तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्याशी काही प्रश्नोत्तरे

रा. ग. जाधव लिखित 'शास्त्रीजी' या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन 26 जानेवारी 2023 रोजी कोल्हापूर येथे होते आहे. 

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना 27 जानेवारी 1901 ते 27 मे 1994 असे 93 वर्षांचे आयुष्य लाभले. संस्कृत भाषा व साहित्य यातील त्यांची विद्वत्ता विशेष उल्लेखनीय तर धर्म, संस्कृती, साहित्य, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र इत्यादी विषयांवर त्यांनी केलेले अभ्यास-संशोधन व लेखन पायाभूत मानले जाते. त्यांच्या साथीत व संगतीत वाई येथे जवळपास दोन दशके वावरलेल्या रा. ग. जाधव यांनी 1994 मध्ये लिहिलेल्या पुस्तकाची ही नवी आवृत्ती आहे. दोनेक वर्षांपूर्वी डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी समग्र लक्ष्मणशास्त्री जोशी हा पंधरा ते अठरा खंडांचा प्रकल्प हाती घेतला असल्याची बातमी सांगितली आणि तेव्हाच असेही सुचवले की, 'शास्त्रीजी या पुस्तकाची नवी आवृत्ती लवकर प्रकाशित करा.' त्यांनी केलेला पाठपुरावा या आवृत्तीसाठी प्रमुख कारण ठरला आहे.

पहिल्या आवृत्तीतील सर्व मजकूर जसाच्या तसा या दुसऱ्या आवृत्तीत समाविष्ट केला आहे, मात्र मुखपृष्ठ तेवढे बदलले आहे आणि तीन परिशिष्टे नव्याने जोडली आहेत. तर्कतीर्थ यांच्या साहित्याची सूची, त्यांचा जीवनपट आणि 'समग्र तर्कतीर्थ' या आगामी प्रकल्पाचे तपशील. ही तिन्ही परिशिष्टे लवटेसरांनी विशेष आस्थापूर्वक तयार केली आहेत. आणि या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर घेतलेले छायाचित्रही त्यांनीच मिळवून दिले आहे. या आवृत्तीचे प्रकाशन 26 जानेवारी 2023 रोजी, सरोजा भाटे अध्यक्ष आणि प्रकाश पवार व शंतनू अभ्यंकर हे दोन प्रमुख पाहुणे असलेल्या, कोल्हापूर येथील 'अक्षरदालन'ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात होत आहे. त्यानिमित्ताने या पुस्तकात असलेली, जानेवारी 1991मध्ये रा. ग. जाधव आणि लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या दरम्यान टपालाने झालेली प्रश्नोत्तरे येथे प्रसिद्ध करत आहोत.

(टीप : ही प्रश्नोत्तरे टपाली स्वरूपाची आहेत, समोरासमोर झालेली नाहीत. त्यामुळे उत्तरांच्या अनुषंगाने पुढील प्रश्न विचारणे वा बदलणे शक्य झाले नाही. उदारणार्थ, ‘‘मार्क्सवादात चिरंतन टिकेल असे काय आहे?- आणि साम्यवादी प्रयोगात क्षणभंगुर ठरले ते काय होते?’’- या प्रश्नांतील दुसरा प्रश्न अनावश्यक होता, असे आधीच्या एका उत्तरावरून लक्षात येईल. काही व्यावहारिक अडचणीमुळे प्रश्नोत्तराचा टपालमार्ग त्यावेळी पत्करावा लागला होता...)

प्रश्न - आदिमानवापासून आधुनिक मानवापर्यंत मानवी समाजाने केलेल्या वाटचालीचे मर्म नाना अंगोपांगांनी विशद करण्याचे कार्य आपण गेल्या सहा तपांहून अधिक काळ करीत आला आहात. या पार्श्वभूमीवर आता अखेरच्या दशकात पदार्पण करणाऱ्या या विसाव्या शतकाचे, एकंदरीत मानवी संस्कृतीच्या पदयात्रेत कोणते वेगळेपण आपणास जाणवते?

