महाराष्ट्राच्या पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीतील जेष्ठ विचारवंत, सत्याग्रहाच्या मार्गाने आंदोलन करणारे कष्टकऱ्यांचे नेते, माजी सहकारमंत्री आणि रयत शिक्षण संस्थेचे माजी कार्याध्यक्ष प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांचे वयाच्या 93 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या व्यक्तित्वाबद्दल आणि कर्तृत्वाबद्दल संबंध महाराष्ट्राला अभिमान आणि आदर आहे. त्यांच्या जाण्याने पुरोगामी चळवळीत एक पोकळी तयार झाली आहे.
महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक चळवळीच्या वाटचालीत प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांचे योगदान खूप महत्त्वपूर्ण राहिले आहे. विद्यार्थिदशेपासून ते शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचे व्यक्तिमत्त्व लोकाभिमुख होते. त्यांनी सर्वहारांच्या कल्याणासाठी घेतलेली खंबीर, गंभीर आणि कणखर भूमिका उभ्या महाराष्ट्राच्या मनातून कधीही पुसली जाणार नाही. एन.डी. हे एक वादळ होते. महाराष्ट्राच्या भल्यासाठी, कष्टकऱ्यांच्या कल्याणासाठी तळमळीने, समर्पित भावनेने आणि त्यागी वृत्तीने लढणारे एक नेतृत्व होते. त्यांच्या भूमिका, निष्ठा, श्रध्दा आणि वृत्ती-प्रवृत्ती तितक्याच ठाम, ठाशीव अन् पारदर्शी होत्या. 1950 नंतरच्या महाराष्ट्राच्या इतिहासातील त्यांचे एकूण कार्य पाहता, त्यांना 'महाराष्ट्राचा पोलादपुरुष' म्हटले तर फारसे वावगे ठरणार नाही.
ज्या कुटुंबात शिक्षणाचा गंध नाही, अशा शेतकरी कुटुंबात प्रा.एन.डी.पाटील (नारायण ज्ञानदेव पाटील) यांचा जन्म 15 जुलै 1929 रोजी सांगली जिल्ह्यातील ढवळी (आष्टा) येथे झाला. ज्या कालखंडात त्यांचा जन्म झाला, तो काळ सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक आणि स्वातंत्र्यविषयक चळवळीने भारलेला होता. महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, महाराजा सयाजीराव गायकवाड, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक चळवळीने संपूर्ण महाराष्ट्र जागा झालेला होता. अशा काळात एन.डी.पाटील यांचे बालपण गेले.
प्रा.एन.डी.पाटील यांचे शालेय शिक्षण प्रतिकूल परिस्थितीत झाले. त्यांची शाळा मारूतीच्या मंदिरात भरत असे. याच शाळेत त्यांना परीट गुरुजी भेटले. 'बाळाचे पाय पाळण्यात दिसतात' ह्या म्हणीप्रमाणे परीट गुरुजींनी एन.डीं.ना हेरले आणि त्यांना शिक्षणाचे बाळकडू दिले. एन.डीं.च्या शिक्षणाला त्यांच्या आजोबांचा विरोध होता. त्यांचे आजोबा म्हणत, "भटा-बामणांची पोरं जिथं पास होत नाहीत, तिथं कुणब्याच्या पोराचा कुठे टिकाव लागणार?" पुढे एन. डीं.नी आजोबांचा हा दावा साफ खोटा ठरवला.
