एच-पॉप च्या निमित्ताने: संगीत, सोशल मीडिया आणि राजकारण

हिंदू-पॉपचा विषय, आशय आणि सादरीकरण हे कुठल्याही विवेकी, तर्कनिष्ठ विचाराला कडवे आव्हान बनून उभे आहे.. 

हिंदू-पॉपच्या गाण्यांमध्ये उघडपणे हिंसेचा पुरस्कार केला जातो. गाण्यांमध्ये मानहानीकारक मजकुरासोबत लाठ्या, तलवारी, मारहाणीची, लिंचिंगची दृष्य, बाबरी मशिदीचा विध्वंस अशा हिंसक प्रतिमा वापरल्या जातात. या गाण्यांचा आशय समजून घेतला तर लक्षात येते की, ही गाणी लोकांच्या इच्छा, आकांक्षा, काळजी, भीती, असुरक्षितता, अविश्वास या भावनांना थेट हात घालतात. यामुळे प्रेक्षक/ श्रोत्यांमध्ये हिंसेची भावना रुजवणे अधिक सोपे होऊन जाते. एका प्रकारे त्यातून हिंसेचे सामान्यीकरण होते.

सध्या जगभरात आणि विशेषतः पश्चिमेतील देशांमध्ये उजव्या आणि अतिउजव्या विचारसरणीच्या राजकीय पक्षांना राजकीय अधिष्ठान लाभले आहे. नवनाझीवादाने पुन्हा डोके वर काढले असून आपल्या विचारधारेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या विचारसरणीचे राज्यकर्ते आता संगीताचा वापर करत आहेत. फ्रान्समध्ये ‘कॉल ऑफ टेरर’ आणि इटलीत ‘हॉट शॉवर’ या दोन कॉन्सर्ट्सचे या वर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात आयोजन करण्यात आले होते. या कॉन्सर्ट्समधील गाणी श्वेतवर्णीय वंशश्रेष्ठत्ववाद, वांशिक राष्ट्रवाद, मुस्लीम द्वेष इत्यादी विषयांवर आधारलेली असतात. रॉबर्ट फुटरेल, पीट सिमी आणि सायमन गॅचोक (2006) या अभ्यासकांच्या मते ‘संगीत हे राग, द्वेष, किंवा क्षोभ व्यक्त करण्याचे साधन आहे. इतकेच नव्हे तर संगीत हे अभिमान, अहंकार, प्रतिष्ठा आणि सुख या भावनांनी ओतप्रोत असते आणि लोकांमध्ये सामूहिकतेचे भान जोपासून विचाराशी बांधिलकी जपण्याची क्षमता त्यात असते.' अलीकडच्या काळात याच धर्तीवर भारतातही ‘हिंदू-पॉप’चा उदय झाला आहे. प्रस्तुत लेखात भारतातील हिंदू-पॉपच्या उदयाची पार्श्वभूमी, कारणमीमांसा, आशय, सादरीकरण, त्याला मिळालेले राजकीय पाठबळ आणि त्याच्या उमटणाऱ्या सामाजिक-राजकीय पडसादांची चर्चा केली आहे.

गेल्या काही वर्षांत रामनवमीच्या दिवशी धार्मिक दंगली घडत आहेत असे दिसते. महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, बिहार, कर्नाटक या राज्यांमध्ये अशा धार्मिक दंगली उसळल्या. रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या मिरवणुकांदरम्यान असे प्रकार घडले. या मिरवणुकांमध्ये एक पॅटर्न दिसतो. कर्कश आवाजात चिथावणीखोर गाणी वाजवीत, प्रक्षोभक घोषणा देत, हुल्लडबाजी करत हत्यारबंद आक्रमक लोकांचा जमाव मशिदी किंवा मुस्लिमबहुल वस्तीतून जातो. काही ठिकाणी या मिरवणुका ऐन नमाजाच्या वेळीच तिथे पोचतात. स्थानिक मुस्लीम समुदायातील लोकांशी त्यांची बाचाबाची होते आणि लगेचच त्याचे रूपांतर दंगलीत होते. धार्मिक दंगली हे सामाजिक ध्रुवीकरण घडवून आणण्यासाठीचा सर्वात प्रभावी मार्ग होय. ध्रुवीकरणामुळे मतांचेही गणित सोपे होते. अशा दंगली भारताला नवीन नाहीत.. परंतु तसे असले तरीही अलीकडच्या काळात या हिंदू-मुस्लीम संघर्षात अशी प्रक्षोभक गाणी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. समाजात धार्मिक तेढ निर्माण करून ती सतत तेवत ठेवण्याची घातक क्षमता या संगीतात आहे.

