वाचकांना विचार करायला भाग पाडणं हीच माझ्या सार्थकतेची  कसोटी...

 माझी कथायात्रा - उत्तरार्ध 

हिंदीच्या प्रसिद्ध लेखिका मन्नू भंडारी यांचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी निधन (15 नोव्हेंबर रोजी) झाले. 1957 मध्ये त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली. त्यानंतर त्यांनी सातत्यपूर्ण लेखन केले. 'महाभोज' आणि 'आपका बंटी' या कादंबऱ्यांनी त्यांना वेगळी ओळख मिळवून दिली. 'मैं हार गई', 'तीन निगाहों की एक तस्वीर', 'एक प्लेट सैलाब', 'यही सच है', 'आंखों देखा झूठ', 'त्रिशंकु' यांसारख्या त्यांच्या कलाकृतींनी हिंदी साहित्यावर अमीट छाप सोडली. 2008 मध्ये राधाकृष्ण प्रकाशनाकडून आलेल्या 'संपूर्ण कहानियाँ' या पुस्तकात त्यांनी 'मेरी कथायात्रा' हा आत्मचरित्रपर लेख लिहिला आहे. त्यांच्या कथांचा मराठी अनुवाद करणारे चंद्रकांत भोंजाळ यांनी या लेखाचा अनुवाद केला असून कर्तव्यवरून तो दोन भागांमध्ये प्रसिद्ध करत आहोत. काल या लेखाचा पूर्वार्ध प्रसिद्ध झाला आहे. हा त्याचा उत्तरार्ध. 

कोणतीही कथा प्रकाशित झाल्यावर ती जास्तीतजास्त लोकांनी वाचावी, केवळ वाचूच नये तर ते त्या कथेशी जोडले जावेत, संवेदनेच्या पातळीवर ते भागीदार बनावेत, म्हणजेच एकच कथा-व्यथा ही अनेकांची व्हावी, अशी इच्छा केवळ माझीच नाही तर लिहिणाऱ्या प्रत्येकाचीच असते नाही का? एक आणि अनेक यांच्यातील पूल बनण्याची इच्छा याच्या मुळाशी असत नाही का? मला हेही माहिती आहे की, ही इच्छा तुम्हांला ‘लोकप्रिय साहित्य’ किंवा ‘व्यावसायिक साहित्य’ यांच्या दिशेनं ढकलू शकते. तुमचं साहित्य कमी वाचक वाचतील, तर तेच उत्कृष्टतेचं सर्टिफिकेट आहे, असं मानणारा एक वर्ग आहेच. कामचलाऊ लेखनालाच एक मोठा वाचकवर्ग मिळतो असा त्यांचा समज आहे.

या दृष्टीनं पाहिलं तर प्रेमचंद यांचं साहित्य पहिल्यांदा मोडीत काढायला हवं. त्यांची लोकप्रियता, गावागावांत पोहोचलेला त्यांचा  वाचकवर्ग, प्रत्येक पिढीतील लेखकांना त्यांच्या बरोबर आपणही जोडलं जावं असं वाटणं हे सगळं काय दर्शवतं? लोकप्रियता हा एखाद्या साहित्यकृतीचा मापदंड असू शकतो हे मला मान्यच नाही. खरा मापदंड हा लेखकाची जीवनदृष्टी आणि कलात्मकता हाच असायला हवा. इथं मी कालात्मकतेखाली अंडरलाइन करीन. कारण तीच तुमच्या वास्तवतेला संवेदनेच्या पातळीवर घेऊन जाते. तुमच्या अनुभवाला कथेच्या पातळीवर घेऊन जाते.

जे असेल ते असो, पण माझ्यासाठी वाचक हाच महत्त्वाचा आहे. तो वाचक कोण आहे, कसा आहे, कुठे रहातोय याची कोणतीही जाणीव कथा लिहिताना माझ्या मनात नसते. किंवा अदृश्य वाचक माझ्या लेखणीची दिशाही बदलत नाही.... ठरवत नाही. वाचकाची भूमिका कथा छापली गेल्यानंतर सुरू होते. त्यानं ती कथा कशा प्रकारे समजावून घेतली आहे, माझ्या संवेदनेशी त्याची संवेदना मिळतीजुळती आहे का... ज्या प्रश्नाविषयी मी लिहिलं आहे त्या प्रश्नानं त्याला अस्वस्थ केलं आहे का... काही विचार करायला भाग पाडलं आहे का... हीच मी माझ्या सफलतेची, सार्थकतेची कसोटी मानते.

