संवाद सुरु झाला, आणि अडचणी दूर झाल्या! - डॉ. मंदा आमटे

बाबा आमटेंच्या निधनाला एक तप उलटलंय. या निमित्ताने मंदाताई आमटे यांच्याशी साधलेला संवाद

Photo Courtesy: Dr. Sheetal Amte-Karajgi (@AmteSheetal)

1914 ते 2008 असे 94 वर्षांचे आयुष्य लाभलेले बाबा आमटे यांनी 1951 मध्ये स्थापन केलेली महारोगी सेवा समिती आणि आनंदवन प्रकल्प आता 70 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. मागील अर्धशतकभर तरी आनंदवन हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतभरातील तरुणाईसाठी ऊर्जास्रोत म्हणून कार्यरत आहे. बाबांच्याच  प्रेरणेतून  प्रकाशभाऊ व  मंदाताई यांनी सुरु केलेला हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्पही आता पन्नाशीच्या उंबरठ्यावर आहे. बाबा आणि त्यांची पत्नी साधनाताई यांच्या कुटुंबाचा विस्तार तर इतका मोठा आहे की, त्यांचे मानसपुत्र व मानसकन्या म्हणवून घेणारे आणि त्याप्रमाणे कार्यरत असलेले असंख्य लोक देशाच्या कानाकोपऱ्यात आहेत. आणि विशेष म्हणजे त्यांची दोन मुले विकास व प्रकाश यांनीही  बाबांचा समाजसेवेचा वारसा व वसा तेवढ्याच ताकदीने पुढे चालू ठेवला, अर्थातच भारतीताई व मंदाताई यांच्याशिवाय त्यांना ते शक्य झाले नसते. एवढेच नाही तर त्यांची पुढची पिढीही त्याच निष्ठेने व धैर्याने याच कामात सामील राहिली आहे. कालच्या 9 फेब्रुवारीला बाबांना जाऊन एक तप (बारा वर्षे) पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर बाबांचे व्यक्तित्व आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन केलेले समाजकार्य यांच्यावर दृष्टीक्षेप टाकण्याची विनंती आम्ही भारतीताई व मंदाताई या दोघींना केली होती, त्यातून आकाराला आलेल्या दोन स्वतंत्र मुलाखती प्रसिद्ध करीत आहोत. साधना परिवार व आमटे परिवार यांचे ऋणानुबंध खूप जुने आहेत. त्यामुळे या मुलाखतींचे अगत्य आम्हाला विशेष आहे...
-संपादक 

प्रश्न- तुमचे बालपण, शिक्षण, कौटुंबिक पार्श्वभूमी याविषयी आम्हाला जाणून घ्यायचे आहे.
- माझा  जन्म नागपुरातला आणि शिक्षण पूर्ण होईपर्यंतचं सगळं आयुष्य नागपुरातच गेलेलं. माझे आई-वडील दोघेही शिक्षक होते. त्यामुळे शिक्षणाबद्दल त्यांना एक प्रकारची आस्था होती. शिक्षणासाठी त्यांनी आपल्या मुलींना कायम प्रोत्साहित केलं. आम्ही तिघी बहिणी होतो. पण सगळ्यात मोठ्या बहिणीला शिक्षणात फारसा रस नसल्यामुळे ती काही फारसं शिकली नाही. माझ्यापेक्षा वयाने मोठी असणारी बहीण डॉक्टर झाली आणि त्यानंतर मीसुद्धा डॉक्टर झाले.
 
माझ्या आईला खरं तर डॉक्टर व्हायचं होतं; पण आजोबांना टीबी असल्यामुळे आपल्यादेखतच सहाही मुलींची लग्नं व्हावीत; असा त्यांचा आग्रह होता. त्यामुळे मॅट्रिकमध्ये असतानाच आईचं लग्न लावून देण्यात आलं आणि मेडिकलला जाण्याचं तिचं स्वप्न अपूर्णच राहिलं. त्यामुळे तिने मेडिकलला जाण्यासाठी आम्हाला प्रोत्साहित केलं. आमची आर्थिक परिस्थिती काही खूप चांगली नव्हती. मेडिकलची फीसुद्धा खूप होती. त्यामुळे एका मुलीला मेडिकलला पाठवल्यानंतर मलाही तिकडेच पाठवण्याची वडिलांची फार काही इच्छा नव्हती. ते म्हणायचे, BA वगैरे कर. पण माझा हट्ट होता मेडिकलला जाण्याचा. आईनेही मला प्रोत्साहित केलं. ती म्हणाली,आम्ही घरखर्च कसाही भागवू, पण तुझी इच्छा आहे तर जा. म्हणून मी मेडिकलला गेले.

प्रश्न- मग प्रकाशदादांची आणि तुमची ओळख मेडिकलला असतानाच झाली?
- MBBS झाल्यानंतर पुढे काय करायचं, याबाबत मी खरं तर संभ्रमातच होते काहीशी. पण हाऊस जॉब करताना 'अ‍ॅनेस्थेशिया' हा विषय आवडल्यामुळे मी ठरवलं की, यातच पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आणि सहा महिन्यांच्या या कोर्ससाठी सेवाग्रामच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. इथेच माझी आणि प्रकाशची पहिल्यांदा ओळख झाली. खरं म्हणजे आम्ही दोघे एकाच कॉलेजमध्ये होतो, मात्र मी काही त्याला ओळखत नव्हते. ‘लेप्रसी झालेल्या पेशंट्ससाठी काम करणारी व्यक्ती’ इतकंच बाबा आमटेंबद्दल माहीत होतं त्यावेळी. मेडिकलला असताना प्रकाश आणि विकास हे दोघे हाउसजॉब करण्यासाठी सेवाग्रामच्या मेडिकल कॉलेजला आले होते. विकास मेडिसिनमध्ये, तर प्रकाश सर्जरीमध्ये काम करत होता. सर्जरीमध्ये एका टेबलावर, एका पेशंटवर काम करत असताना माझी आणि प्रकाशची पहिल्यांदा ओळख झाली. ओळखीची मैत्री झाली आणि मग मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. 

