नो मॅन्स लॅंड : मानवजातीचे प्राक्तन?

युद्धपटांवरील लेखमाला :1

मागील एक - दीड महिना संपूर्ण जगाचे लक्ष रशिया - युक्रेन युद्धाकडे लागले आहे.. हे युद्ध आणखी किती काळ चालेल, किती वाढेल आणि त्याचे काय परिणाम होतील याबद्दल आज तरी कोणालाही सांगता येत नाही. युद्ध संपले तरी त्यात झालेली मनुष्यहानी, अनेक पातळ्यांवर झालेले नुकसान, विस्थापन याची चर्चा होत राहील. या पार्श्वभूमीवर ‘कर्तव्य साधना’वरून वाचकांना काय वेगळे व महत्त्वाचे देता येईल याचा विचार करत असताना एक कल्पना पुढे अशी आली की, काही उत्कृष्ट युद्धपटांवर किंवा युद्धाची पार्श्वभूमी असलेल्या सिनेमांवरील लेख असलेली मालिका ‘कर्तव्य’वरून प्रसिद्ध करावी. या मालिकेत मराठीतील काही लेखक, समीक्षक व सिनेमा क्षेत्रांतील जाणकार अभ्यासक / तज्ज्ञ यांचे लेख प्रसिद्ध करणार आहोत. आठवड्यात दोन लेख याप्रमाणे दहा ते बारा भागांची ही लेखमाला आजपासून प्रसिद्ध करीत आहोत. - संपादक

युद्ध का होते?

संस्कृतीच्या सुरुवातीच्या कालखंडापासून हा प्रश्न विचारी माणसाला सतत पडलेला आहे. कारण युद्ध हे संस्कृतीइतकेच प्राचीन आहे. ‘हात उभारून’ अनेक चिंतकांनी युद्धाच्या भीषण परिणामांची कल्पना माणसाला सतत दिली आहे. सामान्य माणूसही ते परिणाम सतत भोगत आला आहे, तरीही ‘युद्ध’ संपण्याची काहीच लक्षणे दिसत नाहीत. किंबहुना ती आता अशक्य कोटीतील कल्पना वाटते आहे.

युद्धाची भीषणता, त्याची व्यर्थता, आणि त्यातील संहार यांचे सुन्न करून टाकणारे दर्शन प्रथम व्यासांनी घडविले. त्यानंतर असंख्य कलावंतांनी आपल्या पद्धतीने या विश्वव्यापी विषयाला भिडण्याचा प्रयत्न केला. विसाव्या शतकाने तर दोन ‘महायुद्धे’ पाहिली, अनुभवली आणि त्या शतकातील कलाविचारावर त्याची फार मोठी सावली पडली. या कलावंतांत काही श्रेष्ठ चित्रपट दिग्दर्शक देखील होते. दुर्दैवाने मराठी किंवा हिंदीत श्रेष्ठ युद्धपट निर्माण झाले नाहीत (त्याची कारणे हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे.) म्हणून असामान्य युद्धपटांचा शोध घेण्यासाठी आपल्याला बाहेरच दृष्टी वळवावी लागते.

‘युद्धस्य कथा रम्या’ असे संस्कृत सुभाषित आहे. युद्धाच्या कथा ऐकण्यास, वाचण्यास किंवा पाहण्यास रम्य असतात. युद्धपटात प्रेक्षकाला आवडेल असे खूप काही असते. एक प्रभावी आणि गतिमान कथा असते, तिच्यात संघर्षस्थाने असतात, ताण असतो, अनिश्चितता असते. तिच्यात अनेकदा चांगले आणि वाईट यांचा संघर्ष रंगविला जातो. नैतिकतेचे समर्थन असते, मानवी स्वभावाचे असंख्य नमुने असतात आणि परिस्थितीच्या दबावाखाली माणसांचे उन्नयन वा अध:पतन कसे होते याचेही चित्रण असते. युद्ध माणसातील उत्तमाचे दर्शन घडविते तसेच त्याच्यातील अधमपणाचेही. ते अर्थपूर्ण असते आणि निरर्थक देखील.

