प्राचार्य ल. बा. रायमाने हे दलित साहित्य आणि आंबेडकरी चळवळीतील अनेकांसाठी मार्गदर्शक ठरलेले नाव. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या, औरंगाबाद येथील मिलिंद कला महाविद्यालयात 26 ऑगस्ट 1963 ते 31 जानेवारी 1995 या काळात त्यांनी मराठीचे अध्यापन केले. मिलिंद कला महाविद्यालयात त्यांनी साहित्यविषयक अनेक उपक्रम सुरु केले. साने गुरुजींनी अमळनेर येथे चालवलेल्या ‘छात्रालय दैनिक’ या हस्तलिखिताच्या धर्तीवर त्यांनी मिलिंद हस्तलिखित पाक्षिक सुरू केले. त्याशिवाय मिलिंद जर्नल, मिलिंद मॅगझिन, मिलिंद साहित्य परिषद, अस्मिता त्रैमासिक (त्याचेच पुढे अस्मितादर्श झाले) यांसारखे उपक्रमही त्यांनी सुरू केले. 6 डिसेंबर 2020 रोजी वयाच्या 85व्या वर्षी त्यांचे निधन झाले. डिसेंबर 2021मध्ये 'आधारस्तंभ प्राचार्य ल.बा. रायमाने' या त्यांच्या गौरवग्रंथाची तिसरी आवृत्ती लोकवाङ्मयगृहतर्फे प्रसिद्ध करण्यात आली आहे. या ग्रंथाचा करून दिलेला परिचय..
‘मिलिंद’च्या सांस्कृतिक पर्वातील लोभस व्यक्तिमत्त्व म्हणजे प्राचार्य ल.बा. रायमाने होत. खरंतर रायमाने सरांच्या कर्तृत्वाशी जुळलेल्या बहुआयामी प्रतिभा, निष्ठा आणि व्यक्तित्वाचा चतुरस्त्ररित्या सम्यक वेध 'आधारस्तंभ' या गौरवग्रंथाव्दारे घेण्यात आला आहे. अलीकडेच, डिसेंबर 2021मध्ये या गौरवग्रंथाची तिसरी आवृत्ती लोकवाङ्मयगृह, मुंबई तर्फे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ह्या बृहत्ग्रंथाचे चोखंदळ संपादन आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार प्रा. अविनाश डोळस आणि कवी राम दोतोंडे यांनी केलेले असून या गौरवग्रंथाला वाङ्मयीन व वैचारिक मूल्य प्राप्त करून देण्याचा यत्न दोन्ही संपादकांनी अत्यंत कुशलतेनं केला, हे इथे विशेष नोंद घेण्यासारखे आहे.
प्राचार्य ल.बा.रायमानेंनी मिलिंद व नागसेन परिसरात जी नवसमाजनिर्मितीची प्रक्रिया सुरु केली. त्यामधून मिलिंद संस्कृतीचा उदय झाला. सांस्कृतिक चळवळीची खरेतर ही 'निळी पहाट' होती. 12 डिसेंबर 1963 मध्ये प्रा. रायमाने यांनी 'मिलिंद हस्तलिखित’ सुरू केले. या उपक्रमाचा भाग म्हणून 'मिलिंद मॅगझिन’, ‘मिलिंद साहित्य परिषद’ तसेच मिलिंद कॅम्पसमधून उदयास आलेल्या ‘अस्मिता’ या त्रैमासिकातून लिहिते झालेले अनेक नामवंत लेखक, कवी, नाटककार, आत्मकथनकार व विचारवंत पुढे मराठी वाङ्मयविश्व व महाराष्ट्रात ख्यातनाम ठरलेत. या सर्वांच्या जडण-घडणीमध्ये मिलिंदमधील सांस्कृतिक चळवळीचा मोठा हातभार लागलेला होता आणि प्राचार्य रायमाने यांचे मौलिक मार्गदर्शन तर या सर्वांसाठी आधारस्तंभ ठरलेले होते. आजघडीला चळवळीतील हे सूर्यसत्य सहज विसरता येण्याजोगे नाही.