कथालेखनाच्या संदर्भात माझी समज जसजशी वाढत गेली, त्यानं माझ्या कथालेखनाला लगाम तर घातलाच; पण बाहेरची परिस्थितीही अशी बनत गेली की, कथा लिहिण्यासाठी वेळ काढणं मला कठीण होत गेलं. घराच्या बरोबरच मुलीची जबाबदारी, नऊ वर्षं शाळेत शिकवल्यावर कॉलेजमध्ये मिळालेली नोकरी... ज्यासाठी मला पूर्ण तयारी करावी लागत होती...

यातील कोणतीही जबाबदारी मला टाळता येण्यासारखी नव्हती. केवळ लेखन थांबवता येण्यासारखं होतं. मग 1964 मध्ये मला कलकत्ता सोडून दिल्लीला यावं लागलं. नवं शहर, नवं घर, नवं कॉलेज... हे सगळंच माझ्यासाठी नवं होतं. आणि त्यातील कोणतीही गोष्ट मला आवडत नव्हती. सुरुवातीचे काही दिवस तर मी खूपच अस्वस्थ होते. जणू मला कुणीतरी एका जागेवरून उपटून दुसऱ्या जागी लावले आहे! लिहिणं तर मी जवळजवळ विसरलेच होते. पण काळाबरोबर आयुष्य पुन्हा रुळावर येऊ लागलं. राकेशजी, कमलेश्वरजी आणि सत्येन दा (सत्येन शरत) यांच्या बरोबरीच्या बैठका... मग त्या कॉफी हाउसमध्ये होवोत किंवा घरी... त्यांच्या बरोबर होणाऱ्या चर्चा, वादविवाद यांमुळं माझ्या मनाची स्थिती हळूहळू बदलू लागली. वेळेच्या बरोबरच माझ्या परिचयाचं वर्तुळ वाढत गेलं. तसंच माझ्या अ‍ॅक्टिव्हिटीजदेखील वाढत गेल्या. त्याचा परिणाम असा झाला की, माझ्या अनुभवांचं भांडार समृद्ध होत गेलं. आणि या अनुभवांच्या भांडारातील एखादी घटना, एखादी व्यक्ती मला लेखनासाठी प्रेरितच नव्हे तर प्रोत्साहितही करू लागली. आणि कथालेखनाचा माझा थांबलेला प्रवास पुन्हा एकदा सुरू झाला.

दुसऱ्या कथासंग्रहानंतर तब्बल आठ वर्षांनंतर माझा ‘यही सच है’ हा तिसरा कथासंग्रह प्रकाशित झाला. हा कालावधी आठ वर्षांचा असला तरी या काळात माझी कथेबद्दलची वाढलेली समज, साहित्यिकांच्या मधे वाढलेला माझा वावर यामुळं या संग्रहातील कथांमधे निश्चितच परिपक्वता आली आहे. ‘यही सच है’मधील कथा अधिक परिपक्व आहेत. हे मीच म्हणतेय असं नाही. वाचक आणि समीक्षकांनीदेखील हे म्हटलेलं आहे. त्यानंतर दोनच वर्षांनी प्रकाशित झालेल्या ‘एक प्लेट सैलाब’मधेही मी कथेची हीच गुणवत्ता राखली आहे.

1977 पर्यंत माझे चार कथासंग्रह आणि एक नाटक ‘बिना दीवारोंके घर’ प्रकाशित झाले होते. नाटकाचे तीनचार प्रयोग पाहिल्यावर त्यातील काही त्रुटी मला जाणवल्या. त्यामुळे मी प्रकाशकाशी बोलून त्याचं पुनर्प्रकाशन थांबवलं. ते नाटक पुन्हा एकदा लिहावं असं वाटत होतं. पण त्या वेळी ते शक्य झालं नाही. त्या काळी मन राहून राहून कादंबरी लेखनाकडे धाव घेत होतं. तीन वेगवेगळ्या कुटुंबांत, असामान्य परिस्थितीत वाढणारी तीन मुलं, केवळ मला आकर्षितच करीत नव्हती तर माझ्यावर मानसिक दडपणही टाकत होती. आणि बघता बघता हे सारे बंटी आपल्या कुटुंबाच्या मर्यादा ओलांडून एक सामाजिक समस्या म्हणून माझ्या समोर उभे राहिले. मग या प्रश्नाचं आव्हान पेलण्यासाठी मी लेखणी हातात धरली. आणि अशा तऱ्हेने ‘आपका बंटी’ची सुरुवात झाली.