अनेक युद्धपट पाहिले मात्र पुन्हा पुन्हा आठवणारा, अस्वस्थ करणारा असा एक चित्रपट मी सुमारे पंधरा वर्षांपूर्वी पाहिला, तो होता डेनीस टेनोविक या नवख्या दिग्दर्शकाचा ‘No Man’s Land’ हा 2001 सालचा चित्रपट. या संपूर्ण चित्रपटात, सुरुवातीची काही मिनिटे सोडली तर, प्रत्यक्ष युद्ध किंवा त्यांतील हत्याकांड नाहीच. पण साऱ्या चित्रपटावर युद्धाची गडद, अंधारी सावली पडलेली आहे. सर्वसाधारणपणे उत्तम युद्धपटात युद्ध दोन पद्धतींनी दाखवले जाते. एका प्रकारच्या चित्रपटात युद्धातील नरसंहार, क्रौर्य, आणि विनाश यांचे तपशीलवार चित्रण असते. उदा ‘The Longest Day’ किंवा ‘The Great Escape’ किंवा  ‘Patton’. काही चित्रपटांत मात्र युद्ध पार्श्वभूमीला ठेवलेले असूनही ते अंगावर येत राहते.  ‘All Quite On The Western Front’ हे याचे अप्रतीम उदाहरण.   ‘No Man’s Land’ हा याच प्रकारचा एक असामान्य चित्रपट आहे.

डेनीस टेनोविक (जन्म 1969) हा बोस्नियन चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथाकार. तो कॉलेजमध्ये शिकत असतानाच बोस्नियामध्ये युद्ध सुरू झाले. त्याने आपले शिक्षण अर्धवट सोडले व आपला एक ग्रूप तयार करून सरकारच्या परवानगीने सैन्याच्या अनेक विलक्षण कामगिऱ्यांचे चित्रण केले. हे चित्रण इतके प्रभावी होते, की त्यानंतर अनेक डॉक्युमेंटरीमध्ये ते वापरले गेले. युद्धानंतर त्याने स्वत:ही काही डॉक्युमेंटरीज् निर्माण केल्या. या दरम्यान आपल्या अनुभवातून त्याला एक उत्तम कथा कल्पना सुचली व तिच्यावर सर्बो-क्रोशियन भाषेत ‘निशीजा झेमलजा’ (No Man’s Land) या नावाचा चित्रपट निर्माण करण्याचे त्याने ठरविले.


हेही वाचा : द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय - अरुण टिकेकर 


बोस्निया आणि सर्बिया या दोन देशांतील युद्धाची पार्श्वभूमी या चित्रपटाला आहे. सुरवातीला दिसतात ते काही बोस्नियन सैनिक. रात्रीच्या वेळी गस्त घालताना धुक्यामुळे ते आपला मार्ग चुकतात. सकाळी जेव्हा त्यांना जाग येते तेव्हा त्यांना दिसते की, ते सर्बियाच्या सीमेजवळ आलेले आहेत. मात्र ते आलेले सर्बियाच्या गस्त घालणाऱ्या रणगाड्याला दिसतात, व सर्बियन सौनिक त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करतात. या गोळीबारात फक्त किकी नावाचा एक सैनिक बचावतो. जखमी अवस्थेत तो ‘युद्धबंदी क्षेत्रातील’ एका खंदकात लपून बसतो. काही वेळाने दोन सर्बियन सैनिक शत्रूच्या जवानांचा शोध घेण्यास येतात मात्र त्यांना किकी दिसत नाही. त्याऐवजी त्यांना शत्रूच्या जवानाचे एक प्रेत दिसते. त्या दोघांपैकी जो वरिष्ठ असतो तो, शत्रूला दहशत बसावी म्हणून, त्या जवानाच्या अंगाखाली एक जिवंत बॉम्ब पेरून ठेवतो. समजा शत्रूचे सैनिक आपल्या सहकाऱ्याचा शोध घेत आलेच तर त्याचे प्रेत हलविताना त्या शक्तीशाली बॉम्बचा स्फोट होईल व आजूबाजूचे सारेजण मारले जातील. हे पाहून त्याचा सैन्यात नुकताच भरती झालेला तरुण सहकारी  विचारतो, “असे का?”