1944 मध्ये एन.डी. रयत शिक्षण संस्थेच्या आष्टा येथील विद्यालयात दाखल झाले. हायस्कूलचे शिक्षण घेत असतानाच त्यांच्यावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला. एकाच वर्षी वडील आणि भाऊ यांचा मृत्यु झाला. त्यामुळे त्यांच्या वाट्याला एकाकीपणा आला. त्या परिसरात कर्मवीर भाऊराव पाटील बहुजन समाजाच्या प्रगतीसाठी अहोरात्र झटत होते. योगायोगाने कर्मवीर अण्णांची आणि एन.डीं.च्या मातोश्रीची भेट झाली. त्यावेळी कर्मवीर अण्णा त्यांच्या मातोश्रींना म्हणाले, "नारायणची जबाबदारी मी घेतो. त्याला माझ्यासोबत नेतो. तो आष्टयाला राहून काम करील. तुमच्या डोळ्यासमोर राहील. तुम्ही चिंता करू नका." कर्मवीरांनी निवडलेली, हेरलेली पोरं आयुष्यात वाया गेली नाहीत. मग त्यात ज्ञानदेव घोलप असोत, बॅ.पी.जी.पाटील असोत की डॉ.एन.डी.पाटील असोत. कर्मवीरांनी जबाबदारी घेतलेली, वाढवलेली ही पोरं रयत शिक्षण संस्थेच्या विकासात मोठी वाटेकरी ठरली. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे एकदा कर्मवीरांना म्हणाले होते, ''मी इतके दिवस काम करतो आहे. मला कोणी साथ दिली नाही. तुम्हाला तुमच्या हयातीतच इतकी माणसं जोडता आली. याचा मला खूप आनंद होत आहे."
पुढे एन.डीं.नी आपले उच्च शिक्षण सांगली, कोल्हापूर आणि पुणे येथून पूर्ण केले. 1955 साली ते पुणे विद्यापीठातून एम.ए. (अर्थशास्त्र) झाले. तर 1962 साली याच विद्यापीठातून त्यांनी एल.एल.बी.चे शिक्षण पूर्ण केले. पुण्यात असताना त्यांच्यावर सेवादलाचे संस्कार झाले. राष्ट्रसेवादलाच्या अनेक कार्यक्रमांत, उपक्रमांत त्यांनी सहभाग घेतला. शेतकऱ्यांची आंदोलने, ठिकठिकाणी भरलेल्या त्यांच्या परिषदा त्यांनी जवळून अनुभवल्या. यातूनच त्यांची सामाजिक आणि राजकीय जाणीव प्रखर बनत गेली.
विद्यार्थीदशेत असतानाच एन.डीं.नी शेतकरी कामगार पक्षात (1948) प्रवेश केला. परंतु काही कारणास्तव ते राजकारणात सक्रीय झाले नाहीत. राजकारणाऐवजी त्यांनी काही वर्षे सातारच्या शिवाजी कॉलेजमध्ये प्राध्यापकी (1954) केली. काही वर्षे त्यांनी प्राचार्य म्हणूनही काम पाहिले. पुढे त्यांचे मन शिक्षणात काही रमले नाही. याच काळात त्यांना केशवराव जेधे, शंकरराव मोरे, दत्ता देशमुख, रामभाऊ नलावडे यांसारखे अनेक सत्यशोधक विचाराचे कार्यकर्ते भेटले. त्यांच्या सहवासात एन.डीं.ची समाजपरिवर्तनाची अन् समाजप्रबोधनाची जाणीव अधिक विकसित होत गेली.
कर्मवीर अण्णांचा एन.डीं. वर प्रचंड विश्वास होता. 1959 साली कर्मवीरांना एका गंभीर आजाराने ग्रासल्यावर, एन.डीं.नी त्यांची भेट पुणे येथील ससून हॉस्पीटलमध्ये जाऊन घेतली. चर्चा केली अन् त्याच दिवशी कर्मवीर अण्णांनी, एन.डीं.ना कसलाही पत्ता लागू न देता, त्यांची रयत शिक्षण संस्थेवर सदस्य म्हणून निवड करावी अशी सूचना केली. ही गोष्ट एन.डीं.ना धनंजयराव गाडगीळांनी सांगितली. खरेतर एन.डीं.साठी हा मोठा सन्मान होता. 1959 पासून ते 2008 पर्यंत एन.डीं.नी रयत शिक्षण संस्थेची सेवा (49 वर्षे) इमानेइतबारे केली. 1990 ते 2008 पर्यंत ते रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष होते. त्यावेळी संस्थेच्या एका ‘पै’मध्ये त्यांचे मन गुंतले नाही की गुरफटले नाही. एका ऋषीतुल्य व्यक्तित्वाप्रमाणे काम करून, त्यांनी रयत शिक्षण संस्थेची बांधणी केली. आज रयत शिक्षण संस्थेचा जो चेहरामोहरा बदलला आहे. त्यात प्रा.एन.डी. पाटील यांचे योगदान खूप मौलिक आहे. हे संस्थेला कदापि विसरता येणार नाही.