प्रश्न- प्रकाशदादांचे कोणते गुण तुम्हाला भावले होते त्या वेळी?
- एकदा प्रेम झालं की, त्या माणसाचं एकूणच वागणं आवडायला लागतं. प्रकाशची निर्णयक्षमता चांगली होती. राहणीही साधी होती एकदम. स्वभावही सौम्य होता त्याचा. जे करायचं ते अगदी मनापासून करायचं हे त्याचं वैशिष्ट्य होतं. आपल्या कामावर त्याची आस्था होती. पेशंट्ससोबत तो खूप आपुलकीने वागायचा. त्याच्यामध्ये काही तरी वेगळा स्पार्क आहे, हे मला जाणवलं. पुढे त्याच्या वेगळ्या आयुष्याचीही भुरळ पडली. आमचं ठरल्यावर मी मागे वळून पाहिलंच नाही. 

प्रश्न- तुम्हा दोघांच्या प्रेमाची बातमी बाबांपर्यंत गेल्यावर काय झालं?
- विकास आमच्यासोबतच शिक्षण घेत होता. त्याला कळलं की, हे काही तरी प्रकरण दिसतंय. मग त्याने घरी जाऊन बाबांना आणि ताईंना आमच्याविषयी सांगितलं. मग बाबांनी प्रकाशला सांगितलं, "तिला आनंदवनला घेऊन ये. तिला सगळं बघू दे. तुम्ही लग्न करायचं ठरवलंय हे ठीकाय पण तिला माहीत असलं पाहिजे, आपण कुठं जाणार आहोत आणि काय करणार आहोत ते." मला याबाबतीत सर्व कल्पना दिल्याची माहिती प्रकाशने बाबांना दिली. आदिवासींसाठी काम करणार असल्याचं प्रकाशने मला सांगितलं होतं, पण त्यासाठी जागा नक्की कुठे मिळणार आहे ते अजून पक्कं माहीत नव्हतं. बाबांनी मला बोलावून घेतलं. बाबांनी बोलावलं म्हणून मी आनंदवनात गेले. त्या वेळी बाबांना मी पहिल्यांदाच पाहिलं. 

प्रश्न- बाबांसोबतच्या पहिल्या भेटीचा अनुभव काय होता?
- आनंदवनात बाबांचं झोपडीवजा एक घर होतं छोटंसं. त्याच्या व्हरांड्यामध्येच बाबा बसले होते. मी तिथं गेल्यावर ते स्वतः उठून उभे राहिले आणि म्हणाले, "मी बाबा आमटे, प्रकाशचा बाप." मग ताईसुद्धा बाहेर आल्या. बाबांनी मग थेट विषयाला हात घालत मला विचारलं, "तू प्रकाशसोबत लग्न करणार आहेस? तू होकार दिला आहेस का त्याला?" मी 'हो' म्हणाले. त्यावर बाबा म्हणाले, "मनाशी पक्कं आहे का सगळं?" मी म्हणाले, "हो पक्कं आहे." त्यावर बाबा म्हणाले, "हे आनंदवन आहे, इथे आता बऱ्यापैकी घरं आहेत गावासारखी. पण तू आणि प्रकाश नव्या जागी ज्या जंगलात जाणार आहात, तिथं यांपैकी काहीच नसणारेय याची तुला कल्पना आहे का? प्रकाशने तुला याबाबत काही सांगितलं आहे का?" मी म्हणाले, "हो! त्याने सांगितलंय मला आणि मी होकार दिलाय."

खरं सांगायचं तर मला पुढची फारशी कल्पना नव्हती. पण प्रकाश आणि मी ठरवलं होतं, जायचं म्हणून. मी बाबांना सांगितलं की, तिथं जायची आणि काम करायची माझी तयारी आहे. बाबा म्हणाले, "ठीक आहे मग. तू घरी सांग तुझ्या किंवा मी येतो विचारायला घरी लग्नाचं." मी म्हणाले, "आधी मी सांगते घरी, मग तुम्ही या." 

प्रश्न- साधनाताईंची प्रतिक्रिया काय होती?
- बाबा जरी फॉरवर्ड असले तरी ताई पारंपरिक विचारांच्या होत्या. त्या काहीशा नाराजच होत्या. कारण मी प्रकाशला सिनियर होते. वयानेही त्याच्यापेक्षा मोठी होते. दुसरं म्हणजे विकास मोठा भाऊ होता, आणि परंपरेप्रमाणे त्याचं लग्न आधी व्हायला हवं असं ताईंना वाटत होतं. पण बाबा म्हणाले, "आपण ताबडतोब लग्न करून टाकू, कारण ठरलेलं उगाच लांबवण्याची माझी इच्छा नाही." ताईंना ते खटकलं. ताई म्हणाल्या, "विकासचं ठरेपर्यंत थांबूया." पण बाबांच्या हट्टापुढे ताईंचं काही चाललं नाही आणि शेवटी बाबांचा निर्णय त्यांना मानावा लागला. 