या गाण्यांचे आशय गेल्या दशकातील महत्त्वाच्या राजकीय घटनांवर आधारित असतात, त्यांत मुस्लीमांप्रती प्रचंड द्वेष असतो. मुघल राज्यकर्त्यांनी उध्वस्त केलेली हिंदू मंदिरे, राम मंदिर, अनुच्छेद 370, लव्ह जिहाद, पाकिस्तान, पुलवामा हल्ला, सर्जिकल स्ट्राईक, नागरिकत्व कायदा इत्यादी विषय असतात. साधारण 2010 पासून उदयास आलेल्या गाण्यांच्या या प्रकाराला हिंदू-पॉप असे म्हटले जाते. किंवा 'भगवे संगीत' किंवा 'हिंदूवादी संगीत' असेही म्हटले जाते. ही गाणी अगदी उघडपणे राजकीय आहेत.

तर्कमीमांसा

हिंदू-पॉप ही एक राजकीय कृती आहे. या कृतीला हिंदुत्ववादी विचारधारेचे ठाम अधिष्ठान आहे. हिंदुत्ववादी विचारधारेचे अनेक पैलू आहेत. त्यात सांस्कृतिक, वांशिक आणि प्रादेशिक राष्ट्रवाद हा एक प्रमुख पैलू आहे. भारताचे हिंदू राष्ट्र व्हावे, हे त्यांचे उद्दिष्ट सर्वश्रुत आहेच. यासाठी सकल हिंदू समाजाचे संघटन त्यांना करायचे आहे. हिंदू राष्ट्र-राज्य घडवताना खरेतर इथली विविधता त्यांना अडचणीची ठरते. भारतासारख्या विशाल, खंडप्राय, विविधतेने नटलेल्या आणि जातीयतेने ग्रासलेल्या देशात असे संघटन बांधणे व टिकवणे अतिशय कठीण बाब आहे. असे संघटन टिकवण्यासाठी बिगर-हिंदूंना, प्रामुख्याने मुसलमानांना टार्गेट केले जाते. मुसलमानांच्या हेटाळणीत सहभागी होण्यात आणि त्यांचा अपमान करण्यात त्यांना एक प्रकारचे सुख वाटते. स्लावोज झिझेकच्या मते, ‘सुख ही संकल्पना राजकारणात आत्यंतिक महत्त्वाची आहे. आपले सुख कुणीतरी आपल्यापासून हिरावून घेतले आहे अशी भावना जेव्हा मूळ धरते तेव्हा हे हिरावलेले सुख परत मिळविण्यासाठीचा विचार आणि कृती महत्त्वाची ठरते.’

भारतातील उजव्या राजकीय शक्तींनी कायमच मुस्लीम लोकसंख्येचा बागुलबुवा, मुस्लीम तुष्टीकरण हे विषय लावून धरलेले आहेत. यातून निर्माण होतो तो 'पॅरानॉईया' (paranoia). आपल्यावर सतत अन्याय, अत्याचार होतोय असा भ्रम आणि भय बाळगणारा एक मोठा वर्ग आज समाजात वावरत आहे. हे सगळे काँग्रेसच्या मवाळ आणि धर्मनिरपेक्षतेच्या धोरणांमुळे घडले असल्याचे चित्र आतापावेतो यशस्वीरीत्या उभे केले गेले आहे. उदाहरणार्थ हे गाणे पहा, 'कुछ लोगों की तो साज़िश है, हम बच्चे खूब बनाएंगे. जब संख्या हुई हमसे ज़्यादा, फिर अपनी बात मनाएंगे.’

