावरणाची चांगली जाण असणाऱ्या मुमताज शेख यांनी त्यांच्याशी संवाद सुरूच ठेवला. त्या त्यांच्या कार्यक्रमांना मौलानांना बोलावू लागल्या. त्यांच्याशी विविध प्रश्नांवर चर्चा करायला लागल्या.

हळहळू मौलानांचं मत बदलत गेलं. या कार्यकर्त्याही आपल्याच कष्टकरी बायकांच्या भल्यासाठी बोलत आहेत असं त्यांना लक्षात आलं. मग मौलानांनी त्यांना विरोध करणं तर सोडूनच दिलं. याउलट त्यांनी स्वतःला ‘कोरो’शी जोडून घेतलं आणि त्यांना जमेल तसं, ते त्यांच्या मोहोल्ल्यातल्या महिलांचे प्रश्न सोडवू लागले. 

माझी आणि मौलानांची पहिली भेट झाली होती तीच मुळी एका जेंडरवरच्या कॉन्फरन्समध्ये! मुंबईतल्या एस.एन.डी.टी. कॉलेजमध्ये चार वर्षांपूर्वी भरवलेल्या त्या कॉन्फरन्समध्ये सफेद सदरा-पायजमा, टोपी, दाढी अशा पेहरावातल्या मौलानांनी माझं लक्ष वेधून घेतलं. ते बोलायला उभे राहिले तेव्हा ते मौलाना आहेत हे कळून तर आश्चर्याचा धक्काही बसला होता. त्या कॉन्फरन्सनंतर मला त्यांच्याबाबत इतकं कुतूहल वाटलं की, मी आणि माझी मैत्रीण एक दिवस त्यांच्या मदरशात जाऊन आलो. तिथलं चित्रही सुखावणारं होतं. मुलामुलींना वेगळं बसवलेलं नव्हतं. आम्ही गेल्यावर त्यांनी मुलांना अभ्यासातून थोडा वेळ सुट्टी दिली... तर मुलंमुली दंगा करायला लागली. काही मुली तर मौलानांच्या अंगाखांद्यांवरही खेळत होत्या... पण अशाच बसा, जास्त मोठ्यानं खिदळू नका, मुलांसोबत मस्ती करू नका अशा काहीही सूचना मौलानांनी दिल्या नाहीत. त्या वातावरणात मुली एकदम मोकळेपणानं बागडत होत्या.

महिलांच्या हक्कांसाठी आणि इतर सामाजिक प्रश्नांवर काम करणाऱ्या ‘कोरो’ या संस्थेसोबत मौलाना 2015पासून ते काम करत आहेत. सध्या मुख्यत्वेकरून कौटुंबिक हिंसाचार हा प्रश्न घेऊन, वस्तीतले लोक मुख्यतः पतिपत्नीतल्या भांडणाची समस्या त्यांच्याकडे घेऊन येतात. एखाद्या महिलेचा नवरा तिच्यावर संशय घेत असतो तर एखादीला मूलबाळ होत नाही म्हणून सासरचे लोक नांदवायला तयार नसतात. कुणाच्या घरी क्षुल्लक कारणावरून मारपीट केली जाते तर कुठे हुंड्यावरून. अशा वेळी मौलाना त्या दोघांनाही समोरासमोर बसवून त्यांच्याशी चर्चा करतात. त्या दोघांच्या भांडणात आईवडील, सासूसासरे यांनी जास्त हस्तक्षेप करू नये असं त्यांना वाटतं... त्यामुळे ते खूप वाद असणाऱ्या जोडप्यांना, काही काळ मोठ्या कुटुंबापासून स्वतंत्र राहून पाहण्याचा सल्ला देतात.

मौलाना शक्यतो कुराणातले दाखले देऊन पुरुषांना समजवतात. उदाहरणार्थ, मोहम्मद पैगंबर आपल्या मुलीचा कसा सन्मान करत वगैरे... हे सांगून मग स्त्रियांशी कसं वागावं, याबाबत इस्लाम काय सांगतो, कुराण काय सांगतं आणि आपल्या भारतीय संविधानात काय सांगितलेलं आहे यांतली साम्यं शोधून ते लोकांना समजेल अशा भाषेत त्यांना समजावतात... तर प्रसंगी ‘पत्नी ही तुमची गुलाम नाही, घरातली सर्व कामं तिनं करावीत अशी अपेक्षा तुम्ही कशी करता?’ असे खडे बोलही ते सुनावतात.

