व्यवस्थेतील अव्यवस्थेशी दोन हात करण्याची दृष्टी आणि बळ हे पुस्तक देईल!

साधना प्रकाशनाचे 'आऊट ऑफ द बॉक्स' हे पुस्तक अ. भा. म. साहित्य संमेलनात प्रसिद्ध होते आहे. 

कार्यक्षम प्रशासक आणि सर्जनशील लेखक अशी दुहेरी ओळख असणारे लक्ष्मीकांत देशमुख 2014 मध्ये आय.ए.एस. सेवेतून निवृत्त झाले आणि 2018 मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमानही त्यांना मिळाला. त्या पार्श्वभूमीवर त्यांची एक दीर्घ मुलाखत साधना साप्ताहिकातून क्रमश: आठ भागांत प्रकाशित केली होती. ती संपूर्ण मुलाखत आता एकत्रित स्वरूपात पुस्तकरूपाने आणली आहे. ही दीर्घ मुलाखत वाचून त्यांच्यातील प्रशासकाला व लेखकाला 'आऊट ऑफ द बॉक्स' हे विशेषण किती योग्य आहे याची प्रचिती येईल. या पुस्तकाचे प्रकाशन 22 एप्रिल 2022 रोजी उदगीर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात होते आहे. त्या पार्श्वभूमीवर, ही दीर्घ मुलाखत ज्यांनी घेतली त्या किशोर रक्ताटे यांचे मनोगत येथे प्रसिद्ध करतो आहोत.

2018 मध्ये बडोदा येथे पार पडणाऱ्या 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत सेवानिवृत्त सनदी अधिकारी व साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख निवडून आले. त्या वेळी ‘साधना’च्या वाचकांसाठी देशमुख सरांची दीर्घ मुलाखत घ्यायला हवी, असे ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ यांनी मला सुचविले, मी तशी तयारी दर्शवली. देशमुखसरांचे प्रशासनातील काम आणि त्यांच्या साहित्याबद्दल मला थोडीफार माहिती होती. परंतु, सनदी अधिकाऱ्याने साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणे, ही घटनाच अपूर्व होती. म्हणूनच, त्यांची एकूण जडणघडण जाणून घेण्याची उत्सुकता होती. प्रशासनातील 30 वर्षांपेक्षा जास्त अनुभवाचा पट, त्यांचे साहित्य आणि त्यांची विविध विषयांतील मुशाफिरी एवढा मोठा आवाका मुलाखतीमध्ये कसा आणायचा, असा प्रश्न माझ्यासमोर होता. मुलाखतकार म्हणून दडपणाचे ओझे होते. पण, मुलाखतीच्या निमित्ताने त्यांच्याशी झालेल्या पहिल्या भेटीतच हे ओझे गळून पडले.

पण तरीही माझ्या मनात एक प्रश्न घोळत राहिला. तो म्हणजे, देशमुखसर ही एकच व्यक्ती असली, तरी ती प्रशासक आणि साहित्यिक या दोन क्षेत्रांत तितक्याच अधिकारवाणीने कार्यरत होती. त्यामुळे, नेमके साहित्यिक अंगाने मुलाखत घ्यायची की प्रशासक अंग उलगडून दाखवायचे, असे हे कोडे होते. परंतु, त्यांच्या अनुभवी बोलण्यातून तेही सुस्पष्ट होत गेले. साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष, लेखक म्हणून आपले अनुभव, लेखनाचा प्रवास, लेखनाचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्रोत सांगत असताना त्यांचे साहित्य हे मोठ्या प्रमाणात प्रशासकीय अनुभवातून आल्याचे अधोरेखित होत गेले. कारकिर्दीच्या पहिल्या पोस्टिंगपासून त्यांचे साहित्य कसे आकार घेत गेले, हे सांगताना ते अनेकदा भावूक झाले. संवेदनशील व्यक्ती कोणत्याही क्षेत्रात गेली तरी तिचे वेगळेपण कसे सिद्ध करते, याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे देशमुखसर. सार्वजनिक जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत संवेदनशीलता किती आणि कशी गरजेची आहे, हे त्यांच्या दोन्ही क्षेत्रांतील प्रवासातून उलगडते.