प्रस्तुत गौरवग्रंथाची प्रसिद्ध झालेली आणि विक्रीस आलेली ही तिसरी आवृत्ती एकूण दहा विभागांत विभागलेली असून तिच्या पहिल्या भागात संपादकीय, दुसऱ्या व तिसऱ्या आवृत्तीची प्रस्तावना तसेच दोन मनोगतांचा समावेश करण्यात आलेला आहे. ‘मी जे जगलो’ या भागात रायमाने सरांचे बालपण, प्राथमिक व महाविद्यालयीन शिक्षणासंबंधीची मूलभूत मांडणी केली आहे. पुढे याच भागात 1963-64 पासून तर 1993-94 पर्यंत, म्हणजे एकूण तीन दशकांतील मिलिंदच्या आठवणी वाचायला मिळतात. खरंतर या आठवणी म्हणजे मिलिंद संस्कृती जाणून घेण्याचा मोठा ऊर्जास्रोत आहे. नंतरच्या भागात रायमाने सरांच्या लेखनाचा सर्जनशील भाग वाचकाला खिळवून ठेवतो. कारण, रायमाने सर ज्या काळात लिहीत होते. तो काळ दलित साहित्याच्या उदयाचा असल्यामुळे त्यांच्या लेखनातील विचारांना आज विशेष महत्त्व व संदर्भ प्राप्त झालेला आढळतो.
हेही वाचा : ‘मिलिंदायन’चे ल. बा. रायमाने - राम दोतोंडे
तिसरा भाग ‘रिपोर्ताज’चा आहे. मिलिंद मॅगझिनमधून अभिव्यक्त होणाऱ्या साहित्याचा वृत्तांत, आमचे कवी - आमचे लेखक, मिलिंद मॅगझिनच्या निमित्ताने घडून आलेली चर्चा, धम्मचक्रप्रवर्तन प्रेरणा व वाटचाल, दलित - बौद्ध प्राध्यापक एक मुक्त संवाद, दलित बौद्धांतील सुशिक्षित वर्ग आणि सामाजिक समस्या या संवेदनशील विषयांवर घडून आलेली चर्चा, विद्यार्थी साहित्य शिबिर, महात्मा गांधी आणि समाज परिवर्तन एक मुक्त चर्चा तसेच समाजवाद व दलित अशा अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चामंथन घडून आले. अशा मंथनातून वर्तमानातील अभ्यासकांना अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. तत्कालीन समाजाच्या भावविश्वाचे व विचारविश्वाचे सम्यक दर्शन घडून येते. शिवाय पुढच्या पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी समुचित दिशा त्यातून मिळते, असे म्हणावे लागते. ‘व्यक्तिविशेष’ या चवथ्या भागात मिलिंद संस्कृतीमधून उदयास आलेल्या शिलेदारांचा वेध, प्रा. रायमाने यांनी मनस्वीरित्या घेतला आहे. प्राचार्य म.भि.चिटणीस, डी.जी.जाधव, प्रा. मनोहर जिल्ठे, प्रा. अविनाश डोळस, यांच्याविषयी रायमाने सरांनी उत्कट भावनेतून लिहिलेले आहे. या सर्व लेखांमधून घेतल्या गेलेल्या व्यक्तिवेधासाठी जसे हे पुस्तक महत्त्वाचे आहे, तसेच बाबासाहेबांनी सुरू केलेल्या तत्कालीन कार्याचा सांस्कृतिक दस्तावेज म्हणूनही ते महत्त्वाचे ठरते. मिलिंद महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य होण्याचा मान चिटणीसांना मिळाला. त्यामुळे त्यांनी कथन केलेला माहितीचा सूक्ष्म तपशील हा अनेकार्थाने मौलिक ठरतो.