यावर अधिकारी उत्तर देतो, “गंमत म्हणून! (For fun)”

त्याने इतके मृत्यू त्याने पाहिलेले असतात की, मृत्यू हाही त्याच्यालेखी एक ‘मजेचा’ विषय बनलेला असतो. सैन्याचा काही काळ अनुभव घेतल्यानंतर माणसाची नजर कशी मरून जाते व विचारांतील भावुकता कशी कमी होत जाते याचे हे उदाहरण. नव्या सैनिकाला (त्याचे नाव निनो) अर्थातच हे पटत नाही, पण वरिष्ठांची आज्ञा पाळलीच पाहिजे ही त्याला सैन्यात आल्यानंतर मिळालेली पहिली शिकवण असते. तो गप्प बसतो.

किकी लपून हे सारे नाट्य पाहत असतो. आपल्या सहकारी मित्राच्या प्रेताची विटंबना त्याला सहन होत नाही. चिडून तो बाहेर येतो व या दोघांवर हल्ला करतो. या हल्ल्यात वरिष्ठ अधिकारी मारला जातो आणि निनो जखमी होतो. किकीचा बंदी बनतो. आता या दोघांत लहान प्रमाणावर एक शीतयुद्ध सुरू होते. मात्र किकीजवळ शस्त्र असते आणि निनो नि:शस्त्र असतो. त्याला किकीच्या प्रत्येक आज्ञा ऐकाव्याच लागतात.

आता परिस्थिती अशी आहे की, खंदकात दोन शत्रूराष्ट्राचे दोन सैनिक एकमेकांसमोर आहेत. ते हळूच मान उचलून पाहतात. एका बाजूला बोस्नियाची सीमा आहे व दुसऱ्या बाजूला सर्बियाची. दोन्ही दिशेला दूरवर त्या त्या देशातील सैनिक गस्त घालताहेत. खंदकातून वर यावे तर कुठल्या बाजूकडून बंदुकीची गोळी सणसणत येईल आणि आपला जीव घेईल हे सांगता येत नाही. काय करावे? सुटकेचा काहीच मार्ग दिसत नाही. मात्र अशा वेळी देखील आपण एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहोत ही भावना त्यांच्या मनातून जात नाही.  ही लढाई कुणी सुरू केली, कोण दोषी आहे? या मुद्द्यांवर ते दोघे वाद घालू लागतात. दोघेही शेजारी राष्ट्राचे नागरिक असल्यामुळे त्यांना एकमेकांची भाषा समजते. वास्तविक या वादाला काहीच अर्थ नाही. कोण बरोबर, कोण चूक यालाही.  किकीजवळ बंदूक असते ती निनोवर रोखून तो त्याला आपले म्हणणे मान्य करायला लावतो. प्रत्येक वेळी तो नवी आज्ञा देतो आणि निनोला पाळायला लावतो. निनो एकदा कुरकुरत म्हणतो, “सारखे सारखे मीच तुझे का ऐकावे?”

यावर किकीचे उत्तर असते, “कारण माझ्याजवळ बंदूक आहे म्हणून!”

बळी तो कान पिळी. युद्धात ज्याच्याजवळ शस्त्र तो श्रेष्ठ. अर्थात जीवनात इतर वेळीही काही फारसे वेगळे दृश्य दिसत नाही. ज्याच्याजवळ सत्ता असते तो श्रेष्ठ असतो, ज्याच्याजवळ संपती असते तो श्रेष्ठ असतो. सामान्य माणसाची किंमत कुणालाच नाही. मात्र या दोघांच्या चर्चेतून आणखी एक गोष्ट स्पष्ट होत जाते. प्रत्येकाजवळ दुसऱ्याविषयी इतक्या काही तक्रारी आहेत की आता समेट होणे जवळजवळ असंभव आहे. युद्धाने प्रश्न सुटत नाहीत, वादाने सुटत नाहीत. ते फक्त प्रेमाने सुटू शकतात. पण आजच्या माणसाला एकमेकांबद्दल ते प्रेम वाटते का?

