शंभर वर्षांहून अधिक काळापासून ज्ञानदानाचं अविरत कार्य करणाऱ्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज एकशे चौतिसावी जयंती. कर्मवीरांच्या जयंतिदिनी त्यांच्या विचारांचं आणि कार्याचं स्मरण आणि चिंतन होणं आवश्यक आहे. दोन धोतरं, दोन पैरणी, एक घोंगडी आणि एक काठी अशा कवडीमोल संपत्तीच्या जोरावर कर्मवीर अण्णांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना आणि बांधणी केली. देशातील सर्वात मोठी संस्था म्हणून आज तिचा नावलौकिक आहे.
कर्मवीर अण्णांनी स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवलं आणि त्याचं अवघं आयुष्य समाजासाठी वाहून घेतलं. तळागाळातल्या लोकांच्या हातांत त्यांनी ज्ञानाच्या चाव्या दिल्या. भारताचे माजी राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांनी त्यांची तुलना तुकोबांशी केली होती.
स्वातंत्र्यपूर्व कोल्हापूर संस्थानातल्या कुंभोज या गावी 22 सप्टेंबर 1887 रोजी भाऊरावांचा जन्म झाला. त्यांचं पाळण्यातलं नाव भाऊ. लोक त्यांना आदरानं भाऊराव म्हणायचे. भाऊरावांना तीन भाऊ होते आणि दोन बहिणी होत्या. त्यांचे वडील पायगोंडा पाटील महसूल खात्यात कारकून होते. वयाच्या आठव्या वर्षी भाऊराव दहिवडीच्या मराठी शाळेत इयत्ता पहिलीत दाखल झाले. वडलांच्या बदलीमुळे त्यांना विटा, इस्लामपूर अशा तालुक्यांच्या ठिकाणी फिरावं लागलं. पुढे इंग्रजी शिक्षणासाठी 1902मध्ये त्यांच्या मामांनी त्यांना कोल्हापूरला आणलं. कोल्हापुरात ते दिगंबर जैन वसतिगृहात वास्तव्याला होते. कोल्हापूरचं जैन वसतिगृह कर्मवीरांच्या आयुष्यातलं महत्त्वाचं वळण आहे. रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेची बीजं या वसतिगृहात घडलेल्या घडामोडींमध्ये दडलेली आहेत.
कर्मवीर अण्णा धर्मानं जैन होते, पण ते जैन धर्मानुसार आचरण करायचे नाहीत. जेवणापूर्वी दाढी करावी असा नियम जैन वसतिगृहात होता. मात्र वसतिगृहाचे व्यवस्थापक अण्णासाहेब लठ्ठे कोणत्याही वेळीदाढी करत असत. हे भाऊरावांना खटकायचं. एकदा भाऊरावांनी जेवणानंतर दाढी केली म्हणून लठ्ठेंनी त्यांना दंड केला, पण भाऊरावांनी तो भरायला स्पष्टपणे नकार दिला. त्यानंतर कोल्हापुरात अस्पृश्य मुलांसाठी स्थापन केलेल्या मिस क्लार्क वसतिगृहाच्या उद्घाटनास (1908) भाऊराव हजर राहिले म्हणून लठ्ठेंनी त्यांना वसतिगृहात येण्यापूर्वी अंघोळ करायला सांगितली. पण भाऊरावांनी या गोष्टीलाही ठाम नकार दिला. भाऊरावांच्या आयुष्यातल्या या दोन घटना त्यांच्यातल्या थोर समाजसुधारकाची ओळख देऊन जातात.
कर्मवीरांच्या आयुष्यात घडलेलं डांबर प्रकरणही (1914) त्यांच्यासाठी प्रचंड वेदनादायी होतं. खोटे आरोप करून, कटकारस्थान रचून त्यांना त्यात गोवण्यात आलं. यातल्या खोट्या आरोपांमुळे ते आत्महत्येस प्रवृत्तही झाले. सुदैवानं ते त्यातून बचावले.
