बदलत्या पंजाबचा जनादेश : काँग्रेस आणि अकालींची मक्तेदारी मोडत 'आप'ची जोरदार मुसंडी

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका : 14

2022 ची पंजाबमधील निवडणूक ही खऱ्या अर्थाने काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दल या दोन्ही पक्षांची पारंपरिक मक्तेदारी मोडीत काढणारी ठरली आहे. या दोन्ही पक्षांवर पंजाबी जनतेने अक्षरश: सूड उगवला असे म्हटले तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही. एका नवीन पर्यायाचा शोध लागताच काही दशकांची मनात साठलेली नाराजी आणि चीड पंजाबच्या मतदारांनी मतपेटीतून व्यक्त केली आहे.

'आप'ची विक्रमी लाट

1966 साली पंजाब राज्याची स्थापना झाल्यापासून पंजाब विधानसभेत एकाच पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून येण्याचे सर्व विक्रम आम आदमी पक्षाने 92 जागा जिंकत मोडीत काढले आहेत. (याआधी 1997 च्या निवडणुकीत अकाली दल आणि भाजपला मिळून 93 जागा मिळाल्या होत्या.) पंजाबने दिलेल्या जनादेशाने आजवर पंजाबच्या राजकारणात सर्वार्थांने प्रभावी असलेल्या अनेक मातब्बरांना मतदारांनी स्पष्ट नकार देत घरी बसविले आहे. शिरोमणी अकाली दलाचे सर्वेसर्वा आणि पंजाबचे पाच वेळा मुख्यमंत्री राहिलेले प्रकाशसिंग बादल हे त्यांचा ‘गड’ मानल्या गेलेल्या लांबी मतदारसंघातून पराभूत झाले. पंजाबचा ‘सर्वात तरूण मुख्यमंत्री’ आणि  ‘सर्वात वयोवृद्ध मुख्यमंत्री’ असे दोन्ही विक्रम प्रकाशसिंग बादल यांच्या नावावर आहेत. त्यांची 75 वर्षांची राजकीय कारकिर्द ही एका पराभूत टप्प्यावर विसावली आहे. दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले कॅप्टन अमरिंदरसिंग या राजा माणसाला त्यांच्या हक्काच्या पटियाला मतदारसंघानेच घरी बसण्याचा जनादेश दिला. पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री (कार्यकाळ : एकशे अकरा दिवस) चरणजितसिंग चन्नी यांना त्यांच्या चमकौरसाहेब या हक्काच्या मतदारसंघाने आणि मालव्यातील भदौड या मतदारसंघानेही नाकारले. अकाली दलाचे प्रमुख नेते आणि माजी मुख्यमंत्री सुखबिरसिंग बादल हेदेखील त्यांच्या जलालाबाद या बालेकिल्ल्यात पराभूत झाले. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धूदेखील अमृतसरमधून निवडून येऊ शकले नाहीत. या सर्व दिग्गजांचा आपच्या नवख्या आणि ‘आम आदमी’ प्रतिमेच्या उमेदवारांनी धक्कादायक पराभव केला आहे.

द्विध्रुवीय स्पर्धेचा ‘आप’ला फायदा

यावेळी झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूक निकालात उमेदवारांपेक्षा राजकीय पक्ष हेच मतदारांसाठी जास्त प्रभावी ठरल्याचे निरीक्षण पंजाबलादेखील लागू पडते. आजवर पंजाबमध्ये अकाली आणि काँग्रेस या दोन पक्षांच्या द्विध्रुवीय स्पर्धेला सुरूंग लावत आम आदमी पक्ष एक सक्षम पर्याय म्हणून उदयास आला आहे. निवडणुकीपूर्वी ‘आप’चे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर सर्वपक्षीय नेत्यांनी केलेल्या आरोपांना पंजाबी मतदारांनी फारसे महत्त्व दिले नाही. उलटपक्षी दिल्ली मॉडेलच्या धर्तीवर केजरीवालांनी दाखविलेले स्वप्न आणि दिलेल्या आश्वासनांवर विश्वास दाखविल्याचे मतपेटीतून दिसले आहे. केजरीवाल यांना मिळालेल्या अभूतपूर्व यशाला त्यांनी ‘इन्कलाब’ संबोधले आहे.  त्यातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग या दोन नायकांचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला. दिल्लीनंतर पंजाबमध्ये क्रांती झाली आणि आता ती देशभरात होणार हा त्यांचा आशावाद आपच्या राजकारणाची पुढची दिशा स्पष्ट करण्यासाठी पुरेसा आहे. एका राज्याची सीमा ओलांडून पंजाबसारख्या महत्त्वाच्या राज्यात सत्तेत येऊन आपने राष्ट्रीय राजकारणात तृणमूल काँग्रेस, डीएमके, टीआरएस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या सर्व पक्षांपेक्षा आपले स्थान बळकट केले आहे.