1960 ते 1982 या कालावधीत एन.डी. विधानपरिषदेचे 18 वर्षे सदस्य राहिले. या काळात त्यांनी शिक्षणासंबंधीच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली. तत्कालीन शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांनी काढलेल्या श्वेतपत्रिकेला त्यांनी कडाडून विरोध केला. (श्वेतपत्रिकेचा विषय - विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवणे) विधिमंडळात ह्या श्वेतपत्रिकेवर एन.डी. चार तास बोलले अन् म्हणाले, “तुमची ही श्वेतपत्रिका महाराष्ट्रात बेकारांची फौज तयार करेल." एन.डीं.नी अशी तोफ डागल्यावर, ती श्वेतपत्रिका कॉंग्रेस सरकारला मागे घ्यावी लागली होती. याशिवाय एन.डीं.नी शिक्षण हक्क कायदा लागू करण्यासाठी जिवाचे रान केले होते. एन.डी. महाराष्ट्राच्या भल्यासाठीच आपले रक्त आटवत होते. जे अयोग्य आहे, चुकीचे आहे, महाराष्ट्राच्या अधोगतीचे आहे. त्याला त्यांनी कधीच पाठिंबा दिला नाही आणि समर्थनही केलं नाही. एन.डी. आपली भूमिका समोरच्याला पटवून सांगत असत. परंतु आपल्या वैचारिक भूमिकेपासून ते कधीच ढळले नाहीत.
1978 साली महाराष्ट्रात शरद पवारांचे पुलोद सरकार सत्तेवर आल्यावर, एन.डीं.नी मंत्रीमंडळात यावे, अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली. यासाठी एस.एम.जोशींनी पुढाकार घेतला आणि मग एन.डी. पुलोद सरकारमध्ये सहकारमंत्री झाले. एन.डी. सहकारमंत्री असताना, त्यांनी 'कापूस एकाधिकार खरेदी योजना' आणली. ती खूप यशस्वी झाली. त्यावेळी कापसाचा हमीभाव 22 टक्क्यांनी वाढला. शिवाय चोवीस तासांच्या आत शेतकऱ्यांना कापसाचे पैसे मिळू लागले. सहकारमंत्री असताना एन.डीं.नी कायम शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे, भटक्या विमुक्तांचे, शोषितांचे अन् भूमिहीनांचे प्रश्न सोडवले. ते सभागृहाला सांगायचे, “ज्या शेतकऱ्यांचे आपण अन्न खातो, त्यांच्याशी आपण इमानदारीने राहिले पाहिजे."
एन.डीं.च्या काळात खूप गाजलेला एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे एन्रॉन प्रकल्प. एन्रॉन कंपनीची वीज मिळेल त्या दराने घेणे त्यांना मान्य नव्हते. म्हणून त्यांनी एन्रॉनविरूद्ध आवाज उठवला. कंपनीशी झालेले गैरव्यवहार त्यांनी उघडकीस आणले. शेवटी एन्रॉन प्रकल्प तत्कालीन सरकारला गुंडाळावा लागला. यात एन.डीं.चा वाटा मोठा होता. 1985 मध्ये शेका पक्षाने त्यांना कोल्हापूर मतदारसंघातून उमेदवारी दिली. तेव्हा एन.डी. पाटील यांचे, त्या मतदारसंघात नावसुद्धा नव्हतं. त्यांचं कोल्हापुरात घरदार, शेतीवाडी असे काहीच नव्हते. परंतु राजाराम कॉलेजमध्ये असताना त्यांचा कोल्हापुरशी जवळून संबंध आला होता. शिवाय परिवर्तनवादी चळवळीत काम करताना त्यांनी आपली नाळ कोल्हापुरकरांशी अधिक घट्ट जोडली होती. त्यामुळे या निवडणुकीत कोल्हापुरकरांनी आपला किंवा परका असा भेदभाव न करता एन.डीं.ना प्रचंड मतांनी निवडून दिलं होते.
