डॉ.श्रीराम लागू यांनी वेळोवेळी लिहिलेले लेख आणि त्यांच्या वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या मुलाखती यांचा संग्रह असलेले रूपवेध हे पुस्तक मुंबई येथील पॉप्युलर प्रकाशनाने काढले. त्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ 25 एप्रिल 2013 रोजी पुणे येथील फिल्म आर्काइव्ह थिएटर येथे झाला. पॉप्युलरचे प्रकाशक रामदास भटकळ, ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल व अन्य अनेक मान्यवर उपस्थित असलेल्या त्या सभागृहात सर्वाधिक लक्षवेधी ठरले ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे भाषण. कारण 1985 ते 2013 या पाव शतकात डॉ लागू व डॉ. दाभोलकर यांचे जे घनिष्ठ नाते तयार झाले, त्याची नेमकी कल्पना फार थोड्या लोकांना होती. त्या भाषणातून डॉ लागू यांचे मोठेपण व वेगळेपण पुन्हा एकदा तर ठसतेच, पण डॉ.दाभोलकर यांचेही कितीतरी आयाम अद्यापही पुरेसे प्रकाशात आलेले नाहीत, याचीही खात्री पटते. डॉ. दाभोलकर यांची हत्या झाली त्याच्या चारच महिने आधी झालेले हे भाषण आहे, सप्टेंबर 2013 मध्ये या भाषणाचा व्हिडिओ यू ट्यूब वर टाकला गेला होता. मात्र त्याचे शब्दांकन प्रथमच प्रसिद्ध होत आहे, डॉ. लागू यांना अभिवादन करण्यासाठी..
जब्बार सर्वार्थाने मला ज्येष्ठ असताना, खरं म्हणजे आधी मी बोलायला पाहिजे होतं आणि नंतर त्याने. पण मला असं दिसतं की, ज्या गोष्टीसाठी मी बोलावं अशी संयोजकांची कल्पना आहे, ती गोष्ट डॉ. लागू यांच्या नंतरच्या आयुष्याशी जास्त संबंधित आहे. जब्बार हा तन्वीर सन्मानाचा यावेळी प्रमुख पाहुणा होता, तेव्हा तो असं म्हणाला की, "इथं यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये आल्यानंतर मला असं लक्षात आलं की, गेल्या 25 वर्षांत मी नाटकच केलेलं नाही!" तर ही गोष्ट खरी आहे. आणि त्याचाच व्यत्यास असा की, माझ्या चाळिशीनंतर आणि डॉ. लागूंच्या साठीनंतर त्यांची-माझी भेट झाली. दुसरी गोष्ट अशी की, 'रूपवेध' या पुस्तकाचं आज प्रकाशन होतंय, पण त्या संदर्भात मी काही बोलणार नाही. जब्बारच्या हातात या पुस्तकाची आधी मिळालेली प्रत होती, तशी त्यांनी ती मला दिलेली नाही; आणि दिली असती तरी मी त्याबद्दल बोललो नसतो. याचं कारण मला असं वाटतं की, मी जे बोलेन त्यातून 'रुपवेधा'मध्ये न आलेल्या डॉ. लागूंच्या रूपाचा वेध तुमच्यापर्यंत पोहचावा अशी संयोजकांची कल्पना असेल.जब्बार म्हणाला, "ते-डॉ. लागू माझे गुरू आहेत" आणि मी असं म्हणतो की, "ते माझे ज्येष्ठ सहकारी आहेत." तर आपल्या कुणाच्याही मनात असा स्वाभाविक प्रश्न पडू शकेल की, डॉ. लागू माझे सहकारी कसे काय? नाटक, सिनेमा, अभिनय, संगीत हे डॉक्टरांच्या आवडीचे आणि तज्ज्ञतेचे विषय आहेत. आणि ह्यातलं मला काहीही कळत नाही हे त्यांना 'परमेश्वर नाही' इतक्याच ठामपणे माहीत आहे. पुण्यामध्ये माझं घर नाही, त्यामुळे मीच क्वचित त्यांच्याकडे चहाला जातो आणि माझ्याकडे त्यांना चहाला बोलावण्याची शक्यता नसते.