प्रश्न- लग्नाचा निर्णय घरी सांगितल्यावर तुमच्या आई-वडिलांची काय प्रतिक्रिया होती? 
- मी घरी जाऊन माझ्या आई-वडिलांना माझ्या निर्णयाची कल्पना दिली. त्यांनाही थोडा धक्काच बसला. कारण त्या काळी बाबा आमटेंचं नाव लेप्रसीसाठी प्रसिद्ध होतं. आणि त्या वेळी लोकांच्या मनात लेप्रसीबद्दल प्रचंड घृणा अन् भीती होती. लोकांनी लेप्रसीचे पेशंट्स देवळासमोर, मशिदीसमोर भीक मागतानाच पाहिलेले होते. त्यामुळे लोक त्यांच्यापासून दूरच राहणं पसंत करत. आपल्या मुलीने त्या लेप्रसी कॉलनीमध्ये जाण्याचा निर्णय घेतलाय, हे ऐकून आईवडिलांना धक्काच बसला होता आणि भीतीदेखील वाटली होती. त्यांनी दोन-चार वेळा मला ‘समजवायचा’ प्रयत्नही करून पहिला. मग मी त्यांना म्हणाले, "तुम्ही असं करा, एकदा आनंदवनला जाऊन बघून या. ताई-बाबांशी बोला. मग आपण काय ते बघू या." पण माझा निर्णय पक्काच होता. ते दोघे आनंदवनला गेले. ताई-बाबांना भेटल्यामुळे त्यांचा विरोधही कमी झाला. आपली मुलगीही निर्णयावर ठाम आहे हे त्यांना माहीत होतं, त्यामुळे त्यांचा इलाजही नव्हता. मग त्यांनी लग्नाला परवानगी दिली आणि 24 डिसेंबर 1972 रोजी आमचं लग्न झालं. 

प्रश्न- तुमचं लग्नही आनंदवनातच झालं...
- प्रकाशच्या लग्नाच्या बऱ्याच अटी होत्या. माझे वडील संघाचे कार्यकर्ते होते पक्के. त्यामुळे लग्न पारंपरिक पद्धतीने व्हावं, असं त्यांना वाटायचं. ते जेव्हा आनंदवनात गेले होते, तेव्हा प्रकाशनेच त्यांना अटी सांगितल्या होत्या. तो म्हणाला, "लग्न आनंदवनातच होईल, कारण आमच्या या लेप्रसी पेशंट्ससमोरच आम्हाला लग्न करायचं आहे. ते काही नागपूरला येऊ शकणार नाहीत. आणि ते आले, तर इतर कुणी लग्नालाच येणार नाही. त्यामुळे तुम्ही  तुमचे नातेवाईक इथे घेऊन या. यांनाही आयुष्यात आनंद मिळायला हवा." प्रकाश-विकासला लहानाचे मोठे होताना पाहिलं असल्यामुळे पेशंट्सच्या मनात त्याच्याविषयी प्रेम होतंच. त्यामुळे त्यांच्यासमोर लग्न व्हावं ही बाबांची इच्छा होती आणि प्रकाशनेही सांगितलं की त्याला इथेच लग्न करायला आवडेल. आमच्या वडिलांनीही मग काही विरोध केला नाही. लग्नात काही देण्या-घेण्याचा कार्यक्रम नव्हताच. साधे रुमालही एक्स्चेंज करायचे नाहीत असं ठरलं होतं. पत्रिका पाहायचा तर प्रश्नच नव्हता. मुहूर्तही बघायचा नाही असं ठरलं. लोकांना येण्या-जाण्यासाठी सोईस्कर असल्यामुळे रविवार हाच मुहूर्त सगळ्यात चांगला, त्यामुळे तो दिवस ठरला. त्या दिवशी साने गुरुजी यांची जयंतीही असते. बाबांना साने गुरुजींबद्दल आदर आणि प्रेम होतं. संस्कृतातील मंत्रोच्चार कळत नाहीत म्हणून वैदिक पद्धतीने लग्न करायला प्रकाशचा विरोध होता, तर रजिस्टर मॅरेज रुक्ष वाटतं, त्यात कुणाचा सहभाग नसतो म्हणून तशा लग्नाला माझा विरोध होता. बाबा म्हणाले तुमचं वेगळ्या पद्धतीने लग्न करूया. लग्नाची पत्रिका म्हणजे आंतरदेशीय पत्रच होतं. त्या आम्ही आनंदवनच्याच प्रेसमध्ये छापल्या होत्या. त्याच्या एका बाजूला ताई आणि बाबांनी स्व-हस्ताक्षरात आमंत्रण दिलेलं होतं. लग्नाच्या वेळी महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता. खूप लोक मृत्युमुखी पडत होते. त्यामुळे लग्नात गोड करायचं नाही, जेवण द्यायचं नाही - असं ठरवलं. फक्त लेप्रसी पेशंट्सना जेवण ठेवलं होतं.  