मूलबाळ होत नाही म्हणून पत्नीला तलाक द्यायला निघालेल्या जोडप्यांच्या केसेस त्यांच्याकडे येतात तेव्हाही ते धर्माचा आधार घेत त्या स्त्रीच्या बाजूनं बोलतात. ‘तुमच्या पदरात मूलबाळ नाही’ हा कदाचित अल्लाचा निर्णय आहे... त्यात तुमच्या पत्नीची काय चूक? तुम्ही तिला असं तलाक देऊ शकत नाही अशा प्रकारे हरतऱ्हेनं ते समजावून सांगतात. धर्मोपदेशक असल्यानं लोकांना अनेक चांगल्या गोष्टी समजावण्यासाठी ते धार्मिक तत्त्वज्ञानाचा आधार घेतात आणि या पद्धतीनं सांगितलेल्या गोष्टींचं लोक पालन करतातही असा त्यांचा अनुभव आहे.

मौलानांच्या कामातल्या प्रामाणिकपणाची आणि सातत्याची दखल कोरोनं घेतली. त्यांना 2019 मध्ये ‘कोरो’ची ‘समता’ फेलोशीप देण्यात आली. या फेलोशीपचा भाग म्हणून त्यांनी गोवंडी परिसरातल्या मदरशांत, मशिदींत कुराणातली आणि संविधानातली मूल्यं यांची सांगड घालत लोकांमध्ये समताधिष्ठित मूल्यं रुजवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पूर्वी मौलाना हुसैन मशिदीत शुक्रवारच्या नमाजनंतर बयानच्या कार्यक्रमात (धार्मिक प्रवचनांतून) धार्मिक बाबींवर मार्गदर्शन करायचे. आता ते या ‘स्पेस’चा वापर धार्मिक गोष्टीच सांगण्यासाठी करत असले तरी या धार्मिक दाखल्यांतून ते महिलांचे हक्क, अधिकार काय आहेत, त्यांच्याशी आपण कसं वागलं पाहिजे इत्यादी बाबी सांगण्यासाठीसुद्धा करतात. इतकंच नाही तर त्यांनी आपल्या परिसरातल्या इतर दहा इमामांचा, उलेमांचा एक गट तयार केला आहे. सांविधानिक मूल्यांचा प्रचारप्रसार, महिलांच्या प्रश्नांवर काम करण्याकरता ते या इमामांना, उलेमांना तयार करत आहेत. 

इमामांना आणि उलेमांना अशा कामासाठी पटवणं फारच अवघड होतं... पण मौलानांनी सततच्या संवादानं ते साध्य केलं... मात्र तोवर मागच्या मार्चमध्ये कोरोना आणि लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवली. आता परिस्थिती पूर्ववत झाल्यावर त्यांनी पुन्हा एकदा या कामाला गती दिली आहे. 

कौटुंबिक हिंसाचार, स्त्रियांचा इतर प्रकारचा छळ, तलाकची समस्या, वस्तीतल्या गरीब स्त्रियांना मदत करणं या आणि अशा कित्येक मुद्द्यांवर ते काम करत असले तरी त्यांचा हा प्रवास सोपा नाही. हे सगळं करताना त्यांना दुहेरी संघर्ष करावा लागला आहे. एका बाजूला स्वतःच्या धार्मिक धारणांशी आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या कामामुळे ‘मौलाना’ म्हणून जी एक पारंपरिक प्रतिमा असते तिला तडा गेल्यानं लोकांशीही संघर्ष करावा लागतो आहे. 

स्वतःच्या धारणांशी इतक्यांदा टकराव होत असतो की, अजूनही तलाकनामा लिहिताना ते दहा वेळा विचार करतात. एखाद्या केसमध्ये तलाक घेण्याशिवाय गत्यंतरच नाही असा पेचप्रसंग आला तर ते तलाकनाम्याचा मसुदा स्वतः लिहित नाहीत... दुसऱ्या कुणालातरी लिहायला लावतात. असे तलाक ते अनिच्छेनंच करतात... पण तलाक करण्यावाचून पर्याय नसला तर विरोधही करत नाहीत... इथपर्यंत त्यांचा वैचारिक प्रवास येऊन पोहोचला आहे.

तीन तलाकविरोधी कायदा होत असताना ‘कोरो’सह अनेक मुस्लीम स्त्रियांनी, संघटनांनी या कायद्याला पाठिंबा दर्शवला होता. त्यासाठी अनेक कार्यकर्त्या या कायद्याला पाठिंबा आहे असं पत्रक काढून वस्ती-वस्तींतून इतर बायकांच्या सहमतिदर्शक सह्या मिळवत होत्या. त्या वेळी मात्र मौलानांनी कोरोच्या भूमिकेसह तीन तलाकवर बंदी घालणाऱ्या कायद्याला विरोध केला होता.