- समाजवादी क्रांती आणि अणुशक्तीवर आधारलेले वैज्ञानिक तंत्रज्ञान यांच्या योगाने जगातील सगळ्या मागासलेल्या आणि विकसित झालेल्या जनतेला समृद्धीचे आणि सर्वांगीण विकासाचे सामाजिक जीवन साध्य करता येईल, असा जबरदस्त आशावाद निर्माण झाला. मार्क्सवादाने या आशावादात अर्थशास्त्रीय दृष्टिकोनाचे महत्त्व स्थापित केले. त्यामुळे तो आशावाद बळकट झाला.

प्रश्न - मार्क्सवाद आणि जागतिक साम्यवादी क्रांती यांचा इतिहास 1917 ते 1985 या अवघ्या सुमारे 70 वर्षांत घडला, आणि संपला. मानवी इतिहासाच्या संदर्भात म्हणजे इतिहासाला एक क्रांतिकारक वळण देण्याच्या अर्थाने कार्ल मार्क्सपेक्षा लेनिन आणि लेनिनपेक्षा गोर्बाचिव्ह अधिक महत्त्वाचे, असे म्हणता येईल काय? साम्यवादी संस्कृतीचा इमला उभारणारे नि तो उभा इमला पाडून टाकणारे यांची ऐतिहासिक मूल्यदृष्टीने तौलनिक मीमांसा कशी करता येईल?

- साम्यवादी क्रांती आणि मार्क्सवाद यांनी सामुदायिक प्रयत्नांना आणि व्यक्तीच्या सामाजिकतेला महत्त्व दिले आणि व्यक्तीच्या स्वयंप्रेरणांना उपेक्षित केले. त्यामुळे व्यक्तीच्या स्वयंप्रेरणेला आणि स्फूर्तीला महत्त्व देणारी भांडवलशाही राष्ट्रे आणि युनायटेड स्टेटस्‌ ऑफ अमेरिका यांच्यातील कामगारवर्गाचे हितसंबंध भांडवलशाहीच्या प्रभावाखाली अधिक सुधारले. कामगारवर्ग आणि मध्यमवर्ग सुस्थितीमध्ये जगू लागला. परंतु मार्क्सवादी क्रांतीने थंड युद्धमय विग्रहावस्था विसाव्या शतकात ताणतच राहिली. लेनिनच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या किंवा माव त्से तुंग यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेल्या साम्यवादी क्रांतीने व्यक्तीची प्रेरणा उपेक्षित केल्यामुळे सामाजिक क्रांतीतून अपेक्षिलेला समताप्रधान व समृद्ध समाज निर्माण झाला नाही. लेनिनचे हे अपयश आहे आणि गोर्बाचेव्हचे यश म्हणजे क्रांतीच्या वैफल्याची स्पष्ट कबुली जगाला मिळाली. त्यामुळे जगातील विकसित राष्ट्रे आणि साम्यवादी क्रांतीची राष्ट्रे यांच्यातील अणुयुद्धापर्यंत विश्वविनाशकारी चाललेली स्पर्धा थांबली. गोर्बाचेव्ह हा मार्क्सवादी क्रांतीचा पुत्र होय. त्या क्रांतीमध्ये सर्व मानवजातीचे कल्याण करणाऱ्या आर्थिक शक्ती मंदावल्या आणि तथाकथित भांडवलशाही राष्ट्रांच्या संसदीय लोकशाहीवर अधिष्ठित असलेल्या राज्यसंस्था स्थिरावल्या. त्या राष्ट्रांचे सतत आर्थिक समृद्धीकडे पडणारे पाऊल आणि बहुजनसमाज, कामगारवर्ग यांचे समाधानकारक जीवन गोर्बाचेव्हच्या प्रत्ययास आले आणि अत्यंत प्रामाणिकपणे त्यांनी साम्यवादी क्रांतीची परागती स्पष्ट केली आणि सोव्हिएत युनियनला बाजारात टिकाव धरणारी अर्थव्यवस्था महत्त्वाची म्हणून मान्य करावयास लावली. एकंदरीत मार्क्सवाद हा वैचारिक दृष्टीने अनेक वैगुण्यांनी भरलेला आहे, हे लक्षात आले. मार्क्सवादी क्रांतीचे एक प्रवक्ते मानवेंद्रनाथ रॉय यांनी गोर्बाचेव्हच्या अगोदरच 60 वर्षे मार्क्सवादी क्रांती ही क्रांतीचा गर्भपात आहे, असे मूल्यमापन केले आहे आणि त्यांनी म्हटले की, या विसाव्या शतकाच्या अखेरीस समाजवादी क्रांती विरुद्ध भांडवलशाही समाज अशी परिस्थिती राहिली नाही. भारत, मुसलमानी राष्ट्रे आणि चीन यांमध्ये साठ टक्के मानवजात भरलेली आहे. यांचे प्रश्न आणि यांच्या समृद्धीचे प्रश्न अजून सुटले नाहीत. प्रजावाढीचा स्फोटक विस्तार आवरता येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे मानवी समाजाचे भवितव्य सर्वांगीण दृष्टीने समाधानकारक निर्माण करणे एकविसाव्या शतकात शक्य नाही.

