आज जगभरामध्ये जो युद्धज्वर पसरलेला आहे... जी हिंसेची, द्वेषाची पाळेमुळे वाढत चाललेली आहेत ती समस्त मानवजातीसमोर अस्तित्वाचे प्रश्न घेऊन उभी आहेत. पर्यावरणाची अपरिमित हानी झालेली आहे. ॲमेझॉनचे जंगल तिथले सरकारच जाळत आहे. मुंबईतील आरे येथील मेट्रोशेडसाठी बिल्डरलॉबी सेटिंग लावत आहे. अशा वेळी इकोफॅमिनिझमसारख्या चळवळीची आपण पाठराखण करायला हवी. पितृसत्ता ज्याप्रमाणे स्त्रियांचे शोषण करते त्याप्रमाणे तीच सत्ता निसर्गालाही ओरबाडत असते.
‘स्त्रीवाद’ या शब्दाचा अर्थ माझ्या भोवतालच्या माणसांना कळण्याआधीच मी स्त्री म्हणून जन्माला आले होते. ‘सिमान द बोव्हा’ ज्याप्रमाणे (जे) सांगते की, पुरुष जन्माला येतो आणि स्त्री ही घडवली जाते हे खरेच आहे. मलाही लहानपणापासून ‘स्त्री’ म्हणून मोठे करण्यात आले. खाली बघून चालायचे, स्वयंपाक करायला शिकायचे, मुलांशी माफक बोलायचे, आरशात जास्त वेळ पाहायचे नाही अशी कुंपणे माझ्याभोवतीही होती. मी मुलगी म्हणून जन्माला आल्याचे दुःख आईआजी या दोघींना फारच वाटायचे. माझे वडीलही मुलगी झाली म्हणून हळहळायचे. मुलगा नाही म्हणून माझा वंश बुडाला असे त्यांना वाटायचे... कारण लग्न झाल्यावर रितीरिवाजानुसार मी नवऱ्याचे नाव लावणार होते ना... तर त्यांना दिलासा द्यायला मी एकदा आग्रहाने म्हटले की, काही काळजी करू नका. लग्न झाल्यावरही मी तुमचेच आडनाव लावेन... तर जन्मापासून मला चिकटलेले माझे नाव शिल्पा आदिनाथ कांबळे हे लग्नानंतरही तसेच कायम राहिले. मला वाटते... स्त्रीवादी विचारांतून प्रेरणा घेऊन एक ठोस कृती अशा प्रकारे मी पहिल्यांदा केली असेन.
ज्याला आधुनिक पाश्चात्त्य स्त्रीवाद म्हटले जाते त्या स्त्रीवादाचा आणि माझा परिचय कॉलेजात असताना झाला. मला वाटते... मी जर रुईया महाविद्यालयात प्रवेश घेतला नसता तर आज एक निराळीच व्यक्ती असते. रुईया महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळ होते. तिथे मी फार रमत गेले. मीना गोखले नावाच्या आमच्या प्राध्यापिका होत्या. त्या अतिशय प्रेमाने वकृत्वस्पर्धेसाठी आमची तयारी करून घ्यायच्या. त्या स्पर्धांच्या तयारीचा भाग म्हणून मी अनेक पुस्तके वाचू लागले. ती पुस्तके वाचता-वाचता स्त्रीवादी विचारांची बैठक तयार होत गेली. स्त्रियांना मतदानाचा हक्क नव्हता, सारखा पगार मिळायचा नाही, लिहिण्यावाचण्याची मनाई होती, त्या मालमत्ता बाळगू शकायच्या नाहीत, मुलांच्या संगोपनासाठी सुट्टी नव्हती, पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांमध्ये पुरुष सैन्यात गेल्यामुळे स्त्रियांना कारखान्यात काम करण्याची संधी मिळाली... अशा एकेक गोष्टी समजत गेल्या.