हा कायदा हे मुस्लीम पुरुषांविरोधातलं षड्‌यंत्र आहे असं मौलानांना वाटत होतं. त्यामुळे त्यांनी इतका विरोध केला की, त्यांनी या कायद्याला पाठिंबा देणाऱ्यांविरोधात पत्रकं काढून ती वाटली. कोरोच्या महिला कार्यकर्त्यांना शिवाजीनगरमधल्या महिलांनी आपल्या दारी थाराही देऊ नये असं ऐलान त्यांनी मशिदीमधूनही केलं... मात्र ‘कोरो’नं त्यांच्याशी सतत संवाद केला. मग एक दिवस ते खुल्या चर्चेसाठी तयार झाले. त्यांनी काही इस्लामिक विचारवंतांना बोलावलं... दुसरीकडे मुमताज शेख, हसीना खान आणि कोरोचे कार्यकर्ते. खूप तास चर्चा झाली. या कायद्याला मुस्लीम महिलांचा इतका पाठिंबा का आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी विरोध करणं थांबवलं. 

तीन तलाकच्या कायद्याला तुमचा एवढा विरोध का होता? असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, ‘खरं म्हणजे यावर चर्चा होण्याआधी मी मुस्लीम पुरुषांच्या बाजूनं जास्त विचार करत होतो... पण जेव्हा आमची खूप वेळ चर्चा झाली... तेव्हा हे लोक फक्त विरोधाला विरोध करत नाहीत तर खरंच आपल्या समाजाच्या महिलांचं आयुष्य चांगलं राहावं यासाठी त्यांचा जुबानी तीन तलाकला विरोध (आणि नव्या कायद्याला पाठींबा) आहे हे मला पटलं. बऱ्याच गोष्टींबाबतीत आजपर्यंत चूक काय, बरोबर काय हे मला कुणी सांगितलं नाही, उलट मीच लोकांना सांगायचो... पण जसंजसं मुमताजदीदींच्या आणि महिला मंडळाच्या इतर लोकांशी मी वेगवेगळ्या विषयांवर बोलायला लागलो, चर्चा करायला लागलो... तेव्हा मला माझ्या चुका दिसायला लागल्या.’

आपल्या प्रवासाबदद्ल सांगताना ते म्हणतात, ‘मौलाना म्हणजे खूप कट्टर, भीतिदायक प्रकरण अशीच आमची इमेज झाली आहे... त्यामुळे लोक आमच्याशी संवादच साधत नाहीत. जोपर्यंत वेगवेगळ्या स्तरांतल्या, वेगळ्या विचारांच्या लोकांशी तुमचा संवाद होत नाही तोवर तुम्ही आपल्याच डबक्यात राहता... आणि दुसरं म्हणजे मौलाना असूनही मी ‘अशी’ कामं करतो, बायकांमध्ये ऊठबस करतो, बायकांच्या बाजूनं उभा राहतो... म्हणून मला खूप त्रासही दिला जातो. ‘वो औरते तो दुपट्टा भी नही लेती, आप मौलाना होकर भी ऐसी औरतों के साथ कैसे बैठते हो?’ असं लोक मला विचारायचे. मी कधी त्यांना समजावून सांगतो, कधी त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करतो. आता तर महिलांच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी, संविधान प्रचारासाठी ज्या मिटिंग असतात... त्या माझ्याच मदरशामध्ये होतात. आमच्या कार्यकर्त्यांना जेव्हा मिटिंग घ्यायची असते तेव्हा मी मुलांची तालीम ॲडजस्ट करून त्यांना जागा मोकळी करून देतो; चहापाण्याची, नाश्त्याची सोय करतो. सर्व धर्माचे बायकापुरुष मदरशात मिटिंगला येतात.’

मौलानांच्या कामाचा पैस फक्त इतकाच नाही तर सीएए, एनआरसी यांच्या विरोधात देशभर निदर्शनं केली जात असताना त्यांनी त्यांच्या वस्तीतल्या लोकांना संघटित केलं आणि प्रामुख्यानं स्त्रियांना या विरोधातल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केलं. इतकंच नाही... तर ज्या मोहल्ल्यात पूर्वी प्रजासत्ताकदिन, स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी महिलांना मदरशात बोलावलं जात नव्हतं... त्याच मोहल्ल्यात आता झेंडावंदन महिलांच्या हस्ते केलं जातं, प्रमुख पाहुणे म्हणून महिलांना निमंत्रण दिलं जातं. मौलानांच्या वस्तीतले हे छोटेछोटे बदलही उद्याच्या मोठ्या परिवर्तनाची नांदी आहेत.