तरी माणसे वाद घालणे संपवीत नाहीत. निरर्थक वाद. विफल चर्चा.

आता या परिस्थितीची Absurdity आपल्या ध्यानात येऊ लागलेली असते. आयुष्य हे Absurd आहे या निष्कर्षापाशी विसाव्या शतकातील अनेक कलावंत आलेले आहेत. Absurdity जगण्यातच नाही, ती मरण्यातही आहे हे प्रभावीपणे व्यक्त करणारी ही कलाकृती आहे. ही हास्यास्पदता काही दृश्यानंतर अधिकच स्पष्ट होते. एका गाफील क्षणी किकी आपली बंदूक खाली ठेवतो व निनो झडप घालून ती उचलतो. आता निनोच्या हातात बंदूक आहे, किकी नि:शस्त्र आहे. मात्र या बंदुकीचा उपयोग तो किकीला ठार मारण्यासाठी करीत नाही. तो किकीला म्हणतो, “आता सांग, कोण बरोबर आहे? आम्ही का तुम्ही?”

किकीला त्याचे म्हणणे मान्य करण्यावाचून पर्याय नसतो. मृत्युच्या सावलीत देखील माणसाला लहान मोठे विजयच महत्त्वाचे वाटतात!

मात्र काही वेळातच या चर्चेला पूर्णविराम मिळतो. कारण एक नवी अनपेक्षित परिस्थिती निर्माण झालेली असते. तो तिसरा सैनिक, ज्याला आतापर्यंत हे दोघेजण मेलेला समजत होते, तो अचानक डोळे उघडतो. तो खरे तर मेलेला नसतोच. आता एक वेगळीच समस्या समोर उभी राहते. किकी आपल्या त्या देशबांधवाजवळ जाऊन त्याला सांगतो की, कोणत्याही परिस्थितीत थोडेही हलायचे नाही. कारण तो हलला की बॉम्बस्फोट होणार व तिघेही मरण पावणार! आता तीन आयुष्ये फक्त एका माणसाच्या एका लहानशा हालचालीवर अवलंबून आहेत. वातावरणातला ताण अधिकच वाढतो. त्या तिसऱ्या सैनिकाची परिस्थिती अधिकच विचित्र आहे. उरलेले हे दोघे निदान हालचाल करण्यास ‘स्वतंत्र’ आहेत. त्याला मात्र जिवंत असून प्रेतासारखे पडून राहावे लागत आहे! निनोच्या अधिकाऱ्याने हे बॉम्ब आणलेले असतात, त्यामुळे निनोला त्यांची माहिती असते. तो सांगतो की या बॉम्बना निकामी करावयाचे असेल तर त्यासाठी कुशल तज्ज्ञांची आवश्यकता आहे. साधारण सैनिकांना ते शक्य नाही.

या खंदकातील घटनांना आता आणखी एक वेगळे वळण मिळते. किकी आणि निनो बाहेरच्या जगाशी संपर्क करू पाहतात. योगायोगाने संयुक्त राष्ट्रांच्या एका शांतीपथकाला यांचा पत्ता लागतो. या ‘United Nation’s Protection Force’चा प्रमुख एक फ्रेंच आहे. तो या तिघांच्या मदतीस जाण्याचे ठरवितो. आपल्या वरिष्ठांना बॉम्ब निकामी करणारे एखादे पथक पाठवण्याची विनंती करतो.  पण त्याचे वरिष्ठ त्याची विनंती धुडकावून लावतात.  ते सांगतात की, ही आपल्या कक्षेबाहेरची गोष्ट आहे, युद्धात थेट हस्तक्षेप करणे आपले काम नाही. युनोच्या एकंदर धोरणाची मर्यादाच या आदेशातून स्पष्ट होते. मात्र फ्रेंच अधिकाऱ्याला ते आदेश पटत नाहीत. तो या तिघांना मदत करण्यासाठी काय करता येईल याची आखणी करू लागतो.