समाजातील वंचित घटकांबद्दल असलेल्या जिव्हाळ्याची किनार त्यांच्या भूमिकेला आहे. त्यामध्ये त्यांचा संवेदनशील स्वभाव आणि भूमिका अधिक नेमकेपणाने पुढे येतात. प्रशासनातील कारकिर्दीत सुरुवातीला असणारा आशावाद आणि संवेदनशीलता काही वर्षांतच मरून जातात, असे सर्वसामान्यपणे म्हटले जाते. त्याची विविध कारणे असू शकतात. परंतु, कारकिर्दीच्या सुरुवातीला तहसीलदार असताना घडलेली एक भूकबळीची घटना व कारकिर्दीच्या उत्तरार्धात महानगरपालिकेचा आयुक्त असताना एका रिक्षाचालकाने केलेल्या आत्महत्येमुळे त्यांना आलेली अस्वस्थता या दोन्ही ठिकाणी ती संवेदनशीलता अतिशय तीव्र अशीच दिसते. अशा घटनांवर व्यक्त होत असताना ‘आपले काही चुकले का?’ हा त्यांच्या मनाला लागणारा घोर हीच त्यांच्या संवेदनशील स्वभावाची साक्ष आहे. कोरोना काळाने व्यवस्थेला आणि समाजाला ‘सांख्यिकी’ तक्त्यात मृत्यू बघायची सवय लावलेली असताना, एका मृत्यूमुळे अस्वस्थ होणारा अधिकारी ही कल्पनाच बहुतेकांना अचंबित करू शकेल.

देशमुखसरांची संवेदनशीलता ही फक्त व्याकूळ होण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर तिने कार्यक्षमतेचे रूप धारण केलेले दिसते. त्यांची सार्वजनिक ओळख ही एक धडाडीचा आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून आहे. त्यांच्या कार्यक्षमतेचे तपशील या पुस्तकातून उलगडत जातात. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील पूरग्रस्तांना चाकोरीबाहेर जाऊन विक्रमी वेळेत मदत पोहोचवणे असो, भ्रष्टाचाराच्या दुष्टचक्रात अडकल्याने कोल्हापूर जिल्ह्यात सामान्यांना रॉकेलचा पुरवठा न होण्याची समस्या असो, साक्षरतेच्या बाबतीत शेवटच्या क्रमांकावर असलेला परभणी जिल्हा उच्चस्थानी नेऊन ठेवणे असो की, अकोला शहराचा कायापालट असो, ही उदाहरणे त्यांच्या कार्यक्षमतेची साक्ष देतात. धोका पत्करणे, कल्पकता आणि उत्तमतेचा ध्यास ही त्यांच्या कामाची वैशिष्ट्ये दिसून येतात.


हेही पाहा : पराग चोळकर लिखित 'अवघी भूमी जगदीशाची (भूदान -ग्रामदान आंदोलनाची कहाणी) या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ


प्रशासनात अधिकारी बहुतेकदा आखून दिलेले नियम व चालत आलेल्या परंपरांनाच सर्वेसर्वा मानतात. नियमबाह्य काम केल्याचे बालंट नको म्हणून, अत्यंत निकडीच्या वेळीही महत्त्वाचे आणि तातडीचे निर्णय घेण्यास बहुसंख्य अधिकारी कचरतात. परंतु, खरे तर हीच वेळ कोणत्याही प्रशासकाच्या कार्यक्षमतेची कसोटी पाहणारी असते. या ठिकाणी देशमुखसर निश्चितच अपवाद ठरतात. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत बऱ्याचदा धोका पत्करूनही जनहिताची कामे वेगाने मार्गी लावलेली दिसतात. केवळ प्रशासनातील नियमच नव्हे, तर आपणही जनतेला बांधील आहोत, हीच भावना त्यांच्या प्रत्येक कृतीमागे दिसून येते. दुसरे म्हणजे, नावीन्यता आणि देशमुख सर हे अविभाज्य आहेत. कायम काही तरी नवीन करण्याची प्रयोगशील वृत्ती त्यांच्या कामात दिसून येते. त्यामध्ये, एकखिडकी योजना असो, देशात पहिल्यांदाच ‘बीओटी’ तत्त्वावर सुरू केलेली अकोल्यातील बससेवा असो, किंवा स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित केलेले कोल्हापूर मॉडेल असो, असे विविध प्रयोग त्यांनी प्रशासनात केले. जनतेला केंद्रस्थानी ठेवून प्रशासनाला देण्यात आलेले असे एक ना अनेक ‘देशमुख मॉडेल’ केवळ नावाजलेच नाहीत, तर विविध क्षेत्रांत ते दिशादर्शक ठरलेले आहेत, व्यापक प्रमाणावर प्रशासनात स्वीकारले गेले आहेत. हे त्यांचे नावीन्य प्रत्यक्षात ऐकताना एखादी व्यक्ती भारावून गेली नसेल, जनतेप्रती त्यांची असलेली तळमळ पाहून अभिमान वाटला नसेल, तर नवलच!