आम्ही ज्या-ज्या वेळी रात्री एकत्र असू, त्यावेळी 'ड्रिंक्स घेणं ही कशी कला आणि संस्कृती आहे' हे त्यांनी मला पटवण्याचा प्रयत्न केला आणि 'ते कसं घातकच आहे' हे मी त्यांना पटवण्याचा प्रयत्न केला. आम्ही दोघेही हट्टी असल्यामुळे, मी त्यांना पटवू शकलो नाही आणि तेही मला पुरेसं पटवू शकले नाहीत. आणि एवढं अपुरं म्हणून की काय, त्यांचं असं मत आहे की, "परमेश्वराच्या अस्तित्वाचा पुरावा गेल्या पाच हजार वर्षांत मिळालेला नाही, त्यामुळे परमेश्वराधिष्ठित धर्म ही या देशातली सगळ्यात मोठी व मुलभूत अंधश्रध्दा आहे. जोपर्यंत या अंधश्रध्देचं निर्मूलन तुम्ही करत नाही, तोपर्यंत तुमच्या या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाला काही अर्थ नाही. तुम्ही डावपेचात्मक भूमिका म्हणून सध्याचं काम करताय असं मी समजतो." आणि त्यांचे हे म्हणणे मला मान्य नाही. मी डावपेचात्मक काम करत नाही. भारतीय संविधानाची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. त्याच्यामध्ये व्यक्तीला उपासनेचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. मी संविधानाची चौकट मानतो. आणि त्याहीपलीकडे जाऊन साक्षात लागूंनी ज्यांची भूमिका केली, त्या देवकीनंदन गोपाला म्हणणाऱ्या गाडगेबाबांनी एकाचवेळी धर्मही पाळला आणि कठोरपणे अंधश्रद्धेवर प्रहार केले व नीतीचा प्रचार केला. सांगण्याचा मुद्दा असा की, एवढं सगळं असताना ते कसे झाले आमचे सहकारी?
मला आठवतंय, मी 1982च्या आसपास माझी वैद्यकीय प्रॅक्टिस बंद केली आणि पूर्णवेळ कार्यकर्ता बनलो. ज्या काळात एन.जी.ओ. कल्चर निघालेलं नव्हतं त्या काळात पूर्णवेळ कार्यकर्ता बनणं, ही फारशी सोयीची गोष्ट नव्हती. असे असंख्य कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये होते जे काम करत होते- ज्यांच्याबद्दल घरच्यांना वाटत होतं की, ही फुकटची फौजदारी आहे. कारण समाजाला त्यांच्याशी घेणं-देणं नव्हतं आणि ते ज्या समाजासाठी काम करत होते, त्या समाजाची ही कुवत नव्हती की ते त्या कार्यकर्त्यांना काही मदत देऊ शकतील. तर अशा कार्यकर्त्यांना मदत देण्यासाठी, 'मदत मागितली जाईल त्यावेळी खिशामध्ये हात घालणारे' अशी खासियत असणारी नाट्य सिनेमा क्षेत्रांतील दोन माणसं आमच्या सभोवताली होती- एक डॉ. श्रीराम लागू आणि दुसरे निळूभाऊ फुले.
नंतर असा विचार पुढे आला की, हे असं किती दिवस चालणार? म्हणून मग सामाजिक कृतज्ञता निधीची स्थापना (जळगाव चे राम आपटे यांच्या कल्पनेतून) पुढे आली. डॉक्टर लागू त्याचे संस्थापक अध्यक्ष, तर मी त्याचा संस्थापक कार्यवाह. आणि मग उत्साहाने डॉक्टरांनी पैसे गोळा करायला सुरुवात केली. ते कुठेही शूटिंगला गेले की भेटेल त्या नटाला पैसे मागायचे. माझ्याकडे ते चेक पाठवायचे. त्याच्यावर कधी जयाप्रदाची सही असायची, कधी धर्मेंद्रची. त्यामुळे अतिशय कौतुकाने आणि कुतूहलाने माझे मित्र आणि आम्ही सगळे ते चेक बघायचो. पण अचानकपणे डॉक्टरांकडून ते चेक येणं बंद झाले. तेव्हा मी त्यांना म्हटले, "डॉक्टर, काय झालं?" ते म्हणाले, "दाभोलकर, माझ्या असं लक्षात आलं की, हे लोक मी पैसे कशाला मागतो, हे विचारतच नाहीत. तुम्ही काय डॉक्टर, वाईट गोष्टींसाठी मागणार आहात का? घ्या.. असं म्हणून ते पैसे देतात." डॉक्टर लागू पुढे मला म्हणाले, "असं चालणार नाही. आपण लोकांना समजावून सांगितलं पाहिजे." मग आम्ही 'लग्नाची बेडी' नावाचं एक स्टार स्टडेड (star studded) नाटक केलं. म्हणजे एकाच नाटकामध्ये श्रीराम लागू, निळूभाऊ फुले, सदाशिव अमरापूरकर, सुधीर जोशी, रोहिणी हट्टंगडी, रीमा लागू, तनुजा, भारती आचरेकर, सुहास जोशी एवढी सगळी मंडळी होती. त्या दौऱ्यातील 21 नाट्यप्रयोगांतून खर्च वजा जाता 21 लाख रुपये आम्हाला महाराष्ट्राने दिले. यामध्ये डॉक्टरांचे मोठे योगदान आहे.