सुरुवातीला ही कादंबरी ‘धर्मयुग’मध्ये क्रमश: प्रकाशित झाली. ती आवडली अशा आशयाची पत्रं ‘धर्मयुग’मध्येही प्रकाशित होत राहिली. नंतर ती कादंबरी पुस्तकरूपानं प्रकाशित झाल्यावर समीक्षकांनीही तिचा गौरव केला. त्यामुळं माझा आत्मविश्वास वाढला. पण नंतर एक गोष्ट मला खटकत राहिली, ती ही की, या चर्चेचं केंद्र ‘बंटी’ झाला. पण शकुन एकदम बाजूला फेकली गेली. माझ्या मते तिचं पात्र हे कादंबरीतील एक महत्त्वपूर्ण पात्र आहे. ती पूर्णतः शकुन म्हणून किंवा पूर्णतः आई म्हणून जगू शकत नाही, हेच तिचं दु:ख आहे. हे केवळ शकुनचंच दु:ख आहे का? व्यक्तित्व किंवा मातृत्व या द्वंद्वात जगणाऱ्या हजारो स्त्रिया आजदेखील आपल्या आसपास आपण पहात असतो.

नव्या क्षेत्रात प्रवेश 
‘सारा आकाश’ या चित्रपटाच्या यशाने बासू चटर्जी यांना प्रसन्न आणि पुलकितच केलं नाही तर नव्या योजना आखण्यासाठी उद्युक्तही केलं. त्यांनी माझ्या ‘यही सच है’ या कथेवर ‘रजनीगंधा’ चित्रपट काढण्यासाठी चर्चा केली. या प्रस्तावानं मला रोमांचित केलं हे खरंच. पण केवळ मानसिक पातळीवर जगणाऱ्या मुलीची कथा चित्रमाध्यमात कशी मांडली जाईल, याविषयी माझ्या मनात शंका होती. तिच्या मनांतील आंतरद्वंद्व व्यक्त करण्यासाठी मी कथेतदेखील डायरी हा फॉर्म निवडला होता. पण बासुदांचा आग्रह आणि माझी मनापासून इच्छा यामुळं त्या कथेवरचा चित्रपट तयार झाला. पण कोणीही वितरक न मिळाल्यामुळं तो वर्षभर डब्यातच पडून राहिला. शेवटी त्याला वितरक मिळाला. आणि तो चित्रपट केवळ प्रदर्शितच झाला असं नाही तर त्यानं ‘सिल्व्हर ज्युबिली’ देखील साजरी  केली.

चित्रपटाच्या या मिळालेल्या यशाने माझा आत्मविश्वास इतका वाढला की, शरदचंद्र यांच्या ‘स्वामी’ या कादंबरीचं पुनर्लेखन करण्याचं धाडस मी करायला धजावले. बासुदांनी या कादंबरीला नवं रूप देण्याचं स्वातंत्र्य दिल्यानंतर मी तयार झाले. त्या कादंबरीचा मूळ ढाचा तसाच ठेवून मी वर्तमानकाळानुरूप त्यात बदल केले. शरदचंद्र यांनी चांगल्या कल्पनेला न्याय दिलेला नाही, असं मला वाटत राहिलं. अनिच्छेनं झालेल्या लग्नातून घनश्याम (पती) विषयी मिनीच्या मनात उपेक्षा उत्पन्न होते. पण हीच भावना सावत्र आई आणि कुटुंबातील इतर व्यक्तींच्या वागण्यामुळं बदलते. पतीच्या वागण्यामुळं तिच्या मनात पतीविषयी सन्मानाची भावना वाढते.... आणि हळूहळू तिच्या मनात पतीविषयी स्नेह उत्पन्न होतो. पुढे त्याचं श्रद्धेत रूपांतर होतं. पतिपत्नीमधील बदलत्या संबंधाचं जे समीकरण या कथेत दाखवलं गेलं आहे तोच या कथेचा मूळ आधार आहे. मूळ कथेत मी खूप बदल केले आहेत हे खरंच आहे. पण कादंबरी म्हणून छापताना मी हे बदल का केले याचे स्पष्टीकरणही दिलेलं आहे. मला फक्त एकाच गोष्टीचं दु:ख होतं आणि ते म्हणजे बासुदा यांनी चित्रपटाचा शेवट मी लिहिल्यापेक्षा वेगळा केला होता. आणि स्टेशनवरच मिनीला नवऱ्याच्या पायावर लोटांगण घ्यायला लावलं होतं. (पुरुषाची आकांक्षा... ज्यातून तो आजही मुक्त झालेला नाही.)