प्रश्न- लग्न झाल्यावर तुम्ही लगेचच कामाला सुरुवात केली का?
- नाही, नाही. तेव्हा आम्ही दोघेही शिकत होतो. खरं म्हणजे आमच्याजवळ काही इन्कम नव्हतं. हाऊस जॉब करायचे, त्यामध्ये जेमतेम पैसे मिळायचे. लग्न झाल्यावर आम्ही शिकण्यासाठी पुन्हा नागपूरला गेलो आणि पुढील प्रवेश घेतला. तिथे मी काही दिवस रजिस्ट्रारशिप केली. त्यातून मिळणाऱ्या थोड्याफार पैशांतून आम्ही आमचा संसार चालवायचो. नागपूरजवळ आनंदवनचेच अशोकवन सेंटर आहे. तिथे कोंबड्यांसाठीच्या खोल्या साफ करून आम्ही त्यात राहत होतो. तोवर भामरागड परिसरात प्रकल्पासाठी कुठे तरी जागा मिळावी म्हणून आम्ही सरकारकडे अर्ज केला होता. सरकारने दिलेल्या पर्यायांपैकी आम्ही आता जिथे आहोत ती हेमलकसाची जागा त्यातल्या त्यात मध्यवर्ती होती, अतिदुर्गम नव्हती. ही जागा 1973मध्ये मिळाली. जागेचा ताबा घ्यायला बाबा स्वतः हेमलकसा येथे आले. सुरुवातीला त्यांनी धान्य साठवण्यासाठी एक टिनशेड उभारली. पेशंट्ससाठी काही झोपड्या बांधल्या. बाबांबद्दल वाचून आलेले आणखी काही कार्यकर्तेही इथे होते. त्यांनीही कामाला सुरुवात केली. जागा मिळाल्याचं कळल्यावर राजीनामा देऊन प्रकाश इकडे आला. पण माझा बॉंड असल्यामुळे तो संपेपर्यंत नागपूरला राहणं मला भाग होतं. तो संपल्यावर मी इथे आले. पण राहायची सुविधा नसल्यामुळे पहिल्यांदा आम्ही एक झोपडी बांधली. दवाखाना सुरुवातीला झाडाखालीच सुरू केला. मग नंतर एक झोपडी, त्याच्यासमोर एक तात्पुरता मांडव बांधला. झोपडीत औषधं, ड्रेसिंगचं सामना इत्यादी वस्तू ठेवल्या. दवाखाना सुरु केला खरा, पण सुरुवातीला कुणी यायचंच नाही. आम्ही झाडाखाली बसून राहायचो. लोकांना आधुनिक औषधांची फारशी माहितीच नसल्यामुळे त्यांचा प्रतिसादच मिळत नव्हता. मग आम्ही इकडं-तिकडं फिरायचो, लोकांशी बोलायचो. पण आम्हाला त्यांची भाषा कळत नव्हती आणि त्यांना आमची भाषा कळायची नाही. त्यामुळे काय बोलायचं हा प्रश्नच होता. त्यांना आमची भीतीही वाटायची. आधीच बाकीचे लोक आपलं शोषण करत आहेत, त्यात यांची आणखी भर पडली असा त्यांचा सुरुवातीचा समज होता. त्यामुळे ते लोक काही संबंध ठेवत नव्हते. फक्त लांबून लांबून बघायचे. 

प्रश्न- मग त्या लोकांमध्ये तुमच्याविषयी विश्वास कसा निर्माण झाला? 
- बरेच दिवस गेले. अपेक्षित प्रतिसाद काही मिळत नव्हता. यातून काही तरी मार्ग काढायला हवा, असं वाटलं. त्यासाठी त्यांच्याशी संवाद होणं आवश्यक होतं. मग आम्ही त्यांची भाषा शिकायला सुरुवात केली. रेव्हेन्यू आणि फॉरेस्टचे अधिकारी इथे आधीपासून होतेच. म्हणजे पनिश्मेंट पोस्टिंगवर आले की दहा-दहा वर्षं त्यांची बदली व्हायची नाही. त्यामुळे त्यांना इथे राहणं भाग होतं. त्यामुळे त्यांना या लोकांची भाषा यायला लागली होती. मग आम्ही या कर्मचाऱ्यांकडूनच तोडकीमोडकी का होईना पण ही भाषा शिकलो. दवाखान्यात हळूहळू पेशंट्स यायला लागले आणि मग त्यांच्याकडून आम्ही बऱ्यापैकी भाषा शिकलो. संवाद सुरु झाल्यावर आम्ही काय म्हणतोय ते त्यांना कळायला लागलं. पण तरी प्रतिसाद थंडच होता. मग आम्ही गावोगावी हिंडायला लागलो. आमचा प्रोजेक्ट हेमलकसा गावाच्या बाहेर आहे. ते गाव तसं आत आहे. तिथे फिरताना आम्हाला दहा-बारा वर्षांचा एक मुलगा घराबाहेर बसलेला आढळला. तो चाळीस टक्के जळालेला होता. त्याच्या जवळ जाऊन पाहिलं तर त्याच्या शरीरभर अळ्या आणि किडे झाले होते. शरीरावर जखमा होत्या आणि वासही खूप घाण येत होता. ‘तुम्ही याला आमच्या दवाखान्यात का घेऊन येत नाही?’ असं आम्ही त्याच्या घरच्यांना विचारलं. ते म्हणाले, "आम्ही पुजारी, बाबा करून पाहिले, त्याचा काही फायदा होत नाहीये. आता आम्ही त्याची आशा सोडलीये आणि त्याला इथेच ठेऊन दिलंय." आम्ही त्यांना विनंती केली की, एकदा आमचाही उपाय करून बघा. 