पण ते तिथंच संपत नाही. त्यानंतर सामाजिक कृतज्ञता निधीत पैसे वाढवायचे ठरले. मी अशी कल्पना काढली की, आपण विद्यार्थ्यांना सांगू, "तुम्ही एकवेळ उपवास करा आणि त्यातून वाचलेले पाच रुपये आम्हाला द्या." लोकांनी आम्हाला मूर्खात काढलं. "मुलं उपवास करून कधी पैसे देतील का आणि त्यातून निधी उभा राहतो का?" म्हणून मी म्हटलं, "आपण सातारा जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर हे राबवू." आणि मग सर्व शाळांतल्या सर्व विद्यार्थ्यांना मी जी पत्रं पाठवली त्याच्यावर बाबा आमटे, कुसुमाग्रज, पु. ल. देशपांडे, जयंत नारळीकर, अण्णा हजारे यांचं आवाहन होतं की, 'मुलांनो उपवास करा.' पण ह्याने काही झालं नाही. म्हणून मी शिक्षणाधिकाऱ्यांकडे गेलो. त्यांना म्हटलं, "काय करावं?" ते म्हणाले, "मलाही कळत नाही. खरं तर मुख्याध्यापकांनी प्रतिसाद द्यायला हवा होता." पुढे ते म्हणाले, "आपण कुणी सेलिब्रिटी आणू शकू का? " मी म्हटलं, "आणू शकू की!" ते म्हणाले, "कोण येतील?" मी म्हटलं, "डॉ. लागू आणि निळूभाऊ येतील ही जबाबदारी माझी." आणि आम्ही एकाच दिवसात सातारा जिल्ह्याचे दोन भाग करून 300 मुख्याध्यापक इकडे आणि 300 तिकडे अशा दोन बैठका घेतल्या. दोन्ही ठिकाणी डॉ.लागूंनी स्वतः आवाहन केले. त्यातला एक महत्त्वाचा भाग असा होता की, 'उपवास करून पाच रुपये देणं परवडत नसेल, तर देऊ नका. पण कार्यकर्ते हे काम का करतात यासाठी उपवास करायला तुम्ही मुलांना सांगा.' तर, तेव्हा सातारा जिल्ह्यामध्ये 48 हजार मुलांनी उपवास करून अडीच लाख रुपये दिले. त्यानंतर लागूंसोबत महाराष्ट्रभर हा उपक्रम आम्ही राबवला. त्यातून जवळजवळ 25 लाख रुपये मिळवले, त्यासाठी डॉ. लागूंना आम्ही मुख्याध्यापक वगळून थेट विद्यार्थ्यांतच घेऊन जात होतो.
पण हे सगळं सुरु होण्याआधी मला आलेलं त्यांचं एक पत्र, काल फायली चाळत असताना मला सापडलं. त्यात असं लिहिलेलं आहे की, "लोकसत्तेमध्ये बातमी आलेली आहे. त्याच्यामध्ये 'डॉ लागूंनी 22 लाख रुपये इन्कम टॅक्स चुकवला' असं लिहिलेलं आहे. खरं तर तो आकडा अडीच लाख आहे आणि तोही मी चुकवलेला नाही. त्याबद्दल मी कोर्टामध्ये लढतोय. माझी अशी प्रवृत्ती नाही; आणि 22 लाख रुपये इन्कम टॅक्स चुकवावा इतकी माझी ऐपतही नाही. मी तुम्हाला हे यासाठी कळवतोय की, तुम्हाला हे embarrassing होऊ नये. सामाजिक कृतज्ञता निधीची विश्वासार्हता धोक्यात येऊ नये म्हणून. तुम्हाला पाहिजे असेल तर मी पत्राद्वारे राजीनामा देत आहे. मी राजीनामा दिला तरीही, मी तेवढंच काम करत राहीन. पण मी काम करणंही योग्य नाही, असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला तेही सांगा. याच्यामध्ये माझं काही हौतात्म्य नाही किंवा कसलाही कमीपणा नाही. एका चांगल्या सामाजिक कामाला माझ्यामुळे अकारण बाधा येऊ नये, अशी माझी इच्छा आहे." मित्रहो, हे लिहिणाऱ्या डॉ. लागूंनी अनेक कोटी रुपये मिळवले आणि ऐंशी वर्षं झाल्यानंतर शांतपणे सामाजिक कृतज्ञता निधीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तो आम्ही अद्याप स्वीकारलेला नाही. पण डॉक्टर मात्र त्याच्यानंतर कधीही तिकडे फिरकले नाहीत. इतके पैसे मिळवण्यासाठी स्वतः फिरल्यानंतर 'इदम् न मम' म्हणून ते सोडून देणं ही गोष्ट आपल्याला वाटते, त्याच्यापेक्षा अवघड आहे.