चित्रपटाचं मुख्य काम बासुदांचं होतं. त्यामुळं त्या दरम्यान माझं कथालेखन सुरू होतं. पण मला असं वाटू लागलं होतं की, भावुक कथा खूप लिहिल्या, आता काहीतरी नवीन विषयाला हात घालायला हवा. पण प्रायोगिक कथा लिहिणं हे मला शक्य नव्हतं. जर मारून मुटकून मला शक्य नसलेली गोष्ट मी केलीही असती, तर ती धड कथाही नाही आणि धड प्रयोगही नाही असं काहीतरी झालं असतं. फक्त समाधानाची गोष्ट हीच की, मला माझ्या मर्यादा माहीत आहेत. मी त्या बाबतीत जरा जास्तच जागृत असते. नवीन करायच्या नावाखाली मी काही व्यंगात्मक ढंगानं नव्या शैलीत काही कथा लिहिल्या. ‘त्रिशंकू’, ‘तीसरा हिस्सा’ आणि ‘स्त्री सुबोधिनी’ या कथा त्या प्रकारच्या होत्या. मी त्या कथा लिहिल्या याचा मला आनंद आहे. वाचकांच्या आणि समीक्षकांच्यादेखील अनुकूल प्रतिक्रिया मला मिळाल्या.

मला आठवतं आहे त्याप्रमाणे 1977 मध्ये ती हृदयद्रावक घटना घडली होती. त्यात काही हरिजनांना झाडाला बांधून जिवंत जाळलं होतं. जेव्हा मी कोणत्यातरी वृत्तपत्रात (नाव आठवत नाहीये) ही घटना वाचली, तेव्हा मी अंतर्बाह्य थरारले. सगळ्या गावात या घटनेनं दहशत पसरली होती. कुणीही काहीही बोलायला तयार नव्हतं. दोन दिवस या घटनेसंदर्भातील कितीतरी चित्रं माझ्या नजरेसमोर तरळत होती. मी माझ्या डायरीत काही  नोंदीदेखील केल्या. पण त्यात भावुकता होती. ही सगळी घटना मला लिहिण्यासाठी प्रेरित करीत होती. पण कोणत्याही ठोस वैचारिक आधाराशिवाय फक्त भावुकतेच्या आवेगात कोणतीही कथा लिहिणं माझ्यासाठी अशक्य होतं. त्यामुळं तो आवेग डायरीतच नोंदवला गेला. काही महिन्यांनंतर मी वृत्तपत्रात वाचलं की, त्या गुन्हेगाराला शिक्षा झाली. पण पॅरोलवर सुटून येऊन त्यानं निवडणूक लढवली आणि तो प्रचंड मतांनी निवडूनदेखील आला. माझं लक्ष आपल्याकडील निवडणूक प्रक्रियेकडे गेलं. संगनमत, छक्के-पंजे, धनशक्ती, दहशत यांवर आधारित आमची निवडणूक प्रक्रिया चाललेली असताना असे लोक सत्तेवर बसले तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नव्हतं. आणि अचानक माझ्या भावनिक आवेगाला वैचारिक पृष्ठभूमी मिळाली. आणि दोघांच्या मिलनातून 1979 मध्ये ‘महाभोज’चा जन्म झाला. इथं एक गोष्ट मी स्पष्ट करू इच्छिते की, विपरीत परिस्थितीतही आशेचा एक किरण माझ्या मनात चमकतोच.... मग तो कौटुंबिक मामला असू दे, समाजाचा असू दे, किंवा देशाचा असू दे. माझ्या आशावादाची कुणाला टिंगल करायची असेल तर ती त्यानं जरूर करावी. पण तीच माझी शक्ती आहे. सगळी परिस्थिती विपरीत असतानाही बिसू, बिंदा, आणि आता सक्सेना ही पात्रं माझ्या या आशावादातूनच निर्माण झालेली नाहीत का?