‘अ व्हिंडिकेशन ऑफ राइट्स ऑफ द वुमन’ (1792) यासारख्या पुस्तकाचा परिचय झाला. आंतरमहाविद्यालयीन वकृत्वस्पर्धांमध्ये जीन्स घालून भाषण करणारी मुलगी म्हणून माझ्यावर कमेंट्स पास केल्या जायच्या. मी जीन्स फॅशन म्हणून नाही तर गरज म्हणून घालायचे. त्या वेळी त्या एकदोन जीन्सवर आलटून-पालटून टॉप्स घातले की माझा कपड्यांवरचा खर्च वाचायचा. तर स्त्रियांचे चारित्र्य हे असे कपड्यांवरून ठरवायची आपली रीत आहे. स्त्रीपुरुष समानतेसाठी ‘स्त्रियांनी जाकिटे घातलीच पाहिजेत’ असे गोपाळ गणेश आगरकर म्हणत ते याचमुळे.
घराबाहेरचे जग असे होते आणि घरातले जगही तसेच होते. कुटुंबातील बायकांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष शोषण पाहत मोठी होत गेले. वयस्क आजीला आजोबा सहज येता-जाता मारायचे. आई, मामी, काकी या सगळ्या बायकांवर हात उचलण्याचे परवाने त्यांच्या नवऱ्यांना होते. बायका या मारहाणीची तक्रारही करायच्या नाहीत. इतके हे जगणे त्यांच्या अंगवळणी पडलेले असायचे. ‘पशू, शूद्र और नारी सदा ताडन के अधिकारी’ ...हे काही उगाच तुलसीदास यांनी म्हटलेले नाही. बायकांसाठी संसार हा कष्टाचा दुःखाचाच असायचा. प्राचीन काळात महाकारुणी तथागताने स्त्रियांना भिखुणी म्हणून संघात प्रवेश दिला आणि त्यांच्या मुक्तीचा मार्ग खुला झाला. ‘थेरीगाथा’मध्ये मुक्ता थेरी भिखुणी होताना आनंदाने म्हणते ना... मी मुक्त झाले. मी तीन गोष्टीपांसून मुक्त झाले. उखळ, मुसळ, कुबड्या. पतीपासून आणि जन्ममृत्यूच्या चक्रापासून मी मुक्त झाले. माझी तृष्णा समूळ नष्ट झाली.
...तर संसारातील काबाडकष्ट, कुटुंबाचा जाच, व्यक्तिस्वांतत्र्याची गळचेपी या सगळ्या गोष्टींना आव्हान द्यायचे म्हणजे लग्न या व्यवस्थेला प्रश्न विचारायला हवेत हे मला कळत होते. किबंहुना मराठी साहित्यातील स्त्रीवादी लेखनाच्या वाचनातून कुटुंबसंस्था, नातेसंबध, प्रेम या सगळ्या संकल्पना नव्याने कळू लागल्या होत्या. गौरी देशपांडे यांच्या साहित्याचा माझ्यावर व माझ्या मैत्रिणींवर फार प्रभाव होता. या वाचनातूनच विचारांना बळकटी येऊ लागली होती. माझ्या एका मैत्रिणीने कुटुंबाच्या आग्रहाला बळी पडून ॲरेंज्ड मॅरेज केले... पण काही केल्या नवऱ्याबरोबर तार जुळेना म्हणून घटस्फोटही घेतला. अर्थात हे काही तिच्यासाठी सोपे वगैरे नव्हते... पण जे स्त्रीवादी लेखन आम्ही वाचत होतो त्यांतून आमची काहीएक तात्त्विक बैठक तयार होत गेली.