त्यांचे आजोबा जिनगोंडा पाटील धाडसी आणि बंडखोर होते. कर्मवीर अण्णाही लहानपणापासूनच धीट, धाडसी, नीडर आणि बंडखोर होते. भाऊराव लोकांना सांगत, "माझ्या मानसिक घडणीस, लौकिकास व यशास माझ्या पूर्वजांकडून मिळालेल्या दोन गुणांचा वारसा कारणीभूत आहे. पहिला गुण म्हणजे संन्यस्त, निरिच्छ वृत्ती आणि दुसरा बंडखोर वृत्ती.” या दोन गुणांच्या जोरावरच कर्मवीर थोर पदाला पोहोचले. भाऊराव आपल्या विद्यार्थ्यांना म्हणत, "डोळ्यांदेखत अन्याय दिसत असताना त्यास अन्याय म्हणत नाही व त्याचा प्रतिकार करत नाही, तो माझा विद्यार्थी नाही.'' विद्यार्थी कसा असला पाहिजे याचा वस्तुपाठच कर्मवीरांनी घालून दिला होता.
1909मध्ये भाऊरावांनी कोल्हापूर सोडलं. त्यानंतर पुढच्याच वर्षी त्यांनी दूधगाव इथं दूधगाव विद्यार्थी आश्रमाची स्थापना केली. त्यानंतर 1912मध्ये भाऊरावांचा विवाह लक्ष्मीबाई यांच्याशी झाला. लग्नानंतर भाऊरावांनी ओगले, किर्लोस्कर, कूपर या कारखानदारांकडे नोकरी केली. पण पुढे काही कारणास्तव त्यांनी ती सोडली. त्यानंतर साताऱ्यात त्यांनी शिकवणीवर्ग सुरू केले. त्यातूनच पुढे वसतिगृहाची संकल्पना मूळ धरू लागली. भाऊरावांनी काले इथं पहिलं वसतिगृह सुरू केलं आणि पुढे 4 ऑक्टोबर 1919 रोजी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. 1924मध्ये संस्थेचं कार्यालय सातारा इथं स्थलांतरित केलं.
साताऱ्यातही त्यांच्या संस्थेला प्रतिकूलतेचा सामना करावा लागला, पण भाऊराव डगमगले नाहीत. कारण रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज, ज्ञानाची फुलं स्त्रियांच्या हाती ठेवणारा सत्यशोधकी जोतिबा आणि कवड्यांची माळ घालणारा शाहूराजा ही भाऊरावांची स्फूर्तिस्थानं होती. (लोकांचा राजा म्हणून ज्याला वावरायचं असतं त्यानं आपलं आयुष्य कवडीमोल समजून जगायचं असतं, म्हणून शाहूराजा कवड्यांची माळ घालत असे.)
सातारच्या शाहू महाराजांची पत्नी सगुणाबाई यांचा वाडा धनिणीची बाग म्हणून प्रसिद्ध आहे. भाऊरावांनी ही बाग 575 रुपये खंडानं वसतिगृहासाठी घेतली आणि याच बागेत वसतिगृह सुरू केलं. या वसतिगृहात अठरापगड जातीतल्या मुलांना प्रवेश दिला. एकाच चुलीवर शिजवलेलं अन्न त्यांनी अठरापगड जातींतल्या पोरांना एकाच पंगतीला बसवून खायला घातलं. वसतिगृहातल्या पोरांवर भाऊरावांची खूप माया होती. ते वसतिगृहातच राहायचे.