आपला पंजाबमध्ये मिळालेल्या मोठ्या जनाधारामागे पंजाबची मागील काही दशकांची अस्वस्थता आहे. मागील दोन दशकांपासून पंजाबचे दरडोई उत्पन्न हे खालावत आहे. त्यामुळे पंजाबने विकास, रोजगारनिर्मिती, दर्जेदार शिक्षण, मोफत वीज आणि आरोग्य सुविधांच्या आश्वासनांनावर विश्वास दाखवून आम आदमी पक्षाला एक संधी दिली आहे. 2020 मध्ये शंभरी पूर्ण केलेला शिरोमणी अकाली दल हा पंजाबमधील सर्वात जुना, तसेच शिरोमणी गुरूद्वारा प्रबंधन समितीवर वर्चस्व असलेला पक्ष या निवडणुकीत निष्प्रभ ठरला आहे.  सुरूवातीच्या टप्प्यात नवीन पक्ष व आघाड्यांमुळे पंजाबमधील लढत ही पंचकोनी होताना दिसत होती. मात्र काँग्रेस आणि आप या दोन पक्षांमध्येच प्रमुख लढत होणार असल्याचे मतदानाच्या दोन ते तीन आठवडे आधी स्पष्ट झाले होते.


हेही वाचा : आंबेडकरी चळवळीसाठी दिपस्तंभ ठरलेला गौरवग्रंथ - अशोक इंगळे


दलित मतांच्या ध्रुवीकरणाचे अपयश

देशातील सर्वात मोठे राज्य उत्तर प्रदेशपेक्षा पंजाबमध्ये दलित मतदारांची संख्या ही जास्त म्हणजे 32 टक्के आहे. पहिल्यांदाच दलित मुख्यमंत्री देऊनही दलित मतांचे ध्रुवीकरण अपेक्षेप्रमाणे काँग्रेसच्या बाजूने झालेले नाही. अर्थात पंजाबमधील दलित मतांचे राजकारण हे वेगळ्या धाटणीचे आहे. 32 टक्के दलितांनी एकगठ्ठा एका पक्षाला मतदान केले असे आजवर पंजाबमध्ये घडलेले नाही. बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांनादेखील पंजाबमध्ये दलित मतांचे ध्रुवीकरण करता आले नाही हा इतिहास आहे. पंजाबी दलित समुदाय हा लहान मोठ्या 26 पोटजातींमध्ये विभागलेला आहे.  पैकी 60 टक्के दलित हे शीख आहेत तर 40 टक्के दलित हे हिंदू आहेत. पंजाबातील दलितांच्या दोन गटांपैकी एक गट हा महजबी किंवा अदधर्मी म्हणून ओळखला जातो तर दुसर्‍या गटात रामदासी आणि रवीदासींचा समावेश होतो. यातील रवीदासी तर स्वतःला हिंदू आणि शीख या दोन्हींपेक्षा वेगळे समजतात. त्यांच्या मते रवीदासी हा त्यांचा स्वतंत्र धर्मच आहे. जातीनिहाय व्यवसायांच्या जोडीने पंजाबच्या अर्थव्यवस्थेत आणि सामाजिक व्यवस्थेत ‘जमिनीची मालकी’ हा घटक फार महत्त्वाचा ठरतो. पंजाबात केवळ साडेतीन टक्के दलितांकडे अत्यल्प जमिनीची मालकी आहे. यामुळे तेथील दलितांना एक तर शेतमजूर व्हावे लागते किंवा इतर व्यवसाय निवडावा लागतो. या निवडणुकीत दलित मतदारांनी काँग्रेसकडे पाठ फिरवल्याचे निवडणूक निकालांवरून स्पष्ट दिसते. मालवा प्रांतातील 69 जागांपैकी 66 जागांवर आपचे उमेदवार विजयी झाले तसेच स्वत: मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी हे दोन्ही मतदारसंघांतून पराभूत झाले यावरून चित्र पुरेसे स्पष्ट होते. त्यामुळे चन्नी यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्याचा निर्णय हा काँग्रेससाठी मास्टरस्ट्रोक न ठरता एक चुकीचा निर्णय म्हणून नोंद झाला आहे. शिवाय पंजाबमधील दलित मतदारांमध्ये डेरा सच्चा सौदा, डेरा सचखंड अशा डेऱ्यांचा प्रभाव याआधीच्या निवडणुकीत दिसून आला आहे. मात्र या निवडणुकीत हा प्रभाव दिसून आला नाही हे या निवडणुकीचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे.