एन.डीं.चा लोकसंपर्क आणि लोकसंग्रह अतिशय दांडगा होता. अनेक क्षेत्रातील लोक त्यांच्याकडे संवाद करण्यासाठी येत असत. एन.डीं.चे व्यक्तिमत्त्व करारी असले तरी ते तितकेच लोभस होते. त्यांची भाषणशैली लक्षवेधक होती. लोकांना खुर्चीला खिळवून ठेवणारी होती. विषय कोणताही असो, एन.डी.तो आकडेवारीसह, ठोस पुराव्यासह आणि सनावळीसह लोकांसमोर मांडत असत. त्यामुळे त्यांचे भाषण कधीच रटाळ झाले नाही. त्यांचा श्रोता वर्ग ग्रामीण-शहरी, साक्षर-निरक्षर अशा सर्व स्तरातला होता.
एन.डी.लिहायला बसले की, प्रचंड गंभीर व्हायचे आणि एका संशोधकांच्या मुशीत शिरून ते लिहायचे. त्यांनी लिहिलेले आत्मचरित्र (माझी संघर्षयात्रा) आणि इतर ग्रंथ आज प्रसिद्ध आहेत. एन.डी. प्रचंड वाचनवेडे होते. मराठी इतकेच त्यांचे इंग्रजी वाचनही तितकेच उत्तम, कसदार आणि दमदार असे. इंग्रजी कवी शेलेच्या कितीतरी काव्यपंक्ती त्यांच्या तोंडपाठ होत्या. वाचनाच्या जोरावरच त्यांनी आपली वक्तृत्वकला विकसित केली आणि संपूर्ण महाराष्ट्रभर भाषणे दिली. त्यांच्या वक्तृत्वामुळे शेका पक्षाला महाराष्ट्रात प्रतिष्ठा मिळाली होती. 1952च्या पहिल्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला 52 जागा मिळाल्या होत्या. एवढया जागा त्यांच्या पक्षाला परत कधीच मिळाल्या नाहीत. आज केवळ रायगड जिल्हयामध्ये त्यांचा पक्ष टिकून आहे. अन्यत्र महाराष्ट्रात मात्र त्यांचा पक्ष मागे पडला आहे.
एन.डीं.नी अनेक लढे उभे केले अन् काही प्रमाणात ते यशस्वी केले. लढाई संयुक्त महाराष्ट्राची असो, नामांतराची असो, सीमाप्रश्नांची असो, शनीशिंगणापुरची असो, एक गाव एक पाणवठ्याची असो, सत्याग्रहाची असो, शेतकऱ्यांच्या सेझची असो, नर्मदा आंदोलनाची असो, प्रकल्पग्रस्तांची असो, पुनर्वसनाची असो, अंधश्रध्दा निर्मुलनाची असो, जातपंचायतीची असो की टोलबंदीची असो एन.डी. सर्वत्र असत आणि अग्रभागी असत. वेळ पडली तर तुरूंगात जायलाही ते मागेपुढे पाहत नसत.
एन.डी. बदलत्या महाराष्ट्राचे साक्षीदार होते. स्वातंत्र्याचा लढा, संयुक्त महाराष्ट्राचा लढा, सहकारी संस्थांचा विकास, शैक्षणिक आणि औद्योगिक क्रांतीचा विकास, राजकारणातील घराणेशाही आणि जागतिकीकरणाने गोरगरिबांच्या स्वप्नांची केलेली राखरांगोळी त्यांनी उघडया डोळ्यांनी पाहिली. एन.डीं.नी 23 वर्षे राजकारण केले, पण भष्टाचाराचा एकही आरोप त्यांच्यावर झाला नाही. सार्वत्रिक जीवनाइतकेच त्यांचे वैयक्तिक आयुष्यही स्वच्छ होते. 1976 पर्यंत त्यांचे आणि त्यांच्या पत्नीचे साधे बँक खाते नव्हते. आजच्या राजकारण्यांची बँक खाती तपासली तर त्याची यादी लांबलचक असेल.