लेखनातून प्रेरणा मिळाली हे जरी खरे असले तरी उच्चवर्गीय-उच्चवर्णीय साहित्य आणि बहुजन समाजविश्व यांत दरी होतीच. ही दरी फार खोल होती. आमचे समाजवास्तव हे मराठी स्त्रीवादी लेखनाच्या परिघात येणारे नव्हते. या पुस्तकांच्या जगातील पुरुष समजूतदार, सुसंस्कृत होते. त्यांतील स्त्रियांचे प्रश्न प्रामुख्याने भावनिक, लैंगिक होते. दलित स्त्रियांचे अनुभवविश्व त्याहून वेगळे होते. त्यांचे शोषण तिहेरी होते. पुरुषसत्ता, जातिप्रथा आणि वर्गव्यवस्था या सगळयाच पातळ्यांवर या बायकांचे शोषण होत होते. त्यांच्यासमोर भुकेचा, उपासमारीचा, दारुड्या नवऱ्याचा मार चुकवण्याचा, घराबाहेर अब्रू वाचवण्याचा प्रश्न होता. माझ्या समाजातील स्त्रिया कचरावेचक, घरकामगार, रस्त्यावर खडी फोडणाऱ्या, हायवेवर फुटकळ वस्तू विकणाऱ्या अशा होत्या. त्यांच्या अधिकाराच्या, अस्तित्वाच्या लढाया या पुस्तकांतून प्रभावीपणे येत नव्हत्या. ज्या जातीत, ज्या समाजात मी वाढले होते त्यांतील स्त्रियांची अवस्था अशी हताश करणारी होती.
नोकरी, लग्न, मूल असूनही माझे मन कसल्यातरी दुखण्याने त्रस्त असायचे. एक पोकळी जाणवत राहायची. मग अश्विनी तोरणे नावाच्या या जिवलग मैत्रिणीच्या आग्रहाखातर मी पुस्तक लिहिण्याचे ठरवले. त्यातून ‘निळ्या डोळ्यांची मुलगी’ ही कादंबरी लिहिली गेली. या कांदबरीमध्ये आंबेडकरी विचारांवर आधारलेला स्त्रीवाद मी मांडलेला आहे. एखाद्या दलित मुलीला महानगरामध्ये किती प्रकारच्या जाचाला सामोरे जावे लागते ते यात मांडले आहे. या मुलीच्या आजूबाजूच्या बायका लुपेंन कॅटेगरीतील आहे. समतेच्या चळवळीशी जोडून घेतल्याशिवाय स्त्रीमुक्ती होणार नाही अशी भूमिका त्यात मी मांडलेली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रीला जातीचे द्वार म्हटलेले आहे. स्त्रियांवर नियंत्रण मिळवले की जातप्रथा टिकवून ठेवणे पुरुषसत्तेला शक्य असते. त्यासाठीच तर बालविवाह, विधवाविवाह बंदी, सतीप्रथा, केशवपन यांसारख्या अमानुष प्रथा निर्माण करण्यात आल्या. आजचा ‘लव्ह जिहाद’ही त्याच धर्तीवरचा आहे.
...तर जुनाट, बुरसटलेल्या प्रथांचे उद्दात्तीकरण करणारे साहित्य, सिनेमा आजही मराठीत तयार होत आहे ही अतिशय खेदाची गोष्ट आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल मांडून भारतामध्ये स्त्रीमुक्ती चळवळीची मुहूर्तमेढ रोवली होती. या बिलाला सनातन्यांनी प्रखर विरोध केला. विरोधाची तीच पंरपरा आज शबरीमला (केरळ) इथपर्यंत पोहोचली आहे.
आधुनिक स्त्री म्हणजे चकचकीत कपडे घालणारी, धिटाईने दारूसिगरेट पिणारी, शरीरसुखाला चटावलेली अशी प्रतिमा तयार करण्यात आली आहे. अलीकडच्या हिंदी चित्रपटांमध्ये ही प्रतिमा ठळक करण्यात येत आहे. उदाहरणार्थ, कंगना राणावत या नटीचे ‘तन्नू वेड्स मन्नू’, ‘क्वीन’ हे चित्रपट पाहा. या सिनेमांमधून आधुनिक भारतीय स्त्रीचे एक मॉडेल आपल्यासमोर आणले जाते. हे मॉडेल पितृसत्तेला सुखावणारे, जातवर्ण व्यवस्थेला बळकटी आणणारेच असते. खऱ्या जीवनात या अभिनेत्रीने ट्विटरच्या माध्यमातून ज्या राजकीय पक्षाला समर्थन दिले आहे ते पाहता... माझे म्हणणे आपल्या लक्षात येईल.