मग ते त्या मुलाला घेऊन दवाखान्यात आले. आम्ही त्याच्यावर इलाज केले. या लोकांनी कधी अँटिबायोटिक औषधं घेतली नसल्यामुळे त्याला गुण लवकर आला आणि तो चांगला बरा झाला. मग आम्ही फिरायचो, तेव्हा तो आमच्या मागे-मागे फिरायचा. आम्ही त्याच्याकडून आणखी भाषा शिकलो. मग त्याला आम्ही दत्तकच घेतलं. त्याचं खाणं-पिणं, राहणं वगैरे सगळं आमच्या इथेच व्हायचं. हा मुलगा बरा झाल्याची बातमी मग हळूहळू सगळीकडे पसरायला लागली. 

लोकांचा थोडासा विश्वास बसला असावा. मग आणखी एक पेशंट आला. तो बेशुद्ध होता. आता तो बेशुद्ध का झाला याचं निदान करायला आमच्याकडे साधनंच नव्हती. मग आम्ही पुस्तकं काढून, चर्चा करून त्यामागची कारणं शोधायला लागलो. मग मलेरिया झाला असावा, या निष्कर्षाप्रत आम्ही आलो. तीन दिवस दिवसरात्र त्याची देखभाल करत होतो. इथे कुणी ट्रेंड नर्स येणं शक्यच नव्हतं. मग आम्ही आमच्या सहकाऱ्यांनाच बऱ्याच गोष्टी शिकवून ठेवल्या होत्या. सलाईन लावणं, ड्रेसिंग करणं वगैरे. कार्यकर्त्यांना औषधांची माहितीही दिली होती. सगळे मिळून आम्ही आठ जण होतो त्या वेळी. 

प्रश्न- इतक्या प्रतिकूल परिस्थितीत काम करताना हे सगळं सोडून शहरात जाऊन सुखाने नोकरी करावी, असं एकदाही वाटलं नाही?
- जेव्हा आम्ही इथं पहिल्यांदा आलो तेव्हा पेशंट्सच येत नव्हते, आम्ही नुसते रिकामे बसायचो. मग विचार यायचा की, आपल्या इतक्या शिक्षणाचा काय उपयोग? आपलं सगळं ज्ञान वाया जातंय. फ्रस्ट्रेशन यायचं थोडंसं. पण मग मनात विचार यायचा की, यांच्यासाठी आपण आणखी प्रयत्न केले पाहिजेत. मग एकमेकांशी बोलून आम्ही आमचे फ्रस्ट्रेशन दूर करायचो आणि इतर कामांकडे लक्ष डायव्हर्ट करायचो. मग आम्ही शेती करायला सुरुवात केली. आजूबाजूला सगळं जंगलच होतं. लाकडं आणा, पाणी आणा, अंघोळीसाठी नदीवर जा - असं करायचो. इथे काही सुविधाच नसल्यामुळे हे करावं लागायचं. गावागावात हिंडायचो. फळझाडं-फुलझाडं लावायचो. 

प्रश्न- कुठल्या प्रेरणेने तुम्हाला इथे बांधून ठेवलं?
आपण इथेच काम करायचंय, हा माझा निर्धारच होता. ज्या काही अडचणी येतील त्या आपण सहन करूया, कधीतरी सकारात्मक प्रतिसाद मिळेलच, असं वाटायचं. मग हळूहळू प्रतिसाद मिळायला लागला. आज चार पेशंट्स तर उद्या आठ, अशी संख्या वाढत गेली. त्याचबरोबर आमचा आत्मविश्वासही वाढत गेला आणि पुढे कामही वाढत गेलं. एकमेकांशी संवाद सुरू झाला आणि अडचणी दूर व्हायला लागल्या. इथला मागासपणा पाहिल्यावर लक्षात आलं की, यांना शेती करायला शिकवलं पाहिजे आणि शिक्षण दिलं पाहिजे. यांची शेती म्हणजे जमीन उकरायची आणि त्यात काही फेकून द्यायचं. जे उगवेल, ते थेट कापायलाच जायचं. 'कंदमूळ गोळा करा, शिकार करा' असं त्यांचं आयुष्य होतं. यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करू, असं वाटलं आणि त्यासाठीच राहिलो.

प्रश्न- या सगळ्या कामात बाबांचं कशा पद्धतीचं मार्गदर्शन लाभायचं?
- बाबा सुरुवातीपासून आनंदवन आणि सोमनाथ इथली कामं बघायचे. त्यामुळे बाबा इथे अधूनमधूनच यायचे. पूर्वी पाउस पडला की, या परिसराचा जगाशी संपर्क सहा-सहा महिने तुटलेला असायचा. रस्ते नव्हते, नदी-नाले यांवर पूल नव्हते. आष्टीच्या पलीकडे एकही पूल नव्हता. त्यामुळे इथे कुणाला येताच यायचं नाही. त्यामुळे बाबा कायम राहत नव्हते. मग जे काही निर्णय आहेत ते आम्हा दोघांनाच घ्यावे लागायचे. फोनही नव्हता, त्यामुळे काही विचारायचं असलं, तरी विचारणार कुणाला आणि कसं? 

