सध्या चर्चेत असलेल्या रेव्हरंड डॅनियल मस्करनीस (धर्मसुधारणा करणाऱ्या सर्व विचारवंताना मी रेव्हरंड अथवा रेव्ह. असे संबोधन वापरतो.) यांच्या 'मंच' या पुस्तकाच्या संदर्भ सूचीतील 'अंधारातील वाटा' हे रेव्ह. अॅड. अतुल आल्मेडा लिखीत पुस्तक हा 'मंच' या पुस्तकाचाच पहिला भाग असे म्हटले तर त्यात अतिशयोक्ती ठरणार नाही. वसईमध्ये ख्रिस्ती धर्मात जी विवेकवादी चळवळ सध्या चालू आहे त्यामागील प्रगल्भ विचारसरणी या पुस्तकात अभ्यासता येते. समाजात बदल घडवून आणणाऱ्या धर्म, विज्ञान, राजकारण या सर्व विषयांवर साधक बाधक विचारांचा आढावा या पुस्तकातील 23 प्रकरणांमध्ये घेतलेला आहे व त्याद्वारे विवेकवादी समाजाचे स्वप्न त्यात पाहिले गेले आहे.
विवेक म्हणजे बदल! जुने ते बहरवून, अनावश्यक ते बाजूला सारून नाविन्याकडे वाटचाल! सत्य, सुंदर अन् मंगलाची आराधना! विवेक स्थायी नसतो तर परिवर्तनशील असतो. आपल्या विचारांना ब्रह्मसत्य न मानता तो सर्व विचारांना समजून घेतो. विवेकाची वाट ही दिसायला अंधूक भासते परंतु त्यावर चालू लागल्यावर एका असीम स्वातंत्र्याची अनुभूती येते. 'अंधारातील वाटा' वाचत असताना अगदी प्रस्तावनेतच या सत्याची जाणीव होते. प्रस्तावनेत रेव्ह. जो. मा. पिठेकर हे एक आस्तिकवादी विचारवंत रेव्ह. आल्मेडांच्या कित्येक भूमिकांना आक्षेप नोंदवतात आणि तरीही ही प्रस्तावना सदर पुस्तकाच्या ढाच्याला कणभरही धक्का लागू देत नाही; कारण आस्तिक नास्तिक वादापलिकडे या दोन्हीही विचारवंताना जोडणारा त्यांचा विवेक त्यांच्यासाठी परस्पर पुरक ठरतो.
विवेकवाद म्हणजे नास्तिकवाद हे जे समीकरण सध्या रुढ होताना दिसत आहे तेच मुळात चुकीचे आहे. नास्तिकवादी आणि विज्ञानवादी असलेले, परंतु त्याचवेळी स्व-मतांचा कट्टर पुरस्कार करणारे बुद्धिजीवी कधीच पुरोगामी ठरत नसतात. त्याचवेळेला ईश्वराचे अस्तित्व मानणारे व सर्व धर्मांना व विचारांना प्रज्ञेच्या नजरेतून पाहणारे रामकृष्ण परमहंसांसारखे साधक पुरोगाम्यांहून पुरोगामी ठरतात.
जीवनाचे परम सत्य व त्या सत्याला अर्थपूर्ण करणारे तत्त्व हे मनात उमटलेल्या तत्संबंधित प्रश्नांचा परिसस्पर्श घेऊनच ज्ञानाची खाण बनून जातात. रेव्ह. अॅड. अतुल आल्मेडा यांना एक वकील म्हणून न्यायदेवतेची व चर्चचे कायदेशीर सल्लागार म्हणून धर्मदेवतेची सेवा करताना असेच काही प्रश्न पडू लागले. धर्ममार्तंडांच्या अहंमन्य व स्वार्थलोलूप वर्तणूकीचा प्रत्यय आल्यावर ते त्या प्रश्नांची उत्तरे शोधू लागले. त्यांना पडलेले प्रश्न व त्या प्रश्नांना मिळालेली उत्तरे असे या पुस्तकाचे काहीसे स्वरूप असल्याने 'अंधारातील वाटा' हे नाव सदर पुस्तकाला अगदी साजेसे होऊन बसते. नव्हे, चाणाक्ष वाचक वर्गालादेखील ते आपले कुतूहल धर्माच्या कृत्रिम बेड्यांत अडकवून न ठेवता स्वतःची वाट शोधण्याची प्रेरणा देत राहते.