प्राचार्य चिटणीसांनी विद्यार्थ्यांवर अखंडपणे संस्कार केलेत. म्हणून ते मिलिंद महाविद्यालयाला संस्कारकेंद्र मानत होते. खरंतर प्राचार्य चिटणीस व प्राचार्य वानखेडे यांच्या मार्गदर्शनातून प्रा. अविनाश डोळस, प्रा. जिल्ठे यांनी उत्तुंग झेप घेतली. मिलिंद काॅलेजचे प्रा. डोळस पुढे मिनॅडर ठरलेत. एकूणच मिलिंदच्या स्थापनेमागची पूर्वपीठिका, सांस्कृतिक इतिहास आणि तत्वप्रणाली समजून घेण्यासाठी हा भाग अत्यंत महत्त्वाचा ठरतो. पाचवा, सहावा आणि सातवा भाग हा प्राचार्य ल. बा. रायमाने यांच्याविषयी इतरांनी लिहिलेल्या लेखांसंबंधी आहे. यामध्ये सहकाऱ्यांच्या दृष्टीतून, विद्यार्थ्यांच्या दृष्टीतून आणि सगेसोयरे व नातेवाईकांच्या दृष्टीतून अधोरेखित होणारे, प्राचार्य रायमाने असे या भागांचे संमिश्र स्वरूप राहिलेले आहे. यात प्रा. रा.ग. जाधव, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, प्राचार्य एस.आर. हणमंते, प्रा. अविनाश डोळस, डॉ. मनोहर जिल्ठे, बी.आर. आरबाड, सुरेश शिपूरकर, श्याम कुलकर्णी, ॲड. हिरालाल डोंगरे, डॉ. सुहास जेवळीकर, प्रसन्न भालचंद्र वराळे, प्रा. रामदास झाकडे, अंजली मालकर, हरीश खंडेराव या साहित्य चळवळीतील लेखक, कवी व प्राध्यापकांनी सरांच्या व्यक्तिमत्त्वाचा चौफेर वेध घेत, त्यांच्या नानाविध पैलूंवर मौलिक झोत टाकला आहे. याच भागांमध्ये काही विद्यार्थ्यांनीदेखील रायमाने सरांच्या लोभस व्यक्तित्वाविषयी चिंतनरूपी आठवणींचा समुद्र उपसून काढला आहे. त्यामध्ये ख्यातनाम कथाकार योगिराज वाघमारे, जेष्ठ विद्रोही कवी डॉ. यशवंत मनोहर, प्रभाकर गांगुर्डे, प्रा. डॉ. अरूणा लोखंडे, प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे, दे.ना. दवणे, प्राचार्या माधुरी निकुंभ, प्रा. कमलाकर गंगावणे, प्रा. शांताराम हिवराळे, ॲड. नाना अहिरे, प्रा. ना.तु. पोघे, प्रस्तुत ग्रंथाचे संपादक कवी राम दोतोंडे, नव्या पिढीतील कवी, समीक्षक डॉ. महेंद्र भवरे व विंदा भुस्कुटे इत्यादींचे एकोणतीस लेख आहेत.
डॉ. भवरे यांचा लेख नव्या पिढीला कराव्या लागणाऱ्या संघर्षाची कल्पना देतो. त्यामधील वैचारिक भारलेपण प्रकर्षाने आपले लक्ष वेधून घेते. ‘रायमाने सर म्हणजे मिलिंद संस्कृतीचा चालता बोलता 'Encyclopaedia’ असे डॉ. भवरेंना वाटते. हस्तलिखित मिलिंद पाक्षिकामधून जे विद्यार्थी घडले, लिहिते झाले त्या सर्वांना प्रा. रायमाने हे हाडाचे शिक्षक व संयमी वृत्तीचे वाटतात. विद्यार्थ्यांच्या मनातील सुप्त प्रेरणा जागविण्याचे केंद्र म्हणून रायमाने यांच्याकडे पाहिले जात होते. म्हणून प्रस्तुत ग्रंथामुळे मिलिंद संस्कृतीचे अनेक बारीकसारीक तपशील मूळातून ज्ञात झाले. ही या ग्रंथाची मोठीच उपलब्धी म्हणता येईल. प्राचार्य ल. बा. रायमाने यांचे समग्र व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या कार्याची नोंद इथे मोठ्या संवेदनशीलतेनं घेतली आहे. त्यातून रायमाने सरांचे ध्येयवादी व्यक्तिमत्त्व सहज उलगडत जाते. खरे म्हणजे नागसेन परिसरातील मिलिंद संस्कृतीने आंबेडकरी चळवळीला जे काही परिवर्तनाचे वाटसरू दिलेत. त्यामधील रायमाने हे मिलिंद संस्कृतीचे एक शिल्पकार आहेत.