मी आणि डॉक्टर लागू एकदा सोलापूरला गेलेलो होतो. रोटरीने कार्यक्रम घेतला होता. मला, त्यांना आणि आणखी दोघांना प्रत्येकी पंधरा मिनिटांचा वेळ दिलेला होता. विषय होता- परमेश्वराचं अस्तित्व. तो कार्यक्रम रंगला. परंतु त्याला वेळच पुरे पडला नाही. त्यानंतर मी आणि डॉक्टर बार्शीला निघालो होतो. मी त्यांना म्हटलं, "डॉक्टर, तुम्ही मला दोन महिन्यांतून एक दिवस द्या. म्हणजे आपण याच्यावर सविस्तर चर्चा करत जाऊ." ते म्हणाले, "तुम्ही मला दोन महिन्यांतून एक दिवस मागताय, परंतु मला शिव्या खायची सवय आहेच, त्यामुळे मी तुम्हाला एका महिन्यात दोन दिवस देतो." लक्षात घ्या, हे अवघड आहे, कारण डॉक्टर जे बोलत होते, ते प्रक्षोभक होतं. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे व्यासपीठावर मी डॉक्टरांचा प्रतिवाद करत होतो. मी म्हणायचो "डॉ. लागू जे सांगतात, ते मला मान्य नाही. माझं आणि अंनिसंचं मत, हे डॉक्टर लागूंच्यासारखं नाही. परमेश्वराला रिटायर केल्याशिवाय अंधश्रद्धा निर्मूलन होणार नाही, हे डॉ. लागू यांचे मत आम्हाला मान्य नाही." असं असतानादेखील विवेकी विचारांचं संघटन होतंय, म्हणून ते आमच्याबरोबर आले. एका कार्यक्रमानंतर आमच्यावर फिजिकली हल्ला झाला. मला मारहाण केली. डॉक्टर गाडीमध्ये बसले होते. डॉक्टरांनी न उच्चारलेल्या उच्चारांवरून प्रचंड कल्लोळ माजवला गेला. त्यानंतर आम्ही पत्रकार परिषद घेतली. आणि तिथे आम्ही सांगितलं, "हल्ले-बिल्ले झाले, म्हणून आमचे कार्यक्रम बंद होतील, अशा भ्रमात तुम्ही राहू नका. हे कार्यक्रम आम्ही करणार!"
चार महिन्यांनंतर कळवणला आमचा कार्यक्रम होता. आम्ही आदल्यादिवशी रात्री झोपलो होतो. संयोजक दीड वाजता आले आणि म्हणाले, "उद्या कार्यक्रम होणं शक्य नाहीये. धमकी देण्यात आलेली आहे. हॉल व ध्वनिक्षेपक नाकारण्यात आलेला आहे. तुम्ही उद्या कळवणला येऊ नका, असं सांगायला आलोय." मी म्हटलं, "रात्रीचा दीड वाजलाय. डॉक्टरांना आता उठवत नाही. पण उद्या मी कळवणला येणार. आमचा कार्यक्रम होणार. हॉल मिळाला नाही तरी चालेल, ध्वनिक्षेपक मिळाला नाही तरी चालेल. हॉलसमोर रस्त्यावर उभा राहून, मी आणि डॉ. लागू बोलणार. कोणीही आमचा आवाज बंद केलेला आम्हाला चालणार नाही." दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर उठल्यानंतर मी त्यांना म्हटलं, "डॉक्टर, काल मी त्यांना असं असं म्हटलेलं आहे आणि आपण आता जायचंय." डॉक्टर अर्थातच 'हो' म्हणाले. आम्ही जरा व्यावहारिक हुशारी म्हणून गाडी बरी मागवली आणि त्या ठिकाणी गेलो. तोपर्यंत आमच्या या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांनाही जोर आलेला होता. तो कार्यक्रम उत्तम पार पडला.