सदर पुस्तकात धर्म हा मुद्दा जरी ठळकपणे चर्चीला गेला असला तरीही त्याची खुलेआम चर्चा करण्याचे व्यासपीठ सर्व भारतीय नागरिकांसाठी खुले करून देणाऱ्या संविधानाचा लेखक सर्वप्रथम समर्पक वेध घेतात. लोकशाहीने ते पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणाची सुरूवात करतात. लोकशाही आत्मसात करण्यासाठी हक्क व कर्तव्ये या दुहेरी भूमिकेतून जावे लागते. स्वतः स्वातंत्र्य उपभोगणे हा प्रत्येकाचा हक्क. परंतु त्याचवेळी इतरांचे स्वातंत्र्य ओळखणे व ते त्यांना मिळवू देण्याच्या मार्गातील अडथळा न होणे म्हणजे कर्तव्ये. म्हणूनच हक्क आणि कर्तव्ये यांच्या योग्य मुल्यमापनासाठी नीतीमुल्यांची गरज आहे.
अशावेळी लेखक म्हणतात, 'धर्मात राजकारण नसावे, परंतु राजकारणात धर्म असला पाहिजे.' व त्याचे कारण देताना ते म्हणतात, ' जीवनात धार्मिक तत्त्वावर आधारलेली नैतिकता असल्याशिवाय समानतेवर आधारलेला समाज निर्माण होणार नाही.' नीतीमुल्यांच्या सुपीक वाढीसाठी राजकारण हे धर्माच्या पायावर आधारित असले पाहीजे. परंतु आज धर्म (Duty) व संप्रदाय (Religion) या दोन भिन्न संज्ञा समान अर्थाने वापरल्या गेल्याने आधुनिक राजकारणाला संम्प्रदायाचे स्वरूप आल्याचे आपण पाहतो. अशावेळी 'धर्म' म्हणजे नेमके काय हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते.
'विश्व स्वधर्म सूर्ये पाहो' या मागणीत संत ज्ञानेश्वरांनी 'हवे ते साध्य करण्याच्या आपल्या संघर्षाला असलेला नैतिकतेचा आधार' असा धर्म या संकल्पनेचा अर्थ रूढ केलेला आहे. इतरांवर खरा शेजारी या नजरेतून प्रेम करण्याचा मानवतेचा धर्म ख्रिस्ताला अपेक्षित होता. तर नैतिक कर्तव्याचे यज्ञ भावनेने पालन करणे हा धर्म श्रीकृष्णाने गीतेत सांगितलेला आहे . शेवटी हे सर्व धर्म एकाच मुल्यावर आधारित असताना या चवचाल काळात ते मुल्यच लक्षात न घेणे हे मानवाचे सर्वात मोठे अपयश ठरले.
धर्म, नीतीमुल्ये यानंतरच्या चर्चेनंतर लेखक ईश्वराच्या अस्तित्वावर प्रश्न उभा करतात. त्यासाठी ते स्वामी विवेकानंदांचे 'ईश्वरकल्पना नुसती तर्कविसंगतच नाही तर ती अनीतीला कारणीभूत होणारी आहे' हे मत, तसेच बहिणाबाई चौधरी, ख्रिस्त यांची ईश्वरासंबंधीची मते विचारात घेतात. ईश्वर या कल्पनेचा शोध घेताना ते सुमेरियन, इजिप्त, हिंदू, हुआंग, ग्रीक, माया अशा अनेक संस्कृतींचा व त्यातून निर्माण झालेल्या अनेक संप्रदायांचा वेध घेतात. मानवाच्या अस्तित्वाबाबत ते उत्क्रांतीचा सिद्धांत व मुलद्रव्यांतून झालेली त्याची शारीरिक व मानसिक रचना यांचे स्पष्टीकरण देऊन आपले मत पक्के करतात. त्यासाठी ते डी एन.ए. चे जनक फ्रान्सिस क्रिक व वाॕल्टर हेस यांच्या भावभावनांच्या विकासामागील वैज्ञानिक मत उचलून धरतात.