हिंदू-पॉप या हिरावलेल्या सुखाची अनुभूती देते. या गाण्यांमधला कल्पनाविलास (फँटसी) तथाकथित दुःखी हिंदू मनाला सुखावणारा आहे. राम मंदिराचे निर्माण आणि कलम 370ची हद्दपारी सत्यात उतरवून तथाकथित व्यथित हिंदू मन सावरण्याचे प्रयत्न झाले आहेत. आता संपूर्ण हिंदूकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू असताना, एच पॉप सुखाच्या लाटेवर स्वार होऊन अधिक द्वेषपूर्ण ‘कंटेंट’ची निर्मिती होताना दिसते.

हिंदू-पॉप जरी सद्यकालीन वाटत असले तरी त्याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात मुंबई, नागपूर आणि दख्खन प्रांतात हिंदू-मुस्लीम संघर्षाचे अनेक प्रसंग घडले आहेत. सरसंघचालक केशव बळीराम हेडगेवारांच्या जीवनचरित्रात एक संदर्भ सापडतो. ‘मुसलमानांच्या भीतीमुळे हिंदू मशिदींसमोर ढोल वाजवण्यासाठी कचरायचे. अशा वेळी हेडगेवार स्वतः ढोल वाजवून हिंदूंच्या सुप्त पौरुषाला उद्धिपित करीत.’ (देशपांडे आणि रामस्वामी, 1981 : 71). याच मुद्द्यावरून हेडगेवार आणि मुंजेंनी हिंदू महासभेच्या नागपूर शाखेची स्थापना केली. आज भारतात हिंदू-पॉपच्या निमित्ताने याच इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसते आहे.

हिंदू-पॉपच्या गाण्यांमध्ये उघडपणे हिंसेचा पुरस्कार केला जातो. गाण्यांमध्ये मानहानीकारक मजकुरासोबत लाठ्या, तलवारी, मारहाणीची, लिंचिंगची दृष्य, बाबरी मशिदीचा विध्वंस अशा हिंसक प्रतिमा वापरल्या जातात. या गाण्यांचा आशय समजून घेतला तर लक्षात येते की, ही गाणी लोकांच्या इच्छा, आकांक्षा, काळजी, भीती, असुरक्षितता, अविश्वास या भावनांना थेट हात घालतात. यामुळे प्रेक्षक/ श्रोत्यांमध्ये हिंसेची भावना रुजवणे अधिक सोपे होऊन जाते. एका प्रकारे त्यातून हिंसेचे सामान्यीकरण होते.

1992 मध्ये बाबरी पाडली तेव्हा रथयात्रेदरम्यान 'मंदिर वहीं बनाऐंगे'च्या घोषणा होत होत्या. 2024 मध्ये राम मंदिराचे स्वप्न साकार झालेले असताना आता घोषणा बदलल्या आहेत. यावर्षी रामनवमीच्या मिरवणुकांमध्ये ‘अगर छुआ मंदीर तो तुझे तेरी औकात दिखा देंगे’ हे गाणे मोठ्या प्रमाणात प्रचारात आले. ही गाणी प्रामुख्याने मशिदींसमोर लावली जात होती, असे अनेक यूट्यूब व्हिडीओजमधून दिसते आहे. तसेच प्रेम कृष्णवंशीचे ‘मुल्लों जाओ पाकिस्तान' किंवा संदीप चतुर्वेदीच्या 'टोपीवाला भी सर झुकाकर बोलेगा जय श्री राम' ही गाणीही हिंदी पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर ऐकली जातात.