आता आपण स्त्रीवादाच्या चौथ्या लाटेपर्यंत पोहचलेलो आहोत. या लाटेची वैशिष्टये म्हणजे सोशल मिडियाचा प्रभावी वापर. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम यांचा वापर करून जगभरातील स्त्रिया त्यांच्या शोषणाविरुद्ध आवाज उठवत आहेत. ‘मी टू’ ही चळवळ या टप्प्याचे द्योतक आहे. सत्तेची फळे चाखणाऱ्या अनेक धटिंगणांवर या ‘मी टू’मुळे आपत्ती आली. दुर्दैवाने ‘मी टू’चे आयुध हे मूठभर सुशिक्षित स्त्रियांच्याच हातात राहिले आहे. समाजातील सर्वात खालच्या पायरीवर असलेल्या स्त्रीशोषणापर्यंत ते पोहोचत नाही.
मुझफ्फर नगर (बिहार) बालिकाश्रम येथील लहान मुलीवर अमानुष लैंगिक अत्याचार झाले होते. या प्रकरणात बालकल्याण मंत्रालयाचे अधिकारी, मंत्री यांचा हात होता... पण हे काही एखादे अपवादात्मक प्रकरण नव्हते. निराधार, आश्रित, भटक्या मुलींवर सातत्याने अन्याय, अत्याचार होत असतात. यांतील गुन्हेगारांना राजकीय अभय मिळत असते. कित्येकदा गुन्हेगाराच्या समर्थनार्थ रॅली काढल्या जातात. (आसिफा प्रकरण - कठुआ–काश्मीर) अनाथाश्रम, सरकारी महिलाश्रम, खासगी संस्थांची निराधारगृहे इथे राहणाऱ्या स्त्रियांची जातिनिहाय माहिती तयार केली पाहिजे. तेव्हाच लक्षात येईल की, या मुली नेमक्या कोणत्या घरातून आलेल्या आहेत... त्या कोणत्या जातसमूहाचे प्रतिनिधित्व करत आहेत... त्यांच्या शोषणाला त्यांची जात कशी कारणीभूत ठरत आहे....
आपल्याकडे जातीबरोबरच धर्माचा मुद्दाही कळीचा आहे. दुसऱ्या धर्मांतील स्त्रियांना धडा शिकवण्यासाठी बलात्कराची स्ट्रॅटेजी वापरली जाते. भारतातील सगळ्यात मोठ्या अल्पसंख्याक जमातीतील मुस्लीम स्त्रियांसमोर मुक्तीच्या अनेक समस्या आहेत. त्यांच्यासाठी स्त्रीवाद काय प्रारूप घेऊन उभा आहे? बुरख्यातून मुक्ती, तोंडी तलाक बंदी, इंग्लीश व्यावसायिक शिक्षणाची उपलब्धता, नोकरीत आरक्षण, परधर्मीय पुरुषाकडून झालेल्या हिंसेपासून बचाव... अनेक अकराळविकराळ प्रश्न उभे आहेत. उत्तरे मात्र मिळत नाहीत.