त्याच्यानंतर एकदा दिवसभराचा दौरा होता. संध्याकाळी साडेसात वाजता मुक्कामाच्या जागेला पोचलो. डॉक्टर दमले होते. ते म्हणाले, "हा संध्याकाळचा कार्यक्रम आता तुम्हीच करा. मी जरा पडतो." आणि डॉक्टर आतल्या खोलीत पडले. मी बाहेरच्या खोलीत होतो. एवढ्यात डीवायएसपी आले. ते म्हणाले, "आज तुमचा कार्यक्रम आहे ना? लक्षात ठेवा बरं का, देवाबद्दल काही बोलायचं नाही. अंधश्रद्धेबद्दल काय असेल ते बोलायचं." त्याला काय उत्तर द्यायचं याचा मी विचार करतोय, तेवढ्यात डॉक्टर आतून बाहेर आले. ते म्हणाले, "काय म्हणाला तुम्ही?" डीवायएसपीला आत डॉ. लागू आहेत, हे माहित नव्हतं ना! तो एकदम वरमून म्हणाला, "नाही... ते काय आहे... मी असं म्हणत होतो की, तुम्ही जरा देवाबद्दल बोलला नाही तर बरं होणार नाही का? शिवसेनेने धमकी दिली आहे.. शिवसेनेचेच महापौर आहेत... वगैरे, वगैरे!" डॉक्टर त्यांना म्हणाले, "काय बोलायचं, हे मला चांगलं कळतं आणि काय करायचं हे तुम्हालाही!" या प्रसंगामुळे डॉक्टरांचा सगळा थकवाच गेला. ते नरहर कुरुंदकरांचं गाव होतं, म्हणून मी सुरुवात करताना म्हटलं की, "कुरुंदकरांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे - 'माझा ध्येयवाद' या अप्रकाशित लेखामध्ये. ते आम्हा दोघांनाही लागू होतं, असं मला वाटतं. ते वाक्य असं आहे- माझा देवावर विश्वास नाही. माझा धर्मावर विश्वास नाही. पण देव आणि धर्म मानणारे कोट्यवधी लोक माझ्या आजूबाजूला पसरलेले आहेत, त्यांच्यापासून तुटुन पडण्यावरही माझा विश्वास नाही. मी माझ्या विचारांत तडजोड करणार नाही, कारण विचार माझ्या जीवनाची दिशा ठरवतो, पण आचारांमध्ये मी लवचिकता धारण करीन, कारण कोट्यवधी लोकांना सोबत घेऊन जाण्यामध्ये मला रस आहे." तो कार्यक्रमही व्यवस्थित पार पडला.
कार्यक्रमांतील आमच्या मांडणीनंतर प्रश्नोत्तरं व्हायची. कुठल्यातरी एका प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमांमध्ये एकाला शोध लागला आणि त्याने प्रश्न विचारला, "तुम्ही दोघांनी आपापल्या मुलांचं नाव मुसलमानातील का ठेवलं? विष्णु, शंकर अशी चांगली नावं नव्हती का? परस्परांची ही गोष्ट तोपर्यंत आम्हाला दोघांना माहीत नव्हती बरं का! माझ्या मुलाचं नाव हमीद आहे आणि डॉक्टरांच्या मुलाचं नाव तन्वीर. डॉक्टर म्हणाले, "माझी साधी भूमिका अशी होती की, आपल्याकडे जाती किंवा धर्म हे व्यक्तीच्या नावावरून ओळखले जातात. त्यामुळे समजा माझ्या मुलाचं नाव इब्राहिम ठेवलं असतं तर ते इब्राहिम श्रीराम झालं असतं. इब्राहिमच्या मुलाचं नाव त्याने जॉन ठेवलं असतं, तर ते जॉन इब्राहिम श्रीराम झालं असतं. मग ही काय भानगड आहे, असं लोकांना वाटलं असतं आणि थोडी मजा आली असती. पण अडचण अशी झाली आहे की, तन्वीर हे नाव मुसलमानातील आहे हे कोणाला कळलंच नाही. त्यांना वाटलं, जसं रणवीर तसं तन्वीर!"
कितीतरी वर्षं डॉ. लागू अंनिसच्या कार्यक्रमासाठी आमच्याबरोबर फिरले. मी कधीही एकही नवा पैसा त्यांना दिला नाही. त्यांना एसी खोली असेल, हे बघणंही मला शक्य झालं नाही. ती खोली त्यांना अनेकदा माझ्याबरोबर शेअर करावी लागली. ते नटसम्राट आहेत, ही मोठी गोष्ट आहे आणि ते मान्यच आहे. पण इथे मात्र ते कार्यकर्त्याच्या भूमिकेमध्ये शिरले. वयाच्या साठीनंतर अशी भूमिका स्वीकारणं आणि ती निभावणं, ही अवघड गोष्ट आहे. त्यामुळे पुढे पुढे काय झालं तर आम्ही सत्यशोधकी लग्न लावायचो, त्या लग्नांनाही आम्ही डॉक्टरांना न्यायला लागलो. आमच्या अनेक परिषदा असायच्या, त्या परिषदांनाही आम्ही डॉक्टरांना बोलवायला लागलो.