माध्यमे, साधने आणि सादरीकरण

पॉप-कल्चर हे रोजच्या दैनंदिन आयुष्याचा भाग होऊ शकते. ते सहज उपलब्ध होऊ शकते आणि स्वस्त व अमर्याद इंटरनेटच्या सोयीमुळे त्याचा प्रसार अधिक प्रभावीपणे होतो. हिंदू-पॉप याचमुळे लोकप्रिय ठरते आहे. यात रोजच्या जीवनात बोलली जाणारी भाषा वापरली जाते, त्यामुळे लोकांच्या मनातल्या मान्य प्रतिमा, रचिते, गंड इत्यादींना पुष्टी मिळते. हिंदू-पॉपच्या प्रसिद्धीत डिजिटल इंडियाचा मोठा वाटा आहे. स्मार्टफोन घराघरात पोहोचला आहे. व्हॉट्सअ‍ॅप संपर्क व संवादाचे माध्यम झाले आहे. युट्युब हा मनोरंजनाचा एक प्रमुख स्रोत आहे. आज ही दोन्ही माध्यमे एकमेकांची सहजीवी बनली आहेत. युट्यूबवरील कंटेंट व्हॉट्अ‍ॅपद्वारे प्रसारित होतो. हिंदू-पॉपच्या प्रसाराचे मूळ यातच दडलेले आहे. समाजमाध्यमांद्वारे हिंदू पॉप आता दृकश्राव्य अवतारात प्रेक्षकांना उपलब्ध झाले आहे. हिंदू-पॉपमध्ये पारंपरिक आणि डीजे संगीताची सरमिसळ दिसते. यामुळे गाण्यांना ‘रिच’ (reach) आहे. अक्षरशः संमोहित करणारा इलेक्ट्रॉनिक स्वरकंपा, थिरकणारा ताल आणि सतत येणारे उत्तेजित करणारे शब्द यांमुळे उन्मादी वातावरण निर्माण होते. हल्ली संगीत निर्मितीची साधनेसुद्धा विकसित झाली आहेत. गाणे लिहून झाले की, पुढील निर्मिती प्रक्रिया काही तासांत पूर्ण होऊन ते दृकश्राव्य स्वरूपात लगेचच प्रसिद्ध होऊ शकते. इथे कुठलीही सेन्सॉरशिप नाही. या सगळ्यामुळे हिंदू-पॉपचे वारे अधिक जोमाने फोफावते आहे.

हिंदू-पॉप सादर करणारे बहुतांशी कलाकार भजन, सत्संग किंवा ऑर्केस्ट्रात काम करतात. त्यामुळे हिंदू-पॉपचे आता रंगमंचीय सादरीकरण होते. लक्ष्मी दुबे, कवी सिंग, कमल आग्नेय यांचे लाईव्ह कार्यक्रम उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशातल्या छोट्या शहरांमध्ये व गावांमध्ये होत असतात. इतकेच नव्हे तर आता हिंदू सणांदरम्यान, मिरवणुका किंवा प्रचारसभांमध्येही ही गाणी नित्यनियमाने वाजवली जातात. एकंदरीत हिंदू-पॉपचा विषय, आशय आणि सादरीकरण हे कुठल्याही विवेकी, तर्कनिष्ठ विचाराला कडवे आव्हान बनून उभे आहे.

राजकीय भान आणि राजाश्रय

कुठल्याही कलाप्रकारला किवा कलाकाराला, त्याच्या विकासाच्या दृष्टीने लोकाश्रयाप्रमाणेच राजाश्रय मिळणे उपयोगाचे असते. हिंदू-पॉपचा उदय आणि विकास हा भाजप आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांसाठी गरजेचा आहे. त्यामुळे साहजिकच हिंदू-पॉपचे सादरकर्ते भाजप नेतृत्वाशी जवळीक साधून आहेत. संदीप आचार्य हा कलाकार हिंदू युवा वाहिनीचा सदस्य आहे. उत्तर प्रदेशात युवा वाहिनीचे हजारो सदस्य आहेत. ही संस्था योगी आदित्यनाथांच्या जवळची मानली जाते. संदीपने बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांसाठी अनेकदा कार्यक्रम केले आहेत. कलेची प्रेरणा आणि सादरीकरण हे कलाकाराच्या विचारविश्वातून येतात. हे विचारविश्व कसे घडते, याचा उलगडा करण्याचा प्रयत्न कुणाल पुरोहितांनी ‘एच-पॉप द सीक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदू पॉप स्टार्स’ (2023) या पुस्तकातून केला आहे. 