प्रश्न - मार्क्सवादी ध्येयवादाने अथवा युटोपियाने जगभर गेल्या दीड शतकात पिढ्यांमागून पिढ्या भारून टाकल्या होत्या. त्या ध्येयवादाचा वा युटोपियाचा स्वप्नाळू नि वास्तव असा दुहेरी अर्थ वेगवेगळ्या जागतिक समाजांत आणि व्यक्तींमध्ये, त्यांच्या सांस्कृतिक संदर्भात केला जात असे. आता ही मार्क्सवादाची देवता अंतर्धान पावली आहे असे आपणास वाटते काय? असे असले तर मार्क्सविना जग ही स्थिती ध्येयवादोत्सुक मनांनी कशी सहन करावयाची? मार्क्सवादाला पर्याय आहे काय? स्वप्नदर्शी आणि वास्तव?

- मार्क्सवादरूपी देवता अंतर्धान पावली आहे, हे विधान वस्तुस्थितीला पूर्ण धरून आहे; परंतु मार्क्सवादाला पर्याय नाही. या पार्थिव मानवसृष्टीला संपूर्णपणे शुभ आणि समृद्ध जीवन लाभेल काय? याबद्दल स्वप्नाळू ध्येयवादी काहीही उत्तर देवोत, परंतु खरेखुरे उत्तर वस्तुस्थितीचे मूल्यमापन करता सापडत नाही. या पृथ्वीची मानवी समाजास कल्याणकारक जीवन देण्याची समर्थता दिसत नाही. अपरंपार ऊर्जा माणसाला मिळवून देण्याची समर्थता पृथ्वीमध्ये दिसत नाही. पेट्रोल आणि डिझेल हे पृथ्वीच्या पोटात मर्यादित प्रमाणात आहेत. मानवाला भविष्यकाळात सुसह्य व समृद्ध जीवन सार्वत्रिक स्वरूपात लाभायचे, तर अमर्याद ऊर्जेची आराधना करावी लागेल. सूर्याची ऊर्जा अपरंपार आहे; परंतु ती ऊर्जा औद्योगिक प्रयत्नांमध्ये कशी राबवायची याचे तंत्रज्ञान माणसाला अजून साध्य व्हावयाचे आहे. ते साध्य झाले, तर एकविसावे शतक हे विकासाचा मार्ग निर्वेधपणे आक्रमू शकेल.

प्रश्न - क्रांतीची आकांक्षा ही मानवी समूहजीवनाची प्रवृत्ती मानली, तर रशियन क्रांतीचा इतिहास हा त्या प्रवृत्तीला दिलेला सर्वात मोठा प्राणांतिक धक्का समजता येईल काय? मार्क्सवादासारख्या एकेकाळी चिरनूतन मानल्या गेलेल्या विचारप्रणालीचा प्रयोग फसला असेल, तर एकूणच क्रांतिवाद अनाथ, पोरका झाला आहे, असे म्हणता येईल काय? साम्यवाद आणि त्याचा अधिष्ठाता मार्क्सवाद यांच्या पिछेहाटीमुळे आधुनिक मानव अधिकतर कंगाल झाला आहे, असे आपणास वाटते काय?

- मानवसमाज हा विचारपूर्वक जगू लागला ते आकाशातील सूर्य-चंद्रादी प्रकाशज्योतींच्या चिंतनाने. गणित आणि कालमान यांचा सांधा व्यवस्थित या चिंतनातून दिसला. काळाचे आकलन आणि गणितशास्त्र यांच्यामुळेच मनुष्य काळावर मात करू लागला. मृत्यूवर विजय मिळवू लागला. शेतीला ऋतुमानाचे ज्ञान आवश्यक असते, हे जीवन आणि कालज्ञान यांचे उत्कृष्ट निदर्शक आहे. अनंत आकाशात माणसाच्या जीवनास उपयुक्त अशी महान शक्ती आहे, अशी अंतर्दृष्टी माणसाला प्राप्त झालेली आहे. त्यामुळे तो देवाची प्रार्थना आकाशाकडे पाहून करतो. गायत्रीमंत्र म्हणजे सवितादेवीची उपासना.