प्रश्न- बाबांमुळे तुमच्या आयुष्यात कशा स्वरूपाचं परिवर्तन झालं? 
- बाबांमुळेच आम्हाला आदिवासींची सेवा करण्याची संधी मिळाली. त्यांनी प्रकाशला या भागात आणलं नसतं तर इकडं यायचं काही कारणच नव्हतं, आनंदवनात भरपूर काम होतं. तिथेही डॉक्टर्सची गरज होती. आनंदवनात डॉक्टर म्हणून काम करू, म्हणजे लेप्रसी पेशंट्ना फायदा होईल - असा सुरुवातीला प्रकाशचा विचार होता. बाबांमुळेच लोक बिरादरी प्रकल्पाची सुरुवात झाली. बाबांनी हा परिसर दाखवला आणि प्रकाशने इथे काम करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आम्ही या भागात काम करायला सुरुवात केली. 

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे - संस्थेचं नियोजन कसं करायचं, हे बाबांनी आम्हाला शिकवलं. आपल्याकडे आलेल्या प्रत्येक पैशाचा हिशोब ठेवायचा, कारण आलेला पैसा हा पब्लिक मनी आहे, तो आपला पैसा नाही. ज्यांच्यासाठी तो आलाय, त्यांच्यावर एकूणएक पैसा खर्च झाला पाहिजे आणि त्याचा हिशेब तुम्ही अगदी व्यवस्थित ठेवला पाहिजे, याबाबत बाबा कायम आग्रही असायचे. पारदर्शकतेचा बाबांचा आग्रह आम्ही पूर्णपणे अंगीकारला. त्याच भावनेतून आम्ही येथे प्रकल्प सुरू केलाय. इथे पूर्ण पारदर्शकता आहे. तुम्ही कोणीही येऊन केव्हाही आमचे हिशेब तपासू शकता. 
 
सगळ्यांना बरोबरीनं वागवायचंसुद्धा आम्ही बाबांकडूनच शिकलो. आमच्याकडचे सर्व कार्यकर्ते एकाच लेव्हलवर आहेत. प्रत्येकाचं शिक्षण वेगळं आहे. फिल्डही वेगळ्या आहेत. कुणी स्वयंपाकी तर कुणी चपरासी आहे. पण आम्ही सर्व जण एकत्र जेवण करतो, एकत्रच राहतो. कुणी कोणतं काम करायचं, हे अलिखितपणे ठरलं असलं तरी कुठलंही काम करायला कुणीही तयार असतं आमच्याकडे. कुठलंही काम स्वतः केलं तर बाकी लोक आपोआपच त्याचं अनुकरण करतात हे बाबांनी आम्हाला शिकवलं होतं. ‘Work with the people, not for people' ही बाबांची थिअरी आम्हाला खूप काही शिकवून गेली. त्यांच्या शिकवणुकीमुळेच आम्ही सर्व जण बरोबरीच्या नात्यानं वागू शकतो. बाबा अकरा वर्षं नर्मदा बचाव आंदोलनात गेल्यामुळे प्रत्येकाला आपापले निर्णय घ्यावे लागायचे. त्यामुळे आम्हा प्रत्येकातच निर्णयक्षमता विकसित होत गेली. 

प्रश्न- बाबांना जाऊन आता एक तप उलटलंय. या काळात बाबांची सर्वाधिक आठवण कधी आली?
- बाबांचं निधन 2008 मध्ये झालं. त्यानंतर दोनच महिन्यांनी आम्हाला मॅगसेसे अवाॅर्ड जाहीर झालं. बाबांना ते पूर्वीच मिळालं होतं. त्यामुळे आपल्याला मिळेल, अशी अपेक्षाही नव्हती आणि कल्पनाही नव्हती आमच्या मनामध्ये. त्या कार्यक्रमाला गेल्यावर बाबांची आम्हाला तीव्रतेने आठवण आली होती. आज बाबा असते तर त्यांना किती आनंद झाला असता, असं आम्हाला वाटत राहिलं. त्या वेळी त्यांची कमतरता खूपच जाणवली. आपलं कौतुक करणारा एक माणूस निघून गेल्याची जाणीव त्या वेळी तीव्रतेनं झाली. त्यांना सुनांचं खूप कौतुक होतं. दोन्ही सुनांचं ते भरभरून कौतुक करायचे. त्यांना वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घातलेलं खूप आवडायचं. आपल्या सुना-नातसुना इतक्या दुर्गम भागात येऊन काम करतात, आपल्यापेक्षा एक पाऊल पुढे जंगलात जाऊन राहतात, याचं ताई आणि बाबांना खूप कौतुक होतं. 

प्रश्न- प्रकाशदादांसोबत तुमचं नावही आपसूकच येतं. प्रतिकूल परिस्थितीतही तुम्ही कायम एकमेकांसोबत राहिलात. तुमच्या 48 वर्षांच्या या आनंदी सहजीवनाचं सिक्रेट काय आहे?
- आम्ही जे काही ठरवून आलो होतो, त्यात थोडेफार मतभेद होत होते; नाही असं नाही. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते त्यामुळे मतभेद असणं साहजिकही आहे. पण एकमेकांच्या मताला मान देऊन आम्ही एकमेकांना समजावून घेत होतो. आपण हा प्रकल्प सुरू केलेला आहे आणि आपल्यासोबत इतरही कार्यकर्ते आहेत. त्यामुळे कधी फ्रस्ट्रेशन आलं तरी ते या लोकांसमोर दिसता कामा नये, याची आम्ही काळजी घ्यायचो. आम्ही लांब फिरायला जाताना फ्रस्ट्रेशन आणणाऱ्या गोष्टींबद्दल बोलायचो. आमच्या फ्रस्ट्रेशनचा विपरीत परिणाम आपल्या सहकाऱ्यांच्या आत्मविश्वासावर होऊ नये, याकडे आमचा कटाक्ष असायचा. त्यामुळे आम्ही आमचं फ्रस्ट्रेशन कधीच उघडपणे दाखवलं नाही. 