ती कादंबरी छापली गेल्यानंतर दीड वर्षानं अरविंदकुमार यांनी मला सांगितलं की अमाल अल्लाना ही कादंबरी रंगमंचावर सादर करू इच्छिते. मी होकार दिल्यावर त्यांनी आम्हां दोघींची भेट ठरवली. भेटल्यावर आम्ही इकडच्या तिकडच्या गोष्टी बोललो, पण शेवटी त्याचं नाट्यरूपांतर मीच करावं असं ठरलं. (हा त्यांचा आग्रह आणि माझी अट) पण रंगमंचीय सूचना अमाल देतील, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे विद्यार्थी ते सादर करतील असं ठरलं. ही माझ्यासाठी खूपच सुखद आणि प्रेरणादायक अशी गोष्ट होती. मी आठवड्यातून दोन दिवस कॉलेजमधून सरळ एनएसडीमधे जात असे आणि लिहिलेलं वाचून दाखवत असे. कधीकधी अमाल मला सूचना करे. काही बदल सुचवे. जर त्या सूचना मला आवडल्या तर मी त्यावर विचार करण्याचे आश्वासन देत असे. किंवा मी लिहिलेल्याचे समर्थन करीत असे. पण नाटकाची प्रगती रोखेल अशी काही चर्चा झाल्याचं मला तरी आठवत नाही. नाट्यरूपांतराचं काम जवळजवळ आठ महिने चाललं होतं. आणि नंतर नंतर तर ते काम टीमवर्कच झालं होतं. मी गेल्यावर काही अभिनेतेही येऊन बसत आणि काही सूचनाही करीत. तो माझ्यासाठी अद्भुत अनुभव होता. त्याच्या खोलात न जाता एवढंच सांगते की, कादंबरीचं नाट्यरूपांतर करताना जर लेखकानं आणि दिग्दर्शकानं आपापले अंहकार दूर ठेवले तर त्याचा परिणाम खूप चांगला होतो.

आता रंगमंचासंबंधी लिहिते आहे तर ‘बिना दीवारों के घर’च्या पुनर्लेखनासंबंधीही लिहिते. कॉलेजमध्ये 1978 मध्ये हिंदी नाटक करायचं ठरलं होतं. दिग्दर्शनासाठी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे रामगोपाल बजाज (बच्चू भाई) आलेले होते. प्रत्येक वर्षीप्रमाणेच नाटक कोणतं करावं असा प्रश्न होताच. आणि बच्चूभाईंनी जाहीर केलं की, या वर्षी ते ‘बिना दीवारों के घर’ हे नाटक करू इच्छितात. ते ऐकल्यावर मी अडले. ‘पुनर्लेखनाच्या भानगडीत मी त्याचं पुनर्प्रकाशनही थांबवलं आहे. मग अशा परिस्थितीत मी ते रंगमंचावर सादर करण्यासाठी परवानगी कशी देणार?’ असं मी त्यांना विचारलं. पण बच्चूभाईदेखील अडून बसले. ते म्हणाले की, जर मला पुनर्लेखन करायचंच असेल, तर मी ते तातडीनं सुरू करावं. नाहीतर ते आहे त्या स्थितीत नाटक रंगमंचावर सादर करतील. माझी परवानगी त्यांना नकोच आहे. या दडपणाखाली मी लेखणी हातात घेतली आणि लिहायला बसले. रोज दोन तीन दृश्यं मी लिहून देत असे. आणि ती ते पात्रांना वाचून दाखवीत असत. वेळ खूपच कमी होता. आणि मी वेड्यासारखं काम करीत होते. मी काय लिहितेय, कसं लिहितेय हे माझं मलाच काळात नव्हतं. पण बच्चूभाई, त्रिपुरारी शर्मा आणि रवी शर्मा मी लिहिलेलं स्वीकारत चालले होते. त्यामुळे जे लिहिलं जातंय ते ठीक असेल असंच मी समजत होते. ग्रँड रिहर्सलच्या दिवशी मी ते सगळं नाटक रंगमंचावर होताना पाहिलं तेव्हा जाणवलं की मेहनत व्यर्थ गेलेली नाही. नाटक ठीकठाक झालं होतं.