प्रश्न - मार्क्सवादात चिरंतन टिकेल असे काय आहे? आणि साम्यवादी प्रयोगात क्षणभंगुर ठरले ते काय होते?

- समाजाची शोषित आणि शोषक अशी जी विभागणी मार्क्सवादाने केली, त्यामुळे सामाजिक क्रांतीच्या उलाढाली या शतकात झाल्या. पण त्यातून समताप्रधान समाज निर्माण होऊ शकला नाही. पण समताप्रधान समाज निर्माण करण्याइतका ध्येयवाद आणि इतिहासाच्या शक्तीचे तत्त्व या दोन गोष्टी मार्क्सवादाने माणसाच्या मनात भरवल्या. त्याचे वैज्ञानिक महत्त्व नाकारता येत नाही.

प्रश्न - साम्यवादी चीन हा आज-उद्याच्या जगात विझणारा दिवा आहे की उजळत जाणारा? रशियातून हद्दपार झालेली देवता चीनमध्ये पुन्हा प्रतिष्ठित होईल का? विशेषतः जागतिक मानवी समाजाच्या संदर्भात?

- भारताप्रमाणेच चीनलाही प्रजावाढीचा स्फोट आर्थिकदृष्ट्या पाय मागे ओढणारा ठरत आहे. मार्क्सवादाचा दिवा चीनमध्ये उजळत आहे की मिणमिणत आहे, या प्रश्नाचे उत्तर निश्चितपणे आजची परिस्थिती देत आहे. ‘‘एक काळ असा होता, की चीनची लाल क्रांती भारतीय ध्येयवाद्यांनाही भुरळ पाडत होती.’’  आता तसे काही राहिलेले नाही. मार्क्सवादामुळे एक महत्त्वाचे सत्य दृष्टिआड झाले. ते म्हणजे व्यक्तीची सर्जनशीलता. त्यामुळे मार्क्सवादात जे जातात ते फसतात, हे लक्षात ठेवले पाहिजे.

प्रश्न - भारत 1920 ते 1990 यासंबंधी आपणास जाणवणारी ठळक वैशिष्ट्ये कोणती?

- पहिले मोठे वैशिष्ट्य म्हणजे अनेक भाषिक प्रदेश भिन्न भिन्न राष्ट्रे म्हणून स्वातंत्र्योत्तर काळात उभे राहिले नाहीत. त्या अनेक भाषिक प्रदेशांचे एकराष्ट्रीयत्व भारताचे प्रथम वैशिष्ट्य होय. पश्चिमी संसदीय लोकशाही ही सामान्य जनतेला स्वीकारार्ह वाटू लागली. ही भारतीय सामान्य जनता मोठ्या प्रमाणात निरक्षर आहे. इतके असूनही लोकशाही अजून टिकली आहे. मात्र भविष्यकाळ या लोकशाहीबद्दल निश्चित आशा देत नाही.

प्रश्न - आपण शंभर वर्षे जगण्याची आकांक्षा मागे व्यक्त केली होती. आता काय वाटते?

- मानवी जीवनाला साधारणपणे शंभर वर्षांची मर्यादा निसर्गाने दिली आहे. आता अखेरीच्या काळात निरोगी व स्मरणशक्ती शाबूत असलेली जीवनयात्रा चालली पाहिजे. जीवनाचा वीट आलेला नाही आणि प्राप्त कर्तव्येही टाळावीशी वाटत नाहीत.


रा. ग. जाधव लिखित 'शास्त्रीजी' हे पुस्तक साधना प्रकाशनाच्या वेबसाईटवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. 

 

Tags: लक्ष्मणशास्त्री-जोशी प्रकाशन-समारंभ सुनीलकुमार- लवटे वाई-प्राज्ञपाठशाळा साहित्य-आणि-संस्कृती तत्वज्ञान Lakshmanshastri-joshi sunilkumar-lavate Wai-Pradnyapathashala Load More Tags

Add Comment