रायमाने सरांच्या निमित्ताने ज्या वेगवेगळ्या लेखकांनी लेख लिहिले आहेत, त्यातून केवळ रायमाने सरांचे व्यक्तिमत्वच साकार होत नाही तर बाबासाहेबांच्या समग्र चळवळीचा लेखाजोखाच रेखांकित होतो. हा मौलिक दस्तावेज नव्या पिढीपर्यंत पोहचवणे हेदेखील या गौरवग्रंथाचे प्रयोजन आहे. शिवाय रायमाने सरांचा जीवन संघर्ष, त्यांनी खाल्लेल्या खस्ता, घेतलेल्या ध्येयवादी परखड भूमिकेचा परिचय यातून घडतो.
एकमेकांना सहकार्य करणारे सहाध्यायी, सुखदुःखात साथसंगत करणारे मित्र, मुलांवर जीवापाड प्रेम करणारे रायमाने सर इथे प्रकर्षाने झळकतात. सातव्या भागात ल.बा.रायमाने सरांच्या सग्यासोयऱ्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला उत्कट वेध आलेला आहे. या सर्व लेखांमधून रायमाने सर हे आंतरजातीय विवाहाचे पुरस्कर्ते, कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय, जीवनमूल्यांचा वारसा जोपासणारे, प्रेमळ आणि कुटुंबातील सर्व सदस्यांवर प्रेम करणारे म्हणून इथे आपणास भेटतात. ‘आठवण’ ह्या भागात डॉ. यशवंत मनोहर आणि सुनीता सावरकर यांनी शब्दबद्ध केलेल्या आठवणी आहेत. प्राचार्य ल.बा. रायमानेंमध्ये मनोहरांना ‘अम्लान नायकत्व’ दिसते; तर सावरकरांना ते अभ्यासू, चिंतनशील, मितभाषी व द्रष्टे प्रवृत्तीचे प्राचार्य दिसतात. परिशिष्टामध्ये ‘मिलिंद महाविद्यालय : साहित्यिक चळवळीचे केंद्र’ (डॉ. म.ना.वानखडे), ‘मिलिंद मॅगझिन म्हणजे संदर्भग्रंथच’ (कुलगुरू डॉ. शंकरराव खरात) या दोन्ही लेखांत मिलिंद संस्कृतीचा मूलभूत इतिहास शब्दबद्ध झालेला आहे. परिशिष्टाच्या या भागात वर्तमानपत्र आणि साधना मित्र मंडळाचा अहवाल दिला आहे. नसलापूरचे संस्कार शिबिर व समता अभियानातील अनुभवकथनातून प्राचार्य रायमानेंच्या अलक्षित पैलूंवर झोत टाकला गेला आहे. तसेच प्रातिनिधिक प्रतिक्रियेतून देवेंद्र उबाळे यांनी ग्रंथाचे मूल्य तटस्थपणे अधोरेखित केले आहे.