खरे तर प्रदीर्घ काळ कल्पकतेतील सातत्य जपणे आणि ते अविवादित असणे कठीण असते. परंतु, त्यांनी या अशा कल्पकतेत कधी खंड पडू दिला नाही. अधिकारी म्हणून काम करताना त्यांनी जपलेली वेगळी ओळख, त्यांच्या धोरणात्मक भूमिका आणि त्यासाठी जपलेली अभ्यासू कल्पकता विशेष आहे. हे करीत असताना सरळमार्गी आणि पारदर्शी राहणे आपले कर्तव्य आहे, याचे भान त्यांनी कधीही सोडलेले नाही. किंबहुना त्याचा अहंकारही त्यांनी कधी बाळगला नाही. त्यांच्या साहित्यिक असण्याचा खूप वेगळा आणि अप्रत्यक्ष फायदा त्यांना प्रशासकीय अधिकारी म्हणून अनेक योजना कल्पकपणे पुढे आणण्यात झालेला आहे. दीर्घ प्रशासकीय कारकिर्दीने त्यांना अधिकारी म्हणून अनेक मानसन्मान दिले. परंतु, त्यांच्या साहित्यिक प्रशासक राहण्याचा सर्वोच्च सन्मान म्हणजे साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळाले. तो सन्मान किती उचित होता, ते त्यांनी अध्यक्षीय भाषणातून दाखवून दिले.

बडोद्याचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विशेष गाजले, ते त्यांच्या अध्यक्षीय भाषणामुळे. बहुतांश मराठी साहित्यिक राजकीय प्रश्नांवर भूमिका घेत नाहीत, अशी दुर्दैवी पण सत्य परिस्थिती आपल्याकडे आहे. पण, त्यांनी अध्यक्षीय भाषणात देशातील वाढता कट्टरतावाद आणि त्याला पूरक चाललेल्या ‘राजा’च्या राजकारणाविरुद्ध घेतलेली स्पष्ट भूमिका हे त्यांच्या वेगळेपणाचे द्योतक आहे. त्यांनी वरिष्ठ अधिकारी किंवा राजकारणी यांच्याविरुद्धही अनेकदा निडरपणे भूमिका घेतल्याचे त्यांच्या कारकिर्दीत दिसून येईल. कार्यक्षमता आणि प्रामाणिकपणा यांच्या आधारावरच अशी भूमिका घेण्याचे नैतिक बळ त्यांच्यात आहे, हे नितळ सत्य आहे. ‘मला दबलेल्या आणि दाबलेल्या समूहांच्या दुःखाचा वाहक व्हायचे आहे, तोच माझ्या साहित्याचा गाभा आहे...’ असे ते या मुलाखतीत म्हणतात. तेव्हा वंचित घटकांसाठी काम करताना स्पष्ट भूमिका घ्यायला जो निडरपणा लागतो, तो त्यांच्याकडे होता म्हणूनच अनेक लोककल्याणाचे उपक्रम धडाडीने मार्गी लागू शकले, हे लक्षात येते.