‘बिर्याणी’ नाटकात मी माझ्या आकलनानुसार या समस्येला सामोरे जाण्याचा प्रयत्न केला. यातील ‘सकिना’ ही स्त्री मुस्लीम माणसाची बायको आहे. (हे आंतरधर्मीय लग्न होते.) तिला तिच्या नातवाचा हैसियतचा बर्थडे करायचा आहे. तिची मुलगी नमाजी माणसाची सून आहे. कट्टरपंथीय मुसलमान आणि साधे मुसलमान यांतील अंतर्विरोध दर्शवण्याचा प्रयत्न त्यात केला आहे. सकिनाच्या या बर्थडेच्या मिशनमध्ये तिला मदत करण्यासाठी ‘कुरमुरी’ नावाची बाई आलेली आहे. ही कुरमुरी मंदिरासमोर भाकड गायी घेऊन बसते. तर घुली नावाच्या या शाकाहारी गायीची सिकंदर नावाच्या मासांहारी कुत्र्याशी मैत्री आहे... तर या नाटकात मी अधूनमधून लोकगीते, श्रमगीते पेरली होती. त्यांतले एक गाणे मला फार आवडायचे... ‘आमची माया वाया गेली... ज्याची होती त्याने नेली.’
...तर या गाण्यात जसे सांगितले आहे नाऽ तसेच असते.. कुटुंबातल्या मुलीचा मालक कुणीतरी दुसराच असतो, हे माहेर ती आज ना उद्या सोडून जाणार असते. माझ्यासाठी स्त्रीवादाची लढाई हीच आहे की स्त्रीचा कुणी मालकच असू नये. ती स्वतःच, स्वतःची असावी. सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी त्यांचे अवघे आयुष्य स्त्रीमुक्तीसाठी अर्पण केले. सार्वजनिक कार्यासाठी घराबाहेर पडलेली पहिली भारतीय स्त्री म्हणजे सावित्रीबाई आहेत... तर आता मुली शाळेत जाऊ लागल्या आहेत, नोकरी मिळवू लागल्या आहेत... पण त्यांच्या जगण्यातील गुतांगुत वाढतच गेली आहे. नव्वदोत्तर स्त्री चूल, मूल आणि नोकरी या त्रांगड्यात अडकलेली आहे. तिच्याकडे महिन्याचा पगार आलाय... पण आर्थिक स्वातंत्र्य आलेले नाही.
माझ्या नात्यातील एका बाईला मोठ्या पगाराची, अधिकाराची नोकरी आहे... पण तिची फडी, दागिने, पासबुक सगळे नवऱ्याच्या ताब्यात असते. त्याच्या मर्जीविरुद्ध ती एक रुपयाही खर्च करू शकत नाही. त्यांचा आंतरजातीय विवाह झालेला आहे. दारू पिऊन आला की तो बायकोच्या खालच्या जातीवरूनही तिला शिवीगाळ करतो. आंतरजातीय विवाहातून जातव्यवस्था मोडून निघेन असा आदर्शवाद आपण मांडला होता... पण वास्तवात असे होताना दिसत नाही. पितृसत्ताक मूल्यव्यवस्था भारतीय पुरुषाच्या रोमारोमांत भिनलेली आहे. ती तोडण्यासाठी कॉन्शस प्रयत्न हवेत. ‘कार्ल मार्क्स’ म्हणतो ना... ‘क्लास इन इटसेल्फ’ला ‘क्लास फॉर इटसेल्फ’ करायला हवे. बायकांना त्यांच्या गुलामगिरीची जाणीव करून देणे... आद्य कर्तव्य आहे. ती करून दिली की त्या बंड करून उठण्याची शक्यता निर्माण होईल.
स्त्रीवादाचा विचार केवळ स्त्रियांमध्येच नाही तर पुरुषांमध्येही रुजला पाहिजे. माझ्या काही मैत्रिणी एनजीओच्या माध्यामातून पुरुषामध्ये स्त्रीमुक्तीचा विचार रुजवण्याचे कष्टाचे काम करत आहेत. अनीता पगारे (नाशीक) दीपा पवार (कल्याण) या धडपड करणाऱ्या महिलांची नावे मी आवर्जून या ठिकाणी घेईन. अशा लढाऊ स्त्रियांना आपण बळ पुरवले पाहिजे.