पक्षांतर्गत नेतृत्वाच्या स्पर्धेचा काँग्रेसला फटका

पंजाबमधील काँग्रेस नेत्यांची गटबाजी, शह-काटशह आणि पक्षाच्या प्रतिमेला धोका पोहोचेल अशा सार्वजनिक वक्तव्यांमुळे काँग्रेसमधील अस्वस्थता चव्हाट्यावर आली होती. साडेचार वर्षांच्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या निष्क्रियतेमुळे नेतृत्वबदल झाल्यानंतरही काँग्रेस पक्ष एकदिलाने निवडणुकीला सामोरा गेला असे चित्र दिसले नाही. नवज्योतसिंग सिद्धू यांनी मुख्यमंत्री चन्नी यांच्यावरील अविश्वास वेळोवेळी व्यक्त केला. पक्षांतर्गत गटबाजीमुळे पंजाब काँग्रेसविषयीच्या प्रतिमेला तडे जाऊन मतदार शेवटच्या टप्प्यात काँग्रेसपासून दुरावला. शिवाय चरणजितसिंग चन्नी यांचे नेतृत्व पंजाबने मोठ्या मनाने स्विकारल्याचे मालवा, माझा आणि दोआबा यापैकी कुठल्याही निवडणूक निकालात दिसत नाही. कठीण काळातही काँग्रेसचे राज्यपातळीवरील नेतृत्व व्यक्तिगत हेवेदावे बाजूला सारून पक्ष म्हणून एकत्र येत नाही असे चित्र तयार झाल्यामुळे काँग्रेसचा पारंपारिक मतदारदेखील या निवडणुकीत काँग्रेसपासून दुरावला. नेतृत्वाची ही पोकळी आणि अवकाश व्यापण्यासाठी आम आदमी पक्ष गांभीर्याने रणनीती आखत होता. आम आदमी पक्षाचा जन्मच मुळात सोशल मीडियाच्या उदय आणि विस्तारानंतरचा असल्यामुळे नरेटीव्ह आणि पर्सेप्शन तयार करण्यात आपची प्रचारयंत्रणा आघाडीवर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

'आप'चा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरला निर्णायक

2017 च्या निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा न देता निवडणुकांना सामोरे जाणे आम आदमी पक्षाला महागात पडले होते. मुख्यमंत्री पंजाबी असावा ही पंजाबी जनतेची रास्त अपेक्षा होती. ‘आप’ला निवडून दिल्यास अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री होऊ शकतात हे पंजाबी अस्मितेला मान्य होणारे नव्हते. अनिच्छेने का असेना, पण 2017 च्या अनुभवातून शिकत आपने वेळीच जनतेचा कौल घेतला आणि भगवंत मान यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित केले. अर्थात पंजाब आपकडे मान यांच्याएवढ्या लोकप्रिय चेहऱ्याचा दुसरा पर्यायदेखील उपलब्ध नव्हता. दोनवेळा संगरूर लोकसभेचे खासदार भगवंत मान यांना मालवासह संपूर्ण पंजाबमधून व्यापक जनसमर्थन मिळाल्याने पंजाबमधील त्यांच्या लोकप्रियतेवर शिक्कामोर्तब झाले आहे. मान यांची दारू पिण्याची सवय आणि व्यसन हा मुद्दा निवडणुकीत त्यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी वापरण्याचा प्रयत्न जरूर झाला मात्र पंजाबी मतदारांनी त्याला फारसे गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही. एक कलाकार आणि शेतकरी आंदोलनातील सहभागातून मान यांची चांगली प्रतिमा तयार झाली होती.