आता या तिघांच्या जगात बाहेरचे विश्व येऊन दाखल होऊ लागते. दरम्यान ही बातमी आता बाहेर पसरू लागलेली असते. जेन लीव्हिंग्तन नावाची एक टी. व्ही. वार्ताहर आपला लवाजमा घेऊन येते आणि बातमी कव्हर करू लागते. जेनसाठी सर्वात महत्त्वाची असते सेन्सेशनल बातमी. बातमीत गुंतलेली माणसे बातमीची रंजकता वाढवितात की कमी करतात याकडे तिचे लक्ष आहे. ती बातमीची रंजकता कमी होऊ देत नाही. खंदकातील माणसांना देखील ती ‘जग तुम्हाला पाहते आहे’ असे सांगते. अधून मधून ती प्रेक्षकांना म्हणत राहते, “How will this all end? Stay tuned...” (याचा शेवट कसा होणार? पाहत रहा!”). एका प्रसंगी ती सिगारेटची लाच देऊन निनीला विचारते, “तुला कसे वाटते आहे?” खरे तर हा तद्दन मूर्खपणाचा प्रश्न आहे. तिला स्वत:ला या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात काही रस आहे असे दिसत नाही. तिला माहीत आहे की, प्रेक्षकांना या प्रश्नाच्या उत्तरात रस आहे. निनोला अर्थातच हा प्रश्न अपमानास्पद वाटतो. तो ती सिगारेट फेकून देतो. आज सर्वत्र आपण टी.व्ही. वरील निवेदकांचा, बातमीदारांचा मूर्खपणा आणि थंडपणा पाहतो तो टी.व्ही.ने व्यवसायाला पहिले प्राधान्य देण्यास सुरुवात केली तेव्हापासून आहे.

चकचकीत गाड्या, कॅमेरे, उत्साही माणसे यांची आता भोवती गर्दी जमते. त्या गर्दीत बिचारे हे तीन सैनिक बाजूलाच पडतात. हे तीन सैनिक आतापर्यंत नशिबाच्या हातातील प्यादे असतात, आता ते माणसांच्या गटांच्या हातातील प्यादे बनून जातात. नशीब हे निर्मम असते, माणसे भावनाशील असतात असे मानले जाते पण ते खोटे आहे याची विषण्ण जाणीव हा चित्रपट करून देतो. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो युद्धपट असला तरी ‘हिरोंचे’ चित्रण करणारा सिनेमा नाही. यांतली प्रमुख पात्रे युद्धात ‘सापडलेली’ सामान्य व म्हणून निराधार माणसे आहेत. त्यांना मरायचे नाही, जगायचे आहे.

आधुनिक काळातील महायुद्धोत्तर साहित्यावर व कलांवर Absurdity चा फार मोठा प्रभाव आहे. एकाच वेळी जीवनाची हास्यास्पदता व अर्थशून्यता या विचारसरणीमधून व्यक्त केली जाते. जीवनाला कसलाही नियम लावता येत नाही, उलट त्याला नियमाच्या बंधनात अडकवू पाहणे हेच निरर्थक म्हणून हास्यास्पद आहे. Absurd कलाकृतीतून बहुतेक वेळा एक वरकरणी विनोदी भासणारी घटना घेऊन तिचे शोकात्म अंतरंग दाखविले जाते. हा चित्रपट एका मूलतः ताणयुक्त, दुर्दैवी परिस्थितीला पाया धरून विस्तारत जातो. या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्गच नाही हे शेवटी आपल्याला स्पष्ट होत जाते. मात्र विरोधाभास हा की, त्या परिस्थितीत अडकलेल्या शेवटच्या माणसाला तो मार्ग बंद झाला आहे याचे ज्ञान नसते. निरर्थक आशेचा धागा धरून तो येणाऱ्या दिवसाकडे पाहत राहतो.  