सर्वसामान्य लोकांमध्ये स्त्रीवाद हा शब्द बायकांचा विटाळ या शब्दासारखा अस्पृश्य आहे. व्हॉट्सॲप, फेसबुक, पॉप्युलर शो यांमध्ये या शब्दांचे हसेच केले जाते. त्यांच्यासाठी बायका बडबड करणाऱ्या, जाड्या, मूर्ख अशाच असतात. ८ मार्चचा दिवस तर कित्येक कार्यालयांत एखाद्या उत्सवासारखा साजरा केला जातो. बायका हौशीने दागिने, पैठणी घालून दिवस सेलिब्रेट करतात. वटपौर्णिमेला जो उत्साह असतो तोच या दिवशी असतो. या दिवसाची पंरपरा काय आहे, त्याकाळी नेमके काय झाले, त्याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम झाला, हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू काय आहे असा इतका खोल विचार आयोजक करत नाहीत. व्हाट्सॲपमधून बायकांना ‘हॅपी वुमन्स डे’ची गुलाबाची इमेज पाठवली की प्रश्न मिटला असलाच सगळा मामला असतो.
आज जगभरामध्ये जो युद्धज्वर पसरलेला आहे... जी हिंसेची, द्वेषाची पाळेमुळे वाढत चाललेली आहेत ती समस्त मानवजातीसमोर अस्तित्वाचे प्रश्न घेऊन उभी आहेत. पर्यावरणाची अपरिमित हानी झालेली आहे. ॲमेझॉनचे जंगल तिथले सरकारच जाळत आहे. मुंबईतील आरे येथील मेट्रोशेडसाठी बिल्डरलॉबी सेटिंग लावत आहे. अशा वेळी इकोफॅमिनिझमसारख्या चळवळीची आपण पाठराखण करायला हवी. पितृसत्ता ज्याप्रमाणे स्त्रियांचे शोषण करते त्याप्रमाणे तीच सत्ता निसर्गालाही ओरबाडत असते. निसर्गाशी संवाद साधत जगण्याची कला आपण शिकली पाहिजे. ग्रेटा थुनबर्गसारखी तरुण पर्यावरणवादी कार्यकर्ती एकाच वेळी प्लास्टीकच्या विरोधात बोलू शकते... तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या प्रश्नाबरोबरही स्वतःला जोडून घेऊ शकते... तर या विचारधारेच्या बरोबर आपल्याला उभे राहावे लागेल.
माझे स्त्रीवादाचे आकलन हे या प्रकारचे आहे. एका बाजूला पैशासाठी बीडमधील ऊसतोड करणाऱ्या स्त्रियांच्या गर्भाशयाची पिशवी काढणारे डॉक्टर मला दिसतात... तर दुसऱ्या बाजूला उसासारख्या नगदी पिकाची शेती करून जमिनीचे पाणी उपसणारे कारखानदार असतात. एका बाजूला कोरड्या दुष्काळाने शेतकरी तडफडत असतो... तर दुसऱ्या बाजूला शहरातील मॉलमध्ये वस्तूंचा महापूर आलेला असतो. पृथ्वी ही सगळ्या प्राणिमात्रांची जननी आहे हे समाजातील सगळ्या सत्ताधीशांना धनदांडग्यांना समजावून, वेळप्रसंगी ओरडून, मोर्चे काढून, आंदोलने करून सांगण्याची वेळ आली आहे.
मानवकल्याणाची ही जबाबदारी स्त्रीवादी विचारसरणी पेलू शकते याची मला खात्री आहे... म्हणूनच मी अभिमानाने सांगते की, मी एक स्त्रीवादी कार्यकर्ती लेखिका आहे.
- शिल्पा कांबळे
shilpasahirpravin@gmail.com
(शिल्पा कांबळे या लेखिका आहेत. 'निळ्या डोळ्यांची मुलगी' ही कादंबरी आणि 'नऊ चाळीसची लोकल' हा कथासंग्रह प्रसिद्ध आहे.)
महिला दिन विशेष हे लेखही वाचा :
Tags: शिल्पा कांबळे स्त्रीवाद महिला दिन विशेष महिला मानवकल्याण feminism woman shilpa kamble Load More Tags
Add Comment