शनिशिंगणापूरला आम्ही सत्याग्रह केला, शनिशिंगणापूरच्या शनिमंदिराच्या चौथऱ्यावर बायकांना प्रवेश मिळायला पाहिजे यासाठी. तेव्हा डॉक्टर आमच्याबरोबर कलेक्टरच्या दारामध्ये दोन दिवस धरणे धरून बसले. तिसऱ्या दिवशी आम्हाला अटक केली. त्यात डॉक्टर, एन. डी. पाटील, बाबा आढाव, पुष्पा भावे असे सगळे मोठे लोक होते. पोलिसांनी सह्या घ्यायला सुरुवात केली. तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की, पोलीस जामिनावर सह्या घेतायत. मी म्हटलं, "सत्याग्रहींनी जामीन द्यायचा नसतो. तुम्हाला अटक झालेली आहे. तुम्ही शिक्षा भोगायला पाहिजे. सगळ्यांचे जामीनाचे कागद काढून घेतले. तो डीवायएसपी वैतागला. म्हणाला, "मी यांना तुरुंगात कुठे ठेवू?" मी म्हटलं, "तुरूंगात कुठे ठेवायचं हा तुमचा प्रश्न आहे, तो माझा प्रश्न आहे का?" मग संध्याकाळी पाच-साडेपाच वाजेपर्यंत नगरच्या जेलमध्ये बराक बऱ्यापैकी मोकळी करण्यात आली आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळे लोक गेलो. तुम्ही कधी जेलमध्ये गेला नसाल. बराकेतल्या संडासला पूर्ण बंद होणार दार नसतं. ते वरुन आणि खालून थोडं मोकळं असतं. 'तुमचं लज्जारक्षण व्हावं; पण तुम्ही आत आहात, हेही कळलं पाहिजे', यासाठी ती स्थिती असते. आणि झोपायला जाडंभरडं काहीतरी असतं. तिथे रात्री आम्ही सगळे झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉ. लागू व्हरांड्यात खुर्ची टाकून बसले होते. समोर एक हौद होता, त्यावर मी आणि एन. डी. पाटील अंघोळ करत होतो. आम्हाला गार पाण्याने अंघोळ करायची सवय आहे. बाकीचे कैदी बाहेर आले, तेव्हा त्यांना कळेचना की, डॉ. लागू इथे कुठून आले? त्यांना वाटायला लागलं की, इथे शुटिंगबिटिंग काहीतरी दिसतंय. आणि त्याच्यासाठी लागू आलेत. हे सगळं झाल्यानंतर साडेनऊ वाजता तो जेलर माझ्याकडे आला. मला बाजूला घेऊन तो म्हणाला, "एक विनंती आहे." मला कळेना की, अटक होऊन मी जेलमध्ये आहे, तो जेलर आहे; आणि तो मला विनंती कसली करतोय? मी म्हटलं, "काय झालं?" तो म्हणाला, "बायको म्हणतेय, डॉ. लागू इथं आलेच आहेत, तर त्यांना घरी ब्रेकफास्टला बोलवा." मी म्हटलं, "आनंदाने मंजूर आहे तुमची विनंती. आम्हाला कुठं हौस आहे इथलं वाईट खाण्याची!" पुढे तर अशी वेळ आली की, लोक मला कार्यक्रमाला बोलवायचे आणि मी कार्यक्रम स्वीकारल्यानंतर हळूच विचारायचे, "तुमच्याबरोबर लागू येणार आहेत, की निळूभाऊ फुले?"
एकदा आमचा जळगाव आणि धुळे दौरा होता. सगळ्या संघटना एकत्र आल्या होत्या. प्रचंड उत्साह होता. संयोजनामध्ये काहीतरी चुकलं. एरवी कार्यक्रमाच्या ठिकाणी सकाळी साडेनऊला ब्रेकफास्ट करून डॉक्टर तयार व्हायचे, कार्यक्रम संपला की विश्रांती आणि मग दुपारचा दुसरा कार्यक्रम. इथं मात्र सकाळी साडेसातला एकाकडे चहा, मग दुसऱ्याकडे साडेआठला नाश्ता, तिसऱ्या घरी नऊ वाजता भेट, मग चौथीकडेच कार्यक्रम असं चाललं होतं. तो कार्यक्रम उरकून आम्ही शिरपूरला गेलो. डॉ. लागू येणार आणि हॉल नाही, म्हणून प्रचंड मंडप घातलेला. तुलनेने उन्हाळ्याचे दिवस, त्यात लाईट गेलेले. वर पंखा नाही. माईक नसल्यामुळे आवाज जात नाही. असं करत करत आम्ही तो कार्यक्रम संपवला. त्यानंतर डॉक्टर आणि मी खोलीमध्ये आलो. शांतपणे दोन पेग त्यांच्या घशाखाली गेले. तेही शांत बसलेले होते आणि मीही. (कार्यक्रम संपल्यानंतर साधारणतः आम्ही दोघेच असायचो.) थोड्या वेळानंतर ते म्हणाले, "दाभोलकर एक सांगू का?" मी म्हटलं, "सांगा." स्फोट व्हावा असं ते म्हणाले, "आम्ही म्हणजे नुसते वेठबिगार.. तुमचे वेठबिगार! तुम्ही सांगितलं, 'उठा'.. की उठायचं. तुम्ही सांगितलं 'बसा..' की बसायचं." मी म्हटलं, "माझी चळवळ केवढी मोठी झाली... दस्तुरखुद्द डॉ. श्रीराम लागूंसारखा वेठबिगार मला मिळाला!" तर मित्रहो, आजच्या घटकेला डॉक्टरांच्या एक दशांश क्षमतेचा नाटकातला, सिनेमातला वा टिव्ही सिरियलमधला वेठबिगार त्याला आवडणाऱ्या आमच्या कुठल्याही कार्यक्रमाला मिळत नाही.