हेही वाचा : रशिया-युक्रेन युद्धात होरपळलेली चित्रकार - प्रणव पाटील 


या चित्रपटाला अनेक आंतरराष्ट्रीय पारितोषिके मिळाली. टीकाकारांनी त्याला एकमुखाने गौरविले. या चित्रपटाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे दिग्दर्शक येथे कुणाचीच बाजू घेत नाही. अनेक गाजलेल्या युद्धपटांची ही एक कमजोरी असते. ते ज्या देशाचा माणूस बनवितो त्या देशाची बाजू, कळत नकळत त्यांत प्रभावीपणे व्यक्त होते. खरे तर या चित्रपटाचा दिग्दर्शक यांत गुंतलेल्या दोन देशांपैकी एकाचा, बोस्नियाचा नागरिक आहे. पण आपल्या देशाच्या भूमिकेचे समर्थन करण्याचा त्याने मुळीच प्रयत्न केलेला नाही. यामुळेच या चित्रपटाला एक कालातीत महत्त्व प्राप्त झाले आहे. हा चित्रपट मी पाहिला तेव्हा बोस्निया व सर्बेरीया या देशातील युद्धाची कसलीही पार्श्वभूमी मला ठाऊक नव्हती. पण त्यामुळे या चित्रपटाच्या प्रभावात कसलीही उणीव आली नाही.

या चित्रपटाच्या अनेक अंगांपैकी एक त्यांतील ‘भाषेचा वापर’ हे आहे. युद्ध हे बोस्निया व सर्बेरीयाच्या सीमेवर चालू असले तरी त्यांत अनेक राष्ट्रांचे सैनिक गुंतलेले आहेत. विशेषत: युनायटेड नेशन्सच्या अस्तित्त्वामुळे त्याला जागतिक पातळी लाभली आहे. येथे फ्रेंच अधिकारी आहेत, जर्मन तज्ज्ञ आहेत, अमेरिकन आहेत तसेच रशियन देखील आहेत. इतकी विविध भागातून आलेली, विविध भाषा बोलणारी माणसे एका घटनेत गुंतल्यामुळे अनेकदा एकजण काय म्हणतो आहे हे दुसऱ्याला समजत नाही. एकमेकांशी संपर्काचे साधन म्हणून भाषेची मर्यादा स्पष्ट होते. त्यातल्या त्यात विरोधाभास असा की किकी आणि निनो हे ‘शत्रू’ मात्र एकच भाषा बोलतात.   

आता पडद्यावरील माणसांची संख्या वाढते आणि घटनांना वेग येऊ लागतो. जगाच्या काना-कोपऱ्यातून वार्ताहर बातमीचा वास काढीत तेथे येऊ लागतात. त्यांना आवरता आवरता ‘युएन’च्या सैनिकांची पुरेवाट होते. मोठ्या खटपटीने किकी व निनोला वर काढले जाते. या वार्ताहरांना पाहून एके प्रसंगी किकी चिडून त्याना ‘गिधाडे’ म्हणतो. ‘आमच्यावरील संकटातून तुम्हाला भरपूर पैसे मिळत आहेत ना?’ असे उपहासाने विचारतो.

‘यूएनपीएफए’चा प्रमुख विमानातून येतो आणि परिस्थितीची पहाणी करू लागतो. त्याने सोबत एक जर्मन बॉम्बतज्ज्ञ आणलेला असतो. तो येऊन काही प्रयत्न करतो पण बॉम्बला धक्का न लावता कसे निष्क्रिय करायचे हे त्याला समजत नाही. मिडियाचे, वार्ताहरांचे लक्ष त्या प्रमुखाकडे व तज्ज्ञाकडे लागलेले आहे. संधीचा फायदा घेऊन किकी एक सैनिकाच्या मृतदेहाकडे जातो व त्याच्या खिशातील पिस्तुल काढून आपल्याजवळ लपवितो. मात्र आता हे सारे नाटक त्याला असह्य झालेले असते. क्रोधाच्या भरात तो सर्वांवर पिस्तुल रोखतो. सारे जण भयचकित होतात. एकच गोंधळ माजतो. या गोंधळात आपल्याला दिसते की, किकीच्या पिस्तुलातील गोळीने निनो मारला गेला आहे आणि हा अंदाधुंद गोळीबार करतो की काय या भीतीने युनोच्या एक सैनिकाने त्याला ठार केलेले आहे.