एकमेकांकडून आमच्या फारशा काही डिमांड नव्हत्याच, त्यामुळे वादविवाद असं काही होत नव्हतं. कधी तरी चुकून काही झालंच, तर दोघांपैकी एकाने माघार घ्यायची - असं आम्ही ठरवून टाकलं होतं. 

प्रश्न- या सगळ्या व्यापात तुम्हाला एकमेकांसाठी वेळ देता यायचा? 
- सुरुवातीच्या काळात तर खूप वेळ असायचा. नंतरही आम्ही असं ठरवलं की, सकाळी आणि संध्याकाळी -असं दोन वेळेला फिरायला जायचं. तेव्हा बहुतेक वेळी आम्ही दोघेच असायचो आणि त्यात आजही खंड पडलेला नाही. आता नातवंडं झाल्यामुळे आम्ही त्यांना सायकलने घेऊन जायला लागलो. आम्ही सगळे न चुकता फिरायला जातो. आमची मुलं-सूनाही फिरायला जातात. एकमेकांसाठी आम्ही तेवढा वेळ राखीव ठेवलेलाच असतो, सकाळी आणि संध्याकाळी. त्यामुळे आमची तब्येतही चांगली राहते आणि नातंही. 

प्रश्न- तुमची पुढची पिढीदेखील बाबांचं स्वप्न तितक्याच उत्साहाने पुढे घेऊन जात आहेत. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
- आम्हाला दोन मुलं आहेत - दिगंत आणि अनिकेत. आई-वडिलांच्या कामात सहभागी व्हायचं, असं दोघांनीही स्वखुशीने ठरवलं. आमच्या संस्थेला 25 वर्षं पूर्ण झाली, तेव्हा संस्थेसाठीच काम करणार असल्याचं दोघांनी जाहीर केलं. त्या कार्यक्रमाला बाबासुद्धा उपस्थित होते. त्या दोघांचा निर्णय ऐकून बाबांना खूप भरून आलं. आपल्या हयातीतच तिसरी पिढी या प्रकल्पामध्ये सहभागी होतेय, हे पाहून बाबा भावनिक झाले होते. ताईंनाही खूप आनंद झाला होता. त्यांनी दिगंतला एक पत्रच लिहिलं. दिगंतची एकच अट होती- त्याला आपली पार्टनर डॉक्टर हवी होती. आम्ही दोन वर्षं खूप प्रयत्न केले, पण काही प्रतिसाद मिळत नव्हता. पुण्यातल्या नियतकालिकात जाहिरातही देऊन झाली. इतक्या दुर्गम भागात येऊन आयुष्य घालवण्यासाठी, काम करण्यासाठी कुणी सहजपणे तयार होणार नव्हतं. पुढे तर इथे नक्षली कारवाया सुरु झाल्या होत्या. त्यामुळे तर या भागात यायची भीती वाटणं स्वाभाविक होतं. पण गोव्याच्या अनघाने इथे काम करण्याची तयारी दर्शवली. ती आमची सून झाली. अनघा स्त्रीरोगतज्ज्ञ आहे. बाबांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांनी पन्नास बेडचं आधुनिक हॉस्पिटल बांधलं आहे. त्यानंतर इथे वीज आली. आता अनेक सुविधा इथे उपलब्ध झाल्या आहेत. अतिदुर्गम भागात त्यांनी आणखी काही लहानमोठे प्रोजेक्टस सुरु केले आहेत. दुर्गम भागातील लोकांना छोट्यामोठ्या आजारांसाठी खूप लांब पायपीट करावी लागू नये यासाठी या भागातील तरुणांना औषधांचं जुजबी ज्ञान देणं, ड्रेसिंग करायला शिकवणं - अशा गोष्टी त्यांनी सुरू केल्या आहेत. त्यांनी अशी सहा सेंटर्स दुर्गम भागात उघडली आहेत. आता हॉस्पिटलचं बरंच नाव झाल्यामुळे इथे वर्षभर कॅम्प सुरु असतात. सर्जिकल, डोळ्यांचे, स्त्रीरोगाचे असे अनेक कॅम्प होत असतात. त्यामुळे आता काम भरपूर वाढलंय. त्यांना आता आणखीही डॉक्टर जॉईन झाले आहेत. 

धाकट्या मुलाने - अनिकेतने शाळेची सर्व जबाबदारी घेतली आहे. त्याची बायको समीक्षा पुण्याची आहे. तिनेही शिक्षणासंबंधी गोष्टींमध्ये रस घेतलाय. आधी इथे एकच निवासी शाळा होती. आता लोकांमध्ये शिक्षणाविषयी जागृती निर्माण झाली आहे. त्यामुळे आमच्या गावांमध्ये शाळा सुरू करा अशी मागणी लोक करू लागले. त्यामुळे समिक्षाने इथून 28 किमी आत असलेल्या निलगुंडा या गावात पाच वर्षांपूर्वी शाळा सुरू केली. या गावात आजही रस्ते नाही, नद्यांवरती पूल नाहीत. या शाळेला खूपच छान प्रतिसाद मिळाला. गावातील सरकारी शाळेत दोन मुलं आहेत आणि आमच्या शाळेमध्ये पहिल्याच दिवशी 65 मुलं आली होती!