1998 मध्ये साधनाचा संपादक झालो आणि डॉक्टरांना सांगायला गेलो की, तुम्ही काहीतरी लिहा. तेव्हा डॉक्टरांनी त्यांची भरलेली बाडं मला दिली. त्याचंच पुढं लमाण हे पुस्तक निघालं. साधना हे त्यावेळी तुलनेने अत्यंत छोटं साप्ताहिक होतं. त्यावेळची आमची स्थितीही वाईट होती. दुसऱ्या बाजूला डॉ. लागूंना फार मोठं नाव होतं. कुठल्याही प्रमुख साप्ताहिकाने आणि वृत्तपत्राने डॉक्टरांचं ते लिखाण आनंदाने सिरियलाइज केलं असतं. फार मोठया प्रमाणात त्याला वाचक मिळाला असता. पण साधना हे एक ध्येयवादी साप्ताहिक आहे आणि नरेंद्र दाभोलकर त्याचे संपादक झालेले आहेत, तर त्यांना आपण मदत करायला पाहिजे, म्हणून त्यांनी ते लिखाण मला दिलं. तेवढ्या तोलामोलाने त्याचं पुस्तक आम्हाला काढता येणार नाही, म्हणून मग त्या लेखमालेचं पुस्तक पॉप्युलरने काढलं.
ना. धो. महानोरांना 1991 साली पद्मश्री मिळाली त्यावेळी जळगावला डॉ. लागूंच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. तेव्हा योगायोगाने मी तिथे होतो. सत्कार झाल्यावर मी आपलं उगीचंच डॉ. लागूंना म्हटलं, "डॉक्टर, आता तुम्हाला पण पद्मश्री मिळायला पाहिजे बरं का!" डॉक्टरांनी तिरकं माझ्याकडे बघितलं आणि म्हणाले, "दाभोलकर, मला 1973 मध्येच पद्मश्री मिळाली आहे."
मला एकदा उत्तम कांबळेचा फोन आला की, "अमुक अमुक कवी आजारी आहेत. त्यांना तातडीने काही लाखांची गरज आहे. डॉ. लागू काही मदत करतील का?" मी म्हटलं, "विचारतो." मी डॉक्टरांना फोन करून विचारलं. डॉक्टर म्हणाले, "देतो." मला आश्चर्य वाटलं, कारण मला अशी अपेक्षा होती की, ते म्हणतील, "दाभोलकर, त्यांना असं सांगा की, अमुक एवढी रक्कम मी देतो." पण तसं झालं नाही. मात्र त्याच्यानंतर पाच मिनिटांत मला उत्तमचा फोन आला. "अरे नरेंद्र, डॉक्टरांचा फोन आला मला. आणि त्यांनी सांगितलं की, मी इतकी-इतकी रक्कम देतोय म्हणून." आणि ती रक्कम बऱ्यापैकी मोठी होती. मी असा विचार केला, की डॉक्टर मला हे सांगू शकत होते. पण त्यांनी ते सांगितलं नाही. याचं कारण, दान हे कधी शतकर्णी करायचं नसतं, असं आपण म्हणतो. ते फक्त देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला माहिती पाहिजे. डॉ. लागूंनी दिलेल्या सगळ्या देणग्यांविषयी दीपाताईंना तरी माहिती आहे की नाही, मला माहित नाही. पण मला ते बरंच जास्त माहीत आहे, कारण देणगी घेणाऱ्या अनेकांनी मला सांगितलेलं आहे, की डॉक्टर लागूंनी त्यांना किती मदत केलेली आहे. त्यांच्या 'वाचिक अभिनय' या पुस्तकाची सहावी आवृत्ती चालू आहे. आणि त्याची सगळी रॉयल्टी अंधश्रद्धा निर्मूलन समितीला मिळते आहे. हे मी तुम्हाला सांगितल्याशिवाय कळणार नाही.