जगभरचे प्रेक्षक हे नाट्य पाहत असतात.

आता ज्याच्या अंगाखाली बॉम्ब आहे तो सैनिक वाचू शकत नाही हे स्पष्ट झालेले असते पण आपले अपयश लोकांसमोर आणावे असे युनोच्या तुकडीच्या प्रमुखाला वाटत नाही. यासाठी तो एक वेगळीच ‘योजना’ आखतो. दुसराच एक मृतदेह लोकांना दाखविला जातो व अडकलेल्या सैनिकाची सुटका केलेली असून त्याला दवाखान्यात नेले जात आहे असे भासविले जाते. एक एक करून सारे जण खंदकाच्या जवळून निघून जातात. ‘युएन’चे सैनिक आणि प्रमुख, अमेरिकन जर्नालिस्ट, इतर सैनिक, वार्ताहर... सारे निघून जातात. आता संध्याकाळच्या सावल्या पसरण्यास सुरुवात झाली आहे. खंदकात एक माणूस हालचाल न करता पडलेला आहे. तो कशाची प्रतीक्षा करतो आहे?

या जमिनीवर झोपवलेल्या माणसाच्या अंगाखालचा बॉम्ब आता संपूर्ण मानव जातीच्या अंगाखाली असलेल्या स्फोटक परिस्थितीचे प्रतीक बनून जातो. त्या परिस्थितीचा स्फोट झाला तर केवढा विध्वंस होईल याची कल्पनाही करता येत नाही. आणि सामान्य माणसाच्या हातात काहीच नाही. आपण सारे याच परिस्थितीत आहो. कुठेतरी एक बोट एका बटणाजवळ पोहोचलेले आहे. ते बोट बटणावर दाबले गेले की संपले.

यावर उपाय माहीत असलेल्या कुणा तज्ज्ञाची वाट पाहणे हेच आपले प्राक्तन आहे. असा कुणी येईल का? आज तरी या आशेला जागा नाही.

शेवटी साराच काळोख होतो आणि चित्रपट संपतो. पाहता पाहता मनातही काळोख दाटलेला असतो...

नो मॅन्स लॅंड

दिग्दर्शक : डेनिस टेनोविक
कथा, पटकथा आणि संगीत : डेनिस टेनोविक
छायाचित्रण : वाल्टर एन्डे
संकलन : फ्रांसेस्का कावेली
प्रमुख भूमिका : ब्रांको ड्यूरिक, रेने बिटोराजाक
कालावधी : 98 मिनिटे
प्रदर्शन : 19-9-2001

काही पारितोषिके :  

Best Foreign Language Film, 2002 74th Academy Awards
Best Foreign Language Film, 2002 59th Golden Globe Awards
Best Screenplay Award, European Film Academy
Best Screenplay, 2001 Cannes Film Festival

- विजय पाडळकर
vvpadalkar@gmail.com 

(लेखक मुख्यतः अभिजात साहित्य व चित्रपट या विषयांचे अभ्यासक असून त्यांची 27हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.)


नो मॅन्स लॅंड या सिनेमाचा ट्रेलर 

 

Tags: युद्ध रशिया युक्रेन संयुक्त राष्ट्रसंघ Load More Tags

Comments:

नामदेव माळी

सिनेमाचे समर्पक विश्लेषण केले आहे. अशा लेखमालेची गरज आपण नेमकी ओळखली आहे. यातून संवेदनशील माणसे विचार करतील . लहानांना असे चित्रपट दाखविल्यास युद्ध वाईट असतं हे मुलंच्या मनात पक्कं होईल .

Add Comment