प्रचलित ईश्वराचे, स्वर्ग नरक यांचे अस्तित्व ठामपणे अमान्य करत असतानाच, ते ख्रिस्ताला अभिप्रेत असलेले 'स्वतःच्या अंतःकरणातील स्वर्ग राज्य' या संकल्पनेवर मात्र भर देतात. तसे पाहिले तर आध्यात्मिक होणे हे धार्मिक होण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. एकीकडे स्त्री शक्तीची पुजा करायची व दुसरीकडे तिच्यावर अत्याचार करायचे, नदीला मातेचा दर्जा द्यायचा व नदी या सर्वात मुख्य नैसर्गिक संसाधनाचे हवे तसे प्रदुषण करायचे. आणि मुख्य म्हणजे ज्या देशात अशा पुजा अर्चा चालतात त्याच देशात हे प्रमाण जास्त आढळून येते. कारण पुजा-अर्चेत देव देवळात अडकून बसतो. त्या देवाचे देव्हारे माजतात. व तेच निसर्गाचा व बहुतेक वेळेला त्या विरूद्ध आवाज उठवणाऱ्यांचा घात करतात. अशावेळी लेखकाचे 'आध्यात्मिक होणे म्हणजे विवेकाने जगणे' हे मत ' ईश्वर सत्य नसून सत्य म्हणजेच ईश्वर आहे' या महात्मा गांधींच्या मताला पुष्टी देते.
अपेक्षितपणे ज्या ख्रिस्ती संप्रदायात ते वाढले त्यावर जेव्हा ते चर्चा सुरू करतात, त्यावेळी माझ्यासारख्या ख्रिस्ती श्रध्देत वाढलेल्या श्रद्धावंताला त्या संप्रदायातील मूळपाप ही कल्पना, मरियेचे दैवीकरण, ख्रिस्ताचे निर्भय विचार व त्याच्या नावावर पोसलेल्या धर्मसंस्थेचे आचार यांतील तफावत अशा काही विषयांवर विचार करणे भागच पडते. नव्हे, माझ्या आजवरील निरीक्षणास एका नवीन जिज्ञासेचे कोंब फुटू लागतात. विज्ञानाच्या शोधामुळे पाश्चात जगताला विज्ञाननिष्ठ अशी ओळख मिळाली आणि त्यामुळे तेथे रुढ असलेल्या ख्रिस्ती संप्रदायाचीही विज्ञानवादी अशी एक ओळख सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाली.
परंतु मुळ पाप ही संकल्पना पाळून आजही नवजात बालकांच्या कपाळावरील तो डाग पुसण्याचा विधी (बाप्तिस्मा)पाळणारा (बाप्तिस्मा होण्यापूर्वी जर एखादे बाळ दगावले तर त्याचे मुळपाप कायम असल्याने त्याचा दफनविधी इतर ख्रिस्ती लोकांच्या दफन भूमीत केला जात नाही.), मदर तेरेसासारख्या कुष्टरोग्यांची सेवा करणाऱ्या एका जिवंत चमत्काराकडून त्यांच्या मृत्यूनंतर संतपद बहाल करण्यासाठी एखाद्या अलौकिक चमत्काराची अपेक्षा करणारा संप्रदाय खरंच विज्ञानवादी ठरतो का? बरे, त्यातही मदर तेरेसा ख्रिस्ती असल्याने त्या संत होऊ शकतात व देवाकडे मानवांसाठी मध्यस्थी करू शकतात. परंतु मग तसेच कार्य करून ख्रिस्त विचारांशी एकरूप झालेले, परंतु अख्रिस्ती असलेले बाबा आमटे हे ख्रिस्ती संत का नाही होऊ शकत?
ख्रिस्त क्षमा शिकवतो म्हणून अपराध्यास मृत्यूदंड देऊ नये ही त्या धर्मसंस्थेची भूमिका आदर्शवादी आहेच; परंतु तीच संस्था जर त्या धर्मसंस्थेविरोधात प्रसिद्धी माध्यमात काही छापून दिले तर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी सुचना (धमकी) प्रार्थनाविधीच्या शेवटी देते त्यावेळी सत्याचा पुकार करणाऱ्या ख्रिस्त वचनांची पुरती पायमल्ली नाही का होत?
बायबलमध्ये मूर्तीपुजेस मनाई आहे. 'आम्ही मूर्तीपुजा नाही तर त्या मूर्तीचा सन्मान करतो' या त्यांच्या युक्तीवादास देखील बायबलमध्ये कुठे स्थान नाही. बायबलमध्ये तर 'आमच्या स्वर्गीय बापा' ह्या प्रार्थनेव्यतिरिक्त अन्य कुठलीही प्रार्थना नाही. त्यात ती प्रार्थना देखील चुकलेल्यांना क्षमा करून पवित्र आचरण ठेवणे या वर्तणुकीत उतरली पाहिजे असेच ख्रिस्ताचे मत आहे. असे असताना ख्रिस्ताच्या शेवटच्या भोजनास एका विधीचे रूप दिले गेले व त्यातून अनेक प्रार्थनाविधींची परंपरा चालू झाली.