डॉ. लागूंच्याबरोबर- आता कमी, पण पूर्वी अनेकदा रात्री भरपूर गप्पा मी मारलेल्या आहेत. मात्र गेल्या 25 वर्षांत चुकून देखील मी त्यांच्याकडून एकदाही गॉसिप ऐकलेलं नाही. फक्त एकदा एका अभिनेत्रीबद्दल ते म्हणाले, "She behaved thoroughly unprofessional." आणि एवढं वाक्य उच्चारल्याबरोबर जीभ चावून ते म्हणाले, "Oh, I'm very sorry." मित्रहो, हे असं वागता येणं फार अवघड आहे.
एवढं सगळं असूनही या माणसाची इच्छा किती दुर्दम्य आहे बघा. स्टीफन हॉकिंग हा आईन्स्टाईननंतरचा प्रतिभाशाली शास्त्रज्ञ. तो भारतामध्ये येणार होता. ते म्हणाले, "काही झालं तरी मला त्याला भेटायचं आहे." तो येणार होता मुंबईत International particle physicsच्या परिषदेला. योगायोगाने माझा सख्खा पुतण्या अतिश दाभोलकर त्या परिषदेचा मुख्य संयोजक होता. ( तो सध्या फ्रान्सला एका मोठ्या इन्स्टिट्यूटचा डायरेक्टर आहे.) मी त्याला म्हटलं, "डॉ. लागूंना स्टीफन हॉकिंगला भेटायचंय." तो म्हणाला, " काका, अवघड आहे." पण त्यालाही डॉक्टरांच्याबद्दल आदर होताच. त्याने एक आयडिया काढली. तो म्हणाला, "जेवायच्या वेळी हॉकिंग एकटेच असतात, त्यामुळे त्या वीस मिनिटांमध्ये मी त्यांची आणि डॉक्टरांची भेट घालून देऊ शकतो." डॉक्टर तिथे गेले. डॉक्टरांच्या घरी त्यावेळचा फोटो आहे, एखादं लहान मूल ज्या निरागस कुतूहलाने एखाद्या फार मोठ्या अवलियासोबत उभं असावं, तसे डॉ. लागू स्टीफन हॉकिंगच्या बाजूला उभे आहेत आणि त्यांचा चेहरा आनंदाने फुलून आलेला आहे.
हे सगळं काय आहे? आपल्याला माहीत असेल की, डॉ. लागू यांच्या घरी महात्मा गांधी उतरत असत. कारण डॉक्टरांचे वडील पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते. मोठे वजनदार नेते होते. त्यावेळी डॉक्टरांनी महात्मा गांधींना बघितलेलं आहे. त्यातून त्यांच्यावर काय संस्कार झाला? त्यांनी पुस्तकातही एके ठिकाणी लिहिलंय, "आम्हाला असं सांगण्यात आलं होतं आणि आम्ही ते मानलं होतं की, या देशामध्ये जे काही वाईट आहे- धर्मांधता, जातीयता, हिंदू-मुस्लिम वैर, अस्वच्छता, अंधश्रद्धा इत्यादी सगळ्याचं कारण म्हणजे ब्रिटिशांचं साम्राज्य. त्यामुळे एकदा ब्रिटिश साम्राज्य गेलं की, सगळं आबादी आबाद होणार. 1947 साली ब्रिटिश निघून गेले आणि आम्हाला वाटलं, आता आपण छानपैकी मेडिकल प्रोफेशन करायचं, आपल्याला आवडतात ती नाटकं करायची, मजेत राहायचं. पण त्यात आणीबाणी आली आणि आमच्या तोंडात कुणीतरी थप्पड मारल्यासारखं झालं. मी त्या गाफील पिढीचा प्रतिनिधी आहे." पण ज्यावेळी त्यांना हे लक्षात आलं, त्यावेळी त्यांनी ठरवलं की, आपण त्याची मनःपूर्वक भरपाई केली पाहिजे. आणि त्यांनी ती भरपाई केली आहे. मित्रहो, इतकी सजग, तीव्र, कृतिशील बांधिलकी अवघड आहे. आपण म्हणतो की, 'तुका म्हणे झरा, आहे मूळचाचि खरा'. तर हा जो खरा असलेला झरा आहे, त्याचं एक रूप डॉक्टर लागू आहेत. त्याचा वेध घेण्याची संधी मला रूपवेध पुस्तकाच्या प्रकाशनामुळे मिळाली. आपण सर्वांनी ऐकून घेतलंत. धन्यवाद.
(शब्दांकन : सुहास पाटील)
- डॉ. नरेंद्र दाभोलकर
Add Comment