मुलाखतीत आपल्या जडणघडणीत आईचा असलेला मोठा प्रभाव, आईने लावलेली वाचनाची शिस्त, त्यासाठी तिने केलेले प्रयत्न, बालपण-तरुणपणातील चार शहरांतील वास्तव्य व त्यांचा व्यक्तिमत्त्वावरील परिणाम आणि घडलेली साहित्यिक समज, शिवाय बेंगलोर आणि अमेरिकेतील वास्तव्यातील अनुभवही मननीय आहेत.

त्यांची साहित्यिक-संपदा अधिक वास्तववादी आणि वेगळी का ठरते, याचे उत्तर या छोट्या पुस्तकात मिळू शकेल. प्रशासनात असताना पाहिलेल्या तळागाळातील लोकांसमोर येणाऱ्या दाहक समस्या व निरीक्षणे इथल्या जीवनव्यवहारांच्या समग्र आकलनाचा साज चढवून त्यांच्या पुस्तकातून आपल्यापर्यंत येतात. फक्त प्रश्न मांडण्याच्या नव्हे, तर सोडवण्याच्या प्रक्रियेत कार्यरत असणाऱ्या संवेदनशील प्रशासकाच्या आड दडलेल्या लेखकाचे साहित्य आणि शिक्षण, पत्रकारिता किंवा शेती इत्यादी व्यवसायांच्या पार्श्वभूमीतून येणाऱ्या लेखकांचे साहित्य, यांमधील मूल्यात्मक फरकाची कारणे या पुस्तकात आपल्याला सापडू शकतील.

प्रशासनात कारकीर्द घडवू पाहणाऱ्या आणि संवेदनशीलपणे समाजातील घडामोडी आणि समस्यांकडे पाहणाऱ्या तरुण-तरुणींना या मुलाखतीतून दिशा देणाऱ्या बऱ्याच गोष्टी गवसू शकतील. ‘व्यवस्थेतील अव्यवस्थेशी’ दोन हात करून मार्ग काढण्याची दृष्टी आणि बळ त्यांना हे पुस्तक देईल, असा विश्वास वाटतो.

देशमुखसरांचा जीवनप्रवास मुलाखतीच्या माध्यमातून पुस्तकात मांडत असताना मला जाणवलेली आणि प्रेमात पडायला लावणारी गोष्ट म्हणजे त्यांची संवेदनशीलता, जी आजकाल कुठे तरी हरवताना दिसत आहे. ती टिकून राहण्याची गरज आहे, हे मला वारंवार पुस्तकाचे शब्दांकन करताना दिसून आले. आपल्यासमोर गाऱ्हाणे घेऊन आलेल्यांच्या समस्या सोडविण्यावर तर ते आपल्या संपूर्ण कारकिर्दीत कार्यरत राहिलेच. परंतु, आपल्या डोळ्यांना जे दिसत आहे, त्यावर मार्ग काढण्याची त्यांची जिद्द निश्चितच वाखाणण्याजोगी आहे. त्यामुळेच ‘हा माझा प्रांत नाही,’ ही भूमिका त्यांच्यात दिसून येत नाही. जे समाजात घडते, ते साहित्यकृतींमध्ये उमटते असे म्हटले जाते. हे पुस्तक वाचत असताना त्याचे प्रत्यंतर येईल. त्यांच्या साहित्यात समाजवर्तनाचे दर्शन घडेल, तसेच त्यांच्यातील प्रशासकही दिसून येईल. त्यांच्यामध्ये असलेला एक साहित्यिक आणि एक प्रशासक घट्टपणे एकमेकांचे हात हातात धरून प्रवासाला निघाले आहेत. त्यांची ताटातूट करणे खरे तर अशक्य आहे. तरी तसा प्रयत्न झाला आणि या दोघांची ताटातूट झालीच, तरीही ते दोघे स्वतंत्ररित्याही समाजाला, प्रशासनाला, साहित्याला आणि वाचकाला तितकेच दिशादर्शक ठरतील, यात काही शंका नाही.

- किशोर रक्ताटे
kdraktate@gmail.com 


अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांची मुलाखत 

 

Tags: मराठी साहित्य संमेलन साधना प्रकाशन नवे पुस्तक मराठी साहित्य सनदी अधिकारी MPSC UPSC मुलाखत Load More Tags

Add Comment