बदलाची तीव्र आस

पंजाबी मतदारांची परिवर्तनाची इच्छा किती प्रबळ होती हे मान यांच्या नेतृत्वात आपला मिळालेल्या विक्रमी यशामुळे स्पष्ट झाले आहे. सदर लेखक डिसेंबर 2021 च्या शेवटी दहा दिवस पंजाबच्या अभ्यासदौऱ्यात मतदारांशी बोलत होते. तेव्हा काँग्रेस आणि अकाली दलाविषयी असलेली नाराजी मतदारांमध्ये स्पष्टपणे जाणवत होती. मात्र त्याचवेळी मुख्यमंत्री चन्नी यांनीदेखील निर्णय आणि घोषणांचा धडाका लावला होता. त्यामुळे ते चांगले काम करत असल्याची भावनादेखील व्यक्त करणारे काही लोक होते. मात्र पक्षात ते एकाकी पडत असल्याचे चित्र निर्माण झाल्यानंतर परिवर्तन हाच पर्याय असण्यावर पंजाबी मतदारांनी जोर दिला. अर्थात आम आदमी पक्षाने खूप सुरूवातीपासून ‘एक मौका आपनू, एक मौका केजरीवालनू’ म्हणत परिवर्तनाला पुरक ठरेल असे नरेटिव्ह बनवण्यावर भर दिला होता. मान यांच्या निवडीनंतर त्यात ‘एक मौका भगवंत माननू’ या ओळीचीदेखील भर पडली. आपची प्रचारयंत्रणादेखील संपूर्ण ताकदीने काम करत होती. मुख्य प्रवाही माध्यमे आणि सोशल मीडिया आणि आपच्या स्वयंसेवकांची मेहनत यांची आपच्या यशात निर्णायक भूमिका राहिली आहे. पंजाबमधील 58 टक्के मतदार हे काँग्रेसच्या पाच वर्षांच्या शासनकारभारावर पूर्णपणे असमाधानी असल्याचे ‘सीएसडीएस’ने केलेल्या अभ्यासात उघड झाले आहे. त्याचप्रमाणे कृषी कायदे मागे घेतल्यानंतरही पंजाबी जनतेची भाजपविरोधातील टोकाची नाराजीदेखील या अभ्यासात दिसून आली आहे. एका परिवारापुरता मर्यादित झालेल्या शिरोमणी अकाली दलाच्या पारंपरिक मतदारांनीदेखील आपला पसंती दिली आहे. उच्चजातीय हिंदू आणि हिंदू ओबीसी या काँग्रेसच्या पाठीराख्या मतदारांनी काँग्रेसकडे पाठ फिरवून आपला जवळ केले आहे. एकूणच 2022 च्या निवडणुकीत पंजाबच्या राजकारणात मोठी घुसळण होऊन आपने निर्णायक यश मिळविले आहे. लोकनीतीच्या अभ्यासात बहुतांश पंजाबी मतदारांनी ‘उमेदवारांचा धर्म’ हा फारसा महत्त्वाचा घटक नसल्याचे मत नोंदविले आहे. 80 टक्के हिंदू मतदारांनी आणि 60 टक्के शीख मतदारांनीदेखील उमेदवाराचा धर्म महत्त्वाचा नसल्याचे मत व्यक्त केले आहे. आपवर शीख मतदारांनी तर विश्वास दाखवलाच मात्र राज्यातील हिंदू मते खेचण्यातदेखील आपला यश आल्याचे सीएसडीएस लोकनीतीचा अभ्यास सांगतो. पंजाबमधील मतदारांचे हे वर्तन ‘पंजाब आणि पंजाबियत’च्या खऱ्या धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाचे दिशादर्शन करते.