पुस्तकाच्या समारोपात पुरोहित 2024 च्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करतात. पुस्तकात नमूद केलेल्या तीन कलाकारांपैकी कवी सिंग आणि कमल आग्नेय हे दोघे भाजपच्या गोटात सामील होऊन आपले भविष्य साकारू पाहत आहेत. कवी सिंगने तिचे नवे गाणे 'फिर से कमल खिलाना है, घर घर भगवा लेहराना है, 24 मे तुमको राम कसम, फिर मोदी को लाना हैं' युट्युबवर लाँच केले आहे. कमल आग्नेयदेखील 2023 मध्ये भाजपच्या खासदारांनी आयोजित केलेल्या 'तिरंगा यात्रेत' सामील झाला होता. तो 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासंदर्भात मोठ्या जबाबदारीसाठी धडपडतोय. सध्या कमल उत्तरप्रदेश व मध्यप्रदेशमध्ये भाजपच्या उमेदवारांसाठी प्रचार करतोय. राम मंदिराचे निर्माण झाल्यानंतर कृतज्ञभावनेतून तयार झालेले कन्हैय्या मित्तलचे 'जो राम को लाए हैं, हम उनको लाएंगे' हे गाणे सध्या धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते.

धर्माचे राजकारण करू पाहणारे उमेदवार आपल्या मनातले द्वेषकारक विचार अशा पॉपस्टार्समार्फत बोलून दाखवतात. त्यामुळे आजघडीला हिंदू-पॉपस्टार्स प्रचारयंत्रणेचे अविभाज्य घटक बनले आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

समारोप

भाजपचे सध्याचे राजकारण दैनंदिन आयुष्यातील घटना आणि स्थानिक ‘नॅरेटिव्ह’वर भर देणारे आहे. संसदेच्या सत्रादरम्यान दक्षिण दिल्लीचे खासदार रमेश बिधूरी यांनी बसप खासदार दानिश अलींसाठी वापरलेले अपशब्द, त्यादरम्यान पक्षश्रेष्ठीकडून मिळालेले अभय यामुळे मुस्लिमविरोधी शिवीगाळ 'नॉर्मलाईझ' होते आहे. लोकसभा निवडणुकांच्या प्रचारसभांमध्ये पंतप्रधान सातत्याने मुस्लीमविरोधी विधाने करत आहेत. त्यामुळे आता अशा द्वेषपूर्ण गाण्यांचे पीक उत्तरोत्तर वाढण्याची भीती आहे. कट्टर हिंदुत्ववादी विचारविश्व, त्यातील चिन्हे आणि प्रतीके, आणि त्यांच्या प्रसाराला पूरक आणि अनुकुल अशी राजकीय आणि तांत्रिक परीघातील संरचनात्मक व्यवस्था, हिंदुत्वाच्या या ‘पॉप’अवताराला कायम चालना देत राहतील. मते मिळविण्यासाठी मने जिंकावी लागतात किंवा माथी भडकवावी लागतात. हिंदू-पॉप सत्तेतील हिंदुत्ववाद्यांना दोन्ही पातळ्यांवर उपकारक आहे.

संगीताने मानवी समाजाला कायम आशा व प्रेरणा दिली आहे, लोकांचे मनोरंजन केले आहे. हिंदू-पॉपच्या निमित्ताने मात्र संगीतकलेचा आधार घेऊन हिंसेचे समर्थन केले जात आहे, द्वेष पसरवला जात आहे. त्यामुळेच त्याचे सावध निरीक्षण करत राहणे आवश्यक आहे.

-  डॉ. अजिंक्य गायकवाड
gaikwadajinkya88@gmail.com


हेही वाचा : 

 

Tags: hindu muslim hindu pop music and politics bjp ram mandir Load More Tags

Add Comment