ख्रिस्ताने मरताना आपल्या आईची जबाबदारी आपल्या प्रिय शिष्याला दिली हा धागा पकडून ती साऱ्या जगाची आई आहे व आपल्यासाठी देवाकडे मध्यस्ती करत असते अशी एक प्रचलित धारणा आहे व वैयक्तिक पातळीवर ती मानणे यात काहीही गैर नाही. परंतु आज त्याचा पुरता उपयोग करून श्रध्देचा व्यापार बळावलेला दिसतो आहे. हे सर्व पाहताना स्वामी विवेकानंदाचा 'स्वार्थासाठी चाललेल्या या तुमच्या जीवनप्रवासात, या ध्वंसाच्या युद्धात ख्रिस्त कुठे आहे?' हा सवाल माझ्यासकट सर्वच विचारशील ख्रिस्तीजनांना बेचैन करतो.
ख्रिस्ताचा जन्म एका गोठ्यात झाला, एका दीन दरिद्री सुताराचा पोर म्हणून त्याने आपल्या लोकोत्तर कार्यास सुरूवात केली हे आम्ही लहानपणापासून ऐकत आलो. 'देवाचे घर बाई गुरांचा गोठा, नव्हे त्या ओटा ना खिडक्यांचा तोटा, देवाचे घर बाई शेणाची लादी मऊ मऊ गवताची अंथरली गादी ' अशी गीते गाताना आम्हाला दरिद्री नारायणाचे रूप ख्रिस्तात दिसे. परंतु वास्तविक ख्रिस्तमंदीराचे वैभव, त्यातील सोन्याचा मुलामा आम्हाला त्या अनाथबंधू येशूपासून दूरचं नाही का घेऊन गेले?
असे हे विचार मनात थैमान घालून या पुढे काय ही संभ्रमावस्था निर्माण करत असताना, रेव्ह. अॅड. आल्मेडांचे हे पुस्तक ख्रिस्ताची निर्भयता दाखवत निर्भय बनून स्वतंत्र विचार करण्याची दिशा दाखवते. तथापि ते धर्मसत्तेपासून फारकत घ्यायला सांगत नाहीत; तर त्या संघटनेमध्ये प्रापंचिकांचा सहभाग अधिक वाढवून ती एक सर्वसमावेशक संस्था बनविण्याचा मानस ते धरतात. ते धर्मसंस्थेला अनेक कालसुसंगत निर्णय घेण्याचे (जसे- स्त्रियांना धर्मगुरूपद, विवाहित धर्मगुरू) आवाहन करून पुरोगामी चळवळीत आणू पाहतात. यात त्यांच्या धर्मसंप्रदाय विरोधापेक्षा त्याबद्दल विवेकी प्रेम ठळकपणे जाणवते. काही मुद्द्यांची पुस्तकात पुनरावृत्ती प्रकर्षाने दिसत असली तरीही धर्म या खोलवर रूजलेल्या भावनेला नवीन आकार देण्यासाठी अशा गोष्टी पुन्हा पुन्हा ठासून सांगण्याची त्यांची पद्धत स्तुत्यच आहे.
शेवटी प्रत्येक मनुष्याच्या अस्तित्वाचा सन्मान करणाऱ्या आपल्या संविधानास साजेसा नागरिक लेखकाला अपेक्षित आहे. त्यासाठी धर्म व राजकारण यांचा विवेकी अनुबंध व्हावा ही लेखकाची भूमीका आहे. ही त्यांची भूमिकाच विचारशील श्रद्धेपर्यंतची वाट दैदिप्यमान करून समाजाला मार्गदर्शक ठरेल हे मात्र नक्की!
- मॅक्सवेल लोपीस
maxwellopes12@gmail.com
(लेखक, नरसी मोनजी महाविद्यालयात वाणिज्य अध्यापक असुन गांधी विचारांचे अभ्यासक आहेत.)
अंधारातील वाटा
लेखक: अतुल आल्मेडा
प्रकाशक: स्मित प्रकाशन, वसई
पृष्ठे: 112
किंमत: 100 ₹
Tags:Load More Tags
Add Comment