वसतिगृहातल्या मुलांचं जेवण व्यवस्थित आहे की नाही, मुलं अभ्यास करतात की नाही याकडे भाऊरावांचं जातीनं लक्ष होतं. भाऊराव मध्यरात्री उठायचे आणि झोपलेल्या मुलांमधून कंदील घेऊन फिरायचे. कुणाच्या अंगावरचं पांघरूण बाजूला पडलं असेल तर ते अंगावर टाकायचे. काही मुलं दिवा तसाच ठेवून अभ्यास करता-करता झोपायची. अशा झोपी गेलेल्या मुलांच्या उशाचा दिवा विझवून तो बाजूला ठेवायचे. वसतिगृहातल्या काही मुलांना आई नव्हती, काही मुलांना वडील नव्हते. अशा आईवडील नसलेल्या मुलांवर कर्मवीर पतिपत्नींनी खूप माया केली. गोरगरिबांच्या मुलांना शिकता यावं म्हणून त्यांनी 'कमवा आणि शिका' योजना सुरू केली. भाऊरावांनी ज्ञानाच्या माध्यमातून माणसाला शब्दांशी जोडलं, श्रमाशी जोडलं.
भाऊराव करारी बाण्याचे होते. त्यांच्या निष्ठा तावून सुलाखून निघालेल्या होत्या. 1924च्या सप्टेंबरमध्ये दिल्लीत हिंदू-मुस्लीम दंगली झाल्या. त्याच्या निषेधार्थ महात्मा गांधीनी 21 दिवसाचं उपोषण केलं. त्याच महिन्यात भाऊरावांनी खानबहादूर कूपरशी संबंध तोडले आणि प्रतिज्ञा केली, 'माझे वसतिगृह छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने काढीन आणि त्या वसतिगृहात माझ्या दाढीतील केसाइतकी मुले होईपर्यंत दाढी काढणार नाही व पायात वहाणा घालणार नाही.'
नेर्ल्याचं हायस्कूल (कराड) आणि शेव्हरलेट गाडी ही त्यांच्या त्यागाची जिवंत प्रतीकं आहेत. नेर्लेकरांनी भाऊरावांचा विरोध डावलून तिथल्या हायस्कूलला त्यांचं नाव दिलं. हे त्यांना पटलं नाही म्हणून भाऊरावांनी कुडीत जीव असेपर्यंत तिथं पाऊल ठेवलं नाही. माजी विद्यार्थ्यांनी भाऊरावांना शेव्हरलेट कंपनीची एक गाडी भेट दिली होती, पण गाडीचा खर्च (डिझेलपासून ड्रायव्हरपर्यंत) माजी विद्यार्थ्यांनी कबूल करूनही नंतर दिला नाही म्हणून भाऊरावांनी त्या गाडीचा त्याग केला आणि जनता गाडी पसंत केली. त्यांची त्यागनिष्ठा अशी सर्वार्थानं निराळी, आदर्श आणि अनुकरणीय आहे.
30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधींची हत्या झाली. त्यानंतर 12 फेब्रुवारी 1948 रोजी भाऊरावांनी साताऱ्यातल्या गांधी मैदानात सभा घेतली. या सभेत गांधींना श्रद्धांजली अर्पण करताना, महाराष्ट्रात गांधींच्या स्मरणार्थ 101 माध्यमिक शाळा सुरू करण्याची आणि महात्मा गांधी ग्रामीण विद्यापीठाची घोषणा त्यांनी केली. याच सभेत त्यांनी मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांच्यावर सडकून टीका केली. त्या वेळी मुख्यमंत्री खेरांनी आकसापोटी संस्थेचं अनुदान बंद केलं पण भाऊराव घाबरले नाहीत. ते मुख्यमंत्र्यांना तडक म्हणाले, 'तुमच्या ग्रँट बंद करण्याला मी भीक घालत नाही, गरज असेल तर रयत तिला तारेल नाहीतर मारेल.' त्या वेळी भाऊरावांच्या रयतला रयतेनं तारलं ही गोष्ट सर्वज्ञात आहे. 9 मे 1959 रोजी भाऊरावांचं निधन झालं. त्या वेळी माध्यमिक शाळा 85 होत्या, तीन महाविद्यालयं आणि तीन वसतिगृहं होती.