हेही वाचा : ऑडिओ : नीलकंठ पाहण्यासाठी - विभूतीभूषण बंद्योपाध्याय
मुंबईतील प्रतिष्ठित प्रकाशन संस्था असलेल्या ‘लोकवाङ्मयगृह’ने प्रकाशित केलेला हा गौरवग्रंथ 394 पृष्ठांचा असून अतिशय देखणा व कलात्मकदृष्टया वेगळ्या धाटणीचा आहे. प्रकाशक राजन बावडेकर आणि संपादकांनी ग्रंथाची रचना प्रत्येक पृष्ठाच्या तीन ‘कॉलम’मध्ये मजकुराची विभागणी केली असून देवेंद्र उबाळे म्हणतात त्याप्रमाणे मुद्रणात प्रभावी ठरणाऱ्या ‘ओपनस्पेस’चा मुक्त वापर केला आहे. प्रत्येक कॉलममध्ये अधोगामी - ऊर्ध्वगामी धूसर होत जाणाऱ्या ‘ग्रेडिएंट’ रेषेने ग्रंथसौंदर्यात भर पडली आहे. शिवाय कॅलिग्राफीचा वापर कल्पकतेने व कुशलतेने केला आहे. लक्षवेधी मुखपृष्ठ, ग्रंथाच्या मधोमध आर्टपेपरची सोळा रंगीत पाने, ऑफ-व्हाईट कागदावरची सुबक व हटके छपाई, मजबूत बांधणी आणि निर्मिती वैशिष्ट्यपूर्ण आहे. नेहमीच्या वळणाच्या आयताकृती आकाराऐवजी चौरस आकार स्वीकारल्यामुळे ग्रंथ भारदस्त झाला आहे. मुळातच ग्रंथाची मुद्रणरचना आणि अंतर्गत मांडणी करताना अनवट वाटेचा स्वीकार केला गेला आहे. म्हणूनच प्रस्तुत गौरवग्रंथाचे आरेखन आणि एकूणच निर्मिती उत्तम जमली आहे. खरं म्हणजे नऊ वर्षांत प्रस्तुत गौरवग्रंथाच्या तीन आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत ही रायमाने सर आणि चळवळीची मोठीच उपलब्धी ठरते.
एकंदरीत, 82 प्रकरणात विभागलेला हा गौरवग्रंथ बृहद स्वरूपाचा असून महेश गावणकर यांच्या आशयघन मुखपृष्ठामुळे आणि किशोर निकम व विजय उरगुंडे यांच्या छायाचित्रांमुळे ग्रंथ अतिशय देखणा झाला आहे. विशेषतः ग्रंथाच्या काही पानांवर चौकटीत मिलिंद वार्षिकांकातून घेतलेला ‘अनुभव’चा भाग वाचकांना नवे ऐतिहासिक संदर्भ पुरवितो. आंबेडकरी चळवळीला विविधांगी स्वरूपाचे बारीक-सारीक तपशील पुरविणारा गौरवग्रंथ म्हणून या ग्रंथाचे वैचारिक मोल अन्ययसाधारण आहे. रायमाने सरांच्या हस्ताक्षराने सुरू झालेला सदर ग्रंथ भारत सरकारमधील तत्कालीन विद्युतमंत्री मा. सुशीलकुमार शिंदे आणि ख्यातनाम आंबेडकरवादी लेखक डॉ. यशवंत मनोहरांच्या शुभेच्छापत्राने गौरवग्रंथाचा समारोप झाला आहे. गौरवग्रंथाचा शेवट मात्र ल.बा. रायमाने सरांच्या संक्षिप्त परिचयाने होतो. विशेष असे की, स्मृतिशेष प्रा. अविनाश डोळस सरांच्या अनुपस्थित या गौरवग्रंथाची तृतीय आवृत्ती ख्यातनाम कवी राम दोतोंडे यांनी मोठ्या ध्येयनिष्ठेने सिद्ध केली. म्हणून त्यांचे मनस्वी अभिनंदन केले पाहिजे.
- डॉ. अशोक रा. इंगळे,अकोला
ashokingle73@gmail.com
Tags: दलित साहित्य दलित बौद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर Load More Tags
Add Comment