या मुलांची मातृभाषा वेगळी असल्यामुळे मराठी शिकायला या मुलांना खूप त्रास होतो. त्यामुळे मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषा यांच्यासाठी परकीयच आहेत. त्यामुळे या शाळेत इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिलं जातं आणि आज ही मुलं खूप छान इंग्रजी बोलतात. त्यामुळे भेट द्यायला आलेले  लोक आश्चर्यचकित होतात. त्याचबरोबर आपण या मुलांना हिंदी आणि मराठीही शिकवतो. इथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी या शाळेबद्दल ऐकलं होतं. पण हा परिसर 'नक्षली भाग' म्हणून बदनाम असल्यामुळे सरकार त्यांना इथे येऊ देत नव्हतं. पण अनिकेतसोबत त्यांनी या शाळेला मुद्दाम भेट दिली. ही शाळा आणि इंग्रजी बोलणारी मुलं पाहून ते हरखून गेले. त्यांनी त्या मुलांशी इंग्रजीतच संवाद साधला. रस्ते, वीज, बेंचेस या गोष्टी नसलेल्या दुर्गम भागातही इतकं छान शिक्षण मिळतंय, याविषयी ते फारच समाधानी होते. आता दुर्गम भागांतूनही शाळांची मागणी वाढायला लागली आहे.
 
पाच वर्षांपूर्वी जिंजगावातून एक शेतकरी आला होता. त्याला पाण्याची समस्या होती. अनिकेतने तिथे लोकसहभागातून तलावाची खोली वाढवली आणि इतर उपाययोजना केल्या. त्यानंतरच्या पावसात तो तलाव पूर्ण भरला, तो आजवर आटला नाही. नंतर त्यात मासळीही सोडण्यात आली. यावर्षी त्यातून 10 लाखांचे मत्स्योत्पादन घेण्यात आलंय. गाव सुधारणेचे असे अनेक उपक्रम हाती घेतलेत. त्यामुळे तेथील लोकांची आर्थिक परिस्थितीही सुधारायला लागली आहे. गेल्या पाच वर्षांत अनिकेतने 20 गावांत तलावांचे काम केलं आहे, आणि तेथील पाणी समस्या संपुष्टात आली आहे. 

दोन्ही मुलांनी आणि सुनांनी कामाची व्याप्ती खूप वाढवली आहे, या गोष्टीचा आम्हाला खूपच अभिमान वाटतो. 

प्रश्न- आता शेवटचा प्रश्न. चार दशकांपासून तुम्ही अगदी व्रतस्थपणे कार्य करताय. आज मागे वळून पाहताना तुमच्या भावना काय आहेत?
- आमचा लोक बिरादरी प्रकल्प इतका मोठा होईल, अशी कधी कल्पनाच केली नव्हती. आता त्याची इतकी प्रगती पाहिल्यावर जीवन कृतार्थ झाल्यासारखं वाटतं. आम्ही लोकांवर खूप प्रेम केलं. या प्रकल्पावर तर खूप प्रेम केलं. त्याबद्दल आम्ही खूपच समाधानी आहोत. सुरुवातीची तीस वर्षे तर आम्ही बाहेरही जात नव्हतो. जंगलामध्ये हे लोक काम करतात, याची कुणाला कल्पनाही नव्हती. आनंदवन तर बाबांमुळे सगळ्यांना माहीत होतं, पण दुर्गम भागातील या लोक बिरादरी प्रकल्पाची कुणाला माहितीही नव्हती. 1973मध्ये हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर तीस वर्षांनी पहिल्यांदा आम्ही बाहेर पडलो. अमेरिकेत गेलो. तिथे आमची मुलाखत झाली आणि त्यानंतर आम्ही थोडं प्रकाशात आलो. आपण असे प्रकाशात येऊ किंवा आपल्याला सन्मान मिळतील, अशी आमची काहीच अपेक्षा नव्हती. पण जे काही झालं ते मनाला समाधान देऊन गेलं. जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं आता.  

- डॉ. मंदा आमटे
लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा, भामरागड.
hemalkasa1973@gmail.com , 
amteprakash@gmail.com

(मुलाखत आणि शब्दांकन- समीर शेख)

वाचा भारतीताई आमटे यांची मुलाखत- 
संधी चालत आली, आणि मी घेतली! 

Tags: साधनाताई आमटे लोक बिरादरी प्रकल्प प्रकाश आमटे मंदाताई आमटे मुलाखत Baba Amte Sadhana Amte Lok Biradari Prakalp Prakash Amte Mandatai Amte Interview Load More Tags

Comments:

दत्ता चव्हाण

दोन्ही ही मुलाखती अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रेरक आहेत.

Tambe Shyam

ग्रेट! Ms. Samiksha & Angha यांच्याही विस्तृत मुलाखती घ्या. सर्वांना वाचायला आवडेल. धन्यवाद!

Daniel Mascarenhas

आमटे कुटुंबीयांचं कार्य म्हणजे उभ्या देशाचे अभिमानस्थळ आहे... दोन्ही मुलाखती सुंदर झाल्या आहेत ..

Add Comment