ग्रामीण, शहरी सर्वत्र ‘आप’

दिल्लीस्थित शहरी पक्ष म्हणून ओळख असणाऱ्या आपला पंजाब निवडणुकीत ग्रामीण तसेच शहरी अशा सर्वच मतदारांनी भरघोस मते दिली. शहरी मतदारसंघांमध्ये काँग्रेसची मते ही 2017 च्या तुलनेत 23 टक्क्यांनी घटली आहेत. ही मते आम आदमी पक्षाने स्वत:कडे ओढत शहरी मतदारसंघांमध्ये 27 टक्के मते घेतली आहेत. आप मालवासह माझा आणि दोआबा या सर्व विभांगांमध्ये आघाडी घेत काँग्रेसची मते स्वत:कडे वळविण्यात यशस्वी ठरला आहे. ग्रामीण, शहरी व निमशहरी अशा सर्वच मतदारसंघांमध्ये 42 ते 43 टक्के मते मिळविण्यात आपला यश आले आहे. आम आदमी पक्षाला एक संधी देण्याबाबत बहुतांश पंजाबी जनतेत एकमत झाल्याचे निकालांमधून दिसून येते. पंजाबमध्ये 39 मतदारसंघ असे आहेत जिथे हिंदू मतदारांची लोकसंख्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. या मतदारासंघांमध्येही आपने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. पंजाबमध्ये पूर्ण शहरी असलेल्या मतदारसंघांची संख्या ही 20 पेक्षा जास्त नाही. उर्वरीत सर्व मतदारसंघ हे ग्रामीण आहेत.

त्यामुळे शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हे उर्वरित सर्व मतदारसंघांमध्ये कळीचे ठरतात. जालंधर आणि लुधियानालगत असलेले लघु व मध्यम उद्योग हे विजेच्या समस्येमुळे पंजाबमधून हिमाचल प्रदेशमध्ये स्थलांतरित झाले आहेत. शिवाय सेवा क्षेत्राचा विस्तार अगदीच मर्यादित असल्यामुळे बेरोजगारीच्या समस्येने पंजाबमध्ये उग्र रूप धारण केले आहे. पंजाब राज्यावरील कर्जाचा डोंगर हा तीन लाख कोटींवर गेला आहे. ड्रग्जचा व्यापार रोखण्यात सर्वच पक्षांना अपयश आल्यामुळे महिला व तरूण मतदारांनी एक पर्याय म्हणून आपला मोठ्या संख्येने मतदान केले आहे.

‘आप’समोरील संधी आणि आव्हान

अरविंद केजरीवाल यांना नेता मानण्यात 2017 साली हात आखडता घेतलेल्या पंजाबने यावेळी त्यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास टाकल्याचे निकालातून दिसले आहे. तीन शेतकरी कायद्यांविरोधात झालेल्या ऐतिहासिक आंदोलनाने पंजाबचे राजकीय शिक्षण करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. माझा आणि दोआबाच्या तुलनेत मालवामधील शेतकरी कुटुंबांनी खूप मोठ्या अपेक्षा ठेवून आम आदमी पक्षाला निर्णायक पाठिंबा दिला आहे. पंजाबमध्ये मागील काही दशकांपासून गंभीर बनलेल्या समस्यांवर धोरणात्मक उपायांची मोठी अपेक्षा आपकडून असणार आहे. दिल्लीतील विकास कामांची भुरळ पडलेल्या पंजाबी जनतेसमोर सुशासनाचे नवे मॉडेल आपला ठेवावे लागेल. त्यासाठी पंजाबला धोरणात्मक दिशा देण्याचे मोठे आव्हान आम आदमी पक्षासमोर असणार आहे. बदलत्या पंजाबने दिलेला जनादेश हा पंजाबच्या राजकीय इतिहासातील महत्त्वाचे वळण म्हणावे लागेल.

- भारत पाटील 
bharatua@gmail.com

(लेखक मुक्त पत्रकार असून द युनिक फाऊंडेशनमध्ये वरिष्ठ संशोधक व राजकीय प्रक्रियेचे अभ्यासक आहेत)


हेही वाचा : 
पाच राज्यांतील निवडणुकांचा अन्वयार्थ लावणारी विशेष लेखमाला : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका - 2022 

Tags: पंजाब विधानसभा प्रचार निवडणूक निकाल आम आदमी पक्ष शिरोमणी अकाली दल राजकारण लेखमाला Load More Tags

Comments:

Chandrashekhar Jagadale

अप्रतिम विश्लेषण केलंय, पंजाबच्या निवडणुकांचे

Add Comment