कर्मवीरांचं शैक्षणिक तत्त्वज्ञान हे शाळा, महाविद्यालयं आणि वसतिगृहं यांमधून आकाराला आलेलं आहे. सहजीवन, सहभोजन, सहअध्ययन आणि स्वावलंबन ही त्यांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाची चतुःसूत्री आहे. भाऊराव लोकांना सांगायचे, 'माझ्याकडे रयत शिक्षण संस्थेच्या वाढीचा निश्चित आराखडा नव्हता. अंधारात हातात बॅटरी घेऊन चालणाऱ्याप्रमाणे माझे काम होते. बॅटरीच्या प्रकाशात दिसेल तेवढा मार्ग आक्रमायचा. वाटेतील खड्डे, अडथळे टाळायचे. पुन्हा बॅटरीचा प्रकाश टाकायचा व पुढचा दिसणारा मार्ग तुडवायचा. वाटेत येणारे सर्प टाळायचे.'
रयत शिक्षण संस्थेची उभारणी अशा खडतर अग्निदिव्यातून झालेली आहे हे आपल्याला कदापि विसरता येणार नाही. अनुभव हा कर्मवीरांचा गुरू होता. कर्मवीर कुणाच्या खांद्यावर उभे राहून मोठे झालेले नाहीत तर त्यांना मिळालेलं मोठेपण हे स्वकष्टानं, स्वकर्तृत्वानं आणि त्यागानं लाभलं.
जगात जे चांगलं आहे ते रयतमध्ये आज उभं आहे. बदलत्या शैक्षणिक धोरणांना आणि आव्हानांना रयत शिक्षण संस्था मोठ्या नेटानं सामोरी जात आहे. आज रयत शिक्षण संस्थेच्या अनेक शाखांना आयएसओ मानांकन मिळालेलं आहे, तर नॅक मानांकनात संस्था सर्वोच्च स्थानावर आहेत. रयतला गुणवत्तेशी अन् गुणवंतांना रयतेशी बांधणं हे रयत शिक्षण संस्थेचं उद्दिष्ट आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून नुकताच रयत शिक्षण संस्थेला क्लस्टर युनिव्हर्सिटीचा दर्जा प्राप्त झाला आहे. यावरून संस्थेची वाटचाल अतिशय उत्तमपणे चालू आहे, हे अधोरेखित होतं.
आजमितीला रयत शिक्षण संस्थेचा विस्तार महाराष्ट्रातल्या 15 जिल्ह्यांत आणि कर्नाटकातल्या एका जिल्ह्यात झालेला आहे. आज संस्थेच्या एकूण 679 शाखा कार्यरत आहेत. काळाच्या हाका ऐकून आणि पोरांच्या गरजा लक्षात घेऊन कर्मवीरांची रयत नवनवे बदल आत्मसात करते आहे.
कर्मवीरांनी त्यांच्या काळात पांडूरंग (बॅ.पी.जी. पाटील) घडवला, ज्ञानेश्वर (ज्ञानदेव घोलप) घडवला, नारायण (डॉ.एन.डी. पाटील) घडवला... पण आम्हाला नवीन कर्मवीर घडवता आला नाही याची खंत वाटते. भाऊरावांमधला कर्मवीर आपल्यामध्ये कणाकणानं उतरत राहो आणि क्षणाक्षणाला झिरपत राहो हीच प्रार्थना. जयंतीनिमित्त कर्मवीर नावाच्या थोर समाजसुधारकाला विनम्र अभिवादन!
- आबासाहेब सरवदे. उरण, जि. रायगड
sarvadeaba@gmail.com
संदर्भग्रंथ
कडियाळ स. अ. - कर्मवीर भाऊराव पाटील (काळ आणि कर्तृत्व) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, आवृत्ती पहिली, फेब्रु. 1998
Tags: लेख व्यक्तिवेध आबासाहेब सरवदे कर्मवीर भाऊराव पाटील कर्मवीर आण्णा लक्ष्मीबाई रयत शिक्षण संस्था समाजसुधारक शिक्षण Marathi Abasaheb Sarvade Karmveer Bhaurao Patil Karmveer Anna Lakshmibai Rayat Shikshan Sanstha Social Reformer Educationist Education Load More Tags
Add Comment