एन.डीं.नी ज्या चळवळीत आपले आयुष्य घालवले, त्या चळवळी आज कमकुवत आणि वाईट स्थितीत आहेत. याचे दुःख त्यांना जरूर वाटायचे, परंतु ते निराश व्हायचे नाहीत उलट ते अंतर्मुख व्हायचे. 'एन.डीं. च्या दृष्टीने अंतर्मुख होणे म्हणजे जबाबदारी ओळखणे आणि स्वीकारणे होय.' एन.डीं.नी अनेक चळवळींचे नेतृत्व केले पण, चळवळीच्या स्वायत्तेला त्यांनी कधी नख लागू दिले नाही. सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून त्या चळवळीचे किती महत्त्व आहे, या हेतुनेच ते चळवळीशी जोडले गेले.
एन.डी. आचार आणि विचारात एक आणि नेक होते. ते निरीश्वरवादी होते. त्यांचा कुठल्याही अदृश्य शक्तीवर अजिबात विश्वास नव्हता. त्यामुळे त्यांनी मंत्रीपद स्वीकारल्यावर कुठल्याही धार्मिक कार्यक्रमांचे भूमीपूजन, त्यांच्या कार्यकाळात कधीही केले नाही. लोकांच्या धर्मश्रध्दा त्यांनी जरूर मान्य केल्या परंतु वैयक्तिक जीवनात त्यांनी स्वतःच्या धारणा शिस्तबद्धपणे अंमलात आणल्या. त्यांनी कौटुंबिक जीवनात कधीही, कुठेही धार्मिक कर्मकांड केले नाही. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे काम करताना, त्यांनी लोकांना कायम जागरूक बनवले.
एन.डी. विचाराने अन् कृतीने पुरोगामी, प्रबोधनवादी, मार्क्सवादी आणि लेनिनवादी होते. ते म्हणायचे की, वर्गलढयाबरोबरच जातिअंताचा लढा यशस्वी झाल्याशिवाय समग्र समाजात परिवर्तन घडणार नाही. एन.डीं.नी सर्वसामान्यांचे प्रश्न आपल्या लढ्याचे विषय बनवले आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आपले आयुष्य समर्पित केले. ते चळवळीतल्या कार्यकर्त्यांना कायम म्हणायचे, “प्रत्येक आंदोलनात, लढयात यश येतंच असं नाही. पण काम आणि लढा थांबवायचा नाही." एन.डीं.नी हे सूत्र आयुष्यभर जपले होते. त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्याकडून डी.लिट. ही पदवी प्रदान केली होती.
एन.डीं.च्या 93 वर्षांच्या समग्र जीवनप्रवासात त्यांची पत्नी सरोज (माई) पाटील यांनी, मोठया धैर्याने त्यांना साथ दिली. एन.डीं.च्या वैयक्तिक, सार्वजनिक जीवनात माईंनी आपल्या माहेरचा दबदबा कधीही वाढू दिला नाही. शिक्षिकेची नोकरी सांभाळत, कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्या पेलत त्यांनी एन.डीं.बरोबर ‘नांदा सौख्यभरे’ असा सुखाचा संसार केला. माईंच्या आयुष्यात आज एन.डी. नाहीत. पण एन.डीं.चा धगधगता, लढवय्या, संघर्षमय प्रवास त्यांच्या सोबतीला कायम असेल. या शोकसागरातून सावरण्याचे बळ त्यांना प्राप्त होवो, अशी प्रार्थना करतो. आणि उदयाच्या बदलत्या महाराष्ट्राच्या उभारणीत एन.डीं.च्या विचारांचे प्रतिबिंब सातत्याने उमटत राहील, अशा अपेक्षेसह इथेच थांबतो. महाराष्ट्राच्या पुरोगामी लढवय्याला कृतज्ञपूर्वक अभिवादन!
संदर्भ
'बदलता महाराष्ट्र' (2003,पहिली आवृत्ती )
संपा. भास्कर भोळे, किशोर बेडकिहाळ
(प्रकाशक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमी, सातारा)
- आबासाहेब सरवदे
sarvadeaba@gmail.com
(लेखक, वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजमध्ये अध्यापनाचे काम करतात.)
Tags: शेकाप परिवर्तनवादी चळवळ स्मृतीलेख पुरोगामी Load More Tags
Add Comment