वर्षानुवर्षं अतिधार्मिक वातावरणात वाढलेल्या ज्या माणसानं स्त्रीवादाबद्दल कसलंही थिअरॉटिकल वाचन, अभ्यास केलेला नसतानाही धार्मिक तत्त्वज्ञानाची आणि संविधानाची सांगड घालत स्त्रियांच्या हक्कांसाठी जमेल तसं काम करणं सुरू केलं. त्याचा प्रवास कट्टर धार्मिक वातावरणात वावरणाऱ्या सर्वच स्त्री-पुरुषांसाठी पथदर्शक आहे. 

या प्रवासात सगळं काही आलबेल आहे किंवा मौलानांची स्त्रीवादाबाबतची, स्त्रीप्रश्नांबाबतची समज एकदम परिपक्व झाली असं नाहीच... पण स्वतःशी आणि समाजाशी संघर्ष करता-करता उपलब्ध असलेल्या संकुचित अवकाशातही समताधिष्ठित समाजाचं स्वप्न बघत त्यासाठी काम करता येतं हे मौलाना हुसैन यांनी त्यांच्या कृतिशील प्रयत्नांतून दाखवून दिलं आहे. 

धर्मोपदेशाची जबाबदारी शिरावर असलेला माणूस जेव्हा अशा प्रकारचं काम करतो तेव्हा त्याला खूप विरोध केला जातो, एकटं पाडलं जातं. अशा स्थितीत प्रागतिक विचारांची इतर माणसं, संस्था त्यांच्या बाजूनं ठामपणे उभी राहिली नाहीत तर वेगळा रस्ता धरलेली ही माणसं अर्ध्या वाटेतून परत फिरण्याची शक्यता असते. ते होऊ न देणं ही जबाबदारी आपणा सर्वांची आहे. 

- प्रियांका तुपे 
tupriya2911@gmail.com

(लेखिका या मुक्त पत्रकार आहेत.)


महिला दिन विशेष हे लेखही वाचा :

स्त्रीवादी विचारसरणी मानवकल्याणाची जबाबदारी पेलेल!
फेमिनिझम - काळ आणि प्रवाह

Tags: महिला महिला दिन प्रियांका तुपे मौलवी मौलाना मुस्लीम महिला कोरो Priyanaka Tupe Muslim Muslim Women Womens Day Maulana Maulavi Load More Tags

Comments: Show All Comments

Tejaswi

Humko molana ka number cahiye

Anjani Kher

प्रियांका तुपे चांगले काम करत आहेत. असेच चालू ठेवा. मौलाना आणि आपण सगळ्यांना त्याची गरज आहे.

Balu

असे मौलवीच समजामध्ये बदल घडवू शकतात, या मौलवी मध्ये मी धर्मापेक्षा मानवता अधिक प्यारी आहे हे बघितले, सलाम त्यांच्या कार्याला

Subhash Ware

मौलानांच्या कामाची फार समर्पक शब्दात ओळख करुन दिली आहे. समता फेलोशिपच्या निमित्ताने मी खूप वेळा भेटलोय. दुसऱ्याच वेगळं मत समजून घेण्याची तयारी, अंगभूत सौजन्य आणि त्यांच्या विचारांचा पाया इंसानियत या मूलभूत सुत्रावर उभा असणे हे त्यांचे वैशिष्टय मलाही भावले....

स्मिता

फार छान लिहिला आहे लेख... अशा लोकांच्या कामाची माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचली पाहिजे

Mahendra Rokade

धर्मातील मानवीय मूल्य आणि संविधनिक मूल्य यांची सांगड घालून काम करणे खूप कठीण असते. आणि जेंव्हा ही सांगड घालणारी व्यक्ती धर्मोपदेशक असेल तर वेगळाच पेच निर्माण होतो.अशात गेली पाच वर्षे मौलाना जे काम करताहेत ते निश्चितच वाखाणण्याजोगे आहे. प्रियांका तुम्ही मौलानांचे काम कमी आणि सोप्या शब्दात खूप प्रभावी रित्या मांडले त्या बद्दल तुमचे आभार.मौलाना याना अजून खूप मैलाचे दगड गाठायचे आहे.त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!!!

Ravindra Shinde

मुस्लिम म्हणजे वाईट माणसे हे लोकांच्या मेंदू मध्ये रुतलेले आहे.. त्याला छेद देणारे लिखाण गरजेचे आहे...

Shilpa Kamble

फार छान लिहलय

देवयानी गणपूले

छान लिहीले आहेस,प्रियंका!

Add Comment