मी लिहिलेली दृश्यं टाइप झालेली नव्हती की त्याची झेरॉक्स काढलेली नव्हती. फक्त एका फाईलमध्ये मी कागद लावत चालले होते. मी असा विचार केला होता की, काही काळानंतर मी तटस्थपणे ते वाचीन आणि सादरीकरणाच्या वेळी ज्या दोनतीन त्रुटी  मला जाणवल्या होत्या त्या दुरुस्त करून मगच ते छापायला देईन. मी तर काही ते काम करू शकले नाही. पण वाळवीनं आपलं काम केलं. फाईलमधील कागद वाळवीनं असे खाल्ले होते की, ते मला वाचणंही अवघड झालं. मग मी त्याच्या पुनर्लेखनाची गोष्ट डोक्यातून काढून टाकली. माझ्या प्रकाशकांनीही ते या वर्षी (2002) मध्ये मूळ स्वरूपात पुन्हा छापून टाकलं.

कथा, कादंबरी किंवा नाटक असो, भाषेच्या बाबतीत माझा दृष्टिकोन सुरुवातीपासूनच एकसारखाच राहिलेला आहे. लेखकानं कथेच्या बाबतीत आणि भाषेच्या बाबतीतही पारदर्शी असायला हवं असं मी मानत आलेले आहे. वाचकांना सरळ कथेशी जोडणारी भाषा असायला हवी. वाचकांना कथेच्या आशयापर्यंत पोहोचताना भाषेचा अडसर नसावा. हे मात्र खरं की, अतिशय साधं लिहिणं हे अत्यंत अवघड काम आहे. हे कठीण काम मला नेहमीच जमलं असं म्हणण्याचं धाडस मी करणार नाही. पण त्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहिले एवढं मात्र मी म्हणू शकते. माझ्या सुरुवातीच्या कथा वाचून मला कधीकधी हसू येतं. पण याच कच्च्या-पक्क्या रस्त्यावरून मी आजच्या स्थानापर्यंत पोहोचले आहे हे जाणवल्यावर मला आनंद होतो.

आज माग वळून पाहते तेव्हा काय वाटतं? माझा पहिला कथासंग्रह 1957 मधे प्रकाशित झाला होता. आणि शेवटचा कथासंग्रह 1978  मध्ये प्रकाशित झाला. म्हणजे 21 वर्षांमध्ये मी फक्त 50 कथा लिहिल्या. या दरम्यान मी खूप काही लिहिलं असंही नाही. 1961 मध्ये राजेंद्रजींबरोबर ‘एक इंच मुस्कान’  ही कादंबरी, 1971 मध्ये ‘आपका बंटी’ आणि 1979 मध्ये ‘महाभोज’  ही कादंबरी प्रकाशित झाली. त्या दरम्यान ‘बिना दीवारों के घर’ हे नाटक आणि ‘महाभोज’चे नाट्यरूपांतर इतकाच माझ्या लेखनाचा जमाखर्च आहे. टीव्ही आणि चित्रपटांसाठी केलेलं लेखन मी सर्जनात्मक लेखनामध्ये समाविष्ट करू शकत नाही. वीस वर्षांतलं साहित्यातलं माझं योगदान इतकंच. नंतरची वीस वर्ष एकदम सन्नाटा.

त्यानंतर 1992 मध्ये ‘आत्मकथा’ लिहायला सुरुवात केली. ती दहा वर्षानंतर पूर्ण झाली आहे. आयुष्याच्या शेवटच्या वर्षात हातून काहीतरी चांगलं लिहून व्हावं अशी मी आशा करते आहे. आणि हे जग आशेवर तर तगून आहे.

 (अनुवाद - चंद्रकांत भोंजाळ)

- मन्नू भंडारी

Tags: हिंदी अनुवाद मन्नू भंडारी चंद्रकांत भोंजाळ कथा लेखक लेखन लेखनप्रक्रिया व्यक्तिवेध हिंदी साहित्य स्त्रीवाद स्त्री रचनाप्रक्रिया Marathi Hindi Translation Mannu Bhandari Chandrakant Bhonjal Story Writing Proccess Autobigraphical Women Novel Hindi Literature Literature Load More Tags

Add Comment